अनुक्रमणिका

संपादकीय

मुखपृष्ठाविषयी

लेख


स्त्रिया आणि विनोद - सत्तासंबंधांच्या शोधात  - श्रीनिवास हेमाडे

व्यंगचित्रकलेचे महिलांना वावडे ?  -  वसंत सरवटे

सिनेमातले स्त्रीवादी विनोद   - मुक्ता खरे

मालिकांतल्या विनोदी स्त्रिया - सोनाली देशपांडे

विनोद हाजिर हो -   उत्पल  व. बा.

विलक्षण इलेक्शन  -  माधवी भट

अगा चप्पल चप्पल - सई लळित

घरगुती अध्यात्म   - सई लळित

आड येणारं आडनाव  -  सुषमा परचुरे 

आधुनिक स्त्रीपर्वाची लेखिका   नंदिनी आत्मसिद्ध

पितृसत्तात्मक सोच को अभिव्यक्त करते लतीफे - राहुल निशांत

Power of Laughter or Power of Gender - Dr . Seema Ghangale

व्यंगचित्र

परिसंवाद

विनोदाला वळसा

हसण्यावारी नेऊ नका

पुस्तक परिचय

महत्त्वाची विनोदी सामग्री

मुलाखती

मंगला गोडबोले

शुभा खांडेकर

कनिका मिश्रा

तृप्ती खामकर

रसिका आगाशे

विडंबन

नसतोस घरी तू जेव्हा

तो येतो आणिक जातो

कसं जमतं

कसं जमतं रे ?



मूळ कविता 
WhatsApp University 
विडंबन    
वंदना खरे
कसं जमतं गं तुला?
एकांत क्षणी प्रेयसी होणं...
निवांत क्षणी सखी होणं...
अपयशाच्या क्षणी आई होणं...
अन यशाच्या क्षणी सहचारिणी होणं...
किती बदलतेस भूमिका
किती वेळा, कशा?
कसं जमतं गं तुला?
भूक लागली असता भाकरी होणं,
स्पर्श हवा असता रेशीम होणं,
गंध हवा असता मोगरा होणं,
अन तहान लागली असता पाऊस होणं
कसं कळतं गं तुला?
मला काय हवंय? केंव्हा? आणि कसं?
आणि जमतं तरी कसं
असं भाकरी, रेशीम, मोगरा होणं
किंवा पाऊस होऊन कोसळणं
मला जेंव्हा हवं तेंव्हा,
मला जसं हवं तसं
मी मात्र गृहित धरतो
मला हव्या त्या वेळी, हव्या त्या रूपात
तू असशीलच हे
तुला बायकोनावाचं लेबल लावतो
आणि 'बायकोनी असंच असलं पाहिजे'
हे मानतच जातो मनोमन
माझं हे मानणं, माझी ही गृहितं
माझ्या ह्या अपेक्षा...
ह्याही तू स्वीकारतेस मनोमन...
अन वागतेस हे सारं सारं पूर्ण करण्यासाठी
कितीही अोझं वाटलं, कितीही त्रास झाला
तरी तो मला जाणवू न देता
हे सारं सारं जगणं
कसं जमतं गं तुला?
कसं जमतं रे तुला?
दिवसाचे चोवीस तास
वर्षाचे तीनशेपासष्ट दिवस ...
नुसती नवरेशाही गाजवणं...
कधीच नाही वाटत?
बदलावीशी स्वत:ची भूमिका?
कसं जमतं रे तुला?
भूक लागली की
आयतं गिळायला मागणं
झोप आली की तयार अंथरूण मागणं
अन तहान लागली तरी
पाणीसुद्धा स्वत: उठून न घेणं
कळतच नाही का रे तुला?
मलाहि काहि हवं असेल? केंव्हा? आणि कसं?
आणि जमतं तरी कसं
असं बेजबाबदार वागणं
निर्लज्जपणे वाट्टेल ते मागणं
स्वत:ला जेंव्हा हवं तेंव्हा,
स्वत:ला जसं हवं तसं
मी कधीची वाट पाहातेय 
मला हवा तसा, क्षणभर तरी
तूही माझ्यासाठी असशील का?
तू “नवरा” म्हणवून घेतोस ना माझा
मग ‘नवऱ्याने कसं असलं पाहिजे’
त्याचं कधी येईल तुला भान
माझं दमणं, चिडणं, माझ्या अपेक्षा...
दुर्लक्ष करतोस जाणून बुजून ...
वागतोस हे सारं पाहून न पाहिल्यासारखा 
मला किती त्रास झाला
तरी त्याची जाणीव न ठेवता
माझीच टिंगल करणं
कसं जमतं रे तुला?









तो येतो आणिक जातो


मूळ कविता 
आरती प्रभू 
स्त्रीवादी विडंबन
वंदना खरे  
ती येते आणिक जाते
येताना कधि कळ्या आणिते
ती येते आणिक जाते
येताना कधि कळ्या आणिते
अन् जाताना फुले मागते.
येणेजाणे, देणेघेणे
येणेजाणे, देणेघेणे
असते गाणे
जे न कधी ती म्हणते.
येतानाची कसली रीत
येतानाची कसली रीत
गुणगुणते ती संध्यागीत
विचित्र येते, विरून जाते
जी सलते.
ती येते आणिक जाते

तो येतो आणिक जातो
येताना कधी नाणी आणितो
आणि जाताना नोटा मागतो 
तो येतो आणिक जातो
येताना कधी गहू आणितो
आणि जाताना पोळ्या मागतो 
येताना कधि कांदे आणितो
आणि खायला भजी मागतो
येणेजाणे, देणेघेणे
येणेजाणे, देणेघेणे
जे न तो कधी सांगतो
घेतानाची कसली रीत
देतानाची कसली रीत
कुरकुरतो तो सदोदित
विचित्र वागतो, सटकून जातो
जाण्यासाठी फिरून येतो
तो येतो आणिक जातो



मुखपृष्ठाविषयी



मनमोकळेपणाने खदखदून हसणाऱ्या बायका - हे भारतातले दुर्मिळ दृश्य आहे! आपल्या संस्कृतीत बायकांनी खुल्या दिलाने हसणे अयोग्य समजले जाते. म्हणूनच 'लिंगभाव आणि विनोद' यांचा परस्पर संबंध तपासणाऱ्या अंकाच्या मुखपृष्ठावर अशा खळखळून हसणाऱ्या बायकांचे फोटो वापरले आहेत.
मुखपृष्ठाची रचना आणि फोटोग्राफी मकरंद म्हसाणे या मित्राने केली आहे. 

हसण्यावारी नेऊ नका ..


