अधुरी 'प्रेम' कहाणी

एक होतं ग्लोबल गाव. त्यात राहत हजारो मनुष्य प्राणी, 
त्या गावाला नव्हता कोणी एकच राजा आणि एकच राणी. 
तिथे घरोघरी नांदत होते एकेक राजाराणी. 
प्रत्येकाच्या दिलाची एकेक कहाणी, करी जीवाचं पाणीपाणी. 
तरी सगळेजण नेहमी गायचे प्रेमाची गाणी.
प्रेमासाठी वाट्टेल ते,प्रेमासाठी कायपण! - असं म्हणतम्हणत, 
होती ही माणसं जगत. 
तरी त्यांना सापडत नसे प्रेम, कारण सगळ्यांचं वागणं सेमसेम.
कितीही गायली प्रेमाची गाणी, तरी कधीकधी ओढवायची आणीबाणी.
ते सगळे मोठ्या उत्साहाने साजरा करत एक दिवस आणि तो म्हणजे प्रेमदिवस. ह्या प्रेमाच्या दिवशी; जरी सगळे एकमेकांना भेटवस्तू देत, तरी त्यांचं मन काही नव्हते भरत. सारखी कसलीतरी टोचणी लागून राहत असे, कशाची तरी कमतरता भासत असे.
एकदा सालाबाद प्रमाणे असाच प्रेमदिवस आला. प्रेमाचा आठवडा सुरू झाला, तशा सगळीकडे प्रेमाच्या पताका लागल्या, छानछान भेटवस्तू विकायला आल्या, हदयाच्या आकाराचे फुगे हवेत तरंगायला लागले, पण पुन्हा अदृश्य टाचणीने ते फुटू लागले. लाल रंगाचे गुलाब बाजारात आले, मात्र त्यांचे अदृश्य काटे टोचू लागले.
एके दिवशी काय झाले, प्रेमदेवता आकाशातून विहार करीत होत्या. तेव्हा त्यांना दिसले की ह्या गावात प्रेमाच्या नावाने उत्सव सुरू आहे. म्हणून त्या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी गावात उतरल्या. बघतात तर काय, सगळीकडे रंगीबेरंगी कपडे घातलेली, नटलेली, सजलेली माणसे फिरत होती – तरी कोणाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, समाधान नव्हते. 
प्रेमदेवतांनी माणसांची वागणूक जवळून बघायला सुरुवात केली. 
तर त्यांना काय दिसले? 
माणसे प्रेमाच्या नावाखाली एकमेकांना त्रास देत होती.
काही राजे प्रेम आहे म्हणून राणीच्या मागे-मागे जात, तिचा मोबाईल चेक करीत, तिची पर्स उघडून शोध घेत, आपल्याला आवडणारेच कपडे तिने घालावे म्हणून हट्ट करीत, राणीने आपल्या शिवाय इतर कुठल्याही राजाशी बोलू नये म्हणून तिला दटावत, आपल्या लाडक्या राणीशी मैत्री करणाऱ्या एखाद्या राजाला बदडून काढत. हेच आपलं तिच्यावरचं प्रेम आहे, असंही तिला सांगत! तिला इतर पुरुषांपासून दूर ठेवणं म्हणजेच तिचं संरक्षण करणं असंच प्रत्येक राजाला वाटे!
प्रत्येक राणीचीही अशीच तऱ्हा होती ! राजाची मर्जी मिळवायला प्रत्येक राणी प्रयत्न करत होती. त्याला चांगलंचुंगलं खायला घाले, त्याला आवडेल ते कपडे घाले, चेहऱ्यावर रंगरंगोटी करे, त्याने दिलेले दागिने अंगावर मिरवे. तीही त्याचं पाकीट तपासे, मोबाईल तपासे, तीही त्याच्या चौकश्या करे. आपल्या राजाला इतर बायकांपासून दूर ठेवलं तरच त्याचं आपल्यावरचं प्रेम शाबूत राहील – असं प्रत्येकीला वाटे!
राजा-राणी दोघंही अस्वस्थ असत, 
प्रेमाच्या शोधात फिरत, 
शब्दांच्या भोवऱ्यात भिरभिरत, 
देवाणघेवाणीच्या विळख्यात अडकत, 
तरी प्रेम कुणालाच नसे सापडत. 
‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असं कितीही वेळा म्हटलं तरी 
कोणाचाच कोणावर विश्वास नव्हता. स्वत:चा स्वत:वरही विश्वास नव्हता. एकमेकांवर संशय घेणे, हाच त्यांना आपल्या प्रेमाचा पुरावा वाटत होता. 
आपलं प्रेम आहे म्हणजे तरी काय आहे?
- हे कुणालाच समजत नव्हते.
हे सगळं पाहून प्रेमदेवता दु:खी झाल्या. 
ह्या माणसांना प्रेमाचा खरा अर्थ कसा समजावून द्यावा ते त्यांना कळेना!
मग त्यांनी एक युक्ती केली. 
त्यांनी एक संदेश बनवला आणि सगळ्यांच्या फोनमध्ये पाठवून दिला. प्रेमदेवतांनी म्हटलं होतं - 
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे, नुसतंच प्रेम नसतं. तुमचं आणि त्यांचं मुळीच सेम नसतं.”

हा संदेश वाचून सगळे चक्रावले ! हा जगावेगळा संदेश कोणी पाठवला, कुणाला समजेना. 
जो तो ज्याला त्याला विचारू लागला, जी ती जिला तिला विचारू लागली. 
पण कुणाला काहीच माहीत नव्हते. 
काहींना ती कसलीशी जाहिरात वाटली, काहींना ती नवी कविता वाटली, 
काहींना गंमत वाटली तर काहींना भीती वाटली.
 काहींनी तो संदेश डिलिट करून टाकला. 
पण काहींनी धीर करून त्या संदेशाला उलट प्रश्न केले , 
“प्रेम म्हणजे नक्की काय असतं?” 
“मला माझंमाझं प्रेम कसं मिळेल?” 
“माझं प्रेम मला कसं कळेल?”, 
“प्रेमासाठी काय करायला पाहिजे?”
 
प्रेमदेवतांना हे सगळे प्रश्न पाहून आनंद झाला. 
काही माणसांना तरी प्रेमाचा अर्थ समजून घ्यायची इच्छा आहे, ते पाहून त्या खूष झाल्या. 
मग त्यांनी उत्साहाने या नव्या प्रश्नांना उत्तरं द्यायला सुरुवात केली.
“प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे स्वातंत्र्य” 
“ खरं प्रेम हवं असेल, तर एकमेकांवर भरवसा ठेवा.” 
“ प्रेम म्हणजे मालकी हक्क नव्हे, प्रेम म्हणजे समर्पण नव्हे” 
“खरं प्रेम हवं असेल तर जातीपातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, लिंगभेदाच्या भिंती तोडा” 
“ प्रेम म्हणजे समतेचा विचार, प्रेम म्हणजे नाहीत गुलाब आणि हीऱ्यांचे अलंकार” 
“प्रेम म्हणजे जवळीक, प्रेम म्हणजे मोकळीक”

प्रेमदेवतांच्या अशा नव्यानव्या संदेशांनी सर्वांचे फोन भरून गेले. 
पण हे भलतेसलते संदेश पाहून प्रश्न विचारणारे मात्र भांबावून गेले. 
त्यांना ह्या संदेशांचा अर्थच लागेना. 
त्यांनी आपापल्या फोन कंपन्यांच्याकडे तक्रारी केल्या. 
प्रेमाच्या आठवड्यात ऐनवेळी असा गडबडघोटाळा होणं कुणालाच परवडणार नव्हतं, 
फोन कंपन्यांनी सगळे संदेश डिलिट करून टाकले. 
हे संदेश येतायत  कुठून, त्याचीही त्यांनी शोधाशोध सुरू केली. 
नवीन तंत्रज्ञान कामाला लावलं. पण कुणालाच ह्या विचित्र संदेशांचा माग काढता येईना. 
आपल्या साध्यासोप्या संदेशांमुळे असा काही गोंधळ उडेल यांची प्रेमदेवतांना कल्पनाच नव्हती. माणसांच्या नव्या तंत्रज्ञानाचा सामना करायचा असेल तर आपल्याला नवीन अस्त्र शोधायला पाहिजेत, माणसांना समजेल अंशी आणखी सोपी भाषा शिकायला पाहिजे – हे त्यांच्या लक्षात यायला लागलं. 
त्यासाठी पुढच्या वर्षी नवीन कुमक घेऊन परत यायचं ठरवून प्रेमदेवता आल्या तशा परत निघून गेल्या. 
पण काही माणसांच्या मनात त्यांनी पाठवलेले संदेश रुजले होते. 

