दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती

महाराष्ट्रातील पुरोगामी धर्मनिरपेक्ष स्त्री संघटना-गट-कार्यकर्त्यांचा संयुक्त मंच

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याचे पालन न केल्याबाबत कडक कारवाई करावी
दिपाली चव्हाण, हरिसाल तेथील तरुण वनक्षेत्रपाल हिच्या आत्महत्येबाबत स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती तीव्र खेद आणि संताप व्यक्त करीत आहे.
वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार (उपवन संरक्षक, गुगामल विभाग, मेळघाट) यांनी केलेल्या मानसिक आणि लैंगिक छळामुळे दिपालीने आत्महत्या केली. वंचित समाजातून मेहेनतीने पुढे आलेली दिपाली चव्हाण निडर आणि तडफदार अधिकारी होती. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याची (२०१३) शासनाच्या एका महत्वाच्या खात्यामध्येच अंमलबजावणी होत नसल्याने आणि त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने असा आत्महत्येचा प्रकार घडतो ही बाब अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दिपालीने छळाचे अनेक प्रसंग लिहून ठेवले आहेत. उपवनसंरक्षक शिवकुमार यांनी अवमानकारक आणि अशोभनीयभाषा वापरणे, कर्तव्य बजावताना कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा न पुरवणे, इतर अधिकाऱ्यादेखत पाणउतारा करणे अशा अनेक गोष्टी त्यात आहेत. गरोदरपणामध्ये प्रवास करण्याची सक्ती केल्याने त्यांना गर्भपात करावा लागल्याचे ही दिपाली यांनी पत्रात नमूद केले आहे. शिवकुमार यांच्या ज्याकृत्यांचा दिपाली यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम झाला आणि त्यांची सुरक्षा धोक्यात आली, ती सर्व कृत्ये कायद्याने गुन्हा आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांना दिपालीने छळाबाबत मीहिती देऊनही त्यांनी त्यावर काहीही केले नाही, कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत हे भयानक वास्तव यामध्ये दिसते आहे. समोर आलेल्या घटनाक्रमातून हे स्पष्ट होते आहे की अशा छळाच्या घटना हाताळण्यासाठी, कायद्यानुसार अनिवार्य अशी अंतर्गत समिती गठित करण्यात आलेली नाही किंवा ही समिती कृतीशील नाही. तसेच दिपालीची तक्रार या समितीकडे योग्य त्या कारवाईसाठी वर्ग करण्यात आलेली नव्हती. वनविभागामध्ये इतर शासकीय खात्यांच्या तुलनेत महिला कर्मचारी कमी संख्येने आहेत, त्याही विखुरलेल्या भौगोलिक क्षेत्रात काम करतात, अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक आहे.

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या पालनाकडे केलेल्या या अक्षम्य दुर्लक्षाचा आम्ही तीव्र निषेध करतो. कायद्यानुसार श्री शिवकुमार यांच्यावर कारवाई होऊन त्यांना शिक्षा होईल अशी आमची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त आम्ही मागणी करतो की -
१. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत समुचित शासनाने गुगामल वनविभागाला, या कायद्याचे पालन न केल्याबद्दल तातडीने कारणेदाखवा नोटीस पाठवावी आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना दंड ठोठवावा. श्री रेड्डी यांची फक्त बदली करणे पुरेसे नाही तर कायद्यानुसार कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर सुद्धा आरोपपत्र दाखल करण्यात यावे.

२. कायद्यानुसार अंतर्गत समिती गठीत केली किंवा नाही याबद्दल समुचित शासनाने तातडीने चौकशी करावी आणि लैंगिक छळ प्रतिबंध व निवारणासाठी खात्या तर्फे उपाययोजना केल्या जातात किंवा नाही याचीही चौकशी करावी. अमरावती जिल्हा अधिकारी यांच्याकडे खात्या तर्फे या कायद्याप्रमाणे वार्षिक अहवाल दाखल झाला का तसेच अहवालाप्रमाणे कायद्याची अंमलबजावणी होते आहे किंवा कसे हे ही तपासण्यात यावे. सदर चौकशीचा अहवाल जाहीर करून इतर खात्यांसाठीही उदाहरण घालून देण्यात यावे.

३. महाराष्ट्र शासनाने तज्ज्ञांची स्वतंत्र समिती नेमावी. समितीने वन खात्यात कार्यरत महिलांशी संवाद साधून लैंगिक छळाबाबतची परिस्थिती जाणून घ्यावी आणि त्यानुसार या समितीने सुरक्षेसाठी उपाययोजना सुचवाव्यात, ज्याची अमलबजावणी तातडीने व्हावी.

४. महाराष्ट्र सरकारने आपल्या सर्व आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या पालनाचा आढावा घेऊन तो अहवाल जाहीर करावा. तसेच अंतर्गत समितीची माहिती, कार्यकक्षा, अधिकार आणि कार्यपद्धती तसेच या कायद्याबाबात जाणीव जागृती साठी त्वरित पावले उचलावीत.


दिपाली यांचा जोडीदार राजेश मोहिते, तिची आई शकुंतला चव्हाण व इतर कुटुंबियांच्या दु:खाशी आम्ही सहवेदना व्यक्त करतो. दिपालीप्रमाणे छळ सहन करावा लागलेल्या इतर स्त्रियांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी छळाविरोधात तक्रार करावी व छळाचे प्रकरण योग्य रीतीने हाताळले जात नसल्यास महिला संघटनांची मदत घ्यावी.

२७ मार्च २०२१

 

मार्च 2021

‘पुन:स्त्रीउवाच’ ह्या डिजिटल प्रकाशनाला सुरुवात करून दोन वर्षं झाली. त्या निमित्ताने 5 मार्च 2019 या दिवशी उद्घाटनाच्या प्रसंगाच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. ‘पुन्हास्त्रीउवाच’शी जोडलेल्या सर्व लेखक आणि वाचकांबद्दल कृतज्ञता आहेच, तरीही आवर्जून ५ मार्च हा दिवस ‘साजरा’ करावा अशी परिस्थिती आणि मनस्थिती मात्र नाही! उलट बराचसा असंतोष आणि काहीशी हताशाच वाटते आहे. माझ्या मनातल्या भावनांचा कल्लोळ नेमक्या शब्दात व्यक्त करणारे ‘स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती’ चे हे पत्रक समोर आले. यात माझ्यासारख्या अनेक स्त्रीवादी कार्यकर्त्यांच्या भावना त्यात व्यक्त झालया आहेत. म्हणून तेच पत्रक शेअर केले आहे. https://punhastriuvach.blogspot.com/2021/03/blog-post.html 

गेल्या दोन वर्षांपासून ‘पुन्हास्त्रीउवाच’ सोप्या भाषेत मराठीतून स्त्रीवादी मुद्दे सातत्याने मांडत आहे. डिसेंबर 2020 च्या शेवटच्या आठवड्यात, गेल्या वर्षभरात हाताळलेल्या मुद्यांचा आढावा मांडून वाचकांकडून सूचना मागवल्या होत्या. त्या आवाहनाला वाचकांनी whatsapp आणि फेसबुकवर भरपूर प्रतिसाद दिला. त्या सूचना लक्षात घेऊन ‘पुन्हास्त्रीउवाच’ वरील पोस्टस् च्या स्वरूपात काही बदल करायचे नियोजन केले आहे.

त्यातला एक बदल म्हणजे ‘पुन्हास्त्रीउवाच’ वरती पॉडकास्ट ला सुरुवात करत आहे. पहिल्या पॉडकास्ट मध्ये काही स्त्रीवादी कविता सादर केल्या आहेत. https://soundcloud.com/vandanakhare/eegus7sp2npx

यापुढे यात मुलाखती, गाणी, कथा, श्रुतिका अशा विविध स्वरूपातला स्त्रीवादी आशय मांडला जाणार आहे, तो देखील अवश्य ऐका.

त्याशिवाय स्त्रीवादी कथांचा शोध देखील सुरू होता, परंतु गेल्या दोन वर्षात फारच कमी कथा वाचकांसमोर ठेवता आल्या. स्त्रीवादी आशयाच्या नव्या अप्रकाशित कथा मिळवण्यासाठी #गोष्टबदलाजगबदलेल हे आवाहन फेब्रुवारी महिन्यात केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्या गोष्टी आल्या त्यापैकी काही गोष्टी या महिन्या पासून प्रकाशित करायला सुरुवात करणार आहे. या आवाहना विषयी अधिक माहिती इथे वाचता येईल. आणि ‘गोष्टबदलाजगबदलेल’ ह्या लेबल वर क्लिक करून सगळ्या गोष्टी वाचता येतील. नवनव्या स्त्रीवादी गोष्टी वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवत रहा.

वंदना खरे 

गुलिस्ताँ – अनुजा संखे

दिनाकाकासोबत नंदिनी हवेलीच्या समोर उभी होती. धुळीने माखलेला चेहरा, घामेजून, ओले झालेले कपडे आणि दिनाकाकाच्या हाती तिचं सामान असलेली पिशवी. तिच्या चेहऱ्यावरून ओघळत असलेला घाम आपल्या दोन बोटांनी निपटत दिनाकाका म्हणाले, “बेटा आता हेच तुझं घर. आपलेपणाने काम कर आणि नीट रहा.”
नंदिनीला आजारी आई आठवली. डोळ्यात जमा होणारं पाणी तिने निकराने मागे सारलं आणि हवेलीकडे स्वच्छ नजरेने पाहिलं. हवेली सुंदर होती. पांढरीशुभ्र इमारत आणि त्यावर चॉक्लेटी रंगाची किनार. किती सुंदर दिसत होतं ते घर. आणि हवेलीला वेढून असलेली बाग तर तिच्या मनात एकदम भरलीच. कितीतरी रंगांचे गुलाब, जाई-जुईचे वेल, शेवंतीचे ताटवे, अगदी बाहेरच्या बाजूला असलेली चार सोनचाफ्याची मोठी झाडं. नंदिनी मोहोरली. दोन्ही डोळ्यानी हवेलीच्या प्रवेश दारातून जितकं पाहता येईल तितकं तिने पाहिलं.

“क्यों? पसंद आए फूल?” मांजींच्या प्रश्नाने तिची तंद्री भंगली. तिने सावरून त्यांच्याकडे पाहिलं. त्या मोकळं हसल्या. नंदिनीला मनातले ५०% प्रश्न सुटल्यासारखं वाटलं. त्यांनी राधाक्काला बोलावून तिची व्यवस्था लावायला सांगितलं. गरम पाण्याने न्हाऊन, थोडंसं खाऊन आईच्या आठवणीत नंदिनी त्या रात्री झोपली. दुसऱ्या दिवशी उठून काम करण्याची निराळीच ओढ तिला लागली होती. मांजींनी दिनाकाकाकडे दिलेले तिच्या आईच्या उपचारासाठीचे पैसे तिच्या डोळ्यात नाचत होते.

“आपण आईच्या जवळ राहून तिचे उपचार करू शकत नाही पण, इथे काम करून भरपूर पैसे पाठवून दिनाकाका करवी तिचं औषधपाणी करू शकतो” हे मनात घोळवत ती गाढ झोपली.

आदल्या रात्रीच राधाक्कांनी तिला तिची कामं समजावून दिली होती. तरी, पहिलाच दिवस आणि हवेलीचा एवढा रगाडा म्हटल्यावर राधाक्कांचं तिच्यावर बारिक लक्ष होतं. हवेलीत मांजी, राधाक्का, राणासिंगजी, त्यांची पत्नी सरस्वतीदेवी आणि त्यांचा कॉलेजला जाणारा एकुलता एक मुलगा राज असे सगळेजण असायचे. सकाळी उठून हवेली झाडून घेणं, अंगणात झोडलोट करणं, मग चहा घेऊन अंघोळ उरकणं. तोपर्यंत राधाक्कांचा नाश्ता बनवून तयार असायचा. साडेआठ झाले की, सर्व कळ दाबल्याप्रमाणे डायनिंग टेबलाशी गोळा व्हायचे. प्रत्येकाची खुर्ची ठरलेली. ते येऊन बसले की, नंदिनी राधाक्कांच्या देखरेखीखाली सर्वांना नाश्ता देई. मग, त्या दोघी आणि दोघं वॉचमन अशी ती चार गडीमाणसं खाऊन घेत. संध्याकाळी माँजींसोबत नंदिनी बागेतली फुलं गोळा करायला जायची. पहिल्याच दिवशी तिची नजर जाईल तिथपर्यंत फुललेल्या बागेने तिच्या मनाचा ठाव घेतला होताच. म्हणूनच अंगण झाडणं तिला आवडे. तिचं ते हरवून बाग पाहणं मांजींनीही पहिल्याच दिवशी हेरल्याने त्या तिला सोबत घेऊनच फुलं गोळा करत. नंदिनी केळ्याचं पान घातलेल्या टोपलीत सुवासिक, सुंदर फुलं गोळा करे. मांजींच्यासाठी सुंदर हार गुंफे. उरलेल्या फुलांची कधी वेणी बनवे तर कधी गजरा बनवून तो सरस्वतीदेवींना देई किंवा राधाक्कांच्या केसात माळे. मांजी नंदिनीचं मन लावून काम करणं पाहत होत्या. फुलांत गुंतणं पाहत होत्या.

हवेलीच्या मागच्या बाजूला फक्त मोगऱ्याचे वेल चढवलेला मंडप होता. ती तिथे जायची पण, ती फुलं मांजी पूजेत फारशी वापरत नसत. तिला वाटायचं, “आपण ही फुलं खुडावीत आणि त्यांचं काहीतरी करावं. गजरे, हार, माळाच माळा.”

तिच्या खांद्यावर हात पडला तशी ती दचकली. मागे वळून पाहिलं तर, राधाक्का. त्यांच्या डोळ्यात काहीशी नाराजीच दिसली. “कसलंही वेड बरं नव्हे. चल कामं बाजूला सारून बागेत फिरायला तू हवेलीची कन्या नाहीस.” त्यांनी तिच्या डोळ्यात उमलू पाहणारं स्वप्न वास्तवाचं भान देऊन निपटलं. दुसऱ्या दिवशी राणासिंग आणि सरस्वतीदेवींच्या लग्नाचा २५वा वाढदिवस होता. अनेक पदार्थ रांधण्याचं काम होतं. त्याची तयारी मात्र आजच करणं भाग होतं. नंदिनीच्या मदतीने झोपण्याआधीच राधाक्कांनी तयारी करून ठेवली. झाकपाक करून, आवरून रात्री उशिरा त्या दोघी झोपायला म्हणून आपल्या खोलीकडे वळल्या.

