हम जो चलने लगे...


एअरपोर्टहून हॉटेलकडे जाताना टॅक्सीवाला पोरगेलासाड्रायव्हरभयाण  टॅक्सी पळवत होता. मी हातात गुगल मॅप धरून रस्त्याकडे डोळे लावून बसले होते. इकडून तिकडून गाड्यांना कट मारत, ह्याचा त्याचा कान पिळत टॅक्सी हाकता हाकता आदळलाच पठठया मागून एका कारवर. मी घाबरले. आता राडा होणार म्हणून मी पण मनाची तयारी केली. पुढची गाडी बाजूला लागत होती, हा बाजीराव आपली धन्नो तिच्या मागेलावत होता. गाडीतून एक साधारण चाळीशी पार केलेली बाई उतरली. शांतपणे पोराच्या तोंडाजवळ येऊन म्हणाली, "चलाने नहीं आती? जरा धीरे और देखके नहीं चला सकते?  ध्यान किधर है तुम्हारा?" तोपर्यंत इस शेर का कुत्ता हो गया था. "सॉरी मॅडम, गलती हो गयी, माफ कर दो" म्हणत तो शरण गेलाच होता तेवढ्यात ती बाई म्हणते, "खुद तो अच्छी गाडी चला नहीं सकते और उपर से कहते हो कि औरतों को गाडी चलानी नहीं आती. वाह रे पुरुषोंकी सत्ता!" गाडी जोशात पळवणाऱ्या त्या पुरुषाला शांतपणे मान डोलावायला लावून ती बाई आपल्या गाडीत बसून निघून गेली.
स्त्रिया गाडी चालवू शकत नाही आणि रोजगार म्हणून तर या क्षेत्राकडे अजिबात पाहू शकत नाही हा समज मोडून स्त्रियांना अपारंपरिक रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील या विषयावरच्या परिषदेसाठी दिल्लीत आल्या आल्या घडलेला हा पहिला प्रसंग. बायकांनी कशी काही ठराविक कामेच करायला हवीत आणि त्यांच्याकडेच पारंपरिक रोजगाराची संधी म्हणून बघायला हवे असा समज खोडत फक्त पुरुषांच्या मानल्या गेलेल्या क्षेत्रात बायकासुद्धा काम करू शकतात, पैसे कमवू शकतात हा विचार घेऊन दिल्लीतील आझाद फौंडेशन काम करते. बायकांना आणि मुलींना चारचाकी गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना एका travel company सोबत जोडून देते. या बायका फक्त दिल्लीतच नाही तर कलकत्ता, इंदोर, भोपाळ जयपूर अशा शहरांमध्ये ‘सखा कॅब्ज्स’ चालवतात आणि ‘सखा ड्रायव्हर’ म्हणुन ओळखल्या जातात. महिलांसाठी अपारंपरिक रोजगार या विषयावर काम करणाऱ्या किंवा विचार करणाऱ्या जगभरातील लोकांना या आंतरराष्ट्रीय परिषदेने दिल्लीत एकत्र आणले आणि या विषयावर अनेक अंगांनी चर्चा झाली.
खरं तर काम, मग ते पुरुषाने करू देत, स्त्रीने करू देत, गरिबाने अथवा श्रीमंताने, त्यात श्रम हे असतातच. पण पूर्वीपासून आपण पुरुषांनी करायची कामे आणि स्त्रियांनी करायची कामे अशी विभागणी करून स्त्रियांना एकाच प्रकारच्या कामांमध्ये गुंतवून ठेवत आलो. बाईने घरातील व्यक्तींची-मुलांची काळजी घ्यायची, त्यांना खाऊपिऊ घालायचे, सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आणि हे सगळे सांभाळून बाईच्या जातीला शोभेल अशी एखादी सुरक्षित नोकरी करायची अशी आधुनिक मध्यमवर्गीय स्त्रीकडून साधारण अपेक्षा असते. ही सुरक्षित नोकरी सुद्धा खरं तर बाईसाठी खूप