ही माणसं आपापल्या प्रेमाच्या कल्पनेवर नव्याने विचार करायला लागली होती. 
त्यांच्या कुठल्याच प्रश्नांची पुरेशी उत्तरं मिळाली नाहीत, तरी नवीन प्रश्न त्यांच्या मनात उगवले होते. 
पुढच्या वर्षी प्रेमदेवता येतील तेव्हा त्यांना नव्या प्रकारच्या प्रेमाचे अंकुर पाहायला मिळतील का?   

वंदना खरे

संपादक, 'पुन्हास्त्रीउवाच'

प्रेमरंगी रंगता ...

प्रेम या विषयावर लेख ?
प्रेम हा विषय बोलण्याचा नसून 'पडण्याचा' आहे.
विचाराचा नसून उस्फूर्त भावनेचा आहे.
तर्क, नीती आणि नाती यांच्या शृंखलांनी प्रेमाला जखडण्याचा हा अट्टहास का ? - असे काहींना वाटेल. तर ज्यांना व्यवसाय करता आला नाही, ते जसे कलत्या तारूण्यामध्ये व्यवसाय मार्गदर्शन केंद्र चालवितात. तसाच हा प्रकार असावा, असेदेखील काहींना वाटेल. या दोन्ही शक्यता मनात ठेऊन, लेखाच्या अखेरपर्यंत पोचल्यावरच वाचकांनी त्याचा निर्णय करावा.
अगदी सुरुवातीलाच हे स्पष्ट करू या की, समाजात ‘प्रेमा’ला विरोध होतो किंवा त्यावरून जे वाद होतात, त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यात येणारे शारीरिक सबंध होय. त्याविषयी आपण नंतर बोलूच! युवक-युवतींना आपण कोणाला तरी आवडलो पाहिजे, आपले व्यक्तिमत्व आकर्षक असायला हवे - असे फार मनापासून वाटत असते. ते याच विवंचनेत असतात. म्हणूनच ते व्हॅलेंनटाईन डे सारख्या खास दिवसाची प्रतीक्षा करत असतात. बऱ्याचवेळा असं समजलं जातं की, प्रेमात पडणे किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमाचा विषय होणे हे दुसऱ्यामुळे घडणाऱ्या बाबी आहेत. यात तुम्हांला कोणीतरी प्रेमवस्तू म्हणून ‘पिक अप’ करतं. म्हणजे इथं तुम्ही काहीच कृती करत नाही,तर तुम्हांला एक वस्तू मानले जाते. हीच तर आजची खरी मेख आहे. खरंतर प्रेम म्हणजे मानवी सबंधाचा अमूर्त आशय आहे. प्रेम म्हणजे दुकानातील आकर्षक वस्तू उचलण्याचा प्रकार नाही. पण नेमकी हीच गोष्ट आजकाल नजरेआड होतांना दिसते. कारण समाजात मार्केटचे मोठं प्राबल्य आहे. तुम्ही एक मार्केटेबल वस्तू म्हणून तयार होता. त्यासाठी जिम् पासून ब्युटीपार्लर्स पर्यंत विविध गोष्टींची मदत घेतली जाते. “प्रेमासाठी काहीपण” या भावनेने मारामारीसारखी अनेक साहसेसुद्धा केली जातात.
त्याचे मूळ आपल्याला दिसते मुख्यतः सिनेमामधून किंवा तशाच प्रकारच्या कथा-कादंबऱ्यातून. कारण प्रेम आणि सिनेमा यांचे आधुनिक भारतीय सांस्कृतिक जीवनात अविभाज्य असे स्थान निर्माण झाले आहे. इतके की, जीवनात प्रेमाचा प्रवेश हा कोणत्यातरी चित्रपटाच्या प्रतिमांमधूनच होतो. प्रत्यक्ष जीवनात जे धाडस आपण करूच शकत नाही; जे सुखसमाधान, प्रेयसी-प्रियकर आणि प्रेम यांची आपण कल्पनादेखील केली नसेल, ते सर्व भारतीय युवक-युवतींना सिनेमा देत आला आहे. म्हणूनच भारतीय सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटात पडत नसून चित्रपटांतील प्रतिमांचे प्रतिबिंब समाजात पडताना दिसते.
आपल्याला चित्रपटसृष्टीने इतके ‘नीट’पणाने शिकविले आहे की, प्रेम हे ‘उस्फूर्तपणे’ येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यासारखे किंवा वीजेसारखे असते. भारतीय चित्रपटसंगीतामध्ये प्रेम या विषयावर जेवढे काव्य आणि संगीत निर्माण झाले, तेवढे जगात कुठेही झाले नाही. त्या काव्याने आणि संगीताने भारताच्या किमान ४ पिढ्यांची आयुष्ये मोहरून गेली. भारतीय तरूण-तरूणींना प्रेम व्यक्त करण्याची भाषा चित्रपटातील संवादांनी आणि गीतांनी दिली. पोशाख आणि स्टाईल दिली. इतकेच काय आत्मप्रतिमा दिली. प्रेम करताना मुले देव आनंद-शम्मी कपूर-धर्मेंद्र-राजेश खन्ना-अमीरखान-शाहरूखखान बनू लागली. तर मुली नूतन-शर्मिला-वहिदा-नंदा-माधुरी-काजोल-करीना- कतरिना इत्यादी बनल्या.
स्त्रियांना टोकाचे दुय्यम स्थान देणाऱ्या भारतीय समाजात मुलींना प्रेम करण्याचा अधिकार आहे, हे निदान बोलले जाऊ लागले. मुला-मुलींनी आपल्या मताने प्रेम करणे, श्रीमंती-प्रतिष्ठा यांच्या पलिकडे जाऊन विवाहाचे निर्णय घेणे आणि प्रसंगी कुटुंबातील वरिष्ठांचा विरोध पत्करून ते निभावणे ह्याला किमान स्वीकारार्हता या सिनेमांनी मिळवून दिली.प्रेमात काव्य-संगीत हळुवार भावना, एकमेकांच्या भावना जपणे यांबाबत पुराणातील देवादिकांची पात्रे वगळता कोणालाच अधिकार नव्हता. आधुनिक सिनेमा-नाट्यांतून या गोष्टी सामान्यांनी देखील करण्यायोग्य आहेत, अशा ढाँचा रूढ झाला. ही बाब निश्चितच खरी आहे.
या चित्राची दुसरी बाजू
परंतु सिनेमा व्यवसायाच्या सोयीसाठी प्रेमिक हे साधारणतः तरूण, सुंदर आकर्षक असे दाखविणे हे भागच असते. परंतु त्यातून एक नवा साचा तयार झाला. एक म्हणजे, प्रेम हे फक्त तरूणांनीच करावे. ते सुंदर, स्मार्ट, बलवान, प्रमाणबद्ध शरीराचेच असले पाहिजेत. दुसरे म्हणजे प्रेम हे जणूकाही प्रथमदर्शनी आणि जीवनात एकदाच होते. प्रथम प्रेमाचे संबंध फाटले तर जीवनात दुसरे काहीच उरत नाही. जीवन म्हणजे फक्त विराण बाभळीचे काटेरी झाड बनते. प्रेम होताना बहुतेक वेळा मुलांनी मुलींच्या सहनशक्तीच्या पलिकडे जाऊन त्यांनी कितीही विरोध केला तरी, अगदी थोबाडीत मारली तरीही त्यांना सतावणे ह्या सर्व प्रेमाच्या प्रथम पायऱ्या आहेत. मुलींचा असा विऱोध गंभीरपणाने घ्यायचा नाही. उलट तो होकाराचाच आविष्कार असतो – अशा कल्पना रूढ झाल्या!
सिनेमातील अशा प्रतिमांमध्ये स्वतःला पाहून मोठ्या न्यूनगंडाची शिकार झालेल्या युवक-युवती लाखोंनी सापडतील. दुसरीकडे पडद्यावर प्रेमाबद्दलची अत्यंत उदात्त भाष्ये आणि त्याग करणारे नायक-नायिका दिसूनदेखील प्रत्यक्ष जीवनात जाती-पातींची-रूढींची बंधने तोडणारी युगुले अगदी अपवादानेच निघाली. असे धाडसी प्रेमविवाह दाखविणारे सिनेमे पाहूनदेखील ९९.९९ टक्के विवाह परंपरागत रूढींमध्येच बंदिस्त राहिले. हेदेखील वास्तव आहे.
 

त्यामुळे मग प्रश्न तयार होतो की, या प्रेमाची ओळख काय ? 

प्रेम आणि मैत्री यांच्यात खरोखर भेद आणि दरी असते काय ? 