नवनिता देवसेन आधुनिक स्त्री पर्वाची लेखिका


साहित्याच्या क्षेत्रात स्त्री आणि पुरुष असा वेगळा विचार करावा की नाही हा एक चिरंतर वादविषय आहे. पण जगभराचा साहित्य इतीहास पहिला, तर स्त्रियांनी नेहमीच स्वतःच्या वेगळ्या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केलेला दिसतो. सर्वच स्त्रिया स्वतःला वेगळेपणाने मांडतात असं नाही, पण काहींना तरी निराळं असं अनुभवविश्र्व किंवा विश्लेषण मांडायचं असतं. ते निराळं असण्याचा आग्रह त्या करतात कारण त्यांनी विशिष्ट पद्धतीने जाऊन लिहावं अशी पुरुषप्रधान समाजाची अपेक्षा असते. हे केवळ लिखाणाच्या किंवा कलेच्या क्षेत्रापुरतेच मर्यादित नाही, उलट जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्त्रिया हा अनुभव घेत असतात. त्यांची त्यावरची प्रतिक्रिया ही त्यांच्या स्वतःच्या स्वभाव धर्मावर, जाणीव शक्तीवर आणि धाडसावर अवलंबून असते. विसाव्या शतकात स्त्रिवादाचा उदय झाल्यानंतर स्त्रीलेखनाला एक वेगळी दिशा मिळाली. भारतातही हा प्रभाव दिसतो. पण भारतीय स्त्रीची जडणघडणच अशी होते की ती पूर्णपणे पश्चिमी प्रभावाखाली फारशी जात नाही. अगदी आजही हे विधान बहुतेक स्त्रियांच्या बाबतीत खरं ठरावं. भारतीय परंपरा आणि संस्कृती स्त्री, पुरुष दोघांच्याही मनीमानसी रुजलेली असते. स्त्रीच्या बाबतीत तर दुहेरी पेच पडतो. एकीकडे तिला ह्या परंपरेचा काच होतो तर दुसरीकडे आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधताना तिला स्वतःच्या मुळांचे संदर्भ तपासावेसे वाटतात. स्त्रीवादाच्या जाणिवेनंतरची स्त्री पुन्हा एक वेगळं अकलन घेऊन उभी राहते. ती जर लेखिका असेल तर लिहिणं आणि त्यात स्त्रीवादी तत्व प्रतिबिंबित करणं ह्या गोष्टी साधताना तिला कसरत करावी लागते. ती अशासाठी की मुळातच लिहिताना तिला अनेक बंध तोडावे लागतात, जे तिच्या अभिव्यक्तीवर परंपरेने घातलेले असतात. त्यात स्त्रीवादाचं टोक धरून लिहिणंच काय, पण जगायचं झालं तरी पुरुष सत्तेने घालून दिलेले नेमनियम काही वेळा धुडकावणं, नाकारणं तिला भाग पडतं. हे दुहेरी ओझं आयुष्यभर ती वागवत राहते. निर्मिती क्षमता आणि स्त्रीत्व ह्यांची निसर्ग सिद्ध सांगड आहेच. पण संस्कृतिक सामाजिक संदर्भात हा मेळ घालताना स्त्रीपुढे मोठा पेच उभा राहतो, कारण साहित्य निर्मितीच्या क्षेत्रातही पुरुष सत्तेचा वावर असतोच. आहेच.
   अशा तऱ्हेच्या पेचांमधून जाऊनही आपलं अस्तित्व टिकवणाऱ्या ज्या मोजक्या स्त्रीवादी लेखिका भारतीय साहित्यात पाय रोवून उभ्या राहिल्या त्यात बंगाली लेखिका नवनिता देवसेन यांचं नाव ठळकपणे समाविष्ट करावं लागेल. 
   नवनिता देवसेन यांची लेखनप्रेरणा स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाशी जशी निगडीत आहे, तशीच ती एक हसरी खेळकर आणि खोडकर ही जीवनदृष्टी घेऊन आली आहे. साहित्याचे विविध प्रकार हाताळणारी ही लेखिका लोकप्रिय ही आहे आणि आक्रमकही आहे. कथा,कादंबरी, ललित लेखन, प्रवास वर्णन, विनोद आणि संशोधनपर लेखन त्यांनी विपुल प्रमाणात केलं आहे. त्यांच्या लेखनाची सुरुवात कवितेने झाली. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचं पाहिलं पुस्तक प्रसिध्द झालं. ते कवितेचंच होतं. प्रथम प्रत्यय हे त्याचं शीर्षक. लेखन म्हणजे विरंगुळा, मन रमवायचं साधन असा त्यांचा दृष्टिकोन कधीच नव्हता. आई वडील दोघंही नामवंत कवी असल्याने साहित्य त्यांना आपसूकच जवळचं वाटलं. शिवाय आपण लेखन करतो तेव्हा आपल्या मनातलं काही सांगू शकतो. जे पटत नाही तेही परखडपणे मांडू शकतो हे नवनीता यांना फार लवकर उमगलं. विद्या, साहित्य, शिक्षण याचे संस्कार त्यांना लाभले. तसंच परंपरेने अनेक बंधनं ही त्यांच्या पदरात टाकली. भारतीय स्त्रीच्या आयुष्यातल्या चौकटी त्यांनाही अनुभवायला मिळाल्या. सर्वच चौकटी मोडता येत नाहीत असंही त्यांच्या लक्षात आलं. काळानुसार त्यांच्या धारणा बदलल्या ही. पण या वाटचालीत त्यांना एक उमगलं की आपल्या हाती असलेली लेखणी हे एक शस्त्र आहे. एक हत्यार आहे. ज्यामुळे आपल्या हाती एक ताकदीचा स्त्रोत लागलेला आहे. लेखन हे एक तऱ्हेचं सक्षमीकरणाचं साधन बनून गेल्यानंतर नवनिता देव सेन ह्यांनी त्याच्या माध्यमातून अनेक वाटांनी प्रवास केला. इतिहास, वर्तमान आणि भविष्याच्या अंतरंगाचा वेध घेतला आणि स्वतःच्या भूमिका घेऊन परंपरांचा शोध घेतला. त्यासाठी संघर्ष ही करावा लागला पण वेळोवेळी आपली आक्रमक वृत्ती जागी ठेऊन त्यांनी खिंड लढवली. 
एक तऱ्हेची मूर्तिभंजक, विध्वंसक दृष्टी त्यांच्या लेखनातून दिसते. हा प्रक्षोभ त्यांचा आत्मा आहे. उपहास, विनोद, परखडपणा यामुळे या लेखनाला एक धार आलेली दिसते. म्हणूनच त्यांचं लेखन बोचरं वाटूनही ते लोकप्रिय ठरलं. कारण ते वाचकाच्या मनाचा तीक्ष्ण वेध घेणारं होतं. आपल्या अभ्यासातून आणि संशोधनातून ही त्यांनी जे मांडलं ते परंपरेचा आणि संस्कृतीचा अभ्यास म्हणून महत्वाचं ठरलं. एक विदुषी आणि लेखिका ही नवनिता देव सेन यांची प्रतिमा बंगाली विश्वात आपलं असं स्थान निर्माण करून स्थिरावली आहे.  
कोलकात्याच्या सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबात नवनिता यांचा जन्म झाला. वडील फ्रेंच, जर्मन आणि पर्शियन भाषांचे जाणकार. उत्तम कवी आणि अनुवादक. त्यांनी मुलांसाठी 'पाठशाला' नावाचं मासिक ही चालवलं होतं. आई राधाराणी देवी ही सुद्धा कवयित्री होती. अपराजिता देवी या टोपण नावाने ती कविता लिहायची. नवनिता यांनी १९८४ मध्ये आपल्या आईचा कविता संग्रह संपादित करून प्रकाशित केला होता. त्याला १९८६ मध्ये रविंद्र पुरस्कार लाभला. १९८९ पर्यंत नवनिता यांना आईचा सहवास मिळाला. स्वतःच्या कुटुंबाबद्दल नवनिता यांनी अनेकदा लिहिलं आहे. आमचं पुरुषविरहित घर ज्यात आजी, तिची घटस्फोटित मुलगी आणि तिच्या दोन तरुण मुली राहतात असं वर्णन त्या करतात. स्वतःबद्दल त्या म्हणतात, मी एकटी आहे, सोबत 2 मुली, 1 कुत्रा आणि 2 मांजरी. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात आणि यादवपुर युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतल्यानंतर नवनिता हार्वर्ड आणि अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठात पदव्युत्तर आणि डॉक्टरेट शिक्षणासाठी गेल्या. तौलनिक सहित्याभयास हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. पुढे त्यांनी यादावपुर विद्यापीठातून याच विषयाच्या विभागप्रमुखाची धुरा कित्येक वर्ष सांभाळली. अनेक सुवर्ण पदकं, PhD, केंब्रिज च्या पोस्ट डॉक्टरल स्कॉलर, पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार, अशा अनेक सन्मानाच्या मानकरी असलेल्या नवनिता एक वाचकप्रिय लेखिका म्हणून ओळखल्या जातात. बालसाहित्याचं पुस्तक, सत्यजित राय यांनी काढलेला परीकथा संग्रह, स्त्रीजीवन विषय लेखनाचं "स्त्रिपर्व" अशीही त्यांची पुस्तकं आहेत. 
   नवनिता यांच्या व्यक्तिगत जीवनाला एक वलय प्राप्त झालं ते त्यांच्या आणि अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांच्या विवाहामुळे. ही दोन्ही कुटुंब उच्च वर्तुळातली, नामवंत घरण्यातली. त्यामुळे या लग्नाची चर्चा खूप झाली. विवाहानंर त्यांचं वास्तव्य इंग्लंड मध्ये होतं. तिथे पुढील संशोधन केल्यानंतर त्या काही वर्षांनी कोलकात्याला परतल्या. कारण त्यांचा विवाह टिकला नाही. घटस्फोट घेण्याचा निर्णय झाला आणि दोन मुलींना घेऊन त्या भारतात परतल्या. ही घटनाही बंगाली भद्रलोकांमध्ये वाद विषय बनली. घटस्फोट ही व्यक्तिगत घटना असली तरी सामाजिक पातळीवर तिची जोरात चर्चा आजही होते. तो काळ तर १९७५ च्या आसपासचा. स्त्रीमुक्ती हा शब्द अजुन रूजायचा होता. त्यावेळी घटस्फोट म्हणजे लाजीरवाणी घटनाच समजली जायची. हे सगळं पेलून स्वतःच्या पायावर उभं राहणं एखादीला जड गेलं असतं. नवनिता यांच्यासाठीही ते सहज सोपं नव्हतं. पण स्वतःच्या हीमतीवर त्या हे वास्तव पचवून गेल्या. यादवपुर विद्यापीठातलं अध्यापन, लेखन आणि संशोधन हे त्यांचं विश्व बनलं. कविता त्या पूर्वीही लिहीत होत्या. भारतात परतल्यानंतर त्यांची कविता अधिकच व्यक्तिगत बनली. वैवाहिक नात्याचं, त्यालीत तणावाचं प्रतिबिंब त्यावर पडू लागलं. त्याची चर्चा होऊ लागली तेव्हा त्यांनी हे लेखन थांबवलं. पण मनातल्या मनात त्यांचा कोंडमारा झाला. मग त्या गद्य लेखनाकडे वळल्या. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना बरोबर घेऊन त्या लिहु लागल्या. स्वतःबद्दल च्या या लिखाणातून त्यांनी आपलं कुटुंब एकदम सार्वजनिक करून टाकलं. त्यांचं घर, मुली, आई..  बंगाली वाचकांना हे सारं ओळखीचं झालं. 
   नवनिता देव सेन हे नाव बंगाली साहित्यात रुजत गेलं. त्यांनी वेगवेगळ्या लेखन प्रकरांमधून आपली लेखणी चालवली. प्रवासवर्णनाच्या क्षेत्रातलं त्यांचं लेखन एक वेगळाच अनुभव घेऊन आलं. एक जीवनदृष्टी, सामाजिक भाष्य, या लेखनात आढळतं. त्यांचं दुसरं पुस्तक ‘करुणा तोमार कोन पथ दीये’ १९७८ मध्ये प्रकाशित झालं. एकट्या स्त्रीने केलेली यात्रा, कुंभ मेळ्यातील अनुभव त्यांनी ह्यात मांडला आहे. ह्या लेखनाने त्या एकदम लोकप्रिय लेखिका बनल्या. 
१९८४ मधल्या त्यांच्या ‘ट्रक बाहने मॅक मोहने’ या पुस्तकात त्यांनी १९७७ मध्ये भारत तिबेट सीमेलगतच्या भारताच्या लष्कराच्या अधिपत्याखालील भागात रेशनच्या ट्रक मधून केलेल्या प्रवासाच्या आठवणी आहेत. विनोद, खोचकपणा, उपहास आणि कोटीबजपणा ह्यासाठी हे लेखन प्रसिद्ध आहे. प्रवासानुभव आणि सामाजिक वास्तव यांना जोडणारं हे लेखन बंगाली वाचकांनी डोक्यावर उचलून घेतलं. ‘नटी नवनिता’ हे त्यांचं १९८३ मधलं गद्य लेखन हा त्यांच्या निबंध लेखनाचा संग्रह समीक्षकांनी नावाजलेला आहे.
   कथेच्या क्षेत्रातही नवनिता देव सेन यांची कामगिरी वैशिष्टय पूर्ण राहिली. त्यांचे अनेक कविता संग्रहही प्रसिध्द झाले. त्यांनी लिहिलेल्या विनोदाचा शिडकावा असणाऱ्या लघुकथा हा त्यांच्या लेखनाचा एक चेहरा झाला. त्यांच्या कथांमध्ये आणखी एक प्रवाह दिसून येतो तो म्हणजे पारंपरिक व महाकाव्यातील व्यक्तिरेखा यांच्या संदर्भात त्यांनी नवा अन्वयार्थ मनात घेऊन लिहिलेल्या कथा. यातही त्यांची उपहास पूर्ण शैली आहेच. पण स्त्रीवादी दृष्टी ठेऊन लिहिल्यामुळे या कथांना आलेली धार वेगळीच आहे. त्यांच्या अभ्यासाचा विषयही वाल्मिकी रामायण आणि त्याची रचना शैली असा होता. विशीबाविशित त्यांनी हे संशोधन करायला सुरुवात केलेली. त्यावेळी एक स्त्री म्हणून रामायणाचा वेगळा विचार त्यांच्या मनात सुरू झाला. प्रत्यक्ष आयुष्यातले अनुभव गाठीशी होतेच. रामायणाचा अभ्यास करताना त्यांना संस्कृत भाषेची अडचण आली. संस्कृत पंडितांची मदत त्यांना अपेक्षित होती पण ती पुरेशी मिळेना तेव्हा त्यांचा हा अभ्यास त्यांना थांबवावा लागला. पण यातूनच त्यांच्या मनात रामायण महाभारतातील व्यक्तिरेखानी फेर धरला. विशेषतः स्त्रियांनी. त्यातूनच मग पुढे त्यांनी स्त्रीवादी दृष्टिकोन ठेऊन शुर्पणखा, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्यावर छोट्या कथा लिहिल्या. 

