जानेवारी ते डिसेंबर 2020 ह्या वर्षभरातली ही शेवटची पोस्ट आहे. म्हणून वर्षभरात ‘पुन्हास्त्रीउवाच’मधून हाताळलेल्या विषयांचा थोडक्यात आढावा इथे मांडणार आहे. 

खरंतर ‘पुन्हास्त्रीउवाच’ ची सुरुवात मार्च 2019 मध्ये केली होती. त्यामुळे आमची वर्षपूर्ती मार्चमध्ये होते – असं देखील म्हणता येईल. तरीही डिसेंबरमध्ये हा आढावा मांडायचं कारण - मार्च 2021 मध्ये सुरू होणाऱ्या वर्षासाठी तुमच्याकडून काही सूचना हव्या आहेत. जानेवारीत जर सूचना मिळाल्या तर त्या मार्च पर्यन्तअमलात आणण्यासाठी नियोजन करता येईल.

‘पुन्हास्त्रीउवाच’ मध्ये विविध ताज्या घडामोडींच्या संदर्भात विशेषत: स्त्रीयांच्या दृष्टिकोनातून मांडलेले विचार, भावना आणि मतंमतांतरं वाचकांच्या पर्यन्त पोचवायचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी लेख, कथा, कविता, व्यंगचित्रे, अनुभवकथन अशा निरनिराळ्या माध्यमांचा उपयोग करायची इच्छा असते. जरी अनेक मुद्यांविषयीचे लेख लिहिणारे लेखक जोडले गेले असले तरी स्त्रीवादी ललितसाहित्य मात्र फारसं मिळत नाही. येत्या वर्षात कथा, कविता यासारखं साहित्य ‘पुन्हास्त्रीउवाच’कडे पाठवावं अशी विनंती आहे. ले-आऊटच्या संदर्भातल्या काही सूचना असतील तरी अवश्य सांगा आणि स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिहू शकणाऱ्या लेखक-लेखिकांची नावेदेखील सुचवा.
कृपया पुढे दिलेली जंत्री पाहून आणखी कोणकोणत्या विषयांच्या संदर्भात आणि कोणत्या स्वरूपात मांडणी व्हायला हवी, ते ‘पुन्हा स्त्रीउवाच’ला नक्की सांगा. तुमच्या सूचनांची वाट पाहत आहे.
 
आता जानेवारी 2021 मध्ये ‘शिक्षण आणि लिंगभाव’ या विषयावर भाऊसाहेब चासकर, सुजाता पाटील, सारिका उबाळे, प्रतिभा वाघ अशा अनेक अनुभवी शिक्षकांचे ज्ञानप्रक्रियेविषयीचे विचार आणि काही कविता घेऊन पुन्हा भेटू!

जानेवारी

‘लिंगभाव आणि विनोद’

26

लेख, व्यंगचित्रमालिका,  कविता आणि मुलाखती  

 

मार्च

लिंगभाव आणि ओळख’(Gender & Identity)

 21

लेख, कविता आणि मुलाखती  

 

जून

पर्यावरण

4

लेख

जुलै

आरोग्य आणि लिंगभाव

8

करोनामुळे स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर झालेले परिणाम,किशोरवईन मुलांच्या लैंगिक आरोग्यविषयी आणि ‘आशा’ कर्मचाऱ्यांचा संघर्षविषयी लेख

डॉक्टर,

ऑगस्ट

सप्टेंबर

परिघावरची घालमेल

4

अपंग महिला, ट्रान्सजेंडर व्यक्ती, एकल महिला, आणि घरेलू कामगार महिला यांच्यावर करोनाच्या परिणामाविषयी लेख आणि अनुभवकथन   

ऑक्टोबर

काही कायदे, जाहिराती आणि उजव्या शक्तींचे वाढते प्राबल्य

4

कृषी कायदे, संपत्ती कायदे, करोना काळातील जाहिराती यांचे स्त्रीयांच्या दृष्टिकोनातून विश्लेषण करणारे  लेख

नोव्हेंबर

पुरुषभान

19

पुरुषांचे करोना काळातील अनुभव,कविता, पुस्तक परिचय, ‘पुरुषदिना’विषयी पुरूषांचे विचार वेबसिरीज मधील पुरुषप्रतिमा आणि सणातील पुरुषप्रधानता यावर लेख  

डिसेंबर

लव्हजिहाद आणि ‘शक्ती’ कायदा , तरुण मुलींना वाटणारी असुरक्षितता  

4

लेख

 

गोल खुंटी; चौकोनी भोक.

महाराष्ट्रात येऊ घातलेल्या शक्ती कायद्याला विरोध करण्या विषयी स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समितीची भूमिका आपण मागच्या आठवड्यात समजून घेतली. ह्या नवीन कायद्यामुळे महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंड होऊ शकतो. हा नवा कायदा महिलाविरोधी ठरू शकतो - असे महिला संघटनांना कशामुळे वाटते, ते मागच्या आठवड्यातील लेखात आपण पाहिले. पण या आठवड्यात काहीसा वेगळा विचार मांडणारा लेख देत आहे . ह्या लेखातले काही मुद्दे यापूर्वी काही स्त्री-संघटनांनी मांडलेले आहेत. पण काही मुद्दे मात्र वादग्रस्त ठरलेले आहेत. म्हणून हा लेख आवर्जून वाचा आणि तुमची मतं नक्की कळवा!

निर्भया प्रकरणाने अख्ख्या भारताला खडबडून जागं केलं आणि कायद्यात बरेच बदल घडले. बालकांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध पॉक्सो कायदा आला. अत्याचारित बालकाची/बालीकेची आदरपूर्वक तपासणी, विशेष तपास अधिकारी, संवेदनशील हाताळणी, विशेष सरकारी वकील, जलदगती न्यायालये आणि आवश्यक ती गुप्तता हे सगळं ह्या कायद्यानी दिलं. आज अत्यंत शिस्तबद्धरीत्या, मुद्देसूद पद्धतीने अशा पेशंटची तपसणी करण्याची पद्धत विकसित झाली आहे. बलात्काराच्या कायद्यानुसार (भा.दं.वि. ३७६) कोवळ्या मुलींवर बलात्कार होऊ शकतो याची कायद्याने दखल घेतली होती पण कोवळी मुलंही याची शिकार होऊ शकतात ही शक्यता मुळी गृहितच धरण्यात आली नव्हती. पॉक्सो कायद्याने ही त्रुटीही दूर झाली. मुलामुलींचा पॉर्नोग्राफीसाठी वापरही ‘लैंगिक गुन्हा’ आहे. बेकायदा लैंगिक कृतींसाठी सहाय्यही गंभीर गुन्हा आहे.

बलात्काराच्या व्याख्येची व्याप्तीही बदलत असलेली दिसते. पूर्वी बलात्काराचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी ‘लिंगाचा योनीत प्रवेश’ आवश्यक होता. मग त्यात गुदसंभोग आणि मुखमैथुनचा समावेश झाला आणि आता ‘कोणताही मानवी अवयव अथवा कोणत्याही वस्तूचा, शरीराच्या कोणत्याही द्वारमार्गात प्रवेश (भोकात) प्रवेश’ अशी व्याख्या झालेली आहे. यात ओठानी/जिभेनी केलेला स्पर्शही अंतर्भूत आहे. अर्थात कायदेमान्य वय आणि संमती नसताना.

