लॉकडाउन ते अनलॉक - स्त्रियांचं मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य आणि त्यातही स्त्रियांचे मानसिक आरोग्य ही अत्यंत दुर्लक्षित असलेली गोष्ट आहे! त्यावर विचार, कृती, प्रत्यक्ष काम आणि संशोधन कमीच होते. कोविड नाईंटीन च्या पार्श्वभूमीवर वाईटातून चांगली गोष्ट अशी आहे की हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. गेले तीन महिने विविध स्तरातील स्त्रिया सध्या अनेक पातळ्यांवर आणि अनेक प्रकारचे संघर्ष करत आहेत. त्यांच्याबद्दल आपण हया लेखांमध्ये जाणून घेऊयात. 

जगभरातील आकडेवारी आपल्याला असे सांगते आहे की या काळामध्ये कौटुंबिक हिंसाचार तसंच बालकांचे लैंगिक शोषण खूपच वाढले आहे . राष्ट्रीय महिला आयोग आणि विविध संस्था संघटनांनी चालवलेल्या हेल्पलाइन्स यातून मिळालेल्या माहितीनुसार भारतामध्ये मार्च अखेर ते जून पर्यंत मिळालेली आकडेवारी धक्कादायक आहे. मला व माझ्यासारख्या अनेक तज्ञांना असे वाटते की मदती करता जे संपर्क करु शकत नव्हते अशा अनेक स्त्रिया व लहान मुलं यांची या आकडेवारीत भरच पडेल.स्त्री चळवळ आणि स्त्री अभ्यासाने आपल्याला दाखवून दिले आहे की “सर्व स्त्रिया” नावाचा कोटीक्रम नसतो. स्त्रियाही जात, वर्ग ,धर्म, भौगोलिक स्थान आणि लैंगिकता अशा अनेक वैशिष्ट्यांनी विभागलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला ‘स्त्रियांचे मानसिक आरोग्य’ असे म्हणत असताना इंटरसेक्शनालिटीचा विचार करावाच लागतो. 
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सरकारी यंत्रणेतर्फे एक घोषवाक्य आपल्यापर्यंत आले – ‘स्टे होम, स्टे सेफ’ 
स्त्रीवादी कार्यकर्ते आणि अभ्यासक म्हणून आपल्याला पहिल्यापासूनच माहिती आहे की कुटुंबसंस्था अनेकदा शोषण, हिंसा आणि संघर्ष याने पुरेपूर भरलेली असते. त्यामुळे सध्याची परिस्थिती त्याला मुळीच अपवाद नाही. सर्व वर्गातल्या स्त्रिया या घराच्या चारभिंतीआड घडणाऱ्या हिंसेला सामोरे गेल्या आहेत. अर्थशास्त्रीय अभ्यास असे सांगतात की सध्या अनेक मध्यम व उच्च मध्यम वर्गीय स्त्रियांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा जाणार आहेत. मध्यमवर्गीय स्त्री आणि उच्च मध्यमवर्गीय स्त्री पुन्हा एकदा कुटुंब आणि घरगृहस्थीच्या कचाट्यात सापडली आहे. तिच्याकरता तिहेरी ताण निर्माण झाला आहे. घरकाम, घरातील संघर्ष आणि वर्कफ्रॉमहोम स्वरूपातले व्यावसायिक काम. बॉसची मर्जी सांभाळा, घरच्यांचीही मर्जी सांभाळा, काम उत्तम झालं पाहिजे हा अट्टाहास आणि नोकरी जाण्याची भीती! हा सर्व अतिरिक्त ताण, तिच्या मानसिक आरोग्या करता खूप मोठे आव्हान म्हणून समोर येत आहे. घरात अडकल्यामुळे तरुण मुलींवर लग्नाची जबरदस्ती केली जाते आहे तसंच विवाहित स्त्रिया मूल होऊ देण्याचा निर्णय आता लांबणीवर टाकू शकत नाहीयेत ही जबरदस्ती सुद्धा त्यांच्या मानसिक आरोग्याकरता प्रश्नचिन्ह उपस्थित करते आहे. कोविडच्या वातावरणात सुरक्षित गर्भपात ही सोय सुद्धा अवघड झाली आहे. हा मुद्दा जरी वरवर पाहता रेप्रॉटडक्टिव राईट्स् बद्दल वाटला तरी त्याचा थेट संबंध त्यांच्या विचार, भावना आणि आणि सर्वांगीण मानसिक आरोग्याशी असतो. बाल संगोपन, मुलांचा अभ्यास आणि शिक्षण, नातेवाईकांची सेवासुश्रुषा यामुळे मध्यमवर्गीय स्त्रियांचं मानसिक आरोग्य या काळात नातेसंबंधांशीही तीव्रपणे जोडलेले सतत दिसून येत आहे.
समाज माध्यमांमध्ये ज्या प्रकारे पुरुषांनी पाककृतींचे फोटो आणि व्हिडिओ तसंच वर्णन टाकली होती आणि प्रचंड फुशारकी मारली होती, त्यातून पुन्हा एकदा हे अधोरेखित झाले की पुरुषांनी स्वयंपाक केला, पाककलेतील प्राविण्य दाखवलं तर, ती कौतुकाची गोष्ट असते आणि बायकांवर मात्र पाककला निपुण असण्याची सक्ती असते. अठराव्या शतकापासून आजतागायत ही अपेक्षा त्यांच्या पाचवीला पुजली आहे. आपले मनोसामाजिक विश्व विस्तारले नाही हेच खरे. इतक्या वर्षाच्या स्त्री चळवळींनी नेमके काय साधले असा प्रश्न यामुळे पडतो!
घर कामातील पुरुषांचा सहभाग हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. असा सहभाग मग तो कोणत्याही स्वरूपातला असला हा घरातील बाई किंवा कुटुंबियांवर उपकार समजला जातो. या संकुचित अभिवृत्तिमधून आपण अजूनही बाहेर पडलेलो नाही. समाज माध्यमाच्या स्वरूपात त्याला फक्त एक नवीन झालर, आणि वेष्टन मिळालं आहे. ही नक्कीच खेदाची बाब आहे.
घर कामगार, फॅक्टरी कामगार तसंच कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कामगार यांच्याही शारीरिक तसंच मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अतिशय कमी संसाधने, सुरक्षिततेची हमी नाही, पगाराची हमी नाही अशाही परिस्थितीत अनेक गरीब स्त्रियांचा झगडा पुढचा काही काळ चालू राहणार आहे.या स्त्रियांची सामाजिक आर्थिक आणि मानसिक ससेहोलपट ही उच्च मध्यमवर्गीय स्त्रियांच्या तुलनेत किती तरी पटीने जास्त आहे.
ट्रांसजेंडर स्त्रिया, सेक्सवर्कर स्त्रिया या सदैव दुर्लक्षित राहिलेल्या आहेत. सध्या त्यांच्या मानसिक आरोग्याला अनेक प्रकारची आव्हाने आहेत. त्यामुळे चिंता, नैराश्य अशा अनेक गंभीर मानसिक आजारांना त्या सामोरे जात आहेत. कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्या विविध संघटना त्यांच्या परीने या स्त्रियांना मदत करायला पुढे सरसावले आहेत पण त्यांचे आर्थिक प्रश्न इतके बिकट आहेत की मानसिक आरोग्य या गोष्टीला प्राधान्यक्रम मिळत नाही.
मोलकरीण आणि घर मालकीण यांच्यामधला तिढा सुटायला पाहिजे. या काळात घर कामगारांना योग्य मोबदला आणि वागणूक मिळणे आवश्यक आहे. हे खरेतर घर मालकिण आणि घर कामगार दोघांच्याही मानसिक आरोग्य करता पोषक आहे. पण आपल्याकडील सामाजिक उतरंड, भेदभावाचे वातावरण आणि जातीय प्रांतीय अशा असंख्य पूर्वग्रहांमुळे या आव्हानात्मक परिस्थितीतसुद्धा या दोन घटकांमध्ये सामंजस्य दिसून येत नाही. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा व्यक्तिगत आणि संघटनात्मक पातळीवर मध्यम, उच्च मध्यम वर्गीय तसंच उच्चवर्गीय घर मालकिणीना हे आव्हान केले गेले की घर कामगार स्त्रियांना त्यांच्या पगारापासून वंचित ठेवू नका. तेव्हा स्वतःच्या पगाराबद्दल जागरूक असलेल्या अनेक स्त्रियांनी मोलकरणीना सहानुभूतीपूर्ण वागणूक दिली नाही. त्यांचे काम तर आम्हीच करतो आहे - अशा प्रकारचे चर्चाचर्वितचर्वण झाले. काही ठिकाणी घरकामगार स्त्रियांना संशयामुळे मज्जाव केलेला होता. आता अनलॉकच्या कालखंडातसुद्धा त्यांना अतिशय आक्षेपार्ह वागणूक दिली जात आहे.

