बडा घर पोकळ वासा - ऑस्टिओपोरोसिस

आजी, आजोबा बाथरूममध्ये पाय घसरून पडले आणि त्यांचं खुब्याचं हाड मोडून अंथरुणावर खिळले असं आपण अनेकदा ऐकतो. काही वयस्कर लोक आपल्याला पुढे झुकलेले दिसतात. माझ्या एका मैत्रिणीचा हात नुसता थोडासा झटका बसल्याने फ्रॅक्चर झाला. ती तेव्हा 53 वर्षांची होती. आजकाल कमी वयात सुद्धा हे थोड्याशा आघाताने फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे.

या सर्वांचं कारण आहे - ऑस्टिओपोरोसिस.

हाडं ठिसूळ होणं म्हणजेच ऑस्टिओपोरोसिस. हाडांतलं कॅल्शियम कमी होऊन ती ठिसूळ झालेली असतात. त्यामुळे जराशा धक्क्यानेही फ्रॅक्चर होतं. स्त्रियांमध्ये मेनोपॉजनंतर ही प्रक्रिया खूप वेगाने होते. कारण मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेन कमी होतं.
COVID-19 मुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान ऑस्टिओपोरोसिसच्या घटना आणि तीव्रता वाढली, कारण लोक व्यायाम न करता घरातच राहिले त्यामुळे त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही आणि त्यांच्या खाण्याच्या पद्धतीही बदलल्या.
आपली हाडं ही इतर अवयवांप्रमाणेच जिवंत असतात. ती एखाद्या स्पंजप्रमाणे असतात, ज्याची भोकं कॅल्शियममुळे भरली जाऊन ती मजबूत होतात. वयाच्या 30 वर्षांपर्यंत हाडं तयार होण्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे ती मजबूत असतात. मात्र त्यानंतर हाडं तयार होणं कमी होत जातं आणि अस्थिघनता कमी होत जाते. हाडं ठिसूळ होऊ लागतात. स्पंजमधली भोकं मोठी होतात. बरेचदा हाड मोडेपर्यंत आपल्याला ऑस्टिओपोरोसिस आहे, याचा पत्ताच लागत नाही. म्हणून या आजाराला Silent disease असंही म्हणतात.

कारणं
स्त्रिया आणि पुरुष दोघांमध्ये हाडं ठिसूळ होऊ शकतात. पण ‘National Institute of Health’च्या म्हणण्यानुसार रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांना हाडं ठिसूळ होण्याचा धोका पुरुषांपेक्षा चौपट जास्त असतो. वाढत्या वयाच्या मुलींना, गरोदर महिलांना आणि बाळाला अंगावरचं दूध पाजणाऱ्या आईला देखील कॅल्शियमची नेहमीपेक्षा जास्त गरज असते. पण भारतात महिलांच्या आहाराकडे अतिशय दुर्लक्ष केलं जातं. आपल्या संस्कृतीमध्ये बाईला ‘अन्नपूर्णा’ म्हणत असले तरी स्त्रियांमधील कुपोषणाचं प्रमाण वाढतच चाललं आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार 15 ते 49 वयोगटातल्या 57% महिला अॅनिमिक आहेत. या महिलांना व्हिटामिन D, कॅल्शियम आणि लोह या महत्त्वाच्या अन्नघटकांची कमतरता असते.

याशिवाय आणखी काही जणांना हाडं ठिसूळ होण्याची जास्त रिस्क असते.

  • खूप अशक्त आणि कमी वजन असलेले लोक.
  • थायरॉईड, पॅराथायरॉईड हॉर्मोनची पातळी जास्त असणं
  • किडनी ट्रान्सप्लांटसारखी ऑपरेशन्स
  • कॅन्सरसाठी हॉर्मोन थेरपी घेणारे
  • मल्टिपल मायलोमा हा कॅन्सर
  • व्हिटॅमिन D आणि कॅल्शियमची रक्तातील पातळी कमी असणं. मुबलक सूर्यप्रकाश असूनही सुमारे 85% भारतीय लोकांमध्ये व्हिटॅमिन Dची कमतरता आहे.
  • बैठी जीवनशैली - ऑस्टिओपोरोसिस होण्याचं मुख्य कारण म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव होय. आपण बघतो बऱ्याच वेळा लोक तासनतास टी,व्हीसमोर बसून असतात तर काही लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी खूप वेळ बसून असतात. अशा वेळी त्यांच्या शरीराची पुरेशा प्रमाणात हालचाल होत नाही. व्यायाम किंवा हालचाल केल्याने रक्तातील कॅल्शियम हाडांत जातं. पण आहारात जर पुरेसं कॅल्शियम नसेलच तर रक्तातली कॅल्शियम ची पातळी योग्य प्रमाणात रहावी म्हणून ते हाडांतून रक्तात जातं. त्यामुळे हाडं ठिसूळ होतात. म्हणून अशा लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका जास्त असतो.
  • धूम्रपान वा तंबाखू खाणं
  • दारू - रोज दिवसाला 2 पेगपेक्षा जास्त पिणं
निदान
ऑस्टिओपोरोसिसचं निदान DEXA स्कॅन या मशीनने होतं. यामध्ये आपल्या हाडांची घनता किती आहे त्याचं मापन करतात. मेनोपॉजनंतर स्त्रियांनी आणि 60 वयानंतर पुरुषांनी ही टेस्ट करून घेतल्यास हाडं किती ठिसूळ आहेत हे समजू शकतं. ज्यांना काही रिस्क फॅक्टर आहेत ते त्याआधीही ही टेस्ट करून घेऊ शकतात.

उपचार
1. व्यायाम
2. व्हिटॅमिन D आणि कॅल्शियम

हे साधारण पुरेसं असतं. ज्यांच्यामध्ये खूप जास्त ठिसूळ हाडं असतात, अशांसाठी हाडांना मजबुती देणारी काही औषधंही देतात. पण अगदी दुसरा कुठलाही उपाय नसेल तरच ही देतात.

ऑस्टिओपोरोसिस टाळण्याचे उपाय

ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध करण्यासाठी बालपणापासूनच आहारात कॅल्शियम असलं पाहिजे.
आपली जीवनशैली आणि आहार सुधारणं हे दोन मुख्य उपाय आहेत. मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेन रिप्लेसमेंट थेरपीमुळेही फायदा होतो.
आहार - कॅल्शियम भरपूर मिळेल असा आहार घेतला पाहिजे - उदा. रोज एक कप दूध, पनीर, दही इ. दुग्धजन्य पदार्थ आणि याशिवाय मासे, ब्रोकोली, सुके अंजीर वगैरे घेता येईल.
मला इथे डॉ. मालती कारवारकरांची आठवण होते. त्यांनी आहारातील कॅल्शियमबद्दल विशेष अभ्यास केलेला होता. मांसाहारी लोकांनी हाडे, खुर वगैरे उकळून ते पाणी स्वयंपाकात वापरणं आणि शाकाहारी लोकांनी पनीर,दूध, दही यांचा वापर करावा, यावर त्या खूप भर देत.
आपली हाडं मजबूत असणं खूप महत्वाचं आहे. हाडं ठिसूळ होऊन फ्रॅक्चर झाल्यास उरलेलं पूर्ण आयुष्य अंथरुणावर घालवावं लागतं. काहींना मृत्यूही येतो. असं परावलंबी आयुष्य जगण्यापेक्षा स्वतःला अॅक्टिव ठेवून स्वावलंबी राहावं. त्यासाठी व्यायाम, हालचाल जास्त करणं आणि कॅल्शियम, व्हिटॅमिन D ची पातळी योग्य ठेवणं आवश्यक आहे. अगदी हाड मोडायची वाट न पहाता वरपांगी ठिकठाक दिसणाऱ्या शरीरातल्या हाडांचा सांगाडा आतून पोकळ झालेला आहे का, याची वेळेवारी तपासणीदेखील करायला पाहिजे.