पण बालविवाह कायदा, पॉक्सो, बलात्कारादी कायद्याने आणि अशा प्रकरणांच्या प्रचलित हाताळणीने काही विसंगती आणि प्रश्नही निर्माण केले आहेत. उदा. लैंगिक गुन्ह्यातील बळीची तपासणी ही फक्त स्त्री डॉक्टरनेच करावी असं हा कायदा म्हणतो (Section 27(2)). पण भा.द.वि. १६६अ नुसार ‘वैद्यकीय अधिकाऱ्याने’, बलात्कारीत स्त्रीची तातडीने तपासणी केली पाहिजे असं म्हटलं आहे. यात स्त्री पुरुष सर्व डॉक्टर आले. जेंव्हा स्त्री डॉक्टर नसेल तेंव्हा यातील कोणते कलम पाळायचे? असा प्रश्न आहे. यात स्पष्टता हवी.

‘बलात्कार’ हा फक्त पुरुषच करू शकतो असं कायदा सांगतो. बलात्कार आणि ‘लैंगिक हल्ला’ (Sexual assault) असा भेद आहे. बलात्कार हा पुरुषशाहीचा परिपाक. त्यामुळे तो फक्त स्त्रीवरच होऊ शकतो. शिवाय स्त्री बलात्कार करू शकते हे मान्य केलं, तर प्रत्येकच पुरुष बलात्काराचा आरोप होताच, तिनेच माझ्यावर बलात्कार केला असा बचाव करेल. तीच बदचलन आहे, तिची संमती होतीच, हे आरोपच खोटे आहेत; इत्यादी बचाव आहेतच त्यात ही आणखी एक भर. पण एखाद्या स्त्रीने एखाद्या कोवळ्या मुलाला शरीरसंग करायला भाग पाडणे हे अगदीच शक्य आहे. या बाबतीत निव्वळ ‘लैंगिक हल्ला’ (Sexual assault, Section 8) असा आरोप होऊ शकतो. ‘बलात्काराचा’ नाही. लिंगाला ताठरता येणे आणि स्खलन होणे या दोन्ही गोष्टी त्या मुलाच्या मनाविरुद्ध घडू शकतात. पण कायदा ही बाब मानत नाही. एका पुरुषाकडून दुसरी स्त्री वा दुसरा पुरुष बलात्कारीत होऊ शकतो पण स्त्रीकडून पुरुषावर ‘बलात्कार’ होऊ शकत नाही. ह्याही तरतुदीचा पुनर्विचार करायला हवा.

पीडित व्यक्तीचे नाव जाहीर करायला कायद्याने बंदी आहे. हे योग्यच आहे. पण आरोपीचे नाव माध्यमांतून सर्रास जाहीर केले जाते. हा काही किरकोळ गुन्ह्याचा आरोप नाही. अत्यंत गंभीर आरोप आहे. नुसत्या आरोपाचे भीषण वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक परिणाम होऊ शकतात. त्या माणसाची पतप्रतिष्ठा, विश्वासार्हता संपुष्टात येते. गुन्हा शाबीत होईपर्यंत प्रत्येक आरोपी निर्दोष आहे, हे तत्व बघता आरोपीलाही असाच गुप्ततेचा अधिकार हवा.

पॉक्सोखाली बलात्काराचा आरोप हा बरेचदा शस्त्र म्हणूनही वापरला जातो. विशेषतः कडक तरतुदी असलेला, लहान मुलांच्या बाबतीतला, हा कायदा असल्याने, आरोपीला अजिबात सहानुभूती मिळत नाही. त्यामुळे अर्थातच गैरवापरास अत्यंत सुलभ असा हा कायदा आहे. मालक-भाडेकरू, देणेकरी, वैवाहिक भांडण इत्यादी कारणांसाठी, प्रतिपक्षाची जिरवण्यासाठी, या कायद्याचा वापर करण्यात आला आहे. येत आहे. हे सारे हितसंबंध लक्षात घेऊनच पोलिसांनी योग्य ती कलमे लावली पाहिजेत, हेच यातून स्पष्ट होते. पुढ्यातल्या खटल्यात ह्या कायद्याचा वापर ढाल म्हणून न होता तलवार म्हणून होतो आहे का; हे प्रत्येक न्यायाधीशांनी तपासायला हवे. नव्हे तशी निसंदिग्ध तरतूदच हवी. अशी नसल्यामुळे खालची न्यायालये कायद्याचे बोट धरून चालण्याऐवजी कायद्यावर बोट ठेऊन चालतात. त्यांना तेवढेच अधिकार आहेत. कायद्याचा अर्थ लावण्याची मुभा त्यांना नाही. तेंव्हा अशी तरतूद हवीच हवी.

कोवळ्या वयातील मुलामुलींचे परस्पर संमतीने संबंध आले तर काय करायचे? हा ही थेट ‘लैंगिक गुन्हा’ म्हणावा; असं कायदा सांगतो. बालकांचे लैंगिक शोषण हा गहन गंभीर प्रश्न आहेच पण अठरा वर्षाचा आतला/ली तो/ती ‘बालक’ असं एकदा कायद्यानी ठरवलं की बऱ्याच गोच्या होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते १० ते १९ हे कुमार वय मानलं गेलं आहे. याच वयात शरीरातले हॉर्मोन्स मेंदूत धडका द्यायला लागतात. जसजसे आरोग्य आणि आहार सुधारतो आहे तसतसे वयात येण्याचे वय, अलीकडे सरकू लागले आहे. शारीरिक बदल होत असतात पण मानसिक, भावनिक मॅच्युरीटी नसते. इंटरनेट आणि मोबाईलमुळे नको त्या स्रोताकडून, नको त्या वयात, नको ती माहिती पोहोचत असते. याचं मुख्य कारण योग्य माहिती पोहोचवण्यात आपण कमी पडतो. जिज्ञासा, धाडस करायची उर्मी, मुलामुलींनी मोकळेपणाने एकत्र येण्याच्या कितीतरी संधी, अशा अनेक घटकातून शारीरिक लगट होऊ शकते, मुलामुलींचा शरीरसंबंध उद्भवू शकतो. पण प्रत्येक वेळी याचा अर्थ ‘बलात्कार’, ‘बाल-लैंगिक-शोषण’, ‘लैंगिक हल्ला’ असा लावायचा का?
पूर्वीच्या कायद्यानुसार सोळा वर्षानंतर परस्परांच्या संमतीने शरीरसंबंध मान्य होते. आता अठराच्या आत, परस्पर संमतीने जरी शरीरसंबंध झाले, तरी तो थेट बलात्काराचा गुन्हा गणला जातो. शिवाय वर उल्लेखलेली बलात्काराची व्यापक व्याख्या जर लक्षात घेतली तर असा गुन्हा घडणं किती सोपं आहे हे लक्षात येईल. मुले/मुली वयात येताना ओढ, आकर्षण, शारीर छेडछाड हे घडत असते. यात शोषण, फसवणूक होणे शक्य आहे. पण त्यापेक्षाही मोठे होण्यातली एक उत्स्फूर्त, नैसर्गिक आणि स्वाभाविक पायरी म्हणूनही या खेळाकडे पहाता येईल / पहाण्याची सोय हवी.

