बेल हुक्स आणि समतेचं शिक्षण

नमस्कार! सर्वांना क्रांतिकारी जय भीम!

नुकतंच बेल हुक्स ह्या प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्तीचं निधन झालं. बेल हुक्सला कुठलंही एक लेबल लावलं तर तिच्या व्यक्तिमत्वावर अन्याय होईल असं मला वाटतं. तिने अनेक चळवळींमध्ये काम केले आहे, उदाहरणार्थ डाव्यांची चळवळ, स्त्रीवादी चळवळ, black स्त्रीवादी चळवळ इत्यादी. बेल हुक्स ही या काळातली अत्यंत महत्त्वाची कार्यकर्ती होती, तिने मांडलेले विचार आणि तिने दाखवलेला मार्ग खऱ्या अर्थाने क्रांतिकारी आहे.
बेल हुक्सला श्रद्धांजली म्हणून आज मी तिने लिहिलेल्या माझ्या आवडत्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे – Teaching to Transgress. Education as the practice of freedom. १९९४ साली हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.
खरं तर आपण जेव्हा एखाद्या आवडत्या पुस्तकाबद्दल बोलतो तेव्हा आपण नकळतपणे आपलंही व्यक्तिमत्व मांडत असतो. कारण कुठलंही पुस्तक आवडण्यामागे नेहमी दोन मुख्य कारणं असतात. एक तर ते पुस्तक आपलंच आयुष्य, आपलेच विचार आणि आपलेच अनुभव मांडत आहे असं वाटत असतं किंवा अगदी दुसऱ्या टोकाचं कारण, ते म्हणजे ते पुस्तक आपल्याला अजूनपर्यंत माहीत नसलेला नवा विचार, नवा अनुभव आणि एक नावं विश्व दाखवत असतं. बेल हुक्सच्या या पुस्तकाबद्दल बोलायचं झालं तर मला तिचं हे पुस्तक आवडण्यामागे वर नमूद केलेली ही दोन्ही कारणं आहेत.
म्हणून आधी मी माझ्या विचार- आणि अनुभवविश्वाबद्दल थोडक्यात सांगतो. माझं नाव जमीर कांबळे. मी पुण्यात राहतो. माझं जर्मन हा विषय घेऊन बी.ए., एम.ए. आणि एम.फिल असं शिक्षण झालं आहे. गेली २० वर्षं मी जर्मन भाषा आणि साहित्य शिकवत आलो आहे. परंतु विद्यार्थी म्हणून विद्यापीठाच्या कारभारामध्ये धर्म-जात-वर्ग-लिंग यांच्या आधारावर भेद केला जातो, राजकारण केलं जातं. शिक्षक म्हणूनही शिक्षणक्षेत्रात परिवर्तनाच्या शक्यता कशा नाकारल्या जातात हे अनुभवलं आहे. जर्मन भाषा अनेकदा जर्मन किंवा इंग्रजी माध्यमातून शिकवली जाते, यामुळे जे विद्यार्थी इंग्रजी भाषेच्या वर्चस्वामुळे मागे पडतात ते जर्मनकडे फिरकले तरी फार काळ टिकत नाहीत. शेवटी प्रवेशप्रक्रियेत आरक्षण असलं तरी शिक्षणप्रक्रियेत वंचित मुलं आपोआप स्वतःहून गळून पडतात.
जमीर कांबळे 

नुकतेच मी पुणे विद्यापीठातल्या स्त्री अभ्यास केंद्रामध्ये पुन्हा शिकत होतो. मी एलजीबीटी म्हणजे समलिंगी, उभयलिंगी, ट्रान्सजेंडर, द्विलिंगी वगैरे लोकांच्या प्रश्नांविषयी आणि हक्कांसाठी लिहितो, बोलतो. लैंगिकतेचे प्रश्न लिंगभावाच्या प्रश्नांशी जुडलेले आहेत असं लक्षात आल्यामुळे मी स्त्रीवादाचा अभ्यास सुरू केला. स्त्रीवादी विचारसरणीचा अभ्यास करताना पितृसत्तेची वर्णव्यवस्था, जातव्यवस्था आणि भांडवलदारी व्यवस्था यांच्याशी असलेली युती समजायला लागली. आणि मग अर्थातच स्त्रिया, गरीब, आदिवासी, कनिष्ट जाती, एलजीबीटी अशा असंख्य वंचित व्यक्तींच्या शोषणाला कारणीभूत असलेल्या व्यवस्थांना आणि त्यांच्या युतीला नष्ट करू पाहणारे क्रांतिकारी विचारवंत, त्यांनी मांडलेले चिकित्सक चिंतन मला प्रेरणा देऊ लागलं. एक मुक्तिदायी, समतेचं विश्व निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांनी दाखवलेला मार्ग जसा महत्त्वाचा आहे तसेच बेल हुक्ससारख्या स्त्रीचे विचार आणि तिचं कार्य तितकंच प्रेरणादायक आहे.
मुक्तिदायी विश्वाचा विचार मांडत असताना एका सच्च्या कार्यकर्त्याला एक प्रश्न नेहमी भेडसावत असतो, तो म्हणजे – माणसाला मुक्तिदायी कसं करायचं? कारण मुक्तीचा, समतेचा विचार तर करून झाला आहे आणि होतो आहे, परंतु आता हा विचार माणसामाणसांमध्ये कसा रुजवायचा हा मुलभूत प्रश्न आहे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “The ultimate aim of education is to cultivate the mind.”, तसंच बेल हुक्सलाही चळवळीच्या तिच्या प्रवासात शिक्षणाचं महत्त्व प्रकर्षानं जाणवू लागलं. मुक्तिदायी समाज उभा करण्यासाठी, माणसामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला मुख्यतः आपल्या शिक्षणपद्धतीमध्येच आमुलाग्र बदल घडवून आणावा लागेल – हे तिच्या लक्षात आलं. त्याचंच फलित म्हणजे हे पुस्तक.
या पुस्तकामध्ये मुक्तिदायी शिक्षणपद्धतीसाठी अनेक प्रेरणादायक मुद्दे बेल हुक्सने मांडले आहेत. ती म्हणते,
“शिक्षणक्षेत्र हे काही स्वर्ग नाही. परंतु शिकणं ही एक अशी जागा आहे जिथे स्वर्ग निर्माण करता येऊ शकतो. शाळेतील वर्गखोली तिच्या असंख्य मर्यादांसोबत एक जागा आहे शक्यतांची. शक्यतांच्या या क्षेत्रात आपल्याला एक संधी मिळालीय – मुक्तीसाठी कष्ट घेण्याची, स्वतःचं व आपल्या कॉम्रेड मित्र-मैत्रिणींचं मन व हृदय उदार आणि मोकळं करण्याची, जेणेकरून सामाजिक वास्तवाला आपण आव्हान देऊ शकू, आपल्याला एकजूट होऊन सीमारेषांच्या पलीकडे जाण्याची कल्पना करता येऊ शकेल, त्या सीमारेषा ओलांडता येतील. अशा तऱ्हेने शिक्षण ही नेहमी मुक्तीची साधना होऊ शकते.” शिक्षणाचा लावलेला हा अर्थ फार सुंदर आहे. शिक्षण माणसाचं मन आणि हृदय मोकळं व उदार करू शकतं.” (पान २०७, स्वैर भाषांतर)
ह्यालाच तर बुद्ध ‘करुणा’, “मैत्री” आणि “प्रेम” म्हणतात. फ्रेंच तत्त्वचिंतक आला बाड्यू म्हणतो प्रेमामध्ये क्रांतिकारी ताकत असते. आणि खरंच आहे. आपल्या मनात प्रेम नसेल, मैत्रीभाव नसेल, करुणा नसेल, केवळ स्वतःचं आयुष्य, स्वतःची सोय, स्वतःचा आनंद जिवंत ठेवण्याचा स्वार्थ असेल तर, मनीषा गुप्ते म्हणतात तसं आपल्याला कुणाचंच काहीही ऐकू येईनासं होतं, मग ते आदिवास्यांचे दुःख असो, शेतकऱ्यांचा लढा असो, ‘कनिष्ट’ जातींचं शोषण असो, स्त्रियांच्या व्यथा असो, किंवा भीक मागणाऱ्या हिजड्यांची ताली असो, आपल्याला काहीच ऐकू येत नाही. परंतु आपल्या मनाची आणि हृदयाची कवाडं खुलली, मोकळी झाली, उदार झाली तर? तर आपल्याला काय काय ऐकू येऊ लागतं! मग आपली सुखाची, सोयीची, थोडक्यात आनंदाची व्याख्याच बदलू लागते. जोवर इतर माणसं सुखी होत नाहीत, मी आनंदी होऊ शकत नाही, हे लक्षात येऊ लागतं. आणि आपलं सगळं आयुष्य मग आपण सगळ्यांच्या समतेसाठी झोकून द्यायला तयार होतो. बेल हुक्स म्हणते माणसांमध्ये असे परिवर्तन घडवून आणण्याची ताकत केवळ शिक्षणामध्ये आहे.
परंतु आजचं शिक्षणक्षेत्र, त्यातील शिकवण्याच्या पद्धती या सर्व ज्या तत्वाच्या आधारावर चालतात त्याला बेल हुक्स “banking system” म्हणते. आता शिक्षणाकडे आपण ‘माणुसकीची शाळा’ म्हणून पाहत नाही, शिक्षण म्हणजे नोकरी-व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचं दुकान. म्हणून जितकी महागडी शाळा तितकी या जगातील भांडवली स्पर्धेमध्ये जिंकण्याची शक्यता वाढत जाते. अशी शाळा केवळ स्पर्धा शिकवते. शाळेत शिकवली जाणारी ‘माहिती’ हे करुणा, मैत्री, प्रेम आणि समतेचं ज्ञान नसतं. ही माहिती केवळ स्पर्धेत जिंकण्यासाठी लागणारी कौशल्ये असतात. अशी शाळा आपल्याला विजयाचं मूल्य शिकवते, ज्यात विजय म्हणजे स्वतःच्या स्वार्थावर मिळवलेला विजय नसतो, तर स्पर्धेमध्ये जिंकणे, अर्थात जास्तीत जास्त पैसा आणि सत्ता मिळवणे म्हणजे विजय.
याचा अर्थ, आधुनिक शिक्षण आपल्याला भांडवलदारी व्यवस्थेशी जुळवून घ्यायलाच नाही तर या व्यवस्थेच्या स्पर्धेत पारंगत व्हायला शिकवते, यालाच आपण हल्ली “करियर” असा शब्द वापरतो. प्रेम, मैत्रीभाव, करुणा नाही तर आर्थिक सुबत्ता, सामाजिक सत्ता, वैयक्तिक प्रगती (“personality development”) ही आजच्या शिक्षणाची मूल्ये आहेत. आधुनिक शाळांच्या या स्पर्धात्मक मूल्यांच्या शिक्षणाची टीका करत असताना बेल हुक्स याच्या विरोधात ज्या क्रांतिकारी शाळेची कल्पना सुचवते, त्यात शाळेचा वर्ग ही वैचारिक उर्जांच्या देवाणघेवाणीची जागा असते. ‘प्रत्येकाला त्याचे आत्मभान व्हावं, त्याला दिलेल्या असंख्य ओळखींचं राजकारण त्याला लक्षात यावं, माणसामाणसांमधील विषमता, त्यांच्यातील विसंवाद, त्यांच्यातील दरी त्याला लक्षात यावी, त्याला पर्याय म्हणून करुणेचं, मैत्रीचं आणि समतेचं मुक्तिदायी राजकारण त्याला त्याला सुचत जावं’ - हाच बेल हुक्सच्या नव्या शाळेचा हेतू आहे.