डॉ. मंजिरी मणेरीकर

ताज्या दशमीची कहाणी

एक आटपाट नगर होतं,नगरात राहत होत्या अनेक नारी,त्यांची सदानकदा धावपळ भारी. त्या उठत पहाटेच्या प्रहरी, सगळ्यांसाठी करून ठेवत न्याहारी. 
स्वत:ला मात्र न्याहारीला वेळ मिळत नसे, घरकामांचा मोठा डोंगर दिसे.
त्या घरातच करत सगळी कामं, तरी लोक त्यांना ठरवत रिकामं. 
रोज शिजवलेलं साधं अन्न,हेच त्यांना वाटे पक्वान्न. 
पण तेही ताजं मिळायची मारामारी, कारण बाकीच्या सगळ्यांचे नखरे भारी. 
बाईला खावं लागे शिळंपाकं, कारण उरलेल्या अन्नाला सगळे मुरडायचे नाकं. 
रोज उठून ती सगळ्यांच्या भुकेपुरतंच अन्न शिजवे, पण घरच्या पुरुषांचे आणि मुलांचे एकेक नखरे नवे.
त्यामुळे घरी शिजवलेले अन्न उरायचं आणि शिळं होऊन तिच्या ताटात पडायचं.
कधी अचानक घरी पाहुणे येत आणि त्यांच्यासाठी नवा स्वयंपाक करावा लागे. 
स्वत:ची भूक बाजूला सारून ,बाईला त्यांना वाढावे लागे. 
कधी अन्न वाया जाऊ नये म्हणून, अन्नाचा अपमान होऊ नये म्हणून, माऊली शिळं अन्न खाई.
तर कधी सर्वांना पोटभर मिळावे म्हणून ती उपाशी राही .  
घरोघरी रोज बाईच्या खाण्याची आबाळ होऊ लागली, तिची तब्येत बिघडू लागली.
शरीराला पोषण कमी पडू लागलं. तिचं वजन कमी होऊ लागलं,तिचं डोकं दुखू लागलं.   
ती थोड्याशा कामानं दमू लागली. तिच्या चेहऱ्याची रया गेली, ती उठता बसता थकू लागली.
पुरुषांना कळेना ह्या बायांना झालं काय ? ते बायांवर ओरडू लागले, कामचुकार म्हणू लागले. कोणी त्यांना डॉक्टरकडे नेलं, कोणी बुवाकडे नेलं, कोणी बाईकडे नेलं. कोणाला वाटलं देवाचं काहीतरी राहिलं, म्हणून त्यांनी काराण घातलं, कोणी दान केलं, लोकांना जेवू घातलं. पण बायांच्या तब्येतीत फरक पडेना. काय करावं काही कळेना.
एके दिवशी नवल घडले. एक घर असे दिसले, 
जिथे बाया आजारी नव्हत्या. त्या हसतखेळत काम करत होत्या.
हे असं कसं झालं ? हे घर कोणाचं?म्हणून काहीजण त्या घरात गेले. 
तिथं होती सावित्री माय. ती म्हणाली, “बाबांनो तुमचा चेहरा असा का पडला? असा कोणता प्रसंग घडला.”
“माय माय, आमच्यावर धर मायेची साय आणि सांग आम्हांला तुझी राय”
“मला कळेल असं बोला,सापडेल तुमच्या दुखण्यावर उतारा”
“आमच्या सगळ्यांच्या घरातल्या बायांना काहीनाकाही आजार आहेत ,पण तुझ्या लेकीसुना मात्र खुशाल आहेत. ही कुठली जादू आहे? ते आम्हाला सांग.”
सावित्रीमाय म्हणाली, “जादू नाही, काही नाही. आम्हीही या गावचंच पितो पाणी,पण आमच्या घरची वेगळी आहे कहाणी. आम्ही ताज्या दशमीचा वसा घेतला आहे! ”
“माय माय, आम्हाला तुझा वसा सांग, आमच्या बायकामुली फेडतील पांग”
“बाबानो हा वसा लेकी-सुनांसाठी,आपल्या माय-बहिणीसाठी, सखीसजणीसाठी पुरुषांनी घ्यायचा आहे.”
“हे तू काय विपरीत बोलतेस माय? वसा वसण्याचं काम बायांचं असतं, त्यांनीच सर्वांचं भलं पाहायचं असतं.”
“हा वसा आहे निराळा, जमणार असेल तर हो म्हणा, नाहीतर इथून चालू पडा.”
“ माय आमच्यावर कोपू नकोस, आमच्या बायांच्या सुखासाठी आम्ही हा वसा पार पाडू. ”
सावित्रीमाय म्हणाली, “ बघा बरं, एकदा विचार करा, आणि नक्की काय ते आताच सांगा. नाहीतर उताल माताल आणि घेतला वसा टाकून द्याल.”
सगळ्या बाप्यानी वचन दिलं, “उतणार नाही मातणार नाही,घेतला वसा टाकणार नाही.”
सावित्रीमाय सांगू लागली, “ ऐका तर मग. हे आहे, ताज्या दशमीचं व्रत.”
“आम्ही शिळासप्तमीचं व्रत ऐकलं होतं माय , हे ताज्या दशमीचं व्रत कुठून आणलंस?”
“हे व्रत फार कठीण आहे, बाईची तब्येत सुधारायची आहे, म्हणून तुम्हाला स्वत:ची वागणूक बदलायची आहे. एक सवय लावून घ्यायची - घरात सगळ्यांनी बरोबर जेवायला बसायचं आणि उरलंसुरलं शिळं अन्न सगळ्यांनी वाटून खायचं. बाई देत नसेल तरी आठवणीने मागून घ्यायचं. तुम्ही वेळीअवेळी बाहेरून खाऊन येता – कधी आवडत नाही म्हणून कमी खाता, तुमच्या अशा वागण्याने घरात अन्न उरत असतं. तिला अन्न वाया घालवायचं नसतं, म्हणून ते तिच्या पोटी जात रहातं.”
“पण यात चूक बाईची नाही का? बाईने एवढं अन्न शिजवायचंच कशाल?”
“प्रत्येक गोष्टीचं पाप बाईच्या माथी मारू नका. घराबाहेर जाणारे तुम्ही - जेवायला येणार की नाही हे तिला सांगत नाही. उशीर झाला की बाहेरच खाऊन येता, नाहीतर कधी तिला न विचारता पाहुण्यांना जेवायला घेऊन येता. मग जास्ती झालेलं शिळं तिला खावं लागतं आणि कमी पडलं तर तिलाच उपाशी राहावं लागतं. आता तुम्हीही शिकून घ्यायचा आहे स्वयंपाक, समजून घ्या सगळं मोजमाप. तिलाही तुम्ही करून घाला, ताज्या दशमीचा घास ”
सगळे पुरुष घाबरले, “हा वसा तर फारच कठीण आहे.”
“मी म्हटलं होतं ना? तुम्हांला झेपणार नाही हे ताज्या दशमीचं व्रत ?”
“ नाही नाही सावित्रीमाय, आम्ही हे व्रत नक्की करू. आणखी काय करायचं ते तू सांग.”
“इतकी वर्षे ती तुमच्या तब्येतीसाठी जे जे करत होती ते ते तुम्ही आठवा आणि सगळं तसं करा.”
“म्हणजे गरम ताजी न्याहारी, ताजे जेवण आणि चांगली तब्येत”
“ अगदी बरोबर. हेच आहे ताज्या दशमीचे व्रत, तेच करा अविरत. घरच्या बायकांना मिळू द्या ताजे सकस अन्न, त्यांचे मन राहील प्रसन्न.”

या कहाणीतल्या पुरुषांनी जसं ‘ताज्या दशमीचं व्रत’ आपल्या घरच्या बायांसाठी घेतलं आणि तसे तुम्हीही हे व्रत घ्या आणि सुखी व्हा. ही ताज्या दशमीची कहाणी, सगळ्या घरामध्ये घडो. सगळ्या बायांना उदंड आयुष्य लाभो.

 

अश्विनी बर्वे 
निफाड 

दिल चाहता है ..... मगर !(भाग 2)