मर्यादित संकल्पना आहे. मग बायकांनी शिक्षिका व्हायचे, अंगणवाडी सेविका व्हायचे, कपडे शिवायचे, पापड-मसाला-लोणची बनवण्याचा व्यवसाय करायचा किंवा फार फार तर आताच्या काळात डॉक्टर झाले तर सर्जन न होता भूलतज्ज्ञ व्हायचे आणि इंजिनिअर झाले तर सिव्हील किंवा मेकॅनिकल बाजू न निवडता संगणक किंवा ईएनटीसी इंजिनिअर व्हायचे असा हा आधुनिक ट्रेंड. पण पोलिस बायका, सिक्युरीटी गार्ड बायका, फायर वूमन, taxi ड्रायव्हर, वैमानिक बायका, ट्रेकर वूमन असे प्रोफेशन्स बायकांपासून एकत्र दूरच राहिले किंवा बायका तिथपर्यंत पोहचल्याच नाही. अशाच आतापर्यंत फक्त पुरुषांच्या समजल्या गेलेल्या जागांवर काम करणाऱ्या अनेक धाडसी बायका इथे भेटल्या आणि एकेकीची गोष्ट ऐकताना ही एखाद्या मोठ्या बदलाची सुरुवात तर नसावी ना असंच जाणवत होतं.
आझाद फौंडेशनच्या माध्यमातूनच दिल्लीत taxi चालवणारी एक कोवळी पोर ‘झीनत’. तिच्याकडे आणि ती चालवत असलेल्या गाडीकडे बघत असताना ठळक विरोधाभास जाणवतो. पण ही मुलगी ज्या धाडसाने तिच्या या वेगळ्या निर्णयाबद्दल बोलते ते कमालीचे आशादायी आहे. बारावी पूर्ण झाल्यानंतर आईला कॅन्सर झाल्याचे कळले आणि एका क्षणातच किशोरवयीन फेज संपून झीनत एकदमच मोठी झाली. आईच्या उपचारासाठी मोठाच पैसा उभा करायचा होता. आईवडिलांनी सांगण्याआधीच आता आपल्याला शिक्षण सोडून काहीतरी झटपट पैसे मिळवून देणारे काम शोधावे लागेल हे तिने मनोमन मान्य केले आणि तयारीला लागली. घरातल्या लोकांनी, मैत्रिणींनी, नातेवाईकांनी सगळ्यांनीच एखादा शिवण क्लास कर असे सांगितलं आणि झीनत शिवण क्लासला गेली सुद्धा. पण त्याबद्दल बोलताना ती सांगते, ‘मुझे वो करना ही नही था. सालोंसे औरतें यहीं काम करते आ रहीं हैं. मुझे कुछ अलग करना था. लेकीन घर में  पैसों की जरुरत थी, तो मैंने सोचा कपडे सीके जल्दी पैसे मिल सकते है. लेकीन वहाँ मेरा मन नहीं लगा तो मैने छोड दिया. और आझादके साथ मिलके गाडी चलाना सीख लिया’ सुरुवातीला तिने निवडलेल्या या मार्गासाठी घरातून तिला फारसा पाठिंबा नव्हता. पण निश्चयाने ती तिच्या निर्णयावर टिकून राहिली. झीनत म्हणते इस गाडी चलानेवाले काम ने मुझे सिर्फ पैसाही नहीं दिया, बल्कि हिम्मतभी दी. खुद की क्षमताओं पर विश्वास करना सिखाया’ आता झीनत गेल्या ३ वर्षांपासून दिल्लीत सफाईदारपणे गाडी चालवते. ती म्हणते, ‘जब लाईन में टैक्सी खड़ी होती है तो पॅसेंजर वही टैक्सी में बैठते हैं जिसमे आदमी ड्रायव्हर हो, हम लडकियाँ भी उन्हें अच्छे से पहुंचा सकतीं हैं, इसपर उनका यकीन नहीं होता. तब बुरा लगता है. लोगों ने भी अब हमारा स्वीकार करना चाहिए.’ हे सांगताना झीनतच्या चेह-याचा रंग करडा होतो. ती म्हणते की आम्ही बायका आणि मुली गाडी चालवायला तर शिकलो, पण इथल्या रस्त्यांनी अजुन आम्हाला स्वीकारलंनाही. 