मानसिक आरोग्यावर काम करणारे विविध तज्ञ - म्हणजे चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, मनोविकार तज्ञ, या विषयावर काम करणारे समाजकार्यातील तज्ञ तसंच समुपदेशक हेसुद्धा सर्व स्तरातील लोकांच्या (यामध्ये स्त्रिया पण आल्या) समस्या हाताळायला प्रशिक्षित नाहीत. वंचितांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याकरता तज्ञांना प्रशिक्षणाशिवाय लोकाभिमुख आणि स्त्रीवादी दृष्टिकोनाची आवश्यकता असते जी अभावानेच सापडते.
शेतकरी आत्महत्या, स्त्रियांच्या आत्महत्या आणि तरुणांच्या आत्महत्या ह्या 2014 पासून भारतासाठी एक मोठा आव्हान ठरले आहे. कोविडमुळे आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा गांभीर्याने घेतला जाईल असे वाटते. त्यामध्ये जोडप्याच्या आत्महत्या, जोडपं आणि लहान मुलांच्या आत्महत्या आणि स्त्रियांच्या आत्महत्या हे तिन्ही प्रकार गेल्या तीन महिन्यात वृत्तपत्रांमधून आपल्या समोर आले आहे. कोविडच्या रुग्णांमधील स्त्रियांचं मानसिक आरोग्य आणि कोविडच्या भीतीने स्त्रियांची आत्महत्या यांची ठोस आकडेवारी अजून आपल्यासमोर व्यवस्थित आली नाहीये. पण नजिकच्या काळा मध्ये यावर अभ्यास आणि हस्तक्षेप होणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
गेले दोन महिने ज्या स्त्रियांनी मोफत ऑनलाइन कौन्सिलिंग करता माझ्याशी संपर्क साधला त्यातील बहुतांश स्त्रियांनी माहिती घेणे, कुटुंबीयांची काळजी वाटणे, भविष्याची काळजी यागोष्टींबद्दल जास्त प्रश्न विचारले. ज्यांनी वैयक्तिक मानसिक आरोग्याबद्दल चे प्रश्न विचारले त्यांनी समुपदेशन घेण्याकरता पुन्हा संपर्क साधला नाही. याचा अर्थ थोडसं बरं वाटल्यावर – ‘आता करता समायोजन झालंय मग,पुन्हा कशाला स्वतःला वेळ द्या’ असे वाटलेले दिसते. स्त्रियांचं Help seeking behaviour हे नेहमीच शेवटच्या क्षणी, प्रश्न अधिक जटिल झाल्यावर आणि कमी वेळा करता असतं. भावनिक व मानसिक समस्यांकरता तज्ञ व्यक्तीची मदत घेणे, हे नेहमीच बिनमहत्त्वाचे मानले गेले आहे आणि त्याला कोविडचा काळही अपवाद नाही.
एका महिलेनी घरच्यांच्या नकळत मला फोन केला होता आणि ती म्हणाली कि तिला बहुदा अशा दोन-तीनच सेशन करता वेळ मिळेल. तिच्या घरी खूप सारे पाहुणे येत होते आणि त्यामुळे तिच्या मनावरचा ताण वाढत होता. तिच्या मनामध्ये कुटुंबीय आणि तिच्या मुलांबद्दलची काळजी साठली होती. या पाहुण्यांना मज्जाव करण्याचे स्वातंत्र्य तिच्याकडे नव्हते. तिच्या भावभावनांवरचे नियंत्रण, केवळ तिच्या एकटीच्या हातात नव्हते. पुरुषप्रधान व्यवस्था आणि त्याचे स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावरचे परिणाम या काळात अधिक तीव्र झाले आहेत असेच या उदाहरणातून दिसते.
या काळामध्ये जा स्त्रिया मानसिक आरोग्य करता मदत घेऊ इच्छितात किंवा घेत आहेत त्यांच्यासमोर एक कळीचा प्रश्न आहे. त्या स्वतः करता वैयक्तिक मदत घेत नाहीत किंवा मागत नाहीत तर त्यांना सार्‍या कुटुंबीयांची, त्यांच्या मुलांच्या मानसिक आरोग्याची सुद्धा काळजी आहे. ‌ त्यामुळे त्यांचा ताण हा खूप वाढला आहे. एरवी समुपदेशनामध्ये आम्ही असं सांगतो की तुमचं मानसिक आरोग्य सुदृढ असेल तरच तुम्ही कौटुंबिक आणि सार्वजनिक विश्वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करू शकता. सेल्फ केअर स्वतःच्या मानसिक आरोग्याची प्रथम काळजी घेणे हे सर्वांचे कर्तव्य तसंच हक्क आहे. स्त्रिया एरवीसुद्धा हे विसरतात आणि आताच्या काळात तर महामारीच्या संकटामुळे सेल्फ केअर विसरून त्या पुन्हा एकदा अतिरिक्त ताण घेताना दिसत आहेत.
आताच्या ‘न्यू नॉर्मल’ काळात स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचे जे निकडीचे प्रश्न आहेत त्याबद्दल काय करता येईल? काही ठोस अशा उपाय योजना नक्कीच करता येतील. मानसिक आरोग्य कायदा 2017 अनुसार प्रत्येक व्यक्तीला उपचार व समुपदेशन मिळणे हा त्याचा व तिचा हक्क बनला आहे. फक्त याची पूर्तता काटेकोरपणे होत नाहीये. कोविडच्याच्या काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरच खूप ताण आल्यामुळे आणि लोकांना या कायद्याबद्दल संपूर्ण माहिती नसल्यामुळे अशी उपाययोजना आपल्याकरता आहे हे त्यांच्या खिजगणतीतच नसतं.‌ मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या संस्था, संघटना, या कायद्यावर खास काम करणारे तज्ञ आपापल्या परीने जनजागृती करत असतात, पण आम्ही सर्वजण या कामांमध्ये कमी पडतो आहोत. आपली लोकसंख्या, त्या मधल्या मानसिक आरोग्याचे प्रश्न आणि ग्रस्त असलेल्या स्त्रिया यांची संख्या बघता हे काम खूप मोठे आहे.
एरवी आणि कोविडच्या काळातही सर्वप्रथम शासन यंत्रणेने ही जबाबदारी घेतली पाहिजे. शासनावरील दबाव कमी होता कामा नये आणि त्याकरता सर्व सुज्ञ आणि समाजाभिमुख नागरिकांनी दबावगट म्हणून एकत्र येऊन काम केले पाहिजे. आपण पाहत आहोत कोविडच्याच्या काळात अनेक सामाजिक संस्थांनी साहयता व मदत कार्य रिलीफ वर्क भरपूर केले आहे ते पुढच्या काही काळातही चालू राहील. पण सर्वसामान्य नागरिक आणि सिव्हिल सोसायटीने आपली जबाबदारी उचलली पाहिजे.
Carol Gilligan या स्त्रीवादी मानसशास्त्रज्ञांनी Ethics of Care ची मांडणी केली होती आणि त्यामध्ये त्या असे म्हणतात की जेव्हा आपण काळजी घेणे, आपुलकीने वागणे, दुसऱ्याला सहाय्यभूत होण्याचे वर्तन करणे हे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये पूर्णपणे बिंबवून घेऊ ,तेव्हा आपण खऱ्या अर्थाने Ethics of Care चे पूर्णपणे आचरण करू. सध्याच्या परिस्थितीत याची नितांत गरज आहे. आज ही गरज स्त्री-पुरुष लहान मुलं आणि कुटुंबा पर्यंतच सीमित नसून ती सर्व समूहाकरता निर्माण झाली आहे. जास्तीतजास्त सर्वसमावेशक बनणे, सर्व समूहांकरता आपुलकी आणि प्रेम मनामध्ये ठेवणे तसंच स्वतः बरोबरच इतरांची काळजी घेणे आणि करणे, हे कोविड काळाकरता आणि त्या नंतरही आवश्यक आहे.स्त्रीवादी मानसशास्त्र हे सातत्याने सर्वसमावेशकता, भेदभाव विरहित समाज, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि भगिनीभाव याचा पुरस्कार करत आला आहे. स्त्रियांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याकरता स्त्रीवादी मानस शास्त्राचा आणि सामूहिक मानसशास्त्राचा आधार तसेच समतावादी मूल्य ही आजच्या काळाची गरज आहे. त्याकरता समुपदेशक, चिकित्सा मानसशास्त्र ज्ञ, मनाो चिकित्सा तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अशा सर्व मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील लोकांना व्यक्तीकेंद्री उपचार पद्धती बाजूला सारून कम्युनिटी सायकोलॉजीचा विचार, आराखडा आणि उपचार पद्धती म्हणून वापरायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याकरता पुन्हा प्रशिक्षणाची तयारी ठेवली पाहिजे आणि झापडबंद पद्धतीने चालणारे काम बदलले पाहिजे.ज्या सेवाभावी संस्था, संघटना, प्रशिक्षक, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करताहेत त्यांनाही हे लागू आहे. कारण मानसिक आरोग्याची शास्त्र या प्रकारचं प्रशिक्षण अपवादानेच देतात व समूह केंद्रीत भूमिका कमीच घेतात. आव्हान नक्कीच मोठे आहे यामध्ये आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.