या नवीन शाळेत शिक्षकाच्या भुमिकेबद्दलही बेल हुक्स सविस्तर सांगते. ती म्हणते समतेच्या शिक्षकांनी एक लक्षात ठेवले पाहिजे, ते म्हणजे की विद्यार्थ्यांसोबत स्वतः शिक्षकसुद्धा परिवर्तनाच्या प्रक्रियेतच आहेत. शिक्षक म्हणजे तो कोणीतरी पोचलेला विद्वान किंवा परिवर्तीत झालेला महापुरुष वगैरे नसतो. शिक्षक माणूस असतो, म्हणून प्रक्रियेत असतो. अशा प्रकारे बेल हुक्सच्या शाळेत सगळेच “are not, but are becoming.” म्हणून शिक्षकांनी वर्ग नावाच्या जागेलाही मुक्त, उदार आणि मोकळे केले पाहिजे, जिथे सगळ्यांना आपले विचार व अनुभव मांडायला, प्रश्न, समस्या आणि उपाय सुचवायला मुभा असेल. वर्गामध्ये शिक्षक या प्रवाहाचा केवळ संचालक असेल. त्याच्याकडे समस्यांचे निवारण आधीपासून नसेल, तशी अपेक्षा नसावी आणि तसा अविर्भाव त्याचाही नसावा. समस्या तर त्याला स्वतःलाही असतात, त्यानेही त्या समस्या बिनदिक्कत वर्गात मांडाव्यात, विद्यार्थ्यांसमोर त्यानेही मोकळं व्हावं, असलेल्या दोषांसकट स्वतःला मांडावं. समाजात समता हवी असेल तर आधी वर्गामध्ये समता रुजवली पाहिजे.
आज शिक्षणाची परिस्थिती अजून बिकट झाली आहे. शिक्षणक्षेत्रात भ्रष्टाचार, जात-वर्ग-लिंगभेद, हिंसेसारख्या भयंकर गोष्टी घडत आहेत. अशा बिकट परिस्थितीत बेल हुक्सने मांडलेले हे विचार खूप दिलासादायक आणि प्रेरणादायक आहेत. सगळ्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं, यावर चर्चा घडवून आणाव्यात आणि या विचारांना पुढे न्यावं, बेल हुक्सला ही एक खरी श्रद्धांजली असेल.

जमीर कांबळे

बाया आणि भाकऱ्या

मातीतल्या बाया दिवसाला पदरात झाकून दिवेलागणीला
घरी परतताहेत डालून घेताहेत घराच्या खुराड्यात 
चुलीत जाळून घेताहेत स्वत:ला भाजून घेताहेत तव्यावर
मातीतल्या बाया भाकर होताहेत
- ऐश्वर्य पाटेकर

मध्यंतरी एका शेतकरी कवयित्रीने त्या कुटुंबात रोज किती भाकऱ्या थापतात याचा आकडेवारीसह हिशेब दिला होता. स्त्री ही कवयित्री असो की प्राध्यापक, इंजिनिअर असो की डॉक्टर, व्यावसायिक असो की नोकरदार तिची ‘होममेकर’ म्हणूनच्या जबाबदारीतून सुटका झालेली नाही. सामंती प्रभाव टिकून असलेल्या ग्रामीण भागात तर हे वास्तव बिलकूल बदललेले नाही. ‘जशी उत्पादनव्यवस्था तशी विचारप्रणाली’, या नियमानुसार ‘पायातली वहाण पायातच बरी’ या विचारसरणीचा प्रभाव अजूनही कमी झालेला नाही.

स्त्रियांकडे स्वयंपाकाचे काम हे पितृसत्तेचा बळकट आधार असलेल्या कुटुंबसंस्थेच्या उदयानंतर आले. या कुटुंबसंस्थेच्या संरक्षणासाठी धर्माची रचना उभी राहिली. या रचनेत स्त्रियांच्या ‘गृहिणी’ म्हणूनच्या भूमिकेला गौरविले गेले. मनूने स्त्रियांच्या कर्तव्याबाबत ‘गृहार्थोSग्निपरिक्रीया’ (घरासाठी आगीवर पदार्थ शिजविणे हा पाकयज्ञ हा स्त्रीचा यज्ञच आहे.) अशी भूमिका घेतली होती.

जोतीराव फुल्यांनी शेतकरी स्त्रियांना सकाळपासून उपसाव्या लागणाऱ्या भाकरी थापण्यापासूनच्या कष्टाचे मार्मिक शब्दांत वर्णन केले आहे

सूर्य प्रकाशता भाकरीस थापी ॥ अवलास सोपी ॥ कालवण ॥१॥

स्वयंपाक होता पाटीमध्ये भरी ॥ घेई डोयीवरी ॥ शेतीं जाई ॥२॥

सर्वासंगे शेती काम करू लागे ॥ खाई ना ती मागे ॥ घरी घास ॥३॥

भिकारी ब्राह्मण धान्य ती वाटती ॥ भूदेवा पोशिती ॥ जोती म्हणे ॥४॥

शेतकरी स्त्रियांना उपसावे लागणारे हे कष्ट दुहेरी स्वरूपाचे आहेत :

1. शेतकरी स्त्रियांना कुटुंबांतर्गत स्वयंपाक वगैरे कष्ट करावे लागतात

2. कुटुंबाच्या बाहेर ह्या स्त्रिया उत्पादक श्रम वेचत असतात.

अर्थात, शेतकरी कुटुंबातून सामंत बनलेल्या कुटुंबातील स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनातील सहभागावर मर्यादा येते. अशा कुटुंबातील स्त्रियांना शेतावरील कामे करावी लागत नाहीत. अशा स्त्रियांसाठी ‘घर’ हे ताराबाई शिंदे यांच्या भाषेत ‘गृहबंदीशाळा’ बनते.
याबाबतीत माझा एक खासगी अनुभव सांगतो. ढासळते सामंतीपण जपणाऱ्या माझ्या घरातील कोणत्याही स्त्रीने स्वत:च्या शेतात काम केले नाही; परंतु गावाकडील माझ्या चुलत बहिणी स्वत:च्या शेतात काम करीत. आर्थिक विपन्नाअवस्थेतदेखील त्यांनी दुसऱ्याच्या शेतावर काम केले नाही. थोडक्यात, सामंती दर्जा प्राप्त झालेल्या; परंतु आर्थिक स्थिती ढासळलेल्या कुटुंबांची स्थिती ही “सुंभ जळाला तरी पीळ जात नाही”, अशी असते. अशा कुटुंबातील स्त्रियांना स्वत:च्या शेतावर काम करण्याची मुभा दिली जाते; परंतु दुसऱ्याच्या शेतावर काम करण्याची मुभा दिली जात नाही. १९७२-च्या दुष्काळावेळी अशा तथाकथित ‘घरंदाज’ घरांमधील स्त्रियादेखील रोजगारासाठी रस्त्यावर आल्या होत्या. परंतु, दुष्काळ संपल्यानंतर त्या पुन्हा घरात बंद केल्या गेल्या.
कनिष्ठ जातीतील स्त्रियांच्या बाबतीत मात्र असे घडत नाही. या स्त्रियांना घरातील कष्टासोबतच घराबाहेरील कष्टदेखील उपसावे लागतात. त्यांचे श्रम हे उत्पादनव्यवस्थेला उपलब्ध व्हावे यासाठी त्यांच्यावरील बंधने सैल करण्यात आलेली असतात. अशा स्त्रिया उत्पादनव्यवस्थेतील श्रम वेचण्यासाठी कुटुंबाबाहेर पडणे उत्पादनव्यवस्थेला आवश्यक बनते.
कुटुंबांतर्गत स्वयंपाक करणे, हे काम स्त्रियांचे मानले जाते; परंतु सार्वजनिक ठिकाणी जेव्हा स्वयंपाक केला जाई तेव्हा कुटुंबांतर्गत स्वयंपाक करण्याच्या या जबाबदारीचा विस्तार होई. पूर्वी जेव्हा लग्नं होत असत तेव्हा प्रत्येक कुटुंबातील एक स्त्री – शेजारणी – लग्नाच्या स्वयंपाकातील भागीदारीसाठी जात असे.
आमच्या गल्लीत लग्नप्रसंगी घरटी एक स्त्री स्वत:च्या घरातील पोळपाट-‘बेलनं’ घेऊन लग्नमंडपी सकाळीच हजर होई! लग्नात स्त्रिया मुख्यत: पोळ्या लाटण्याचे काम करीत. आमच्या गल्लीत मुख्यत: देशमुख, तेली, कुणबी, लेवा पाटील, ब्राह्मण अशा जातींची घरं होती. त्यांपैकी लग्नप्रसंगी केवळ मध्यमजातीय स्त्रियाच पोळ्या लाटण्यात भागिदारी करण्यासाठी जात असत! या स्त्रियांनी लग्नप्रसंगी स्वयंपाकासाठी एकत्र येण्याला त्यांच्या कामाच्या जागी एकत्र येऊन सोबत भाकरी खाण्याच्या अनुभवाची पार्श्वभूमी होती. वामन दादा कर्डकांनी त्यांच्या “माळणी” या गाण्यात हा ‘भाकरीधिष्ठित’ भगिणीभाव चित्तारला आहे :