महाभारतातल्या सत्यवती, द्रौपदी, अंबा, शकुंतला यांच्या संदर्भातही त्यांनी कथा लिहिल्या. महाकाव्यातील तपशील तेच ठेऊन घटनांची मांडणी वेगळ्या पद्धतीने करण्याची धरणी नवनिता यांनी अवलंबली. जोडीला मूळच्या पुरुषप्रधान कथानकाची खिल्ली उडवणारे लेखन असे. त्यात नुसताच विनोद नव्हता तर एक उद्रेक, प्रक्षोभ ही होताच. तो आला होता स्त्रीवादी जाणिवेतून. स्त्री व्यक्तिरेखांची मांडणी आजवर विशिष्ट भूमिका असलेल्या पुरुषांनी केली. म्हणून त्यांचे विशिष्ट साचे बनले. एक स्त्री त्याकडे कशी वेगळ्या नजरेने बघते हे त्यांनी दाखवून दिलं. ‘अभिज्ञान दुष्यांतम’ ही त्यांची कथा या बाबतीत लक्षणीय ठरते. त्यातला दुष्यंत वारंवार नवनव्या तरुणींच्या प्रेमात पडणारा राजा आहे. त्याची महाराणी चंद्रवती अपत्याहिन आहे. इतर स्त्रियांपासून ही त्याला मूल नाही. पुत्र व्हावा, सिंहासनाला वारस मिळावा म्हणून त्याला नवी पत्नी हवी असते. सतत प्रेमात पडण्यामागचं त्याचं हे समर्थन आहे. शकुंतलेला त्याने ओळखलं नाही म्हणून तिला परत जावं लागतं. खूणेची अंगठी हरवली म्हणूनच राजाने आपल्याला ओळखलं नाही असं तिलाही वाटत राहतं. आता तो लोलापांगी या अप्सरेच्या प्रेमात पडलाय. तिचं शकुंतलेशी नातं आहे कारण तिची आई शलभा हीसुद्धा मेनकेचीच मुलगी आहे. दुष्यंतला धडा शिकवायचा या इराद्याने शलभा आणि लोलापांगी एक युक्ती करतात. लोलापांगी आपल्या जवळील शिरोमणी खुणेसाठी दुष्यंत कडे देते आणि त्याला रात्री भेटीसाठी बोलावते. प्रत्यक्षात भुवन व्यापाऱ्याचा वेश धारण करून तो पोहोचतो तेव्हा हा शिरोमणी त्याने चोरला आहे असा आरोप होऊन त्याला मारहाण होते. गैर समजुतीतून झालं असा आव आणून शलभा त्याला त्यातून वाचवते. दुष्यंताची स्वतःची अंगठी मात्र ती काढून घेते आणि शकुंतलेच्या मुलाला खेळायला देते. विदुषकला घेऊन राजा अंगठीच्या शोधात शकुंतला असलेल्या अनाथाश्रमात येतो. तिला सन्मानाने बरोबर नेतो. कथेच्या ओघात लेखिकेने दुष्यंताच्या भ्रमर वृत्तीला घेतलेले चिमटे चपखल आहेत. राजपुत्र अंगठीशी खेळत असताना विदुषकाची बहारदार मुक्ताफळं हसू आणतात. "आता राजपुत्र अंगठी गिळणार नाही याकडे लक्ष द्या. त्याचं पोट फाडून आपल्याला ती बाहेर काढता येणार नाही बरं का! आणि तुम्हाला माहीतच आहे अंगठीशिवाय आमच्या महाराजांची स्मृती कशी हरवून जाते ते!"
त्यांच्या अनेक कथांमधून जुन्या संदर्भांची, व्यक्तिरेखांची नवी मांडणी दिसून येते. त्यामागची त्यांची भूमिका व्यवस्थेला आव्हान देणारी आहे. सातत्याने त्यांनी असं लेखन केलं आणि वाचकांच्या मनावर आपला ठसा उमटवला. विनोदी कथांमध्ये त्यांची ‘मोंसीएर होलार हॉलिडे’ ही धमालकथा वाखणाण्या सारखी आहे. आपली आई आणि दोन मुली अशा कुटुंबालाही त्यांनी ह्या कथेत आणलं आहे. रात्रीच्या वेळी हुलो या मांजराचा आवाज ऐकुन मुलींनी कसं त्याला शोधण्याचा हट्ट धरला आणि आसपासचे शेजारी ते थेट फायारब्रिगेड या तपासात सामील कसे झाले त्याचा साद्यंत वृत्तान्तच आहे हा! 

   नवनीता देव सेन या सढळ हाताने लिहीत आल्या आहेत. १९७५ च्या सुमारास त्या भारतात परतल्या. त्यानंतर १९७६ सालि त्यांची पहिली कादंबरी ‘आमी, अनुपम’ प्रसिद्ध झाली. हा आणिबाणीचा काळ होता. शहरी, मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित घरांमधून अनेक तरुण क्रांतिकारी कृत्यांमध्ये सहभागी होण्याची समस्या त्यांनी ह्यात चित्रित केली आहे. नक्षलवादी वाटेवर जाऊन पोहोचणाऱ्या तरुण पिढी बद्दल त्यांनी ह्यात लिहिलं. महाश्वेता देवींची ‘हजार चुराशेर मा’ सुद्धा याच काळात लिहिली गेली. तरुण वर्ग हिंसक मार्गाने जाऊ लागला, भरकटू लागला, याला त्यांची वडीलधारी मंडळी कारणीभूत होती. अशी काहीशी भूमिका नवनीता यांनी या लेखनातून घेतली होती. 
   त्यांची यानंतरची महत्वाची कादंबरी होती ‘वामबोधिनी’. यात त्यांनी गद्य, काव्य असे दोन्ही प्रकार वापरले. एका कादंबरीत त्यांनी रंगवली एक महिला क्रांतिकारक. जी कोलकाता पोलिसांचा सासेमिरा चुकवण्यासाठी इंग्लंडला जाते. तिथे ती इंग्रजीतून लेखन करू लागते. मग तिला आपली भाषा, संस्कृती याचं एक वेगळं भान येतं. आपल्या भाषेपासून फारकत घेऊन उसन्या परक्या भाषेत लिहिणं फोल आहे हे तिला पटू लागतं. अखेर ती आपल्या भाषेकडे परत येते. 
स्वतः नवनीता सेन यांना प्रादेशिक भषांबद्दल जिव्हाळा आहे. प्रादेशिक भाषांची होणारी हेळसांड त्यांना पीडा देते. त्यांनी एके ठिकाणी म्हंटल आहे की त्यांच्या आईने त्यांना १९७१ मध्येच सांगितलं होतं की बंगाली सारख्या कालच्या भाषेत लिहु नकोस. तू आता उद्याच्या भाषेत, इंग्रजीत लिही. त्यांना ते पटलं नव्हतं आणि आईचा जरा रागही आला होता. एका बंगाली कवयित्रीने हे म्हणावं? असंही वाटलं होतं. पण आज आईचे विचार दूरचं पाहणारे होते असं त्यांना वाटतं. अर्थातच त्यांना ही परिस्थिती क्लेशकारक मात्र वाटते. 
   १९९० मध्ये त्यांची ‘शित साहसिक हेमंतलोक’ ही कादंबरी प्रकाशित झाली. मध्यम वर्गातल्या वृद्ध महिलांच्या जीवनाचं चित्रण यात आहे. म्हातारपणाने गांजलेल्या एकाकी वृद्धा राहत असलेला वृद्धाश्रम त्यांनी यात उभा केलाय. वेगवेगळ्या पार्श्भूमीतून आलेल्या वृद्ध स्त्रिया तिथे एकत्र राहतात. त्यात काही गृहिणी काही नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत. एक नामवंत लेखिका, वेश्यावस्तीत वाढलेली एक श्रीमंत स्त्री अशा अनेक स्तरांवरील महिलांचं जीवन त्यांनी चित्रित केलं आहे. आपल्या एकाकीपणाशी जुळवून घेत आयुष्य कांठणाऱ्या या स्त्रिया. वृद्धात्वामुळे येणाऱ्या व्याधिंशी झुंजणाऱ्या, त्यापुढे नमलेल्या या स्त्रिया.