डॉ. साधना नातू 
स्त्री वादी मानसोपचारतज्ञ,संशोधक, कार्यकर्ता












लाखो आशा, किती निराशा

कोरोना विषाणूची लागण नव्यानेच व्हायला लागली होती तेव्हापासून आजपर्यंत आरोग्य कर्मचारी या नात्याने अनेक  स्त्रिया जीव धोक्यात घालून काम करत आहेत. 'आरोग्य कर्मचारी’ ह्या शब्दासोबत आपल्या डोळ्यांसमोर बहुधा डॉक्टर किंवा नर्स येतात. पण कधीकधी त्यांच्यापेक्षा जास्त धोकादायक परिस्थितीमध्येही  काम करणाऱ्या ‘आशा’ताई, अंगणवाडी सेविका अशा तळाच्या पायरीवरील आरोग्यदूतांच्या कामाची जाणीव आपल्याला आहे का? 


‘आशा’ कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन!
फरीदाबाद मध्ये कोरोना सर्व्हे करणाऱ्या ‘आशा’ कर्मचाऱ्यांवर हल्ला
कर्नाटकात ‘आशा’ सेविकांशी गैरवर्तन
मेघालयमध्ये ‘आशा’ सेविकेच्या मदतीने कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलेची सुटका
कोल्हापूर जिल्ह्यात ‘आशा’ कर्मचाऱ्यांवर हल्ला!
बंगळुरूमध्ये ‘आशा’ सेविकेचा फोन पळवला.
‘आशा’ कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ होण्याची शक्यता...