आपण मानवी संबंधांच्या मुळापासूनच सुरुवात करू.मानवी संबंधांचे वर्गीकरण अनेक प्रकारे होऊ शकते. काही संबंध कार्यात्मक-सामाजिक-आर्थिक असतात. जसे विक्रेता-ग्राहक, मालक-नोकर, शिक्षक-विद्यार्थी, नेता-अनुयायी, डॉक्टर-रूग्ण,वकील-पक्षकार इत्यादी. काही संबंध हे रक्ताच्या नात्याने तयार होतात. जसे माता-पिता आणि त्यांची अपत्ये. बंधू-भगिनी इत्यादी.तर पती-पत्नी सारखे काही संबंध जाणीवपूर्वक निर्माण केलेले कायदेशीर संबंध असतात.
आपण जेंव्हा एखाद्याशी मैत्री किंवा प्रेमाचे संबंध असल्याचे सांगतो, तेंव्हा ते वरीलप्रमाणे एखाद्या संबंधांच्या प्रकाराचे नाव नसते. कारण पण प्रेमसंबंध हा मानवी संबंधांचा असा कार्यात्मक-सामाजिक 'प्रकार' नाही. मैत्र आणि प्रेम हा मानवी संबंधांचा अमूर्त आशय आहे. ती जगाशी जोडले जाण्याची एक दृष्टी आहे. रीती आहे. कारण प्रेम आणि मैत्रभाव हा मानवी संबंधाच्या कोणत्याही प्रकारात उपस्थित असू अथवा नसूदेखील शकतो.आणि असलाच तर तो कमी किंवा जास्त होऊ शकतो.

प्रेम ही माणसाची अस्तित्वजन्य गरज
प्राण्यांना भवतालाची जाणीव म्हणजे आपले भक्ष्य, संभाव्य धोके,समागमाची संधी इत्यादी जाणीवाअसतात, तशा मनुष्यालाही असतातच. अन्न, जीवसुरक्षा, लैंगिक संबंधांची इच्छा या नैसर्गिक आवेग,भावना किंवा सहज प्रेरणादेखील इतर प्राण्यांप्रमाणेच मनुष्यालादेखील असतात. पण त्या सहजप्रेरणांचा मानवी आविष्कार अत्यंत सर्जनशील असतो. उदाहरणार्थ, लैंगिक इच्छा प्राणी आणि मानवाला दोघांनाही असतात. पण माणसे आपल्या प्रिय व्यक्तिला वश करण्यासाठी अनेक उपक्रम-साहसे-कारस्थाने आणि गाणी कविता अशा नवनव्या निर्मितीदेखील करत राहतात. त्याबाबतच्या निराशेतून सर्व शरीरक्षमता असूनदेखील कदाचित् सर्वस्वाचा त्याग करून संन्यासदेखील घेण्यापर्यंत देखील पोचतात.
इतर प्राण्यांपेक्षा माणसाचे वेगळेपण असे की, माणसाला भवतालासोबतच स्वतःचीदेखील स्वतंत्र अशी जाणीव असते. दोन पायांवर चालण्यामुळे मोकळे राहणारे दोन हात आणि त्या हातांना स्वतंत्रपणे वापरता येतील असे असणारे अंगठे यामुळे, तसेच बुद्धीच्या क्षमतेमुळे तो कित्येक प्रकारची साधने-हत्यारे निर्माण करतो. वस्तूंची निर्मिती करतो. नव्या सामाजिक संस्थारचना तयार करतो. म्हणजेच त्यातून तो खरे तर निसर्गनिर्मित परिस्थितीपेक्षा वेगळा असा स्वतःचा वेगळाच भवताल निर्माण करतो. इतर प्राण्यांचे कळप हे केवळ सहजप्रेरणांनुसारच वर्तन करत असल्याने त्यातील गुंतागुंत आणि बदल हे अत्यंत मर्यादित आणि थेट शरीराशीच जोडलेले असतात. पण मनुष्याचे तसे नाही. माणसाचे वर्तन पूर्णतः नैसर्गिक सहजप्रेरणांनुसार ठरत नाही. त्याच्या वर्तनामध्ये स्वनिर्मित मूल्यांची भूमिका महत्त्वाची असते. माणसे एकमेकांशी केवळ वैयक्तिक नव्हे, तर संस्थात्मक परिचयाने बांधली जातात. इतरांशी अर्थपूर्ण रीतीने अनुबंधित राहणे ही त्याची मूलभूत गरज बनते. मानवी संबंध हे अशा अर्थाने सामाजिक संबंध बनतात.
मानवी संबंधांच्या आणि रचनांच्या या 'निसर्गा'मध्ये आपल्याला प्रेमाचा शोध घ्यायचा आहे. हे जोडले जाणे कसे घडते, हा कळीचा प्रश्न आहे. म्हणजे जगाशी-माणसांशी जोडले जाण्याऐवेजी जगाविषयी पूर्ण नावड किंवा नकारात्मकता मनात ठेवून जर एखाद्या प्रतीकाला मूर्तीला, धर्मपोथीला शरण जावून होते का ? तसेच स्वतःला नाकारून, केवळ समूहाला शरण जाण्यातून होते की स्वतःच्या शक्ती आणि मर्यादा यांचा आनंदी स्वीकार करत समाजाशी जोडले जाणे होते? थोडक्यात मानवी स्वातंत्र्याचा, आनंदाचा बळी देऊन समाजाचा अनुबंध मिळविला जातो काय? हे पाहिले पाहिजे. प्रसिद्ध सामाजिक विचारवंत एरिक फ्रॉम यांच्या मते , प्रेममयता हा उत्पादक-मानवी आणि आनंदी असा पर्याय ठरतो. तर उर्वरित पर्याय हे विध्वंसक आणि अंतिमतः मनुष्यत्व नाकारणारे ठरतात.
माझ्या मते प्रेसंबंधामध्ये पुढील गोष्टी असतात. अर्थात् प्रेमाच्या विशिष्ट संबंधांमध्ये यातील काही घटकांचे प्रमाण कमी जास्त असू शकते.
  • सक्तीचा अभाव आणि स्वेच्छेने असणारा भावनिक-मानसिक अनुबंध (पैसा-मालमत्ता-नोकरी-व्यापार-अन्य भौतिक घटक इत्यादीनिरपेक्ष ),
  • दुसऱ्याच्या सहवासातून मिळणारा आनंद आणि समाधान आणि त्यामुळे त्यासाठी असणारी इच्छा,
  • दुसऱ्याचे व्यक्तित्व किंवा विचार-भावना या आपल्या भावजीवनाचा सहजपणे -आपोआप अपरिहार्यपणे भाग बनत जाणे, दुसऱ्याशिवाय एक प्रकारची आंतरिक अपूर्णता जाणविणे,
  • परस्परांचा गुणदोषांसहित आदर व आनंदाने स्वीकार. (याचा अर्थ दुसऱ्यामधील बदलासाठी प्रयत्न न करणे असा मात्र नाही.)
  • दुसऱ्याचे स्वतंत्र व्यक्तित्व आणि स्वातंत्र्य शाबूत ठेवून दुसऱ्याच्या कल्याणाबाबत जबाबदारीची भावना.
प्रेम नेमके काय आहे ?

प्रेम म्हणजे फक्त एखाद्या विशिष्ट व्यक्तिशी असणारा संबंध नाही. जो मनुष्य माझे केवळ एकाच व्यक्तीवर प्रेम आहे आणि इतर गोष्टींची मात्र नावड आहे; असे म्हणतो - तो खरे तर संबंधित व्यक्ति किंवा वस्तूबद्दलची केवळ स्वामित्वभावनाच व्यक्त करत असतो. तो खरे म्हणजे, प्रेमाबद्दल नव्हे तर स्वतःच्याच विस्तारित अहंकाराबद्दल बोलत असतो.
प्रेम ही निष्क्रिय शरणतेची किंवा ताबा गाजविण्याची बाब नसून सक्रिय अनुभवाची प्रक्रिया आहे. प्रेमात साध्य आणि साधने या दोन्ही भूमिका भिन्न नसतात. याचा अर्थ प्रेमसंबंधाला कार्यात्मकता असते, पणे ते कार्यात्मक नसतात. ते लैंगिक असू शकतात पण तो फक्त लैंगिक उपभोग नसतो. तो मानवी संबंधांचा सहज परंतु अपरिहार्य असा टप्पा असतो. प्रेमसंबंधांना भौतिकता असते, पण ते भौतिकतेच्या मर्यादा पार करतात. त्यांना सामाजिकता असते, पण समाज त्यांना आपल्या चौकटीत बांधू शकत नाही. प्रेम ही काही जीवांनी भिन्नत्वात राहूनदेखील साधलेली प्रवाही विकसनशील तादात्म्यता असते. जिथे एक अधिक एक मोठा एकक होतो. पण पुन्हा पहिले एक वेगवेगळ्या आकारात उरतातच. प्रेम हे जिवांचे विझणे किंवा विलीन होणे नसते.