“आप लॉकडाऊन की बात कर के टालीये मत. २५वी सालगिराह पर इस हवेली में बंद रहना ठिक है. क्या कुछ भी स्पेशल नहीं होगा?” सरस्वतीदेवींचा तार स्वरातला आवाज शांतता चिरत गेला.

नंदिनीसाठी हे नविन होतं. राधाक्कांनी तिच्या दंडाला स्पर्श करून चलण्याची खूण केली. त्या दोघी जाऊन झोपल्या पण, घरातली ढवळलेली शांतता नंदिनीला अस्वस्थ करून गेली.

सकाळी नंदिनी अंगण झाडत असताना मांजींनी तिला जवळ बोलावलं. ती खाली मान घालून त्यांच्यासमोर उभी राहिली. तिच्याकडे आपादमस्तक पाहून मांजी हलकंसं, आपलंसं करणारं हसल्या, म्हणाल्या, “क्यों तुम्हें फूल पसंद हैं ना?” नंदिनीला त्यांच्या प्रश्ना मागचं प्रयोजन कळलं नाही पण, नजर उचलून हसऱ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत तिने होकारार्थी मान हलवली.

“पिछेवाले आंगन से मोगरे के फूल उतारो और मालाएं बनाना शुरू करो. तुम्हारा खानपान उधर ही आएगा.” नंदिनी आनंदली. आंघोळपांघोळ करून ती मागल्या मंडपाकडे गेली तर दोघा वॉचमनपैकी माधव मोगऱ्याची फुलं खुडत असल्याचं तिने पाहिलं. मोठे दोन टोपले भरून कळ्या होत्या. तिने माळा गुंफायला सुरुवात केली आणि ती त्यातच हरवली. नाश्ता झाला, जेवण झालं. नंदिनी वेड लावणाऱ्या सुगंधात ती न्हाऊन गेली. त्या फुलांचा गंध तिला लागला.

मांजींनी जेव्हा ‘बस झालं’ असं सांगितलं, तेव्हाच तिचे हात थांबले. त्या नंदिनीला घेऊन हवेलीच्या दर्शनी भागात आल्या. मोठी माळ निवडून दरवाजावर तोरणासारखी आडवी लावली. नंदिनीने त्याला छोटे छोटे गजरे अडकवले आणि मग संपूर्ण दिवाणखाना, डायनिंग टेबल सारं सारं फुलांच्या सजावटीने मोहरून गेलं.

मांजींनी राधाक्काला खूण केली. घरी बनवलेला केक राधाक्काने टेबलावर मांडला. मांजींनी राजला बोलावलं. फुलांचं डेकोरेशन पाहून तोही थक्क झाला. त्याने भराभर मेणबत्त्यांची सुंदर रचना केली. मग मांजींनी नंदिनीला सरस्वतीदेवीना बोलवायला पाठवलं. त्या अजूनही जरा रागातच होत्या.

“बहूजी, आप को माँजी ने तैयार होके बुलाया है रानासाहब के साथ.” नंदिनी खालच्या आवाजात म्हणाली. सरस्वतीदेवी फणकाऱ्यानेच उठल्या. नंदिनीने लगेच बेडशीट नीट केली आणि सरस्वतीदेवींना तयारी करण्यात मदत करू लागली. थोड्याच वेळात सरस्वतीदेवी तयार होऊन राणासिंग सोबत दिवाणखान्यात आल्या. त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. मोगऱ्याच्या लडी, गुलाबाचे गुच्छ, झेंडू शेवंतीच्या फुलांची रांगोळी आणि त्यावर मांडलेले दोन पाट. मांजींनी खूण केली आणि आनंदाने, उत्सुकतेने फुललेल्या चेहर्यानेच सरस्वतीदेवी आणि राणाजी पाटांवर बसले. राधाक्कांनी आरतीचं तबक त्यांच्या हाती दिलं. त्यांनी मुलाला आणि सुनेला ओवाळलं आणि तोंडभर आशीर्वाद दिला. केक कट करून, मुलाच्या निवडक मित्रांसोबत मजा करून, भरपेट खाऊन सरस्वतीदेवी आपल्या खोलीकडे जायला वळल्या.

काही वेळाने नंदिनीला सरस्वतीदेवीच्या खोलीत बोलावणं आलं. नंदिनी खोलीत जाऊन उभी राहिली. आजवर मांजींसमोर घर की मर्यादा कसोशीनं सांभाळणार्या सरस्वतीदेवींनी अचानक तिला गच्च मिठी मारली. त्यांनी आजच्या पार्टीचे फोटोज् वॉट्सॅप, फेसबूकवर टाकले होते आणि त्यावर भरभरून कमेन्ट्स येत होत्या. मैत्रिणींच्या ग्रूपवर तर फुलांची सजावट कोणाकडून करून घेतलीस? हाच प्रश्न वेगवेगळ्या शब्दात विचारला जात होता. त्या थबकल्या आणि मिठी सोडून त्यांनी आपला मोबाइल नंदिनीसमोर धरला. तिला लिहिता वाचता येत असलं तरी इंग्रजी जमत नसे. मग सरस्वतीदेवींनी सारं वाचून आणि समजावून सांगितलं. तिच्या चेहर्यावर स्मित उमटलं.

तिच्याकडे एकटक पहात त्या म्हणाल्या, “नंदिनी, मैं सोचती हूँ की अगर हम डेकोरेशन का बिजनेस करेंगे तो कैसा रहेगा? तुम फूल गुथना, हार, गजरे, गालिचे बुनना. हम बेचेंगे. शुरू में हमारे बगिचे से आते हैं, उतने फुलों में यह काम किया करेंगे. जरूरत हो तो फिर और मंगा सकते हैं.” नंदिनीने मान डोलावली.

सरस्वतीदेवींनी खूपच मनावर घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी मांजींना आपली बिजनेसची कल्पना समजावून सांगितली. दिवसभर मऊ बिछान्यात लोळणारी आपली सून काहीतरी करू पाहतेय याचाही त्यांना आनंद झाला होताच. त्यांनी हिरवा कंदिल दाखवला आणि सरस्वतीदेवींनी शेजारच्या बंगल्यातल्या बिट्टीच्या वाढदिवसाचं डेकोरेशन अत्यंत कमी दरात करून द्यायचं आपल्या मैत्रिणीला कबूल केलं.

अनाहूतपणे नंदिनीला जगण्याचं ध्येय मिळालं. सरस्वतीदेवींना आपल्या शिक्षणाचा उपयोग करण्याची संधी मिळाली आणि मांजींना सतत गुंतवून ठेवणारं देखरेखीचं काम मिळालं. राजने आपल्या घरातल्या या स्त्रियांच्या कामाला ऑनलाइन केलं आणि ऑर्डर्स मिळवायला त्याची मदत होऊ लागली. राणासिंग आर्थिक पाठबळ द्यायला सदैव त्तपर होतेच. सर्वांच्या प्रयत्नातून फुलू लागला - “गुलिस्ताँ”

हक्क - नेहा उजाळे

राणासिंग म्हणजे गावची बडी आसामी. पैशाअडक्याची काहीच कमतरता नव्हती. त्यांच्या धर्मपत्नी सरस्वतीदेवी अतिशय सुंदर, मायाळू, दानधर्म करणाऱ्या होत्या. गरीब घरातल्या असल्या तरी त्यांच्या सौन्दर्यावर राणासिंग भाळले होते. त्यांच्या संसारात एक खंत होती ती म्हणजे त्यांना मुलबाळ नव्हते. दहा वर्षे लोटली तरी घरी पाळणा हलला नव्हता. सरस्वतीदेवी कितीतरी वेळा नवऱ्याकडे दुसरे लग्न करा म्हणून लकडा लावायच्या. पण राणासिंग या गोष्टीला त्यांच्या बायकोच्या प्रेमापोटी तयार होत नसत.

इथे सरस्वतीदेवी मूल होत नाही म्हणून खचत चाललेल्या होत्या. एके दिवशी त्यांना एक कल्पना सुचली. त्यांचे डोळे लकाकले आणि त्यांनी पतीला कल्पना सांगितली. राणासिंगनी आधी नकार दिला पण घराला वारस मिळेल यासाठी ते तयार झाले.

सरस्वतीदेवी लागलीच आपल्या माहेरी गेल्या. घरची अतिशय गरीबी. सरस्वतीदेवी सगळ्यात मोठ्या. त्यांच्या पाठच्या तीन बहिणींच्या लग्नाचा खर्च राणासिंग यांनी उचलला होता. धाकटी अठरा वर्षांची बहीण लग्नाची होती. सरस्वतीदेवीनी आईवडिलांना आपल्या डावात सामील केले आणि धाकट्या बहिणीला घरी आणले. नंदिनी अठरा वर्षांची असली तरी उफाड्याची होती. तिचं वाडीतल्या महेशवर प्रेम होतं. दोघांनी घरात संमती घेऊन लग्न करायचे ठरविले होते. नंदिनी ताईकडे जाते आहे म्हणून महेश खूप दुःखी झाला. पण थोड्या दिवसाचा प्रश्न आहे असे वाटून ताईच्या मोठ्या वाड्यात राहायला जायचे म्हणून नंदिनी खूप खुश होती.

सरस्वतीदेवीनी नंदिनीला पैठणी साडी नेसवून, ठसठशीत दागिने घालून सजवले. इतकी भारी साडी आणि दागिने तिने कधी पाहिले नव्हते. साडी सावरत पूर्ण वाड्याभर गिरकी घेत होती. रात्री सरस्वतीदेवींनी तिला आपल्या शेजारी झोपवले. मऊ गादी आणि मऊ रजईमुळे तिला लगेचच गाढ झोप लागली. थोडयावेळाने नंदिनीला आपल्या अंगावर कोणीतरी असल्याचा भास झाला. ती ओरडणार तर तिचे तोंड घट्ट दाबले आणि तिचे कौमार्य कुस्करले गेले. तिला कळून चुकले ती व्यक्ती कोण आहे. तिचं प्रेम, तिच्या इच्छा - आकांक्षा एका क्षणात गळून पडल्या. अशा कितीतरी रात्री गेल्या. अखेर नंदिनीला दिवस गेले.

सरस्वतीदेवी आणि राणासिंगना खूप आनंद झाला. तिची एखाद्या राणीसारखी बडदास्त ठेवण्यात आली. आपल्या ताईचा आणि दाजींचा डाव तिच्या लक्षात आला होता. मूल झाल्यावर ताईच्या हवाली ते बाळ करायचे होते आणि नंतर एखादया रखेलप्रमाणे रहावे लागणार होते! नंदिनीने एक निर्णय घेऊन मनाशी पक्के ठरविले. ताई आणि दाजींकडून तिने वचन घेतले की, मूल झाल्यावर ती काय मागेल ते तिला मिळेल. त्या दोघांनीही आनंदाने तिला वचन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

यथावकाश नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ताई आणि दाजी हरखून गेले. ताई बाळाला आपल्याकडे नेण्यास आली, तेव्हा नंदिनीने दोघांना तिच्या वचनाची आठवण केली. दोघेही बोलले, ' तुला काय हवं ते माग '.

नंदिनी बोलली, " कपटाने तुम्ही दोघांनी मूल होण्यासाठी माझा वापर केला. माझ्या प्रेमाचा बळी गेला. घराला वारस हवा म्हणून माझं जीवन बरबाद केलं. बाहेरच्या जगात आता मला कवडीची किंमत नाही. माझ्या आईवडिलांनी आणि मोठ्या बहिणीने माझा कुठलाही विचार केला नाही. पण मला रखेल म्हणून जगायचं नाही. मला तुमच्या धर्मपत्नीचा दर्जा हवा आणि माझ्या मुलावर केवळ माझाच हक्क राहील. ताईचा तिच्या संसारात अधिकार कायम राहिला तरी मी रखेल म्हणून राहणार नाही."

नंदिनीचे शब्द ऐकून दोघांनाही आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. दोघांनी वारसाच्या हव्यासापोटी डोळ्यांवर पट्टी बांधली होती. भलं - बुरं कसलाही विचार केला नव्हता. आणि कोवळ्या पोरीचं आयुष्य कुस्करून टाकलं. नंदिनीला राणासिंगच्या धर्मपत्नीचा दर्जा मिळाला आणि तिचे मातृत्वही अबाधित राहिले.