वृद्धाश्रमासारख्या अपरिचित कृत्रिम वातावरणाशी जुळवून घेणं त्यांना जड जातं. कारण कुटुंबाशी त्या मनाने बांधलेल्या आहेत. कुटुंब आणि नातेसंबंध यांच्याशी त्या भावनेने जोडलेल्या आहेत. आश्रमात राहणं त्यांना उपरं वाटतं. पण तेच त्यांचं भागधेय आहे. घरात त्यांना अधिकार फारसा नव्हताच, त्यांचं अस्तित्व ही तिथून हटवण्यात आलं आहे. स्त्रीच्या वृद्धात्वाचा प्रश्न मनाला अधिक भिडणारा वाटून नवनीता यांनी या विषयाला हात घातला. या कादंबरीला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वृद्धाश्रमातील वातावरणात नैराश्याने ग्रासलेल्या या स्त्रियांना आयुष्याबददल आलेलं नवं भान हा या कादंबरीचा वेगळा शेवट आहे. अधिक समजुतीने त्या जीवनाकडे बघतात आणि मुक्त व्यक्ती म्हणून मिळालेलं नवं स्थान त्यांना निराळा आनंद अन् समाधान देतं हा आशावाद कादंबरी अखेर मांडण्यात आला आहे. 
   स्त्रीच्या आजवरच्या स्थनाबद्दल आणि तिच्या परंपरागत भुमिकांबद्दल वेगळी दृष्टी घेऊन लिहिणाऱ्या नवनीता देव सेन स्त्रीच्या आजच्या अस्तित्वाला ही वेगळं परिमाण देतात. स्त्रिया सिमित असंच लेखन करतात, त्यांना ऐतिहासिकतेचा अवाका नसतो, युद्धाबाबत काही समजत नाही अशा समजुतींना त्यांचा ठाम विरोध आहे. उलट पुरूषप्रणित इतिहासातल्या अनेक रिकाम्या जागा स्त्रियांचं लेखनच भरून काढू शकतं असा विश्वास त्यांना वाटतो. स्त्रीबद्दल परंपराशरण आणि पक्षपाती दृष्टिकोन ठेऊन लिहिणाऱ्यांबद्दल त्यांनी वेळोवेळी खरपूस टीका केली आहे. त्यात त्यात वाल्मिकीही आले, रवींद्रनाथही आले. 
 पण ज्या मुक्तपणाची, मोकळ्या अभिव्यक्तीची आस त्यांना आहे, तिचा वापर त्या स्वतः खुलेपणाने नेहमीच करु शकलेल्या नाहीत ही कबुली त्यांची त्यांनीच दीलीही आहे. लैंगिक संबंधाची वर्णनं त्यांनी कधीच केली नाहीत. समलिंगी नात्यावर त्यांनी लिहिलं आहे, पण उघडपणे शारिराबद्दल लिहिणं त्यांनी नेहमीच टाळलं. बंगाली भाषा आणि आपली आई यांनी आपल्यावर ही संस्कारांची बंधनं घातली असं त्या मानतात. इंग्रजीत एक अनामिकता मिळू शकते, तसं बंगालीत होत नाही असं त्यांना वाटतं. प्रादेशिक भाषांमधून लिहिणाऱ्या अनेक लेखिकांचं हेच मनोगत असेल. आजकाल स्त्रिया धीटपणे लिहु लागल्या आहेत. पण तरीही अनेक स्तरावरच्या त्यांच्यावरील बंधनांमुळे संकोचामुळे त्या थोड्या स्वतःला आक्रसून लिहितात, हे बऱ्याच जणीनबाबत आजही खरं आहे. नवनीताजींच्या मनातली ही भावना अनेक लेखिकांनिही अनुभवली आहे. 
   आईने त्यांच्या लेखनाला खतपाणी घातलं. तिने कधी त्यांची कविता सुधारून वैगरे दिली नाही. पण प्रेरणा दिली. आईच त्यांच्या लिखाणाची पहिली वाचक असायची. पण दुसरीकडे आईची प्रतिमा, तिचं अस्तित्व त्यांच्यातल्या मुक्त लेखिकेला बंधनात ठेवणारं, काही प्रमाणात लेखनावरच मर्यादा घालणारं ठरलं. अनेक भावना, प्रवृत्ती आतल्या आत दाबून टाकून त्यांनी कधी कधी लेखन केलं. पुढे मुलींच्यासाठी म्हणून विशिष्ट लेखन करणं टाळलं. पुरुषाने कसंही लिहिलं तरी चालतं. पण स्त्रीने स्वतःला हवं तसं लिहिलं तर ते खपवून घेतलं जात नाही. त्याचा तिला आणि तिच्या कुटुंबाला त्रास होतो. ही धारणा या प्रक्षोभक मानल्या गेलेल्या लेखिकेच्या ठायी ही होती. तरीही आपल्या मुलींना आपल्या लेखनाची किंमत चुकवावी लागली असं त्यांनी एकदा म्हंटलं होतं. आता या उतारवयात मात्र त्यांना अनेक बंधनं झुगारून लिहावंसं वाटतं. त्यांच्या दोन्ही मुली आपल्या क्षेत्रात नाव काढत आहेत म्हणून त्या निश्चिंत झाल्या असतील का? ( अंतरा देव सेन इंग्रजीतील नामवंत पत्रकार आहे तर नंदना देव सेन अभिनेत्री म्हणून चित्रपट क्षेत्रात स्थिरावत आहे) की आता काळ बदलला, समाज बदलला असं त्यांना वाटतं
   नवनीता देव सेन यांच्या वाटचाली कडे पाहिलं की, लिहिणाऱ्या स्त्रियांच्या भोवती असलेली अदृश्य बंधनं खऱ्या अर्थानं अदृश्य कधी होणार असा प्रश्न पडतो. स्त्रीच्या लिखणामागे असलेले अनेक दबाव, अनेक काच हे खूपदा अनुच्चारित राहतात. स्त्री लेखनाचा वेगळा विचार म्हणूनच तर करावा लागतो!
   


(हा लेख 'कोरा कागद निळी शाई ' ह्या नंदिनी आत्मसिद्ध यांच्या पुस्तकात पूर्वप्रकाशित झालेला आहे.)


No photo description available.
नंदिनी आत्मसिद्ध   

तृप्ती खामकर

गेल्या काही वर्षांपासून “स्टँडअप कॉमेडी” हा प्रकार खूपच लोकप्रिय झालेला आहे. सुरूवातीला बहुधा पुरुषच हा प्रकार सादर करायचे, पण हळूहळू मुलींनीही या प्रकारात पाय रोवून उभे राहायला सुरुवात केली. या सगळ्या मुलींमध्ये ‘तृप्ती खामकर’ हे एक महत्त्वाचं नाव आहे. ‘फू बाई फू’ ह्या टीव्ही शो मध्ये देखील तिची निराळी चमक आपण पाहिली असेल. शिवाय ‘तुम्हारी सुलू’ ह्या चित्रपटात विद्या बालन, मानव कौल सारख्या कलाकरांच्या समोर टॅक्सी ड्रायव्हरच्या लहानशा भूमिकेत देखील तिने स्वत:चा ठसा उमटवला होता. “बाबा लगीन” हा तर तृप्तीचा प्रचंड गाजलेला परफॉर्मन्स आहे. एक महिला विनोदवीर म्हणून तिचा अनुभव समजून घेणं आम्हाला महत्त्वाचं वाटलं. या अंकासाठी मुक्ता खरेने तिच्याशी केलेल्या ह्या गप्पा...

आपल्याकडे विनोद निर्मितीची कला आहे, हे तुला कसं समजलं?