प्रसिध्द विचारवंत तत्त्वज्ञ कर्कग्राड म्हणतो, “ प्रेमामध्ये जिच्यावर प्रेम केले ती व्यक्ति नव्हे, तर प्रेम करणारी व्यक्तीच बदलून जाते.”
फ्रेंच तत्त्वज्ञ जीऑं पॉल सार्त्र म्हणतो. ‘प्रेमामध्ये एक अधिक एक चे उत्तर एक हेच असते’.
ईशावास्य उपनिषदामधील शांतिमंत्र आहे - ओम् पूर्णम् अदः पूर्णम् इदम् । हे पूर्ण आहे... ते देखील पूर्णच आहे.पूर्णात् पूर्णम् उदच्च्यते। पूर्णातून पूर्ण निर्माण होते. पूर्णस्य पूर्णम् आदाय । पूर्णाने पूर्ण दिल्यानंतर पुन्हा पूर्णच शिल्लक राहते.
प्रेमाचे अनेक आविष्कार समाजात आपण अनुभवतो. जसे माता-पिता आणि त्यांची लहान अपत्ये यांच्यामध्ये प्रेम हे जैविक असते. ते समान परिस्थितीत असलेल्यांमधील नसते.निदान बाल्यावस्थेत ते एकतर्फीच, निरपवाद-निरपेक्ष विनाअट असते.बालकाचा संपूर्ण स्वीकार ही त्याची पूर्व अट असते. बंधू किंवा भगिनी प्रेम हे समान परिस्थितीत असलेल्यांमधील सार्वत्रिक स्वरूपाच्या प्रेमाचा आविष्कार आहे. त्यामध्ये आपण सर्व एक आहोत. अशी सर्वसाधारण भावना असते. देशप्रेम हे बंधू-भगिनीप्रेमाचा अधिक व्यापक आणि अमूर्त असा आविष्कार आहे. त्यामध्ये आपला भवताल, निसर्ग, परिसर त्यातील संस्था-संस्कृती या सर्वसाधारण घटकांशी असणारा भावनिक-मानसिक अनुबंध व्यक्त होतो.

लिंगभावी किंवा वैषयिक प्रेम

प्रौढ स्त्रीपुरूष प्रेमसंबंध हेच नेहमीच चर्चेत येतात. नीती अनिती यांच्या निकषावर समर्थनाचे किंवा विरोधाचे विषय होतात. याची कारणे म्हणजे एक तर त्यामध्ये लैंगिक संबंधांची शक्यता असते. त्यातून विवाह-अपत्यजन्म-कुटुंब इत्यादी सर्व मालिका निर्माण होते. LGBTQ प्रकारामधील संबंध हे देखील वादाचे विषय होऊ शकतात. पण त्याचा स्वतंत्र विचार येथे विस्तारभयास्तव केलेला नाही.
वयात आलेल्या युवक-युवतींपासून पुढील वयातील सर्व स्त्री-पुरुष संबंध हे मुळात कळत्या वयातील व्यक्तिंमधील संबंध आहेत.पण असा कोणताही संबंध परस्परांवर परिणाम करणारा असतो. त्यामुळे दुसऱ्याची बुद्धी-ज्ञान- गुण-स्वभाव या सर्वांचाच दुसऱ्यावर प्रभाव असतो. हे संबंध जितके सातत्याचे-जवळचे होत जातात, तसतसे ते अपरिहार्यपणे अधिकाधिक व्यक्तित्वाच्या सर्वांगांना व्यापणारे होत जातात. शारीरिकता आणि लैंगिकता हे मानवी संबंधांचे अविभाज्य-सलग असे पैलू आहेत. मग या मानवी संबंधांतून शरीर का आणि कसे वेगळे करणार ? आपण अगदी औपचारिक संबंधांमध्य़ेदेखील हस्तांदोलन करतो. थोड्या परिचयानंतर टाळ्या देतो. खांद्यावर हात ठेवतो. अधिक परिचयानंतर मित्रांना क्षणभर मिठीदेखील मारतो. तेथे लैंगिकता नसली तरी शारीरिकता असतेच.

प्रेम की मैत्री -एक कृत्रिम द्वंद्व

'आमच्यात फक्त मैत्री आहे प्रेम नाही'. ही वाक्ये सर्रास कथांमध्ये-सिनेमांमध्ये वापरली जातात. खरे तर एक ढाल म्हणून किंवा कोणाला तरी नकार देण्यासाठीचा संवाद म्हणून. दोन मित्रांमध्ये किंवा दोन मैत्रिणींमध्येदेखील प्रेमाशिवाय मैत्री कशी असू शकेल? मग तीच बाब मित्र-मैत्रिण या संबंधाला अपवाद कशी करणार ? लैंगिकता आणि शारीरिकता ही एक काल्पनिक लक्ष्मणरेषा मानून त्याच्या संदर्भानेच प्रेम की फक्त मैत्री ? असे काल्पनिक विकल्प निर्माण करणे ही शुद्ध फसवणूक आहे किंवा दमन आहे. जणू काही प्रेमात मैत्री नसतेच आणि मैत्रीत प्रेम नसते.
जर लैंगिकता आणि शारीरिक जवळीकीच्या मर्यादा या सामाजिक अपरिहार्यता म्हणून मान्यच कराव्या लागत असतील, तर तसे स्पष्ट म्हणावे आणि कराव्या. परंतु रक्तसंबंधांच्या पलिकडील स्त्री-पुरूष संबंधांमध्ये लैंगिकता-शारीरिकता म्हणजे पाप समजणे किंवा तशी सामाजिक मान्यता असणाऱ्या संबंधांनाच केवळ प्रेम म्हणावे, ही सामाजिक सोयीसाठी केलेली वैचारिक वंचना आहे. प्रेम आणि मैत्री या शब्दांचा दुरूपयोग आहे.
शिवाय लैंगिकता म्हणजे निव्वळ शारीरीकता नव्हे. ती आपल्या सर्व व्यक्तित्वाला व्यापून असते.खरे तर कोणताही मानवी व्यवहार हा निव्वळ मानसिक किंवा शारीरिक किंवा भौतिक नसतो. जसे आपले अन्न –वस्तू उपभोग-निवास-विहार इत्यादी सर्व काही. या प्रत्येक गरजांमध्ये भौतिकते बरोबरच तिच्याही पार जाणाऱ्या सामाजिक,मानसिक,सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटकांचा प्रभाव असतो. लैंगिकता ही त्याला अपवाद असूच शकत नाही.
थोडक्यात वैषयिक किंवा लैंगिक संबंधांची शक्यता ही अपवित्र किंवा एखाद्या हिंसेइतकी अनैतिक किंवा पाप मानून सर्व प्रौढ स्त्रीपुरूष संबंधांना त्याज्य किंवा अनैतिक ठरविणे एका बाजूस ; तर दुसरीकडे शरीरसंबंधानाच केवळ सुखाचे साधन समजून त्यामागे पिसाटासारखे धावणे किंवा प्रेमाचा पुरावा मानणे हे दोन्ही दृष्टिकोन एकाच खोट्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही चूक आणि अमानुष आहेत. उदाहरणार्थ युवक युवतींना देशाचा राजकीय प्रमुख निवडण्याचा अधिकार असला, तरी स्वतःच्या जीवनाचा जोडीदार निवडण्याचा अधिकार मात्र नसतो. त्यामुळे जाती,कुळे, गोत्रे,घराने की इज्जत अशा प्रतिष्ठेच्या संकल्पना यातून जे जमेल तेच विवाह संबंध असे मानले जाते. त्यामुळे युवक युवतींचे कल-प्रेम-निवड यांना काडीचीही किंमत बहुतेक भारतीय कुटुंबात नसते. त्यामध्ये तर आता लव्ह जिहाद इत्यादी द्वेषपूर्ण राजकीय विषारी प्रचारामुळे तर परिस्थिती कुटुंबांच्याही बाहेरील घटकांच्या हाती जाते आहे.
असेच दुसरे उदाहरण म्हणजे विवाहित स्त्री पुरूषांना मित्र -मैत्रिणी असता कामा नयेत; असे मानले जाते! खास करून स्त्रियांना मित्र असणे म्हणजे तर महापापच. मानवी संबंधांच्या गुंतागुंतीला नाकारून तसेच शरीराला, मनाला नाकारण्यातून भारतीय विवाहसंस्था बळकट होते हा भ्रम आहे. कारण कोणत्याही सामाजिक संस्थांची निर्मिती ही माणसाच्या कल्याणासाठी,आनंदासाठी झालेली आहे. माणूस आणि त्याचा दीर्घकालीन आनंद हे साध्य आहे, संस्था या केवळ साधनमात्र आहेत. जर साधने हा साध्यच नष्टच करू लागली, तर अशी साधने सुधारणे किंवा बदलणे हाच शहाणपणा ठरतो. म्हणूनच कुटुंबसंस्था असो की विवाह संस्था, व्यक्तीविकास असो की सामाजिक विकास, या सर्वांचा विचार वरील अंगांनी आणि मूल्यांच्याच आधारावर व्हायला हवा. नव्या अधिक मानवी, विकसनशील समाजासाठी सर्वच प्रस्थापित संस्थांचा आणि समाजमूल्यांचा पुनर्विचार करायलाच हवा.