जो पर्यंत हे सारे प्रकार गुपचूप, गुपचूप चालतात तो पर्यंत ह्याची विशेष झळ कुणालाच बसत नाही. उलट संबंधितांना मज्जाच येत असते. पण अशा संबंधांचा काही पुरावा निर्माण झाल्यास, म्हणजेच गर्भ राहिल्यास किंवा घरच्यांना हे नापसंत असताना रंगेहाथ पकडले गेल्यास, मोठी आफत ओढवते. घरच्यांची पसंती नापसंती अनेकदा जातीवरही अवलंबून असते. मग तर गुन्हा ‘लैंगिक अत्याचार’ गुणिले ‘जातीय अत्याचार’ अशा चढत्या भाजणीचा ठरतो.
जर अठरा वर्षाच्या आतल्या मुलीला गर्भधारणा झालेली आढळली, तर ही बाब डॉक्टरने पोलिसांना कळवणे कायद्याने बंधनकारक आहे. नाही तर गुन्ह्यात तेही सामील होते असा खटला भरला जाऊ शकतो. पूर्वी असं बंधन नव्हतं. त्यामुळे सहमतीने संबंध आले असतील तर गर्भपात करवून घेणं सोपं होतं. त्या मुलामुलीची, आईबापांची आणि डॉक्टरांची खात्री पटली तर या साऱ्या प्रकाराकडे थोड्या सहानुभूतीने, क्षमाशीलपणे पहाणे आणि निस्तरणे शक्य होते. आता पोलीस तक्रारीला, पोलीसी खाक्याला, मुलाच्या तुरुंगवारीला, बदनामीला, मानसिक खच्चीकरणाला पर्याय नाही. हे पोलीसी झेंगट टाळण्यासाठी मग गुपचुप, बेकायदेशीर आणि असुरक्षित गर्भपात करवून घेण्याला पर्याय उरत नाही. असुरक्षित गर्भपातामुळे कित्येक मुलींचा बळी गेला आहे. याचा अर्थ बेबंद आणि बेजबाबदार लैंगिक संबंध यावेत असा नसून; अशा वागण्याला ‘हल्ला’, ‘गुन्हा’, ‘शोषण’ आणि ‘बलात्कार’ वगळून अन्यही आयाम आहेत एवढाच होतो. पोलिसांना कळवण्याच्या बंधनाऐवजी बालकल्याण समिती अथवा अन्य सदय, समजूतदार यंत्रणेला कळवण्याचं बंधन असावं. उडदामाजी काळे गोरे करून ह्यांनी पुढील कारवाई करावी.
मुळात लैंगिक संबंधांसाठी अठरा हे संमती वय, म्हटलं तर, अतार्किक आहे. ह्या आकड्याला काहीही आगापिछा नाही. जगात निरनिराळ्या देशात दहा पासून वीस पर्यंत संमतीवयाचे कायदे आहेत. आपल्याही देशात हे कायदेशीर वय दहा पासून मोठं होत होत, आता अठरावर पोहोचलं आहे. माणूस आणि त्याच्या लैंगिक उर्मी जगभर जरी एक असल्या आणि कायदा काही सांगतो म्हणून बदलत नसल्या; तरी देशोदेशी संमती वयाचे कायदे वेगवेगळे आहेत. कॅनडा, मलेशिया, इंग्लंड वगैरे देशात संमती वय आजही १६ वर्ष आहे. अमेरिकी कायद्यात दोघांच्या वयात तीन (किंवा काही परिस्थितीत पाच) वर्षापेक्षा, कमी अंतर असेल आणि परस्पर संमती असेल तर, असे संबंध थेट गुन्हा ठरत नाहीत. विविध देशात अशा विविध समजूतदार तरतुदी आहेत. अशी काहीतरी काहीतरी तरतूद असणे आवश्यक आहे. बालपणानंतर थेट प्रौढत्व येत नाही. मधे कुमारवय, पौगंडावस्था असते याची दखल हवी.

शिवाय लग्नासाठी मुलीचे वय अठरा आणि मुलाचे एकवीस हवे असंही कायदा सांगतो. शरीरसंबंधांना समाजमान्यता फक्त लग्नसंस्थाच देऊ शकते अशी परिस्थिती आहे. मग लग्नाच्या वयापर्यंत लैंगिक भावनांचे व्यवस्थापन आणि निचरा कसं करायचे हे शिकवणार कोण? ही समाजाची, शिक्षणव्यवस्थेची जबाबदारी आहे. लैंगिकता शिक्षणात हेच अभिप्रेत आहे. मुळात अठरा आणि एकवीस ही विभागणी कृत्रिम आहे. मुलांना एकविसाव्या वर्षापर्यंत कशाला तंगवत ठेवलंय हे काही कळत नाही. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. उलट नवरा सर्वार्थाने ‘मोठा’ हवा ह्या पुरुषी चालीचे हे द्योतक आहे. लवकरच ही परिस्थिती बदलेल असं पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी जाहीर केलं आहे. (पण कोणत्या दिशेने हे गुलदस्त्यात आहे.)


बालविवाह कायद्याला अमान्य आहे पण असे लग्न एकदा लागल्यावर आपोआप संपुष्टात येत नाही. कल्पना करा, कुठेतरी लमाणांच्या तांड्यावर सोळाव्या वर्षीच तिचं लग्न झालं आहे. वर्षाच्या आत पाळणाही हलणार आहे. सगळीकडे आनंदीआनंद आहे. इतक्यात सोनोग्राफीवाले डॉक्टर, कायद्याला अनुसरून, अठराच्या आतील गर्भधारणेची खबर ‘मा.पो.नि.’ यांना देतात. बाललैंगिक गुन्ह्यात सामील असल्याचं लचांड त्यांना नको आहे. पोलीस खटला भरतात. ते तरी दुसरं काय करणार? बाललैंगिक गुन्ह्यात सामील असल्याचं लचांड त्यांनाही नको आहे. यथावकाश खटला उभा रहातो. लग्नाच्या बायकोपासून, मात्र कायद्याच्या दृष्टीने लैंगिक गुन्ह्यातून, झालेले मूल कडेवर घेऊन, आता नवरा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. पीडिता मंगळसूत्र दाखवते आहे! आरोपी हनीमूनचे फोटो दाखवतो आहे!! दोघेही पोटच्या पोराची शप्पथ घेत निर्दोष असल्याचं कळवळून सांगत आहेत; तिला पुन्हा दिवस गेल्याचं मेहेरबान जज्जीणबाईंच्या लक्षात आणून देत आहेत आणि न्यायदेवतेला डोळ्यावरची पट्टी काढायचा मोह अनावर होतो आहे!!! एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रसंग आहे. इतकंच कशाला उद्या सासर माहेरचं फाटलं तरी ‘वधू’वर बलात्कार केल्याचा गुन्हा ‘वरा’वर दाखल होऊ शकतो!!!
 इतकंच कशाला; निरक्षीरविवेक वापरला नाही तर शाळाशाळातून लैंगिकता शिक्षण देणारे, शालेय पुस्तकांत गर्भनिरोधक साधनांवर लिहिणारे, आपात्कालीन गर्भनिरोधनाची माहिती/प्रिस्क्रिप्शन देणारे; असे सगळेच बाल लैंगिक गुन्हेगारीला ‘प्रोत्साहन’ दिल्याबद्दल गजाआड जावू शकतात!! (Chapter IV 16) कायद्याची ही तलवार, एकाच बाजूने, किती लखलखती आहे पहा.

मानवी लैंगिकतेविषयक कायदेकानून करायचे म्हणजे जीवशास्त्राची गोल खुंटी कायद्याच्या चौकोनी भोकात बसवण्यासारखे आहे. जीवशास्त्राची खुंटी तर नुसतीच गोल नसून काटेरी कड असलेली आहे. ती काही गुळगुळीत होणे शक्य नाही. पण ह्या प्रयत्नात कमीतकमी पडझड व्हावी ह्या हेतूने सुचल्या त्या सूचना इथे केल्या आहेत. एवढेच!