असं मला नक्की नाही आठवणार पण एक आहे की मला टायमिंग चं गिफ्ट मिळालेलं आहे. शिवाय मी १९९८ पासून अभिनय करत्ये. शिक्षण संपेपर्यंत माझ्याकडे थिएटर ची डिग्री तर होतीच शिवाय 7 वर्षांचा नाटकाचा अनुभव पण होता. त्यात सिरीयस नाटकं पण मी खूप केली आहेत. पण स्टँड अप कॉमेडी कशी सुरु झाली, तर एका ठराविक काळात मी डिप्रेस्ड होते आणि त्यासाठी महाग महाग औषधं पण घेत होते. अगदी जेवावंसं पण वाटायचं नाही. तेव्हा माझे काही मित्र स्टँडअप कॉमेडीअन्स होते.  करण तुलवर मला म्हणाला - तुझं टायमिंग एवढं चांगलं आहे, तर तुझं सगळं डिप्रेशन, राग ह्याबद्दल तू बोलायला पाहिजे. तो म्हणाला, कॉमेडी म्हणजे ट्रॅजेडी+टायमिंग! म्हणून मग मी लिहायला लागले आणि मग ते थेरप्युटिक व्हायला लागलं. मला माझ्या चुका समजत गेल्या, माझं सेल्फ एस्तीम वाढलं आणि आता तर मी अशा पॉइंटला आहे की रडून बिडून सगळं झालेलंय आणि मी अॅक्च्युअली प्रोफेशनल कॉमेडी करते.

तुझ्या कोणत्या टाईप च्या जोक्स ना कोणती लोकं जास्त हसतात?

माझं जे रीसेंट प्रेझेंटेशन आहे,' बाबा लगीन' त्यात मी किती होपलेसली सिंगल आहे त्याबद्दल बोलते. माझे सगळे जोक्स माझ्या पर्सनल लाईफ मधून येतात. त्यामुळे जनरली सगळ्याच टाईपची लोकं सगळ्याच जोक्स वर हसतात. काही लोकं सिंपथी म्हणून हसतात, काही माझ्यासारख्या सिंगल बाया खूप रीलेट होतात म्हणून हसतात तर काही मोठी माणसं nostalgic होऊन हसतात. पण मी बरेचदा नुसते बायकांचे शो पण करते. त्यात माझ्यापण हे लक्षात आलंय की मी स्वतः पण sexual जोक करताना फक्त बायका असतील तेव्हा जास्त कंफर्टेबल असते. आणि एकही पुरुष नाही म्हणून बायका देखील प्रचंड हसतात.

एखादा विनोद तुला आवडला पण लोकं हसलीच नाहीत तर कसं वाटतं?
असं कधी कधी होतं; पण तो प्रॅक्टिसचा भाग झाला. जेव्हा मी ओपन माईक सेशन करते तेव्हा असं होतं. ओपन माईकवर परफॉर्म करणं, एक जोक १०० वेळा वेगवेगळ्या तऱ्हेने करून बघणं, स्क्रिप्ट चे ड्राफ्ट बनवत राहणं, हाच सगळा रियाज असतो. मोठ्या ऑडीयन्स समोर नेण्याआधी एक जोक 4-5 वेगवेगळया प्रकारच्या लोकांसमोर खुप वेळा वेगवेगळया पद्धतीने घेऊन बघावा लागतो. मग तो जोक चालेल की नाही ते ठरवता येतं! त्यातूनच शिकता येतं. एक किस्सा सांगते तुला - एका शो मध्ये माझ्याबरोबर सई ताम्हणकर पण परफॉर्म करणार होती. प्रेक्षकांमध्ये पण ८० टक्के लोक सईलाच बघायला आले होते. आणि सईला बघून तर त्यांना वेड लागायचं बाकी होतं. सईचा परफॉर्मन्स झाला. मग माझा परफॉर्मन्स होता. पण सईच्या एक्झिट नंतर लोकांचा आरडा ओरडा सुरू झाला. 'सई पाहिजे, सई पाहिजे' असे आवाज यायला लागले. मला परफॉर्म करताच येईना. तेव्हा मी म्हंटलं - 'सई सारख्या मुली जगात 2 असतात. बाकी सगळ्या माझ्यासारख्या असतात.' - तेव्हा कुठे मुलींकडून रिस्पॉन्स येणं सुरू झालं आणि मला पुढे चांगलं परफॉर्म करता आलं.

कॉमेडियन च्या आयुष्यातल्या स्ट्रेस बद्दल काय सांगशील? 
एक फिमेल कॉमिक म्हणून मी तरी बायस फेस केलेला नाहीये. म्हणजे फक्त मी मुलगी आहे म्हणून मला शेवटचा स्लॉट दिला किंवा बोलूच दिलं नाही असं काही कधी झालं नाहीये. इतर मुलींना येणाऱ्या अनुभवांबद्दल मला नाही बोलता येणार. पण कधी कधी आपण ज्यांना मित्र समजतो अशा माणसांच्या कडून सुद्धा फार विचित्र अनुभव येतात.
मला एका मित्राने त्याच्या नाटकात एक रोल ऑफर केला. मला खरं म्हणजे ते करण्यात अजीबात इंटरेस्ट नव्हता. पण त्याने खूपच इंसिस्ट केलं. तो म्हणाला की तू नाही म्हणालीस तर मी डीप्रेस होईन. त्या दरम्यान मला सुद्धा क्लिनिकल डिप्रेशन होतं. त्यासाठी महाग महाग औषध घ्यावी लागायची. पण तरीसुद्धा मित्रासाठी म्हणून मी तयार झाले. मला माझ्याच खर्चाने तालमिसाठी दोन महिने पुण्यात राहावं लागणार होतं. त्यात तिथे जाऊन मला कळलं की माझा रोल तर फक्त एकच पानाचा आहे. मला खूप वाईट वाटलं खूप चीडचीड पण झाली. त्या टीम मधली लोकं मी डिप्रेशनची औषध घेत्ये, मला vulnerable वाटतंय हे लक्षात घ्यायचेच नाहीत. एकदा मी सलग १० दिवस जेवले नाही. पण तरी माझी कोणी साधी विचारपूस पण केली नाही. अशा वेळी मला माणसांच्या असंवेदनशीलपणाची कमाल वाटते.
तुला सेक्सीस्ट जोक्स बद्दल काय वाटतं? 
मला खरंच नाही कळत सेक्सिस्ट जोक काय असतो. आणि आजकाल तर हा इतका नाजूक विषय झालाय की नुस्तं - ‘आज भरपूर बायका आल्या आहेत’ - असं म्हटलं तरी ते सेक्सिस्ट वाटू शकतं. सध्या कॉमेडियन समोर हा खूप मोठा चॅलेंज आहे. मी जर का जोक म्हणून म्हणत असेन की बाई म्हणजे पायातली चप्पल असते तर त्यातला काँटेक्स्ट बघावा, असं मला वाटतं.
 तू स्वतःला फेमिनिस्ट मानतेस का? 
हो नक्कीच. आज बऱ्याच मुली फीमेल कॉमिक अशी ओळख करून दिली की ऑफेंड होतात. पण तुम्ही फिमेलच आहातच. तेव्हा फिमेल कॉमिक म्हंटलं तर काय झालं? मला स्युडो फेमिनिझम च खूप राग येतो. आपापल्या सोयीने समानता हवी असणाऱ्या लोकांना मी अजिबात सपोर्ट करत नाही.






स्त्रिया आणि विनोद - सत्तासंबंधाच्या शोधात

विनोद ही गंभीर गोष्ट आहे, हे वाक्य सकृतदर्शनी विनोदी वाटले तरी ते मूलतः गंभीरच आहे, ह्यात शंका नाही . चांगला, निर्विष, निर्मळ, निखळ विनोद करणे अनेक कारणांमुळे अतिशय अवघड असते. विनोद ही भाषिक कृती असते, पण ती व्यक्ती, वस्तू, घटना, प्रसंग इत्यादी माध्यमातून प्रगट होत असते. 'विनोद' ह्या संकल्पनेच्या अनंत व्याख्या करण्यात आल्या, पण अचूक व्याख्या करणे अवघड आहे. एकवेळ 'तत्त्वज्ञान' या संकल्पनेची व्याख्या होऊ शकते, पण विनोदाची व्याख्या जवळपास अशक्य होते.

विनोदाला अतिशय प्राचीन इतिहास आहे. मानवी संस्कृती आणि सभ्यतेत विनोद कधी निर्माण झाला, हे सांगणं कठीण आहे तसं हास्य कधी निर्माण झालं, हे सांगणही कठीण आहे. माणसाची व्याख्या 'हसणारा प्राणी' अशी केली जाते. हास्य हे मानवी वैशिष्ट्य आहे. केवळ माणूसच हसू शकतो, प्राणी हसू शकत नाहीत (प्राण्यांनी हसावे ही इच्छा बालसाहित्यात पूर्ण होते.)


मला आठवते, १९८२-८४ दरम्यान एमए करत असताना एकदा आम्ही वर्गमित्र लोणावळ्याला गेलो होतो. तिथे कुठल्यातरी बागेत एका पिंजऱ्यात एक बुटका माकडासारखा प्राणी होता. त्याला पाहताच हसू फुटत असे. नीट निरीक्षण केल्यावर लक्षात आले की त्याचा चेहऱ्याची ठेवणच माणसाला हसू फुटावे अशी निसर्गतः होती. म्हणजे त्याच्या चेहऱ्याचे स्नायू, गाल, ओठ, नाक, ओठ यांची रचनाच माणसाला हसवणारी होती. पण ते त्याच्या चेहऱ्यावरचे ते हास्य त्याच्यासाठी हास्य नव्हतेच, ते त्याचे भागदेय होते. तो प्राणी स्वतः हसतच नव्हता पण त्याला पाहाताच हसू माणसाला येत होते. ती त्याची नैसर्गिक ठेवण होती!