अजित अभ्यंकर

मार्क्सवादी नेते आणि अर्थतज्ञ

बुरखा, हिजाब आणि त्या पालिकडचं बरंच काही ...

“Just for a piece of cloth, they are ruining our education” – हे शब्द आहेत, बिबी मुस्कानचे ! ही तीच मुलगी आहे, जिने अतिशय निडरपणाने ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देत तिच्या अंगावर धावून येणाऱ्या भगव्या टोळक्याशी मुकाबला केला होता! 

वेगवेगळ्या चॅनलवर मुस्कानच्या आणि तिच्यासारख्या मुलींच्या मुलाखती बघताना मला आजवर भेटलेल्या अनेक मुस्लिम मुली आठवत राहिल्या. काहीजणी शहरातल्या तर काही खेडेगावातल्या. काहीजणी रंगीबेरंगी बुरखे अभिमानाने मिरवणाऱ्या तर काहीजणी नाईलाजाने काळया बुरख्याशी समझौता करणाऱ्या होत्या. अगदी मुंबईतल्या मुंबईत सुद्धा वेगवेगळ्या आर्थिक वर्गातल्या आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या मुस्लिम मुलींची हिजाब आणि नकाब विषयी वेगवेगळी मतं आणि अनुभव दिसले. कारण आपल्याला वाटतं तसा मुस्लिम समाज एकसंध नाहीये. अनेक मुस्लिम कुटुंबातून मुलींच्या कपड्यांवर कोणतीच विशेष बंधनं नव्हती. पण काहीजणीना बंडखोरी करून बुरखा नाकारायला लागला होता. उलट काहीजणी आवर्जून बुरखा वापरणाऱ्या होत्या तर काहीजणी घरून निघताना बुरखा घालत पण ट्रेनमध्ये बसल्यावर त्याच बुरख्याला बॅगमध्ये बंदिस्त करून ठेवत! काहीजणी सलवारकुडत्यावरची ओढणी डोक्याभोवती लपेटून घेणाऱ्याही होत्या. पण लहानपणी मला जेव्हा अगदी 3-4 वर्ष वयाच्या मुस्लिम मुलीदेखील बुरख्यात दिसायच्या; तेव्हा बुरखा, चादर, हिजाब असे काही फरक माहिती देखील नव्हते. फक्त बुरखा घातलेली बाई दिसली की,तिला किती उकडत असेल – या विचाराने, “अरेरे! बिचारी..” असं मनात यायचं. जसजशी ह्या मुलींशी ओळख वाढत गेली, काहीजणींशी मैत्री होत गेली – तसतसं बुरखा, रिढा, निकाब, हिजाब यातला फरक समजत गेला. हिजाब बांधायला शिकले, कधीतरी बुरखासुद्धा घालून बघितला - तेव्हा लक्षात आलं की लांबून बघताना वाटतं तितकं काही बुरख्याच्या आतमध्ये गुदमरल्यासारखं वाटत नाही! त्या अनुभवानंतर बुरखा/ हिजाब वापरणाऱ्या मुस्लिम बायकांकडे ‘अरेरे बिच्चारी’ म्हणून बघण्याचा दृष्टिकोन देखील हळूहळू बदलत गेला. जसं माझ्या कुटुंबातल्या आई, काकू, मावशी अशा माझ्या मागच्या पिढीतल्या बायकांना जन्मभर फक्त साडी नेसण्यात काही गैरसोय वाटत नाही – तसंच अनेक मुस्लिम महिलांना देखील बुरखा वापरण्यात देखील काही गैरसोय वाटत नसेल – ही शक्यता लक्षात यायला लागली. तसंच ख्रिश्चन नन्सचा पोशाख देखील बुरख्याशी मिळताजुळता आहे, हे देखील लक्षात आलं. जालना,यवतमाळ सारख्या मुस्लिमबहुल भागात बुरखा आणि हिजाब वापरणाऱ्या मुली देखील बालविवाहासारख्या जटिल समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करताना बघितल्या. शिवाय हिजाब किंवा बुरखा वापरण्यामागे फक्त धार्मिकच कारणं नसतात – हे देखील हळूहळू कळत गेलं.

पण खासकरून 90 च्या दशकातल्या दंगलीनंतर मुंबईतल्या अनेक मुस्लिम बायका नव्याने बुरखा किंवा हिजाब वापरायला लागल्या होत्या. नंतर एका प्रोजेक्ट मध्ये काम करताना, मुस्लिम महिलांशी फोकस ग्रुप डिस्कशन केली तेव्हा त्यांच्याशी या विषयावर बोलायला मिळालं. अनेकजणी म्हणाल्या की, हिजाबमुळे त्यांना सार्वजनिक ठिकाणी जास्त सुरक्षित आणि comfortable वाटत असे. जर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर आपल्या ह्या आयडेंटिटीमुळे आपल्याला चटकन मदत मिळू शकते – अशी त्यांची भावना होती. खरंतर बाई कुठल्याही धर्माची असली तरी सर्वच बायकांना सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या शरीराची रखवालदारी करायच्या ताणाखाली वावरावे लागते. रेल्वे स्टेशन्स, बसेस अशा ठिकाणी वावरताना देखील स्त्रिया सतत धास्तावलेल्या असतात. कुठल्या क्षणी आपल्या ढुंगणाला चिमटा काढला जाईल किंवा सीटच्या फटीतून बोटे खुपसून छातीला हात लावला जाईल याची सतत काळजी करावी लागते. रोखून पहाणाऱ्या हावरट नजरा अस्वस्थ करतात, आपली ओढणी किंवा पदर ठीकठाक आहे ना; याची कायम खात्री करावी लागते. नजरेने बलात्कार करू पहाणाऱ्या पुरुषांच्या समोरून अदृश्य व्हावं अशी इच्छा मलादेखील होत असते. त्यामुळे बुरख्याच्या आतमध्ये सुरक्षित वाटू शकतं – हे मला चटकन समजलं!
नंतर कधीतरी वेगवेगळ्या देशातल्या मुस्लिम बायकांचे बुरखा आणि हिजाब विषयीचे विचार ऐकले, वाचले – तेव्हा लक्षात आलं की बुरखा हे फक्त पितृसत्तेने केलेल्या दमनाचं प्रतीक नाहीये. जगभरातल्या बायकांनी इतिहासात वेगवेगळ्या काळात ते निरनिराळ्या गोष्टींचं प्रतीक म्हणून कधी आपलंसं केलंय तर कधी झिडकारलेलं आहे. थोडक्यात, ऐतिहासिक काळापासून मुस्लिम बाईने स्वत:चं शरीर कधी, किती आणि कसं झाकावं त्यावर धर्माशिवाय इतरही सामाजिक घडामोडींचा प्रभाव राहिला आहे.
सध्या डोकं झाकण्यासाठी म्हणजे हिजाब म्हणून वापरण्यात येणाऱ्या वावभर कपड्याच्या तुकड्यावरून देशभरात जे वादंग सुरू आहे; तेदेखील असंच बहुपदरी आहे. कर्नाटकातल्या उडुपी मधल्या एका कॉलेजात काही मुस्लिम मुलींना हिजाब घालून वर्गात बसायला अचानक बंदी करण्यात आली. त्यानंतर हे लोण इतर अनेक जिल्ह्यातल्या कॉलेजेस् मध्ये पसरलं. त्यातल्या पक्षीय राजकारणाचा संबंध उघडच होता. हिजाब विरुद्ध भगवे स्कार्फ असा हा वाद चिघळत गेल्यावर कर्नाटक सरकारने आता 18 फेब्रुवारी पर्यन्त कॉलेजेस् बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे. या वादामध्ये ज्या मुलींना त्रास झाला, त्या हिजाब घालण्याच्या हक्कावर ठाम असल्याचं पाहून बहुतेक गैरमुस्लिम लोकांना खूप आश्चर्य वाटतं आहे. बुरखा घालणं ही पितृसत्तेची निशाणी असताना सुद्धा कॉलेजात जाणाऱ्या तरुण मुलींना तो “Choice” कसा काय वाटू शकतो, असा प्रश्न अनेकजण विचारताहेत. त्यातच काही ठिकाणी “पहले हिजाब, फिर किताब” अशी होर्डिंग लावली गेली आहेत. त्यामुळे तर हा जणूकाही धार्मिक निर्बंध विरुद्ध शिक्षण एवढाच वाद आहे की काय, असं वातावरण तयार झालं आहे. ज्या मुस्कानने ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देत थयथयाट करणाऱ्या मुलांना ‘अल्ला हो अकबर’ असं उत्तर दिलं – तिने ‘जय संविधान’ म्हणायला हवं होतं – असे सल्ले देखील देण्यात आले आहेत! खरं म्हणजे गुंडांनी घेरल्या गेलेल्या एका विशीतल्या मुलीने इतकं प्रसंगावधान दाखवलं आणि ती धैर्याने कॉलेजमध्ये पोचली – हेच किती कौतुकास्पद आहे. पण अनेक channels वरती चर्चेत भाग घेणाऱ्या मुस्लिम महिलांना ‘ तुम्ही शिक्षण निवडणार की धर्म?’ असा पेचात पकडणारा प्रश्न देखील विचारण्यात आला. त्याचवेळी हिजाब किंवा बुरख्याचा धर्माशी काही संबंध नाही – असंही काहीजण ठासून सांगत आहेत. पण ‘हिजाब’ देखील ‘कुंकू, मंगळसूत्रा’ सारखंच एक सांस्कृतिक दडपण म्हणून काम करतं, हे मात्र आपण विसरतो आहोत.
कधी हैदराबाद मधल्या कॉलेजमध्ये मुलींच्या कुडत्याची लांबी मोजली जाते, तर कधी मराठवाड्यातल्या छोट्या शहरांमध्ये हिंदू मुलींनी स्कार्फने चेहरा झाकू नये यासाठी मोठाली बॅनर्स लावली जातात, तालेबानी लोक मुस्लिम महिलांनी ‘चादर’घेतली पाहिजे म्हणून सक्ती करतात, त्याच्या उलट पॅरिस सारख्या शहरात मुस्लिम महिलांना बुरखा वापरायला कायद्याने बंदी केली जाते; हरयाणातले गुज्जर लोक आपल्या जातीतल्या मुलींनी जीन्स घालू नये असा नियम करतात, अगदी कॅनडामधला पोलिस अधिकारीदेखिल तिथल्या महिलांना बलात्कार टाळण्यासाठी – ‘स्लटसारखे’- कपडे घालू नका असे आवाहन करतो –त्याच्या या शेरेबाजीवर प्रतिक्रिया म्हणून जगभर ‘स्लट वॉक’ ची मोहीम उघडण्यात आली होती! त्यालाही आता बराच काळ उलटून गेला – पण अजूनही जगात सगळीकडे बायकांनी घालण्याचे कपडे हा विषय पुन्हापुन्हा चर्चेचे आणि निर्बंधाचेही कारण ठरतच असतो. तुमच्या हिजाबविरुद्ध आमचे भगवे स्कार्फ ही तुलना म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद आहे. अशीच दहशत ख्रिसमसच्या वेळी देखील दाखवण्यात आली होती. 