“भिलाणी, कोळणी, तेलणी, साळणी मराठणी, माळणी गं 
 पोटासाठी एक ठिकाणीखपतो साऱ्या जणी गं
एकाच्या शेतावरी गाव सारा पाणी भरी
रक्ताच पाणी करी तवा मिळे मीठ भाकरी
अशीच निंदणी आणि खुरपणी भांगली कापणी गं...।।१।।”

श्रमाची प्रक्रिया स्त्रियांना आपापसातली जात विसरण्यास भाग पाडते : “जात आमची घरची घरी, मांगणी, बुद्धणी जरी”. पण तरीही बहुजन स्त्रियांमधील सीमित भगिनीभाव दिसून येतो. स्त्रिया जेव्हा कुटुंबात परततात तेव्हा त्या विभागल्या जातात आणि या भगिनीभावावर मर्यादा येतात. जात आणि वर्गाधिष्ठित घर आणि कुटुंबव्यवस्था स्त्रियांना अशी विभागते. असो.
थोडक्यात, लग्नप्रसंगी स्त्रियांनी पोळ्या लाटण्याची कृती ही स्त्रियांच्या विशिष्ट अशा भगिनीभावाची अभिव्यक्ती असली तरी अशा प्रथा पुरुषसत्तेच्या पोलादी चौकटीतच आकाराला येत होत्या, हेदेखील विसरता येत नाही. आता, लग्नात वगैरे स्वयंपाकाची कंत्राटी पद्धती आलेली असली तरी कंत्राटदार पुरुष हा प्राय: स्वयंपाकावर देखरेखीचेच किंवा भाजी तयार करण्याचे तुलनेत कमी श्रमाचे काम करतो. मान-पाठ एक करीत पोळ्या लाटण्याचे काम हे केवळ स्त्री कामगारच करतात.
पोळ्या लाटण्याच्या कामात अतीव श्रम गुंतलेले असतात. सार्वजनिक ठिकाणी जेव्हा हे काम स्त्रिया करतात, तेव्हा मान-पाठ एक करूनच हे काम करावे लागते.
महाराष्ट्रात जेव्हा ग्रामीण भागात वसतिगृहे आली तेव्हा अशा वसतिगृहांमध्ये स्त्रियांना स्वयंपाकाचे काम करावे लागले. मराठीतील एक सुप्रसिद्ध लेखक दया पवार यांनी त्यांच्या आईविषयी लिहिले आहे. अकोले तालुक्यातील अशाच एका वसतिगृहात जेव्हा त्या स्वयंपाकाचे काम करीत असत तेव्हा त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाकऱ्या थापाव्या लागत असत. दया पवार यांनी असे लिहिले आहे की, त्यांच्या आईने थापलेल्या भाकऱ्या एकत्र केल्या असत्या, तर भाकऱ्यांचा प्रचंड मोठा डोंगर तयार होऊ शकला असता. बहुजन समाजातील ह्या स्त्रियांचे हे कष्ट कवडीमोल किमतीने विकत घेतले जात असत, हे सांगण्याची आवश्यकता नाही.
वामन दादा कर्डकांनी “शेणाची भाकर” ही कविता लिहिली. “शेणाच्या कामाला जातंय / शेणाची भाकर खाते रं..” अशा शब्दांत त्यांनी भाकरीभोवती असलेली जातिधिष्ठित अर्ध-वेठबिगारी हतबलता आणि पितृसत्ता यांचे गुंफलेपण शब्दबद्ध केले. “साऱ्या समाजाला जशी साखर हवी, आम्हा गरीबाला आज भाकर हवी...” अशीही रचना करून त्यांनी भाकरीभोवतीचे विश्व आणि समाजातील अंतर्विरोध हेरले. भाकरीची भ्रांत दलित स्त्रियांनाही विवश करीत होती.
“भाकरी आणि लावणीमध्ये फारकत करता न येण्याजोगी विवशता” अशा शब्दांत प्रज्ञा पवार यांनी विठाबाई नारायणगावकर यांचे वर्णन केले आहे. भुकेलेल्या समूहाचा संघर्ष भाकरीच्या शोधार्थ राहिला. ही बोच “भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली” या शब्दांत नारायण सुर्वे यांनी व्यक्त केली. या संघर्षांची जाणीव सर्वच स्त्रियांनी ठेवली पाहिजे अशी अपेक्षा योगिनी सातारकर-पांडे व्यक्त करतात : “विस्थापितांच्या सगळ्या जखमा / भाकरीशी झगडण्यात सुकल्या / असं इतिहास आहे आपला / याचा विसर पडू देऊ नकोस” भाकरीसाठीच्या संघर्षासाठीची जाणीव व्यापक भगिनीभाव निर्माण करू शकते!
कालौघात महाराष्ट्र हळूहळू भाकरीकडून पोळीकडे संक्रमित झाला. अर्थात, राजस्थान-पंजाबमधील ‘हरित-क्रांती’ महाराष्ट्रात पोहचल्यानंतर ह्या स्त्रिया पोळ्या लाटायल्या लागल्या! स्त्रियांच्या जगण्यातील भाकरी ‘थापणे’ गेले आणि पोळ्या ‘लाटणे’ आले. आता पोळ्या लाटणे ही भाकरी थापण्यापेक्षा अधिक जिकरीचे काम स्त्रियांना करावे लागणार होते. नव्या समाजात लाटण्याविषयी नव्या म्हणी आणि वाक्प्रचार तयार झाले. शहरी समाजवादी स्त्रियांनी महागाईविरोधी मोर्चे काढताना स्त्रियांच्या हातात लाटणेच दिले!
आज मध्यमवर्गीय स्त्रिया पोळ्या लाटण्याच्या कामापासून काहीशा मुक्त होऊ पाहाताहेत. पण हे काम शेवटी एका स्त्रीकडून दुसऱ्या स्त्रीकडे वर्ग होते. आपण स्त्रीवर्गाचे असूनही आपले काम आपण दुसऱ्या कुठल्यातरी स्त्रीकडे वर्ग करतोय याविषयी अपराधीपणाची भावना एका फ्रेंच स्त्रीवादी अभ्यासिकेने व्यक्त केली होती. आपल्याकडे मात्र पोळ्या लाटणाऱ्या स्त्रियांविषयी सर्व प्रकारच्या जुन्यानव्या अपधारणा काम करताना दिसतात. एक पुरुषी कोडगेपणा मुरून राहिलेला आहे. मराठवाड्यातील एका पुरोगामी प्राध्यापकाच्या बायकोने ‘मराठा’ जातीची ‘पोळ्यावाली’ मिळेल का, अशी विचारणा केली होती. मराठवाड्यातील एका प्राध्यापकाने चारपदरी पोळ्या लाटण्याचा आग्रह पोळ्या लाटणाऱ्या बाईंकडे केला होता. इतर प्रदेशही यात मागे नाहीत. पुण्यातील कुप्रसिद्ध खोले प्रकरण सर्वश्रुत आहेच. पश्चिम महाराष्ट्रात “सौ. कुळकर्णी यांचे पोळी-भाजी केंद्र” अशा पाट्या दिसतात. “कांबळे पोळी भाजी केंद्र” असे कुणी सुरू केले तर ते केंद्र चालेल का?

भाकरी असो की पोळ्या; स्त्रियांची यापासून सुटका होणे आवश्यक आहे. अलीकडे महानगरांमधून पोळ्यांचे सार्वजनिक उत्पादन सुरू झालंय! पुणे व पिंपरी-चिंचवड येथे तब्बल एका वेळेसाठी पाच लाख पोळ्यांचा पुरवठा होतो व त्यासाठी येथे ३५ कारखाने कार्यरत आहेत. यातून तब्बल प्रत्येकी १० ते १५ हजार पोळ्या वितरित केल्या जातात, असं मध्यंतरी शुभा प्रभू साटम यांनी लिहिले होते. प्रत्यक्षात हे प्रमाण याहून खूप अधिक आहे. घरोघरी जाऊन पोळ्या लाटणाऱ्या ‘अनौपचारिक’ उद्योगातही दरशहरी हजारो स्त्रिया आहेत. अर्थात, अशाप्रकारे पोळ्या लाटून घेण्याचा व्यवहार हा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीयांची मिजास बनतो, हेही नाकारता येत नाही.
स्त्रियांची स्वयंपाकाच्या कामातून मुक्ती साधण्यासाठी समाजवादी स्त्रीवाद्यांनी “कम्युनिटी किचन” हा पर्याय सुचविला आहे. रशियन क्रांतीनंतर माशा कार्प यांनी नवी शक्यता कशी निर्माण झाली यांचे वर्णन केले:

“People forget what an incredible upheaval the 1917 revolution was," she says. "There was a huge movement to free the country from the czarism, bring happiness to poorer classes. People thought maybe it was a good idea to relieve a housewife from her daily chores so that she could develop as a personality. She would go and play the piano, write poetry, and she would not cook and wash up. The idea to have canteens and cafeterias was a continuation of this wonderful intention.”