अशा अनेक बातम्या आपण गेल्या तीनचार महिन्यात वाचल्या असतील. करोनापूर्व काळात ‘आशा’ कर्मचाऱ्यांचा उल्लेख आपण बातम्यांमध्ये क्वचितच कधीतरी ऐकला होता. मग आता अचानक त्यांना ही प्रसिद्धी का मिळते आहे? ह्या ‘आशा’ नक्की काय काम करतात? त्यांच्यावर हल्ले का होत आहेत? असे अनेक प्रश्न कदाचित आपल्याला पडायला लागले असतील. बहुसंख्य शहरी माणसांचा तर ‘आशा’(Accredited Social Health Activists) कर्मचाऱ्यांच्या कामाशी कधी परिचयच झालेला नसतो. त्यामुळेच त्यांना कोणकोणत्या धोक्याना आणि अन्यायाला सामोरे जावे लागते त्याची आपल्याला काही कल्पना नसते.
देशात जवळजवळ 10 लाख ‘आशा’कर्मचारी काम करत आहेत. त्या साधारणपणे 73 प्रकारची आरोग्यविषयक कामे गावपातळीवर करतात. त्याशिवाय भूकंप, चक्रीवादळ किंवा कोविड सारखी महामारी अशा कुठल्याही संकटाच्या वेळी गावोगावच्या ‘आशा’ ताई घरोघर जावून लोकांना आरोग्यसेवा पुरवतात. साधारणपणे - ‘आरोग्य कर्मचारी’ ह्या शब्दासोबत आपल्या डोळ्यांसमोर बहुधा डॉक्टर किंवा नर्सची प्रतिमा समोर येते. जगभरातील डॉक्टर आणि नर्स यांचे कोरोनाकाळातील सुपरहीरो म्हणून कौतुक केले जाते आणि बाल्कनीमध्ये थाळ्या, टाळ्या वाजवून किंवा विमानातून फुले उधळून त्यांचा गौरव केला जातो. पण डॉक्टरांइतक्या किंवा कधीकधी त्यांच्यापेक्षाही जास्त धोकादायक परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या ‘आशा’ताई, अंगणवाडी सेविका अशा अनेक प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या अस्तित्त्वाची सुद्धा आपल्याला जाणीव नसते. आशा कर्मचारी म्हणजे आरोग्य विभाग आणि नागरिक यांच्यातील दुवा आहे. सरकारी पातळीवर मात्र त्यांना ‘अनौपचारिक’ कामगार मानले जाते. प्रत्येक आशाताई गावात १ हजार लोकसंख्येसाठी काम करीत असते. हे काम करत असताना तिला आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक व कधी कधी कार्यालयीन समस्येलाही तोंड द्यावे लागते. सध्याच्या धोकादायक काळात तर कोविड पॉझिटिव रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा मागोवा घेण्यासाठी आशा कर्मचाऱ्यांना कंटेंटमेंट झोनमध्ये पाठवले जात आहे. घरोघर जाऊन परगावाहून आलेल्या लोकांची वैद्यकीय माहिती संकलित करण्याचे काम त्यांच्यावर सोपवलेले आहे. पण अनेक लोकांना अशी माहिती मागितली जाणे हा स्वत:चा अपमान वाटतो. एक तर सामान्य नागरिकांमध्ये कोविडविषयी प्रचंड भीती आहे आणि हा आजार लपवून ठेवण्याचीही प्रवृत्ती आहे. त्यामुळे सर्वेक्षण करायला गेलेल्या ‘आशा’ताईना उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. त्यांच्याशी वादावादी केली जाते. अनेकदा हाणामारीचे प्रसंग देखील उद्भवतात. गेल्या दोन अडीच महिन्यात अशा अनेक घटना देशभरात घडल्या आहेत. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांना लोकांनी सहकार्य करावे यासाठी सरकारने जाहिरात मोहिमेसारखे काही प्रयत्न जाणीवपूर्वक केल्याचे दिसले नव्हते. एकीकडे सरकारकडून वाढत्या कामाचे ओझे आणि दुसरीकडे समाजाकडून हेटाळणी अशा कात्रीत ‘आशा’ कर्मचारी सापडल्या.
प्रत्येक ‘आशा’ताईला आठवडाभरात साधारण 1000 लोकांशी बोलावे लागते. अनेक संशयित रुग्णांशी त्यांचा संपर्क येतो. तरीही हे जोखमीचे काम करताना त्यांना कोणतीही संरक्षक साधने पुरवलेली नाहीत. अनेकजणी चेहऱ्यावर रुमाल किंवा दुपट्टा बांधून उन्हातान्हात, पावसात काम करत आहेत. ज्यांनी लोकांमध्ये हात धुण्याविषयी, मास्क वापरण्याबद्दल जनजागृती करावी अशी अपेक्षा असते, त्यांना मात्र सरकारतर्फे हातमोजे, सॅनीटायझर, मास्क अशी किमान संरक्षक साधने देखील दिली जात नाहीत. ‘आशा’ कर्मचाऱ्यांच्या देशपातळीवरील समन्वय समितीने जेव्हा केंद्रसरकारकडे संरक्षक साधनांची मागणी केली, तेव्हा त्यांनी स्वत:च्या पैशांनी मास्क, सॅनीटायझर इ. खरेदी करावेत असे सांगण्यात आले होते. कोरोना सर्वेमध्ये काम करताना कित्येक ‘आशा’ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. एकीकडे त्यांच्यावर जोखमीचे काम लादून दुसरीकडे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्याचे सरकार कडून टाळले जाते. ‘आशा’ आणि अंगणवाडी कर्मचारी यांना जरी कोरोनाव्हायरस विरुद्धच्या युद्धात थेटपणे धोक्याला सामोरे जायला लागत असले तरी त्या औपचारिकपणे सरकारी कर्मचारी नसतात. त्यांचे काम अर्धवेळ आणि ऐच्छिक मानले जाते. त्यांना पगार देण्याऐवजी ‘प्रोत्साहनपर भत्ता’ दिला जातो. देशातल्या वेगवेगळ्या राज्यात या भत्याचे प्रमाण वेगवेगळे आहे. केरळ, तेलंगणा, दिल्ली आणि मध्यप्रदेशमध्ये मात्र ‘आशा’ कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी वेतन आहे. महाराष्ट्रातल्या आशा आणि अंगणवाडी सेविका मानधनातील वाढीसोबतच सरकारी कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी सामावून घेतले जावे अशीही मागणी करत आहेत.
मागच्या आठवड्यात देशातल्या कामगार कायद्यातील बदलांच्या विरोधात कामगार संघटनांनी जे देशव्यापी आंदोलन पुकारले होते त्यात महाराष्ट्रातल्या अनेक ‘आशा’कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर 10 जुलै रोजी ‘ललकार दिवस’ पाळून राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यामुळे सध्या पुन्हा एकदा अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांचे काम चर्चेत आले आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर 'आशा' देत असलेले योगदान पाहता हा संप राज्य सरकारला परवडण्यासारखा नव्हता. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर २५ जून रोजी आशांच्या मानधनात २ हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला. सदरच्या निर्णयाची अंमलबजावणी १ जुलै २०२० पासून सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. सध्या आशांना प्रतिदिन केवळ ११६ रुपये मानधन मिळत आहे. मात्र त्यांच्यावर टाकलेले कामाचे स्वरूप पाहता दिलेली ही वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याने आशा कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष खदखदतो आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या आशांना किमान १० हजार रुपये मासिक वेतन, कोरोना साथीच्या सर्वेचा प्रतिदिन किमान ३०० रुपये मोबदला द्यावा अशी मागणी सिटू संलग्न ‘आशा’ कर्मचारी संघटनेने केली आहे. सरकारकडून मिळणाऱ्या हक्काच्या सोयीसुविधा आणि वेतनवाढी सोबत त्यांना आपल्यासारख्या नागरिकांकडून सहकार्याची आणि सन्मानपूर्वक वागणुकीची देखील अपेक्षा आहे.

वंदना खरे 

(हा लेख लिहिताना किरण मोघे आणि शुभा शमीम यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग झाला आहे.)

डॉक्टर प्रणाली



‘दोन रुग्णांना मी सोमवारी तपासले. ते माझ्या क्लिनिकमध्ये आले होते. तेव्हा मला शंका आली होती तसेच झाले. बुधवारी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. मग मीही स्वत:ला इतरांपासून थोडं लांब ठेवले. पण आता १६ दिवस झालेत. मी ओके आहे.’ हा अनुभव आहे डॉ. प्रणाली बाणवलीकर यांचा. त्या बालरोगतज्ज्ञ आहेत. अर्थात त्यांच्या क्लिनिकमध्ये छोट्यांबरोबर त्यांचे पालकही येतातच.
कोरोनाची भीती काही संपत नाही. सरकारने सगळ्यांनाच घरात बसण्याचे आवाहन करत लॉकडाऊन घोषित केले. पण त्याही काळात काही स्त्रियांना घराबाहेर पडावेच लागायचे. त्यातल्याच डॉक्टर प्रणाली बाणवलीकर.
त्यांच्या दिनचर्येत या लॉकडाऊनच्या काळात कसा बदल झाला? त्या सांगतात, ‘ पूर्वी मी रोज दोनदा क्लिनिकला जायचे. पण आता या काळात मी एकदाच संध्याकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत जाते. म्हणजे सकाळी घरातले काम करता येते. लॉकडाऊन असं एकदमच अंगावर आदळलं. त्यामुळे घरातही सगळं सामान भरून ठेवलं. तसं क्लिनिकला लागणारं सॅनिटायझिंगचं सर्व सामान आणलं. सगळी तयारी झाल्यावरच मी क्लिनिक सुरू केलं.’ क्लिनिक तर सुरू झालं, पण नेहमीपेक्षा येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होती. ‘मी अंधेरीत असले तरी पेशंटपैकी बरेच जण विरार, मीरा रोड इथून येणारे होते. त्यांना येणं शक्य नसायचं. म्हणून मी रोज फोनवर सकाळी आणि संध्याकाळी कन्सल्टेशन सुरू केलं आणि एक दिवसाआड क्लिनिक सुरू ठेवलं.’

प्रणाली यांच्या भागात सीनियर डॉक्टर्स जास्त असल्याने ते क्लिनिक बंद ठेवत. त्यामुळे त्यांचे रुग्णही मग प्रणालीकडेच यायचे. शिवाय कुटुंबातले लोक , फ्रेंड्स यांचेही फोन यायचे. सगळीकडे पॅनिक वाढत होतं, त्यामुळे जरा काही झालं तरी घाबरून सर्वांना डॉक्टरचा सल्ला घ्यावासा वाटत असे. त्यावेळी अनेकदा नैतिक आधार देणे, सांत्वन करणं ही कामंदेखील प्रणाली करत होत्या.