पण वेषभूषेवर घातलेल्या मर्यादा खरंतर, एकूणच ‘बाई’ म्हणून जगताना त्यांच्यावर असलेल्या वेगवेगळ्या मर्यादांचे एक दृश्यरूप असतात! अशा नियंत्रणाच्या आडून विशिष्ट कुटूंबाचा, वस्तीचा, जातीचा, धर्माचा किंवा अगदी देशाचाही मान-सन्मान (खरेतर दुराभिमान) याबद्दलचे राजकारण काम करीत असते! बायकांना त्या राजकरणातलं प्यादं म्हणून वापरलं जात असतं. आज डोक्यावरचा हिजाब वादाचा केंद्रबिंदू आहे परवा कपाळावरची बिंदी अशाच वादासाठी वापरली होती तर काही दिवसांनी त्या जागी गळ्यातला क्रॉस देखील असू शकतो! म्हणून अशा दहशतवादाला विरोध करायचा असेल तर तो केवळ बुरखा,जीन्स किंवा स्कर्टपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. हिजाब की किताब अशा पेचात अडकून देखील चालणार नाही. Bulli Bai किंवा Sulli deal सारखी app येत रहातात, तेव्हा हिजाब हाच आधार वाटू शकतो, म्हणजे पितृसत्तेने तयार केलेल्या अडथळ्यांच्या विरोधात पितृसत्तेने लादलेल्या प्रतिकांचाच आधार घ्यायची वेळ येते. ही वस्तुस्थिती लक्षात ठेवायला लागेल. सर्वच धर्माच्या आणि कुठलाच धर्म न मानणाऱ्या महिलांसाठी सुद्धा सुरक्षित वातावरण निर्माण करणं – हा उपाय कितीही दूरवरचा वाटला तरी तो अमलात आणायची जबाबदारी आपल्याला सर्वांनाच घ्यावी लागेल.    

 वंदना खरे 
संपादक , पुन्हास्त्रीउवाच

फिरभी... हम साथ साथ है

तो फॅक्टरीत एक रासायनिक प्रक्रिया करत होता. अचानक स्फोट झाला आणि त्याची शुद्ध हरपली. त्यानंतर अनेक शस्त्रक्रिया आणि उपचारांच्या दुष्टचक्रातून तो जेव्हा बाहेर पडला, तेव्हा त्याच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेल्याचं त्याला समजलं. अभ्यास, बुद्धीबळ आणि निसर्ग यांचा मेळ साधत जगणाऱ्या कौस्तुभला, आयुष्याच्या या भयंकर चालीवर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार होती. तो धैर्याने आपली चाल खेळला आणि त्याने नियतीला शह दिला आणि स्वतःच्या शर्तींवर पुन्हा स्वतःला उभं केलं. यात त्याला खंबीर साथ मिळाली ती ऋजुताची! त्या दोघांच्या प्रेमाची ही आगळी कहाणी.
पुण्यात शिक्षण घेताना ऋजुता आणि कौस्तुभ निसर्ग जाणून घेत होते. अनेक गटांबरोबर जंगलात फिरणं, पशु-पक्ष्यांचं निरीक्षण करणं, एकत्र डोंगर चढणं, नद्या-समुद्राचं संगीत ऐकणं - यातूनच दोघांच्या मनात एकमेकांबद्दल ओढ निर्माण झाली. ही ओढ मैत्रीत आणि मग हीच मैत्री प्रेमात बदलली. या नव्या नात्याला दोन वर्षं होत नाही, तोच कौस्तुभचा अपघात झाला. त्याने आपलं गुंतणं बाजूला सारलं आणि तिला सांगितलं की एका अंध माणसाबरोबर तिने संपूर्ण आयुष्य घालवणं योग्य नाही. ऋजुतानेही विचारासाठी वेळ घेतला. लग्न तर नंतरची बाब असते; पण आत्ता एकमेकांवर असलेल्या प्रेमाचं काय करायचं? पुढे न्यायचं की नाही? असा प्रश्न तिच्यासमोर होता. तिने निर्णय मनाशी पक्का केला; “हा माणूसच मुळात आपल्याला खूप आवडतोय. आवडणाऱ्या माणसाला केवळ अंधत्व आलं, म्हणून आपण त्याला आपल्यापासून दूर करू शकत नाही.” असा सांगोपांग विचार करून झाल्यावर, इतर कोणाला काही सांगण्याआधी तिने आईबाबांशी बोलण्याचं ठरवलं.
ऋजुताचे बाबा लहान मुलांचे डॉक्टर आहेत, तर आई गतीमंद मुलांची शाळा चालवते. ऋजुताचं म्हणणं ऐकल्यावर त्यांनीही विचार करण्यासाठी वेळ घेतला आणि मग, तिच्या निर्णयात तिच्याबरोबरीनं उभे राहिले. कौस्तुभच्या घरून देखील तिला पाठिंबा मिळाला. आजही कौस्तुभ आणि ऋजुता त्यांच्या दोन्ही मुलींच्या सहित कौस्तुभच्या आईबाबांसोबत राहतात.
“जीवन भरभरून जगण्यासाठी प्रगल्भ विचार असणाऱ्या साथीदाराची गरज असते. कौस्तुभ अंध झाल्यावरही त्याच्या विचारांमुळे मला अजूनही प्रेमात पाडत असतो.” ऋजुता कौस्तुभबद्दल भरभरून बोलते.
कौस्तुभला ऋजुताच्या निर्णयाबद्दल काय वाटलं होतं?
तो म्हणतो, ‘आधी डोळसपणा अनुभवल्यामुळे, अचानक आलेलं अंधत्व थोडं त्रासदायी होतं. पण त्याचा मी डोळसपणे स्वीकार केला आणि माझ्या प्रयत्नांना ऋजुताने भक्कम पाठिंबा दिला.लग्न झाल्यावर प्रत्येक जोडप्याच्या प्राधान्यक्रमांमध्ये फरक पडतोच. लग्नानंतरची ७-८ वर्षं एकमेकांना जाणून घेऊन, समजून घेत मित्र-मैत्रिणीसारखी गेली. पण आईबाबा म्हणून बढती मिळाली आणि मग सर्व काही मुलींसाठी अशी चार वर्षं गेली. आता पुन्हा आम्ही एकत्र वाचन, डोंगरावर फिरणं, तिचा मुलींसोबतचा एकटीचा वेळ, माझा मुलींसोबतचा एकट्याचा वेळ, आम्हा दोघांचा आईबाबा म्हणून मुलींसोबतचा एकत्र वेळ असा आराखडा जमतोय. मुलींनी लहानपणा पासून बाबाला अंध पाहिलेलं आहे. त्यांना वेगळं काही शिकवावं लागलं नाही. 