इफ्फीमध्ये जगभरातले सिनेमे दाखवतात. हे सिनेमे पाहताना आपलं विश्व, आपल्या समस्या, आपल्या भावना, यांच्याकडे किती वेगळ्या पद्धतीने पाहता येऊ शकते हे लक्षात येते. हे सिनेमे पाहताना एक अद्भुत जग समोर उभं राहतं. आपल्या स्वत:च्या आणि सिनेमातल्या विचारांवर कधी प्रश्न करत, तर कधी सहमती दर्शवत एका वेगळ्या विश्वाची आपण सफर करतो. सिनेमाचे विषय, मांडण्याच्या पद्धती किती अफाट असतात असा मनात विचार येतो. काही सिनेमे त्याच्या सिनेमॅटोग्राफीसाठी निखळ आनंद देऊन जातात. नाझींच्या अत्याचारांचे सिनेमे भारतातील काही घटनांशी साधर्म्य दाखवतात. काही देशातील संस्कृती, परंपरा ध्यानात घेतल्या तरीही एकंदर सर्वच्या सर्व सिनेमातील पौरुष दाखवण्यासाठी सिगरेट, दारू यांचं केलेलं उदात्तीकरणही खटकतं. (खास करून पुरुषाला आलेलं नैराश्य असो की मिळवलेला विजय असो, दोन्हींच्या सेलिब्रेशनसाठी). युद्ध सिनेमे स्तब्ध करतात, क्रूरता किती वेदनादायी आणि विद्रूप असू शकते याचे उघड दर्शन घडवतात आणि तुमच्या ह्रदयाची सहनशीलता तपासतात. 
हे सिनेमे पाहताना मनाच्या तळाशी साचलेल्या, घटना, जपून ठेवेलेल्या आठवणी, भावना उफाळून वर येतात. जणू काही या सिनेमांच्या निमित्ताने स्वत:शी स्वत:ची झालेली भेट... इफ्फीचा माहोल आपणाला हवेत तरंगायला लावतो. तो पंडाल, दिव्यांची रोषणाई, येणारे हौशेनवशे प्रेक्षक, रेड कार्पेट आणि कार्यक्रम स्थळासमोरील समुद्र. आपण आठवडाभर वेगळ्याच धुंदीत असतो. इथे येणारे प्रेक्षक बहुतेक करून दिग्दर्शक, सिनेमा शिकणारे, पत्रकार आणि हौशी असतात. स्त्रिया व लैंगिक वैविध्य असणारे लोक कमीच दिसतात इफ्फीमध्ये. इथे सहसा कुणी तुम्हाला ‘जज’ करत नाहीत, तुम्ही इथे फक्त ‘प्रेक्षक’ असता आणि सगळे आठवडाभर सिनेमावरच बोलत असतात.
पर्यटनाच्या निमित्ताने का होईना, पणजीत पुरातन वास्तूंचे जतन खूप चांगल्या पद्धतीने केले आहे. इथली जुन्या पद्धतीने बांधलेली घरं, चर्च, मंदिरं, हॉटेल्स, सरकारी कार्यालये, मैदाने, बागा इ. अतिशय चांगल्या अवस्थेत जतन होताना दिसतात. सकाळी सकाळी पणजीतील घरे बघत फिरायला जाणे म्हणजे नेत्रसुखच जणू! आजही या वास्तू तोर्‍यात उभ्या आहेत. आम्ही एका चर्चमध्ये रविवारची प्रार्थना सुरू असताना ‘कुणी काही म्हणेल का,’ अशा विचाराने जरा घाबरतच प्रवेश केला. थोडा वेळ तो माहौल अनुभवला आणि मनात शांतता घेऊन बाहेर पडलो. इथे फिरताना प्रचंड सुरक्षित वाटतं, ही जमेची बाजू. पण बीचवर फिरताना मात्र घरच्यांची खूप आठवण येत होती. ‘कबीरला (मुलाला) आणलं असतं तर त्याने खूप मस्ती केली असती, घरातले आले असते तर...’ अशी अपराधी भावना मनात येऊन गेली तरी मी तिला ठरवून पळवून लावले. विडिओ कॉलवरून बीचची, फेस्टिव्हलची सफर घडवून स्वत:ला आणि त्यांनाही सोबत नसण्याच्या ‘गिल्ट’ च्या भावनेतून मुक्त केले.
खामोशी में सुकून 
एवढ्या वर्षात एक गोष्ट लक्षात आली आहे, सर्व सोबत असण्याचा आनंद असतोच पण ‘एकटं’ असण्याची गरज आणि मजा वेगळीच असते. स्वत:च्या हातात हात देऊन स्वत:ची सोबत करत जग अनुभवणं, स्वत:चे लाड करणं, कुणीही आसपास नसतानाही आनंदी राहणं हा स्वार्थीपणा नसतो हे मन स्वत:शी प्रामाणिकपणे पुन्हा पुन्हा सांगत राहतं. माणसांची माणसांना उणीव भासणं खूपच नैसर्गिक आहे. पण ‘आपण नसल्यावर सगळं काही विस्कळीत होईल,’ यावर माझा कधीच विश्वास नव्हता. उलट घरातील सदस्य आणखी स्वावलंबी होतात, असा माझा अनुभव आहे; त्यामुळे मी निर्धास्त होते. मी गोव्यात बिचवर गेलेले, इकडे मुलगा पण त्याच्या बाबाला घेऊन अलिबाग बीचवर मस्त डुंबून आला. माणसं तुमच्या सोबतीने आनंद घेतात आणि तुमच्याशिवायही! ‘आपण इतरांशिवाय आणि इतर आपल्याशिवाय आनंद घेऊ शकत नाही, घेऊ नये आणि घेतला तर आपले एकमेकांवर खरे प्रेम नाही’ हा दृष्टिकोन एक तर इतरांना बंधनात अडकवतो, आपणही त्यात अडकतो आणि आनंदी क्षणातही अपराधी वाटून घेतो. अशाने नाती मोकळेपणाने श्वास घेत नाहीत, गुदमरत, डिवचत राहतात,दुखावतात आणि दूरही जातात कधीकधी.
माझ्या आईला नेहमी वाटतं की बाकीचे आनंदी तर ती आनंदी. ती नेहमीच कुटुंबियांना, आप्तांना खुश ठेवण्यात दंग असते, पण ‘फक्त स्वत:चा’ असा आनंद घ्यायला तिचं मन धजत नाही. इतरांच्या आनंदावर आपला आनंद अवलंबून ठेवल्याने तिला आनंदी किंवा दु:खी करणं इतरांच्या वागण्यावर असतं. आणि मग जेव्हा इतरांमुळे ती दु:खी होते, तिला तेव्हा प्रचंड त्रास होतो. कधीकधी ज्यांच्यासाठी तिने स्वत:चा आनंद पाहिला नाही त्यांच्याकडून प्रश्नही उपस्थित केला जातो, “आम्ही नव्हतो तुला त्याग कर म्हणालो, तूच स्वत: केला त्याग.” मग ती दोनदा दु:खी होते. आधी त्याग करून दु:खी, इतरांनी आपल्या त्यागाची जाणीव ठेवली नाही म्हणून दु:खी. त्यामुळे ज्या त्या वेळी आपण आनंदाची अनुभूती घ्यावी. आयुष्याच्या उत्तरार्धात ‘आपण स्वत:साठी जगलोच नाही’ ही खंत मनात आली नाही पाहिजे आणि आलीच तर त्यासाठी फक्त आपणच जबाबदार असू.