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

'शक्ती कायदा' - स्त्री संघटनांची भूमिका


विधानसभेचं दोन दिवसांचं हिवाळी अधिवेशन अनेक आरोप-प्रत्यारोपांमुळे आणि विविध सामाजिक गटांच्या मागण्यांमुळे हे अधिवेशन गाजलं. त्याचबरोबर या अधिवेशनात मांडला गेलेला ‘शक्ती कायदा’ देखील वादविवादात सापडला होता. महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर जलद कारवाई करणाऱ्या कायद्याचे अनेक सामान्य नागरिक एकीकडे कौतुक करत आहेत. विरोधीपक्ष सुद्धा ह्या विधेयकांना फारसा विरोध करत नव्हते. पण अनेक महिला कार्यकर्ते मात्र या कायद्याला विरोध करत आहेत. सध्या ‘शक्ती विधेयक’ महाराष्ट्र विधी मंडळाच्या संयुक्त निवडसमितीकडे विचार विनिमयासाठी पाठवले आहे. म्हणूनच महिलांच्या हिंसाचाराच्या विरोधात काम करणाऱ्या पुरोगामी धर्मनिरपेक्ष संस्थासंघटना आणि स्त्रीवादी कार्यकर्ते या विधेयकाला करत असलेल्या विरोधामागे काय कारणं आहेत,ते समजून घेेणं जाास्त गरजेेचं आहे.

खरंतर महिला आणि मुलांवरील हिंसेविरुद्ध देशात अनेक कायदे आहेत. तरीदेखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या सहा मंत्र्यांच्या समितीने आंध्रप्रदेशातल्या ‘दिशा’ कायद्याचा अभ्यास करून हे नवीन ‘शक्ती विधेयक’ तयार केलं आहे. ते मंत्रीमंडळानेे मंजूर केलं आणि आता हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असं सांगितलं की ‘शक्ती कायद्यात महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी गुन्हेगारांना मृत्युदंडाची शिक्षा प्रस्तावित आहे. तसेच सोशल मीडियातून महिलांची बदनामी करणाऱ्यांना दोन वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे.’

थोडक्यात, ज्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची तरतूद होती त्याऐवजी शक्ती कायद्यानुसार आता मृत्युदंडाची शिक्षा सुचवलेली आहे आणि फौजदारी प्रक्रियेचा कालावधी कमी करण्याची सूचना आहे. या दोन्ही बदलांवर महाराष्ट्रातील पुरोगामी धर्मनिरपेक्ष महिला संस्था-संघटनांनी आक्षेप घेतला आहे. स्त्रीमुक्तीआंदोलन संपर्क समितीने आपली भूमिका स्पष्ट करताना असे म्हटले आहे की – ‘शिक्षा जितकी कडक तितकी ती होण्याचे प्रमाण कमी हे अनेक अभ्यास सांगतात, आणि फाशीच्या शिक्षेबाबत तर हे अधिकच खरे आहे. तसेच स्त्री विरोधी गुन्ह्यांच्या प्रकरणांचा निकाल रेंगाळू नये या सद्हेतूने दोन आठवड्यात निकाल लावण्याची व्यवस्था या नव्या तरतुदींमध्ये केलेली असली तरी इतक्या कमी कालमर्यादेत योग्य तपास कितपत शक्य आहे, याबद्दल आम्हाला शंका वाटते. परिणामी, महाराष्ट्रात स्त्री विरोधी गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे (conviction rate) अगोदरच कमी असलेले प्रमाण अजून कमी होण्याची भीती आम्हाला वाटते. त्यापेक्षा अस्तित्वात असलेले कायदे अधिक प्रभावी पणे अमलात आणले तर आरोपींना शिक्षा होण्याची अधिक खात्री असेल आणि त्यामुळे कायद्याचा धाक वाढून स्त्रिया आणि बालकांच्या विरोधातली हिंसा कमी होण्याची अधिक शक्यता आहे.’

शक्ती कायद्यामध्ये फौजदारी प्रक्रियेमध्ये जे बदल सुचवले आहेत त्यानुसार तपासाचा कालावधी दोन महिन्यांवरून 15 दिवसांचा केला आहे. खटला चालवण्याचा कालावधी 30 दिवसांचा आणि अपील करण्याचा कालावधी सहा महिन्यांवरून 45 दिवसांवर आणण्यात आला आहे. पण स्त्रीमुक्तीआंदोलन संपर्क समितीच्या अनुभवानुसार अशी कालमर्यादा अभावानेच पाळली जाते. ‘तपास त्वरेने होणे आवश्यकच असले तरी इतकी कडेकोट कालमर्यादा असेल तर योग्य तपास होण्याऐवजी कमकुवत आरोपपत्र दाखल होऊन आरोपी सुटण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. जर आरोपी परराज्यात पळून गेला आणि तिथे असा कायदा नसेल तर पोलिसांना मुदतीमध्ये तपास करण्यात अनेक अडचणी येतील. यामुळे आरोपीना शिक्षा होण्याची काहीच खात्री दिसत नाही. सुनावणीमध्ये अनेक घटक, व्यक्ती असतात अशा वेळी सुनावणी कडेकोट मुदतीत पूर्ण करण्याचे दडपण असेल तर ती सुनावणी योग्य पद्धतीने होईल का हा प्रश्न आहे. कायदेशीर प्रक्रिया या महत्वाच्या आहेत आणि केस पूर्ण करण्याच्या घाईचा विपरीत परिणाम निकालावर होऊ शकतो. सध्या पॉक्सो कायद्यात तसेच महिलांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांच्या तक्रारीतही विशेष न्यायालयांची तरतूद आहे त्यामुळे विशेष न्यायालयांसाठी कायदा आणणे हे अनावश्यक आहे.’ असे संपर्क समितीला वाटते.

एवढेच नव्हे तर या कायद्यातील काही तरतुदी महिला विरोधी आहेत आणि महिला हिंसेचे मामुलीकरण करणार्‍या आहेत – असेही स्त्रीमुक्तीआंदोलन संपर्क समितीचे मत आहे. शक्ती कायद्यातल्या “निहित संमती” (implied consent) आणि तथाकथित “खोट्या तक्रारी” करणाऱ्या स्त्रीला शिक्षा, या तरतुदी अतिशय घातक आहेत आणि शिवाय धर्मवादी, पुरुषप्रधान आणि स्त्रियांबद्दल पारंपारिक दृष्टीकोनाला पुष्टी देणाऱ्याही आहेत – अशी संपर्क समितीची भूमिका आहे.

‘२०१३ च्या बलात्कार कायद्यातील दुरुस्तीमध्ये कलम ३७५ मध्ये संमतीची व्याख्या केली आहे. शक्ती विधेयकात यावर जोडण्यात आलेले स्पष्टीकरण या व्याख्येशी विसंगत आहे. त्यामध्ये म्हटले आहे की जेव्हा दोन्ही पक्ष प्रौढ असतील आणि सर्व परिस्थितीनुसार त्या कृतीला संमती वा निहित संमती असल्याचे दिसून आले तर त्या कृत्याला संमती होती असे गृहीत धरले जाईल. पण अशा कितीतरी घटना आहेत की ज्यात धमकी देऊन, परिस्थितीचा गैरफायदा घेऊन किंवा दिशाभूल करुन संमती मिळवली जाते. तसेच ही जोडणी, पुरावा कायद्यातील तरतुदींशी विसंगत आहे. पुरावा कायद्यात पीडितेला संशयाचा फायदा मिळतो आणि पुरावा देण्याची जबाबदारी ही आरोपीवर असते. म्हणजेच शक्ती कायद्यातली ही जोडणी आक्षेपार्ह आणि गोंधळ निर्माण करणारी आहे. त्यामुळे शिक्षेचे प्रमाण कमी होण्यात याचा परिणाम होऊ शकतो. कारण निहित संमतीचा मुद्दा पुढे करुन आरोपी सुटायची शक्यता वाटते. आधीच महिलांना तक्रार नोंदवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पोलीस, न्याययंत्रणा यांचा प्रतिसाद योग्य नसतो. “खोट्या” तक्रारीसाठी शिक्षा करण्याच्या तरतुदीमुळे गुन्हे नोंदवण्याचे प्रमाण आणखीन कमी होईल आणि शिक्षेचे प्रमाण पण कमी होईल. शिक्षेचे प्रमाण कमी असणे म्हणजे कायदेशीर तरतुदींचा गैरवापर असेही काही लोकं मानतात. त्यामुळे महिलांच्या तक्रारी नोंदल्या जाऊन त्या पुराव्यानिशी सिद्ध होण्यात अनेक अडथळे असतात. अगदी कमी महिला न्याय यंत्रणेपर्यंत पोचू शकणे, त्यांच्या तक्रारी पुराव्यानिशी सिद्ध होऊ न शकणे आणि परिणामत: शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प असणे असे हे दुष्टचक्र आहे. या अडचणींचा विचार न करता तक्रार सिद्ध न झाल्यास तिला ‘खोटी’ ठरवून तक्रारदारालाच सजा करण्यासाठी या तरतुदींचा वापर होऊ शकतो.’ असा धोका महाराष्ट्रातल्या अनेक पुरोगामी धर्मनिरपेक्ष स्त्री संघटनांना वाटतो.