विनोद करणे आणि विनोदाचे समीक्षण चिंतन प्राचीन काळापासून होत आले आहे. भारतीय, ग्रीक आणि चीनी या तीन सभ्यतांमध्ये व संस्कृतींमध्ये जसा मोक्ष, मुक्ति विचार आढळतो तसा हास्य, विनोद यांचाही विचार आढळतो. ग्रीक कवी होमर (इ. स. पू. आठवे शतक) च्या मते माणूसच काय पण देवदेवताही विनोद करतात. भारतीय पुराणात नारद हे एकमेव पात्र विनोद, चेष्टा-मस्करी करताना आढळते. प्लेटो, अरिस्टोफेनीस, भरतमुनी (इ. स. पू. दुसरे शतक), अभिनवगुप्तपासून मराठीत चक्रधरांचे लीळाचरित्र, साहित्यसम्राट न. चि. केळकर, श्री. कृ. कोल्हटकर, राम गणेश गडकरी, गंगाधर गाडगीळ, पु. ल. देशपांडे, ग. त्र्यं. देशपांडे, वि. वि. बोकील, बाळ गाडगीळ, अ. वा. वर्टी, शि. गो. भावे, वा. ल. कुलकर्णी, दत्तू बांदेकर, जयंत दळवी, द. मा. मिरासदार, मुकुंद टाकसाळे ते भालचंद्र नेमाडे, समीक्षक गो. मा. पवार यांच्यासोबत सुशीला मराठे, सुशीला बापट, अपर्णा देशपांडे, मधुवंती सप्रे या कवयित्री आणि इंद्रायणी सावकार, दीपा गोवारीकर, पद्मजा फाटक, मंगला गोडबोले या तुलनेने अतिशय मोजक्या विनोदी लेखिका अशा अनेकांनी विनोदविषयक चिंतन-समीक्षा लेखन केले आहे. पुढे आजच्या दिवाळी अंकातील विविध लेखिका-लेखक असे चिंतन करीत आहेत.

'विनोद म्हणजे काय? ' पासून साधू, संत, महात्मे, प्रेषित विनोद करतात का ? 'टवाळा आवडे विनोद' हे खरेच खरे आहे का? ह्यावरही गंभीर चिंतन झालेले आहे. ह्या साऱ्या चिंतनाचे एक समान आशयसूत्र कोणते आहे? तर "विनोद निर्विष असावा, सुखात्म असावा!" 'विनोद करण्यातून कोणालाही दुखवू नये' हा विनोद निर्मितीचा आणि त्याची मजा घेण्याचा लसावि व मसावि आहे. लसावि व मसावि एकत्रित अपेक्षित असणारा 'विनोद' हा कदाचित एकमेव चिंतनप्रांत असावा, असे मला वाटते.

हास्य आणि विनोद

विद्यमान सभ्यता आणि संस्कृतीत विनोद आणि हास्य हे एकत्रित असणारे घटक मानले जातात. दोन्हीचा तोंडवळा एकसारखाच जुळा दिसत असला तरी त्यांच्यात फरक करणे व वेगळे करणे आवश्यक आहे असे मला वाटते. विनोद आणि हास्य दोन्हीचा तोंडवळा जुळा असल्याने हसणे म्हणजे विनोद असे समीकरण झाले आणि जे जे हास्याबद्द्ल मांडले गेले ते ते विनोदाबाबत स्वीकारले गेले, असे दिसते. त्यातून विनोद (humour/joke), उपहास/उपरोध (satire), विडंबन /गूढान्वय /व्याजस्तुती (Irony), थट्टा/चेष्टा/मस्करी (jest), हास्यविनोद (laughter), हास्यास्पद (ridiculous), कोटी (wit), विनोदात्मकता (comic) काळा विनोद किंवा कटुहास्य (black humor) इत्यादी हे सारे हास्याशी जोडले गेलेले शारीरिक आविष्कार प्रकार निर्माण झाले आणि ते सारेच्या सारे विनोदाचे प्रकार मानले गेले. या प्रत्येकाचे स्वरूप वेगवेगळ्या रीतीचे आहे. साहित्य, चित्रे, कला, नाटक, सर्कस, तमाशा, रोजचे बोलणे असा विविध रीतीने विनोद व हास्य व्यक्त होत असते. ह्या साऱ्या मानवी निर्मिती आहेत. भरताच्या नाट्यशास्त्रानुसार हास्य हा एक रस आहे. पण वास्तवातल्या हसण्याविषयी भरत काही सांगत नाही!
सुखदायक विनोद ही संकल्पना मान्य केली तर विनोदात क्रौर्य असतं का? विनोद क्रूर, हिंसक, घातक असतो का? असा प्रश्न उपस्थित करता येतो. हास्य हा मूळ रस असताना ते शस्त्र कसे बनले? शोषण, अन्याय, आंदोलन इत्यादिपेक्षा कुचेष्टा, खिल्ली उडवणे इत्यादीसाठी 'हास्य' हे शस्त्र म्हणून कायमच वापरले गेले. वास्तवात रोजच्या व्यवहारात असे क्रूर, हिंसक विनोद घडत असतात. विनोद कसा घडतो? त्याच्या आविष्कार पद्धती कोणत्या असतात? ह्या प्रश्नांप्रमाणेच क्रूर विनोद का घडतो? हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे, असे मला वाटते. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत क्रूर विनोद होतात तेव्हा ते का घडतात, हे शोधणे गरजेचे आहे. स्त्री आणि विनोद यांच्या संदर्भात सत्तासंबंध शोधताना एक शस्त्र म्हणून स्त्रियांच्या विरोधात विनोद प्राचीन कालपासूनच वापरले गेले आहे. तसे का झाले असावे?

स्त्रिया आणि विनोद हा विषय अतिशय गंभीर असूनही त्याचा उल्लेख झाला तरी तो विनोदाने घेतला जातो. स्त्रीची विनोदबुद्धी या विषयाबद्दलही विनोदानेच बोलले जाते. साहित्याच्या संदर्भात हा विषय अप्रशस्त मानला जातो. स्त्री आणि विनोद हा विषय प्रामुख्याने दोन पातळीवर चर्चिला जातो. एक त्यांचे वर्तन आणि त्यांच्या वर्तनाचे कथा, कविता, नाटक, कादंबरी इत्यादीतील त्यांचे पुरुष लेखकांनी केलेले चित्रण. पुरुषी लेखन अतिप्राचीन ते अतिआधुनिक काळात होत आलेले आहे. अतिआधुनिक काळात पुरुषांच्या लेखनाच्या जोडीने स्त्रीयांचे लेखनही होते आहे. त्यात विनोदी साहित्याचा समावेश आहे. पुरुषी लेखन अतिप्राचीन आहे तर स्त्री लेखन अतिआधुनिक आहे.

व्यक्तीचे वर्तन अतिशय खासगी ते अतिशय खुल्या सार्वजनिक अवकाशात घडत असते. हा अवकाश प्राचीन काळी स्त्रियांना उपलब्ध नव्हता. आधुनिक जीवनशैलीत तो उपलब्ध झाला आहे. नवरा-बायको, लिव्ह इन इत्यादी खासगी जीवन म्हणजे कुटुंब ते रोजची दैनंदिन कामे, रस्ता, कामाचे ठिकाण इत्यादी सार्वजनिक वर्तन ठिकाणी होणारे स्त्रियांचे वागणे हा विनोदाचा विषय बनवला जातो. त्यांच्याकडून होणारे किंवा केले जाणारे विनोद, त्यांना समजणारे विनोद आणि त्यांचे विनोदी वाटेल असे वर्तन यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतोच, पण स्त्री हाच विनोदाचा, उपहासाचा, चेष्टा-मस्करीचा विषय बनवून विनोदी, प्रहसनात्मक लेखन पुरुष लेखकांकडून केले जाते.

पुरुषांनी स्त्रियांबद्दल केलेल्या विनोदात बहुधा सत्तासंबंध असतो, असे लक्षात येते. हिंसा ही सत्ताप्राप्तीच्या प्रक्रियेत अंतर्निहित घटक म्हणून काम करते. विनोद जर सत्तासंबंध प्रस्थापित करणारी घटना ठरत असेल तर असे विनोद हिंसक मानले पाहिजेत. तसे झाले की विनोद निर्विष न ठरत विषारी व हिंसक बनतो.

प्राथमिक काळातील मानवी संस्कृतीत हास्य हे प्रथम विजयाचे प्रतिक मानले गेले होते. ते क्रूरता, युद्धातील विजय, त्यातील उन्माद यांचे प्रतिक होते. नंतर सौम्य स्वरुपात विनोदाशी जोडले गेले उत्क्रांतीच्या विकसनात हास्यातील क्रूरतेची बाजू पूर्ण गेली नाही आणि जाणारही नाही, पण विनोदातील क्रूरतेची बाजू जाऊ शकेल, असे मला वाटते. हसणं आणि त्या कृतीच्या वर्गातील दात विचकणं, तोंड वेंगाडणं, विकटता, छद्मपणा, सात मजली हास्य हे एकच असतं. हास्य व विनोद विषयक साधारणतः दोन ठळक विचारप्रवास दिसतात. वर्चस्ववादी विषमता आणि खुली स्वातंत्र्यवादी समता असे दोन प्रकार करता येतील.

हास्य-विनोदातील वर्चस्ववाद

स्त्रियांच्या बाबतीत हास्य आणि विनोद यांचा उपयोग मुख्यतः शस्त्र म्हणून वर्चस्ववादी वृत्तीतून होतो, असे दिसते.