अशा कम्युनिटी किचनच्या संकल्पनेतून काही सांस्कृतिक प्रश्न तयार होऊ शकतात. रशिया आणि चीन मध्ये ते तयार झाले.(पहा : https://www.npr.org/sections/thesalt/2014/05/20/314054405/how-russias-shared-kitchens-helped-shape-soviet-politics आणि https://www.atlasobscura.com/articles/peoples-commune-canteens-china)

पण ह्या समस्या सोडविता येऊ शकतात. चळवळीच्या प्रक्रियेत समूहांची लिंगभावसंवेदनशीलता घडवावी लागते. “खाना बनाना सिर्फ औरतों का काम नही”, हा विचार पुरुषही अरिष्टकाळात कसं स्वीकारतात हे पा. रंजिता यांनी ‘काला’ या चित्रपटात दाखविले. पण अशी तयारी केवळ अरिष्टकाळापुरती राहू नये, यासाठी जागे राहावे लागेल. भारतात स्वयंपाक या कृतीभोवती कमालीचे ‘खासगीपण’ आणि ‘पावित्र्य’ जुळलेले आहे. माझ्या घरी लहानपणी एक रामदासी पंथी महाराज यायचे. आमची हवेली मोठी आणि आरामदायी असल्यामुळे ते आमच्याकडे उतरायचे; पण त्यांचा स्वयंपाक करण्यासाठी मात्र आईला ब्राह्मण स्त्रियांची मनधरणी करावी लागे. त्यांना आमच्याकडचा कोरडा ‘शिधा’ चाले; पण ओला स्वयंपाक नाही. हे असले लाड! मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांनी स्वयंपाक न करण्याची प्रथा तर अगदी अलीकडच्या काळापर्यंत अस्तित्वात होती. अजूनही आहे!
कोवीड -१९ महामारीच्या काळात अनेक प्रकारचे वास्तव पुढे आले. केरळमध्ये डाव्या संघटनांच्या पुढाकाराने ‘कम्युनिटी किचन’ चालविली गेली. कम्युनिटी किचनसंदर्भातील निर्णय पुरुषी मानसिकतेच्या आणि पवित्र-अपवित्र अशा धारणांनी ग्रस्त पुरुषांनी घेण्यापेक्षा सर्वसामान्य स्त्रियांना घेऊ दिला पाहिजे. तसेही, पुण्यासारख्या शहरात उचचजातीय व अर्थात उच्चवर्गीय कुटुंबांनी आता स्वयंपाकापासून अंशत: सुटका करणारी ‘सर्व्हिस्ड् अपार्टमेंट’ ही संकल्पना आनंदाने स्वीकारलेली आहेच. 
याबाबतीत पर्यायी विचार केला नाही तर, सारिका उबाळे यांनी या कवितेत मांडल्याप्रमाणे स्त्रियांचे असे जीवन जरठीकृत रूपात अस्तित्वात राहीलच राहील :

स्वतः भोवती गोल गोल फिरत राहातात बाया...
कधी दोन पदरी
कधी तीन पदरी
कधी चौपदरी कधी गोल,
कधी त्रिकोणी, कधी चौकोनी
तेलाच्या, तुपाच्या,
बीनतेलाच्या, कोरड्या,
मऊसूत पोळ्या, फुलके, पराठे
लाटत राहातात बाया
कळायला लागल्यापासून
कळेनासं होईपर्यत
हातापायातलं त्राण जाऊन
शुद्ध हरपेपर्यंत
सासरी माहेरी पाहुणचारी
हॉस्टेल, रेस्टॉरंट, हॉटेल, खानवळी..
लग्न, बारसे, तेरवी, दशक्रिया
रिसेप्शन, प्रकाशन, पूजा, कंदुरी...
शेतात, रानात, पालात, घराघरात
गोलगोलगोलगोलगोलगोल
पोळ्या लाटत राहातात बाया
थापत राहातात भाकरी
रपारपरपारपरपारपरपारप
कणिक-पाणी, पीठा-मीठासोबत
स्वतःला मळून घेत
गोलाकार गोलाकार गोलाकार गोलाकार
फिरत राहातात बाया
पृथ्वीच्या उगमापासून अंतापर्यत..
ताटात पोळी होऊन मुकाट
पडत राहातात बाया
फक्त भूक होऊन मागे
उरत राहातात बाया...



दिलीप चव्हाण

स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड 

 

  

 

 

कहाणी समभाव व्रताची ...



एक आटपाट नगर होतं, त्या नगराला होता एक राजा, सुखाचा होता गाजावाजा - पण राजा भोगत होता सजा. 
कारण तो कधीही बाहेर पडला की त्याला दिसतच नसे त्याची अर्धी प्रजा. म्हणून त्याला प्रश्न पडे, राज्यातल्या स्त्रिया गायब कशा? कधी दिसल्या तरी त्या भीतीच्या छायेखाली कशा? त्याने मंत्र्यांना विचारलं, प्रधानाला विचारलं, गावात चौकशी केली, नगरात चौकशी केली. पण कोणाकडेच त्याचं उत्तर नव्हतं. राजाचं मन दुखत होतं. तो रस्त्यावर गेला, बाजारात गेला, शाळेत गेला, दवाखान्यात गेला, त्याला सगळीकडे पुरुष दिसले नामी आणि स्त्रियांची संख्या फारच कमी. राजाची खंत काही कमी होईना,राजाला राज्य करायला सुचेना. मग एक दिवस त्याने राजवाडा सोडला आणि आपल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी वेषांतर करून इकडेतिकडे भटकू लागला.
आपल्या नगरातली स्त्रियांची प्रजा निर्भय कशी होईल? ती स्वतःहून अनेक कार्यात भाग कधी घेईल? राजाला काही कळेना. राजा असा रानावनात फिरत असतांना राजाला दिसली एक स्त्री. ती निर्भीडपणे तिथं बसली होती. तिने वेषांतर केलेल्या राजाकडे बघूनच त्याला ओळखलं. आणि दमदार आवाजात म्हणाली, “राजा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याजवळ, फक्त विवेकानं विचार कर केवळ”
तिचं बोलणं ऐकून राजाला खूप आनंद झाला, त्याला वाटलं आता आपल्याला नक्की मार्ग सापडेल.
तो म्हणाला,“ हे विदुषी, मी काही न सांगताच तू मला ओळखलं, तूच कर माझ्या समस्येची उकल. पण माझ्या राज्यातल्या सगळ्या बाया मोकळेपणाने वावरल्या पाहिजेत.”
“ राजा, तुझ्या समस्येवर उपाय सांगून उपयोग काय? तो अमलात आणण्याइतकी ताकद तुझ्यात नाही.”
“ हे विदुषी, मी माझे सगळे सैन्य कामाला लावेन, तू मला फक्त काय करायचे तेवढे सांग”
“ अरे मूर्खा, हे सैन्यबळाने होणारे काम नव्हे, त्याला लागेल इच्छाशक्ती.
“ बाई,बाई तू म्हणशील ते आम्ही करू”
“राजा, बोलू नको नुसता गोडगोड, शब्दाला लागते कृतीची जोड! तुला आणि तुझ्या राज्यातल्या प्रत्येक पुरुषाला एक व्रत करावं लागेल. पण कोणताही पुरुष करत नाही कसलेच व्रत, म्हणून घडतात गुन्हे परत परत.”
“ नाही, नाही. आता असे होणार नाही. मला त्या व्रताचे नाव तरी सांग.”
“तुला रे व्रत सांगून उपयोग काय? हे मोठे कठीण व्रत आहे. तू उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील.”
“मी उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.” राजाने कबूल केले.
राजाचे बोलणे ऐकून विदुषी प्रसन्न झाली,तिने सांगितले - “ व्रताचे नाव आहे – समभाव व्रत. पण हे व्रत एकट्याने करून चालत नाही. राज्यातल्या सगळ्या पुरुषांना हे व्रत करावे लागेल.”
हे ऐकून राजा विचारात पडला. तरी तो म्हणाला, “काही हरकत नाही. मी सर्वांना या व्रताचे पालन करायचा हुकूम करतो. या व्रताचा वसा कसा वसायचा?”
“हे बघ राजा, व्रतांचे पालन हुकूम केल्याने, कायदे केल्याने होत नसते. तुझ्या राज्यात स्त्रियांच्या रक्षणासाठी खूप कायदे आहेत, तरी त्यांची भीती कमी का होत नाही? यावर कधी विचार केलास का?”
“ मी तर बराच विचार केला, नागरिकांना विचारलं, दरबारी लोकांना विचारलं, विद्वानांना विचारलं – पण आम्हाला काही समजलं नाही.”
विदुषी हसली आणि म्हणाली, “ पण तू स्त्रियांना विचारलंस का? निदान तुझ्या राणीला तरी विचारलंस का? तुझ्या पूर्वजांनी जी चूक केली तीच तू देखील करतो आहेस. स्त्रीला भीतीच्या छायेत वाढवलं. तिचं रक्षण करण्याच्या प्रयत्नात तिला घरात डांबून ठेवलं, आणि तिला अधिक दुर्बल केलं. तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं. तिला निर्णय प्रक्रियेतून बाजूला पाडलं.”