 फेस्टिव्हलमधील स्त्री प्रेक्षकांचा अत्यल्प सहभाग

पुरुष सहजपणे स्वत:च्या आनंदाच्या, मोकळ्या श्वासाच्या जागा तयार करतात आणि जतन करतात. मग ते गेट टुगेदर असो, होम पार्ट्या, होटेलिंग, व्यायाम, ट्रेकिंग की सोलो ट्रीप! यात एक गंभीर गंमत अशी आहे की पुरुष हे “स्वातंत्र्याचे” क्षण, मग ते घराबाहेरील असो की घरातील, हक्काने मिळवत असताना जबाबदार्‍या महिलांवर येऊन पडतात. महिला हे सहजपणे स्वीकारतात देखील, कधीकधी पुरुष अशावेळी अमर्याद स्वातंत्र्य उपभोगत असल्याने पुरुषांच्या नियोजीत बेतांना हाणून पाडण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांचे प्रयत्न किती फळास येतात हा भाग वेगळा. मात्र महिलांनी असे मोकळे क्षण व्यतीत करणे हा त्यांच्या “स्वातंत्र्याचा” भाग असत नाही, यासाठी त्यांना घरातील मंडळींची, मुख्यत: पुरुषांची परवानगी काढावी लागते. इथे स्त्रियांवरील पुरुषांच्या मालकी हक्काचा मुद्दा येतो.
गोव्यात जाण्यापूर्वी, असताना, आल्यावर अनेक मैत्रिणींचे फोन, मेसेज आले. त्यांचीही अशी फिरण्याची इच्छा होती. मात्र मुलं आणि घरच्यांच्या जेवणाची सोय कशी करणार हा त्यांच्यापुढे न सुटणारा प्रश्न होता. थोडक्यात काय तर, बाया शिकल्यात, नोकरी करू लागल्यात तरी आयुष्यभर मूल आणि चूल या जबाबदारीतून मोकळ्या होऊ शकत नसल्याने ‘फक्त स्वत:साठी’ वेळ काढू शकत नाहीत. सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या घरातील ‘समता’ हे तर अवघड जागचं दुखणं असतं. 
एक समाजकार्य शिकलेली व नोकरी असलेली मैत्रीण म्हणाली , “मला खूप यावसं वाटतं गं. लग्नाआधी खूप फिरायचे मी. पण आता एक तर घरचे येऊ देणार नाहीत. आणि ते जा म्हणाले तरी मुलांचं सगळं कोण बघणार? नवर्‍याला जेवण बनवता येत नाही. सासूबाई पण चिडचिड करतील. सगळ्यांना सांगत बसतील सगळं सोडून गेली म्हणून. मी आले तर नातेवाईकांच्यात फेमसच होईन. फोनवर फोन करून परेशान करून टाकतील मला. आणि माझ्या सगळ्या सुट्ट्या तर सणावारात, लग्नांमध्ये आणि घरातल्यांच्या आजरपणात जातात. आणि असंही वाटतं की एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी घरात वाद कशाला? माझाच पाय निघत नाही बघ घरातून बर्‍याचदा. तुझं बरंय बाई. कसं करतेस मॅनेज?”
“अगं सोप्पंय! अशावेळी मी एकच विचार करते, मी मध्येच गचकले तर काय होईल?”
“असं काय वेड्यासारखं बोलतेयस?”
“खरंच. कल्पना करून बघ. मध्येच आपली विकेट उडली तर? आपलं जगायचं तर राहीलच, पण माझ्या मागे सगळे करतीलच ना मॅनेज? असा विचार केला की बळ मिळतं. गिल्ट कसला? कधीतरी आपल्या मनासारखं वागून बघूया की! स्वत:साठी निवांत वेळ काढणं, कामाच्या रगाड्यातून ब्रेक घेणं ही क्षुल्लक बाब नाही ना ? तसंही बाकी सगळे त्यांचे त्यांचे आनंद शोधत असतातच की. फक्त आपण बायकांनी शोधला तर आपण स्वार्थी कसे ? आणि इतरांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढणार्‍या आपण, स्वत:च्या हक्कांसाठी कधी लढणार? ”
“खरं बोलतेय तू. पण हे सगळं घरच्यांना कोण सांगणार?”
“अगं, आपणच सांगणार. आधी स्वत:ला सांगणार, मग घरच्यांना. आपणच आपल्या मुलांसमोर हा आदर्श उभा करणार की आईलाही स्वत:साठी वेळ हवा असतो, तिला आवडतं ते करण्यासाठी. मुलांना, घरातल्यांना थोडी कामे वाटून दे. सणवारांच्या सुट्ट्या कमी कर, मग वेळ मिळेल. आणि मागच्या महिन्यात नवर्‍याचे गेट टुगेदर, सासुबाईंची सीनियर सिटीज़न टूर होती तर किती आनंदाने पाठवलं होतस दोघानांही. हर कोई अपने अपने हिस्से की जिंदगी जी लेते है, हम भी जी ले।”
“सगळं पटतय गं तुझं. बायको, सून, आई म्हणून काही जबाबदार्‍या आम्ही बायांनी ओढवून घेतलेल्या असतात. बोलते नवर्‍याशी. मलाच धाडस करायला लागेल. मी तरी कधी जगू, मला हवं ते कधी करू? आता मी स्वत:लाच सांगणार आहे, ‘दिल चाहता है’ ते करायचं ‘मगर’ मध्ये नाही आणायचं!”
माझ्या अनुपस्थितीत कुटुंब अस्ताव्यस्त झालं, असं काही झालं नाही; काही गमती जमती झाल्या, तारांबळ उडाली. पण कुटुंबात तसं सगळं सुरळीत होतं. शाळा, ऑफिस. कबीरचा (मुलाचा) बाबा तसं घरातील आणि कबीरच्या जबाबदार्‍या नेहमी घेत असतो; पण ऑफिस व्यतिरिक्त वेळात, सुट्टीच्या दिवशी जेवढ्या घेता येतील तेवढ्याच! एरवी मी कबीरचा अभ्यास घेत असल्याने बाबाला अंधुकसे माहिती होते की ऑनलाइन अभ्यास कुठे असतो, कोणत्या वहीत कोणता अभ्यास घ्यायचा. पण शिकला तो. सबमीशनच्या गडबडी झाल्या. मुलाकडून अभ्यास करवून घेताना बाबाची दमछाक झाली. त्याचे जेवण, आंघोळ आणि इतर बाबींसाठी बाबाला खूप ऊर्जा, संयम आणि सोशिकता लागली (आणि म्हणे बाया सोशीक असतात. आम्ही जन्माने नाही तर परिस्थितीने सोशीक बनतो.)‘गोड बाबा’ ते ‘अंग्री बर्ड बाबा’ - असा बाबाच्या प्रतिमेचा प्रवास झाला. सात वर्षांच्या मुलाबरोबर बाबाची चक्क कडाक्याची भांडणेही झाली. “मला माझ्या आईकडे नेऊन सोड!” अशी दमदार धमकीभरी मागणीही करण्यात आली. इतरवेळी बाबाला समजत असतं की मुलाला सांभाळण्यात आव्हाने आहेत, म्हणून घरातील व मुलाच्या काही गोष्टी तो करतोही...पण यावेळी प्रत्यक्ष अनुभवातून बाबानं आईसमोर प्रामाणिकपणे मान्य केलं की प्रदीर्घ काळासाठी लेकराला सांभाळणं फार अवघड आहे. पालकत्वातील आईच्या वाट्याचे ‘दैवतीकरण’ झाल्यानं त्याचं वास्तविक मूल्य दुर्लक्षित होतं. मुळात मुलांची जबाबदारी आईचीच समजली जाते, त्यामुळे ती विशेष काही करते असं इतरांना आणि कधीकधी तिलाही वाटत नाही. पुरुषाकडे तो नोकरी करणारा आणि मुख्यत: बाहेर काम करून पैसे मिळवणारा असं पाहिलं गेल्याने त्याच्याकडे पालकत्वाच्या खूप मर्यादित जबाबदार्‍या येतात. त्यामुळे घर, काम सांभाळून मुलांची जबाबदारी किती आव्हानात्मक असू शकते याची त्याला कल्पनाही येत नाही. आणि बायकोच्या संसारातील सहभागाला, त्यातील आव्हानांना जाणून, ‘तिच्या’ समजल्या जाणार्‍या जबाबदार्‍या वाटून घेण्याला ‘पुरुषत्व’ समजलंही जात नाही.
घरवापसी 
 बसमधून उतरल्यावर घ्यायला आलेल्या जोडीदाराला आणि बिलगणार्‍या   लेकराला बघून मला आनंद झाला आणि गलबलूनही आलं. सतत शरीराला   आणि मनाला बिलगून राहणारं पिल्लू जेव्हा सांगतं की त्याला जेव्हा माझी खूप   आठवण आली तेव्हा त्याने दोन उशा ठेऊन त्यावर पांघरूण घालून त्याना   बिलगून झोपलं - तेव्हा त्याला भरल्या डोळ्यासकट मारलेली मिठीही मी   सेलिब्रेट  केली. बाई, आई आणि व्यक्ती म्हणून येणार्‍या जबाबदार्‍या घेण्यासाठी   आणि काहींचे वाटप करण्यासाठी मी पुन्हा सज्ज झाले. गोवा फिल्म फेस्टिव्हल   साधारणपणे नऊ दिवसांचा असतो. मी गेले दोन्ही वर्षे काहीशा अस्वस्थतने   आणि मुलाच्या ओढीने एक दिवस आधीच येतेय. पण यावर्षी आल्यावर मनाशी   ठरवून टाकलं की पुढच्यावर्षी पूर्ण महोत्सव अटेंड करायचा. सगळं काही  व्यवस्थित होतं आणि छोट्या गडबडी झाल्या तरी चलता है! 
              ‘दिल चाहता है’ ते करायचं ‘मगर’ मध्ये नाही आणायचं!

(हा लेख ‘पुरोगामी जनगर्जना’ या मासिकात पूर्वी प्रकाशित झाला होता.)

लक्ष्मी यादव

सामाजिक कार्यकर्ती 

दिल चाहता है ..... मगर !(भाग १ )