होमर, प्लेटोपासून अनेकांनी हास्य-विनोदाविषयी चिकित्सक चिंतन केले आहे. त्यात अॅरिस्टॉटलचे मत महत्वाचे आहे, तो म्हणतो, " विनोद हा एक अपशब्द आहे, म्हणूनच इतरांना सांगताना तो हानिकारक होणार नाही, असे पाहिले पाहिजे. मध्ययुगीन काळात इंग्लिश तत्त्ववेत्ता थॉमस हॉब्ज (१५९८-१६७९) चे विचार प्रस्तुत विवेचनासाठी महत्वाचे आहेत. त्याच्या मते, माणसामध्ये एक 'मूलभूत आत्मश्रेष्ठत्वाची भावना' असते, तीच हास्याचे मूळ कारण आहे. हॉब्ज म्हणतो, "हास्याची प्रेरणा म्हणजे अन्य काही नाही तर स्वतःमधील भूतकालीन न्यूनत्वाशी किंवा इतरांमधील कमीपणाशी आपल्याला अचानक जाणीव होऊन त्यांच्याशी तुलना करण्याच्या प्रक्रियेतून अचानक उद्भवणाऱ्या स्वतःबद्दलची श्रेष्ठत्व भावना असते." अशा हसण्यामागे स्वतःतील चांगले शोधण्यापेक्षा नेहमीच इतरांचे दोष काढणे हाच माणसाचा मुख्यः हेतू असतो. हे नैतिकदृष्ट्या चूक आहे, म्हणूनच कोणत्याही चांगल्या माणसांचे योग्य काम म्हणजे इतरांना त्यांच्यातील उणेपण दूर करण्यासाठी मदत करणे, त्यांना आपल्या तिरस्कार भावनेतून मुक्त करणे आणि स्वतःची तुलना जे उत्तम आहे त्याच्याशीच करणे.

हॉब्जच्या मते, ज्याच्यात ही श्रेष्ठत्वभावना निर्माण होते त्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून विनोदाचा विषय झालेल्या इतर व्यक्तीत काहीतरी कमीपणा आहे, वैगुण्य आहे असे वाटत असते. म्हणून ती व्यक्ती स्वतःला श्रेष्ठ समजून अहंकाराचे हसते. 'स्वतःला श्रेष्ठ मानणे' हे माणसाचे स्वरूपच तो करत असलेल्या विनोदामागील मुख्य कारण इतरांना कमी लेखणे हेच असते असे हॉब्जला म्हणायचे आहे. हा हॉब्जचा 'श्रेष्ठत्व सिद्धांत' आहे. चार्ल्स बॉदलिएर हा विचारवंत ह्या प्रतिपादनाचा आधार घेऊन म्हणतो, "हास्य सैतानी असते. हास्य हा प्राण्यांपेक्षा उच्च असल्याची श्रेष्ठत्वाची भावना आणि आपण मर्त्य असल्याच्या जाणीवेमुळे निर्माण होणारी वैफल्यग्रस्तता यांचा आविष्कार आहे.

रेने देकार्त या आधुनिकतेचा जनक विचारवंताच्या मते आश्चर्य, प्रेम, सौम्य दुस्वास, इच्छा, आनंद, हर्ष आणि दुःख या सहापैकी तीन भावना हास्यात असतात. असे असले तरी इतरांविषयी तिरस्कार आणि हास्यास्पद भावना यांचा आविष्कार म्हणजे हास्य. स्टीफन लीकॉक या विसाव्या शतकातील लेखकाच्यामते, विनोदाचा उगम हाच मुळी शत्रूवर मिळालेल्या विजयाचा आनंद प्रकट करण्यातून झाला असावा. तो म्हणतो," विनोद म्हणजे प्रतिकूलतेवर मिळवलेल्या व्यक्तिगत विजयाने होणारा आनंद अथवा काही एक नष्ट झालेले अथवा आकारभ्रष्ट झालेले बघण्यात मिळणारा आनंद."

सिग्मंड फ्रॉईडने मनाचे कार्य उलगडत असताना विनोद, कोटी, विनोदात्मकता किंवा विनोदीवृत्ती यांचे स्पष्टीकरण दिले आहे. त्याच्या मते अबोध अहं, अर्धबोध अहं आणि पूर्णबोध असणारा अहं असे मनाचे तीन स्तर आहेत. अबोध अहं बालपणी मुक्त असतो. जसजसा माणूस मोठा होतो तसे त्याच्यावर अर्धबोध अहंचे नियंत्रण येते. कोणत्या प्रेरणा, भावना प्रगट करायच्या ते अर्धबोध मन ठरवते. पूर्णबोध मनाचे दोघांवर नियंत्रण असते. ही मनाची उच्च अवस्था असते, ते संस्कारित असते. माणूस अहंकारी असतो, याचा अर्थ तो अबोध अहंच्या पूर्ण नियंत्रणात आणि अर्धबोध अहंच्या अर्ध्या नियंत्रणात असतो. अबोध अहं तर केवळ सुख आणि सुखासाठी काहीही करायला तयार असतो, तो कोणतेही नैतिक, सामाजिक बंधन मानत नाही, त्याच्या आड येणारी सारी बंधने तोडून तो 'नागडा स्वसुख' वादी असतो. म्हणून माणूस मूलतः सुखवादी असतो आणि त्यातच त्याचा अहं अतिशय गुंतलेला असतो. पण अनेकदा अबोध मनावर बाह्यजगाचे, म्हणजे इतर लोकांचे, लोकनीतीचे, नियमांचे आक्रमण होत असते. सुखाला बाधा येते. त्या मनाचा तोल जातो, सुख हिरावले जाते. मग ते विनोदाकडे वळते. (संस्कृती, धर्म, नीती, कायदा इत्यादी पूर्णबोधात्मक मनाची निर्मिती असते) या अबोध मनाच्या रक्षणाचे शस्त्र म्हणजे विनोद असे फ्रॉईडचे मत आहे.

कामप्रेरणा, कामसुख किंवा अनुषंगिक इंद्रिय सुख हेच केवळ अबोध मनाचे एकमेवाद्वितीय उद्दिष्ट असते. पण ते सुख मिळाले नाही की दुःख निर्माण होते. पण अबोध मन हे नेहमी अर्धबोध आणि पूर्णबोधात्मक मनाच्या नियंत्रणात असल्याने उघडपणे ओरबाडून सुख घेऊ शकत नाही. त्यास्थितीत ते विनोद करून सुखभावनेचे रक्षण करते. विनोदापासून आनंद मिळवला जातो. हे अहंकाराचे रक्षण असते, असे रक्षण करणे ही फ्रॉईडच्या मते माणसातील मूलभूत प्रेरणा असते.('अहंकार जपणे' असे आपण बोलीभाषेत म्हणतो, त्याचा हाच अर्थ असतो.) ती अहंरक्षणाची प्रेरणा सहज साध्य झाली नाही की मूळ अबोधात्मक भरड मन कामप्रेरणेने लिप्त मनात आक्रमणाची उर्मी निर्माण होते. त्यातून उपहास आणि अश्लीलता यांची निर्मिती होते. अश्लीलता अबोध मनात जन्मते आणि विनोद पूर्णबोधात्मक मनात जन्मतो. अश्लीलता स्वरूपाने कामलिप्त असते, ती सतत उफाळून वर येत असतेच. पण तिला थेटपणे व्यक्त होण्याची परवानगी नसते. मग जणूकाही अर्धबोध मनाची परवानगी घेऊन त्याच्या नियंत्रणाखाली विनोदात मिसळली जाते आणि मग विनोद अश्लीलतेकडे झुकतो.

सिग्मंड फ्रॉईडने कामभावनेचे सविस्तर विवेचन केले आहे. त्याच्या मते, माणसात सुख मिळवण्याची मूलभूत प्रेरणा असते आणि ती मूलतः आक्रमक स्वरुपाचीच असते, सुखप्राप्ती झाली की मिळालेले सुख हिरावले जावू नये म्हणून ती प्रतिआक्रमक होते, म्हणजे मूलभूत प्रेरणा ही केवळ स्वतःचे सुखाचे व स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वापरली जाते. सत्तेचे स्वरूप मूलतः कामोपभोग हेच असते.

कामप्रेरणा अतृप्त राहिली की ती अश्लीलतेचे रूप धारण करते. त्याच्या मते अश्लीलता पुरुषी असते, म्हणून अश्लीलता नेहमी स्त्रीला उद्देशून असते. अश्लीलता म्हणजे सुप्त रुपात (दृश्य रुपात न केलेला) पण मानसिक पातळीवर केलेला बलात्कार असतो. जे शब्द अश्लील भावनेने उच्चारले जातात ते ज्यांचे सूचक असतात ते अवयव आणि तिच्याशी जोडलेली कृती समोर येत असते. अश्लीलतेमागे खरे तर 'लैंगिक अवयव' पाहण्याची-भोगण्याचीच इच्छा असते. एका अर्थाने अश्लील बोलणे, वागणे हे स्त्रीचे पुरुषाने केलेले नग्नीकरण असते.