“पण मला मनापासून वाटतं की स्त्रियांना समान हक्क असले पाहिजेत. त्यासाठी मी कायदे केलेत. त्यांच्यासाठी कायदे करूनही त्या कायद्यांचा फायदा घेत नाहीत. याचंच फार वाईट वाटतं.” राजा म्हणाला.
“राजा, तुझ्या राज्यातल्या स्त्रिया घराच्या बाहेर पडायला घाबरतात. इथं लहान मुलीसुद्धा आपल्या बापापासून, शिक्षकापासून सुरक्षित नाहीत. रस्त्यावर आपल्याला कधी कोण नागडं करेल याची भीती प्रत्येक स्त्रीच्या मनात दडलेली आहे. प्रत्येक आई आपल्या मुलीला हीच भीती वारश्यामध्ये देते. म्हणून या स्त्रियांनी स्वतःला चार भिंतीत कोंडून घेतलं आहे.” विदुषी म्हणाली.
“पण मी तर अनेक योजना आणल्या आहेत. ठिकठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. त्यांना रात्रीच्या वेळी बाहेर पडू नका हे सांगून ठेवलंय, जर त्यांच्या बाबतीत काही गुन्हा घडला तर त्यावर मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.”
“तरीही स्त्रिया का घाबरतात? याचा विचार तू केला आहेस का?”
“आता यापेक्षा जास्त मी काय करू ? तूच सांग ”
“म्हणूनच सांगते राजा, तुझ्या राज्यातल्या सर्व पुरुषांनी हे समभाव व्रत करावं.”
“या व्रतात काय काय करावं लागेल? कधी उपवास करायचा ? कुणाची पूजा करायची? ”
“तुम्हांला सवय नाही कुठल्याच व्रताची, सवय नाही उपवासाची. तुम्हांला काय माहित संयमाचा महिमा? तुम्ही बेताल होवून लावता माणुसकीला काळिमा.”
“नाही नाही देवी, आज माझ्या राज्यात असे अनेक पुरुष आहेत,ज्यांना खरोखरच स्त्रियांनी निर्भय होवून जगावं वाटतं. आम्ही सगळेजण स्वत: मनोभावे व्रत करू आणि इतर पुरुषांना व्रताचा महिमा सांगू”
“ तर मग ऐक. हे समभाव व्रत रोज, प्रत्येक क्षणी मनात ठेवायचं आहे. त्यासाठी नको पूजा, नको उपवास. हवी एक जाणीव की स्त्री आहे एक माणूस. माणूसपणाचे सर्व हक्क तिला मिळायला पाहिजे.”
“पण सगळ्या स्त्रियांना समतेचे हक्क मी केव्हाच दिलेत !”
“आणि तुला ते हक्क कोणी दिले?” विदूषीने विचारले. राजाला त्या प्रश्नातली खोच समजली. तो गप्प बसला, विचारात पडला.
तेव्हा ती म्हणाली, “ जसे पुरुषांना नैसर्गिक हक्क आहेत, तसेच स्त्रीला सुद्धा नैसर्गिक हक्क आहेत. तुम्ही तिला एखाद्या वस्तूसारखं सांभाळायला ती तुमची संपत्ती नाही. ती ही माणूस आहे,जसा पुरुष आहे! तिच्या शरीरावर आणि मनावर तिचा हक्क आहे; हे सतत लक्षात ठेवणं - हेच समभाव व्रत आहे आणि ते सर्वांना एकाच वेळी करावं लागेल.”
“ ठीक आहे, आम्ही सर्व पुरुष मिळून हे लक्षात ठेवू. आम्ही असं वातावरण तयार करू, ज्याने स्त्रीला घराबाहेरच्या जगाची भीती वाटणार नाही. तिची कुचंबणा होईल असं आम्ही वागणार नाही. ती रस्त्यावर, शाळेत, बगीच्यात सगळीकडे मोकळेपणे वावरू शकेल असं वातावरण आम्ही पुरुष निर्माण करू.”
“ पण राजा, हे व्रत तुम्ही फक्त बाहेरच्या स्त्रियांसाठी करायचे नाही आहे. तर तुमच्या घरातल्या स्त्रियांसाठी सुद्धा करायचे आहे. तुला जसा बाहेरच्या पुरुषांपासून आपल्या घरातल्या स्त्रियांना धोका आहे असं वाटतं, तसाच इतर पुरुषांना सुद्धा तुझ्यापासून धोका वाटतो. इथं पुरुषच पुरुषाचा वैरी होतों आणि मग अनेक हत्या होतात, खून होतात. कट कारस्थाने होतात.”
“तुझं म्हणणं मला समजलंय. पण आमच्या या व्रताची सांगता कशी करायची?”
“ तुझ्या राज्यातली कुठलीही स्त्री जेव्हा घरातून कोणत्याही वेळी बाहेर पडायला घाबरणार नाही, जेव्हा तिला तिच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार नाही आणि कुठल्याही पुरुषाला स्त्रीच्या शरीराचा, मनाचा ताबा घ्यावा अशी इच्छा होणार नाही - तेव्हाच या व्रताची सांगता होईल.”
“ हे समभाव व्रत खूपच कठीण दिसते. यासाठी आम्हाला आमच्या मन, विचार, भावना यात खूपच बदल करावा लागेल. पण मी स्वत: आजपासून प्रयत्न करायला सुरुवात करतो. आम्ही सगळे पुरुष हे जग आता सुंदर, निर्भय करण्याचा प्रयत्न करू.”
राजाचे हे शब्द ऐकून विदुषी समाधानाने हसली आणि अंतर्धान पावली. अशा पद्धतीने राजाने हे व्रत घेतलं आणि त्याने अनेक पुरुषांना ते सांगितलं. पण अजून त्याची सांगता मात्र झालेली नाही. ही कहाणी सुफळ संपूर्ण होण्यासाठी किती वर्ष वाट पहावी लागेल हे पुरुषांवरच अवलंबून आहे.

अश्विनी बर्वे 
नाशिक 
 

अवघड जागचं दुखणं (fistula, piles, fissure)

मी तेव्हा मेडिकलच्या दुसऱ्या वर्षाला होते. माझी आई नोकरी करायची त्यामुळे मी घरी यायचे तेव्हा घरात नसायची. पण त्या दिवशी मी आले आणि काही वेळाने बाबांचा फोन आला, आईचे पाईल्सचे ऑपरेशन झालंय आणि ती केईएम (KEM) मध्ये आहे. उद्या घरी येईल. सकाळी माझ्या मावस बहिणीबरोबर ती हॉस्पिटलमध्ये जाणार होती. त्या काळात मोबाईल फोन नसल्याने मी तिथेच असूनही मला कळवता आले नव्हते. मी दुसऱ्या दिवशी आईला भेटले. तिचा केस पेपर वाचला तेव्हा समजले की तिला ऍनल फिशर होता, पाईल्स नव्हत्या. त्यासाठी तिच्या गुदद्वाराच्या तोंडाशी असलेल्या स्नायूंची घट्ट रिंग तोडली होती. त्यामुळे ह्यापुढे तिला जेव्हा मल विसर्जन करण्याचे वेग येतील तेव्हा ते थांबवता येणार नव्हते. हे नवरात्रात नऊ दिवस कडक उपास केल्याने झाले होते. माझ्या देखत सर्जन तिला खूप रागावले आणि ह्यापुढे सगळे उपास बंद असे तिच्याकडून त्यांनी वदवून घेतले. मी मेडिकलला गेल्यावर आषाढीकार्तिकी सकट सगळे उपास बंद केल्याचा आनंद मला तेव्हा झाला!

गुदमार्गाचे तीन आजार मूळव्याध, फिशर आणि फिस्टूला हे स्वतंत्र व वेगवेगळे आजार असले तरी ते मूळव्याध किंवा पाईल्स ह्या नावानेच ओळखले जातात. हे तिन्ही आजार स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. लाजेमुळे बायका सर्जनकडे न जाता लेडी डॉक्टरकडे जातात किंवा नुसते मला असं होतंय असं सांगून आयुर्वेदिक, निसर्गोपचार चिकित्सक किंवा अगदी केमिस्ट कडूनही औषधे आणून स्वत:च स्वत:वर उपचार करतात आणि खूप काळ त्रास सहन करतात. मात्र ह्या आजारांच्या मूळ कारणाकडे लक्ष न देता वरवरचे उपचार करत राहतात. त्यामुळे नंतर हे आजार गंभीर स्वरूप धारण करतात.
 
लक्षणे
  • शौचानंतर रक्तस्त्राव – हे रक्त लालभडक रंगाचे असते.
  • गुदद्वाराजवळ खाज
  • गुदद्वाराजवळ बाहेर आलेला कोंब – हा कोंब शौचानंतर हाताने आत ढकलावा लागू शकतो
  • शौचानंतर गुदद्वारातून चिकट स्त्राव येणे
  • गुदद्वाराजवळ दुखणे, लाल होणे किंवा सूज येणे
  • ऍनिमिया
आता आपण मूळव्याध, फिशर आणि फिस्टूला या तीनही मध्ये काय फरक आहे ते थोडक्यात समजून घेऊ या.

१. पाईल्स(piles) किंवा मूळव्याध

ह्यात गुदद्वाराच्या आतल्या आवरणाच्या रक्तवाहिन्या फुगतात. ह्या हाताला लागतात आणि मलामधून रक्त पडते.

२. फिस्टूला(fistula) किंवा भगेंद्र

ह्यात गुदद्वाराच्या आतील भाग आणि बाहेरची त्वचा ह्यात ऍबनॉर्मल कनेक्शन तयार होते. त्यातून पू बाहेर येतो.

३. फिशर(fissure)

ह्यात गुदमार्गाच्या आतल्या आवरणाला भेगा पडतात. मल विसर्जनाच्या आधी आणि नंतर प्रचंड दुखते. नंतर दिवसभरात हळूहळू दुखणे कमी होते. त्यामुळे शौचाला जाणे टाळले जाते आणि त्रास आणखी वाढतो.

आता थोडे विस्ताराने हे आजार समजून घेऊ या.

पाईल्स(piles) किंवा मूळव्याध

पाईल्सचे मुख्य कारण बद्धकोष्ठता हे आहे. मलविसर्जनाच्या वेळी जोर करावा लागल्याने पोटातील दाब वाढतो आणि रक्तवाहिन्या फुगतात. कारण त्यातील रक्त हृदयाकडे परत जात नाही. त्यांची आवरणे ताणली जाऊन जोर लावणे चालूच राहिले तर एक दिवस त्या फाटतात. त्यांनतर शौचावाटे (स्टूल मधून) रक्त जाऊ लागते. दुखत नसल्यामुळे खूप रक्त जाऊन ऍनिमिया होतो. त्यामुळे ऍनिमिया हे पहिले लक्षण असू शकते.
माझ्या वडिलांचे एक मित्र सांगत होते की माझे हिमोग्लोबिन खूप कमी होतंय. पुरुषांमध्ये ऍनिमिया असेल तर शौच (स्टूल) तपासावेच लागते. तर त्यांच्या स्टूल मधून रक्त जात होते. त्यांना सर्जन कडे पाठवले तर पाईल्स चे निदान झाले. नंतर त्यांचे ऑपरेशन झाले.
पाईल्सची आणखी कारणे म्हणजे स्थूलपणा, गर्भधारणा (प्रेग्नन्सी), आहारात तंतुमय पदार्थ कमी असणे, पाणी कमी पिणे आणि वार्धक्य ही आहेत.