या सर्व कारणांमुळे - महाराष्ट्रातल्या महिलाहिंसेच्या मुद्यांवर काम करणाऱ्या संस्था, संघटना, अभ्यासक, वकील, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा न करता घाईघाईने हा कायदा आणल्या बद्दल स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समितीने तीव्र निषेध नोंदवला आहे. “२०१३ मध्ये वर्मा समितीच्या शिफारसींनुसार गुन्हेगारी कायद्यात झालेले बदल आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे सरंक्षण कायदा, २०१२ या काही योग्य कायदेशीर तरतुदी अस्तित्वात आहेत. त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाल्यास पीडितांना दिलासा मिळू शकतो. वर्मा समितीने सुधारणा सुचवताना ‘गुन्हेगारी न्याय यंत्रणेत सुधारणा’ करण्यावर तितकाच भर दिला होता. परंतु केंद्र व राज्य सरकारे त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसतात. म्हणजे सुधारित कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस-न्यायव्यवस्था आणि प्रशासनात मूलगामी सुधारणा करून योग्य आणि सक्षम यंत्रणा, त्यासाठी लागणारे अर्थसहाय्य आणि त्याच बरोबरीने समाज प्रबोधन, या पैकी काहीही न करता केवळ वरवरचे बदल करून घाईने ते मंजूर करून घेणे म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे” अशी समितीची भूमिका आहे.

 

 

 

आम्ही, असुरक्षितता, समता आणि बरंच काही . . .



आम्ही स्त्रीपणाच्या ठरवून दिलेल्या प्रचलित चौकटीत स्वतःला कधीच न बांधून घेणाऱ्या मुली!

मित्रांनाही धाकात ठेवून त्यांना चार फटके लगावणाऱ्या आम्ही मुली!

‘तुम्ही काय मुली आहात? वागणं तरी तसं आहे का तुमचं?’ असे टोमणे ऐकणाऱ्या आम्ही मुली!

आणि
 
वेळप्रसंगी आम्हाला ताडणाऱ्या काकांना “काका, पुढे बघा!” असंही ऐकवणाऱ्या आम्ही मुली!