 

 

गजरा - शुभांगी दळवी

 

"इकडं आड आनं, तिकडं हीर! अशी हालत झाल्या जिंदगीची. काय करावं, काय बी कळंना....."
संध्याकाळच्या वेळी दिनाकाका बोलला. त्याच्याऐवजी, भिंतीवर टांगलेल्या कॕलेंडरवरील श्रीदेवीच्या फोटोवर तिची नजर खिळली होती. हात श्रीदेवीच्या फोटोतील गजऱ्यावरून फिरत होता.
"काय म्हणतूया मी नंदू? ध्यान कुटं आसतंय तुझं?"
त्याची लेक नंदिनी गडबडून म्हणाली,"हंss…….... काय?"
"काय करतीस त्या नटीसंगं…..?" दिनाकाका भडकला.
"आरं, त्येss, गजरा. मला आसा गजरा लईss आवडतो. आणणार का मला एकदा आसा गजरा….?"
नंदिनीला प्रत्युत्तर न देताच, काहीतरी आठवल्यासारखा काका झटकन उठला. आपल्या मोडलेल्या पायाला काठीचा आधार देत, घराबाहेर जाऊ लागला.
"आता ह्या टायमाला कुटं निगालास, तात्या?" इति नंदिनी.
"आलोच. जरा, जाऊन येतो."
"लवकर ये. भाकरीचं जुगाड करते तवर......"
अंथरूणावर मुटकुळा होऊन पडलेल्या आपल्या आईला दोन घोट पाणी पाजून, नंदिनी चुलीकडे वळली. चुलीच्या धुराच्या वासानं लहान भावंडं तिच्याभोवती गोळा झाली. चुलीचा विस्तव फुलला, पटापट भाजलेल्या भाकरी भुकेल्यांच्या तोंडी पडल्यावर नंदिनीचा जीवही समाधानाने फुलून गेला.
"नंदूss, मी आलो बरं का! काय आसलं दुरडीत तर आण वाडून. दोन घास भागत्यालं पाणी प्यासाठनं....."
बाहेरून जाऊन आलेल्या दिनाकाकाने लेकीला हाक दिली.
लगबगीने तिने उरलेली भाकरी, भाजी, चटणीची चिमट ताटात घालून तात्यापुढे ठेवले.
"व्हयं, काय जमलं का कुटं कामाचं......?"
"अंss, नाई. एक गोष्ट हाय हातात. परss......"
"काय ते स्पष्ट बोल बा."
"त्योsss, खालच्या आंगचा किसना हाय नव्हं? त्येनं...."
"हां, त्येचं काय......?"
"आगं, त्येनं एक स्थळ आणलंय तुझ्यासाठनं. बक्कळ पैशेवाला शेट हाय म्हणतूया त्यो. वरच्या जातीचा बी हाय. आपून काय बी द्याचं नाय. समदं शेट बघणार लग्नाचं. चार दिसानं लगीन करायचं म्हणलाय शेट........."
दिनाकाका भरभरून बोलत राहिला. नंदिनीही त्याच्या बोलण्यावर विचार करत राहिली. त्या रात्री तिला झोप लागेना.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच किसन दिनाकाकाच्या घराबाहेर हजर झाला.
"एss दिनाकाका, हाईस नव्हं घरात?"
"हांss. यं, आत यं."
दिनाकाकाने किसनला बसायला घोंगडी पसरत नंदिनीला हाक मारली,
"आगं, नंदूss. च्या टाक. किसना आलाय."
रात्री पासून विचारांच्या गाडीत बसलेल्या नंदिनीने होकार दिला. काही मिनिटांत ती चहाचा कप घेऊन बाहेर आली.
"हं. घ्या काका, ह्यो च्या पिऊन घ्या."
"हां. आण, आनं यं बघू, हिथं आशी बस जरा." किसन बोलला.
"त्ये नव्हं काका, दळभद्री खोपटात राहणारी माणसं आम्ही. वरच्या जातीचा शेट, राणासिंग! काय म्हणून माझ्यासंगट लगीन करत आसंल."
नंदिनीने आपल्या विचारांची कोंडी फोडली.
"आगं पोरी, पैशेवाला शेट हाय राणासिंग. बायलीचं पॉटपाणी पिकलं नाय. तवा दुसरी बायकु हुडकतोय. जात-पातीचा ईचार नाय, पोरगी चांगल्या वळणाची पायजे म्हणला. तशी तुझी सय झाली मला."
"आवं काका, लई वयाचा असणार त्यो?"
"त्यो.....? आता "ते" म्हणायचं. दोन दिसात तुझा नवरा होत्याल राणासिंग. हाईस कुटं?" नंदिनीच्या आईनं बजावलं.
"तुला काय बी कमी पडणार नाई तिथं. कशाला कमी नाई त्या घरात. नुसती दिवाळी आसत्या रोज. शेटानी हुशील लगीन करून."
दिनाकाकाने समजूत घातली.
"आनं, गजरा बी मिळणार का घालायला….?" नंदिनी.
"ह्या भली थोरली बाग हाय राणासिंगजींची."
किसनने हात पसरत, मोठ्याने हसून सांगताच नंदिनीची कळी खुलली.
घरच्यांनी जवळजवळ सगळंच ठरवलं होतं. जेमतेम दहावीचं तिचं शिक्षण. सौंदर्य म्हणाल तर चार चौघींसारखीच सामान्य रूपरंग. आईचं आजारपण, अपघातात आलेले दिनाकाकाचे अपंगत्व. पाठची चार लहान भावंडं. मोठ्ठं शिक्षण तर सोडाच पण रोजच्या भाकरीची चणचण. नवा कपडा कधीतरीच मिळायचा. आई-वडीलांनी कुणाकडे हात पसरून आणलेले खाणे-पिणे व कपडे यातच समाधान मानत ती जगत होती.
बालपणाच्या आठवणींचे धागे जुळवून बघेपर्यंत नव्या आयुष्याची, लग्नाची वेळ दारात येऊन थांबली.
"बरं का नंदू? शहाण्यासारखी वाग. आमचं नाक खाली हुईल आसं काय करू नगं. मोठ्या खानदानी घरात निगालीस बाय माज्ये. धीरानं घे. सासरच्या चौकटीतनं भाईर पाय काडताना लई ईचार कर. शेटच आता तुझा देव हाईत. तुझ्या म्हायेराचा उध्दार करायचे हाईत ते. संभाळून घे समद्यासंगं……."
कपाळावर मुंडावळ्या बांधलेल्या नंदिनीला तिची आई शहाणपणाच्या चार गुजगोष्टी सांगत होती.
"व्हयं गं आये, समदं ध्यानात ठेवीन. काळजी करू नको."
लग्न आटोपून सुमन राणासिंगच्या गाडीतून रवाना झाली. गाडी एका मोठ्या वाड्याकडे जाऊ लागली तशी नंदिनी कौतुकाने गाडीच्या खिडकीला बिलगली.
"बाबोsss, एवढया मोठ्या वाड्याची शेटानी हाय व्हयं मी? नंदेss, नशीब काडलंस गं बाय!"
नंदिनी अशा विचारातच होती अन् राणासिंगनी गाडी वाड्याच्या शेजारी असणाऱ्या लहानशा घराकडे नेण्याचा हुकूम ड्रायव्हरला दिला. नंदिनी हिरमुसली. अनेक प्रश्नांच्या कल्लोळातच गाडीतून उतरून देवाजींच्या मागोमाग चालत त्या घरात गेली.
"हं, हे तुझं घर. रोज सकाळी वाडयात यायचं. दिवसभराची कामं उरकून पुन्हा तुझ्या घरात येऊन आराम करायचा. आमच्या सौ. म्हणजे सरस्वतीदेवी, सांगतील ते ऐकायचं. तुला काय हवं, नको ते सर्व त्यांनाच सांगायचं." राणासिंगनी सुनावले.
"व्हयं जी. आवो, पण तुम्ही….."
तिला मधेच थांबवून राणासिंग बोलले, "आमच्या सौं ची तब्बेत बरी नसते म्हणून तुला मोलकरीण म्हणून नेमलंय, हेच सौं ना वाटू देत. फार बोलत बसायचं नाही. फक्त काम करायचं नी इथं येऊन बसायचं. आणि हो, मला, अहो नाही तर शेटजीच म्हणायचं, समजलं?"
"हूं ………!!" इति नंदिनी.
त्यानंतर राणासिंगनी सांगितल्याप्रमाणे नंदिनीची दिनचर्या पक्की झाली. महिना सरल्यावर एका रात्री तिच्या दारावर "टकटक" झाली.
"अंss….? कोण…..?" नंदिनीने विचारले.
"आम्ही, शेटजी." बाहेरून उत्तर आले.
लगबगीने नंदिनीने दरवाजा उघडला.
झोकांडी खात राणासिंग आत शिरले.दारूच्या वासाने घर भरून गेले. नंदिनीने दरवाजा आतून बंद केला.
राणासिंगनी आपल्या सदऱ्याच्या खिशातून कागदाची पुडी काढून तिच्या हातात दिली.
"हं. घे. गजरा आवडतो ना तुला…..?" राणासिंगचा प्रश्न.
"व्हयं. लईss…….." नंदिनीचे भाबडे उत्तर.
"घे मग."
राणासिंगची वासनेने भरलेली नजर त्या गजऱ्यासोबतच तिच्या सर्वांगावर भिरभिरू लागली. तिने गजरा घेण्यासाठी पुढे केलेला हात खसकन ओढून त्यांनी तिला आपल्या बाहुपाशात आवळले.नंदिनी गुदमरली.
पण आईच्या गुजगोष्टींची आठवण होताच, शांतपणे शेटजींच्या पुढ्यात स्वतःला तन-मनाने अर्पण करून मोकळी झाली. त्यानंतर हे सतत घडू लागले. रात्र झाली की, दारूच्या वासात गजऱ्याचा दरवळ घुसमटून जाऊ लागला. हळूहळू तिला गजरा आवडेनासा झाला.
चार-पाच महिन्यातच नंदिनीला नवी चाहूल लागली. नेहमीप्रमाणे ती वाड्यात काम करू लागली. सरस्वतीदेवी झोपाळ्यावर बसून काहीतरी वाचत होत्या. थोड्या वेळातच नंदिनीला मळमळायला लागून उलटी झाली.
"काय गं? काय होतंय?" सरस्वतीदेवीनी विचारले.
"बाईसाहेब, म….मला दिवस गेलेत वाटतंय."नंदिनी अडखळली.
"हं, मग…..ठीक. त्यात विशेष काय? शेटजी तुझ्याकडे येतात म्हणजे हे होणारच." सरस्वतीदेवी शांतपणे म्हणाल्या.
"अं…..? म्हणजे तुम्हाला हे समदं……" नंदिनी.
"हो. मला माहिती आहे सगळं. मोलकरीण आहेस हे फक्त मला दाखवायला. तुझ्याआधी एकीला असंच आणलं. तिनं मुलगीला जन्म दिल्यावर हाकलून दिली. मग तुला आणली."
नंदिनी सुन्न झाली. आता गजरा दरवळायचा थांबला. तिने मनाशी निर्णय पक्का केला.
काही महिन्यांनी एका अंधाऱ्या रात्री नंदिनीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तोंड दाबून तिने साऱ्या वेदना सहन करत, बाळाची नाळ कापून स्वतःची व्यवस्थित 'सुटका' करून घेतली. ठरविल्याप्रमाणे तिने आपल्या लेकराला कापडात गुंडाळले आणि पहाट होण्याआधीच ती तिथून पसार झाली. तिला आता तो गजरा पुन्हा दरवळत ठेवायचा नव्हता.

सुफळ संपूर्ण - स्वातिजा मनोरमा

 

वाटेत सर्ववेळ दिनकर काका समजावत होते नंदिनीला, “माझा नाईलाज आहे ग पोरी, साऱ्या कुटुंबाला खायला घालायचं आहे. काम करायला लागेल पोरी पण सर्वांना जेवायला पोटभर मिळेल. चिंता न करता सगळे दोन घास खातील, कोणी उपाशी नाही राहणार” नंदिनी घाबरलेली होती, त्या मोठ्या दरवाजाच्या आवाजाने देखील काटा अंगावर आला होता. आता कायमचे त्या हवेलीत जायचे! डोळे गळत होते, हातपाय थरथरत होते - तिने त्या दिंडी दरवाज्याच्या आत डोकावून पाहिले आणि तिला नेत्रोबा दिसला. तिला फार विचित्र वाटले. असा देव घरात? माळरानावर, उघड्यावर वारापावसात भिजणारा नेत्रोबा तिने पाहिला होता. पण आज ती त्या घरात सजलेल्या, फुल वाहिलेल्या देवाकडे पाहत राहिली आणि तिच्या अश्रू भरल्या नजरेला दिसले - दोन हसरे डोळे, तिच्याकडे पाहणारे। ते डोळे हसरे होते, त्यामध्ये माया होती आणि तिला एकदम काहीतरी आश्वासक वाटलं. ते डोळे कोणाचे होते, तो कोण आहे हे तिला समजूनच घ्यायचे नव्हते. त्या हवेलीत पहिले पाऊल टाकल्याक्षणी तिला आलेले ओझे, वाटलेली भीती, मनावरचे दडपण क्षणात उतरले होते.

घरात इनमीनतीन माणसे होती, बाकी सारे नोकर. तिने माजीसाहेबांना बाकी काही विचारायच्या आधी नेत्रोबा बद्दल विचारले. त्या खुश झाल्या. ‘देवभक्त आहे पोरगी’ म्हणून त्यांना आनंद झाला. त्या नेत्रोबाचे रहस्य उलगडलेले नाहीय, ती घाबरलेली नाहीय तर खूप निष्पाप मनाने ती चौकशी करतेय – हे समजून त्यांना हायसे वाटले. पण त्याना कुठे माहीत होते की नेत्रोबा तर निमित्त होते. त्यांना माहीत नव्हते की तिला ‘तो’ दिसला होता. - त्यांचा व्यवहारीक पातळीवर वेडा ठरवलेला मुलगा ! त्याचे नेत्रोबाचे वाढते वेड, वाढत्या वयाबरोबर अतीच झाले होते. तो हवेलीतल्या खोलीत यायलाच मागत नव्हता. तो सकाळपासून नेत्रोबाजवळ काहीतरी वाचत असायचा, काहीतरी लिहीत असायचा नाहीतर शून्यात नजर लावून बसायचा.

नंदिनीने हवेलीत पाऊल टाकल्यापासून तो तिला नजरेने शोधत राहायचा. आणि तिलाही माणसासारखा पेहराव केलेल्या त्या मूर्तीचे तिला अप्रूप वाटायचे. रोजच तिचा घास त्याच्यासाठी अडकायचा. त्याला जेवण दिल्यावरच ती जेवायला बसायची. तिला खूप वाटायचे त्याच्या सोबतीने जेवावे, पण ते शक्य नव्हते. त्या हवेलीत काही पुतळे होते, नाकेले, भरघोस मिशावाले! त्यांच्या त्या पीळदार मिशांची तिला भीती वाटायची. हवेलीत आल्यावर कोणी नेत्रोबाचे नाव देखील घेतले नव्हते. तिला माजीसाहेबांचे नवल वाटायचे, त्या त्यांच्या पोटच्या गोळ्याला कशा विसरू शकतात. सगळ्यांनी त्याचे अस्तित्वच नाकारले होते. आणि मजेची गोष्ट अशी होती की तिलाही हवेली कधी आपली वाटलीच नव्हती. एकटा नेत्रोबा तिचा सखा होता, एकमेव मित्र! ती सकाळ संध्याकाळ नेतरोबाच्या देवळात पडीक असायची. मग तिला हवेलीत वैताग अंगावर यायचा नाही. थोडक्यात ती हवेलीत रुळली होती.