क्लिनिकमध्ये प्रणाली रुग्णांना तपासताना पुरेपूर काळजी घेतात. त्या स्वत: पीपीई किट घालतातच, पण पेशंटला तपासताना त्याने काही बोलायचे नाही आणि डॉक्टर ही काही बोलत नाहीत. नंतरचे मार्गदर्शन करताना रुग्ण रिसेप्शन भागात बसलेला असतो आणि या आतून म्हणजे लांबून त्याला औषधं सांगतात. प्रत्येक रुग्ण बाहेर पडल्यानंतर सॅनिटायझेशन तर होतेच. सुरुवातीला प्रणालीच्या पतीला वाटत होते की - एवढा धोका पत्करू नये. पण प्रणाली सांगतात, ‘लहान मुलांना अनेकदा लस द्यावी लागते. पालिकेच्या रुग्णालयात कोविडमुळे हे काम बंद होतं. म्हणून मग मला त्यासाठीही जाणं भाग होतं. कारण लसीकरणात दिरंगाई करून चालत नाही.’

कामाच्या ओझ्याबद्दलही त्या म्हणतात, ‘ समजा मी रोज ५० पेशंट बघते, त्याऐवजी १०० आले, तर ते मला झेपू शकतं. कारण ते माझा नेहमीचं काम आहे. पण घरकाम करायला घरात एरवी ३ बायका होत्या. त्या तिघीही बंद झाल्या. मग ते काम अचानक अंगावर पडलं. जी कामं इतके दिवस फारशी केली नव्हती, त्याचा ताण तर नक्कीच आला.’ शिवाय प्रणाली यांनी अनेक भारतीय घरातलं सर्वसामान्य चित्रच समोर उभं केलं. त्या म्हणाल्या, ‘ घरातल्या पुरुषांना काम करण्याची अजिबात सवय नाही. आतापर्यंत नाश्ता वगैरे बनवून त्यांच्या हातात देण्याचीच माझी सवय. त्यामुळे सुरुवातीला हे सर्व मॅनेज करणं वेळखाऊ होतं. म्हणूनच सुरुवातीच्या काळात मी क्लिनिक बंद ठेवलं होतं.’

प्रणाली या काळातली सकारात्मक गोष्ट सांगतात, ती म्हणजे त्यांना घरी भरपूर वेळ देता आला. त्यांचे पतीही वर्कफ्रॉमहोम करत होते. घरी दोन मुलगे. त्यातल्या एकाची नुकतीच बारावी झालेली. दुसरा अमेरिकेला शिकायला गेला होता. पण कोरोना कहर सुरू झाल्यानंतर प्रणाली यांनी त्यालाही परत भारतात आणण्याचे प्रयत्न केले आणि त्यात त्या यशस्वीही झाल्या. या काळात घरातल्यांशी संवाद वाढला, असंही त्या सांगतात. एकमेकांबरोबरचा मोकळेपणा वाढला. अगदी एकमेकांच्या आवडीनिवडीही नव्याने कळल्या. महत्त्वाचं म्हणजे समंजसपणा वाढला, असंही त्या सांगतात. त्या गमतीने म्हणतात, ‘ नवऱ्याने नुसतं मुलाला सांगितलं की जा रे आईला मदत कर, तरीही बरं वाटतं.’ ‘ खूप दिवसांनी मी इतका वेळ घरात दिला, त्यानेही छान वाटलं. वेगवेगळे पदार्थ करून पाहिले. यु ट्युबवर बघून रसगुल्ल्यापासून बरंच स्वादिष्ट बनवलं. त्याने खूप आनंदही झाला.’ असेही त्या म्हणाल्या.

प्रणाली म्हणतात - ‘ घरातल्या पुरुषांना हे काम आपलंच आहे. आपण बायकोला, आईला मदत करत नाही. तर हे आपल्या घरातलं काम आपण करतोय, हे समजून द्यायला थोडा वेळ लागला. पण नंतर त्यांनाही त्याची जाणीव झाली.’ याच काळात बाहेरून एकदम सामान आणणं, मग जेवणं बनवणं ही कामं एकदम अंगावर पडल्याने प्रणाली यांच्या खांद्याला थोडी दुखापतही झाली होती. अर्थात, कोरोना काळात मनावर तणाव तर असतोच. एक अदृश्य चिंता सतत अवतीभवती असते. अशा वेळी प्रणाली यांना योगाचा आधार मिळाला. रोज सकाळी त्या ऑनलाइन योग करतात. त्याचा फायदा हा होतोच.

आपल्याला कोरोना होईल ही भीती डॉक्टरला कितपत असते? याबद्दल प्रणाली सांगतात, - ' खरं सांगायचं तर एकदा का क्लिनिकला गेलं की ती भीती जाते. पण अनेकदा येणारे पेशंटही खरं काय ते सांगत नाहीत. एक-दोन पेशंटच्या घरातल्यांना कोरोना झाला होता - त्यांनी हे मला सांगितलंच नाही. पण मी एक करते, आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येकालाच कोरोना आहे, असं समजून माझी सर्व काळजी घेते. जर मला इन्फेक्शन झालं, तर घरचेही धोक्यात येणार. म्हणूनही काळजी घ्यावी लागते आणि करावीही लागते. पण डॉक्टरांना काही पर्याय नाही,हेही खरं!’





लिंगभावाच्या चष्म्यातून कोरोना आणि आरोग्य

कोविड -१९ च्या महामारीमुळे प्रत्येक क्षेत्रावर कमी अधिक प्रमाणात नकारात्मक परिणाम होणार आहेत हे आपण जाणतोच. त्यामुळे २०२० हे साल जगाच्या इतिहासामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये लक्षणीय ठरणार आहे . विविध चळवळींद्वारे किंवा योजना अथवा कृतींद्वारे कष्टाने घडवलेले सकारात्मक बदल नाहीसे होऊन जग काही वर्षे मागे जाईल असे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.अर्थात् ,हे सर्व आरोग्य क्षेत्राबाबत देखील घडेल. पूर्वीही स्त्रियांच्या आरोग्यावर लिंगभेदामुळे विपरीत परिणाम होतच होते - त्यामध्ये आता कोविडच्या महामारीची भर पडली आहे. कोरोनामुळे आणि या महामारीची साथ रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांमुळे होऊ घातलेल्या परिणामांबाबत आपण लिंगभावाच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया .


हा लेख डॉक्टर प्रिया देशपांडे यांनी लिहिला आहे. त्या मिरज येथील मेडिकल कॉलेज मध्ये समाज वैद्यकशास्त्र विभागात अध्यापन करतात.

पूर्ण जगभरातील चित्र जर बघितले, तर कोरोनाचा संसर्ग होण्यामध्ये स्त्री-पुरुष प्रमाण हे साधारण सारखेच दिसून येते. पुरुष जास्त घराबाहेर पडत असल्याने त्यांच्यामध्ये थोड्या केसेस जास्त दिसून येतात. मात्र कोविडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जर बघितले तर स्त्रियांपेक्षा पुरुषांना मृत्यूचा धोका हा अधिक आहे, असे दिसून येते.
स्त्रियांना त्यांची पाळी सुरू असेपर्यंत हृदयरोग व उच्च रक्तदाब अशा आजारांपासून नैसर्गिकरित्या काहीसे संरक्षण प्राप्त असते. हेच दोन्ही आजार कोविडमुळे मृत्यू होण्याचा धोका वाढवत असल्याने जगभरात पुरूषांच्या मृत्यूचे प्रमाण स्त्रियांपेक्षा अधिक आहे . भारतात झालेल्या एक अभ्यासानुसार एकूण मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी पुरुषांचं प्रमाण जास्त (जवळपास 63 टक्के) आहे.आता हे वाचून तुम्हाला नक्कीच असे वाटले असेल की चला या कोविडच्या साथीमध्ये स्त्रिया त्या मानाने नशीबवान निघाल्या! पण थांबा ...
कोविडच्या साथीचे परिणाम हे केवळ तो आजार होणे एवढ्यापर्यंतच सीमित नाहीत . कोरोनामुळे कोविड तर होतोच पण कोरोनामुळे स्त्रियांचे आयुष्य निरनिराळ्या प्रकारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या खडतर बनत आहे – हे पुढील काही उदहरणांवरून लक्षात येईल.
● काशीबाई, ७० वर्षाच्या आहेत आणि आता पुन्हा त्यांच्या अंगावर लाल जाऊ लागले आहे . त्यांनी लवकरात लवकर तपासणी करून कर्करोग असल्यास त्यावरील शस्त्रक्रिया आणि उपचार करून घेणे आवश्यक आहे . पण कोविडमुळे सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. त्यांच्या मुलाची नोकरी गेल्याने खाजगी दवाखान्यामध्ये जाण्याची परिस्थिती नाहीये. आजार जेवढा अंगावर काढला जाईल तेवढा गंभीर होत राहील आणि जीव वाचण्याची शक्यता देखील कमी होत राहील. जे आजार लवकर निदान केल्याने थोडक्यामध्ये बरे होऊ शकतात, असे सर्व आजार केवळ निदानास उशीर झाल्याने उपचारास दाद देणार नाहीत.
● काशीबाईंचीच नात स्मिता, आठवीतील एक हुशार मुलगी. पण आता वडिलांची नोकरी गेल्याने तिचे खूप शिकण्याचे स्वप्न बहुदा अर्धवट राहणार असे दिसते . आता तिला घरातील कामांमध्ये मदत करावी लागते. सध्या मोबाईलवरून शाळा सुरू आहे पण तिच्याकडे स्मार्टफोन नसल्याने ती ऑनलाईन वर्गाला बसू शकत नाहीये .