गोव्यात नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) भरतो. ‘गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही पाहायला जावे’ – असा विचार माझ्या तोंडून बाहेर पडताच,
“गोव्याला चाललीस? कशाला? एकटी?”
“यावर्षीही जायलाच पाहिजे का?तेही इतके दिवस? सगळी गडबड होईल. कसं अॅडजस्ट करणार?”
“आई, मला सोडून तू पिच्चर बघायला चाललीये?”
“फिल्म फेस्टिवलमध्ये पिक्चर बघायला तेही गोव्याला कशाला जायला पाहिजे? मोबाईलवर पण दिसतात की सिनेमे.”
“पोराची तुला माया हाय का न्हाई? एवढ्याशा लेकराला सोडून जातेत व्हय? असलं कसलं बाई तुझं आईचं काळीज?”
“हं, हे कसलं नवीन फॅड? तिथे येणारे तुझे किती मित्र-मैत्रिणी असं लेकराला, नवर्‍याला सोडून येतात?”
अशा असंख्य प्रतिक्रियांच्या पावसाने मी अक्षरशः न्हाऊन निघाले. आधीच यावर्षी जायचा मूड बनत नव्हता आणि वरून असा पाऊस. ‘जाऊ दे, नकोच जायला या वर्षी. पुढच्या वर्षी बघू.’ अशा विचारापर्यंत येऊन पोहोचले. पण ज्या कोल्हापूरच्या मैत्रिणीला ‘आपण जाऊयात’ म्हणून खूप आधी तयार केलेले. आणि एके दिवशी अचानक तिने ‘मी माझे अमक्या तारखेचे तिकीट बुक केले आहे, तुझे कर लवकर’ असा बॉम्ब टाकला. घरी भाची आली असल्याने तिची मदत होणार होती, त्यामुळे सकारात्मक विचार करायला जरा वाव होता. तरी जायच्या आदल्या दिवशीपर्यंत, ‘आपण जाऊ’ - असे वाटत नव्हते. शेवटच्या क्षणाला बसचे तिकीट बुक केले आणि अनेक प्रतिक्रियांना एका गाठोड्यात बंद करून मी बसमध्ये मागच्या सीटवरुन हलत डुलत, जागरण करत एकदाची गोव्याला निघाले.
मैत्रीण आधीच पोहोचलेली. ती अविवाहित आहे. माझ्या मनात आलं - ‘अविवाहित असणं किती बरं असतं!’ (म्हणजे आम्ही समतेवर आधारीत संसार करत असलो, जोडीदार समतेवर विश्वास असणारा आणि वागणारा असला तरी असा विचार डोकावतो मनात अधूनमधून.) पण मैत्रिणीने तिच्या घरी ती गोव्याला जाते आहे, याबद्दल पालकांना जास्त काही सांगितले नव्हते. मी कारण विचारल्यावर म्हणाली, “अगं दर शनिवार-रविवार कांदे पोहे कार्यक्रम असतोच. कंटाळा आलाय मला त्याचा. पण तो कार्यक्रम रद्द करून मी फिल्मफेस्टिव्हल करता जातेय, हे कळल्यावर आईबाबांना वाटेल की आम्ही किती सीरियस आहोत आणि ही लग्नाबद्दल काहीच सीरियस नाहीये.”
मी अतीच भाबड्या विश्वासाने म्हटलं, “अगं मी सोबत आहे म्हणून सांगायचे ना?”
“अगं मग ते म्हणणार की बघ तुझी मैत्रीण, लग्न, मुलं सगळं करून फिरते आहे. आणि तू?”
“मग बॅचलर मैत्रिणी सोबत आहेत म्हणून सांगायचे?”
“अगं तसं सांगितलं तर म्हणणार - तुझी संगतच तसली. फिरा बिन लग्नाचे! अशाने कशी होणार तुमची लग्ने? - त्यामुळे जास्त काही न सांगितलेलं बरं!”
म्हणजे मुलींनी अविवाहित असणंही काही फार बरं आहे असं नव्हे (आपलंच बरं म्हणायचं!), अशा निष्कर्षास आले.
 
 पणजी आपले स्वागत असे विलोभनीय रीतीने करते.
पणजीत उतरल्यावर समुद्र बघूनच वेगळ्या ठिकाणी आल्याची जाणीव झाली. हा माहोल फक्त डोळ्यांनाच गुंतवून ठेवतो असे नाही तर तो मनालाही शांत करतो. आम्ही सिनेमाच्या आधी दोन दिवस फिरायचे असे ठरवलेले. आमचा स्कूटरवर फिरायचा बेत होता, पण पावसाने अचानक धोका दिला. लेकीन हम हारनेवाले कहाँ थे! पाऊस सुरू असतानाही आम्ही बसने प्रवास सुरू केला. पणजीतील अतिशय सुलभ आणि स्वस्त सीटीबस मधून जुनी रोमांटिक गाणी ऐकत मडगावमधील बेणवली बिचजवळ पोहोचलो. पाऊस सुरूच होता. रिमझिम पाऊस, खळाळता बीच, ती पांढरी वाळू, अगदीच बीचवर असणारी सुगंधी हॉटेल्स, रंगीन पर्यटक आणि सोबतीला हॉटेलमधील सुमधुर संगीत ...अहाहा! तो नजारा आम्ही न बोलता फक्त नजरेत सामावत होतो. बराच वेळ नुसतेच समुद्राकडे बघत बसलो. मग मडगाव मार्केट फिरून काही ‘मिडल क्लास् मुलगी’टाईपच्या खरेद्या केल्या आणि घरी पोहोचलो. दुसरा दिवस जुना गोवा, चर्च, मंगेशी मंदिर असे फिरलो. गोव्याला गेल्यावर मस्त 'वनपिस' मिळाला आणि रखडलेली इच्छा पूर्णत्वास आली. 
५०० वर्षे जुनं चर्च, पणजी
आयुष्यात काही गोष्टी करायच्या विनाकारण राहून जातात तसंच माझं वन पिस घालायचं राहून गेलेलं. गोव्यात फ्रॉक किंवा वन पीस हे महिलांच्या रोजच्या पेहरावाचा भाग आहे, त्यामुळे मी वन पीस घातल्यावर कुणाच्या नजरा पायांवर खिळल्या असे झाले नाही. आजवर मी घरात आणि बाहेर बर्मुडाही वापरलाय तरी वनपिसची पहिलीच वेळ असल्याने काही क्षण conscious होण्याची भावना झाली, पण काही क्षणातच नाहीशी झाली. काही गोष्टींची सुरुवात होण्याची गरज असते. पंढरपूर तालुक्यातील तावशी गावच्या माझ्यासाठी लांब केस, अंगभर कपडे ते छोटे केस, शॉर्ट ड्रेस हा प्रवास तेवढा सोपा नव्हता. हे फक्त कपडे किंवा केसांशी निगडित नाहीये, मुलींना अजूनही इतक्या छोट्याशा वाटणाऱ्या स्वातंत्र्यासाठी झगडावं लागतं. तेवढ्यानेच मुली सबल होतात, असं नसलं तरी हे करणं म्हणजेही स्वातंत्र्य आहे, हेही तितकंच खरं. लोकांना तुमच्या या गोष्टींशी काही देणे घेणे नसते; आपणच ‘लोक असा तसा विचार करतील’ असा कसलातरी महान विचार करून ठेवलला असतो. स्वतःला घातलेल्या चौकटीतून, संस्कृतीच्या जडत्वातून बाहेर पडून शरीराला,मनाला मुक्त करणं, स्वच्छंदपणे विहरणं ही अनुभूती विलक्षण आहे. ज्या मुली, महिला इच्छा असूनही हे सगळं करू शकत नाहीत त्यांच्या डोळ्यात हे करू शकण्याच्या स्वातंत्र्याचं मोल आणि करू न शकण्याची वेदना सहज दिसेल.
आम्ही एका मित्राच्या मैत्रिणीच्या घरी राहत होतो. सामाजिक कामाची पार्श्वभूमी असणारी आई आणि वकिली शिकत असलेली मुलगी असं ते फारच मनमोकळं कुटुंब. त्यामुळे जेवणाचे, राहण्याचे, रात्री उशीर पोहोचण्याचे दडपण नव्हते. “तू वाईन घेत असशील तर फ्रीजमध्ये आहे, हवी तेव्हा घेशील हं!” अशी वाईन पिण्याची ऑफरही त्यांनी गेल्या वर्षी देऊ केली होती. मी पीत नसल्याने त्यांची ऑफर मी नम्रतापूर्वक नाकारली. गोव्यात दारू ‘समाजमान्य’ असल्यासारखे चित्र आहे (दारुने संसार उध्वस्त होतात म्हणून महिलांचा या व्यसनाला विरोधही आहे असे सामाजिक कार्यकर्तीकडून ऐकले.). फिल्म फेस्टिव्हलसाठी येणारे किंवा स्थानिक, सगळे दारू पिण्याबद्दल नॉर्मल असतात. तिथे पिणार्‍या मुलगीबद्दलही लोक बाऊ करताना दिसत नाहीत. मागच्या वेळी गोव्यात आले होते, तेव्हा एका चोवीस वर्षांच्या मुलीशी ओळख झालेली. एकेदिवशी ती मला तिच्या स्कुटीवरून दारूच्या दुकानात घेऊन गेली. आजवर दारूच्या दुकानाशी माझा धाडसी संबंध सुटे पैसे घेण्याइतपत आणि विविध रंगांच्या आणि आकाराच्या बाटल्या लांबून न्याहाळण्याइतपतच आलेला. तर तिने दुकानदारासोबत गप्पा मारत दारूची बाटली आणि सोडा घेतला. तिथेच दोन्ही बाटल्या फोडून मिक्स केल्या आणि दुकानदाराला पिण्याची ऑफर देत काही घोट घेतले. मी तिला न्याहाळत होते. सिनेमागृहात आल्यावर तिने सिनेमा सुरू असताना गुपचुप सिप घेतले. एकीकडे मला तिचे कौतुकही वाटले आणि काळजीही. ती बिनधास्त सिप घेत सिनेमा पाहत होती. यावर्षी ती फेस्टिव्हलला आली नसल्याने मी तिला मिस केले.
गोव्यात गेल्या वर्षी आणि या वर्षीही मला ‘गोव्यात येणार्‍या मुली ‘एवलेबल’ असतात अशा पुरुषी विचारांचे अनुभव आले. गेल्या वर्षी एका कारवाल्या पुरुषाने लिफ्ट दिली आणि गाडीत बसताच सहज बोलता बोलता मांडीवर हात ठेवला. मग त्याची लाज काढून, भांडून आणि शेवटी त्याच्या गाडीवर लाथा मारल्या. तर्राट गाडी चालवून पळून गेला तो. इथे येणार्‍या मुली सहजपणे सेक्ससाठी तयार होतात, असे काहीसे काही पुरूषांचे विचार दिसले. मग ‘नो’ असा स्पष्ट मेसेज दिला तरी दारूची ऑफर करणे, जेवायला आमंत्रण देणे इ. गोष्टी होतात. ‘हमे इशारा समझ मे आता है भाई! इशारा करने पर कोई ऐतराज नही, जिसे इशारे मे घुलमिल जाना है जाये, जाये, पर हमने ‘ना’ बोला तो ‘ना’ को समझो और उसका सन्मान करो।’
एकदा सिनेमासाठीच्या रांगेत उभे असताना एक मुलगा आमच्याशी बोलायला लागला. तो पूर्णत: दारूच्या धुंदीत होता आणि अवतारावरून आंघोळही केलेली दिसत नव्हती. त्याने त्याचे नाव कृष्णा सांगितले व तो केरळचा असल्याचे सांगितले. जुजबी बोलण्यानंतर मला म्हणाला, “मी गेल्याच्या गेल्या वर्षी तुला पाहिले आहे.”( कसलं सिनेमटिक ना - ‘मैने आपको कही देखा है!’)
“मी गेल्याच्या गेल्या वर्षी आले नव्हते,” असं म्हटल्यावर माझ्या मैत्रिणीला “तुला गेल्या वर्षी पाहिले आहे” म्हणाला.
“ती याच वर्षी आलीये ” म्हटल्यावर, त्याने आमची नावे विचारली. 
मी माझे नाव सांगून ‘मी वाईटाचा नायनाट करते, माझ्यापासून सावध राहा ” असे म्हणून संभाषण संपवले. पण त्यानंतर तो दिसेल तेव्हा आम्ही दोघी “मैने आपको कही देखा है!” असे म्हणून हसत असू. 
एके रात्री सिनेमा संपल्यावर घरी सोडण्यासाठी तो आग्रह करत होता. मी त्याला ठामपणे ‘मी जाईन, थॅंक्स’ असं तीन चार वेळा सांगूनही त्याचा आग्रह सुरूच होता. त्यानंतर मात्र त्याला मी नाराजीच्या सुरात बोलले,तेव्हा एकदाचा तो गेला. त्यानंतर त्याने कधी अशा प्रकारचा इशारा केला नाही. 
सेक्स, दारू या वैयक्तिक बाबी आहेत, आपापला चॉइस आहे. त्याला ‘नैतिक’ बंधनात न अडकवता त्याचा आनंद घ्यावा, ही माझीही भूमिका आहे. आपापल्या विचारांची माणसे जरूर शोधावीत, इशारेही करावेत; मात्र फक्त ‘तसाच’ उद्देश ठेऊन नकोइतकी सलगी दाखवणं किंवा नकार देऊनही सतत प्रयत्न करत राहण्याने त्यातील सौंदर्य नष्ट होते, त्याला ‘बाजारूपणा’ येतो. यात स्त्रीला ‘बाजारू उपभोग्य वस्तू (कमोडिटी)’ समजण्याची वृत्तीही दिसून येते. अशा कृती त्रास देऊन जातात. त्या ‘कृष्णा’ला धडा शिकवल्याचा आनंद आम्ही फेस्टिव्हलभर उपभोगला. या कृष्णाच्या निमित्ताने कुठेतरी वाचलेला ‘महिलांच्या छेडछाडीची सुरुवात देवानेच केली’ हा संदर्भही आठवला.
अजून फेस्टिव्हल मधले बरेच अनुभव बाकी होते, त्याबद्दल लेखाच्या पुढच्या भागात!