स्त्रीचा मूळ उपयोग केवळ उपभोग हाच आहे, हे गृहीत धरले जात असले तरी अश्लीलता, त्यावर आधारलेले विनोद हे नातेसंबंधाचे स्वरूप महत्वाचे ठरते. पुरुषाकडून आई, बहिण, मुलगी आणि सून ही जवळची नाती आणि नंतरची आईशी समांतर मावशी, काकू, आजी, चुलत-मावस-आते इत्यादी बहिणी-पुतणी-सून इत्यादी. जसजसे हे नाते दूरचे होत जाते तसे त्या नात्यातील तीव्रता कमी होत जाते. म्हणजे पुरुषाला पत्नी वगळता आई, बहिण व सून यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करता येत नाहीत. त्याचवेळेस ज्याने असे संबंध प्रस्थापित केलेले असतात किंवा ज्यांच्या अशा संबंधामुळे पुरुषाचा (पर्यायाने स्त्रीचाही) जन्म झालेला असतो त्या आईवडिलांच्या लैंगिक संबंधाविषयी तो (किंवा ती) मौन बाळगतो/बाळगते.बहिण-मेव्हण्याच्या लैंगिक संबंधाविषयीही साधारणतः मौनाचे धोरण असते. सून-मुलगा यांच्याबाबत मात्र पुरुष काहीसा सभ्यतेची पातळी कमी करून, उघडपणे बोलू पाहातो.....कारण मुलगा जर 'कामाचा' नसला तर सून त्याला उपभोग्य होऊ शकते, उपलब्ध होऊ शकते. असेच उलट बाजूनेही घडते. स्त्रीला बाप, भाऊ व मुलगा यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करता येत नाहीत, पण जावई उपभोग्य होऊ शकतो, उपलब्ध होऊ शकतो. अर्थात अशा प्रकारच्या संबंधातून निर्माण होणाऱ्या अपत्याच्या नात्याबद्दल अनेक गुंतागुंती होतात. कोणताही पुरुष त्याच्या या स्त्री नातेवाईकांना मात्र त्यातून वगळतो. पण जिथे लैंगिक संबंध प्रस्थापित होऊ शकतात अशी नाती असतील तर तेथे विनोदाची शक्यता निर्माण होते. मामेबहीण, आतेभाऊ. चुलतभाऊ-चुलतबहिण, दीरभावजय इत्यादी. (ते काहीसे धर्मावर अवलंबून असते.) इथे लैंगिक संबंध सूचक विनोद घडू शकतात आणि इथे सत्तासंबंध अदृश्यपणे आपले अधिपत्य प्रस्थापित करतो.

विनोदाकडे आक्रमण, हल्ला करण्याचे साधन म्हणून पाहिले जाते, अशी मांडणी मराठीत केली ती प्रथम ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि प्र. के. अत्रे यांनी. कोल्हटकरांच्या मते, "विनोद हे एक शस्त्र असून त्याचा उपयोग स्वसंरक्षणापेक्षा इतरांच्या व्यंगाचा स्फोट करण्याचेच कमी विशेषेकरून होतो."

अत्रे म्हणतात, "पुरोगामी ललित लेखकांना विनोद हे आता एक अत्यंत सामर्थ्यवान शस्त्र उपलब्ध झाले आहे" ते अन्यत्र म्हणतात, " हास्याची उत्पत्ती प्रथम जी झाली ती विशुद्ध आनंदाच्या पोटी नाही. शत्रूवर विजय झाल्यावर त्या आनंदाचे प्रदर्शन करताना प्राथमिक अवस्थेतील मनुष्याने दिलेला हुंकार म्हणजे हास्य...उत्क्रांतीच्या ओघात हास्यविनोदाचे काटे झाडून गेले असले तरी ह्या मूळ हास्यात रानटी ओबडधोबडपणा, सुडाची भावना व क्रौर्याची तीव्रता होती. गळा दाबल्याने तडफडणाऱ्या शत्रूंचे हाल पाहून प्राथमिक माणसाला हसू येत असेल, तर आजच्या सुधारलेल्या जगात आपल्या प्रतिपक्षाला कोटीक्रमाने निरुत्तर झालेला पाहूनही आपल्याला हसू येते. विनोदजन्य हास्याचा प्राण उपहासच आहे."

पण पु.लं.ची विनोदाबाबतची भूमिका वेगळी होती. ते म्हणतात, 'वस्तऱ्याने गुळगुळीत हजामत केली पाहिजे, पण त्याने जखम मात्र होता कामा नये.''

स्त्री स्वभावातून निखळ विनोदनिर्मिती करणाचा मान पुरुषलेखकांमध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं. वि. जोशी हे आधीच्या पिढीतील लेखक आणि समकालीन लेखकात शि. द. फडणीस यांचा समावेश होतो. स्त्रियांमध्ये लक्ष्मीबाई टिळक, शकुंतला परांजपे व सई परांजपे यांचा असल्याचे गो. मा. पवार नमूद करतात. फडणीसांनी स्त्रीच्या अनेकांगी स्वभावाला आपल्या व्यंगचित्रांतून निखळ विनोदी पद्धतीने चितारलेले आहे. ते एके ठिकाणी म्हणतात, ‘‘तुम्ही स्त्रियांवरच विनोद का करता आणि मुखपृष्ठावर स्त्रियाच का, असे मला एकदा विचारण्यात आले होते. स्त्रियांच्या विनोदबुद्धीवर आणि खिलाडूपणावर माझा विश्वास आहे. त्या माझे अपराध पदरात घेतात, म्हणून स्त्रियांना पहिलं स्थान दिले आहे.’’

या साऱ्या विचारवंताचे विचार पाहाता त्यांचे विश्लेषण पुरुषप्रधान संस्कृतीच्या बाबतीत पहिले तर असे दिसेल की पुरुष नेहमीच स्वतःला श्रेष्ठ मानत आला आहे. पुरुष स्वतःला 'फर्स्ट सेक्स' समजतो आणि स्त्रियांना 'सेकंड सेक्स.' अर्थात 'स्वतःला शहाणे समजणे' ह्या गोष्टीसाठी इतरांना तुच्छ लेखणे हाच एक मार्ग नसतो. ज्ञान, नीती, समृद्धी, व्यवस्थापन, शिक्षण इत्यादी अनंत मार्ग असतात. हॉब्जच्या म्हणण्या नुसार – “ पुरुषाने आकस्मिक आत्मश्रेष्ठत्वाची प्रतीती इतरात काहीतरी कमी आहे, व्यंग आहे हे समजल्यामुळे स्वतःला श्रेष्ठ समजणे कितपत नैतिक आहे? आत्मश्रेष्ठत्व जाणवण्यासाठी इतरांचे व्यंग ओळखणे, त्यावर प्रहार करणे, ही अनिवार्य अट आहे का? तसे न होतही आपण स्वतःतील चांगलेपणा, उच्चता ओळखू शकतो ना ! मग ते मार्ग कोणते? ते शोधले पाहिजेत.

स्वातंत्र्यवादी समता विचार मांडायचा तर हे लक्षात घेतले पाहिजे की आक्रमक विनोद तर कधीही सुखावह नसतो. स्त्रीच्या बाबतीत तर तो कधीही असू शकत नाही, असे म्हणता येईल. याला अपवाद असूही शकेल पण मला तरी तो माहित नाही. उलट बाजूने स्त्रीकडून मात्र प्रतिआक्रमणास प्रतिबंध होऊ पाहातो.

गांधीजींचं हसणं हे मला नेहमीच गूढ वाटत आलं आहे. त्यांच्याइतके निर्मळ, सरळ हसू मला अजून कुठेही आढळलेलं नाही.

पण हे सगळे विश्लेषण किंवा असेच काही साहित्य वाचून, उमजून जर स्त्री-पुरुषांमधील विनोदच संपला तर त्यांचे नातेच संपेल. मग निष्कर्ष काय काढावा? विशेषतः स्त्रीवादी स्त्री किंवा पुरुषाबरोबर कोणते विनोद करावेत ? त्यांची चेष्टा करावी की नाही ? असे काही प्रश्न उपस्थित होतील? मग साधारण असे म्हणता येईल की कोणत्याही पुरुषाने आणि स्त्रीनेही सार्वजनिक ठिकाणी तरी हिंस्त्र कामुक विनोद टाळावेतच. आता, कामुक विनोद नवरा-बायकोत व्हावेत, ज्यांच्यात लैंगिक संबंध आहेत त्यांच्यातच व्हावेत, असे म्हणावे का? हाही प्रश्न आहेत, कारण स्त्रीवरचे विनोद, हिंस्त्रता घरगुतीतच तर असते ना ! मग उत्तेजक, कामुक विनोद कोणी, कुठे करावेत ? कारण ते उफाळून वर येत राहणार. विनोद हा जगण्याला दिलेला उत्तम प्रतिसाद आहे. पण कधी ? विनोद सहज साधा, निर्विष असेल तर.... तसा नसेल तर ... ???

संदर्भ :

१. John Morreall , Philosophy of Humor : the Stanford Encyclopedia of Philosophy (SEP) : https://plato.stanford.edu/entries/humor/

२. Aaron Smuts : Philosophy of Humor : The Internet Encyclopedia of Philosophy (IEP) (ISSN 2161-0002) : https://www.iep.utm.edu/humor/

३. गो.मा. पवार, "विनोदाचे तत्त्वज्ञान", विनोद: तत्त्व आणि स्वरूप, मौज प्रकाशन, पहिली आवृत्ती २१ डिसेंबर २००६, पान २७३, किंमत रु. २५०/-, ISBN 8174866116.

४. श्रीनिवास हेमाडे , "लैंगिकता – तात्त्विक आणि नैतिक परिप्रेक्ष्यातून" , कामस्वातंत्र्यपर्व, उद्याचा मराठवाडा, दिवाळी अंक २०१९, पान १४ ते २१, अतिथी संपादक : उत्पल व. बा. ,संपादक : राम शेवडीकर

Image may contain: 1 person
श्रीनिवास हेमाडे
तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि संगमनेर  येथे प्राध्यापक