आपल्याकडचे रस्ते प्रचंड पितृसत्ताक आहेत. त्यांनी महिला ड्रायव्हर्स या प्रतिमेचा विचारच केलेला नाही. सगळीकडे पुरुषांसाठीच स्वच्छतागृहे असतात, पुरुषच सिक्युरिटी गार्ड असतात, पुरुषांच्याच टॅक्सीप्रवास करणे निवडणारे प्रवासी जास्त असतात. माझ्यासारख्या अनेक मुलींनी या क्षेत्रात यायला हवे असेल तर आपल्याला तसे वातावरण तयार करावे लागेल. फक्त झीनतच नाही तर तिथे भेटलेल्या इतरही सखा ड्रायव्हर्सशी बोलताना हेच ऐकू येत होते. कलकत्त्यात टॅक्सीचालवणारी पल्लवी नावाची तृतीयपंथीय मुलगी तर म्हणते की मला समाजाने असंही स्वीकारलेलंच नाही  आणि त्यात मी असं काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं काम करते म्हणजे आणखीच प्रवाहाच्या बाहेर. एकवेळ बायका आणि मुलींसाठी वातावरण बदलण्याची शक्यता तरी आहे पण माझ्यासाठी गोष्टी आणखीच हाताबाहेर आहेत. मला फक्त टाळ्या वाजवून पैसे मागताना पाहण्याची लोकांना सवय आहे. माझ्या हातात गाडीचे स्टिअरींग पाहून तर अनेकांना धक्काच बसतो. महिला ड्रायव्हर्सचे प्रश्न जिथे संपतात तिथे माझे  प्रश्न सुरु होतात. २६ वर्षांची पल्लवी कलकत्त्यातील पहिली तृतीयपंथी ड्रायव्हर आहे. ती म्हणते ही संख्या वाढली तर बळ मिळेल तग धरण्यासाठी.
या सगळ्या गोष्टी ऐकून नकळत ग्रॅज्युएशननंतर पुढे पत्रकारिता करायची हे ठरवताना ‘हे धोकादायक क्षेत्र असते. मुलांनीच असल्या गोष्टी कराव्या. मुलींनी नाही.’ असं म्हणत मुलींसाठी सुरक्षित क्षेत्रे सुचवणारे अनेक चेहरे डोळ्यासमोर तरळले. आणि खरंच बाईला असा काहीतरी अपारंपरिक निर्णय घेऊन त्यात सन्मानाने जम बसवायला लागणारे धाडस झीनत आणि पल्लवीच्या रुपात शेजारी बसलेले पाहिले.
महिलांनी आपल्यावर लागलेल्या पारंपरिक कामांचे लेबल काढून अशा नेहमीच्या मानल्या न गेलेल्या क्षेत्रांमध्ये काम करणे सगळ्या बाजूंनी किती नवीन आणि आव्हानाचे असु शकते याची खरी जाणीव या परिषदेत भेटलेल्या सगळ्या अपारंपरिक काम करणाऱ्या महिलांचे अनुभव ऐकताना होत होती. त्यांनी असा काहीतरी मार्ग निवडून बदलासाठी एक हात पुढे केला आहे. हे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सगळ्यांनी समाज म्हणुन दुसरा आधाराचा, स्वीकृतीचा हात आता पुढे केला पाहिजे याच विचारात मी परिषद संपवून बाहेर पडले. बाहेर टॅक्सी आणि रिक्षांची मोठीच मोठी रांग लागली होती. त्यांच्या ‘किधर जाना है मॅडम?’ कडे दुर्लक्ष करून मी खिशातला फोन काढला आणि ‘सखा कॅब’ बुक केली. झीनत आणि पल्लवी सारख्याच दिसणा-या एका चुणचुणीत सखा ड्रायव्हरच्या साथीने माझा परतीचा प्रवास सुरु झाला आणि गाडीत एफ.एम वर गाणं सुरु होतं,
बैठे बैठे ऐसे कैसे कोई रास्ता नया सा मिले,
तू भी चलें मैं भी चलूँ होंगे कम ये तभी फासले
आओ तेरा मेरा ना हो किसीसे वास्ता,
आओ मिलो चलें जाना कहाँ ना हो पता
हम जो चलने गे चलने लगे हैं ये रास्ते ......’
  