(हा लेख ‘पुरोगामी जनगर्जना’ या मासिकात पूर्वी प्रकाशित झाला होता.)

लक्ष्मी यादव.

सामाजिक कार्यकर्ती 

स्नेहांकिता


या सदरात अनुजा संखे - अपंग व्यक्तींचे  संघर्ष, त्यांच्या यशोगाथा, त्यांचे समाजातले योगदान आणि समाजाकडून त्यांना मिळालेली मदत अशा विविध मुद्यांविषयी  लिहिणार आहे. अनुजा स्वत: पूर्णपणे दृष्टिहीन आहे. अनुजाचे काही लेख 'पुनःस्त्रीउवाच' मध्ये तुम्ही पूर्वीदेखील वाचले असतील. ती मागच्यावर्षी महाराष्ट्र टाईम्स मध्ये एक सदर लिहीत होती. तिच्या ‘मनातलं’ ह्या ब्लॉगमध्येही  तिचे अनेक लेख वाचता येतील.

१९८० चा काळ. अंधांसाठी विशेष शाळांमध्येसुद्धा तेव्हा क्रमिक पुस्तकं ब्रेलमध्ये सहज उपलब्ध होत नव्हती. १० जणीत एक पुस्तक असायचं. हळूहळू ही परिस्थिती शालेय अभ्यासक्रमाच्या संदर्भात बदलत गेली पण, उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर याचा दूरगामी परिणाम व्हायला लागले. अभ्यासासाठी ब्रेलमधून साहित्य मिळत नसल्याने अनेक जण शिक्षणाच्या प्रवाहातूनच बाहेर फेकले गेले. ही परिस्थिती परिमला भट यांनी जवळून पाहिलेली होती. ‘अभ्यास करायला काहीच साधन नाहीत म्हणून पुढल्या पिढीने तरी शिक्षणापासून वंचित राहू नये’ याकरता त्यांनी २२ ऑगस्ट २००१ साली स्नेहांकित हेल्पलाइन या संस्थेची स्थापना केली.