फिस्टूला(fistula) किंवा भगेंद्र
ह्यामध्ये गुदद्वाराच्या आतील ग्रंथींना इन्फेक्शन होते. ह्याचे कारणही शौचाच्या वेळी जोर केल्याने मलाचे काही कण त्या ग्रंथीच्या नलिकेत जातात व तिचे तोंड बंद झाल्याने त्यातील स्राव साठून राहतो व त्यात जीवाणू (बॅक्टेरिया) वाढतात आणि पू तयार होतो. ह्याचे प्रमाण जास्त झाले की दाब वाढतो आणि हा पू त्वचेतून बाहेर येऊ लागतो. हे इन्फेक्शन मूत्रमार्गापर्यंत पोचून त्याचेही इन्फेक्शन होते. त्यामुळे मल मूत्र विसर्जनाच्या वेळी खूप दुखते. गुदद्वारातून रक्त, पू बाहेर येतो. त्याला घाण वास येतो. ताप, थकवा येतो.
म्हणजेच शौचाच्या वेळी जोर करणे आणि बद्धकोष्ठता ही मुख्य कारणे आहेत. मात्र ह्याची काही गंभीर कारणेही असू शकतात. उदा टी बी, कॅन्सर, मोठ्या आतड्यातील अल्सर वगैरे.

फिशर(fissure)

ह्यामध्ये गुदद्वाराच्या बाजूला आणि आतमधील आवरणास भेगा पडतात. त्या डोळ्यांनाही दिसतात. शौचाला खडा होत असेल तर त्यामुळे गुदद्वाराचे आवरण खरचटले जाऊन त्याला जखमा होतात. स्टूल मध्ये थोडेसे रक्त असते.
ह्यात शौचाच्या वेळी आणि नंतर प्रचंड दुखते. हे दुखणे रात्रीपर्यंत कमी होते. पुन्हा सकाळी दुखते.
ह्याचेही मुख्य कारण पाणी कमी पिणे, तंतुमय पदार्थ कमी खाणे व त्यामुळे होणारे बद्धकोष्ठ हे आहे.
प्रचंड दुखण्यामुळे डॉक्टरांचा सल्ला लौकर घेतला जातो पण सर्जन कडे जाण्यास टाळाटाळ केली जाते. ह्या जखमा खूप खोल झाल्यास इमर्जन्सी ऑपरेशन करावे लागते.
फिशर चे आणखी एक कारण गुदसंभोग हे सुद्धा आहे. पुरुष होमोसेक्शयूअल, ट्रान्स जेंडर ह्यांच्यामध्ये हे दिसून येते.

निदान
ह्या तीनही रोगांचे निदान गुदमार्गाची बोटाने तपासणी करून होते. आपण सर्जनकडे गेल्यावर ते आपल्याला एक कुशीवर आडवे पडून एक पाय पोटाजवळ घेण्यास सांगतात. नंतर बोटाने तो भाग 'बघतात'.
लाज, संकोच ह्या कारणांसाठी सर्जनकडे जाणे टाळू नये. लौकर समजल्यास तिन्ही रोग लगेच बरे होतात.

उपाय आणि प्रतिबंध
असे म्हणतात की शंभर कामे सोडून जेवून घ्यावे आणि हजार कामे सोडून शौचाला जावे. आपण जे कमावतो ते खरे तर पोट भरण्यासाठी असते. मात्र विशेषतः स्त्रिया स्वतःच्या जेवणाची खूपच आबाळ करत असतात. आणि हे आजार लौकर सांगितले जात नाहीत.  

१.आहारातील तंतुमय पदार्थ वाढवणे. किंवा फायबर असलेली औषधे घेणे.

२.पाणी आणि इतर पातळ पदार्थ जास्त घेणे.

३. परगेटिव्ह औषधे घेणे.

४.शौचाला जोर न करणे

५.नियमित व्यायाम आणि वजन कमी करणे.

साध्या उपायांनी पाईल्स बऱ्या झाल्या नाही तर शस्त्रक्रिया करावी लागते. त्यात अनेक मार्गांनी ह्या रक्तवाहिन्या बंद केल्या जातात. मात्र ऑपरेशन नंतर बद्धकोष्ठ होऊ नये म्हणून आधी सांगितलेले आहारविहारातील बदल करावेच लागतात. 
फिस्टूलाचे निदान झाल्यावर तो कुठून कुठपर्यंत आहे ते शोधण्यासाठी सोनोग्राफी, एनल स्कोपी, फिस्टूलोग्राफी वगैरे करावी लागते.ह्यावर शस्त्रक्रिया हाच उपाय आहे. 
फिस्टूला पूर्णपणे बाहेर काढला जातो. मात्र पुन्हा होऊ नये म्हणून वरील जीवनशैली चे बदल करावेच लागतात.

फिस्टूलावरील उपाय - हाय फायबर डाएट, सौम्य लॅक्झेटिव्ह, शौचाला जाणे न टाळणे, शौचाआधी आणि नंतर ऍनेस्थेटीक क्रीम लावणे, टब मध्ये गरम पाणी घेऊन त्यात बसणे व गुदद्वाराचा भाग शेकवणे आणि गरजेनुसार अँटिबायोटिक्स. जर जखमा खोल असतील तर ऑपरेशन करतात. ह्यात गुदद्वाराच्या स्नायूंची रिंग तोडतात ज्याने मल सहज बाहेर पडतो. पण त्यानंतर त्या व्यक्तीला शौच लागल्यास लगेच जावे लागते. अडवू शकत नाही.
ह्यावरून हे लक्षात येईल की आपण जे अन्न खातो त्यामुळे आपल्याला पोषण तर मिळाले पाहिजेच शिवाय त्यापासून योग्य प्रमाणात, मऊ स्टूल सुद्धा तयार झाले पाहिजे. तसेच मल विसर्जनाचे वेग येतात तेव्हा लगेच त्याचे विसर्जनही झाले पाहिजे.
स्त्रियांच्या खाण्याच्या आवडी, खाण्याचे प्रमाण, उपास तापास, स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे किंवा कामाच्या घाईमुळे शौचाचे वेग जिरवणे, बैठे काम, व्यायामाचा अभाव ह्या सर्व कारणांनी स्त्रियांनामोठ्या प्रमाणात  हे आजार होतात. जर काही लक्षणे दिसली तर लौकरात लौकर जीवनशैलीत बदल करावा. आणि संकोच न करता डॉक्टरचा सल्ला घ्यावा. 

डॉ. मंजिरी मणेरीकर

 

 


पित्ताशयातील खडे (Gall Stones)

स्त्रियांचे रोग म्हणजे आपल्याला फक्त गर्भाशयाचे आजार अशी समजूत असते. मात्र काही सर्वसाधारण आजार असे आहेत की जे प्राधान्याने स्त्रियांनाच होतात. पित्तखडे(Gall Stones) हा त्यापैकीच एक आजार आहे. चमचमीत, तेलकट खाणे, व्यायामाचा अभाव, तंतुमय पदार्थ कमी खाणे, व्रतवैकल्य, उपासाच्या नावाखाली मांसाहार न करणे, खूप वेळ उपाशी राहणे आणि स्त्री मधील हॉर्मोन इस्ट्रोजन ह्या कारणांनी स्त्रियांमध्ये हे जास्त प्रमाणात होतात. पुरुषांमध्ये खूप दारू पिण्याने लिव्हर सिरोसिस झाल्यास हे खडे होतात.

मी सध्या ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते तेथे ऑगस्ट महिन्यात २२ शस्रक्रिया (सर्जरी) झाल्या, त्यापैकी १४ गॉल ब्लॅडरच्या होत्या आणि ज्यांच्यावर झाल्या त्यापैकी १३ स्त्रिया होत्या! त्यांचे वय २६ ते ६१ दरम्यान होते. मला आठवतंय माझ्या ओळखीच्या एका सर्जननी मला सांगितले होते की त्यांच्या मुलीच्या मैत्रिणीचे पित्ताशय १५ व्या वर्षीच काढून टाकावे लागले होते. ऑपरेशन नंतर खाण्यापिण्याची खूप बंधने येतात कारण फॅटचे पचन होत नाही. कल्पना करा या मुलीचे जगणे किती कठीण झाले असेल? तसा कोणताही अवयव महत्वाचा असतोच. गर्भाशय काढून टाकलं तर त्यातल्या त्यात वय झालेलं असेल तर कमी नुकसान होतं. पण पित्ताशय पचनासाठी आवश्यक आहे त्यामुळे ते कायमच गरजेचं आहे. जितकी आपली पचनशक्ती चांगली तितकं आपलं आरोग्य चांगलं. आपल्या आरोग्यविषयक बेफिकीरीमुळे आपण आपल्या हाताने पित्ताशयाचं नुकसान करत असतो.
source- wikipedia
माझी मैत्रीण वैशाली तशी पहिल्यापासून स्थूलच. उपास तापास खूप करायची. पण दिवसभर काही खायचे नाही आणि रात्री भरपूर खायचे. शिवाय तळलेले पदार्थ, पाणीपुरी हे सगळे खूप आवडीचे आणि अगदी ताव मारायची. ती मला काही दिवसांपासून सांगत होती,’ मला उजव्या खांद्याजवळ, पाठीत दुखते. कधी कधी मळमळते आणि उलटीही येते.’ त्यामुळे हार्टचा प्रॉब्लेम असेल का? अशी शंका तिला सतत सतावत होती. तिने ईसीजी काढला तो नॉर्मल होता. आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि अलोपॅथी सगळ्या डॉक्टरांची औषधे घेतली. पण दुखणे काही थांबत नव्हते. मी तिला म्हणाले की, सोनोग्राफी करून घे. कदाचित तुझ्या पित्ताशयात खडे असतील. तर ती म्हणाली – ‘छे छे, मला पित्त कधीच होत नाही.’ हे ऐकून मला हसू आले. मी तिला सांगितलं की – ‘पित्त’ हा शब्द एकच असला तरी तू सांगतेस ते पित्त म्हणजे ऍसिडिटी, जी जठरातील हायड्रोक्लोरिक आम्लामुळे होते. आणि पित्ताशय म्हणजे इंग्लिश मध्ये गॉल ब्लॅडर.
“हे पित्ताशय यकृताच्या (लिव्हर) मागच्या बाजूला असते. ही एक स्नायूंची पिशवी असते. लिव्हरमध्ये पित्त तयार होते आणि पित्ताशयात साठवले जाते. त्यापासून निघणारी पित्तनलिका लहान आतड्याच्या पहिल्या भागात (duodenum) उघडते. पित्तरसात कोलेस्टेरॉल आणि बिलिरुबिन असते. शिवाय काही क्षारही असतात. जेव्हा अन्न जठरातून लहान आतड्यात येते तेव्हा पित्ताशय आकुंचन पावते आणि पित्तरस लहान आतड्यात येतो. पित्तरसाचे काम स्निग्ध पदार्थांच्या पचनाला मदत करणे हे असते,” इतके सांगितल्यावर तिला पित्त आणि पित्ताशयातील फरक स्पष्ट झाला,