● माझी घरकाम मदतनीस, लक्ष्मी - वय वर्षे ५५, लठ्ठपणासह उच्च रक्तदाब व हृदयाचा आजार. म्हणजेच कोविड झाल्यास गंभीर आजारासाठी अतिजोखमीचा गट . हृदयाच्या ऑपरेशननंतर महागडी औषधे देखील सुरू आहेत. घरातील इतरांचीही आरोग्याबाबत साधारण अशीच परिस्थिती आहे . मी माझ्याकडून जरी भरपगारी रजा दिलेली असली तरी लॉकडाऊन उठल्यानंतर इतर घरांमधून तिला कामावर येण्याचा आग्रह सुरू आहे. अशा अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी घराबाहेर पडणे धोक्याचे ठरू शकते हे ती जाणते . अशा परिस्थितीमध्ये काय करावे हे तिला समजत नाहीये . हा कोरोना कधी संपणार हे मला सारखे विचारत असते .. कामावर हजर नाही झाली तर काम जाण्याचा धोका आहे आणि हजर झाली तर कोरोनाचा .. निर्णय तिच्यासाठी अवघड आहे .

● श्वेताने लॉकडाऊनच्या काळामध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला . मात्र तिची काळजी घेण्यासाठी तिच्या सासर आणि माहेरचे कोणीदेखील तिच्याजवळ पोचू शकले नाहीत . बाळाच्या जन्मानंतरच्या कठीण काळामध्ये तिची काळजी घेण्यासाठी तिच्या पतीशिवाय कोणीच जवळ नव्हते .. बाळंतपणानंतर योग्य ती विश्रांती न मिळाल्याने भविष्यामध्ये तिच्यासाठी आरोग्यविषयक तक्रारी उद्भवू शकतील. बाळाच्या लसीकरणामध्येही अडचणी येत आहेत. तरी श्वेता नशीबवान म्हणायची! ती आणि बाळ सुखरूप आहे. काही दिवसांपूर्वी बर्‍याच दवाखान्यांनी नाकारल्यामुळे बाळाला जन्म देताना एक स्त्री मरण पावली ही बातमी आपण सर्वांनी वाचली असेल. 