परीमला भट 
कोणत्याही कामाला मूर्त स्वरूप येण्यापूर्वी ते आधी आपल्या मनात साकारलेलं असतं. परिमलाताईंनीही आधी सर्व आराखडे मनातच मांडले. त्या स्वतः अंध असल्यामुळे दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींची त्यांना पूर्ण कल्पना होतीच. त्यावर मात करण्यासाठीचा मार्ग हा समाजाच्या पोटातून जातो हे लक्षात घेऊन परिमलाताईंनी नेहमीच्या संपर्कातल्या माणसांना अंध विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी सांगायला सुरुवात केली.
“संवाद साधता येणं आजच्या काळात खूपच आवश्यक आहे. आपण आपली अडचण सांगू शकलो तर अनेक जण मदतीसाठी पुढे येऊ शकतात याचा मी अनुभव घेतला आहे.” परिमला भट सांगत होत्या. स्वयंसेवकांच्या योगदानावर आणि सर्व प्रकारच्या मदतीवर स्नेहांकित हेल्पलाइन ही संस्था गेली २० वर्षं काम करतेय. ब्रेलमधून पूस्तक छापून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचवणं शक्य नव्हतं. यावर उपाय म्हणून स्नेहांकिततर्फे स्वयंसेवकांच्या मदतीने परिमला भट यांनी महाविद्यालयीन अभ्यासक्रमातली पुस्तकं ध्वनिमुद्रित करून घ्यायला सुरुवात केली. त्याआधी स्वयंसेवकांना वाचन, लेखन आणि ध्वनीमुद्रणासाठी किती भाषा अवगत आहेत?, सरकारी कचेरी, इस्पितळं, पोलिसठाणी यांसारख्या गडबडीच्या ठिकाणी मदतनिस म्हणून जाण्यासाठी कोण उत्सुक आहेत?, कोणाला विद्यार्थ्यांना शाळेत-कॉलेजात जाऊन शिकवणं शक्य आहे? हे जाणून घेणं आवश्यक होतं. त्यासाठी त्यांनी एक फॉर्म तयार केला आणि तो स्वयंसेवकांना दिला. मौखिक जाहिरातीमुळे काही लोक या कामात रस दाखवत होते. परंतु, आवश्यकतेप्रमाणे स्वयंसेवक उपलब्ध होत नव्हते. मग, त्यांनी वर्तमानपत्रातून जाहिरात दिली आणि स्नेहांकित हेल्पलाइन महाराष्ट्राशी जोडली गेली.
ध्वनीमुद्रित करून हवी असलेली पुस्तकं स्वयंसेवकांपर्यंत पोहोचवली की, ते घरी ध्वनीमुद्रण करत असत. सुरवातीला कॅसेटचा काळ असल्याने प्रत्येक स्वयंसेवकाला वॉकमन दिला होता. पुढे जसा काळ बदलला तसं हे माध्यमसुद्धा बदलत गेलं. आता ध्वनीमुद्रित पुस्तकं टेलिग्रॅमवरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जातात. अनेक विद्यार्थी असेही आहेत ज्यांच्याकडे स्मार्ट फोन्स नाहीत. अशांना पोस्टाने सिडिज् पोहोचत्या होतात. ब्रेल लिहू वाचू शकणाऱ्या विद्यार्थ्याना ब्रेल पुस्तकंही उपलब्ध करून दिली जातात. चाकोरीबद्ध शिक्षणाला विशेष कौशल्याची जोड असावी यासाठी स्नेहांकित हेल्पलाइन संगणकाचं प्रशिक्षण देते. पण, ब्रेलचा वापर वाढावा यासाठीही प्रयत्नशील असते. मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने २००१ मध्ये उचलेलं पाऊल पुढे टाकताना अनेक इतर गोष्टीही परिताईंच्या लक्षात आल्या आणि त्या दिशेने त्यांनी पावलं उचलली.
जसा महाविद्यालयिन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा प्रश्न होता, तसाच तो शाळेत न जाऊ शकणाऱ्या मुलांचाही होता. या मुलांसाठी डोंबिवलीत एक अभ्यास केंद्र स्नेहांकित हेल्पलाइनने उघडलं. हेही स्वयंसेवक चौधरी दांपत्याने राहतं घर दिल्याने शक्य झाल्याचं परिमलाताई अभिमानाने सांगतात. या केंद्रात २ वर्षांपासून ते पुढे शाळा-कॉलेजात जाणारे सर्व गटातले विद्यार्थी आळीपाळीने येत असतात.
अंधविद्यार्थ्यांबरोबर काम करताना अभ्यासएकेअभ्यास एवढंच तंत्र धरून चालणार नाही हे परिमलाताईंच्या लक्षात आलं. हल्ली बरीच मुलं आपल्या कुटुंबासोबत राहून जवळच्या शाळांमध्ये जातात. अधिक सजग, सुशिक्षित आई-बाबा विशेष शाळांमध्ये मुलांना पाठवत नाहीत. परंतु, त्यांना इतर मुलांप्रमाणे घरात वावरूही दिलं जात नाही. त्यामुळे मुलं खूप हुशार, अभ्यासू असली तरी स्वावलंबी, स्वतंत्र मात्र नसतात. अशा मुलांना कपडे घालणं, स्वतःचे केस विंचरणं, बूट घालणं, बॅग भरणं यांसारखी कामं जमत नाहीत. आपल्या घराची रचना, घरातल्या वस्तू, त्यांच्या जागा माहित नसतात. याला खरंतर पालकांना वाटणारी अतिकाळजी कारणिभूत असते. मुलांना या सर्व गोष्टी निवासी कॅम्प्समधून प्रत्यक्षपणे शिकवल्या जातात. मासिक पाळीच्या वेळी पॅड कसा घ्यायचा यापासून ते सर्वप्रकारची स्वच्छता कशी राखायची हे आवर्जून सांगितलं जातं. शारीरिक बदलांबद्दल बारकाईने समजावून सांगितलं जातं. मदत करायला येणाऱ्या लोकांचे स्पर्श, बोलण्याची ढब यावरून त्यांच्या हेतूंचा अंदाज बांधणं याबद्दल त्यांच्याशी मोकळेपणे बोललं जातं. मुलींच्या बरोबरीनेच, मुलांशीही या सर्व गोष्टी वेळोवेळी बोलल्या जातात. पौगंडावस्थेतल्या मुला-मुलींशी साधलेल्या या संवादामुळे शाळेतून बाहेर पडण्यापूर्वीच आपणच आपली काळजी कशी घ्यावी याबाबत त्यांच्या मनात विश्वास तयार झालेला असतो.
स्नेहांकित हेल्पलाइन ही संस्था संपूर्णतः स्वयंसेवकांच्या कामावर उभी आहे. अनेक गृहिणी, निवृत्त व्यक्ती, घरून काम करणारी तरुण मंडळी स्नेहांकितशी जोडली गेलीत. वाचक, लेखनिक, ध्वनीमुद्रक म्हणूनच नव्हे तर प्रसंगी आर्थिक सहाय्य उभारण्यातही या मंडळींचा सिंहाचा वाटा असतो. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता म्हणून ५ डिसेंबरला स्नेहांकित हेल्पलाइन मोठ्याप्रमाणावर जागतिक स्वयंसेवक दिन साजरा करते. यातही, या मंडळींना आपण ज्या अंध विद्यार्थ्यांसाठी काम करतोय त्यांच्या अडचणी अधिक जवळून कराव्यात म्हणून एका स्वयंसेवक दिनाला डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना त्यांची नेहमीची कामं करायला सांगितली. त्यामुळे 'आपण करत असलेल्या कामाची आवश्यकता कळली.'- असं अनेक स्वयंसेवक सांगतात.
"मला यशस्वी करण्यामागे समाजाचा हात आहे. त्याची परतफेड करता येणं हेच माझं बळ आहे.” परिमलाताई सांगत होत्या. दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना स्नेहभावातून मदतीचा हात देण्याची इच्छा असेल तर आपणही हे काम करू शकता. जर आपल्यापैकी कुणाला स्वयंसेवक म्हणून स्नेहांकित हेल्पलाइन या संस्थेशी जोडून घ्यायचे असेल तर परीमला भट यांच्याशी इथे दिलेल्या फोन नंबर आणि ईमेल वर संपर्क साधता येईल.

अनुजा संखे 


नवे उत्सव, नवे सापळे ...

पूर्वी कधीतरी असं मानलं जायचं की नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे 14 जानेवारीला येणारी संक्रांत! पण गेल्या काही वर्षांपासून सावित्रीबाई फुलेंची जयंती म्हणजे 3 जानेवारी हा नव्या वर्षातला पहिला सण म्हणून साजरा केला जावा – असे प्रयत्न सात-आठ वर्षांपूर्वी राष्ट्र सेवादल आणि काही परिवर्तनवादी लोकांनी सुरू केले. आता त्यांच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं शरद कदम यांनी कौतुकाने सोशल मिडियावर सांगितलं आहे. पूर्वी महिला मंडळ किंवा संस्थाच्या पातळीवर काहीशा औपचारिक पद्धतीने केला जाणारा सावित्री बाईंच्या जयंतीचा कार्यक्रम आता घरोघरी सुद्धा ‘सावित्रीउत्सव’ म्हणून साजरा केला जातो. हाच त्यांच्या प्रयत्नांच्या मागचा उद्देश होता, असं राज आसरोंडकर म्हणाले . तेदेखील त्यांच्या ‘कायद्यानेवागा’ चळवळी तर्फे सावित्री उत्सव करतात. त्यासाठी हा नव्या वर्षातला पहिला सण कसा साजरा करायचा त्याचं एक टेम्पलेटच राष्ट्र सेवा दलाने लोकप्रिय केलं. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सावित्रीबाईंच्या जयंतीचे म्हणजे “सावित्री उत्सवाचे” मेसेजेस सोशल मिडियावर यायला लागतात. सावित्रीउत्सव२०२१ ह्या फेसबुक पेजवर अशी पोस्ट आहे की - “घराघरात पारंपारिक पद्धतीने आकाशकंदिल लावून, रांगोळ्या काढून, खायला गोडधोड करुन सावित्रीबाई व फातिमा शेख यांच्या कार्याची कृतज्ञ आठवण काढली जावी ही अपेक्षा तर आहेच. त्यात भर म्हणून नव्या त-हेने, नव्या माध्यमातून घरोघरी सावित्रिउत्सवाच्या आनंदाचे लोण पसरावेत अशीच आपल्या सर्वांची इच्छा आहे.” फुले दाम्पत्याने इतके महत्त्वाचे क्रांतिकारक काम केले आहे की त्यांच्या आठवणी जागत्या ठेवण्याचा प्रयत्न करणं जरुरीचेच आहे. पण हे “नव्या तऱ्हेने, नव्या माध्यमातून” उत्सव करणं म्हणजे काय?

 “नव्या तऱ्हेने, नव्या माध्यमातून” उत्सव करणं म्हणजे काय?