“मात्र या पित्ताशयात खडे कसे होतात?” हा प्रश्न शिल्लक होताच!

“तुझ्यासारख्या तळलेले पदार्थ खूप खाणाऱ्या, मध्येच दिवसभर काही न खाणाऱ्या, बैठे काम करणाऱ्या बायकांमध्ये हे खडे होण्याचे प्रमाण जास्त असते. कारण गॉल ब्लॅडरचे काम फॅट च्या पचनाला मदत करणे हे असते. पण मधेच खूप वेळ अन्न नाही, शरीराला हालचाल नाही असे बराच काळ झाले की त्याचे काम मंदावते. त्यात पित्तरस साठून राहायला लागतो. जास्त फॅटी पदार्थ खाणाऱ्यांचा कोलेस्टेरॉल जास्तच असतो. मग पित्तरस साचून घट्ट होऊन त्याचे खडे बनायला लागतात. जोपर्यंत हे पित्ताशयात असतात तोपर्यंत काहीच लक्षणे दिसत नाहीत. मात्र ते पित्तनलिकेत गेले की उजव्या खांद्याजवळ दुखणे, तो हलत असतो तेव्हा मळमळणे, उलट्या होणे हे सगळे होते.” 
एवढं सांगितल्यावर वैशाली सोनोग्राफी करून घ्यायला तयार झाली. तिने माझे ऐकून सोनोग्राफी करून घेतली आणि खरंच तिला पित्तखडे असल्याचे निदान झाले. बराच काळ खडे असल्याने तिच्या पित्ताशयाच्या आतल्या आवरणाला सूज आली होती आणि एक खडा नलिकेत अडकला होता त्यामुळे ऑपरेशन करून पित्ताशय काढून टाकावे लागले. मात्र त्यानंतर तिच्या खाण्या पिण्यावर खूप बंधने आली. सगळे उपास बंद झाले, पाणीपुरी खाणे बंद करावे लागले. फळे, भाज्या भरपूर खाणे, वजन कमी करणे व व्यायाम करावे लागले. थोडक्यात पूर्ण जीवनशैली बदलावी लागली. पित्ताशय हे पचनयंत्रणारूपी इंजिनमध्ये तेलाचे काम करीत असते. ते एकदा शरिरातून काढले की पचनशक्ती लुळीपांगळी होऊन जाते.
पित्ताशयातील खडे २ प्रकारचे असतात. कोलेस्टेरॉल आणि बिलिरुबिन ह्यांचे बनलेले. काही वेळा मिक्स प्रकारचेही असतात. कोलेस्टेरॉलचा खडा एकच असतो. मात्र बिलिरुबिन किंवा मिक्स खडे अनेक असतात. पित्ताशय त्यामानाने मोठे असते, त्यात खडा असेल तर त्रास होत नाही. मात्र एखादा खडा पित्तनलिकेत अडकला तर खूप मोठ्या प्रमाणात वेदना होतात. तसेच बरीच गुंतागुंत होऊ शकते.
बिलिरुबिन चे खडे मात्र वेगळ्या प्रकारच्या पेशन्ट मध्ये होतात. ज्यांना RBC म्हणजे तांबड्या रक्तपेशी तुटण्याचा आजार आहे – थॅलसेमिया, सिकल सेल ऍनिमिया असे आजार असलेल्या मुलांमध्ये हे खडे होतात. पण हे रोग बालकांना लहानपणीच होतात.

पित्तखडे होण्याची रिस्क जास्त असणाऱ्या व्यक्ती

१. स्थूल, गरोदर, मेनोपॉजनंतर हॉर्मोन थेरपी घेणाऱ्या स्त्रिया ( इस्ट्रोजेन ह्या हॉर्मोन मुळे)
२. कौटुंबिक इतिहास (फॅमिली हिस्टरी)
३. लिव्हर सिरॉसिस असलेले पेशन्ट (हे जास्त अल्कोहोल घेणाऱ्यांमध्ये आढळते) 
४. आतड्यांचे आजार असलेल्या व्यक्ती
५. ज्यांची ट्रायग्लिसराईड लेव्हल जास्त आहे अश्या व्यक्ती
६. HDL म्हणजे चांगले कोलेस्टेरॉल कमी असेल तर
७. आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असेल तर

पित्तखड्यांमुळे खालील त्रास होऊ शकतात-

ही लक्षणे असली तर तात्काळ अल्ट्रासोनोग्राफी केल्यावर खडे दिसल्यास निदान होते. 
पित्तखड्यांवर उपाय म्हणून सर्जरी करून पित्ताशय काढून टाकतात. मात्र नंतर खाण्यापिण्याची खूप बंधने येतात कारण फॅट चे पचन होत नाही. त्यामुळे हे टाळणेच हितकारक आहे.

पित्तखडे होऊ नये म्हणून पाळण्याची पथ्ये

१. वजन नियंत्रणात ठेवणे. मात्र वजन कमी करण्यासाठी कडक डाएट, कमी काळात खूप वजन कमी करणे हे करू नये.
२. आहारात मासे, जवस, शेंगदाणे, बदाम इ ज्यापासून चांगले कोलेस्टेरॉल मिळते असे पदार्थ खावे.
३.तंतुमय पदार्थ जास्त खाणे (फळे, भाज्या, वगैरे)
४. व्यायाम - बैठ्या जीवनशैलीमुळे शरीरातील क्रियांचा वेग मंदावतो. त्यामुळे पित्तरस साठून राहतो व खडे बनतात. म्हणून व्यायाम करणे आवश्यक आहे.
५. जर हॉर्मोन ट्रीटमेंट किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल किंवा कोलेस्टेरॉल जास्त असेल तर ती कमी करणारी औषधे घेणे.
पित्ताशय काढून टाकल्यावर नाईलाजाने निरोगी जीवनशैली स्वीकारण्यापेक्षा पहिल्यापासूनच स्वीकारलेली बरी, ही खूणगाठ मनात बांधू या. आपल्या कुटुंबाच्या, पतीच्या आरोग्याची काळजी घेण्याला स्त्रिया प्राधान्य देतात. यात त्या अनेकदा स्वतःकडे दुर्लक्षही करतात. पण स्त्रीने आपल्या आरोग्याविषयी अधिकच जागरूक असलं पाहिजे. स्त्री निरोगी राहिली तरच कुटुंबही निरोगी व हसते खेळते राहू शकते, हे सर्वांनी आवर्जून लक्षात घ्यायला हवे.

डॉ. मंजिरी मणेरीकर

 

 

शतकांचे अंतर ओलांडणारी वारी




कालच कार्तिकी एकादशी झाली आहे. तब्बल दोन वर्षानंतर वारकऱ्यांना विठूमाऊलीची भेट घेता आली.
वर्षानुवर्ष हजारो भाविक पंढरीची वारी करतात. संतांचे अभंग गातात. संतसाहित्य आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. वारीमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण लोक सामील झालेले दिसतात.
ग्रामीण महिलांना वारीच्या निमित्ताने रोजच्या धबडग्यातून काहीशी मुक्ती मिळते.
पण शहरातल्या मध्यमवर्गीय स्त्रीला घराबाहेर पडण्यासाठी आज काही वारीची गरज नसते.
 
  • मग आजच्या सुशिक्षित शहरी महिलांना ह्या लोकपरंपरेशी कसं जोडून घेता येईल?
  • वारकरी परंपरेतल्या संतांनी जो समतेचा संदेश दिला आहे, संत स्त्रियांनी वैयक्तिक आयुष्यात जो संघर्ष केला आहे – त्या सगळ्याशी आधुनिक स्त्रीचं काय नातं आहे?
  • पण संत कवयित्रीचे हे विचार आधुनिक स्त्रीयांच्या पर्यन्त पोचणार कसे? 
  • आजचे वारकरी स्त्रीसंतांचे अभंग फारसे का गात नाहीत?
या प्रश्नांची उत्तरं लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी ह्या व्हिडिओ मध्ये दिली आहेत.
हा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला डॉ. तारा भवाळकर यांचे विचार ऐकून काय वाटलं ते नक्की कळवा.  