 काजल बोरस्ते


नाशिकमधील अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या सामाजिक संस्थेत ग्रामीण भागातील मुलींच्या आयुष्यावर सुरू असलेल्या कृतीसंशोधनाचे काम करते. त्याच बरोबर पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि महिला व त्यांचे हक्क या विषयावर मुक्त पत्रकार म्हणून लेखन करते. 



कुंपण



लोखंडी तारांच्या कुंपणात
कित्येकदातरी सुरक्षित असणार ती
कुंपणातच रंगते, बागडते
बनून राहते कैदी कुंपणाची
जेव्हा वयात येते तेव्हा
होते डोईजड ती
म्हणूनच कित्येक वेळा
पडतात डोईवर अक्षता
अन बांधून दिली जाते
कोणाच्यातरी दावणीला
सोडून जाते एक कुंपण
अन होते दुसर्‍या कुंपणात रवानगी
फरक काय तो एवढाच
कैदी तीच राहते
बदलत राहते फक्त कुंपण
नवीन कुंपणात गुंफते ती
स्वछंदपणे गगनात उडण्याची स्वप्ने
जी तिला पाहायला मिळालीच नव्हती कधी
पण होतो राजरोस चुराडा स्वप्नांचा
जेव्हा रोजच्या एकसूरी जगण्याला कंटाळून

ती लांघू पाहते निरधास्तपणे
ही काटेरी लक्ष्मणरेषा
गळ्यात काळे मणी घालून स्वरक्षणार्थ
तेव्हा ती पुन्हा होते रक्तबंबाळ
या नवीन कुंपणाच्या काटेरी तारांनी
बये...
फक्त कुंपणच बदललय गं
लोखंडी काटेरी तारा तर त्याच आहेत.


प्रज्ञा भोसले 



नाझीपासून..... अयोध्येपर्यंत



रात्रीच्या अंधारात पिंगा घालणाऱ्या भेसूर ओळी

दिसेनाश्या झाल्या आहेत

दिवसाच्या लख्ख तापदायी उजेडात

मरून पडलेल्या आशाआकांक्षाच्या प्रेताने

भरून उरला आहे अवघा शवागर

माणसं एकमेकांना तुडवत आहेत

या विनाशकारी शहरात

माझ्यापुरते मेणबत्तीचे युद्ध

झाले आहे सपशेल अपयशी

सुरुंगाचे अनाठायी आवाज

घुमत आहेत कानात

नाझीपासून..... अयोध्येपर्यंत

वंदना महाजन


आपलेच आदीम सृजनत्व



एखादा घोड्यासारखा बेफाम
एखादा कोल्हयासारखा धूर्त
एखादा मोरसारखा नाचरा
एखादा पारव्यासारखा लोचट
बाईने खुशाल बाळगावे
पशू-पक्ष्यांच्या हिकमती शिकलेले
नर चार पाच
बागडू द्यावे त्यांना
हवे तसे, हवे तेव्हा
आपल्या मनाच्या रानात.
तिने
खुशाल घ्यावा आश्रय
खांडववनात,
भोगून घ्यावा
द्रौपदीच्या स्वप्नातला अज्ञातवास
स्वताहाच करावी
कांचनमृगाची शिकार
आणि
पुरवून घ्यावे
सीतेचे वनवासात अपुरे राहिलेले डोहाळे
शबरीची बोरे टाकावी थुंकून
आणि
चाखावी
तिला आवडणारी सफरचंदे
आदमच्या अपरोक्ष
एकटीने... मनसोक्त.
खणून काढाव्यात
रानटी, पोटभरीच्या मुळया
भूक लागल्यावर,
तरीही उपासमार झालीच
तर खाव्या मुंग्याही
लाल काळ्या रंगाच्या,
जांबुवंताशी मैत्री करून.
हक्काच्या काजव्यांची
वाट न बघता
पेटवावे
आपल्या गुहेतले दिवे
आवडत्या प्राण्याच्या चरबीचे वंगण घालून,
वंशाच्या दिव्यासाठी
जिवाची वात न करता
ओरबाडून घ्यावा उजेड
आपल्यापुरता... आपल्यासाठी.
खुशाल शिवावी
आपल्या आवडीची पर्णवस्त्रे
झाकावे
केवळ वाटतील तेच अवयव
किंवा
खुशाल मिरवावे
आपले करडे, नागडे सौंदर्य
आपल्याच मस्तीत
वनराजाच्या भूमिकेतून कोणी
सांगू लागला हक्क रानावर
तर
तिने बिनदिक्कत दाखवावे
आपल्यातले
आदिम रासवटपण,
पेटवावा धडाडता वणवा
निबीड विचारांचा
आणि
खुशाल करावा
त्या प्राण्याचा अधिवास भस्मसात
आपले काळेभोर घनदाट जंगल
संस्कृतीच्या भयापोटी
एकाच अर्धांग नरपुंगवाच्या
हवाली करण्यापेक्षा
बाईने ठेवावा
निसर्गाच्या ऋतुचक्रावर
दुर्दम्य विश्वास
आणि
निर्माण करावे
एक नैसर्गिक उत्फुल्ल अरण्य
आपलेच आदिम सृजनत्व पणाला लाऊन.