गरोदर स्त्रिया त्यांच्या मासिक तपासणीसाठी दवाखान्यात जायला घाबरत आहेत किंवा प्रवासाची सोय नसल्याने जाऊ शकत नाहीयेत . याचा परिणाम त्यांच्या गर्भातील बाळावर होऊ शकतो. लॉकडाऊननंतर ९ महिन्यांनी बेबी बूम होईल असे जोक आपण सर्वांनी वाचले . पण गर्भनिरोधक साधने आणि सुरक्षित गर्भपाताच्या सोयी या कोरोनामुळे सहजसाध्य उरल्या नाहीत म्हणून यातील कितीतरी स्त्रियांना बाळंतपणाला सामोरे जावे लागेल याची आपण सर्व नक्कीच कल्पना करू शकतो. अशा काही स्त्रिया भोंदू लोकांकडून धोकादायक रीत्या गर्भपात करवून घेण्याचा प्रयत्न करतील आणि नक्कीच जीवाला मुकतील .
● आशाला सध्या गर्भ राहिलाय पण तिला दुसरे मूल नको आहे .ती २७ वर्षांची आहे पहिल्या गरोदरपणामध्ये बिपी खूप वाढल्याने दुसरे मूल होऊ द्यायचे नाही असे तिने ठरवले होते . मात्र या कोरोनाच्या भीतीमुळे गर्भपात करण्यासाठी तिने दवाखान्यामध्ये जाण्याऐवजी तिने गर्भ राहू द्यावा असा तिच्यावर घरून दबाव येत आहे . . लगेचच राहिलेल्या या गर्भामुळे तिला अशक्तपणा आलाय आणि तिच्या छोट्या बाळाकडेही तिला नीट लक्ष देता येत नाहीये . गर्भपातासाठी तिच्या काकूने तिला एक घरगुती उपाय सांगितलाय. तो केल्यावर जीवाला धोका तर निर्माण होणार नाही ना अशी तिला भीती वाटतेय. घरगुती उपाय करून जीवाचा धोका पत्करायचा की हे नको असलेले बाळ होऊ द्यायचे अशी तिचीद्विधा मनस्थिती आहे . 
● रुबिनाला कोरोनाची बाधा झाली होती. आधी तिच्या नवर्‍याला झाली आणि त्यानंतर तिच्या कुटुंबातील ३ जण बाधित आहेत असे तपासणीमध्ये सापडले . तिला याचा काहीच त्रास जाणवला नाही . मात्र तिचा शौहर कोविडमुळे मरण पावला आहे. आता आपल्या लहान लहान ३ मुलांना घेऊन कसे जगायचे या प्रश्नाचे उत्तर डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिला शोधावे लागेल.
केवळ आरोग्यविषयक तक्रार असली तरच कोविड साथीचा परिणाम जाणवतो असे नाही. 
 डॉ. रचना एक कोविड योद्धा आहे. तिचे घर आणि कामाचे ठिकाण वेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे . लॉकडाऊनच्या काळामध्ये जिल्ह्याच्या सीमा पार करता येत नाहीत म्हणून कर्तव्याला प्राधान्य देऊन कामाच्या ठिकाणी राहू लागली . तिचे संपूर्ण घर सांभाळण्याची जबाबदारी तिच्या सातवीमधील मुलीवर पडली कारण तिच्या घरकाम सहायिकादेखील कामावर येऊ शकत नव्हत्या आणि तिचे पती देखील डॉक्टर असल्याने त्यांनाही कामावर जावे लागत होते. त्या मुलीचे बालपण संपून ती अचानक मोठी झालीये. कोरोना आला नसता तर असे नक्कीच झाले नसते. लॉकडाऊन संपल्यावर आता तिच्या सहायिका येऊ शकतात कामावर, मात्र त्यांच्यामार्फत आजार देखील येऊ शकतो , तेव्हा काय करावे याबाबत तिची द्विधा मनस्थिती आहे ... आता मुलीची ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने तिच्या अडचणी अजूनच वाढल्या आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये मृत्यू झाल्यास तिच्या कुटुंबाचे काय होईल या चिंतेने तिची झोप उडाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय केवळ त्यांच्या मृत्यूनेच त्रासात जाऊ शकतात असे नाही.
अलगीकरणामध्ये ठेवलेल्या एका नर्सकडे दुरून बघत रडणारी तिची छोटी छोकरी आणि तिच्याकडे बघून दुरून अश्रू ढाळणारी तिची ती आई हा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वायरल झाला होता. समाजाची सेवा करताना त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम सर्व कोविड योद्ध्यांची कुटुंबीय भोगत आहेत . या मानसिक तणावाचे परिणाम पुढील बऱ्याच काळासाठी राहणार आहेत.आरोग्य क्षेत्रामध्ये स्त्रियांचे प्रमाण ७०% हून अधिक आहे . त्यांना कोरोना बाधेचा धोका अधिक आहे. तरीही या संकटाच्या काळामध्ये काही कोविड रुग्णांसाठी तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती मिळविण्यासाठी पूर्ण देशभरामध्ये परिचारिका आणि आशा सेविका अश्या हजारो स्त्री आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. त्यांच्या कौटुंबिक अडचणी आणि रात्रंदिवस काम केल्याने त्याचा त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम सर्वदूर असणार आहे. याशिवाय सामाजिक, जातीय आणि आर्थिक उतरंडीनुसार समाजातील घटकांवर होणारे परिणाम हे निम्न स्तरातील लोकांसाठी अधिक व्यापक असतील.
साथीच्या काळात वाढलेली कौटुंबिक हिंसा हा देखील एक सार्वजनिक आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे.   
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार स्त्रिया व बालके यांच्यावरील हिंसाचाराचे प्रमाण लॉकडाऊनच्या काळामध्ये वाढले असून आता ३३% ऐवजी ५०% स्त्रिया या हिंसाचाराने पीडित आहेत. लॉकडाऊनमध्ये नवर्‍याची मारहाण वाढल्याने आणि मदत मिळवण्यासाठी अथवा उपचारासाठी घराबाहेर पडू शकत नसल्याने अनेकजणींची घुसमट खूप वाढली आहे . पूर्वी हेल्पलाईन नंबरवर फोन करून मनातील दु:ख मनमोकळेपणाने बोलता येत होते, पण आता सर्व कुटुंबीय घरी असल्याने तेदेखील शक्य होत नाहीये. कौटुंबिक हिंसाचाराचे परिणाम हे शारीरिक तसेच मानसिक देखील असतात. घरातील लहान मुलांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होतो. भविष्यातील मानसिक ताणतणावाच्या काळामध्ये हिंसाचाराचे प्रमाण अजूनदेखील वाढण्याची शक्यता आहे . अशा स्त्रिया स्वतः मदतीपर्यंत पोचू शकत नाहीत म्हणून अशा स्त्रियांपर्यंत मदत पोचण्याच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.
● लॉकडाऊन संपल्यानंतर सीमा अडचणीमध्ये आली आहे . पूर्वी नोकरीसाठी ती रोज प्रवास करायची , पण आता अजून प्रवासाची सोय नीटशी सुरू झालेली नाही. तिला गाडी चालवता येत नाही आणि डबल सीट प्रवासाला परवानगी नसल्याने तिच्यासमोर नोकरी सोडणे किंवा कुटुंबापासून दूर राहणे हेच पर्याय आहेत. बसमध्ये ठराविक लोकांनाच प्रवेश असल्याने सध्या वेळेमध्ये घरी पोचू शकत नाहीये आणि घरातील कामांबाबत देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. घरातील सर्व कामे सुनेनेच करायला हवी अशी तिच्या कुटुंबियांची अपेक्षा आहे. तिचा नवऱ्याला तिची ओढाताण लक्षात येत आहे . पण तिला मदत केल्यास त्याचे आईवडील नाराज होतील म्हणून तो तिला घरकामामध्ये काहीही मदत करत नाहीये. या सर्व दगदगीमुळे पुरेशी झोप होत नसल्याने, तिला थकवा, डोकेदुखी , पित्त अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. न्यू नॉर्मलमध्ये पुरुषांनी घरकाम करणे जर समाजमान्य झाले नाही तर मात्र स्त्रियांचे , विशेषतः नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे आयुष्य अधिक खडतर होईल हे नक्की.
असंघटीत क्षेत्रामध्ये स्त्री कामगारांचे प्रमाण लक्षणीय आहे. मोठमोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि बदल सुरू केले आहेत . मात्र अशा असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणा-या , तसेच वेगवेगळ्या घरी कामासाठी जाणाऱ्या स्त्रिया कोरोनाबाधित होण्याचा धोका अधिक आहे . तरीही समाजातील कितीतरी जणी या क्षणी हा अवघड निर्णय घेत आहेत आणि पोटापाण्यासाठी घराबाहेर पडत आहेत.  योग्य काळजी न घेतल्यास त्यांना स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कोरोनाचा धोका अधिक आहे.
● कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होत असल्याने रोझीला नोकरी बदलण्याची इच्छा होती. मात्र कोविड महामारीमुळे आर्थिक मंदी अपेक्षित असल्याने आता हातातील नोकरी सोडण्याचा धोका ती घेऊ शकत नाही. नोकरीच्या ठिकाणी होणारा त्रास ती घरी बोलू शकत नाहीये आणि तिथे तक्रार केल्यास नोकरीवरून काढून टाकले जाईल अशीही तिला भीती वाटतेय. रोज कामावर जाणे हे तिच्यासाठी खूपच स्ट्रेसफुल आहे . तिला आता सतत भीती वाटत राहते, छातीमध्ये धडधड होते , झोप लागत नाही . स्त्रियांच्या असहाय्यतेचा फायदा उठवण्याची प्रवृत्ती या काळामध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. कामाची ठिकाणे या दृष्टीने सुरक्षित बनविणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.