व्यक्ती म्हणून आम्ही स्वतःला केवळ लिंगाच्या आधारावर बांधलेल्या सामाजिक चौकटीत जखडून घेत नाही. आम्ही जेव्हा कोणीतरी वेगळं बनण्याचा प्रयत्न करायला लागतो, तेव्हा आपोआप भोवतालच्या 'सर्वमान्य' रूढी, जीवनशैली याबद्दल असंख्य प्रश्न उद्भवायला सुरुवात होते. पण आमच्या वयाच्या इतर मुली स्वतःकडे कसं बघतात? समाजाकडे कसं बघतात? मुळात आपण ‘असुरक्षित’ आहोत असं त्यांनाही वाटतं का? मुलींचं बोल्ड आणि बिनधास्त असणं, मुलींनी sexuality बद्दल उघडपणे बोलणं ह्याबद्दल त्यांना काय वाटतं? - हे प्रश्न आम्हाला गेले काही दिवस अस्वस्थ करत होते. खरं तर मुलींची सुरक्षितता, त्यांचे असंख्य प्रश्न, त्यांच्यावरची बंधनं याबद्दल किती वेळा विविध माध्यमांतून कितीतरी जणांकडून लिहिलं, बोललं गेलंय. जेव्हापासून स्त्रियांना जखडून ठेवण्याचे प्रयत्न होत आले तेव्हापासूनच स्त्रीला तिचं माणूसपण मिळवून देण्यासाठी झगडणारा एक प्रवाहदेखील आहे! तरीही वर्षानुवर्षांनंतरसुद्धा जर तेच प्रश्न असतील तर ते वारंवार पुढे आणायला नकोत का? म्हणून आम्ही बऱ्याच समवयस्क मुलींशी बोललो…अगदी निवांत गप्पा मारल्या. तशा सगळ्याजणी पुणेकर, कॉलेजात शिकणाऱ्या ... बऱ्याचजणी बिनधास्तपणे बोलल्या पण काही मुली ह्या विषयांवर बोलायला अजिबात कम्फर्टेबल नव्हत्या. पण ज्या बोलल्या त्या अगदी मूलभूत आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्यक्त झाल्या. त्यांच्याशी संवाद साधताना जाणवलेली तगमग, खंत, स्वत्व शोधण्यासाठीची धडपड आणि निर्भीडपणातही दडलेली भीती आम्हाला सगळ्यांच्या समोर मांडायची आहे! 
मुली आणि असुरक्षितता हे समीकरण समाजाने सोयीस्करपणे घालून ठेवलेलं आहे आणि ते आमच्यावर सतत बिंबवलं जातं. आम्हाला जाणून घ्यायचं होतं की  - ह्या मुलींनाही असुरक्षित वाटतं का? 
हा प्रश्न विचारताक्षणी पटकन एकीचं उत्तर आलं, “असुरक्षित वाटत नाही असं म्हणणं खोटं ठरेल. I do feel unsafe
मग unsafe वाटतं म्हणजे नक्की काय ? 
यावर काही स्वाभाविक उत्तरं अशी आली की
- “रात्रीच्या वेळी एखाद्या निर्मनुष्य रस्त्यावरून जाण्याची वेळ आलीच तर भीती वाटते”
- “सतत कुणी आपला पाठलाग तर करत नाही ना असे विचार मनात येत असतात.”
- “याच आधारावर जर प्रियांका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण बघितलं तर वाटतं आज मी ओळखीच्या शहरात, ओळखीच्या लोकांमध्ये सेफ असले तरी उद्या एखाद्या नवीन किंवा अनोळखी ठिकाणी गेल्यावर काय?”
- “अशा घटना ऐकल्यावर मानसिक संयम ढासळतो. जर इतक्या नियोजन पूर्ण पद्धतीने अशी घटना घडवून आणली जात असेल तर आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही, it is that horrible!”
आजकाल digital platform वर देखील मुलींना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यांना यामुळे देखील असुरक्षिता जाणवते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मुलींवर होणाऱ्या अत्याचारांची व्यापकता ही खरोखर समोर येणाऱ्या घटनांपेक्षा बरीच मोठी आहे.
श्रुती सायकॉलॉजीची विद्यार्थिनी आहे - तिने स्वत:चा अनुभव शेयर केला, “आम्ही मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या किती केसेस दाखल केल्या जातात याचा एक अभ्यास करत आहोत. जवळपास शंभर मुलींशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की घटना दाखल करायचं किंवा न करायचं प्रमाण ५०-५० टक्के आहे. पण अनेक महिलांशी बोलून आमच्या असं लक्षात आलं की प्रत्येक महिलेवर कुठल्या न कुठल्या प्रकारचा अत्याचार झालेलाच आहे! जेव्हा एखादी बलात्काराची घटना घडते तेव्हा ह्या गोष्टी समोर तरी येतात; पण महिला रोज ज्या प्रकारच्या घटनांना सामोऱ्या जातात, त्याबद्दल काही बोललंही जात नाही.”
मुळात बलात्कारासारखे अत्याचार होण्यामागची नेमकी कारणं मुलींना काय वाटतात?
याबद्दल मेडिकल कॉलेजच्या मैत्रिणी म्हणाल्या, “रेपिस्ट्सची मानसिकता तपासली पाहिजे, They are not normal people, त्यांच्यावर काही कायदेशीर कार्यवाही करण्यापेक्षा त्यांची psychological treatment करणं जास्त गरजेचं आहे. Because once a rapist always a rapist.
फक्त ही कारणं जाणून न घेता त्यावर विचारपूर्वक पावलं सुद्धा उचलली गेली पाहिजेत’ असं काहींचं मत आहे.
“ते असे का वागतात, त्यामागे त्यांची काही कौटुंबिक पार्श्वभूमी आहे का ज्यामुळे त्यांची वृत्ती अशी झाली आहे किंवा त्यांच्यात काही hormonal disturbances आहेत का? याचा देखील विचार झाला पाहिजे” – असंही काहीजणी म्हणतात.
"अशा प्रकारचे कृत्य करण्यामागे अनेक कारणं असू शकतात, त्यातलं एक म्हणजे revenge आणि दुसरं aggressive behaviour. "
"काही पुरुषांची एक विशिष्ट प्रकारची मानसिकता असते, त्यांना ‘नकार’ सहन होत नाही, एखाद्या मुलीने जर आपल्याला नकार दिला तर – ‘ती असं करूच कसं शकते’ - ह्या भावनेतून असे प्रसंग उद्भवतात." 
"मुलींचा पोशाख हे काही कारण असू शकत नाही." रेपिस्ट्सची लैंगिक तहान भागवण्यासाठी आणि त्यांचं पुरुषी वर्चस्व दाखवून देण्यासाठी केलेलं हे कृत्य असतं. तिचं वैयक्तिक आयुष्य तर खालावतंच पण तिची सोशल लाईफ सुद्धा संपून जातं आणि ती स्वतःलाच दोष देऊ लागते. लोक त्या मुलीकडे सतत एका व्हिक्टीमच्या नजरेने बघत असतात आणि याचं कायम तिच्यावर एक मेंटल बर्डन असतं.बलात्कारानंतर मुलीवर शारीरिक परिणामांपेक्षा मानसिक परिणाम जास्त होतात, आणि ते तितक्याच भयानकरित्या होतात.
“शिवाय बलात्कार झाल्यानंतरच्या मेडिकल प्रोसिजरमध्ये मुलीच्या काही टेस्ट केल्या जातात आणि त्यासाठी मुद्दाम पुरुष डॉक्टर्सना पाठवलं जातं - ही सुद्धा विकृतीच आहे. त्या मुलीच्या मानसिक स्थितीचा त्याक्षणी सुद्धा विचार केला जात नाही” - ईशा तिची तगमग व्यक्त करताना म्हणाली.
मुलीवर दोष टाकण्याची वृत्ती ही पितृसत्ताक समाजाचं लक्षण आहे, असंही मत व्यक्त झालं. 
सोनिया म्हणाली, “एक समाज म्हणून आपली मूल्यव्यवस्था नापास झालेली आहे आणि त्यामुळे मुलीला दोष देणं हे लोकांना नैतिकदृष्ट्या सोपं वाटतं”. लोकांचा अशा असंख्य घटनांकडे पाहण्याचा एक passive attitude जाणवतो. त्यामुळे लोक स्वतःहून तर काही पाऊल उचलत नाहीच पण दुसऱ्या कोणाच्या समोर येण्याची वाट बघत असतात.
समाजशास्त्रीय अभ्यासकांच्या वर्तुळात एक असा देखील समज आहे की निर्भया प्रकरणातली मुलगी एका आदर्श मुलीच्या चौकटीत बसणारी होती आणि म्हणून ते प्रकरण ग्लोरिफाय केलं गेलं. ती एकटी नसून तिच्या मित्राबरोबर होती. If she was alone and coming from a pub, the scenario might have been different.
लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांवर बलात्कार होतात. आता यापलीकडे जाऊन प्राण्यांवर देखील बलात्कार होतात,असं आपण ऐकतो. हे भयानक आहे. सतत ह्या घटना कानावर पडत असल्यामुळे मनात कायम असुरक्षिततेची भावना असते.
सुरक्षा, असुरक्षा ह्या मुलभूत पण महत्त्वाच्या प्रश्नांच्या पलीकडे एक वेगळाच मुद्दा जाणवतो, तो म्हणजे व्यसन. मग ते स्मोकिंग असो किंवा ड्रिंकिंग! ड्रग्स सुद्धा! ‘आयुष्यात एकदा तरी ट्राय केलंच पाहिजे’ या मित्रमैत्रिणींच्या सहज सल्ल्याने सुरुवात तर होते; पण त्याचं सवयीत कधी रूपांतर होतं हे समजत नाही. कुठलंही व्यसन करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी - 'मुली आणि व्यसनं’ हा त्यातल्या त्यात सर्वाधिक चर्चेचा आणि वाद्ग्रस्त विषय. मुली सिगारेटच्या टपरीवर उभं राहून सिगारेट ओढतात म्हटलं की आजूबाजूच्यांचे डोळे वटारलेलेच दिसतात, 'मुली'ने वाईन शॉप मध्ये उभं राहून दारू विकत घेतली तर काय अनर्थ होतो? सिगारेट, दारू यांचे दुष्परिणाम सगळ्यांसाठी सारखेच असतात. त्यामुळे ते कोणीच करू नये अशी सुध्दा बऱ्याच जणींची मतं होती.
 मग असं असूनही मुली ह्या व्यसनांकडे का आकर्षित होत असतील? असं विचारल्यावर सहज एक उत्तर पुढे येतं की "कदाचित त्यांच्यासाठी मोकळीक अनुभवण्याचा हा एक मार्ग असू शकतो. इट्स अ वे टू रिबेल... कारण मुलींना नेहमीच फक्त त्यांच्यावर लादलेल्या बंधनांना सामोरं जावं लागतं.”
"मुलांनी स्मोक करणं आणि मुलींनी करणं ह्यात नेहमीचाच वाद आहे. मुलांनी केलं तर ते कूल, पण तिथेच मुली स्मोक करत उभ्या असल्या तर त्या 'असंस्कारीत'? ड्रिंक्सचं सुद्धा तेच... जर मुलगी सार्वजनिक ठिकाणी उभी राहून स्मोक करताना दिसली की लगेच तिच्या 'upbringing' वर प्रश्न उभे राहतात. त्यामुळे मुलगी म्हणून मला स्मोक किंवा ड्रिंक करण्यासाठी एखाद्या 'सेफ' जागी जावं लागतं जिथे मला कोणी ओळखत नसेल. मुलगा असते तर मला ह्या गोष्टींचा विचार करायला लागला नसता”, असं एक मैत्रीण सांगते.
जेव्हा आपण हॉटेलमधेही जातो तेव्हा ड्रिंक्स ऑर्डर करताना वेटर्सकडूनही असाच समज केला जातो की मुलगा असेल तर हार्ड ड्रिंक्स घेईल आणि मुलगी आहे, फार फार तर वाईन किंवा बिअर घेईल. 'जस्ट अ मॉकटेल फॉर द लेडी!'
“समाजाचं तर जाऊच दे.. जर मी मुलगा असते तर कदाचित मी माझी पहिली बिअर माझ्या बाबांबरोबर प्यायले असते. अनफॉर्च्युनेटली मी ड्रिंक करायला जातेय हे घरी सांगण्यासाठी दोनदा विचार करावा लागतो.”- ही वैयक्तिक खंत मुलींनी बोलून दाखवली.
या सगळ्या चढाओढीत हरवून बसलेलं असतं ते आमचं स्वतंत्र अस्तित्व. आमचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व. सोनिया खूप सहज बोलून गेली “नेहमी असं म्हणतात a mother always gets the last piece of the cake. But why? Isn’t she a human first? तिला केक किंवा चॉकलेट्स आवडत नसतील? आई असली की तिने त्याग केलाच पाहिजे हे कोणी ठरवलं?” ह्या गोष्टी वाटत जरी साध्या असल्या तरी तितक्या साध्या नाहीत. ह्याची पाळंमूळ खोलवर रुजून त्यावरच पितृसत्तेचा मोठा वृक्ष विस्तारलेला आहे.
Evolve होणं हे निसर्गाचं चक्र आहे, मुली-स्त्रिया विचारांनी evolve होतील, बोलतील, पण म्हणून स्वतःसाठी उभी राहणारी बोलणारी सक्षम स्त्री म्हणून समाज तिच्याकडे पाहणार आहे का? की “Vocal woman is easy woman” असंच तिच्याकडे बघितलं जाईल? आंचल म्हणते, “अजूनही एका स्त्रीला व्यक्त होण्याआधी हजार वेळा समाजानी घालून दिलेल्या स्वतःच्या चौकटी पडताळून पाहाव्या लागतात, she also has to make sure that she is not being too outspoken or too opinianated
मग एक मुलगी असणं हे त्यांच्यासाठी काय आहे किंवा स्त्रीत्वाची त्यांची नेमकी परिभाषा काय आहे?
काही जणींना हा प्रश्न विचारल्यावर त्या बुचकळ्यात पडल्या कारण त्यांनी याचा कधी विचारच केला नव्हता. याउलट काहींचं असं मत आहे की, ‘केवळ माझी तुलना एका पुरुषाशी आहे म्हणून मी मुलगी नाही. I am an independent woman आणि स्त्री म्हणून जगणं ही माझी निवड आहे.’
“मुळात स्त्री आणि पुरुष यांची स्वतंत्र अस्तित्व आहेत. त्यांच्यात तुलना केली जाऊ शकत नाही. पुरुष हा दणकट आणि त्या तुलनेत स्त्रीने नाजुक किंवा ग्रेसफुल असावं अशी अपेक्षा असते, ह्या तुलनेला कुठला आधार आहे?” असा प्रश्न सोनिया रंगोळेला पडलाय.
इथे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, बाळ जन्माला आल्यापासूनच किंबहुना जन्माला यायच्या आधीपासूनच 'मुलीला पिंक आणि मुलाला ब्ल्यू' रंगाचे टॅग्स लावले जातात. ह्या गोष्टी वाटायला खूप गोड वाटत असल्या तरी त्यामागे पेरल्या गेलेल्या लैंगिक साचेबद्धतेचा विचार केला गेला पाहिजे. एरवी 'western culture'ला नाकारणाऱ्या आपल्या दुटप्पी समाजाने ही पाश्चात्य पद्धत मात्र सोयीस्करपणे आपलीशी करून घेतली. जन्मल्यापासूनच मुलींना नाजुकसाजुक,सौम्य प्रतिमांशी जोडून टाकण्याचा हा आणखी एक प्रयत्न असतो. कदाचित म्हणूनच सोनिया सांगते की - “माझी स्त्री असण्याची व्याख्या ही एका पुरुषाशी तुलनात्मक नसावी, आधी एक माणूस म्हणून माझ्याकडे बघितलं गेलं पाहिजे,”
स्त्री-पुरुष, त्यांच्यातली तुलना याही पलीकडे जात श्रुतीला असं वाटतं, “माझं फेमिनीन असणं ही माझी निवड आहे. असं मानलं जातं की जर तुम्ही स्त्रीवादी असाल तर तुम्ही फेमिनीन राहू शकत नाही पण जर मला तसं रहायला आवडत असेल तर मी का राहू नये? मी जशी दिसते, जशी राहते त्यापासून माझे विचार वेगळे असू शकतात. मला मुलगी म्हणून जसं रहायला आवडतं ती माझ्यासाठी माझी ‘ग्रेस’ आहे. जर एखाद्या मुलीला टॉमबॉयप्रमाणे राहायला आवडत असेल तरीही ती माझ्यासाठी तितकीच स्त्री आहे. If she feels like a woman, she is a woman”.
आंचल म्हणते, “जेव्हा एक मुलगी असणं माझ्यासाठी काय आहे याचा विचार मी करते तेव्हा हे लक्षात येतं की मुलगी म्हणून मी सतत conscious असते आणि माझ्या आजूबाजूचं वातावरण जाणीवपूर्वक मला त्या गोष्टीबद्दल सावध ठेवत असतं”.

'लैंगिक समते’चं वास्तवात रूपांतर व्हायला ‘१०० हून अधिक वर्षे लागतील' असा अहवाल WEF ने दिला आहे. आंचलला याबद्दल वाटतं – “माझी अशी इच्छा आहे की पुढील 100 वर्षात माझ्या मुलीला किंवा तिच्या मुलीला त्यांच्या स्त्री असण्याबद्दल सतत जागरूक राहावं लागणार नाही आणि स्त्रीपुरुष समता ही फक्त कल्पना न राहता वास्तव असेल. तोपर्यंत आपण सगळे मुलगी असण्याचा अर्थ पुनःपुन्हा परिभाषित करत राहू.”

राही पाटील
आणि 
शिवानी तनपुरे 
(दोघीजणी मुक्त पत्रकार आहेत.)







 

 

लव जिहाद- खुळाला कायदा म्हणण्याची चढाओढ


“लवजिहाद” नावाचं एक नवीन खूळ बीजेपी आणि त्यांच्या समर्थकांना मिळालेलं दिसतं आहे. मुळात ह्या विषयाची सुरवात काही वर्षांअगोदरच झाली आहे. पण त्या मुद्द्यावर येण्याआधी ‘लव जिहाद’चा मुद्दा आत्ता चर्चेत का आहे - ते पाहू या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांनी ह्या विरोधात नुसता वटहुकूम आणला नाही तर तो तिथल्या राज्यपाल आनंदीबेन पटेल ह्यांच्या संमतीसाठी पाठवून त्याचा कायदा बनवला सुद्धा!'बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०' असे या कायद्याचे नाव आहे. सध्या ह्या कायद्याच्या बारीक सारीक कायदेशीर कंगो-यात जायची गरज नाही. तूर्तास आपण हे समजून घ्यायला हवं की हा कायदा कसा संविधान विरोधी आणि महिला विरोधी आहे. हा कायदा लग्न करणा-या जोडप्यांच्या मूलभूत हक्कांची नुसती पायमल्ली करत नाही तर त्यांच्यावर भावनीक अत्याचार सुद्धा करतो.
ह्या कायद्याला जरी ‘लवजिहाद विरोधी कायदा’ अशी संज्ञा दिली असली तरी मुळात हा कायदा धर्मांतराच्या विरोधी पूर्वग्रह असणाऱ्या राजकीय व्यवस्थेची प्रगट अभिव्यक्ती वाटते. हरियाणामध्ये काही दिवसांपुर्वी एका हिंदू मुलीची एका मुस्लिम मुलाने लग्नाला मना केलं म्हणून हत्या केली. ह्या घटनेला राजकीय पुरस्कृत ट्रोल्सनी एका व्यक्तीच्या चुकीच्या कृतीला त्याच्या धर्माशी जोडलं आणि लव जिहादच्या विरोधात कायदा व्हावा अशी मागणी मुख्यधारेतली माध्यमं आणि सामाजिक माध्यमं ह्यांच्या मार्फत होऊ लागली. मुळात कोणाच्याही धार्मिक आणि व्यक्तीगत स्वातंत्र्यावर गदा आणणं हेच संविधानविरोधी आहे. आर्टिकल 21 ची ती पायमल्ली आहे. एवढंच नव्हे राज्य सरकारांनी बनवलेला कुठलाही असा कायदा जो ह्या हक्कांची पायमल्ली करतो तो सर्वोच्च न्यायालय जे सांविधानिक न्यायालय आहे तिथे घटनाबाह्यच ठरवला जाईल.
ह्या लव जिहाद कायद्याच्या  तीन बाजु आहेत - एक आहे व्यक्तीगत, दुसरी राजकीय आणि तिसरी पहिल्या दोघांशी मेळ साधणारी आहे ती म्हणजे धार्मिक.
हिंदुत्ववादी प्रचाराचा नमुना 
सर्वप्रथम लोकांकडुन जोडीदार निवडण्याचा अधिकार हिरावुन घेणं म्हणजे वर नमुद केल्याप्रमाणे आर्टिकल 21 ची पायमल्ली आहे. दुसरी गोष्ट अशी की आता राजकीय मुख्यधारेत आलेले जे भारतातील मूलतत्ववादी आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की मुस्लिम मुलांनी हिंदु मुलींवर जबरदस्ती करुन केलेलं लग्न आणि त्यानंतर झालेलं धर्मांतर हे रोखण्यासाठी हा कायदा गरजेचा आहे. मुळात जबरदस्ती कोणतीही वाईटच. जबरदस्तीचं लग्न आणि धर्मांतराच्या घटनांविरुद्ध लढायला सध्या अनेक कायदे उपलब्ध आहेत. शिंकण्याने करोना होत असेल तर प्रत्येकाने मास्क घालावे का शिंकण्यावर आणि नाक शिंकरण्यावरच बंदी आणावी? नेमका हाच तर्क इथे लागु होतो. आणि पुन्हा अनेक मुस्लिम मुली सुद्धा प्रेमापोटी, स्वेच्छेने हिंदु मुलांबरोबर लग्न करतातच. मग त्याला काय म्हणायचं?
‘लव्ह जिहाद’ कायदा मुस्लिमविरोधी सुद्धा आहे! कारण ह्या कायद्याचा मसुद्याचे बारकावे बघीतले तर ही धर्मांतरबंदी कायद्याचीच एक विस्तारीत आवृत्ती भासते. मुळात जिहादचा खरा अर्थ लढाई असा होतो. ही लढाई दुर्गुणांशी असते आणि वाईटाशी असते. पण ह्या शब्दाला इतका आतंकवादाशी जोडला गेला आहे की ह्यातुन आंतरधर्मीय लग्नांना विरोध आणि मुस्लिम धर्मीयांविषयी दुर्भावना हे दोन्ही ही पसरवलं जातंय. प्रेमात कसला आलाय जिहाद? प्रेम हे खुप निरागस असतं. इथे जिहाद किंवा लढा समोरच्याचं हृदय जिंकण्याचाच असतो. बाकी काय असतो तो अभिनिवेष!
आता इस्लामच्या चष्म्यातून जर ह्या विषयाकडे पाहिलं तर असं लक्षात येईल की इस्लाम धर्मात लग्नाकडे खुप निष्पक्ष पद्धतीने पाहिलं आहे. लग्न हा दोन व्यक्तींमधला करार आहे. ह्यात तिस-याचा कुठेच उल्लेख नाही. शिवाय इस्लाम धर्माने पहिल्यांदा घटस्फोटाची मुभा स्त्री आणि पुरुष ह्या दोघांना ही दिली आहे. प्रेषित मुहम्मद ह्यांच्या आयुष्यात घडलेली घटना - एक तरुण विवाहीत मुलगी त्यांच्याकडे आली आणि ती म्हणाली की माझं लग्न माझ्या मर्जीशिवाय झालं आहे. तेव्हा लागलीच ते तिला म्हणाले की मी तुझा घटस्फोट घडवुन आणतो. इस्लाम बाहेरील मुलींशी जबरदस्ती लग्न करायला इस्लाम मध्येच धार्मिक मान्यता आहे - असं खोटं जे पसरवत आहेत, त्या सगळ्यांना हे उदाहरण चपराक आहे ! प्रेषितांनी स्वत: हजरत खदिजा नावाच्या आणि त्यांच्यापेक्षा साधारण पंधरा वर्ष मोठ्या असणा-या विधवा महिलेशी लग्न केलं होतं. शिवाय मुलीकडच्यांनी लग्नात एक पै देखील खर्च करु नये असा देखील इस्लाम मध्ये नियम आहे. शिवाय मुलाकडुन मेहेर स्वरुपात काही रक्कम मुलीकडे सुपुर्द केली जाते!
जी विचारसरणी आपल्या धारणे अथवा अवधारणेपोटी अख्खा कायदा बदलु पाहत आहे, तीच मुळात अत्यंत जुनाट आणि पुराणमतवादी आहे. मी कोणाशी लग्न करायचं हा माझा व्यक्तीगत प्रश्न आहे, त्यात बाहेरच्यांची सोडा घरच्यांशी सुद्धा लुडबुड होऊ नये. ही व्यक्तीगत बाजू जशी पुरुषांची आहे तशीच स्त्रीयांची सुद्धा आहे. आपली घटना पुरुष-स्त्री दोघांना समान अधिकार देतं. असं जर असेल तर मग ‘हिंदु’ स्त्रीयांना वाचवण्याचा अभिनिवेष आणून जर कोणता कायदा होत असेल तर पुरुषसत्ताक राजसत्ताच स्त्रीयांना वाचवु शकते अशा प्रकारचा हा दावा आहे. 
म्हणून ‘लवजिहाद कायदा’ हा कुठल्याही सामाजीक बदलाच्या इच्छेने प्रेरित झाला नसून फक्त आणि फक्त राजकीय फलीतं समोर ठेऊनच बनवला गेला आहे. समाजामध्ये विघटन करणा-या  - मंदीर निर्माण, CAA सारख्या विषयांमध्ये ह्या कायद्याची अजून एक भर पडली आहे. उजव्या विचारांच्या बाजारु गावगुंडाना अजून एक कायदेशीर हत्यार मिळाल्यात जमा आहे. अर्थकारण, रोजगार आणि अशा अनेक सामान्य लोकांच्या मुद्यावर आलेलं अपयश लपवण्यासाठी केलला हा फुकाचा राजकीय प्रपंच आहे. कोणताही धर्म सर्वसाधारणपणे आदर्शवादाची शिकवण देत असतो. पण लोक त्यांच्या मनाप्रमाणे वागत असतात. आणि म्हणुन राजकारण आणि धर्माची सरमिसळ ही घातक आहे. कायदा हा सर्व जनतेचा भल्याचा दृष्टीने लिहीला जायला पाहिजे. त्यात अमुक धर्म तमुकवर कसा वरचढ; अशी चढाओढ असूच शकत नाही. उद्याच्या भारतातले तरुणतरुणी खुलेपणाने श्वास घेत आपली स्वप्न साकार करु इच्छीतात. ह्यात कुबट धर्मांधतेला काही थारा असता कामा नाही!

केतन वैद्य 

वरिष्ठ पत्रकार आणि संस्थापक, केवीकॉम