पूर्वी राष्ट्र सेवा दलाच्या आवाहनात आडवी चिरी लावावी असा उल्लेख असायचा,पण आता ते सांगावं देखील लागत नाही इतकं लोकप्रिय झालं आहे. मालिका आणि सिनेमातून घराघरात पोचलेल्या अनेक मराठी अभिनेत्रींनी कपाळावर आडवी चिरी लावून सोशलमिडियावर सेल्फी पोस्ट केल्यानंतर त्यांचं अनुकरण झालं नसतं तरच नवल! आता पारंपरिक वेषात आडवी चिरी लावलेला सेल्फी पोस्ट करणे हा आता उत्सवाचा अविभाज्य भाग बनून गेला आहे. रांगोळी, कंदील, पणती आणि ही आडवी चिरी ह्या सगळ्या गोष्टी एकप्रकारे ही नव्या उत्सवाची कर्मकांडं आहेत. कदाचित विचार रुजवण्यासाठी काहीनाकाही प्रतिकं आवश्यक आहेत – असं सावित्रीउत्सवाचा प्रसार करणाऱ्यांना वाटत असेल. पण नेमका हाच भाग मला धोकादायक वाटतो!
 स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्यांवर कृतिशील असणाऱ्या जाणत्या कार्यकर्त्या निशाताई शिऊरकर म्हणतात,“ जेव्हाजेव्हा अशी कर्मकांड होतात, तेव्हा त्यातला विचार हरवतो.” त्यांना वाटतं - “ त्याकाळी सावित्रीबाईंनी बालविवाहापासून केशवपनापर्यन्तच्या अनेक हिंदू रूढीना विरोध केला. त्या मानाने रंगोली, कंदील किंवा आडवी चिरी हे त्यामानाने सोपं काम आहे.”
स्त्रीयांच्या चळवळीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या मंगल पाध्ये यांनीही अशीच भावना व्यक्त केली, “अशा प्रकारची नवीन प्रथा पाडून त्यातून काही सिद्ध होत नाही, होणार नाही असं मला वाटतं. मुळातच कुंकवाचा एक सौंदर्य प्रसाधन असा उपयोग आहे असं मला वाटतं. मग चिरी असो की गोल टिकली असो. चळवळीतल्या आम्ही काही मैत्रिणींनी कुंकू,बांगड्या, मंगळसूत्र यासारख्या गोष्टी वापरणं जाणीवपूर्वक बंद केलंय. त्यासाठी खाजगी आणि सामाजिक जीवनात संघर्ष करावा लागला होता. त्यातल्याच एका कुंकवाच्या चिरीचा असा symbolic उपयोग करणं मला बरोबर वाटत नाहीये.” हे त्यांचं म्हणणं मला फारच महत्त्वाचं वाटलं.
स्त्रीवादी विचारांच्या सारिका उबाळे, शीतल पाटील, सीमा घंगाळे, विभा पिटके, अनुजा संखे, शामल गरुड, लीना कुलकर्णी, नूतन मघाडे अशा अनेक मैत्रिणीही  “आडवी चिरी लावून काही साध्य होईल असे वाटत नाही” असंच म्हणत आहेत. त्यापेक्षा इतर कृतिशील उपक्रम करावेत असं अनेकजणींनी सुचवलेलं आहे.
पत्रकार संयोगीता ढमढेरे यांनी एक जवळचंच उदाहरण दिलंय - “पुरोगामी म्हणून काही नवीन उत्सव केले पाहिजे असं माझं मत आहे.काटेकोर फुटपट्टी लावून आपल्याला मासेसपर्यंत पोहोचता येणार नाही. त्यामुळं काही जाहिरात सदृश्य कल्पना किंवा समाजमाध्यमस्नेही प्रतीक वापरली तर वापरू दे..पण काही वर्षांनी का होईना लोकांनी स्वतःहून हे उत्सव साजरे केले पाहिजेत. पण बाजारकेंद्री समाजात हे शक्य वाटत नाही. 25 डिसेंबर हा भारतीय महिला दिन म्हणून कुठे साजरा होतो?”
पण राज आसरोंडकर म्हणतात की सामान्य माणसांना परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचं असेल तर असे सोपे उपक्रम द्यावे लागतात. त्यांना मी विचारलं की सावित्रीबाईंनी अशा कर्मकांडाच्या बेड्यातून मुक्त करण्यासाठीच काम केलं आणि आता नव्या कारणांसाठी तसंच प्रतीक नव्या पिढीसमोर आणणं हे एकप्रकारे पुन्हा चार पावलं मागे जाण्यासारखंच नाही का? तर त्यांनी वैयक्तिक रित्या ह्या कर्मकांडाशी जोडून घेत नसल्याचं सांगितलं. पण त्यांचा अशी प्रतिकं वापरण्याला फारसा विरोध देखील नाहीये. उजव्या विचारसरणीच्या मंडळींना टक्कर देण्यासाठी हे करावं लागतं – असं त्यांना वाटतं. 
पण ही नवीन कर्मकांडं पुरुषांनी सुद्धा करावीत, अशी काही ‘सावित्रीउत्सव’ प्रमोट करणाऱ्या मंडळींची अपेक्षा दिसत नाही. सावित्री उत्सवाचे कुठलेही फोटो पाहिलेत तरी पारंपरिक पद्धतीच्या साड्या आणि आडवी चिरी लावणाऱ्या बाया दिसतात पण पुरुष काही जोतिबासारखा पोशाख देखील केलेले दिसत नाहीत. मुळात पुरुषांनी जोतिबांचे विचार आणि वागणूक अंगिकारावी असं तरी त्यांना वाटतं की नाही, हयाबद्दल उत्सवाच्या टेम्पलेट मध्ये स्पष्टपणे काही म्हटलेलं दिसत नाही. म्हणून समाजकारणात सहभागी असलेल्या काही पुरुषांना मी सावित्रीउत्सवाच्या स्वरूपा बद्दल विचारलं.
तेव्हा किशोर मांदळे, दिलीप चव्हाण, सुभाषचंद्र सोनार, गणेश रत्ना अनेक पुरुषांनी ह्या प्रतीकांना स्पष्ट शब्दात विरोध दर्शवला आहे. मकरंद जोशी तर विचारतात की हा नवा उत्सव गौरव आहे की का नवी बेडी? त्यांचं म्हणणं आहे की – “भारतीय परंपरेतले अनेक सण म्हणजे घरातील स्त्रीयांसाठी आकर्षक पध्दतीने घातलेली बंधने आहेत. या सण- उत्सवांची कर्मकांडे आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी/ पदार्थ / तयारी ही जणू फक्त घरातल्या महिलांचीच जबाबदारी आहे असा सार्वत्रिक समज अनुभवायला येतो. हे सण, याचे विधी नाकारण्याचे स्वातंत्र्य आजही सगळ्या स्तरांतील स्त्रीयांना नाही. या पारंपरिक कर्मकांडांमधून स्त्रीयांची पूर्ण मुक्तता झाली नसतानाच सावित्री उत्सव सारखी नवी कर्मकांड निर्माण होताना दिसत आहेत. जुन्या पठडीतून बाहेर पडताना त्याच धर्तीच्या नव्या पठडीचा जन्म होणार नाही याची काळजी घ्यायला नको का?”
या प्रतिक्रियेमुळे एक विरोधाभास अगदी स्पष्टपणे समोर आला. सावित्रीबाईंची जयंती असो नाहीतर जोतिबांचा स्मृतीदिवस असो; बरेच पुरुष त्यांना अभिवादन करताना म्हणतात की – “ कुठं गेल्या सावित्रीच्या लेकी? स्त्रीयांनी सावित्रीबाईंच्या कार्याची जाणीव ठेवली पाहिजे...पण आजची स्त्री वटसावित्रीच्या पूजेत वेळ वाया घालवतेय!” एका बाजूला पारंपरिक व्रत करण्याबद्दल टीका केली जाते. पण ‘सावित्रीउत्सव’ रुजवण्यासाठी जी प्रतिकं वापरायला सांगितलं जातं आहे – त्याबद्दल मात्र ही मंडळी चकार शब्द काढत नाहीत. शिवाय सावित्रिबाईंच्या कार्याची आणि त्यागाची जाणीव फक्त स्त्रियांनीच का ठेवायची? त्यांच्या त्यागामुळे पुरुषांना काहीच लाभ झालेला नाहीये का? पुरुषांचे सध्याचे सगळे वागणे सावित्रिबाईंच्या आदर्शाला स्मरून आणि त्यानुसारच चाललेले आहे का? - यावर मात्र  कोणीच काही म्हणत नाही. तसंच पुरुषांनी समाज परिवर्तनात पुढाकार घ्यायला पाहिजे – असंही म्हणत नाहीत.
पितृसत्तेने स्त्रियांना दुय्यम चिन्हे अंगीकारायला भाग पाडले. अनेक प्रथामधून आणि छद्मविज्ञानाच्या गावगप्पा सांगून कुंकू, मंगळसूत्र सारखी अनेक प्रतिकं माथी मारली, बायाबायांच्यात भेदभाव तयार केले. आता पुन्हा नव्या उत्सवाच्या निमित्ताने बायांच्या वरच रांगोळी , आडवी चिरी, पणती, गोडधोड करणे अशी कर्मकांडं लादली जाताहेत. थोडक्यात उत्सव नवा असला तरी जशी प्रतिकं जुनाट आहेत तशी त्यामागची मानसिकता देखील जुनीच आहे – असं आत्ता तरी दिसतं आहे!
“सावित्रीच्या लेकी” ना हा नवा सापळा लवकर लक्षात येवो, हीच आजच्या दिवशी सदिच्छा!

वंदना खरे 
संपादक,'पुन्हास्त्रीउवाच'