 






एक जळजळीत समस्या

“ ताई, मधून मधून पोटात दुखते,लघवीच्या जागी जळजळ होते, सारखे सारखे लघवीला जावे लागते. आणि कधी कधी तिकडे सुद्धा दुखते ” माझी लॅबटेक्निशियन मदतनीस मला तक्रार सांगत होती. ती नुकतीच हनिमूनला जाऊन आली होती. ही ‘हनिमून सिस्टायटीस’ची लक्षणे वाटली म्हणून तिची युरिन तपासली तर पससेल्स खूप जास्त होत्या. पण माझ्या अनेक मैत्रिणींची आणि काही वयस्कर महिलांचीही अशीच तक्रार असते. ह्याचे कारण असते - मूत्रमार्गाचे इन्फेक्शन. (Urinary tract infection).
इन्फेक्शन म्हणजे बॅक्टरीयाचा संसर्ग. मूत्रमार्ग ह्या शब्दात किडनीज(मूत्रपिंडे), युरेटर (मूत्रवाहक नलिका), युरिनरी ब्लॅडर (मूत्राशय) आणि युरेथ्रा (मूत्र उत्सर्जक नलिका) असे बरेच अवयव येतात. ह्यापैकी किडनीमध्ये युरिन तयार होते आणि ती मूत्राशयात साठवली जाते. मूत्राशय भरले की आपल्याला ती बाहेर टाकण्याचे वेग येतात. त्यावेळी जर योग्य परिस्थिती नसेल तर आपण ते टाळतो. मात्र एक मर्यादेनंतर आपण ती थोपवू शकत नाही. मग मात्र कंट्रोल जाऊ शकतो.

स्त्रियांना मूत्रमार्गाचे इन्फेक्शन वारंवार का होते ?

नैसर्गिकरित्या मूत्रमार्गात एकही बॅक्टरीया नसतो. मात्र स्त्रियांमध्ये योनीमार्गाचे तोंड, मूत्रनलिकेचे तोंड आणि गुदद्वार हे तिन्ही अगदी जवळजवळ असतात. योनीमार्ग आणि गुदमार्ग ह्या दोन्हीमध्ये नैसर्गिकरित्या बॅक्टरीया असतात. त्यांना उपकारक बॅक्टरीया म्हणतात. मात्र ते मूत्रमार्गात शिरून तिथे वाढल्यास उपकारक न राहता अपायकारक होतात आणि मग त्रास सुरू होतात. शौचानंतर तो भाग साफ करताना युरेथ्रा मध्ये जंतू जाऊ शकतात. ह्याचा अर्थ हे इन्फेक्शन युरेथ्रा पासून सुरू होऊन वर जाते. जेव्हा एखाद्या ठिकाणी बॅक्टरीया वाढतात तेव्हा रक्तातील पांढऱ्या पेशी तिथे जातात तसेच थोड्या तांबड्या पेशीही जातात. त्या भागाला सूज येते त्यामुळे दुखणे सुरू होते. हे सर्व शरीराचे इन्फेक्शन कमी करण्याचे उपाय आहेत पण त्यामुळे काही लक्षणे दिसतात.
  • लघवी करताना दुखणे, जळजळणे
  • जास्त वेळ लघवीला जावे लागणे
  • पोटात, ओटीपोटात दुखणे
  • पांढरट, दुर्गंध येणारी लघवी होणे
  • शरीर संबंधाच्या वेळी दुखणे
  • ताप येणे, थकवा
  • उलटी येणे
पुरुषांमध्ये युरेथ्रा हा पेनिस मध्येच असतो त्यामुळे तो गुदद्वारापासून लांब असतो. तरीही प्रोस्टेट ग्रंथी वाढणे, मुतखडा ह्या कारणांनी मूत्रमार्गाचे इन्फेक्शन होऊ शकते. तसेच डायबेटिस हे कारण सर्वांनाच लागू आहे. युरिन मध्ये शुगर असेल तर बॅक्टरीया भराभर वाढतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो.  युरेथ्राच्या इन्फेक्शनवर लौकर उपाय न झाल्यास ते मूत्राशयापर्यंत पोचते.
माझ्या लॅब मधली टेक्निशियन लग्नानंतर हनिमूनला जाऊन आली होती. काही दिवसांतच पोटात खूप दुखणं , लघवीला जळजळ ही लक्षणे दिसू लागली. प्रथमच शरीर संबंध झाले की योनीमार्गातील जंतू सहज मूत्रमार्गात जातात आणि मूत्राशयापर्यंत पोचतात. ह्याला नावच मुळी 'हनिमून सिस्टायटीस' असे आहे. तिची युरिन बघितली तर पससेल्स खूप जास्त होत्या आणि पोटात दुखणे हे लक्षण मूत्रशयापर्यंत संसर्ग गेल्याचे दाखवत होते. आणखी एक प्रकार म्हणजे - पायलोनेफ्रायटीस म्हणजे किडनीचे इन्फेक्शन. हे बरेचदा स्टोनमुळे होते. पण मूत्राशयापासूनही होऊ शकते. हे मात्र खूप गंभीर असते. ह्यामुळे किडनी फेल होऊ शकते. त्यामुळे वेळीच उपचार घेणे चांगले.

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन टाळण्यासाठी काय करावे?
  • शौचानंतर आणि पाळीच्या वेळी स्वच्छता: ही अतिशय महत्त्वाची आहे. पॅड वेळोवेळी बदलणे, शौचानंतर गुदभागाला लागलेला हात मूत्रमार्गाला लागू न देणे. ह्यासाठी स्त्रियांना आपल्या गुप्त भागाची माहिती असणे गरजेचे आहे. हे लहानपणापासून शिकवले गेले पाहिजे.
  • पाणी जास्त पिणे: ह्यामुळे जास्त युरिन तयार होऊन चुकून थोडे जंतू युरिनरी ट्रॅक्टमधे आले असतील तर निघून जातील. उन्हाळ्यात युरिन कमी तयार होते म्हणून इन्फेक्शन लगेच होते. म्हणूनच युरिन इन्फेक्शन ला ‘उन्हाळे लागणे’ असेही म्हणतात.
  • मूत्र उत्सर्जनाचे वेग आल्यावर लगेच जाणे, शरीरसंबंधा आधी आणि नंतर लगेच मूत्र विसर्जन करणे आणि तो भाग पाण्याने धुवून साफ करणे.
  • खूप घट्ट आणि नायलॉन किंवा सिंथेटिक अंतर्वस्त्रे न घालणे. कॉटनची अंतर्वस्त्रे घातल्याने मूत्रमार्गाजवळ ओलसरपणा साठून राहत नाही.
या संसर्गाचे निदान करण्यासाठी युरिन रिपोर्ट किंवा युरिन कल्चर करावे लागते.
युरिन रिपोर्ट: ह्यामध्ये सकाळची पहिली युरिन लॅबमध्ये दिल्यास त्यात पस सेल्स आणि तांबड्या पेशी असल्या तर इन्फेक्शन असू शकते.
युरिन कल्चर: ह्यासाठी सुरुवातीचे आणि शेवटचे सोडून मधले (mid stream) युरिनचे सॅम्पल निर्जंतुक डबीत द्यावे लागते. ह्यामध्ये कोणत्या बॅक्टरीयाचे इन्फेक्शन आहे आणि त्यावर कोणती अँटी बायोटिक उपयुक्त आहेत ते समजते. साधारणपणे ह्या दोनच टेस्ट आवश्यक असतात.
पण जर औषधांनी बरे वाटत नसेल तर Cystoscopy, सोनोग्राफी किंवा CT स्कॅन सुद्धा करावा लागतो.
किडनी स्टोन असेल तर ह्यामुळे समजतो आणि मग तो काढला की इन्फेक्शन आपोआप बरे होते.
इन्फेक्शन वर दोनच उपचार असतात; एक तर पाणी जास्त पिणे आणि दुसरे म्हणजे अँटिबायोटिक्स.
खरंतर भरपूर पाणी पिणे हा सोपा उपाय आहे, असं वाटू शकतं. पण शहरातल्या स्त्रियांना घराबाहेर पडल्यावर सार्वजनिक मुताऱ्या फार कमी प्रमाणात उपलब्ध असतात. शिवाय सार्वजनिक टॉयलेटची अवस्था वाईट असल्यानेही त्या लघविला जाण्याचे टाळतात आणि त्या कमीच पाणी पितात. घराबाहेर पडले की स्वच्छ शौचालय मिळत नाही म्हणून बऱ्याच स्त्रिया घरी येइपर्यंत मूत्रविसर्जन करत नाहीत. ह्यामुळे सुद्धा युरिन इन्फेक्शन होऊ शकते. आपल्या आतडयात असलेले बॅक्टेरिया मूत्रनलिकेतून मूत्राशयात जातात. जर ते वेळच्या वेळी रिकामे झाले नाही तर ते बॅक्टेरिया वाढून इन्फेक्शन होऊ शकते. ह्याच कारणाने मुतखडे, मूत्राशयाचे स्नायू दुर्बळ होणे वगैरे रोगही होतात.
मूत्रमार्गाच्या इन्फेक्शनची लक्षणे पाहून डॉक्टर कल्चर आणि सेनसिटीव्हीटी टेस्ट करायला सांगू शकतात. त्यानंतर जी उपयुक्त अँटिबायोटिक्स आहेत तीच लिहून देतात. पण त्यांनी सांगितलेला डोस पूर्ण करणे गरजेचे आहे. जरा बरे वाटल्यावर औषधे सोडून दिल्यास जंतू पुन्हा पुन्हा वाढतात. अर्धवट उपचार सोडल्यास बॅक्टरीया त्या औषधांना रेझिस्टंट होतात त्यामुळे पुन्हा इन्फेक्शन झाल्यास आणखी महाग अँटीबायोटिक घ्यावी लागतात. स्त्रियांच्या शरीर रचनेमुळे स्त्रियांना मूत्रमार्गाचे इन्फेक्शन वारंवार होते. पहिल्यांदा होईल तेव्हाच नीटपणे उपचार घ्यावेत आणि नंतर ते टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. ह्यामुळे पुढची गुंतागुंत टळू शकते.

डॉ मंजिरी मणेरीकर