● सुमन ही ३५ वर्षीय गृहिणी. आपण बरे आणि आपला संसार बरा असे तिचे आयुष्य सुरू होते. नवरा बांधकामावर मजूर म्हणून जात होता. आता काम बंद झाल्याने त्याचे दारूचे व्यसन भरपूर वाढले आहे .. आणि आता घराचा गाडा ओढण्यासाठी तिला घराबाहेर पडावे लागले. एक नोकरी मिळाली आहे पण तिथे काहीही सोयी मिळणार नाहीत असे सांगितले आहे . एका छोट्या कोंदट खोलीमध्ये दिवसभर बसून ठराविक काम रोज संपवावे लागते. दिवसभर एका जागी बसून काम करून तिच्या मागे पाठदुखी व मानदुखी सुरू झालीये. त्याच्या औषधोपचारावर पैसे घालवले तर कुटुंबाच्या पोटाला पुरणार नाहीत म्हणून ती तसेच दिवस ओढत आहे.
● लैला ही एक वेश्या आहे . लॉकडाऊनच्या काळामध्ये तिचा धंदा पूर्णपणे बंद पडल्याने उपासमारीला सामोरे जावे लागले. लॉकडाऊननंतर देखील पूर्वीसारखा व्यवसाय होत नाहीये .उपासमारीमुळे पुढे कसा मार्ग काढावा हे तिला समजत नाहीये. आता मिळेल तो धंदा हातातून सुटू नये म्हणून असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले गेले तर तिला लैंगिक आजार , तसेच एड्सचा धोका आहे . अर्थातच तीही असहाय आहे . म्हणून गिऱ्हाईकाकडून होणाऱ्या अत्याचारास देखील निमुटपणे सामोरे जावे लागणार आहे . तिच्या मुलीला तिने धंद्यापासून दूर एका संस्थेच्या वसतिगृहामध्ये ठेवले होते. पण आता ते वसतिगृह बंद झाल्याने तिची मुलगी तिच्याकडे परत आली आहे. आणि आता या वस्तीमध्ये तिला सुरक्षित ठेवणे किती दिवस शक्य होईल हे तिला माहीत नाही .
या आणि अशा किती कहाण्या सांगाव्या! या सर्वांची प्रत्यक्षातली नावे बदलली आहेत, पण अशा स्त्रिया तुम्ही देखील आपल्या आसपास नक्कीच बघितल्या असतील. शेकडो मैल प्रवास करणार्‍या मजूर स्त्रिया - काही घरी पोचल्या, काही पोचल्या नाहीत .. कोरोनाने गाठण्यापूर्वी मृत्यूने त्यांना गाठले. कोरोनामुळे केवळ कोविड आजारच होत नाही तर कोरोना आयुष्यातील बर्‍याच गोष्टी बदलू शकतो. कोणासाठी शिक्षणाची संधी नाहीशी करू शकेल, कोणासाठी नोकरीची. कोणासाठी मिळेल तशी आणि मिळेल ती नोकरी/व्यवसाय करण्याचे बंधन असेल तर कोणाला वेश्याव्यवसायात अडकवले जाईल. कोणासाठी आजार अंगावर काढण्याचे कारण तर कोणासाठी झाडपाल्याचे औषध घेण्याचे . कोणी घरच्यांना खाऊ घालून स्वतः उपाशी राहील तर कोणी शिक्षण सोडून नोकरी करू लागेल. कोणासाठी हे कौटुंबिक हिंसाचार बनून येईल तर कोणासाठी लैंगिक अत्याचार.. एक कोविडची साथ मात्र रूपे तिची हजार आहेत.
हे सर्व परिणाम स्त्री पुरुष सर्वांवर होणार आहेत, मान्य आहे . पण लिंगभेदामुळे हे परिणाम स्त्रिया व पुरुषांसाठी वेगळे असतील.पुरुषांवर कुटुंबप्रमुख म्हणून घरासाठी पैसे कमविण्याची जबाबदारी अधिक आहे . त्यामुळे कोरोनाच्या सावटाखाली देखील त्यांना घराबाहेर पडावेच लागेल . आजार झालाच तर गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असल्याने मृत्यूचा धोका जास्त आहे याचा मानसिक दबाव देखील सहन करावा लागेल . नोकरी किंवा व्यवसायावर गदा आल्यास सर्व खर्च कशा प्रकारे चालवायचा आणि कर्जाचे हप्ते कसे भरायचे याचे टेंशन त्यांना मानसिक तणावाकडे ढकलेल. लिंगभावाच्या परिणामांमुळे मनातील दु:खे कोणाशी मनमोकळे बोलणे हे पुरुषांसाठी अवघड असते, तसेच आत्महत्येचा धोका देखील पुरुषांसाठी अधिक असतो. त्यामुळे पुरुषांनी या काळामध्ये जपायला हवे आणि मानसिक ताणतणाव जाणवल्यास त्यांनी तज्ज्ञाचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. हा अवघड काळ काही महिने/वर्षे सुरू राहणार असल्याने हा काळ पार पडेपर्यंत सर्वांनीच एकमेकांना जपणे आवश्यक आहे. पुरुषांमधील व्यसनाधीनता व त्या अनुषंगाने येणारी गुन्हेगारी व हिंसक प्रवृत्ती भविष्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसेल.
स्त्रियांवर मात्र कुटुंबांची काळजी घेण्याचे काम सोपवलेले असते. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची सुश्रुषा करताना त्यांना स्वतःला आजार होणार नाही ना याची योग्य ती खबरदारी त्यांनी घ्यायला हवी. स्त्रियांवरील हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याने त्यांना मानसिक तसेच शारीरिक आरोग्यविषयक मदतीची नितांत गरज भासणार आहे , मात्र मदतीपर्यंत पोचणे त्यांना अवघड जाईल. नोकरी करणार्‍या स्त्रियांना आता जास्तीचे घरकाम देखील करावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येईल . घरकामाची वाटणी करून घेऊन घरातील पुरूषांना देखील यामध्ये हातभार लावणे क्रमप्राप्त आहे . पैश्यासाठी पोटच्या पोरीला विकणे यापूर्वी देखील सुरू होते, मात्र आता त्याचे प्रमाण वाढू शकते. कुटुंबातील संसाधनांची जेव्हा वाटणी करण्याची वेळ येते तेव्हा अर्थातच स्त्रिया व मुली मागे पडतील. शाळा बंद होताना आधी मुलींच्या शाळा बंद केल्या जातील . शिक्षणाची वाट अधिक खडतर झाल्याने आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यामध्ये आणि आत्मनिर्भर बनण्यामध्ये आता पुन्हा अडचणी निर्माण होतील . स्त्रियांच्या आरोग्यासाठी जर खास तरतुदी व सोयीसुविधा दिल्या नाहीत तर माता मृत्यूचे प्रमाण वाढू शकते. स्त्रियांच्या औषध पाण्यावर पैसे खर्च करायला आपल्या समाजात दुय्यम प्राधान्य मिळते. त्यात रोजगाराची हमी नसताना, असलेले रोजगार गमावले असताना,रोजगार आहेत पण पगार नाही अशा अवस्थेत स्त्रियांच्या औषधपाण्यावरचा खर्च शून्यावर येऊ शकतो. 
स्त्रिया व मुलांमधील कुपोषण आपल्या देशात आधीच मोठ्या प्रमाणात आहे , ते प्रमाण अजून वाढू शकते. शिक्षण बंद झाल्याने कमी वयातील लग्ने व गरोदरपणा यांना मुलींना सामोरे जावे लागेल . पुरुषांचे मृत्यू अधिक प्रमाणात झाल्याने विधवांचे प्रमाण वाढेल व त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागेल. पैश्याच्या तंगीमुळे अडलेल्या स्त्रियांचे विविध स्तरावर लैंगिक शोषण होण्याचा धोका अनेकपटीने वाढेल . तृतीयपंथी व्यक्तींसाठी आरोग्यविषयक सेवा मिळवणे हे नेहमीच अवघड होते . त्यांचे राहणीमान देखील आरोग्यपूर्ण असण्याची शक्यता कमी आहे . नियमित रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने त्यामधील अनेक जण लैंगिक सेवा पुरवीत होते . या सर्वांसाठी कोरोनाचा धोका आणि कोरोनामुळे उपजीविकेमध्ये येणार्‍या अडचणी यांना सामोरे जाणे अवघड जाणार आहे  - असा हा कोरोना आणि त्याचे नानाविध परिणाम !
आरोग्य आणि स्त्रिया असा व्यापक विचार करताना असे लक्षात येते की मूलभूत आरोग्य आणि संगोपनाच्या सेवा कल्याणकारी राज्य व्यवस्थेने उपलब्ध करून न दिल्यामुळे कष्टकरी आणि मध्यमवर्गातील स्त्रिया अधिकच परिघाबाहेर फेकल्या जातात,तर कोविडच्या काळात होत असलेले स्त्रियांच्या आरोग्यावरील परिणाम पाहता त्त्यात अधिकच तीव्र वाढ झाली आहे. हा आजार जरी एकच असला तरी लिंगभावानुसार समाजातील विविध घटकांवर होणारे त्यांचे परिणाम हे पूर्णतः निराळे आहेत आणि म्हणूनच समाजाच्या आरोग्याची काळजी घेताना या सर्व बाबींचा विचार होऊन त्यानुसार योग्य त्या उपाययोजना करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी व्यापक आणि संवेदनशील दृष्टी आणि लिंगभावाधारित समर्पक नियोजन पाहिजे . पोस्ट कोविड जगामध्ये “न्यू नॉर्मल” तयार करताना या आणि अशा सर्व समाजघटकांचा विचार करून एक संवेदनशील व सुरक्षित समाज निर्माण करण्याचा आपण सर्व प्रयत्न करुया.