पण ह्या दोघांच्या जोडीकडे पाहण्याचा 
लोकांचा दृष्टीकोन कसा होता?
कौस्तुभ स्पष्टच म्हणतो, “लोक बहुतेकदा थेट विचारत नाहीत, पण त्यांच्या बोलण्याची ढब न बोललेलं व्यक्त करत असते. सुशिक्षितांना हे अधिक नीट जमतं. तर अशिक्षित मंडळी मनातलं रांगड्या शब्दात सरळ बोलून दाखवतात. मला बिच्चारा वगैरे म्हणतातच. आणि ऋजुताला हा निर्णय का बरं घ्यावा लागला असेल? याचेही अंदाज लावत बसतात. बऱ्याचदा फिरायला गेल्यावर मला निसर्ग डोळ्याने अनुभवता येणार नाही, याबद्दल ऋजुताला काय वाटतं? असं आडून विचारलं जातं. पण या कोणत्याही प्रकारच्या प्रश्नांना मी आणि ऋजुता हसून टाळतो. कारण नेहमी सोबत असलेल्यांना माझ्या अंधत्वापेक्षा कर्तृत्वाची माहिती आहे.”

 एकमेकांबरोबरचं नातं स्पष्ट करताना ऋतुजा म्हणते, “पती-पत्नीच्या नात्यात विश्वास आणि प्रेम याला खूप महत्त्व आहे. आम्ही दोघं जेव्हा जोडीनं वावरतो तेव्हा लोकांच्या दयार्द्र नजरा मला अधूनमधून झेलाव्या लागतात. पण शक्य असेल तिथे लोकांशी मोकळेपणे बोलून त्यांचा दृष्टीकोनात बदल करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. बऱ्याचदा कौस्तुभ अंध असल्यामुळे तो सर्वच बाबतीत माझ्यावर अवलंबून असेल असं लोकांना वाटतं. पण खरंतर तो फॅक्टरीत लक्ष घालणं,शेअरमार्केटिंग करणं अशी व्यावसायिक कामं करतो. मी लेखिका आहे. मी कामानिमित्त बाहेर गेले की, मुलींना गोष्टी सांगणं, त्यांना एकट्यानं सांभाळणं, अशी घरगुती कामंही करतो. खरं तर,आईपणाचे सोहळेसुद्धा मी कौस्तुभमुळेच अनुभवतेय. 
लग्नाच्या काही वर्षांनंतर जेव्हा मुलं होऊ देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा दिवस राहीनात. वैद्यकिय उपचार सुरू झाले. या काळात मला प्रचंड नैराश्य आलं होतं. एक वेळ अशी होती की, मी मूल नकोच असं म्हणत होते. तेव्हा कौस्तुभने आय.व्ही.एफ या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याबाबत माझं मन वळवलं. जर याचा फायदा नाही झाला तर, आपण पुन्हा या गोष्टीचा विचारही करायचा नाही, असंही आम्ही ठरवलं. त्यामुळे मी स्वतःला सावरलं, उपचार घेतले आणि मग लग्नानंतर 9 वर्षांनी आम्ही जुळ्या मुलींचे आईबाबा झालो. त्या काळातले माझे मूड स्विंग्स कौस्तुभने प्रेमाने हाताळले. मला सकारात्मक ठेवणं, माझ्या तब्येतीची काळजी घेणं हे सर्व त्यानं मनापासून केलं.”
ऋजुता आणि कौस्तुभशी गप्पा मारल्यावर मनापासून जाणवतं, ते म्हणजे दोघांनी एकमेकांचा डोळसपणे केलेला स्वीकार. हेच अंधत्व कौस्तुभला लग्नानंतर आलं असतं तर ? कदाचित तो ऋजुताला ‘माझं अंधत्व लक्षात घेऊन नात्याचा पुनर्विचार कर’ असं ठामपणे सांगू शकला असता का? किंवा कौस्तुभने जरी सुचवलं असतं तरी ऋजुताला तसा विचार करणं शक्य झालं असतं का? पण दोघांनी नात्याचा सर्वांगीण विचार केला आणि मग निर्णय घेतला. यामुळे निसर्गाच्या साथीने आणि साक्षीने ती दोघं निसर्गाच्या कुशीत गेली 14 वर्ष आपला संसार फुलवत आहेत. प्रेम, विश्वास आणि विचारांची भक्कम साथ असेल तर नातं कसं बहरू शकतं याचं उदाहरण म्हणजे ऋजुता-कौस्तुभ हे जोडपं आहे.


अनुजा संखे

अपंग व्यक्तींचे संघर्ष, त्यांच्या यशोगाथा, त्यांचे योगदान आणि त्यांना समाजाकडून मिळालेली मदत असे विविध मुद्दे ' अपूर्णांकांची बेरीज 'या सदरात वाचायला मिळणार आहेत

निराश करणारा आशावादी सिनेमा


सध्या पुष्पा : द राईज (पार्ट १) या चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. कोविडचे निर्बंध असताना देखील एकूण चार भाषेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट लोकांनी थिएटर्समध्ये जाऊन बघितला. शिवाय अनेकांनी Amazon prime ला सुद्धा बघितलाच! ह्या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, असं दिसतंय. चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांनी तर नुसता कल्ला केला आहे. पुष्पाच्या ट्रेंडींग गाण्यावर आणि डायलॉगवर रील्स बनवण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता आलेला नाही. डेव्हिड वॉर्नर पासून ते हार्दिक पांड्या पर्यंत सर्वांनी या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत. यावरूनच पुष्पाच्या लोकप्रियतेने किती मोठं टोक गाठलंय ते लक्षात येतं.
एक साधा लाकूड तोडणारा मजूर ते लालचंदनाचं स्मगलिंग करणाऱ्या टोळीचा प्रमुख असा प्रवास दाखवणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकात खरंतर काहीच नाविन्य नाहीये. तरीही प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलंय. याचं कारण म्हणजे यातले डायलॉग, हाणामारी आणि गाणी – हे असेल का? की अशक्यतेला शक्यतेत बदलवणारी फँटसीच पुष्पाच्या यशाचं खरं गमक असावं? कारण कुठल्याच पुरुषाला वास्तवात जे शक्य नाही ते फक्त पडद्यावरील पुष्पा शक्य करून दाखवतो.
पुष्पा (अल्लू अर्जुन) हा या चित्रपटाचा नायक. तो वंचित घटकांचं प्रतिनिधित्व करतो. जाती-वर्गनिहाय त्याचं समाजातलं स्थान अत्यंत गौण आहे. पण त्याला सन्मान हवा आहे. खरंतर तो प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे पण तो मिळवण्यासाठीही काही लोकांना संघर्ष करावा लागतो. आपलं स्थान बदलण्यासाठी त्याने केलेला हा संघर्ष सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा आहे. एकाच वेळी पन्नास-साठ गुंडांना पळवून लावणं, आपल्या प्रत्येक शत्रूला पुरून उरणं, प्रत्येक डाव शिताफीनं शत्रूवरच उलटवणं, अशा सगळ्या आघाडीवर त्याला स्वतःची हुशारी आणि कर्तबगारी सिद्ध करावी लागते. शिवाय, स्त्रीयांसाठी तर आपण एखाद्या मसीहापेक्षा कमी नाही, ही अधिकची जबाबदारीही पेलावी लागते!
नायकाकडे जे गुण हवेत ते सगळे असूनही पुष्पाला चित्रपटात एका वर्गाकडून मान्यता मिळते; मात्र एका वर्गाकडून त्याची सतत हेटाळणी होत राहते. कारण, या समाजात राहायचं तर तुमच्याकडे एक ब्रँड हवा. हा ब्रँड तुम्ही समाजातल्या कुठल्या स्तरात आणि कुणाच्या पोटी जन्म घेतला आहे यावरून ठरतो. पुष्पाची कमजोरी हीच आहे की, त्याच्याकडे असा ब्रँड नाही. तो अनौरस मुलगा आहे. त्याच्या नावामागे त्याच्या बापाचे नाव नाही. त्याचे सावत्र भाऊ त्याला आपल्या रक्ताचा, नात्याचा मानत नाहीत. या गोष्टीची त्यालाही मनापासून खंतच आहे, म्हणून तर पन्नास गुंडांना अंगावर घेणारा पुष्पा या एका मुद्द्यावर मात्र तोंड पाडून बसतो. तो येनकेन प्रकारेण पैसा मिळवण्यात तर यशस्वी होतो. पण सन्मान? याबाबतीत मात्र शेवटपर्यंत त्याचा संघर्ष संपत नाही. पुष्पाची ही कमजोरी प्रत्येकवेळी त्याच्यावर मात करते. तो या कमजोरीशी लढायला आता सिद्ध झाल्याचं शेवटी तरी दिसतंय. पण अजूनही बापाचं नाव नसलं तरी आपल्याकडे आई आहे, असं मात्र तो म्हणत नाहीये.
कुणाशीही पंगा घेण्यात पुढाकार घेणारा, ‘मै झुकेगा नही साला’ म्हणून ताठ उभा राहणारा पुष्पा प्रेमाच्या आणि प्रेयसी श्रीवल्लीच्या बाबतीत मात्र कमालीचा हळवा आहे. प्रेम ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यातही पुरुषाने प्रेम करणाऱ्या स्त्रीला जर सुरक्षा दिली नाही, आपलं नाव दिलं नाही - तर तिची अवस्था काय होते याचं जिवंत उदाहरण स्वत:च्या आईच्या रुपात त्याने पाहिलेलं आहे. त्यामुळे आपल्या प्रेयसीला प्रोटेक्ट करण्यात कुठेच कमी पडायचं नाही, हे चलेंज त्याने आपसूक स्वीकारलेलं आहे. स्वप्नातला राजकुमार या अभिजात कॅटेगरीत बसण्यास तो अगदी सक्षम आहे.
श्रीवल्लीच्या एका नजरेसाठी पुष्पा तरसत असतो. त्याची ही तडफड बघवत नाही म्हणून त्याचा मित्र श्रीवल्लीच्या मैत्रीणीना सांगतो की, तुम्हाला एक हजार रुपये देतो पण एकदा श्रीवल्लीला पुष्पाकडे पाहून एक स्माईल द्यायला सांगा. एक हजार मिळत असतील तर एक स्माईल द्यायला काय हरकत आहे? – असं मैत्रिणींना वाटतं. पण श्रीवल्लिला काही हे पटत नाही. मैत्रिणींनी एक हजार रुपये घेतलेले असतात. म्हणून मैत्रिणीच्या दबावामुळे ती त्याच्याकडे पाहून स्माईल द्यायला तयार होते. तिने स्माईल देताच पुष्पाचं धाडस वाढतं आणि तो तिला विचारतो, ‘मी आवडतो म्हणूनच तू मला पाहून हसली ना?’ असं विचारताच ती आपल्या हसण्यामागचं खरं कारण सांगते. ती प्रेमासाठी नव्हे तर पैशामुळे हसल्याचं कळतं तेव्हा तो थोडा दुखावला जातो. मग तो एका पप्पीच्या बदल्यात तिला पाच हजार देण्याचे आमिष दाखवतो. पुन्हा एकदा मैत्रिणी तिला भरीस घालून त्याच्याकडे आणतात, पण श्रीवल्लीला हा सौदा मंजूर नसल्याने ती रडून तिथून निघून जाते. आपण केलेल्या या आचरटपणाचा पुष्पाला थोडादेखील पश्चाताप नाहीये. प्रेमात पैसा ओतावा लागतो या समजूत त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेली दिसते जी आणखी निराश करणारी आहे. ‘पप्पीसाठी हिचा नवरा व्हायचा असेल तरी हरकत नाही’, असे म्हणत तो श्रीवल्लीशी लग्न करण्याचे निश्चित करतो. सगळीकडे ‘मै झुकेगा नही साला’ म्हणणारा पुष्पा श्रीवल्लीच्या बाबतीत ‘मै झुकनेको तैय्यार है’ म्हणतो.
“मै शादी के बाद अपने पती को ही चुम्मी देगी,” म्हणून रडणाऱ्या श्रीवल्लीसाठी अब्रू हीच एक मोठी कमजोरी आहे. तिच्या समोर त्याशिवाय दुसरी कुठलीच टास्क नाही. तिला एक्स्ट्रऑर्डीनरी ठरण्यासाठी सिनेमात फक्त हेच काम करायचं आहे. समाजात वावरताना स्त्रियांना सतत काचेचं भांडं जपण्याची काळजी बाळगतच जगावं लागतं. दुर्दैवाने चित्रपटाच्या नायिकेलाही यातून सूट मिळत नाही. जिथे ती कमजोर पडेल तिथे तिचा नायक तिचा संरक्षक म्हणून उभा राहीलच. शिवाय तो सेक्सी आयटमसॉन्ग मध्ये नाचूनही घेईल. 
नायकाला येनकेन प्रकारेण वाट्टेल त्या मार्गाने उन्नती करण्याची मुभा आहे, या पार्श्वभूमीवर हा विरोधाभास चांगलाच खटकतो! पाच हजारच्या बदल्यात पप्पी घेण्याची कल्पना त्याला अजिबात चुकीची वाटत नाही की नंतरही त्याला त्याचा थोडासादेखील पश्चाताप जाणवत नाही. मग काही वेळाने चित्रपटातील खलनायकाची नजर पुष्पाच्या प्रेयसीवर पडते. तो तिला काही पैसे, साडी वगैरे देऊन शरीरसुखाची मागणी करतो. त्यावर मात्र पुष्पा भडकतो. तिला वाचवण्यासाठी पुष्पा त्याला अशी मारहाण करतो की चित्रपटाच्या शेवटपर्यंत तो अंथरुणातून उठतच नाही. निघता निघता पुष्पा त्याला ‘खरी मर्दानगी’ शिकवण्यासाठी चार डायलॉगही मारतो! आपल्या प्रेयसीकडे कुणी वाकडा डोळा करून बघितलं तर त्याची काय हालत होऊ शकते हे पुष्पा दाखवून देतो. ही त्याची मर्दानगी!
पुरुष स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणताही मार्ग वापरून “नायक” ठरू शकतो, त्याला सगळे पर्याय खुले आहेत. मात्र हा नियम स्त्रियांना लागू होत नाही. स्त्रियांची इज्जत त्यांच्या योनिशुचितेशी जोडलेली असते आणि तिचा अवास्तव बाऊ करण्यात येतो. एकूणच समाजाच्या या भूमिकेत अजून काहीच फरक पडलेला नाही आणि चित्रपटही याबाबत बदलायला तयार नाहीत. वर्ग-जाती संघर्षाच्या बाबतीत चित्रपटाने एक आशादायी चित्र निर्माण केले असले तरी लैंगिक समतेच्या बाबतीत मात्र पुष्पा सपशेल फेल ठरला आहे. कारण, यात स्त्रियांची स्वप्ने, त्यांची कर्तबगारी, त्यांचे स्थान हे त्यांच्या कुटुंबातील पुरुषांच्या स्थानावर अवलंबून आहे. पुष्पाची प्रेयसी असो की आई त्यांचा सन्मान त्यांच्या जोडीदाराच्या म्हणजेच पुरुषाच्या सन्मानावर अवलंबून आहे. हेच सत्य होतं आणि आजही आहे.
बाकी तर्क गुंडाळून ठेवून फक्त फँटसी म्हणूनच पाहायचा असेल तर, चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. सामान्य माणसाच्या असामान्य ठरण्याच्या भावनांचे विरेचन करण्यात हा चित्रपट कुठेही कमी पडत नाही. लैंगिक समतेच्या बाबतीत मात्र पुष्पा पार्ट 1 अतिशय निराशाजनक ठरला आहे असेच म्हणावे लागेल. आता पार्ट 2 मध्ये काही वेगळं घडतंय का बघूया.

मेघश्री श्रेष्ठी

हा लेख https://meghasrujan.blogspot.com/ह्या ब्लॉग वर देखील वाचता येईल.