आणि तो दिवस उजाडला आज सरस्वती आणि राणा साहेबांचे भांडण सुरू झाले. नंदिनीच्या खोलीचं दार वाजलं. दार उघडायला आलेल्या नंदिनीला सरस्वती साहेबांनी मिठीच मारली आणि तिला खेचून त्या स्वतःच्या शयनगृहात घेऊन गेल्या. त्यांची जीभ लडखडत होती पण त्यानी हात जोडले तिच्यापुढे आणि म्हणाल्या, “राणानी तुला पाहिले तेव्हापासून तुझी शय्यासोबत करायची होती त्याला. तू लहान आहेस म्हणून मी त्याला रोकले होते. पण आज माझा नाईलाज झाला, त्याने फर्मान काढलंय - घरात राहायचे असेल तर नंदिनीला माझ्याकडे पाठव. माझा नाईलाज आहे, मी घराबाहेर जाऊ शकत नाही. मला कुठे जायला जागाच नाहीय, मी हात जोडते, तुझ्या असहायतेचा फायदा उठवतोय आम्ही. पण अखेर तूही यातून काहीतरी कमावशीलच” ती त्यांच्या खोलीतून बाहेर पडायच्या आत राणासाहेब तुफानासारखे आत आले, त्यानी सरळ नंदिनीला आडवे केले आणि तिचे शरीर ओरबाडून घेतले. अनेक दिवसाचा उपास फेडल्यासारखे.

नंदिनी तिथून उठली आणि नियम मोडून सरळ नेत्रोबाच्या देवडीतल्या मंदिरात घुसली आणि आश्वासक डोळ्याच्या त्या मुक्या, तिच्या फक्त तिचा एकटीच्या असलेल्या हाडांमासाच्या नेत्रोबाला बिलगली.

आता हा नित्यक्रम झाला. माजीसाहेबांना तरी सांगावे असावं वाटत होते. पण त्यांना ते माहीत असावे. त्या जाणून होत्या म्हणा किंवा त्या जाणूनबुजून दुर्लक्ष करत होत्या. त्यांच्या मनात असलेली इच्छापूर्ती होणार आहे अशी त्यांना आशा वाटू लागली होती. ज्या पोटच्या गोळ्याला घराबाहेर ठेवले, आज तोही नंदिनीच्या निमित्ताने घरी येत होता. त्याची नीट प्रेमाने काळजी घेतली जातेय आणि राणाची झाकली मूठ सव्वा लाखाची राहातेय. हे सर्व सर्वांच्या मनासारखे होत आहे आणि म्हणून बसलेल्या घडीला धक्का द्यायचा नव्हता. ना पट्टराणीपदाचा प्रश्न उदभवला होता. नंदिनी काही सरस्वती या मोठ्या सुनेची जागा घेणार नव्हती आणि ज्याला माजीने नाकारले होते त्याचा त्या देवळातील संसारही प्रेमाने चालू होता. हवेलीला वारस मिळणार होता. कोणाला जास्त कोणाला कमी खुषी मिळाली आणि सर्वांना सुखदुःखाचे समान वाटप झाले होते...काही गोष्टी अखेर अशादेखील अर्थाने “सुफळ संपन्न” होतात.

निर्णय - रेणुका कल्पना

दिनाकाकाच्या सोबत नंदिनीनं हवेलीत पहिलं पाऊल ठेवलं तेव्हाच ठरवून टाकलं - आता हीच आपली माणसं मानायची! तिची रक्ताची माणसं तर गावातल्या ठाकूरांनी जमिनीच्या वादात मारली होती. आपल्या घरात काम करणाऱ्या गड्याला सरकारी योजनेत मिळालेली जमीन त्यांना बघवली नाही. नंदिनीला मात्र त्यांनी जिवंत ठेवलं. आधी तिचा उपभोग घ्यायचा आणि कंटाळा आला की द्यायची मुंबईच्या कामाठीपुराला पाठवून असं त्यांचं ठरलं होतं. पण त्यांना तिचा कंटाळा यायच्या आधी नंदिनीनंच तिथून पळ काढला. तो यशस्वीही ठरला.

समोर दिसेल त्या रेल्वेत ती चढली. कुठली रेल्वे माहीत नाही. कुठं जायचंय तेही माहीत नाही. पाठलाग करणारं कुणी नाही याची खात्री पटली तेव्हा आधी ती बायकांच्या डब्यात जाऊन बसली. समोर कोणताही पुरुष दिसूच नये असं तिला वाटत होतं. तिटकारा आलेला पुरुषांचा. किती स्टेशन्स गेले. एका स्टेशनवर मधू मावशी चढल्या. स्वतःजवळची भाकरी त्यांनी नंदिनीसोबत वाटून खाल्ली. पोर एकटी आहे म्हटल्यावर तिला आपल्या घरी घेऊन आल्या. मधू मावशींचा दीर दिनकर म्हणजेच दिनाकाकाच्या ओळखीनं राणासिंगच्या हवेलीत कामाला चिकटवलं. आता परत गावाचं नाव काढायचं नाही, पडेल ते काम करायचं, मिळेल ते खायचं आणि गप पडून रहायचं, असं नंदिनीनं ठरवलं. सूडाची भावना मनात उसळत होतीच. पण ती एकटी काय करणार होती! तिच्या मागं ना पोलिस, ना पाठबळ, ना यंत्रणा. पैशाच्या जोरावर ठाकूरांनी सगळं आपल्याकडे ठेवलेलं होतं. त्यामुळेच आपल्या रक्ताच्या माणसांचा खून झाला तेव्हाच आपलं प्रोफेसर व्हायचं, मनासारख्या जोडीदारा सोबत आयुष्य घालवायचं आणि आता तर सूड घ्यायचंही स्वप्न मेलं हे नंदिनीनं ठरवून टाकलं. हतबल वाटायचं. पण इलाज नव्हता.

नंदिनीला सोडून दिनाकाका निघून गेले. नंदिनीचा दिनक्रम सुरू झाला. पहाटे उठायचं. घरातली सगळी कामं करायची, झाडलोट, पाणी भरणं, चहा करणं, कपडे धुणं. जे दिसेल ते, जे पडेल ते. सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर जेवण मिळायचं. माँसाहेब रोज रात्री तिच्याकडून पायाला तेल लावून घ्यायच्या. तिची विचारपूसही करायच्या. कुठून आली, गाव का सोडलं सगळं विचारायच्या. नंदिनीनं कधी खरं सांगितलं नाही.

कधीतरी तिला न्यूजपेपर पडलेला दिसायचा. राणासिंगाच्या खोलीत काही पुस्तकंही दिसायची. वाचायचा फार मोह व्हायचा. पण आवरावा लागायचा. नंदिनीच्या भूतकाळाबद्दल कळालं असतं तर तिलाच चारित्र्यहीन समजून घरातून हकलून दिलं असतं. तिच्याकडे राणासिंगची हवेली एवढा एकच आधार होता.

माँसाहेब, त्यांची तीन मुलं आणि त्यांच्या तीन बायका हे कुटुंबच तिच्या सोबत होतं. शेरसिंग आणि त्याची बायको शकुंतलादेवी, पवनसिंग आणि त्याची बायको विजयादेवी आणि सगळ्यात लहानगा मुलगा राणासिंग आणि त्याची बायको सरस्वतीदेवी यांच्यातच तिचा वेळ जायचा. राणासिंग शहरात एमबीए शिकून आलेला. माँसाहेबांच्या आग्रहाखातर त्यानं गावात थांबून घरचा व्यवसाय सांभाळायचं ठरवलं. त्यांच्याच आग्रहाखातर त्यानं सरस्वतीदेवीशी लग्नही केलं. पण त्यांचं सूत कधी जुळलंच नाही. घरात माँसाहेबांच्या विरोधात बोलायची कुणाचीही बिशाद नव्हती. माँसाहेब म्हणतील तोच शब्द अखेरचा.

एक दिवस संध्याकाळच्या वेळी भांडणाचे आवाज नंदिनीला आले. तिनं हॉलमधे डोकावून पाहिलं तर सगळा परिवार जमला होता. घटस्फोटाची नोटीस दारात येईल असं सांगून सरस्वतीदेवी दिवेलागणीच्या वेळीच घरातून निघून गेल्या. जाताना माँसाहेब सरस्वतीदेवीला म्हणाल्या, ‘जा ग वांझोटे. पुढच्या एका वर्षात या घरात पाळणा हालेल. शब्दय् माझा!’

हे एवढंच नंदिनीला कळालं. राणासिंग तिथंच मान खाली घालून उभे होते. पुढचे काही दिवस घरात वकील येत होते. कोर्ट कचेऱ्यांच्या तारख्यांना राणासिंग आणि माँसाहेब जात होते. बहुतेक त्यांचा घटस्फोट झाला असावा. त्यानंतर काहीच दिवसातच घरात कसलीतरी पुजा आहे, सगळी तयारी करून ठेव असं माँसाहेबांनी नंदिनीला सांगितलं. तिलाही नवी भारीतली साडी भेट दिली. पुजेला हीच नेसायची अशी ताकीद दिली. नेमकं काय होतंय हे कळायच्या आतच नंदिनी आणि राणाचं लग्न लावून दिलं गेलं. लग्नानंतर माँसाहेब तिला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. एका महिन्यात गोड बातमी दिली नाही तर ठाकूरांच्या हवेलीवर पाठवून देईन, असं माँसाहेबांनी बजावलं. बाहेर एका दिवशी १० जणांसोबत झोपण्यापेक्षा इथं एकाशीच संबंध ठेवणं बरं; अशी ऑफर नंदिनीसमोर ठेवली. माँसाहेबांना हे सगळं कळालं कसं, त्यांना कुणी सांगितलं नंदिनीला काही कळेना. पण त्याक्षणी ते मान्य करण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता. तिला त्यांचं ऐकावंच लागलं.

राणासिंगच्या खोलीबाहेर सोडायला माँसाहेब आल्या होत्या. त्यांनी डोळे मोठे करून तिला आत जायला सांगितलं. नंदिनीनं दार वाजवलं आणि आत गेली. राणासिंग म्हणाले, नंदिनी दाराला कडी घालून इकडं ये. थरथरत्या हातांनी तिनं कडी बंद केली. राणासिंग खुर्चीत बसले होते तिथं आली. ते उठले. नंदिनी दोन पावलं मागे सरकली. आणि राणासिंग म्हणाले, ’नंदिनी, आपलं एकमेकांवर प्रेम नाही. तर आपल्यात कुठलेही संबंध असू शकणार नाहीत. तुझ्या मर्जीविरोधात तर मला काहीही करायचं नाही. हे सगळं मला माँसाहेबांच्या प्रेशरमुळे करावं लागतंय. त्यांच्या प्रेशरमुळेच तुला रोज रात्री इथं यावं लागेल. पण मी तुला काहीही करणार नाही हे नक्की!’ नंदिनीला काही कळेनाच. हे काय असं? माझं काही चुकलं की काय? की हाही कुठल्यातरी प्लॅनचाच एक भाग आहे ?

पण हळूहळू नंदिनीला राणासिंगांचं वेगळेपण उमगलं. पवनसिंगच्या बायकोच्या पोटातली मुलगी पाडण्याला त्यांनी केलेला विरोध, मोठ्या भावानं, शेरसिंगनं, बायकोला मारलं तेव्हाही ते वहिनींसोबत उभं राहिले होते, अन्न उरलं नाही तर परत बनवायचं पण घरातला प्रत्येक नोकर जेवण करूनच झोपणार अशी ताकीद देणं, नोकरांच्या पोरांना आणि पोरींनाही शहरात शिकायला मदत करणं नंदिनीला अनेक गोष्टी कळत गेल्या. यातल्या बऱ्याच गोष्टी माँसाहेबांना माहीत नाहीत हेही तिला उमगलं. माँसाहेबांचा थेट विरोध राणासिंगांना घ्यायचा नव्हता. म्हणूनच सरस्वती देवींशी त्यांनी लग्नाला होकार दिला. सरस्वतीदेवींचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे हे लग्नानंतर कळालं. तेव्हा त्या मुलाला शोधून त्यांचं सरस्वतीदेवींशी जमवणारे राणासिंगच होते. घरात कुणाला कळू नये म्हणून दोघांनी ठरवून राणासिंग यांनाच मूल होऊ शकत नाही त्यामुळे संसार करायचा नाही, असं सांगितलं. पण आपल्या मुलात दोष आहे ही गोष्ट माँसाहेबांच्या पचनी पडेना. सरस्वतीच वांझोटी आहे असं त्यांनी ठरवूनच टाकलं. स्वतःचं खरं करण्यासाठी आव्हान स्वीकारलं आणि नंदिनीला पुढे केलं.

असे कसे हे राणासिंग, नंदिनीला कळायचंच नाही. पुरुष असताना इतक्या हळव्या मनाचे? इतके काळजी करणारे? तू माझी दासी नाहीस, माझ्या पायाशी बसायची गरज नाही. तुझे तू निर्णय घेत जा असं त्यांचं सांगणं नंदिनीला कळायचंच नाही. तिनं तिच्या वडलांनाही नेहमी आईवर ओरडताना, तिला मारताना पाहिलं होतं. एकदा आईनं जमिनीबाबतचा सल्ला दिला म्हणून बाबांनी जेवणाचं ताट फेकून दिलं होतं. पण राणासिंग नंदिनीला आवर्जून विचारत होते. तिला गोष्टी समजावून सांगत होते. असा पुरुष नंदिनीनं कधीच पाहिला नव्हता.

महिना संपत आला तशा माँसाहेब अस्वस्थ होऊ लागल्या. अजून काहीच कसं झालं नाही? सरस्वती म्हणते ते खरं आहे की काय असं त्यांना वाटू लागलं. एक दिवस नंदिनीला बोलावून तिला उलटे सुलटे प्रश्न विचारले. नंदिनीला फार वेळ खोटं बोलता आलं नाही.

राणासिंग आणि तिच्यात काहीच संबंध आले नाहीत हे समजल्यानंतर माँसाहेब भयंकर संतापल्या, ‘एक काम दिलं होतं, तेही केलं नाहीस’ - असं म्हणत तिच्या केसाला धरून ओढत खोलीबाहेर आणलं. शेरसिंगला ठाकूरांना फोन करायचा आदेशच दिला. इतरवेळी आधारासाठी वापरली जाणारी काठी त्यांनी जमिनीवर पडलेल्या नंदिनीवर उचलली. आणि तिला फटका बसणार इतक्यात मागून राणासिंगानी ती खेचून घेतली. आयुष्यात पहिल्यांदा माँसाहेबांच्या विरोधात ते उभे राहिले होते. ‘नंदिनी कोणत्याही ठाकूरकडे जाणार नाही आणि तिला कुणी मारणारही नाही,’ त्यांनी ठणकावूनच सांगितलं. काठी खाली फेकून दिली. घरातल्या पुरुषसत्तेनं सारवलेल्या भिंतींमधे काठीचा आवाज घुमत राहिला.

 


शिळा शोक, बुळा बोध – मुक्ता खरे

नंदिनी हवेलीत आली. राणासिंगच्या हवेलीत तिला काम मिळालं होतं. झाडलोट, सडा रांगोळी, गुरांना चारा, दूध काढणं, स्वयंपाक करणं, कुणाला काय हवं नको ते बघणं. पण ह्या सगळ्यात तिला देवांसाठी फुलं काढून हार करणं हे काम खूप आवडायचं. मांजीसाहेब खुश असायच्या तिच्यावर. थोडी फुलं ती बाजूला ठेवायची. सगळं काम संपलं की ती फुलं घ्यायची, त्याचे हार करायची, नेत्रोबाला घालायची. तिला हलकं वाटायचं. पण खरं काम काय होतं? हे तिला माहितही नव्हतं.

राणासिंगचं लग्न झालं होतं. त्याची बायको सरस्वतीदेवी दिवसभर खोलीत लोळत असायची. संध्याकाळी त्याच्यासोबत नटूनथटून मोटारीत बसून जायची. रात्री दोघे झिंगून परत यायचे. नंदिनीनं केलेलं काही खाल्लं तर खाल्लं नाहीतर खोलीत जाऊन झोपलं! कधीकधी त्यांच्या खोलीतून जोरजोरात बोलल्याचे आवाज यायचे. पण एकदा रात्री त्यांच्या खोलीचं दार उघडंच होतं. राणासिंग मोठमोठ्याने शिव्या घालत होता. नंदिनी घाबरली आणि डोक्यावर पांघरूण  घेऊन गप्प पडून राहिली. पण अचानक सरस्वतीदेवी तिच्या खोलीचं दार लोटून आत आली आणि राणाच्या खोलीत जा म्हणाली. नंदिनी थरथरत राणासिंगच्या खोलीत गेली आणि दार लागलं. असं वारंवार घडायला लागलं.

सरस्वती देवीची तर सुटका झाली. राणासिंगला नवीन खेळणं मिळालं होतं, त्यामुळे तिच्याकडे तो बघायचा सुद्धा नाही. वाड्यात आल्यापासून तिला राणासिंगने फुरसतच मिळू दिली नव्हती. सकाळपासून रात्रीपर्यन्त तेच ते आणि तेच ते! आता मात्र ती मस्त तिच्या एकटीच्या खोलीत लोळायची, सुंदर सुंदर जुने दागिने घालून बघायची किंवा झोपा काढायची. तिची सुद्धा मजा चालली होती. पण हळूहळू तिला त्या मजेचाही कंटाळा यायला लागला. एकटीनेच सिनेमे तरी किती बघणार? एकटीने बाहेर तरी कशासाठी जाणार? मांजी कधीकधी तिला घरकामात लक्ष घालायला लावायचा प्रयत्न करायच्या पण सरस्वती काही त्यांना भाव द्यायची नाही. एकतर तिचा जीव घरकामात रमत नसे आणि मांजीसाहेबांचा तो कंटाळवाणा चेहरा देखील पाहवासा वाटत नसे. तिला काहीतरी खूप छान करायचं होतं. तिने अनेक दिवस विचार केला आणि एक दिवस ठरवलं की आता बास! खूप झालं...

एक दिवस नंदिनी नेत्रोबाला फुलं वाहत होती आणि तेव्हाच तिला बोलावण्यात आलं. नंदिनीला देवासमोर उभं केलं. तिथे राणासिंग पण होता. बाजूला मांजी आणि सरस्वतीदेवी सुद्धा. नंदिनी – राणासिंगचं लग्न लागलं. नंदिनीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले. ती धावत नेत्रोबाकडे गेली. त्याच्या पायावर डोकं ठेवून आनंदाने रडली. नंदिनी खूप खूष होती. राणासिंग पण खूष होते. नंदिनीला पलंगावरून खाली पण उतरायला द्यायचे नाहीत ते. जे काय असेल ते पलंगावरच!

सगळेजण मध्यरात्री निवांत घोरत असताना सरस्वती गजर लावून  उठली. मांजीच्या गळ्यातली चेन हलकेच काढून घेतली. मग अगदी अलगद तिजोरी उघडली. त्यातून आवडीचे तीनचार हार, साताठ दागिन्यांचे सेट्स आणि तिची आवडती नथ घेतली. आवडत्या कपड्यांचं गाठोडं तयारच होतं. पटकन पांढरी साडी नेसली. आणि मागच्या कुंपणावरून बाहेर उडी टाकली. तिला माहीत होतं, रात्री पांढऱ्या साडीवाल्या बायका रस्त्यात दिसल्या तर पुरुष त्यांच्या वाटेला जात नाही. मग तिने दिसेल ती पहिली एस्टी पकडली आणि सरळ मुंबईला पसार झाली.

इकडे हवेलीत राणासिंग मात्र वेडापीसा झाला. सुरुवातीला सहामहिने त्याने जवळपासची गावं पालथी घातली. तो सरस्वतीचं मानगूट पकडुन परत आणणार होता. पण काही काळाने त्याच्या बरोबरीचे लोक सुद्धा कंटाळले. आता नंदिनीला मूल झालं होतं. अगदी नेत्रोबासारखं होतं ते. नंदिनी खूष झाली. मांजीसाहेब खूष झाल्या, वाड्याला वारस मिळाला. मग मांजीसाहेब नंदिनिकडे बोट दाखवून राणाला म्हणाल्या, “आता हीच तुझी सरस्वती”

नंदिनीला तर लॉटरीच लागली. सरस्वती देवीच्या छान छान साड्या तिला मिळाल्या, दागिने मिळाले आणि परत सगळे नोकर तिची सेवा करायला लागले. तिच्या मुलाचं नाव तिने राजवीर ठेवलं होतं. त्याच्याशी खेळण्यात तिचा मस्त वेळ जायचा. राणासिंगला मस्का मारणं काही फार कठीण नाही हे कळल्यावर तिघंजण थायलंडला सुद्धा जाऊन आले. बघता बघता राणा कामकाजात मश्गुल झाला. राजवीर शाळेत जायला लागला. काही दिवसांनी त्याला एका लांबच्या बोर्डिंग स्कूल मध्ये घातलं. मग नंदिनीला खूपच वेळ मिळायला लागला. ती आपली मस्त तिच्या एकटीच्या खोलीत लोळायची, सारखे दागिने घालून बघायचे किंवा झोपा काढायची. एकटीनेच सिनेमे तरी किती बघणार? एकटीने बाहेर तरी कशासाठी जाणार? नेत्रोबाच्या देवळात देखील जायला नकोसं वाटायला लागलं. तेच मंदिर, तीच मूर्ती. सकाळपासून रात्रीपर्यन्त तेच ते आणि तेच ते... नंदिनीला देखील हळूहळू कंटाळा यायला लागला...

जागा - प्रिया जोशी

आज सकाळपासून नंदिनीची धावपळ सुरू होती. घाईघाईतच तिनी एकदा तिच्या त्या वीतभर घरावर शेवटची नजर फिरवली आणि दार बंद करून त्याला कुलूप लावलं. आता पुढचे काही महिने तरी या कुलुपाला किल्ली लागणार नव्हती. 

दिनाकाका वाटच बघत होते तिची. काही न बोलता दोघंही राणासिंगच्या हवेलीच्या दिशेनी निघाले. हवेलीत प्रवेश करताना एकीकडे नंदिनीची नजर सर्वदूर फिरत होती. जागोजागी ओसंडून वाहणारं ऐश्वर्य बघून तिचे डोळे चमकले. तिचं व्यवहारी मन तिच्याही नकळत हिशोब मांडायला लागलं. 'चला, आता पुढचे निदान नऊ दहा महिने तरी अगदी आरामात राहता येईल. मागच्या दोन वेळची कसर भरून काढायची आता...आयत्या चालून आलेल्या संधीचा फायदा करून घ्यायचा...' - मनात विचारांचे इमले बांधतच ती दिनाकाकांच्या मागोमाग हवेलीच्या मुख्य दालनात येऊन पोचली. तिथे माँसाहेब ,राणासिंग आणि त्यांची पत्नी - सरस्वतीदेवी तिघेही तिची वाटच बघत होते.

मासाहेबांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला.-"दिनाकाकांनी सांगितलंच असेल तुला सगळं सविस्तर; त्यामुळे आता मी परत नाही सांगत. उद्याच आपण सगळे डॉक्टरांकडे जाणार आहोत. आता लवकरात लवकर आम्हाला आमच्या घराण्याचा वारस हवा आहे - आणि तो तू आम्हाला देणार आहेस. त्यामुळे या क्षणापासून आमचा वारस जन्माला येईपर्यंत तू इथेच आमच्या नजरेसमोर राहशील."

हवे असलेले शब्द कानी पडताच नंदिनी मनातून सुखावली. क्षणभर- तिला नावं ठेवणाऱ्या लोकांचे ते जळजळीत कटाक्ष आणि त्यांचे टोमणे ऐकू आले तिला... पण ती स्वतःच्या निर्णयावर ठाम होती... अगदी मागच्या दोन्ही वेळा आपली कूस भाड्याने दिली होती तेव्हा... आणि आज सुद्धा!

हो, नंदिनी एक surrogate mother होती... आणि तेही अगदी स्वखुशीने...तिच्या दृष्टीने पैसे मिळवण्यासाठीचा हा सगळ्यात सोपा आणि फायदेशीर मार्ग होता. याबाबतीत तिचे विचार अगदी स्पष्ट होते... 'लोक आपल्या बुद्धीचा, आपल्या शक्तीचा वापर करून पैसे मिळवतात - त्याचप्रमाणे मी माझ्या प्रजननशक्तीचा वापर करते. माझ्यामार्फत जर काही लोकांची स्वप्नं पूर्ण होत असतील तर त्यात वाईट काय आहे? आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी माझा जीव धोक्यात घालते... बाळंतपण हा स्त्रीचा पुनर्जन्म म्हणतात ते काही उगीच नाही ! मग त्यासाठी जर मी पैसे घेतले तर माझं काय चुकलं?' - याच विचाराला अनुसरून तिनी याआधीही दोन वेळा आपली कूस भाड्याने दिली होती. आणि आता ही तिची तिसरी वेळ होती.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे डॉक्टरांकडे गेले. त्यांनी नंदिनीच्या आवश्यक त्या सगळ्या चाचण्या आणि परीक्षण केलं आणि लवकरच राणासिंग आणि सरस्वतीदेवींचा अंश नंदिनीच्या पोटात वाढू लागला.
आता माँसाहेब आणि सरस्वतीदेवी जातीने नंदिनीची काळजी घेत होत्या. तिच्यासाठी सकस आहार, फळं, दूध, तूप....सगळी रेलचेल होती. तिच्या सगळ्या इच्छा, सगळे डोहाळे अगदी हौसेनी पुरवले जात होते. जसजसा तिच्या पोटाचा घेर वाढू लागला तसतशा राणासिंग च्या तिच्या खोलीतल्या चकरा सुद्धा वाढू लागल्या.
नंदिनीच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातला सगळ्यात समृद्ध काळ होता तो ! पण - सगळं कोडकौतुक आपल्यासाठी नसून आपल्या पोटातल्या बाळासाठी आहे - हे ती जाणून होती. या लोकांना यांचं बाळ मिळाल्यावर हे आपल्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत हेही तिला माहीत होतं.

'नंतर तुझ्या नशीबात पुन्हा एकटं राहाणं आणि पैशांची चणचण …' अधूनमधून नंदिनी स्वतःला बजावत राहायची. पण आता तिला या सगळ्या सुखसोयींची, ऐश्वर्याची चटक लागली होती. एका अनाथ, गरीब स्त्रीला जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे तिनी अनुभवलं होतं. पुन्हा त्या दारिद्र्याच्या दलदलीत जाण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती.
'वेळीच काहीतरी केलं पाहिजे... या घरात टिकून राहण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करायला हवे'- नंदिनीचं व्यवहारी मन तिला सतत हेच सांगत होतं. खूप विचार करून शेवटी तिने आपला डाव मांडला... हळूहळू फासे टाकायला सुरुवात केली. आणि लवकरच तिच्या खेळातलं सगळ्यात महत्त्वाचं प्यादं तिच्या हिशोबानी चालायला लागलं.
आधी सरस्वतीदेवी बरोबर तिच्या खोलीत येणारा राणासिंग आता अधूनमधून एकटाच यायला लागला. बाळाची चौकशी करताकरता आता तिचीही विचारपूस करायला लागला. आधी त्याच्याशी फक्त कामापुरतं बोलणारी नंदिनी आता त्याच्याशी लगट वाढवायला लागली. येणाऱ्या बाळाबद्दल, त्याच्या भविष्याबद्दल राणासिंग जी स्वप्नं बघत होता त्यांत आता हळूहळू नंदिनीने आपली जागा निर्माण करायला सुरुवात केली. तिनी फेकलेल्या जाळ्यात राणासिंग अधिकच गुंतला जात होता.
पण अजूनही एक प्यादं होतं - जे नंदिनीला आपल्या बाजूनी हवं होतं...माँसाहेब !! लवकरच ते प्यादंही तिच्या काबूत आलं.... आधी आपल्या सुनेचा, तिच्या चांगुलपणाचा उदोउदो करणाऱ्या माँसाहेब आता नंदिनीचं गुणगान करायला लागल्या. आपल्या हातातून निसटणारी नाती आणि हळूहळू ढळणारं आपलं स्थान - हे सगळं सरस्वतीला दिसत होतं. पण सगळं काही उघड्या डोळ्यांनी बघत राहण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
रोज मागच्या अंगणातल्या देवळात नेत्रोबाच्या मूर्तीसमोर आपलं गाऱ्हाणं मांडायची ती! त्याच्यावर विश्वास ठेवून आला दिवस ढकलत राहिली. पण जसंजसं नंदिनीचं जाळं घट्ट होत होतं तसातसा सरस्वतीचा देवळातला मुक्काम वाढत गेला.
आणि शेवटी एकदाचा तो दिवस येऊन ठेपला. नंदिनीच्या पोटात पहिली कळ आली. तिला गाडीत बसवून माँसाहेब आणि राणासिंगनी तडक हॉस्पिटल गाठलं.... पण त्या घाईगर्दीत कोणालाच सरस्वतीची आठवण देखील झाली नाही . त्या क्षणी तिला जाणवलं, 'आज त्यांच्या गाडीत आपल्याला जागा मिळाली नाही.. लवकरच त्यांच्या आयुष्यातलं आपलं स्थानही आपण गमावून बसणार. . माझा नवराच काय .... आता तर माझं मूलही माझं राहिलं नाहीये......एका नव्या जीवाच्या आगमनामुळे आता नात्यांचे सगळेच संदर्भ बदलले आहेत.'
तिनी धावत जाऊन नेत्रोबाचे पाय धरले...'यापुढे हीच माझी जागा....'
सरस्वतीला आता हे कटू सत्य कळून चुकलं होतं... या वस्तुस्थितीचा स्वीकार करण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता !!!!

सौदा - अरुण मनोहर

 


दिनाकाकाच्या मागोमाग नंदिनी मुकाटपणे चालत होती. हवेलीच्या बाहेर काका थांबला, हात जोडत म्हणाला, “जा आत... घर वाचवलंस पोरी...” काका गेला.

राणासिंगच्या हवेलीत तिला काम तर मिळालं होतं. मांसाहेब खुश असायच्या तिच्यावर. झाडलोट, सडा रांगोळी, गुरांना चारा, दूध काढणं, स्वयंपाक करणं - पण ह्या सगळ्यात तिला देवांसाठी फुलं काढून हार करणं हे काम खूप आवडायचं. थोडी फुलं ती बाजूला ठेवायची. सगळं काम संपलं की ती फुलं घ्यायची, त्याचे हार करायची, नेत्रोबाला घालायची. तिला हलकं वाटायचं.

राणासिंगचं लग्न झालं होतं. त्याची बायको सरस्वतीदेवी दिवसभर खोलीत लोळत असायची. संध्याकाळी नटूनथटून मोटारीत बसून जायची. रात्री दोघे झिंगून परत यायचे. नंदिनीनं केलेलं खाल्लं तर खाल्लं नाहीतर खोलीत जाऊन झोपणं. एका रात्री राणासिंग मोठमोठ्याने शिव्या घालत होता. नंदिनी घाबरली. पण गप जाऊन पडली.

सरस्वतीदेवी आली, नंदिनीला उठवलं आणि राणासिंगच्या खोलीत जा म्हणाली. नंदिनी थरथरत खोलीत गेली आणि दार लागलं. पुढे काय वाढून ठेवले असेल याच्या भीतीने ती अर्धमेली झाली होती. राणासिंगने तिला पलंगावर बसायला सांगितले. शेजारी बसून तो म्हणाला-

“हे बघ पोरी. तुझी मालकीण माझ्या धनदौलतिला वारस देऊ शकत नाही. म्हणून मांसाहेबांनी तुझ्या काकाला भरपूर पैसा देऊन तुला इथे आणले. तू विरोध केला तरी काही उपयोग होणार नाही. तू गुण्यागोविंदाने मला जे हवे ते दिले तर तुला त्रास होणार नाही. तेव्हा मुकाट्याने तूझे काम तू कर.”

नंदिनी न बोलता दैवात लिहिलेले भोगायला तयार झाली.
पुढे हे नेहमीचेच झाले. नंदिनी दिवसभर घरात कामे करायची. रात्र झाली की आपणहून राणासिंगच्या दालनात हजर व्हायची. असे काही महीने गेले. मांसाहेबांचे नंदिनीवर बारीक लक्ष होते. पण त्यांना हवी ती लक्षणे दिसेनात. आपली निवड चुकली तर नाही ना अशी शंका त्यांना येऊ लागली. एक दिवस मांसाहेबांनी नंदिनीच्या काकाला बोलावणे धाडले आणि जाब विचारला.

“काय रे ए तुला काय वाटते, तू मला इतके सहज फसवशील? वांझोटी गाय माझ्या मुलाच्या गळ्यात बांधली ना?”

“नाही बाईसाहेब. अहो मी सांगितले ना तुम्हाला, तिचे पोर जन्मल्याबरोबर मीच तर सगळे संपवले होते. पदरात पोर असलेली बिनलग्नाची मुलगी! मी जर वेळीच उपाय केले नसते तर तिने नक्कीच एखादी विहीर गाठली असती. तुम्ही मला माझ्या पोरीचे कल्याण करण्याची संधी दिली. मी फसवले नाही बाईसाहेब. तुम्ही तिला जरा वेळ द्या.”

हे ऐकून मांसाहेबांनाही वाटले की खरंच आपण उगाच घाई करत आहोत.
नंदिनी राणासिंगच्या दालनात जाऊ लागल्यापासून त्याची बायको सरस्वतीदेवी स्वतंत्र खोलीत झोपायची. वाड्यावर काम करणारा महादू तिच्या दिमतीला होता. तिला हवे नको ते बघणे, अगदी तिचे ड्रिंक्स बनवून देणे वगैरे कामे तो करायचा. त्या जवळीकीत महादूचे पिळदार शरीर सरस्वतीदेवीला आकर्षित करित राहिले. एकदा अशाच बेसावध क्षणी जे घडायचे ते घडले. ते कोणालाही कळणे शक्य नव्हतेच. त्यामुळे नंतरही ते सतत घडत गेले. अचानक पाळी चुकली तेव्हा मात्र सरस्वतीदेवीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने लगेच नंदिनीला खोलीत बोलावून घेतले.

“अगं नंदिनी तुझे चाललेय तरी काय? मांसाहेबांना गोड बातमी कधी देणार आहेस?”

“बाईसाहेब, मी तरी काय करू? मी रोज सांगितलेले काम करते. पण माझ्या हातात काहीच नाही ना!”

“मूर्ख मुली. माझ्याजवळ बोललीस. बाहेर कुठे बोललीस आणि राणासिंगांना कळले तर जीवच घेतील तुझा.”

“मग बाईसाहेब मी काय करू?”

“हे बघ. नीट लक्ष देऊन ऐक. मांसाहेबांचा धीर सुटत चाललाय. त्यांनी काही दुसरे पाऊल उचलायच्या आत आपल्याला काहीतरी करणे आवश्यक आहे. तुला दिवस राहिल्याचे नाटक करावे लागेल.” त्यांनी नंदिनीला सगळे समजावून सांगितले.

दुसऱ्या दिवशी सरस्वतीदेवी त्यांच्या माहेरी निघून गेल्या. जातांना राणासिंगांना तंबी द्यायला विसरल्या नाहीत की लवकर खुषखबर मिळाली नाही तर त्या घटस्फोट घेतील आणि मग राणासिंगांना व्यवहारात सगळी इस्टेट गमवावी लागेल. असली मानहानी पचविणे राणांसिंगांना शक्यच नव्हते. ते काळजीत पडले. पण त्यांची काळजी लवकरच मिटली. एक दिवस नंदिनीच्या कोरड्या ओकाऱ्या ऐकून मांसाहेबांनी सत्यनारायण घातला. तिचे थोडेफार पोट दिसायला लागल्यावर सरस्वतीदेविंनी तिला त्यांच्या माहेरी बोलावून घेतले. “तुमच्याजवळ पोटूशी बाईने राहणे म्हणजे तिच्या बाळाला मोठा धोकाच आहे" अशी भिती राणासिंगांना घातल्यावर त्यांनी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता.
यथावकाश तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन सरस्वतीदेवी घरी परत आल्या. कुलदीपक आला म्हणून मांसाहेबांनी वाड्यावर मोठे गावजेवण घातले.
नंदिनी कुठे गेली याची कोणीच चौकशी केली नाही. महादू देखील वाड्यावरची नोकरी सोडून निघून गेला. आपण काही न करताच बला टळली म्हणून सरस्वतीदेवीना हायसे वाटले!
सरस्वतीदेविंनी दिलेल्या घसघशीत रकमेमधून नंदिनीने दूरगावी मोठी हवेली बांधली. जुन्या हवेलीत नोकर असणारा महादू आता महादेवशेट झाला होता आणि तारुण्यातल्या त्याच्या प्रेयसीसोबत म्हणजे नंदिनीसोबत त्यांचा स्वत:चा वारस आणण्यासाठी उत्सुक होता.

गोष्ट बदला, जग बदलेल

 आज 10 मार्च... सावित्रीबाईंचा स्मृतीदिन !

सावित्रीबाईंनी दीडशे वर्षांपूर्वीच्या काळात बाईने कसं वागावं, काय करू नये याबद्दलच्या अनेक चौकटी मोडल्या. आणि आपल्यासमोर एक आदर्श - रोल मॉडेल उभं केलं. इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला अशा अनेक क्रांतिकारी नायिका भेटतात. स्त्रीवादी चळवळीच्या रेट्यामुळे जरी काळाबरोबर स्त्रियांवरचे निर्बंध काहीसे कमी होत गेले असले तरी स्त्रियांनी आणि पुरुषांनी कसं वागलं पाहिजे त्याबद्दलच्या ठोकळेबाज अपेक्षा पूर्णपणे संपलेल्या नाहीत. उलट अनेकदा सिनेमा, नाटकं, टीव्ही आणि वेबसिरीज मधून पारंपरिक भूमिकांचे साचे आपल्यावर लादले जातात. कित्येकवेळा आपल्याला ह्या माध्यमातून होणारं चित्रण पटत नाही, पण नाईलाजाने ते ‘मनोरंजन’ आपण खपवून घेतो! पण आपल्या नकळत त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. खासकरून चांगली बाई आणि वाईट बाई अशा दोन टोकाचं जे चित्रण केलं जातं त्यामुळे तर – स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते – ह्या गैरसमजाला खतपाणी घातलं जातं. निमूटपणे अन्याय क्षण करणाऱ्या सोशीक नायिका सतत पाहून स्त्रियांवरचा हिंसाचार मामुली वाटू शकतो. कदाचित असं चित्रण करणं ही धंदेवाईक माध्यमांची मजबूरी असू शकते, पण ‘पुन्हास्त्रीउवाच’ मधून तरी यापेक्षा वेगळं चित्रण करणाऱ्या कथा मांडायला पाहिजेत – असं मला वाटतं. म्हणूनच #गोष्टबदलाजगबदलेल च्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न करायचं ठरवलं. 
या उपक्रमासाठी शार्दुल सराफने फेब्रुवारीमध्ये एक छोटीशी कथा लिहून दिली. ही कथा आपण नेहमी टीव्ही मालिकांमध्ये पाहतो तशाच वळणाची होती. पण त्या कथेला वेगळं वळण देऊन साधारण 1000 शब्दात मावणारी नवीन कथा लिहायचं आवाहन केलं होतं. लेखकांनी त्या कथेतल्या टिपिकल पात्रांपेक्षा निराळी पात्रं आणि घटना उभ्या कराव्या अशी अपेक्षा मी आवाहनात मंडळी होती. मूळ कथा लिहिताना तिला निराळं वळण देता येईल अशा अनेक जागा शार्दुलने हुशारीने पेरून ठेवलेल्या आहेत. 
शार्दुल म्हणतो - मी स्वतः टीव्ही मालिका, चित्रपटांसाठी लेखन करतो. बऱ्याच वेळा मी स्वतः लिहिलेले सीन्स टीव्ही वर पाहत असताना मी त्यांची थट्टा उडवतो, जा मग आता खड्ड्यात असं म्हणून आहेत त्या सीन्सना अगदी ridicule करतो, अगदी शिव्या पण देतो. त्याची तात्पुरती का होईना मजा घेतो. ह्या उपक्रमाबद्दल वंदना आणि माझ्यात चर्चा झाली. आधी आमचा रोख सरळ टीव्ही मालिकांकडेच होता. आम्ही पण असं काहीतरी उलट पालट करावं का? असा विचार केला म्हणून मग एक अशी कथा लिहून काढली. ती टोकाची असावी ह्याची फक्त काळजी घेण्याचा प्रयत्न होता. अर्थात ह्याच्यापेक्षाही टोकाच्या गोष्टी अवतीभवती घडत असतात, आपण त्याचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष भाग असतोच. मागे एकदा आमचा एक मालिका लेखन करणारा मित्र म्हणाला, “आपण तर अवतीभवती घडतं तेच लिहितो. दोन बायका, सरोगसी, सासू – सुना हेवे दावे, हुंडा बळी, चेटूक, जादूटोणा... ह्या गोष्टी आजूबाजूला घडतात. त्या काय आपण घडवतो? आणि लोक आपल्यालाच नावं ठेवतात. आपलं काम लिहिणं आहे जग बदलणं नाहीये...” आता हे कुणाला पटेल कुणाला न पटेल. पण हे वाक्य माझ्या डोक्यात कायम घोळत असतं. आणि जग बदलावं हे खूप आतून वाटत असतं. मला आणि माझ्या त्या मित्रालासुद्धा. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जग बदलेल का? कितपत बदलेल हे चर्चेचे मुद्दे आहेत. आणि ती पुढे पण होत राहीलच. ती आपण करूच. अगदी जोरदार! 
पण कोण कोण, काय काय, कसा कसा विचार करतात? त्याची गोष्ट ते कशी बांधू पाहतात? हे तरी पाहता येईल. ह्या सगळ्याचं कुतूहल आहे. वाहणारं पाणी वाहत असतं. आपल्यासाठी ते नसतं, आपल्याला हवं तसं वाहतही नसतं. दगडावर पाणी आदळून काही थेंब अंगावर उडतात. तेव्हा मस्त वाटतं. मी आता दगडावर पाय ठेवून शांत बसलो आहे. इतकंच!
गोष्टबदलाजगबदलेल च्या आवाहनात म्हटल्याप्रमाणे जीवनाचे निराळे ताणेबाणे आणि नव्या शक्यता उलगडणाऱ्या कथा आजपासून प्रकाशित करत आहे. आज अंजली म्हसाणे यांनी लिहिलेली कथा प्रकाशित करत आहे 

ही कथास्पर्धा नव्हती त्यामुळे ह्या कथांना पहिला, दुसरा नंबर दिलेला नाही. शेजारच्या कॉलममध्ये “गोष्टबदलाजगबदलेल” ह्या लेबल वर क्लिक केल्यावर उपक्रमात रोज प्रकाशित होणाऱ्या सर्व कथा वाचता येतील.  मला ह्या कथा वाचताना मजा आली. आता तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

 वंदना खरे

(संपादक 'पुन्हा स्त्रीउवाच') 



मूळ कथा

 


दिनाकाकाच्या मागोमाग नंदिनी मुकाटपणे चालत होती. हवेलीच्या बाहेर काका थांबला, हात जोडत म्हणाला, “जा आत... घर वाचवलंस पोरी...” काका गेला. नंदिनी विचार करत होती. हवेलीशिवाय दुसरा पर्याय तिच्याकडे नव्हता. नेत्रोबानं हेच ठेवलंय पुढ्यात. नंदिनी हवेलीत आली.

राणासिंगच्या हवेलीत तिला काम मिळालं होतं. पण काम काय होतं? हे तिला ही माहित नव्हतं.

झाडलोट, सडा रांगोळी, गुरांना चारा, दूध काढणं, स्वयंपाक करणं, कुणाला काय हवं नको ते बघणं. पण ह्या सगळ्यात तिला देवांसाठी फुलं काढून हार करणं हे काम खूप आवडायचं. मांजी साहेब खुश असायच्या तिच्यावर. थोडी फुलं ती बाजूला ठेवायची. सगळं काम संपलं की ती फुलं घ्यायची त्याचे हार करायची नेत्रोबाला घालायची. तिला हलकं वाटायचं.

राणासिंगचं लग्न झालं होतं. त्याची बायको सरस्वती देवी दिवसभर खोलीत लोळत असायची. संध्याकाळी नटून थटून मोटारीत बसून जायची. रात्री दोघे झिंगून परत यायचे. नंदिनीनं केलेलं खाल्लं तर खाल्लं नाहीतर खोलीत जाऊन झोपणं. एका रात्री राणासिंग मोठमोठ्याने शिव्या घालत होता. नंदिनी घाबरली. पण गप जाऊन पडली. सरस्वतीदेवी आली, नंदिनीला उठवलं आणि खोलीत जा म्हणाली. नंदिनी थरथरत खोलीत गेली आणि दार लागलं.

असं वारंवार घडायला लागलं. आणि एक दिवस नंदिनी नेत्रोबाला फुलं वाहत होती आणि तिला बोलावण्यात आलं. नंदिनीला देवासमोर उभं केलं. तिथे राणासिंग पण होता. बाजूला मांजी आणि सरस्वतीदेवी सुद्धा. नंदिनी –  राणासिंगचं लग्न लागलं. नंदिनीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले. ती धावत नेत्रोबाकडे गेली. त्याच्या पायावर डोकं  ठेवून आनंदाने रडली.

नंदिनीची काळजी घ्यायला आता इतर काही नोकर आले. नंदिनी खूप खुश होती. पलंगावरून खाली पण उतरायलां द्यायचे नाहीत ते. अगदी राणासिंग पण उतरू द्यायचे नाहीत. जे काय असेल ते पलंगावरच.

एक दिवस सरस्वती देवी आल्या. नंदिनीच्या पोटाच्या घेरावरून हात फिरवत म्हणाल्या, “मला जमलंच नसतं हे... Thanks to you...!!” नंदिनीला मुल झालं. अगदी नेत्रोबासारखं होतं ते. नंदिनी खुश झाली. सरस्वती देवी आल्या. तिचं मूल उचललं. घेऊन गेल्या. मांजी साहेब आल्या. गोडाधोडाचं ताट ठेवलं. “खा लो... फिर हिवडा साफ करो...” नंदिनी उठली. अंगण झाडलं. सगळी कामं केली. फुलांचा हार केला. नेत्रोबाला घातला. “नेत्रोबा, असाच आशीर्वाद असू दे...” म्हणत जेवणातली बासुंदी तिनं नेत्रोबासमोर ठेवली. तिथंच सावलीत शांत बसून राहिली.

धक्का - अंजली म्हसाणे




त्या घराबद्दल मला काही कळण्याचं कारण नव्हतं. पण त्या खूप पावसाच्या रात्री पप्पांचा ट्रक एका अवघड वळणावर घसरून उलटला. सगळंच उलटंपालटं झालं. मी ,मम्मी आणि माझे दोघे धाकटे बहीणभाऊ काहीतरी करून दिवस निभावत होतो. एकदम एक दिवस या ठिकाणी हाउसकीपिंगचा जाॅब आहे असं दीनाकाकाने सांगितलं. आणि या घरात मी येऊन पडले.

ही मालक मंडळी आपल्याशी काही बोलत नाहीत. सगळं राधाक्कांच्या तर्फे!

त्यांचा मुलगा सून नात इथेच मागच्या बाजूला रहायची आणि ड्रायव्हर अजित पण तिथेच रहायचा. माझ्या खोलीत राधाक्कांची नात नूपुर. हे सगळे तिथे काम करायचे

सरस्वतीदेवींचा मुक्काम सारखा स्टडीतच असायचा. त्या खोलीत छतापर्यंतच्या कपाटांमधे पुस्तकंच पुस्तकं होती. त्यातच त्या कायमच्या बसलेल्या असत. आणि आपण त्यांना काही नेऊन दिलं की काही न बोलता डोळेच हसायचे त्यांचे. राणासाहेब आणि सरस्वतीदेवी त्यांच्या बेडरूममधे असायचे तेव्हा तिथून भांडण केल्यासारखे खूप आवाज ऐकू यायचे. पण जेव्हा ते दोघे खोलीच्या बाहेर यायचे तेव्हा त्या भांडणाचा मागमूसही त्यांच्या चेहर्‍यावर दिसायचा नाही. मला विचित्रच वाटायचं सगळं...

राणासाहेब दिवसदिवस बाहेर असायचे आणि घरात हो नाही शिवाय फारसं काही बोलल्याचं ऐकू यायचं नाही. धाकटे राजासाब काहीतरी बरंच शिकून आले होते म्हणे. माँजी आणि राजासाब बर्‍याच वेळा हसर्‍या चेहर्‍याने एकमेकांशी गप्पा मारत बसलेले दिसायचे.अर्थात बहुतेक वेळ तेही बाहेरच असत आणि फोन कानाला असेच सतत.

माँजी टी.व्ही.वर काहीतरी लावून बसलेल्या असायच्या. नाहीतर सिनेमा बघत बसलेल्या असायच्या. ते सिनेमे पण विचित्रच. कधी त्यातली माणसं संपूर्ण सिनेमाभर टेबलाशी बसून बोलतच असायची. तर कधी युध्दं, लढाया, जखमी माणसं.. असली दृष्यं! कधी काहीतरी कुणीतरी स्टेजवर बसून सितार घेऊन आ ऊ करत गात असायचं. एकदा त्यांना विचारलं तेव्हा म्हणाल्या, "ती सितार नाही, तानपुरा आहे. "

इथे आल्यापासून कधी एकदाही नेहमीच्या सीरीयल नाही बघायला मिळाल्या.

दोन मुलं आहेत राणासाहेब आणि सरस्वतीदेवींना. पण त्यांना होस्टेलमधे ठेवलंय. घरात कामाला एवढी माणसं आहेत तरी मुलांना कशाला ठेवायचं आपल्यापासून दूर कोण जाणे! आता मात्र लाॅकडाउनमुळे घरीच असतात.

एक न एक विचित्र माणसांची फॅमिली आहे ही. अर्थात मला काय करायचंय त्याच्याशी? मला चांगले पैसे मिळतात मग बास झालं. काम पण मरणाचं असतंंच की! हाऊस कीपिंग म्हणे! यात सगळंच येतंय. सक्काळपासून रात्री झोपेपर्यंत एक मिनिट उसंत मिळत नाही. रविवारी मात्र सुट्टी असते. त्यादिवशी या विचित्र फॅमिलीतले लोक काहीतरी स्वतःच खुडबुड करतात स्वयंपाकघरात आणि आम्हा ५ जणांच्या स्टाफला खाऊ घालतात सकाळी. संध्याकाळी मात्र आम्ही आपापलं बघायचं.

पण बाकी त्रास नाही. आमची कामं आम्ही नीट केली की झालं. कधीतरी कुणाकडून तरी काहीतरी चुका होतातच. पण ही विचित्र फॅमिली ते काही डोक्यात घेत नाही. पण मी आले इथे. घरी आम्ही एका खोलीत चारजण रहातो. इथे नुपुर आणि मी दोघीच. शिवाय पाणी नळाला येतं. भरावं लागत नाही. काम फार असलं, तरी खायला पण भरपूर मिळतं. रविवारी सुट्टी मिळते. शिवाय घरी पैसे पाठवता येतात. घरचे लोक निदान नीट खाऊ शकतात. एक आहे की घरी जाता येत नाही. आता गेले सहा महिने मी अडकून पडलीये इथं लाॅकडाउनमुळे. पण आता काही करून तरी जायचच्चे मला घरी सगळ्यांना भेटायला. कंटाळा आलाय खूप. थकायला पण झालंय. काहीवेळा वाटतं की बास झाली ही नोकरी. अजून शिकावं म्हणजे जास्त पैसे पण मिळतील. पण काही काही जण म्हणतात की या लाॅकडाउनमुळे नोकर्‍या गेल्यात लोकांच्या. काय करावं गोंधळ होतोय डोक्यात.

एकदिवशी माँजींना म्हटलं,'माँजी, खूप आठवण येतेय घराची. जाऊ का थोडे दिवस?'

माँजीं माझ्याकडे थोडा वेळ बघतच राहिल्या. 'अं... सरस्वतीदेवींना विचार आणि बघ काय म्हणतायत त्या ते'.

सरस्वतीदेवी स्टडीत पुजलेल्या असतात. तिथेच सापडल्या. राणासाहेब पण तिथेच होते. आणि दोन्ही पोरं पण तिथेच. सगळेजण आपापल्या वह्यापुस्तकात डोकं घालून बसलेले होते. विचित्र फॅमिली!

मी विचारलं त्यांना "जाऊ का घरी" म्हणून.

हे ऐकल्यावर त्यांच्या भुवया उंच झाल्या आणि तिथेच थांबल्या. राणासाहेब आणि मुलं पण एकमेकांकडे पहायला लागली. सरस्वतीदेवींनी राणासाहेबांकडे पाहून भुवया खालीवर केल्या.

'लेट हर गो माय डिअर!' मला इंग्रजी समजतं हल्ली थोडं थोडं. आणि मला हसू फुटलं. मला हसताना पाहून ते सगळेचजण हसायला लागले. विचित्र आहेतच ते.

'पण कशी जाणार ग तू? बघूया ,काहीतरी करूया'.

माझं हसू मावळलं.

दोनतीन दिवसात राजासाबना एक महत्वाचं काम निघालं. त्यांच्याबरोबर मी जाईन असंही ठरलं. आनंदात होते मी. दुसर्‍या दिवशी निघायचं. रात्री सगळी कामं आटोपून दिवे बंद करून मागच्या दाराकडे जाणार्‍या बोळकंडीतून चालायला लागले. माझ्याच नादात. समोरून येणारे राजासाब मला दिसलेच नाहीत. अगदी समोरून धडकलेच त्यांच्यावर. अगदी काहीतरीच वाटलं. पण त्यांनी मला घट्ट पकडून मिठीत घेण्याचा प्रयत्न केला आणि माझं तोंडही स्वतःच्या तोंडाजवळ आणण्याचा प्रयत्न केला. माझा थरकाप झाला होता.एक जोराचा हिसडा मारून त्यांना जोरात ढकलून मी मागच्या दारातून बाहेर पडले. माझा श्र्वासोच्छ्वास जोरात सुरु होता. भयंकर घाबरल्यामुळे एका दगडाला अडखळून तोल जाऊन मी धाडकन खाली पडले. त्या आवाजाने नुपुरचे आईबाबा जागे होऊन बाहेर आले. मला अगदी ओशाळवाणं झालं होतं. कसंबसं उठून खोलीकडे धाव घेतली.

उद्या मला घरी जायचंय आणि ते सुध्दा या राजासाबसोबत! या कल्पनेनेच मला घाम फुटला होता. काय करावं सुचत नव्हतं. एकाएकी एक निश्र्चय करून मी राधाक्कांच्या शोधात निघाले. किचनशेजारच्या खोलीत त्या झोपतात. बंगल्यातले बाकी दिवे पण आता बंदच होत होते. स्टडीतला दिवा मात्र अजून झगझगत होता. राधाक्कांच्या खोलीत डोकावून पाहिलं. पण त्या गायब.

देवा! काय करू आता? सरस्वतीदेवींना चहाकाॅफी द्यायला गेल्या असतील म्हणून स्टडीत डोकावले. दोघी तिथेच होत्या. गेले खरी त्यांच्या समोरपण काय बोलावं कळेना.

'काय झालं ग?' याचं उत्तर म्हणूनच की काय मला दरदरून घाम फुटला होता आणि शरीर थरकापत होतं. राधाक्कांनी मला जवळच्या खुर्चीवर बसवलं आणि पाण्याचा ग्लास समोर ठेवला.

'मला उद्या जायचंय आणि....' पुढे शब्द सरकेनात. त्या दोघींनी मला शांत होऊ दिलं आणि हळूहळू माझ्या तोंडून झाली गोष्ट बाहेर पडली. राधाक्का गप्प होत्या.

सरस्वतीदेवींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. म्हणाल्या,'उद्या सुरक्षित जाशील तू. जा झोप आता. राधाक्का, तिला मागच्या दरवाज्याशी सोडून परत या. आणि दार लावून घ्या. नंदिनी, नूपुर आहे ना तुझ्या खोलीत?'

मी 'हो' म्हटलं. मी खोलीत परतले. पण मला उद्याची खात्री वाटेना. नूपुर गाढ झोपेत होती. मी अंथरुणावर पडून झोप लागण्याची वाट बघत राहिले. कधी झोप लागली मला समजलं नाही.

सकाळी मला नूपुर विचारत होती,'घरी जातेयस ना आज? कधी येशील परत?'

याचं उत्तर मला माहीत नव्हतं.'आधी मम्मी आणि बहीणभावाला भेटते तरी.' असं काहीतरी गोलमाल उत्तर देऊन मी आवराआवरीला लागले. तेवढ्यात राधाक्का आल्या, म्हणाल्या," सगळं आवर आणि सरस्वतीदेवींना जाऊन भेट'.

पुन्हा पोटात गोळा आला. काय होणार आता? माझी ही नोकरी काही रहाणार नाही आणि मी इथे पुन्हा काही परत येणार नाही. माझी खात्रीच झाली होती. नूपुरचा निरोप कसा घ्यावा हेही मला कळत नव्हतं. मी माझी बॅग उचलली आणि स्टडीकडे चालायला लागले.मी घरी तरी जाईन का? की वाटेतच काही होईल मला? जाण्यापूर्वी आईशी फोनवर बोलता येईल का मला? अनेक प्रश्र्न भिरभिरायला लागले.

स्टडीत पोचले तर असं वाटत होतं की सरस्वतीदेवी रात्रभर तिथेच बसून आहेत. मला आलेलं पाहून त्या उठल्या आणि मला चक्क जवळ घेतलं.'नंदिनी, घाबरू नको. खंबीर रहा. काही होत नाही. जगताना नाना प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. हा त्यातलाच एक समज!'

खरं तर मला हे ऐकून खूपच राग आला होता. म्हणे त्यातलाच एक प्रसंग. आता यांचं खरं रूप दिसतंय आपल्याला. टी.व्ही.वर काही खोटं दाखवत नाहीत. या लोकांना यातलं काहीच भोगायला लागत नाही.आणि दुसर्‍याला मात्र 'काही होत नाही,चल' म्हणतात! राधाक्कांनी मला चहा दिला. सकाळचा नाश्ता डब्यात भरुन दिला. बाहेरच्या हाॅलमधे आले. तिथे माँजी बसलेल्या होत्या आणि राजासाब उभे होते. सरस्वतीदेवी पण आल्याच पाठोपाठ. आता कसल्या स्फोटाला निमंत्रण मिळणारआहे याची कल्पना येईना.

तेवढ्यात राजासाबकडे हात करुन माँजी म्हणाल्या,' ऐक काय म्हणताहेत राजासाब.'

क्षणभर वर नजर करून मी राजासाबकडे पाहिलं. त्यांची नजर खाली होती. 'नंदिनी, आय अॅम व्हेरी साॅरी. काल चूक झाली माझ्या हातून. पुन्हा असं होणार नाही. खात्री देतो. तू तुला हवं तेव्हा इथे परत येऊ शकतेस.'

माझ्या डोळ्यांवर आणि कानांवर माझा विश्र्वास बसेना. मला खूप हलकं वाटत होतं.खरंच इतकी चांगली असू शकतात माणसं?

इथल्या सगळ्याच बाया चांगल्या आहेत आणि पुरुष पण वाईट नाहीत. काहीतरी खूप चांगलं घडतंय आणि नक्की घडणारच आहे असा विश्र्वास मला वाटायला लागला होता . . .

स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती, पुणे

८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस चिरायू हो!
समता, न्याय, बंधुता आणि समान अधिकारांचे रक्षण करण्याची लढाऊ परंपरा जिंदाबाद!


८ मार्च म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिवस. शंभर वर्षांहून अधिक काळ साजरा होणारा, अन्याय, शोषण, अत्याचार, भेदभावाच्या विरोधात स्त्रियांनी रस्त्यावर उतरून केलेल्या प्रतिरोधाचे जागतिक प्रतीक. पण आज समतेसाठी आणि हक्कांसाठी लढण्याचा हा अधिकारच धोक्यात आला आहे. जे.एन.यु-अलिगड-जामिया ई. विद्यापीठांमध्ये झालेले विद्यार्थ्यांचे लढे, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात किंवा सध्या सुरु असलेली शेतकरी आंदोलने, ठिकठिकाणी कामगारांच्या अधिकारांसाठी, रेशन-पाणी इत्यादी होणारी आंदोलने यांतून सर्वत्र स्त्रियांची भागीदारी आणि नेतृत्व ठळक पणे समोर आले आहे. पण “बेटी बचाओ बेटी पढाओ” अशी घोषणा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना हे अजिबात खपत नाही. स्वातंत्र्याची भाषा बोलणाऱ्या, अधिकारांसाठी संघटना बांधणी करून लढणाऱ्या स्त्रियांची त्यांना खरे तर भीती वाटते. त्यामुळे आपल्या अनेक बहादूर भगिनींवर “देशद्रोही” असा शिक्का मारून त्यांना तुरुंगात टाकले गेले आहे. सुधा भारद्वाज, शोमा सेन, गुल्फिषा, सफूरा, देवांगना, नताशा, नोदीप, दिशा.... त्यांची यादी वाढतच चालली आहे. शिवाय तिकडे संसदेत स्वतः प्रधानमंत्री हक्कांची लढाई लढणाऱ्यांची “आंदोलनजीवी” म्हणून खिल्ली उडवतात, आणि सरकार आदेश देते की समाज माध्यमांवर शासनाच्या विरोधात लिहिणाऱ्या-बोलणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी “स्वयंसेवक” नेमले जातील! म्हणजे मनुने जसे स्त्रियांना बंधनात ठेवण्याचे फर्मान काढले होते, त्याच पद्धतीने हे मोदी सरकार स्त्रियांवर नजर ठेवून तथाकथित कायदे मोडले म्हणून शिक्षा करायला निघाले आहे. खोट्या आरोपांवर डांबून ठेवलेल्या सर्व कार्यकर्त्यांना ताबडतोबीने सोडावे, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारची बंधने आणू नयेत अशी आम्ही मागणी करतो. सरकारच्या धनिक-धार्जिण्या धोरणांना जसा लोकांचा विरोध वाढत आहे तशी या सरकारची एकाधिकारशाही वाढत आहे. पोलीस, नोकरशाही, न्यायपालिका, प्रसार माध्यमे, इतर स्वायत्त लोकशाही संस्थांवर दबाव आणून आपल्या बाजूने निर्णय घ्यायला त्यांना भाग पाडत आहे. ही फॅसिझमच्या दिशेने वाटचाल आहे. या अघोषित आणीबाणीला आम्ही आव्हान देतो. आम्हाला कोणत्याही तुरुंगाची भीती नाही! प्रतिकार हा आमचा अधिकार आहे. आमच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार! हेच ८ मार्च च्या निमित्ताने आम्ही ठणकावून जाहीर करीत आहोत.

स्त्रियांवरच्या अत्याचारांची वाढत जाणारी संख्या आणि दिवसेंदिवस भीषण होत जाणारे स्वरूप रोखण्यात शासन व्यवस्था पूर्णतः निकामी ठरली आहे. स्वतः लोकप्रतिनिधी, न्यायाधीश, पोलीस, प्रशासन त्यात भागीदारी करून स्त्रियांप्रति प्रतिगामी आणि बुरसटलेले विचार व्यक्त करताना दिसतात. असलेल्या कायद्यांची चोख अंमलबजावणीकरून अन्याय अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा करण्याच्या ऐवजी स्त्रियांनाच दोषी ठरवले जात आहे. प्रेम, मैत्री, लग्न करण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणारे ‘लव-जिहाद’ सारखे कायदे करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धर्मांध जातीयवादी कार्यक्रम राबवला जात आहे. आमच्या या मूलभूत अधिकारांवर आम्ही कधीही टाच येऊ देणार नाही असे आम्ही घोषित करतो.

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर देशात अभूतपूर्व मंदीचे वातावरण असून सामान्य महिलांच्या अडचणी खूपच वाढल्या आहेत. त्यांच्या बिनपगारी श्रमाचा वाटा वाढला आहे. महिलांवरील हिंसा वाढली व बालविवाहांचे प्रमाणही वाढले. वाढती बेरोजगारी आणि प्रचंड महागाईला तोंड द्यावे लागत आहे. रेशन, आरोग्य, शिक्षण, पाणी इत्यादी सार्वजनिक सोयींमध्ये कपात व त्यांचे खाजगीकरण अव्याहतपणे सुरु आहे. कॉर्पोरेट क्षेत्रापुढे नमते घेऊन सर्व धोरणे त्यांच्या हितासाठी राबवली जात आहेत. सर्व नियम धाब्यावर बसवून संसदेत बळजबरीने शेती विषयक तीन आणि कामगार विरोधी चार कायदे या सरकारने मंजूर करून घेतले, त्यांचे थेट परिणाम महिलांच्या जीवनावर होत आहेत. बजेट मध्ये मोठ्या कंपन्यांना सूट दिली गेली पण महिला, लहान मुले, दलित, आदिवासी, अपंग इ. वंचित घटकांच्या साठीच्या योजनेत कपात करण्यात आली. खाजगीकरणाचा पुरस्कार करणारे नवीन शैक्षणिक धोरण शिक्षणाचा मूलभूत हक्क हिरावून घेणारे आहे. पूर्ण बहुमतात असलेले हे सरकार महिलांसाठी संसदेत आणि विधिमंडळात ३३% आरक्षण ठेवायला तयार नाही.

शेतकरी आंदोलनाशी व देशात ठिकठिकाणी सुरू असलेल्या शोषण, अन्याय आणि भेदभाव विरोधी लढा देणाऱ्या सामान्य लोकांशी आम्ही एकजूट व्यक्त करतो. सध्याच्या आव्हानांची जाणीव ठेवून, आमच्यात जाती-धर्म-प्रांत-भाषा-पंथ इत्यादी नावाने फूट पाडण्याचे आम्ही सर्व प्रयत्न हाणून पाडू. ८ मार्च ची लढाऊ परंपरा स्मरून आमच्या अधिकारांचे रक्षण करू हाच आमचा निर्धार आहे.

आमच्या मागण्या

➢ खोट्या आरोपांखाली कैदेत असलेल्या सर्व कार्यकर्ते, पत्रकार, इत्यादींची त्वरित सुटका करा. यु.ए.पी.ए. रद्द करा. नागरिकत्व दुरुस्ती कायदा मागे घ्या.

➢ तीन शेतकरी विरोधी आणि चार कामगार विरोधी कायदे मागे घ्या. शेतीमालासाठी किमान आधारभूत किंमतीला कायदेशीर आधार द्या. शेती व्यवस्थेचे कंत्राटीकरण आणि खाजगीकरण रद्द करा. सर्व राज्यांना विकास कार्यावर खर्च करण्यासाठी जी.एस.टी. ची थकीत रक्कम त्वरित द्या.

➢ महाराष्ट्रात पारित केलेला जमीन अधिग्रहण कायदा रद्द करा. शेतकरी आणि कामगार विरोधी केंद्रीय कायदे राज्यात लागू करू नका.

➢ पेट्रोल-डीझेल-स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यासाठी सेस व कर कमी करा. महागाई नियंत्रित करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्याचा उपयोग करा. अन्न धान्याचा सट्टा बाजार बंद करा.

➢ रेशन व्यवस्था बळकट करून त्याचे सार्वत्रिकीकरण करा. अनावश्यक रेशन कार्ड तपासणी मोहीम मागे घ्या.

➢ शेतकरी महिलांची स्वतंत्र नोंद करा. त्यांना कृषी विषयक योजनांचा फायदा द्या.

➢ २००९ मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने तयार केलेला महिला शेतकरी धोरणाचा मसुदा, तसेच २०१२ साली ज्येष्ठ कृषितज्ञ एम एस स्वामिनाथन यांनी राज्य सभेत मांडलेले महिला किसान अधिकार (खाजगी) विधेयक यावर व्यापक चर्चा घडवून ते अंमलात आणा.

➢ रोजगार हमी योजनेवरील तरतूद वाढवा. शहरी भागात रोजगार हमी कार्यक्रम राबवा. असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांच्या नोंदणीची व्यवस्था करून त्यांना सामाजिक सुरक्षा देणारा सक्षम कायदा व त्यासाठी बजेट मध्ये तरतूद करा.

➢ शक्ती विधेयक मागे घ्या. महिला अत्याचार विरोधी कायद्यांच्या चोख अंमलबजावणीसाठी पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करा.

➢ ‘लव जिहाद’ सारखे घटना विरोधी कायदे रद्द करा. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना कायदेशीर संरक्षण आणि निवारा, प्रशिक्षण, इत्यादी योजनांमध्ये प्रोत्साहनपर आरक्षण द्या. तथाकथित प्रतिष्ठेपायी केलेल्या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष कायदा करा.

➢ महिलांचे बचत गट आणि सहकारी संस्थांना स्वस्त दरात कर्ज आणि बाजारपेठेची हमी द्या. सरकार ला लागणाऱ्या वस्तु आणि सेवा त्यांच्याकडून घ्या.

➢ महिला विकासाच्या सर्व योजनांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात एकूण खर्चाच्या किमान ५% तरतूद करा. शिक्षण क्षेत्रावर राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या किमान ६ % आणि आरोग्यावर किमान ४% खर्च करा. दलित-आदिवासी समूहांसाठीच्या आर्थिक तरतुदींच्या वर्गीकरणाला प्रतिबंध करणारा कायदा करा. अपंग महिलांसाठी तरतूद वाढवा. भटक्या विमुक्त स्त्रियांची नोंद घेऊन त्यांच्यासाठी विशेष योजना करा.

➢ एल.आय.सी., जी. आय. सी. राष्ट्रीयकृत बँका व इतर सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण करण्याचे धोरण मागे घ्या.



स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीकरिता संघटना, संस्था व कार्यकर्त्यांचा पाठिंबा

अखिल भारतीय जनवादी महिला संघटना - हिराबाई घोंगे सुभद्रा खिलारे; बहुजन महिला आघाडी - रेखा ठाकूर; भारतीय महिला फेडरेशन - लता भिसे सोनावणे; जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय - सुनीती सु. र.; कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत - सुरेखा गाडे, पूर्णिमा चिकरमाने; लोकशाही उत्सव समिती - मिलिंद चव्हाण, शंकर गवळी; पुणे जिल्हा घरकामगार संघटना - किरण मोघे, सरस्वती भांदिर्गे; पुणे शहर मोलकरीण संघटना, समाजवादी महिला सभा - वर्षा गुप्ते; श्रमिक महिला मोर्चा - मेधा थत्ते; सत्यशोधक महिला सभा - प्रतिमा परदेशी; श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी) - नागमणी राव; स्त्री मुक्ती संघटना - मुक्ता शिंगटे; तथापि ट्रस्ट - मेधा काळे; पुरुष उवाच; मिळून साऱ्याजणी - गीताली वि. मं. आणि अर्चना मोरे, अंजली मायदेव, अरुणा बुरटे, जया सागडे, क्रांती अग्निहोत्री डबीर, मनिषा गुप्ते, मेधा टेंगशे, निर्मला भाकरे, प्रसन्ना इनवली, प्रीती करमरकर, रझिया पटेल, डॉ. साधना नातू, संध्या फडके, संयोगिता ढमढेरे, सीमा कुलकर्णी, शैलजा आरळकर, उज्वला मसदेकर, वंदना कुलकर्णी, विद्या कुलकर्णी, विनीता बाळ