योगिनी राऊळ



जातपंचायतीमध्ये महिलांचा सहभाग

७३ व्या  घटना-दुरुस्तीनंतरपंचायत राज व्यवस्था लागू झाली. त्यात ग्रामसभेला अधिकार प्राप्त झाले. महिलांना ३३ टक्के आरक्षण  मिळाले; त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला प्रतिनिधी यायला लागल्या. पंचायतराज व्यवस्थेमध्ये महत्त्वाची तरतूद म्हणजे आदिवासी स्वशासन कायदा त्यात स्त्रियांचा  सहभाग. सन २००० मध्ये नाशिक येथे 'आदिवासी स्वशासन कायदा' यावर विचारमंथन  बैठकघेण्यात आली.  आदिवासी इतर जातीतील महिलांनी एकत्र येऊन अभ्यास केला की  आदिवासीस्वशासन कायदा काय आहे ? त्यात कोणकोणत्या तरतुदी आहेत ?
 संपत्तीवरमहिलांचा अधिकार, गौण वनउपज, गौण खनिज, स्थानिक  स्वराजसंस्थांमध्येमहिलांचा अधिकार, आरोग्य-शिक्षण, गावाची सार्वजनिक साधनसंपत्ती, बाजार असे  इतरहीमुद्दे चर्चेसाठी पुढे आले.  त्यातीलदोन मुद्दे अभ्यास करण्यासाठी  निवडण्यात  आले.  धानोरातालुक्यातीलमहिला संपत्तीवर तर कोरची तालुक्यातील महिला जात-पंचायतीमध्ये  महिलांचासहभाग ह्या विषयावर अभ्यास करणार असे ठरले प्रक्रिया सुरु झाली. दर  सहामहिन्यांनी  आढावाआणि पुढील नियोजनाच्या टृष्टीने एकत्र येणे  सुरुझाले. यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्था /संघटनाही सहभागी होत्या.
 पुढचीप्रक्रिया म्हणजे संपत्तीवर अधिकार. म्हणजे घरावर, शेतीच्या सातबारावर   गावाच्यासार्वजनिक संपत्तीवर अधिकार. अनेक अडचणी आल्यामुळे ही प्रक्रिया थांबली. मात्र जातपंचायतीमध्ये  महिलांचासहभाग वाढविण्यात चांगले यश प्राप्त झाले.
२००१ मध्ये गोंड समाजातील महिलांना जातपंचायतीच्या माध्यमातून सासरकडच्या संपत्तीवर अधिकार आणि योग्य न्याय मिळाला. विचार व्यक्त करण्यासाठी संधी दिली गेली.
गावांच्या पंचायतीमध्ये (विभागीय  पंचायतीत ) प्रत्येक गावातील १० महिला प्रतिनिधी घेतल्या आहेत. एकूण ९० महिला सहभागी आहेत.
६० गावांच्या राज्य पंचायतीमध्ये महिला प्रतिनिधी घेतल्या  आहेत आणि त्यांच्या मताचा आदर- सन्मान केला जात आहे.
पूर्वी  आदिवासी समाजामध्ये लग्न मुलाकडे व्हायचं . -  दिवस लग्न व्हायचं. त्यात येणारा  खर्च आणि वेळेचा हिशेब काढून, पूर्वीचे  नियम बंद करून दिवसांत  लग्न संपवायचं असं  ठरवलं .मुलगा-मुलगी दोघांकडे मांडव असतात. कुठल्याही प्रकारचा हुंडा मागितला किंवा दिला जात नाही.
गोंड /कवर आदिवासी समाजात ग्नाच्या वेळी एक  'चिकट' पद्धत आहे. तांदूळ, कपडे, पैसा इतर वस्तूंच्या स्वरूपात एकमेकांना  मदत करतात. त्यामुळे  कर्जबाजारीपणा जास्त प्रमाणात होत नाही. स्वतः  होऊन तयारी असल्यास सामूहिक लग्नालाही समाजमान्यता दिली आहे.  ही पद्धत दोन्ही  समाजांमध्ये आहे.
गोंड आदिवासी समाजात एक सांस्कृतिक कार्यक्रम होतो  'लयोर नाच'. त्याला साधारण ३० ते ४० हजार रुपये एका रात्री  खर्च गावाला यायचा. गावांनी अभ्यास केला की खायला अन्न नाही , गरीब आहोत असे म्हणतो आणि इतके  रुपये खर्च  करतो. दुसरे दिवशी आपल्याला काहीच मिळत नाही. अजून गरीब  होत चाललो आहोत. म्हणून ही  पद्धत बंद करण्यात आली.
कवर आदिवासी  जातपंचायतीचा जिल्हास्तरीय मेळावा २५ नोव्हेंबर २००७ला टेंभली येथे झाला. त्या ठिकाणी महाराष्ट्राची कन्या' पुरस्कार ऑक्टोबर २००७ रोजी 'नारी  समता मंच', पुणे यांच्याकडून मिळाल्याबद्दल समाजातर्फे माझा सत्कार करण्यात आला. त्याठिकाणी संधी साधून महिलांवर होणारी हिंसा, शिक्षण आणि  जन्मदरामध्ये स्त्रियांच्या गळतीचे प्रमाण आणि त्यांचे कारण काय आहे, तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देणारा कायदा २००५  याची मदत आपल्या व्यवस्थेमध्ये कशी घेता येईल, याविषयी मांडणी केली. आता प्रत्येक  मीटिंगला  प्रमुख अतिथी म्हणून महिलांना स्थान दिले जात आहे, तसेच आपलं मत व्यक्त करण्यासाठी संधी दिली जात आहे.महिलांच्या पुढाकाराने कोरची येथे कवर समाज समितीच्या बैठक शिवमंदिराकरिता  जागामिळवणे यात महिलांनी पुढाकार घेतला.१५ नोव्हेंबर २००७ रोजी भूमिपूजन कार्यक्रम वार्षिक मूल्यांकन बैठक झाली.तिच्यात आर्थिक  व्यवहारांव्यतिरिक्त इतर  गोष्टींचे  बारीक-सारीक विचार पडताळून बघितले आणि पुढे सर्वाना पटेल असे काम समाज करत असेल तर समाजाचा नक्कीच विकास होऊ शकेल असे मत राज्य पंचायत मीटिंगमध्ये व्यक्त करण्यात आले.त्यामुळे समाजाने सोशल ऑडिट दरवर्षी व्हायलाच पाहिजे म्हणून मान्यता दिली .
           कायदा आणि अभ्यासाचा आधार घेऊन सध्या सुरु असलेल्या प्रक्रिया खालीलप्रमाणे
        . घरावरपति -पत्नी दोघांची  संयुक्तनाव -नोंदणी
        . वन-अधिकार कायदा २००७च्या योग्य अंमलबजावणीसाठी महिलांचा पुढाकार .
        . मुलाचेनावामागे आईचे नाव सर्व कागदपत्रांमध्ये योग्यरितीने यायला पाहिजे यासाठी प्रयत्न .
        . गौणवनउपज गोळा खरेदी -विक्री करण्याचा अधिकार .
आदिवासी समाजात कायदा-अभ्यास प्रकिया सातत्याने सुरु असल्यामुळे आणि संवाद होत असल्याने संपत्तीवर अधिकार , मुलींचे  शिक्षणाचेप्रमाण आणि  शिक्षणाविषयीविचारप्रणालीमध्येबदल  दिसतआहे.




कुमारीबाई जमकातन


मुळात छत्तीसगडच्या आदिवासी भागातल्या असल्या तरी गेली अनेक वर्षे गडचिरोलीत वास्तव्य आणि काम. महिलांचे बचतगट, किशोरी प्रशिक्षण आणि वनहक्क या विषयातील कामांसाठी नारी समता मंच, लोकसत्ता दुर्गा सन्मान असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित.