"महिला, शौचालयं आणि बरंच काही..." पुस्तिकेच्या निमित्तानं

मुंबईतल्या महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत मुताऱ्या मिळाव्यात या मागणीनं 2011 मध्ये राईट टू पी मोहिम आकारास आली. कोरोच्या नेतृत्वाखाली अनेक संस्था आणि संघटना एकत्र येत राईट टू पी मोहीम सुरू झाली. हळूहळू या मोहिमेचा विस्तार वाढू लागला. मुंबईतल्या झोपडपट्टी व वस्तीतल्या सामुदायिक शौचालयांच्या सुविधा, हक्क आणि विकासासोबतही कोरो जोडली गेली. मुंबईत सामुदायिक शौचालयांचं व्यवस्थापन करणारी अनेक महिला मंडळं आणि कोरो एकमेकांच्या नियमित संपर्कात असतात. 
कोरोनाची महामारी आणि त्यासोबत सुरू झालेलं लॉकडाऊन... पहिल्या लॉकडाऊन दरम्यान सर्वांचीच अवस्था सैरभैर झाली होती. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनचा फटका वस्तीतल्या सामुदायिक शौचालयांनाही बसला. बृहन्मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी सार्वजनिक शौचालयाचा वापर मोफत करता येईल असं जाहीर केलं. हा निर्णय रेल्वेस्टेशन, बाजार आणि मोक्याच्या ठिकाणच्या पे एण्ड युझच्या शौचालयांकरता होता. पण या घोषणेतून वस्तीतल्या शौचालयांना वगळल्याचं जाहीर केलं नाही. यामुळं झोपडपट्ट्यांमधील लोकं वस्तीतल्या शौचालयाच्या मासिक पासचे पैसे द्यायला टाळाटाळ करू लागले. बहुतांश लोकांचा रोजगार बंद झाल्याचं कारणही होतंच!
कोरोच्या कार्यकर्त्यांचे फोन सतत खणाणू लागले. कुठं फिनेल संपलं तर कुठं सफाईच्या इतर सामानांची बोंब, केअरटेकरचा पगार थकल्यानं तो काम करायला तयार नाही. कुठं लाईन चोकअप तर कुठं पैसे न देणारे लोक मंडळासोबत वाद घालताहेत. काही ठिकाणी महिला मंडळं वैयक्तिक वर्गणी काढून सफाईचं सामान आणत आहेत. अशी ठिगळं किती दिवस लावणार? कारण सर्वांचच हातावरचं पोट. मासिक पासाची रक्कम लोकांकडूनही घ्यायची नाही आणि महापालिकाही काही साधनसामग्री पुरवणार नाही. अशा परिस्थितीत व्यवस्थापक मंडळ शौचालयाची स्वच्छता कशी करणार? 
या सगळ्यासोबत कोरोनाचे नियम तर होतेच. सामुहिक शौचालयांनी स्वच्छतेचं कडक आचरण करणं खूप गरजेच होतं. महिला मंडळं कसेबसे दिवस रेटत होती. कोरोच्या सोबत या महिला मंडळांच्या पदाधिकारी बृहन्मुंबई महापालिकेचे विशेष सेवा अधिकारी (निवृत्त) आनंद जगताप यांच्या संपर्कात होत्याच. या व्यवस्थापक मंडळांची मोट असणाऱ्या स्वच्छता संवर्धन महासंघाला जगताप आणि कोरोच्या कार्यकर्त्यांनी पुनर्जीवन दिलं. महिला व्यवस्थापक मंडळांच्या अडचणी जाणून घेताना त्यातून मार्ग काढण्याचंही सुरू होतं. काही स्वयंसेवी संस्था, मोठ्या कंपन्यांच्या सीएसआरमधून या मंडळांना स्वच्छता साहित्य आणि इतर सामान पुरवू लागल्या.
या सर्व संवादातून कोरो, आनंद जगताप आणि महासंघाला (यांचा उल्लेख या पुढं टीम असा करत आहे) जाणवलं की महिला व्यवस्थापक मंडळाकडं बोलण्यासारखं खूप काही आहे. राईट टू पी मोहिमेची दशकपूर्ती होत होती. दहा वर्षांचा मागोवा घेऊन पुढची दिशा ठरवायची होती. शौचालय स्वच्छतेशी संबधित भारतीय समाजात पूर्वग्रह आहे. महिलांनी या क्षेत्रात येणं, सर्व त्रास सहन करून पाय घट्ट रोवणे या सर्वांचा धांडोळा घेतला पाहिजे असं या टिमला जाणवू लागलं. आणि मग साधारण सप्टेंबर 2020 मध्ये या महिलांच्या प्रवासाची नोंद करण्याचं ठरलं. हे सर्व दस्ताऐवजीकरण करण्याकरता कोरोनं मला सांगितल्यावरच खूप मोठी जबाबदारी असल्याचं लक्षात आलं. कारण मुंबईतल्या सामुहिक शौचालयांचं व्यवस्थापन करणाऱ्या महिला मंडळाबद्दल पहिल्यांदाच अशा प्रकारे अभ्यास घेण्यात येत होता. प्रत्यक्ष काम करण्याच्या आधी या सर्व महिला मंडळांसोबत मी 2-3 वेळा एकत्रित चर्चा केली. या चर्चेतून माझा प्लॅन ऑफ एक्शन ठरला. या 33 महिला मंडळांची केस स्टडी तर करायचीच होती. या महिलांसोबतच्या चर्चेतून वेगवेगळे मुद्दे समोर येत होते. त्यातल्या मुख्य मुद्द्यांना सूत्रात गुंफायचं मी ठरवलं.  ही संशोधन पुस्तिका किचकट किंवा फक्त केस स्टडी असं याचं स्वरुप असता कामा नये हा विचार मी व्यक्त केल्यावर, टिमनंही मला काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं. 
लॉकडाऊन असल्यानं प्रत्यक्ष भेटणं तर शक्यच नव्हतं. झूम कॉल, गुगल मीट, फोनद्वारे माझा या महिलांशी संवाद सुरू झाला. साधारण सहा महिने या सर्व महिला मंडळांसोबत माझा नियमित संवाद सुरू होता. महिलांकडं अनेक वर्षांचं खूप काही साचून होतं. अशाप्रकारे त्यांच्या अडचणींबद्दल कोणी त्रयस्थानं त्यांच्यासोबत कधीच संवाद साधला नव्हता. त्यांचा माझ्यावर विश्वास बसू लागला आणि त्या मोकळ्या होऊ लागल्या. महिलांनी अनेक वर्ष मनात दाबून ठेवलेल्या गोष्टींचा निचरा व्हायला लागला.
सार्वजनिक शौचालय असलं तरी लाईट-पाणी नाही, अस्वच्छ शौचालयं, तुटलेले दरवाजे, धोकादायक बांधकाम, खचलेलं शौचालय, दारुडे-गर्दुले-गुंडाचा विळखा असलेलं शौचालय, घर आणि शौचालयातलं अंतर, नेहमीची छेडछाड, शिवीगाळ, मारामाऱ्या, कधी अत्याचार व अतिप्रसंगाची भीती, किडे-जनावरांचं राज्य असणारं शौचालय, अपुरी शौचालयं, या सर्वामुळं अंधार पडल्यावरच शौचाला जाव लागायचं. वर्षानुवर्ष या महिला लघवी आणि शौचाचा वेग दाबून ठेवत होत्या. ह्या सर्व गोष्टींमुळंचं वस्तीतल्या महिला शौचालयाच्या व्यवस्थापनात उतरू लागल्या.
पण व्यवस्थापनात उतरायचं ठरवल्यावरही सगळ्यांच्या समोरचा मार्ग सोपा नव्हताचं. काहींना प्रशासकीय अडचणी आल्या, हिंसाचाराला सामोरं जावं लागलं, कधी राजकीय दबाव हे अजूनही सुरू आहेच. नगरसेवक निधी आणि या शौचालयांचा काहीही संबंध नसताना पैशाचं कुरण किंवा कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी काही नगरसेवकांना ही शौचालय त्यांच्या ताब्यात हवी असतात. मासिक पासाचे पैसे चुकवणं, वस्तीची साथ किंवा विरोध हे मुद्देही आहेतच. पण ही सगळी आव्हानं असूनही, महिलांना येणाऱ्या अडचणी महिलाच समजू शकतात या उक्तीवर ही महिला मंडळ टिकून आहेत. 
काही महिला मंडळ शौचालयाच्या आवारात उत्तम उपक्रम राबवत आहेत. शौचालयाच्या गच्चीवर वस्तीतल्या मुलांकरता शिकवणी वर्ग, महिलांकरता रोजगार प्रशिक्षण आणि निर्मिती, बचतगट, समुपदेशन सुरू आहे. वस्तीतल्या घरात महिलांना मोकळी जागा मिळत नाही. हे लक्षात घेऊन शौचालयाच्या समोरील जागेचा महिलांना दोन घटका विरंगुळ्यासाठी वापर, शौचालयाचे वाढदिवस, वस्तीला आरोग्याच्या चांगल्या सवयी लावणं या गोष्टी सुरू असतात.
हे सर्व वाचल्यावर तुम्हांला कदाचित प्रश्न पडू शकतो, महिला मंडळांद्वारे शौचालय व्यवस्थापन म्हणजे काय? मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता असावी, लोकांना स्वच्छतेच्या चांगल्या पायाभूत सुविधा मिळाव्यात आणि चांगलं आरोग्य मिळावं, याकरता १९९५ मध्ये मुंबई महानगरपालिकेनं जागतिक बँकेच्या मदतीनं काही पावलं उचलली. या अंतर्गत वस्ती स्वच्छता कार्यक्रम (Slum Sanitation Program – SSP) राबवायचं ठरलं. या कार्यक्रमाकरता सुरूवातीला जागतिक बँकेनं आर्थिक मदत केली. या कार्यक्रमांतर्गत मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये शौचालयं बांधायचं ठरलं. यात बांधकामाचा खर्च जागतिक बँक करणार असं ठरलं. या कार्यक्रमात वस्तीला म्हणजेच रहिवाशांनाही सहभागी करण्यात आलं. किंबहुना त्याशिवाय हा कार्यक्रम राबवताच येणार नाही. वस्तीत राहणाऱ्या लोकांनीच शौचालयाची देखभाल आणि व्यवस्थापन करायचं. वस्तीतल्या स्थानिकांनी त्याकरता मंडळ बनवून त्याची नोंदणी करायची असते. अशा मान्यताप्राप्त मंडळाला महापालिकेकडून शौचालय व्यवस्थापनाचा परवाना मिळतो. महापालिकेनं निवड केलेली स्वयंसेवी संस्था या मंडळाला प्रशासकीय बाबींकरता मदत करते. वस्तीत सर्वेक्षण करणं, वस्तीच्या गरजेनुसार शौचालयाचा आराखडा, कंत्राटदाराकडून काम करवून घेणं याकरताही स्वयंसेवी संस्था सीबीओंना मदत करते. सीबीओंना सक्षम बनवण्याचं काम स्वयंसेवी संस्थांचं असतं. त्याकरता त्यांना महापालिकेकडून मानधन मिळतं. हे सर्व आपलं आहे आणि आपण ते योग्यरित्या सांभाळलं पाहिजे ही भावना लोकांमध्ये असेल, तरच या सुधारणा टीकून राहतील या उद्देशानं मंडळांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या रक्कमेतून शौचालयाची साफसफाई, केअरटेकरचा पगार, वीज-पाणी खर्च भागवला जातो. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या सर्व कामाकरता सीबीओंनी यातून काहीही आर्थिक फायदा, मानधन किंवा टक्केवारी घ्यायची नाही. कोणाची जबाबदारी काय याबाबत महापालिका आणि त्या सीबीओमध्ये सामंजस्य करार (MoU) होतो. या कार्यक्रमाला 1997 ते 2005 या कालावधीत जागतिक बँकेनं अर्थसहाय्य केलं. 2006 पासून मुंबई महापालिका या कार्यक्रमाला अर्थसहाय्य करत आहे.
सुरवातीला फक्त पुरूष मंडळच शौचालय व्यवस्थापनात उतरत होते. फक्त शौचालय चालवणं हाच त्यांचा उद्देश असतो. महिलांच्या सेवा-सुविधा, अडचणी, सुरक्षा याकडं पुरूष मंडळांचं दुर्लक्ष होतं. शौचालयाचा सर्वात जास्त त्रास महिलांना सहन करावा लागत असल्यामुळं हळूहळू महिला सीबीओ या कार्यक्रमात उतरू लागल्या. या सर्व गोष्टी धोरणपातळीवर मजबूत दिसत असल्या तरी प्रत्यक्षात महिला सीबीओंनी शौचालय व्यवस्थापनात येणं आणि टिकणं एवढं सोपं नक्कीच नाही. सध्या या कार्यक्रमात मुंबई महापालिकेकडून आणखी एक चांगलं पाऊल उचललं आहे. लॉट नंबर 10 पासून या सीबीओंमध्ये महिलांकरता 33 टक्के आरक्षण ठेवलं आहे. यामुळं आता सरसकट सर्वच सीबीओंमध्ये महिला असणार आहेत. आता महिलांना सामुहिक शौचालय वापरताना होणाऱ्या त्रासाकडे  अधिक जाणीवपूर्वक लक्ष दिलं जाईल आणि हे त्रास दूरही होतील, अशी आपण आशा नक्कीच करू शकतो!

साधना तिप्पनाकजे 

(मुक्त पत्रकार)

रक्तपांढरी आणि महिला

नुकतीच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (NFHS-5 )दुसऱ्या टप्प्यातली आकडेवारी जाहीर झाली आहे. पहिल्या टप्प्यातली आकडेवारी डिसेंबर मध्ये जाहीर झाली होती. आता देशभरातील आकडेवारीत प्रथमच पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते आहे. म्हणून अनेक ठिकाणी कौतुकाच्या बातम्या येत आहेत. स्त्रियांची संख्या वाढली हे चांगलेच आहे पण त्या निरोगी आहेत का? जर याच NFHS-5 मधली स्त्रिया आणि मुलांमधील अॅनिमियाचे वाढलेले प्रमाण बघून निराशा पदरी येण्याची शक्यता आहे. कारण 2015-16 मध्ये झालेल्या NFHS-4 नुसार 15 ते 49 या वयोगटातल्या स्त्रियांमध्ये 54% स्त्रिया अॅनिमिक होत्या, ते प्रमाण वाढून आता 58.7% इतकं झालं आहे. याच वयोगटातल्या पुरुषांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण 25% आहे. भारतात सगळीकडे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये एनिमियाचे प्रमाण जास्त असते. गेल्या काही वर्षांपासून “अॅनिमिया मुक्त भारत” सारख्या योजना राबवल्या जात असूनदेखील स्त्रिया, पुरुष आणि मुलं या सर्वांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण वाढत चालले आहे!
मी इंटर्नशिप करत असताना KEM हॉस्पिटलमध्ये एका गरोदर मुलीला अॅडमिट करून तिच्या टेस्ट करून घेण्याचे काम मला दिले होते. तिचे हिमोग्लोबिन फक्त 4 होते; तो रिपोर्ट बघून मी चक्रावले. मी मॅडमना विचारले की ही घरात कशी काय काम करत असेल ? तर त्या म्हणाल्या,’ 2 हिमोग्लोबिन असलेल्या बाया पण येतात. त्यामानाने,चार तर जास्तच आहे!’
अॅनिमिया ही भारतीय स्त्रियांची ओळखच आहे म्हणाना! मी अठरा वर्षांची झाले तेव्हा माझे हिमोग्लोबिन 10 असूनही माझे रक्त घेतले होते. कारण तेव्हा भारतीय महिलांचे हिमोग्लोबिन 10 म्हणजे नॉर्मल मानले जायचे. आता मात्र रक्तदानासाठी स्त्रियांचेही हिमोग्लोबिन कमीत कमी12.5 ग्राम असावे लागते. हीच रेंज पुरुषांसाठी 13 ते 17 आहे. हिमोग्लोबिन हे रक्तातील तांबड्या पेशींमध्ये असते. हिमोग्लोबिन ची पातळी स्त्रियांमध्ये 11.5 ग्रॅम आणि पुरुषांमधे 13 पेक्षा कमी असेल तर अॅनिमिया झाला असे म्हणतात. अनेकदा स्त्रियांमध्ये 10 च्या वर हिमोग्लोबिन बघायला मिळत नाही.
हिमोग्लोबिन हा रेणू हिम आणि ग्लोबिन अश्या दोन भागांचा बनलेला असतो. हिम हा लोह असलेला रेणू आहे. तर ग्लोबिन हे एक प्रोटीन आहे. हिमोग्लोबिन च्या एका रेणुमध्ये एक लोहाचा अणू असतो, तो हिम नावाची रिंग तयार करतो आणि त्या रिंगला ग्लोबिनच्या 4 साखळ्या जोडलेल्या असतात. ह्यावरून हे समजून येईल की हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह आणि प्रथिने आहारात असणे अत्यावश्यक आहे. आपण हवेतून घेतलेला ऑक्सिजन रक्तातल्या हिमोग्लोबिनशी संयोग पावून ऑक्सिहिमोग्लोबिन तयार करतो. हे रक्त जेव्हा अवयवांच्या पेशींमध्ये जाते तेव्हा ऑक्सिजन सुट्टा होऊन तो पेशींना मिळतो. पेशी कार्बन डाय ऑक्साईड तयार करतात. तो रक्तातील प्लाझ्मा मध्ये विरघळतो आणि फुप्फुसांमार्फत बाहेर टाकला जातो. जर हिमोग्लोबिन कमी असेल तर पेशींना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या नष्ट होऊ लागतात. मोठ्या प्रमाणावर पेशी नष्ट झाल्यास थकवा येणे, सूज येणे, वेगवेगळ्या अवयवांचे कार्य कमी होणे अश्या अनेक गोष्टी घडतात. बरेचदा ह्याचे कारण अन्नातून पुरेसे लोह किंवा प्रोटीन न मिळणे हे असते. मात्र काही बाबतीत आतड्यातील रक्तस्त्राव आणि जंत हे कारणदेखील असू शकते. तसेच आहारातील लोह रक्तात शोषले जाण्यासाठी व्हिटॅमिन C ची आवश्यकता असते. आणखी व्हिटॅमिन B12 आणि फॉलीक ऍसिडची कमतरता हेही कारण असते.
ज्यात शरीराच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही अशा वेगवेगळ्या आजारांचे अॅनिमिया एक लक्षण आहे.. कारण शोधून त्याला औषध द्यावे लागते. किडनीचे रोग, जंत, लोह, व्हिटॅमिन 12 फोलेट ची कमतरता, काही आनुवंशिक आजार, इन्फेक्शन्स, hiv, पाईल्स, रक्ताचा कॅन्सर, टीबी अशा वेगवेगळ्या आजारांत अॅनिमिया हा एक भाग असतो. 
अॅनिमियाची लक्षणे
1 चक्कर येणे
2 हृदयाची गती वाढणे, पायांना सूज येणे
3 डोकेदुखी
4 छाती, पोट, हाडे, सांधे दुखणे
5 मुलांची वाढ नीट न होणे
6 त्वचा पांढरट दिसणे
7 खूप थकवा येणे, अशक्तपणा
रक्तातील पेशी ह्या अस्थीमज्जेत तयार होतात. तांबड्या पेशींचे आयुष्य 120 दिवसांचे असते. जुनाट तांबड्या पेशी प्लिहा किंवा स्प्लिन मध्ये नष्ट केल्या जातात आणि त्यातील लोह पुन्हा अस्थीमज्जेत येते तर ग्लोबिन साखळ्यांपासून बिलिरुबिन बनते. हे लक्षात घेतले तर अॅनिमिया होण्याची कारणे आपल्याला सहज समजतील.
1 तांबड्या पेशी किंवा हिमोग्लोबिन तयार न होणे
2 खूप जास्त रक्तस्त्राव
3 तांबड्या पेशी रक्तवाहिन्यांमध्येच नष्ट केल्या जाणे

1 तांबड्या पेशी किंवा हिमोग्लोबिन तयार न होणे- ह्याची अनेक कारणे आहेत.
रक्तमज्जेत तांबड्या पेशी तयारच न होणे- हे बरेचदा जेनेटिक किंवा औषधांचा दुष्परिणाम म्हणून होते. पण
स्त्रियांमधील मुख्य कारण म्हणजे आहारात लोह, प्रोटीन आणि जीवनसत्वांची कमतरता.
भारतात अजूनही मुलींना सकस अन्न दिले जात नाही हे मुख्य कारण आहे. घरात आधी पुरुषांना वाढून मग उरले सुरले बायकानी खाण्याची पद्धत आहे. मांसाहारी कुटुंबातही पुरुषांना मासे किंवा मटण आधी दिले जाते. स्त्रिया फक्त रस्सा खातात. ह्या सर्व कारणांनी स्त्रियांमध्ये अॅनिमिया असतोच. सधन घरातील स्त्रियांना अशी कमतरता निर्माण होण्याचे कारण म्हणजे स्त्रियांच्या खाण्याच्या आवडी निवडी, डाएट म्हणून खूप कमी खाणे, उपासतापास हे आहे.
गरोदरपणात स्त्रीने स्वतः आणि मूल ह्या दोघांना पुरेल इतके लोह, प्रथिन आणि कॅल्शियम घेतले पाहिजे. गरोदर पणी अॅनिमिया झाल्यामुळे आईच्या मृत्यूचा धोका दुप्पट वाढतो आणि बाळाच्या वाढीवर देखील विपरीत परिणाम होतो. ह्यासाठी गरोदरपणात सर्वच स्त्रियांना लोह, व्हिटॅमिन B12, फोलीक ऍसिड आणि कॅल्शियम ह्या गोळ्या दिल्या जातात. सरकारी हॉस्पिटलमध्ये त्या फुकट दिल्या जातात. तरीही स्त्रिया त्या घेण्याची टाळाटाळ करतात. गोळ्यांनी मूल खूप मोठे होते आणि डिलिव्हरी नीट होत नाही, लोहामुळे बद्धकोष्ठता होते अशा समजुती असतात. शेवटी डिलिव्हरीच्या वेळी हिमोग्लोबिन अतिशय कमी असते आणि त्यावेळी रक्तस्त्राव होतोच मग रक्त चढवावे लागते. कुटुंबातील लोक आधी स्त्रीकडे दुर्लक्ष करतात आणि शेवटी ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांवर रक्त देण्यासाठी दबाव आणतात. त्यावेळी रक्त दिलेच पाहिजे असा नियम आहे. मात्र आधीपासून हिमोग्लोबिन ची पातळी नीट असल्यास ही वेळच येणार नाही हे ते सोयीस्करपणे विसरतात.

2 रक्तस्त्राव
खूप जणींना पाळीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो. गर्भाशयातील फायब्रोईड, गर्भाशयाच्या आवरणाची अनियमित वाढ ही नेहमीची कारणे झाली. तसेच लघवी किंवा शौचातूनही रक्तस्त्राव होऊन अॅनिमिया होऊ शकतो. त्यामुळे ह्यासाठी लौकर ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे.

3 रक्तपेशी रक्तवाहिन्यांतच नष्ट होणे
थॅलेसेमिया, सिकल सेल डिजीज हे जेनेटिक आजार आहेत. मात्र हे लहानपणीच समजतात. थॅलेसेमियामध्ये रक्त देणे हाच उपाय आहे तर सिकल सेल डिजीज मध्ये मूल मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते.
अॅनिमियाचे निदान करण्यासाठी हिमोग्लोबिन आणि RBC लेव्हल तपासली जाते. तसंच युरिन, स्टूल ह्यांचेही परीक्षण केले जाते. रक्तातील लोह, व्हिटॅमिन B12, फॉलिक अॅसिड ची पातळी सुद्धा तपासली जाते.
यावर उपचार म्हणून लोह किंवा व्हिटॅमिनची कमतरता असेल तर त्यानुसार गोळ्या किंवा इंजेक्शन देतात.
रक्तस्त्राव कोणत्या कारणाने होतोय हे शोधून त्यावर उपचार करतात.

अॅनिमिया होऊच नये म्हणून काय केले पाहिजे?
स्त्रियांनी आपल्या शरीराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी किंवा व्रत म्हणून उपाशी राहणे टाळले पाहिजे. मूल होऊ द्यावे की नाही हा निर्णय स्त्रीचा असला पाहिजे. कारण मूल आपल्याला हवी ती पोषक द्रव्ये आईकडून शोषून घेते. ह्यात मुख्यतः कॅल्शियम आईच्या हाडांतून शोषले जाते. त्यामुळे प्रेग्नन्सी सुरू होताना आपले हिमोग्लोबिन आणि कॅल्शिअमची पातळी नॉर्मल असली पाहिजे यांची काळजी घ्यायला हवी. आणि ती नॉर्मल असली तरीही प्रेग्नन्सी आणि मुलाला दूध पाजत असेपर्यंत लोह, व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक ऍसिड च्या गोळ्या घेतल्या पाहिजेत. आहारात हिरव्या पालेभाज्या, गूळ, मासे, वगैरे असले पाहिजेत. मुलीच्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. या वैयक्तिक काळजी सोबतच समाजातले स्त्रियांचे स्थान उंचावणे, त्यांच्यासाठी शिक्षणाची आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता असणे – यामुळे देखील अॅनिमियाचे प्रमाण कमी होऊ शकते – असे विविध अभ्यासातून दिसून आले आहे.

डॉ मंजिरी मणेरीकर

 

 

‘त्या’ दोघी आणि ‘या’ दोघी

लॉकडाउन काळात बघितलेल्या सिनेमांमधील दोन सिनेमे पक्के लक्षात राहिले.कारण या दोन्ही सिनेमांमध्ये दोन वेगवेगळ्या बायकांच्या जोड्यांची गोष्ट सांगितली आहे. या जोड्या अतिशय भिन्न आहेत, सामाजिक – कौटुंबिक स्तरापासून ते मानसिक-वैचारिक स्तरापर्यंत या जोड्यांमध्ये समानता नावालाही नाही. सारखेपण शोधायचेच तर या जोड्या त्यांच्या त्यांच्या परिघात अगदी सामान्य, सर्वसाधारण अशा आहेत. तरिही या जोड्यांची कथा त्यांच्या लेखक - दिग्दर्शकांना सांगाविशी वाटली आणि त्यांनी ती कुठलाही आविर्भाव न आणता सांगितली आहे, यामुळेच हे सिनेमे लक्षात राहिले.

यातला ‘पटाखा’ हा सिनेमा सप्टेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला आहे; तो मी एप्रिल २०२० मध्ये बघितला. या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे विशाल भारद्वाज यांनी.  सिनेमाची माहिती बघताना कळलं की हा सिनेमा ‘चरणसिंग पथिक’ यांच्या ‘दो बहने’ या कादंबरीवर आधारीत आहे. जेंव्हा एखाद्या साहित्यिकाने लिहिलेल्या साहित्यकृतीवर सिनेमा आधारलेला असतो तेंव्हा आपोआप,कथानक,व्यक्तिरेखाटन या बाजू तगड्या असतात. ‘पटाखा’ ही दोन बहिणींची कथा आहे. राजस्थानमधल्या एका लहानशा गावातल्या छुटकी आणि बडकी या दोन सख्ख्या बहिणी. 'सख्खे भाऊ पक्के वैरी' - या म्हणीचे फिमेल वर्जन म्हणजे छुटकी आणि बडकी.लहानपणापासून त्या एकमेकींशी फक्त भांडतात! यांना भांडायला खास कारण ही लागत नाही, चोरून विड्या ओढण्यापासून ते एकमेकींचा ड्रेस ढापून वापरण्यापर्यंत काहीही कारण पुरते. शिवाय एकीने केलेल्या भाजीत दुसरीने डब्बल तिखट घालणे, एक आंघोळीला गेल्य़ावर दुसरीने तिचे कपडे पळवणे असा गनिमी कावा तर या भगिनींसाठी रोज की बात असते. आईवेगळ्या या बहिणी वाढवणाऱ्या बापाचे मात्र यांच्या भांडणात हाल होत असतात.या कथेतील एक खास,महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे ‘डिप्पर’. त्याचा मुख्य ‘बिझनेस’ असतो छुटकी आणि बडकीत भांडण लावून गंमत पाहणं,मग त्यात कधीतरी स्वतःवर शेकलं तरी त्याला पर्वा नसते.
पण या दोघींची स्वतःच्या मनात जपलेली स्वप्नंही आहेत.  छुटकी म्हणजे गेंदा कुमारीला व्हायचंय इंग्रजीची टिचर आणि चंपाकुमारी म्हणजे बडकीला सुरू करायची आहे स्वतःची डेअरी. यथावकाश एकमेकींच्या झिंज्या उपटत आणि एकमेकींना लाखोली वाहात दोघी बहिणी तरुण होतात.एकिने आपला जोडीदार शोधल्याचं लक्षात येताच दुसरीपण जोडीदार शोधते. दोघी बहिणी आपापल्या हिरोंबरोबर पळून जाऊन लग्न करतात आणि मग त्यांना कळतं - की आता त्या सख्ख्या जावा झाल्या आहेत. इथून तर खरी गोष्ट सुरू होते. त्या दोघी आपल्या बापूला दिलेलं कधीही न भांडण्याचं वचन पाळतात का ? डीप्पर त्यांच्या सासरी येऊन पुन्हा काड्या घालतो का ? आणि त्या दोघींनी मनात जपलेल्या स्वप्नाचं काय होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी पटाखे पाहायला हवा.
विशाल भारद्वाज याने अतिशय साधेपणाने, कोणतिही गिमिक्स न वापरता गोष्ट पडद्यावर सादर केली आहे. ती सुरवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते,कारण दिग्दर्शकाने कथेच्या नैसर्गिक प्रवाहाला उगाचच व्यावसायिक वळणे दिलेली नाहीत( म्हणूनच बहुदा तिकीटबारीवर पिक्चर जरा गडबडला असावा).विशाल भारद्वाजचा सिनेमा म्हणजे गुलजारजींची गाणी हे समिकरण इथेही आहेच,रेखा भारद्वाज,सुनिधी चौहान,अर्जित सिंग,विशाल भारद्वाज,सुखविंदर सिंग यांच्या आवाजातली ही गाणी गोष्ट पुढे न्यायचं काम करतात.दिग्दर्शकाबरोबर कलाकारांचा वाटा तितकाच मोठा आहे. छुटकी साकारली आहे सन्या मल्होत्रा हिने तर बडकी  झाली आहे राधिका मदन. या दोन प्रमुख व्यक्तिरेखांच्या बरोबरीने या चित्रपटातील (बेचारे) बापु आणि टिप्पर या दोन पुरुष व्यक्तिरेखा देखिल लक्षात राहातात.यातला बापु केला आहे विजयराज ने तर टिप्पर बनला आहे सुनिल ग्रोव्हर. सुनिल ग्रोव्हरला टिप्परच्या रुपाने लाइफटाईम रोल मिळालाय. या बहिणींना तो जसा उचकवतो, डिवचतो तसाच तो त्यांना मदतही करतो त्यामुळे टिप्परचा प्रेक्षकांना राग येत नाही,जरी तो काड्या घालत असला आणि या बहिणींच्या भांडणाला तडका देत असला तरी तो व्हिलन वाटत नाही. हे यश जितकं लेखक-दिग्दर्शकाचं तितकंच सुनिल ग्रोव्हरचं आहे.
राजस्थानमधल्या एका छोट्या गावातल्या ‘या दोघीं’चा सिनेमा बघितल्यानंतर काही दिवसांच्या अंतराने महानगरी मुंबईतील ‘त्या’ दोघींचा सिनेमा बघितला. या सिनेमाचं नाव आहे ‘टिकली ॲन्ड लक्ष्मी बॉम्ब ’. योगायोग म्हणजे हा सिनेमा पण एका कादंबरीवर आधारित आहे,कादंबरीकार आदित्य क्रिपलानी यानेच आपल्या कादंबरीला पटकथेचं रुप देऊन सिनेमा दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्ससाठी २०१७ मध्ये तयार करण्यात आला होता. 
ही मुंबईच्या वेश्या व्यवसायातील दोघींची गोष्ट आहे. मायानगरी मुंबईतील स्त्रीदेहाचा हा सगळा व्यापार पुरुषांच्या नियंत्रणाखाली आहे. मुंबईच्या उपनगरात लक्ष्मी मालवणकर ही सुमारे वीस वर्षे देहविक्रय करुन जगतेय. आता ती साधारण चाळीशीच्या आसपास आहे,त्यामुळे आपोआप तिच्याकडे ‘अम्मा’ ची भूमिका आलेय. लक्ष्मी आणि तिच्या बरोबरच्या बाकीच्या वारांगना हा धंदा करतात तो म्हात्रेच्या संरक्षणाखाली. म्हात्रेने अनेक जणींना या बाजारात आणून उभं केलं आहे. लक्ष्मी सिनिअर आणि विश्वासातली असल्याने नव्याने आलेली मुलगी तिच्याकडेच देऊन म्हात्रे निर्धास्त राहात असतो. म्हात्रेचा पंटर रिक्षा घेऊन या सगळ्याजणींवर लक्ष ठेवायला,लागली तर त्यांना मदत करायला कायम हजर असतो. एकदा पुतुल ही विशी बाविशीतली बांगला देशी छोकरी आणून म्हात्रे लक्ष्मीच्या स्वाधिन करतो. ती आल्यापासून लक्ष्मीला प्रश्न विचारुन भंडावून सोडते. म्हात्रे या सगळ्या जणींकडून महिन्याचा हप्ता घेऊन पोलिस स्टेशनला देत असतो,तरी मग अधून मधून पोलिस रेड का टाकतात आणि मुलिंना उचलून का नेतात ? जर आपण गिऱ्हाइक उरावर घेतो तर आपल्या कमाईतला मोठा हिस्सा म्हात्रेला का द्यायचा? असे बंडखोर सवाल पुतुल कायम लक्ष्मीला विचारत असते. लक्ष्मीने या धंद्यात आयुष्य घालवलेलं असतं,त्यामुळे हा धंदाच नाही तर हे सगळं जगच पुरुषांचं आहे आणि पुरुषांच्या तालावर चालतं हे तिने स्विकारलं आहे. पुतुल नवीन आहे,तिच्या टिकल्या सुरवातीला वाजतील पण नंतर थंड पडेल असं लक्ष्मीला वाटत असतं. मात्र एका घटनेमुळे लक्ष्मी अस्वस्थ होते आणि पुतुलच्या म्हणण्याचा विचार करु लागते. मग सुरू होते क्रांती .. टिकलीने (पुतुलने) लक्ष्मीसह सुरू केलेली क्रांती ! या टिकली-आणि लक्ष्मी बॉम्बचा चांगलाच धमाका उडतो. आधी विचार करायची आणि येणाऱ्या संकटांमधून मार्ग काढायची जबाबदारी लक्ष्मी टिकलीवर टाकत असते -‘तेरी क्रांती है .. तू सोच ..’ पुतुलही एका पेक्षा एक भन्नाट आयडिया लढवते आणि म्हात्रेला टक्कर देउन सगळा बिझनेस आपल्या हातात घेऊन दाखवते. पण पुरुषांच्या जगात स्त्रियांची बंडखोरी टिकते का ? टिकली आणि लक्ष्मी बॉम्बची क्रांती यशस्वी होते का ? हे सारं पडद्यावर बघायला हवं.

मुळात शोषितांच्या जगातल्या कोणालातरी बंडखोरी कराविशी वाटणं,त्याने इतर शोषितांची साथ मिळवणं आणि यंत्रणेनं ते बंड चिरडण्यासाठी कसून प्रयत्न करणं हे काही नवीन नाही.इथे नवीन आहे ती या गोष्टीतल्या स्त्री व्यक्तिरेखांची मानसिकता. त्यांनी मिळालेलं आयुष्य स्विकारलंय,त्या आयुष्याकडून त्यांच्या फार मोठ्या अपेक्षा नाहीत, आपल्याला संरक्षण देणारे पुरुषच आपला उपभोग घेणार हे त्यांनी स्विकारलेलं आहे, हे जग पुरुषांच आहे आणि स्त्री ही कायम दुय्यम भूमिकेत असणार हे त्यांना मान्य आहे.त्यामुळेच आधी टिकलीचा विचार त्या हसण्यावारी नेतात,पण टिकलीचा विचार धोकादायक असला तरी प्रत्यक्षात येऊ शकतो आणि आपण आपल्यावर हुकुमत गाजवणाऱ्या पुरुषांना नामोहरम करू शकतो हे लक्षात आल्यावर मात्र त्या टिकलीच्या क्रांतीत सामील होतात. या चित्रपटातील स्त्रीया आणि त्यांच जग आपल्या परिघाबाहेरचच नाही तर आपल्यासाठी त्याज्य,कदाचित घृणास्पद विश्व आहे पण चित्रपट बघताना आपल्याला टिकली,लक्ष्मी आणि त्यांच्या गँगबद्दल प्रेम (सहानुभूती नाही हं ) वाटू लागते.एखाद्या कष्टकरी समूहातील महिलांनी दिलेला शोषणाविरुध्दचा लढा जसा आपल्याला त्या महिलांबद्दल आपुलकी निर्माण करायला कारणीभूत होतो तशीच टिकलीची क्रांती आपल्याला पटते,आवडते आणि आपण तिच्या पार्टीचे होऊन जातो. मला वाटतं हेच या सिनेमाचं यश आहे. 
त्याचं निम्म श्रेय जातं ते कलाकारांना.यातली पुतुल म्हणजे टिकली साकार केली आहे चित्रांगदा चक्रवर्ती हिने. तिचा हा पहिलाच सिनेमा होता.फॅशनेबल आणि बडबडी पुतुल- टिकली तिने मस्त रंगवली आहे. टिकलीचा बंडखोरपणा,टिकलीचा दागिन्यांचा आणि फॅशनेबल राहाण्याचा सोस,लक्ष्मीबरोबर उडणारे खटके हे सगळं तिने समजून उभं केलंय.टिकलीची अवखळ, बंडखोर व्यक्तिरेखा उठून दिसते ती विभावरी देशपांडेने साकारलेल्या लक्ष्मीमुळे. देहबोलीपासून ते मुद्रेवरील आविर्भावांपर्यंत लक्ष्मी मालवणकर विभावरीने जिवंत केली आहे.तिच्या लहान सहान प्रतिक्रिया, आविर्भाव, वावर यातून ती जे बोलते त्यामुळे एक काल्पनिक व्यक्तिरेखा हाडामासाची बनून उभी राहाते. म्हात्रेची व्यक्तिरेखा म्हणजे देहविक्रयाच्या बाजारातील टिपीकल भडव्याची व्यक्तिरेखा. म्हात्रेचा माज,त्याची अगतिकता,त्याची संधीसाधू वृत्ती हे म्हणजे उपेंद्र लिमयेसाठी रेडिमेड पॅकेज होतं. या सिनेमाचा विषयच देहविक्रयाचा बाजार आणि त्यातील व्यक्तिरेखा आहे त्यामुळे भाषाही अर्थातच तशी रांगडी आहे मात्र धंदा करणाऱ्या बायकांची गोष्ट सांगताना आणि ओ टि टी प्लॅटफॉर्मवरचा सिनेमा असूनही विनाकारण देह प्रदर्शन किंवा अंगावर येणारे सेक्सचे प्रसंग नाहीत. हा चित्रपट केवळ देहविक्रय करणाऱ्या महिलांचं दुःख दाखवून थांबत नाही. तो त्या जगाकडे आपल्याला वेगळ्या नजरेने बघायला भाग पाडतो आणि ती वेगळी नजर आपल्याला या परक्या जगाशी जोडते.
लॉकडाउनकाळात बघितलेले हे दोन सिनेमा. दोन्ही स्त्री व्यक्तिरेखा प्रधान, पण दोन वेगळ्या जगातल्या स्त्रीयांची गोष्ट सांगणारे! अजिबात ग्लॅमरस नसलेली गोष्ट तितक्याच साधेपणाने सांगणारे दिग्दर्शक आणि अस्सलतेने साकरणारे कलाकार यामुळे लक्षात राहिलेले. अशा व्यक्तिरेखा हिंदी सिनेमांमध्ये क्वचितच पाहायला मिळतात आणि म्हणून मनात ठसून राहातात.


मकरंद जोशी

पुस्तकं, सिनेमा आणि प्रवास यावर प्रेम करणारा 
पर्यटन आणि कॉपी रायटिंग या क्षेत्रात कार्यरत 

मुलींचा आरोग्याचा हक्क


आपल्या देशात – ‘मुलगा हवा तोच वंशाला दिवा’ हे लोकप्रिय असले तरी मुलगी झाली की आनंदी होणारे लोकही कमी नाहीयेत. पण तरीही एकूणच मुलीचे संगोपन मुलापेक्षा वेगळ्या प्रकारेच होते. अशा विचारांचा प्रभाव तिच्या वैयक्तिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावरही पडतो.
National Family Health Survey (NHFS) 2019-20 मध्येही असं दिसून आलं आहे की देशातली 50% हून जास्त महिला आणि मुलं अनिमिक आहेत. Nanhi Kali आणि Naandi Foundation यांनी किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयी जो सर्वे (Teen Age Girls report) नुकताच प्रकाशित केलाय त्या अहवालानुसार भारतातल्या 50% मुलींचं वजन अवश्यकतेपेक्षा कमी असतं आणि 52% मुली तर अनिमिक असतात. त्याबरोबरच 39% मुलींना उघड्यावर शौचाला जावं लागतं आणि 46% मुलींना मासिकपाळी दरम्यान आरोग्यपूर्ण पद्धती वापरायला मिळत नाहीत. Naandi Foundation च्या मुख्य अधिकारी रोहिणी मुखर्जी म्हणतात की कुटुंबातलं बायकांचं दुय्यम स्थान, आरोग्या विषयीचं अज्ञान आणि अंधश्रद्धा अशी सगळी कारणं ह्या अवस्थेला कारणीभूत आहेत.
कुटुंबातून आणि प्रसार मध्यमातल्या प्रतिमांमधून मुलींच्या मनावर असं बिंबवलं जातं की तू मुलगी आहेस म्हणजे तू नाजूकच असले पाहिजेस. काही मुली छान उंच असतात, खरी तर ही अभिमानाची गोष्ट असु शकते. पण बरोबरीच्या मुली बुटक्या असल्याने त्या पोक काढून चालतात. किशोरवयात स्तनांची वाढ होऊ लागली की तेही काही मुली लपवायला बघतात. मजबूत शरीरयष्टीच्या सुदृढ मुलींकडे – ‘काय ही पुरुषी आहे, कसे लग्न होणार हिचे?’ अशा दृष्टीने बघितले जाते. ‘तू किती जाडी आहेस’ वगैरे घरच्यांनी सतत म्हटल्यामुळे त्या गरजेपेक्षा कमी खाऊ लागतात आणि कधीकधी त्यांना बुलिमिया सारखे आजारही होतात.
बहुतेक घरांत आधी पुरुषांना वाढले जाते आणि मगच मुलगी आणि आई जेवतात. बरेचदा पौष्टिक पदार्थ संपूनच जातात. अनेक ठिकाणी महिलांनी मांसाहार करू नये – अशी पद्धत असते. शाकाहारी महिलांना लोहाच्या कमतरतेचा धोका जास्तच वाढतो. आई करते तसे सगळे उपास, व्रतवैकल्य मुलीने करावी अशी अपेक्षा केली जाते त्यामुळे मुलींनाही असे उपास करण्यात मोठेपणा वाटू लागतो. ह्या सगळ्यामुळे मुलींमधले कुपोषण वाढत जाते. त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
बऱ्याच घरांमधे अजूनही पाळी सुरू झाली की मुलीला बाजूला बसवले जाते. काहींना त्या काळात पोटात खूप दुखते, किंवा खूप रक्तस्त्राव होतो. बऱ्याच मुलींचे महिन्यातले चार दिवस ह्या कारणांनी फुकट जातात. काही महत्वाचे इव्हेंट, परीक्षा ह्या कारणांनी बुडतात. त्या शिक्षणात मागे पडायला लागतात. आधीच घरातून काही प्रोत्साहन नसते. अश्या मुली आयुष्यात काही उच्च ध्येय कसं ठेवणार?
बहुतेक वेळा मुलींची मानसिकता लग्न ह्या एकमेव ध्येयासाठी तयार केली जाते. त्यादेखील त्या दृष्टीनेच स्वत:ला तयार करायला लागतात. लग्नासाठी आपल्या देशात गोरा रंग हे सौंदर्याचे परिमाण आहे. पण बहुसंख्य मुलींची त्वचा तर सावळी असते. मग ह्या सावळ्या मुली ‘गोरं’ होण्यासाठी वेगवेगळी क्रिम वापरून आपली त्वचा खराब करून घेतात. पिंपल आल्यावर ते फोडून किंवा सतत हात लावूनही चेहरा खराब करून घेतात. किंवा खूप मेक अप, लिपस्टिक, नेल पॉलिश वापरून त्वचा ओठ, नखे खराब करून घेतात. नंतर त्यांना चारलोकांत मिसळण्याचा आत्मविश्वास राहत नाही.
पाळी सुरू झाली की मुलांपासून लांब राहा एवढेच सांगितले जाते. तसेच जननेंद्रियांची पुरेशी स्वच्छता न राखल्याने इन्फेक्शन सुद्धा होतात. मुलींना सेक्स विषयी कुतूहल असतंच. तरी घरून शारीरिक संबंधाविषयी काहीही माहिती दिली जात नाही. मग त्या मित्र किंवा कोणाही पुरुषाच्या आहारी जाऊ शकतात. आणि गरोदर सुद्धा राहू शकतात. असुरक्षित संबंधातून एचआयव्ही चा धोका सुद्धा असतोच. पण पुरुष बहुतेक वेळा कंडोम किंवा इतर गर्भनिरोधक साधनांना नकार देतात. आता गर्भपात हासुद्धा गर्भनिरोधनाचा एक मार्गच होऊन बसलाय. पण प्रत्येक अबोर्शन नंतर स्त्रीचे आरोग्य ढासळत जाते तसा तिला मानसिक धक्काही बसायची शक्यता असते.
ग्रामीण भागातल्या मुलींच्या बाबतीत तर ह्या समस्या खूपच उग्र स्वरूप धारण करू शकतात. ग्रामीण भागातल्या अनेक शाळांत मुलींसाठी स्वच्छता गृह नसल्यामुळे मासिक पाळीच्या काळात मुली शाळेत जातच नाहीत. अनेक शाळांत तर अशी अवस्था आहे की टॉयलेटच्या चार भिंती उभ्या असल्या तरी ते वापरण्याच्या अवस्थेत नसते. काहीनाकाही कारणाने मुलींन शाळेत जाता आलं नाही की त्या अभ्यासात मागे पडत राहतात. अनेकदा 18 वर्ष पूर्ण व्हायच्या अंत त्यांचं लग्न उरकून टाकलं जातं. करोनोत्तर काळात अल्पवयीन मुलींच्या लग्नाचे प्रमाण खूपच वाढले आहे. अनेक ग्रामीण मुलींना गरीबीमुळे लहान वयातच रोजगारासाठी कामाला जावे लागते. ह्यामुळे एकप्रकारे ह्या मुलींच्या हाती पैसा येतो आणि थोडंसं स्वातंत्र्य मिळत असलं तरी तिथे त्यांची पिळवणूक होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. काहीवेळा घरातून मुलीची हेळसांड झाल्याने त्या पळून जाऊन वाईट माणसांच्या तावडीत सापडून वेश्याव्यवसायात ढकलल्या जाऊ शकतात.
थोडक्यात, आपल्या देशातल्या मुलींच्या सर्वच प्रकारच्या आरोग्याच्या हक्कांची प्रचंड प्रमाणात हेळसांड होते आहे. आज जागतिक बालहक्क दिवसानिमित्त ह्याची जाणीव करून द्यावीशी वाटते. कदाचित ही जाणीव आपल्याला आपलं सामाजिक पालकत्व निभावण्यासाठी उद्युक्त करेल!

डॉ मंजिरी मणेरीकर
 

आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी


आज 19 नोव्हेंबर अर्थात – ‘जागतिक पुरुष दिवस’ आहे म्हणे! हे कधी, कोणी ठरवलं, त्याला संयुक्त राष्ट्रसंघाची संमती आहे का - असले काहीही प्रश्न न विचारता - आजच्या दिवशी सगळ्या पुरुषांना सरसकट शुभेच्छा द्यायच्या,पुरुषांचं कवतीक करायचं अशी प्रथा गेल्या पाचसहा वर्षांपासून सुरू झालीये. वेगवेगळ्या चॅनल वरून ह्या नव्या सणाचे स्पेशल रिपोर्टस दिसतातच. बातम्यांमध्ये काही “पुरुष हक्क संघटना” नवऱ्यावर अत्याचार करणाऱ्या बायकांच्या विषयी राग व्यक्त करताना दिसतात, एखादी संस्था बायकांच्या फोटोला चपलांनी बडवते, संन्याशाच्या वेषातल्या ‘पत्नी पीडित’ पुरुषांचा एखादा मोर्चा निघालेला दिसतो. थोडक्यात काय तर जणूकाही स्त्रियाच पुरुषांच्या शत्रू आहेत की काय – असं वाटावं अशा प्रकारे हा सण सार्वजनिक ठिकाणी साजरा होताना दिसतो.
Saveindianfamily foundation सारख्या संस्थांच्या वेबसाइटवर पुरुषांवर स्त्रीयांकडून होणाऱ्या “अन्याया”चे अनेक नमुने वर्षभर मांडून ठेवलेले बघायला मिळतात. पण त्या बरोबरीने पुरुषांचं एकमेकांमधलं जे शत्रुत्व असतं – त्याच्या विरुद्ध मात्र “जागतिक पुरुष दिवसा”च्या निमित्ताने कुठेही काही बोललं जाताना दिसत नाही! त्यामुळे पुरुषांना पुरुषांनीच एकमेकांवर केलेल्या हिंसेचा आणि अन्यायांचा विसरच पडलेला असतो की काय - असा मला प्रश्न पडतो.
खरंतर ‘स्त्री’ किंवा ‘पुरुष’ किंवा अगदी “ट्रान्सजेंडर” ही काही व्यक्तीची एकजिनसी ओळख असूच शकत नाही. उलट जात, धर्म, भाषा, आर्थिक वर्ग, वर्ण – असे अनेक स्तर त्यात असतात. आणि त्यामुळेच माणसामाणसांत वैविध्य असतं आणि विषमता देखील असते. स्त्री-पुरुषांमधली विषमता हा तर त्यातला फक्त एकच पैलू आहे. महिलांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल काही चर्चा सुरू असेल तर बरेचदा – “स्त्री हीच स्त्रीची खरी शत्रू आहे!” ह्या वाक्यावर ती चर्चा येऊन ठेपते. मात्र पुरुषांवरच्या अन्याय विषयीच्या चर्चेत “पुरुषच पुरुषाचा खरा शत्रू आहे” – असं कधी म्हटलेलं ऐकू येत का? तर कधीच नाही! उलट जर एखादी बाई असं म्हणालीच तर तिलाच “फेमी-नाझी” ठरवलं जाईल.

पण खरंतर रोजच्या बातम्या पाहून सुद्धा लक्षात येईल की पुरूषांच्या एकमेकांशी असलेल्या शत्रुत्वाचं प्रमाण किती मोठं आहे. पुरुष एकमेकांशी रस्त्यावर हाणामाऱ्या करतात, शेताच्या मालकीवरून कोर्टात वर्षानुवर्ष भांडत राहतात, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांवर किंवा बॉसवर बढती-बदलीच्या कारणांवरून राग ठेवतात, कुटुंबातल्या अपंग पुरुषांना त्यांचे हक्क नाकारले जातात, धंद्यातल्या स्पर्धेपायी पुरुष एकमेकांच्या खुनाचे कटदेखील रचतात. एवढंच नाही तर रस्त्यावरून वाहन चालवताना अनोळखी पुरुष देखील एकमेकांशी विनाकारण स्पर्धा करून अपघात ओढवून घेतात. अनेकदा संतापाच्या भरत स्वत:वरच राग काढून स्वत:ला इजा करून घेतात. जागतिक पातळीवर विध्वंसक शस्त्रास्त्र तयार करून देशांच्या सीमेबद्दल युद्धखोरी करतात. सैन्यात एका देशाने दुसऱ्या देशावर मिळवलेला विजय प्रस्थापित करण्यासाठी दुसऱ्या देशातल्या स्त्रियांच्या बरोबरीने पुरुष सैनिकांवरसुद्धा बलात्कार केले जातात. इतकंच नाही तर सैन्यातील अधिकारी स्वत:च्या हाताखाली काम करणाऱ्या सैनिकांवर देखील  मोठ्या प्रमाणावर लैंगिक हिंसा करतात असे दिसून आलेले आहे. Pentagon च्या एका अहवालानुसार दरवर्षी सरासरी 10,000 पुरुष सैनिकांवर लैंगिक अत्याचार केले जातात. पोलिस कस्टडीत किंवा तुरुंगातल्या कैद्यांना प्रचंड मारहाण केली जाते, हे तर सर्वांना माहीतच असते. अनेकदा त्यात कैद्यांचे मृत्यू ओढवतात. असे एकनादोन असंख्य प्रकारचे हिंसाचार अन्याय विविध सामाजिक पातळ्यांवरचे पुरुष एकमेकांवर करत असतात. स्त्रीयांनी पुरुषांवर केलेल्या अन्यायापेक्षा, हिंसेपेक्षा पुरुषांनी पुरुषांवर केलेले अन्याय आणि हिंसा कितीतरी जास्त प्रमाणात आहे - हे NCRB (नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो)च्या अहवालातल्या आकडेवारीकडे बघून सुद्धा लक्षात येईल. पण ‘जागतिक पुरुष दिनाच्या’ निमित्ताने केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये यातल्या कशाबद्दलही आवाज उठवला जात नाही. त्याऐवजी पुरुष हक्क समिती सारख्या संस्था - ‘पुरुषांवर स्त्रियांकडून झालेल्या हिंसेची’ तुरळक उदाहरणे देत राहतात आणि देशातले ‘महिला धार्जिणे’ कायदे बदलायची मागणी करतात. त्यातली सगळीच उदाहरणं खोटी असतील, असं मला अजिबात सुचवायचं नाही! पण शेकडो वर्षांची पितृसत्ता मुरलेल्या आपल्या देशात पुरुषांवर हिंसा करण्या इतकी ताकद किती टक्के बायांमध्ये असु शकते, याचा तरी विचार करायला हवा की नाही?
आपल्या देशात महिलांनी पुरुषांवर केलेली हिंसा याविषयावर फारसे अभ्यास झालेले नाहीत. पण युरोप आणि इतर पाश्चिमात्य देशातल्या संशोधनांमध्ये हे प्रमाण जेमतेम 1 ते 2 टक्के एवढंच दिसून आलंय. दोन वर्षांपूर्वी हरयाणा मध्ये 21 ते 50 वर्ष वयोगटातल्या 1000 पुरुषांच्या सोबत केलेल्या एका संशोधनाचा अहवाल सरकारच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्यात असं दिसून आलं की 51.5 % पुरुषांना आयुष्यात एकदा तरी बायको किंवा प्रेयसी कडून हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. त्यापैकी 10.5 % पुरुषांना सर्वेक्षणाच्या आधीच्या वर्षभरात अशा हिंसेचा अनुभव आला होता. यापैकी पन्नास टक्क्याहून थोडा अधिक प्रकरणांत मानसिक हिंसाचार करण्यात आला होता आणि 1/10 प्रकारात शारीरिक बळाचा वापर झाला होता. यापैकी अर्ध्या प्रसंगात पुरुषांकडून शारीरिक आणि मानसिक हिंसेला सुरुवात केली गेलेले होती. थोडक्यात, शारीरिक हिंसेच्या बाबतीत बायकांनी केलेली हिंसा अत्यल्प म्हणता येईल इतकीच होती - असे दिसले आहे. याउलट बायका जेव्हा कौटुंबिक हिंसेच्या तक्रारी घेऊन येतात तेव्हा अनेकदा त्यांची हाडं मोडलेली असतात किंवा अंगावर माराचे वळ असतात - हे आपल्याला माहीतच आहे. भारतातल्या इतर राज्यांमध्ये खूप वेगळी परिस्थिती असेल असं मला तरी वाटत नाही. पुरुषांनी एकमेकांवर किंवा स्त्रियांवर केलेल्या हिंसेच्या तुलनेत स्त्रियांनी पुरुषांवर केलेल्या हिंसेचे प्रमाण किती कमी आहे - ते यातून पुरेसं स्पष्ट होत आहे. 
जरी काही पुरुषांना काही महिला त्रास देत असतील तरी समाजातली एकूण पितृसत्ता मात्र तशीच राहते. हीच पितृसत्ता पुरुषांना ‘मर्दानगी’च्या चुकीच्या कल्पनांमध्ये अडकवून त्यांच्यातली कोमलता, संवेदनशीलता हिरावून घेते. पुरुष अनेकदा ‘मर्दानगी’ विषयी चुकीच्या कल्पनेतून निष्कारण जोखीम घेतात, ताणतणाव ओढवून घेतात. ‘मर्द को दर्द नहीं होता’ अशी जी पुरुषाची प्रतिमा तयार झालेली आहे - त्या प्रतिमेच्या प्रेमातून पुरुषांनी बाहेर पडायला हवं. म्हणजे कदाचित तो स्वत:ला आणि दुसऱ्या पुरुषांनाही त्रास देणं आणि त्यांच्यावर हिंसा करणं कमी करू शकेल. पुरुषांमधला वैरभाव कमी होऊन आपुलकी जागी होऊ शकेल. त्याकरता ‘आपली कमजोरी काय आहे किंवा बलस्थान काय आहे’, ‘आपल्या पुरुषीपणाच्या कल्पना काय आहेत’ त्याबद्दल सामूहिक चर्चा करायची, आत्मपरीक्षण करायची संधी पुरुषदिना निमित्त पुरुषांनी घेतली पाहिजे. 

वंदना खरे

संपादक
 'पुन्हास्त्रीउवाच'   

 

रुपेरी पडद्यामागच्या स्त्रीया (भाग 4 )

रुपेरी पडद्याच्या मागे चित्रपट-निर्मितीचं एक खूप मोठं विश्व असतं. चित्रपटसृष्टी आणि स्त्रीया असा विचार करताना डोळ्याला सहज दिसणाऱ्या आणि लोभावणाऱ्या अभिनेत्री किंवा कानाला सहज ऐकू येणाऱ्या गायिका आठवतात. पण काहीजणींनी अभिनेत्री म्हणून कमाल सुरुवात केली असली तरी नंतर त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही योगदान दिले आहे. 
अभिनयाची बरीच मोठी कारकीर्द असलेल्या दुर्गाबाई खोटे यांनी दुर्गा खोटे प्रॉडक्शन ही कंपनी सुरू करून त्या द्वारे लघुपटांची निर्मितीही केली आहे. तसंच १९३६ सालातल्या 'अमरज्योती' या चित्रपटात सागरी चाच्यांच्या नायिकेचं काम करताना मराठी चित्रपटातले पहिले स्टंटही केले होते.
याची सुरवात अर्थातच फिअरलेस नादियानं केली. ती मूळची भारतीय नसली तरी तिचं भारतीय चित्रपटात मोठं योगदान आहे. नृत्य आणि कसरतीत पारंगत असलेली नादिया म्हणजे मेरी इव्हान्स ही सुद्धा अर्थार्जनासाठीच या क्षेत्रात आली. १९३३ सालातल्या 'लाल ए यमन' या चित्रपटासाठी ती स्टंट मास्टर होती .पुढे स्वतः पडद्यावर आली. फक्त अभिनेत्री म्हणून नव्हे तर स्टंट करणारी, पुरुषप्रधान समाजाला स्त्रीची क्षमता दाखवणारी भारतीय चित्रपटांतली पहिली स्त्री किंवा सुपर वुमन म्हणून. 
तिची कारकीर्द जे.बी.एच. वाडियांच्या कंपनीत बहरली. पुढे जेबींचा धाकटा भाऊ होमी यांच्याशी विवाह करण्याचं ठरवलं.परंतु होमींच्या आईचा अशा आंतरधर्मीय विवाहाला विरोध होता.तो मोडण्याचं धाडस या पडद्यावरच्या धाडसी स्त्रीनं केलं नाही. होमींच्या आईच्या मृत्यूनंतरच दोघं विवाहबद्ध झाले.
ज्यांची मराठी चित्रसृष्टीतली प्रतिमाच धाडसी आहे अशा सुषमा शिरोमणी यांचं नाव लक्षात घ्यावं लागेल. 
आज सर्वज्ञात असलेल्या आयटम नंबरची सुरवात मराठीत करणाऱ्या सुषमा शिरोमणींनी अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन आणि चित्रसृष्टीतलं संस्थात्मक काम(इंडियन मोशन पिक्चर असोसिएशन) यावर आपली मोहोर उमटवली. हिंदीतही त्यांनी चित्रनिर्मिती, दिग्दर्शन केलं. 
स्मिता तळवलकर, तृप्ती भोईर, सुमित्रा भावे यांच्यासारख्या सातत्यानं मराठीतच निर्मिती-दिग्दर्शन करणाऱ्या पडद्यामागच्या स्त्रीयांची संख्या मात्र फारच कमी आहे. आता अभिनेत्री मृणमयी देशपांडेनीही दिग्दर्शनात दमदार पदार्पण केलं आहे. सई परांजपे, विजया मेहता यांच्यासारख्या मराठी नाटक दिग्दर्शित करणाऱ्या स्त्रीयासुद्धा हिंदी चित्रसृष्टीत उतरल्या.
एकूणच भारतीय चित्रसृष्टीत स्त्रीयांची कार्यक्षेत्रं विस्तारताहेत हे नक्की. एकता कपूर सारखी प्रसिद्ध अभिनेते जीतेंद्र यांची मुलगी अभिनेत्री न होता निर्माती होते. टीव्ही माध्यमाची नस ओळखून, त्यात य़शस्वी होऊन स्वतःची निर्मिती संस्था काढते आणि चित्रपट निर्मिती, वितरण आणि नव्यानं आलेलं इंटरनेटवरचं ओटीटी माध्यमही लीलया हाताळते आहे. एखाद्या भानू अथय्या 'गांधी' या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी वेशभूषाकार होऊन भारताला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून देताना दिसतात. सूनी तारापोरवाला सलाम बॉम्बे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर सारख्या चित्रपटांसाठी दमदार स्क्रीन-प्ले लिहितात. सई परांजपे, कल्पना लाजमी, अपर्णासेन सारख्या कला आणि व्यवसाय यांचा मेळ घालणाऱ्या दिग्दर्शिका नव्यांना प्रेत्साहित करतात. 
एखादी मेघना गुलजार काळाच्या पुढे असलेला सरोगेट मदरहूड सारखा विषय घेऊन 'फिलहाल' चित्रपट दिग्दर्शित करते. अनुषा रिझवी कथा,पटकथा,दिग्दर्शनाची जबाबदारी घेऊन “पीपली लाईव्ह”सारखा समाजाला आरसा दाखवणारा चित्रपट करते. अलंक्रिता श्रीवास्तव,रीमा कागती, झोया अख्तर, जुही चतुर्वेदी यांच्या सारख्या पटकथा लेखन आणि दिग्दर्शन करणाऱ्यांमुळे चित्रपट सृष्टीतल्या विषय वैविध्याला चालना मिळाली आहे. स्त्रीयांच्या दृष्टिकोनातून नातेसंबंध, लैंगिकता, सौदर्य कल्पना यांच्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन तयार होतो आहे. असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
शर्मिष्टा रॉय सारखी कलादिग्दर्शिका 'बॉक्स ऑफिस हिट' चित्रपटांसाठीही 'कलात्मक' काम करते. ”हायवे” “तमाशा”, सारख्या वेगळ्या चित्रपटांचं कला दिग्दर्शन मानिनी मिश्रा करते. ’ट्रॅप्ड’ सारख्या हटके चित्रपटाचं काझ्विन डांगोर ही प्रॉडक्शन डिझाईन करते. रेणू सलूजा अल्प काळात चार राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी यशस्वी संकलक होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून य़शा रामचंदानी “आर्टिकल फिफटीन” एडिट करते. सरोज खान,गीता कपूर,फराह खान सारख्या नृत्यदिग्दर्शिका होतात. एखादी हेतल देढिया इलेक्ट्रिसिटी आणि लायटिंग विभाग सांभाळते. 
बी आर विजयालक्ष्मी
बायकांना जड कॅमेरे वापरून काम करता येईल का अशी शंका व्यक्त करणाऱ्यांना बी आर विजयालक्ष्मी उत्तर देते. ऐशी ते नव्वदच्या दशकात त्या आशियातल्या पहिल्या महिला सिनेमॅटोग्राफर होतात आणि तमीळ चित्रपट सृष्टीत पाय रोवून पुढे पटकथा लेखन आणि दिग्दर्शनही करतात. ’एअरलिफ्ट’ चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफर प्रिया सेठ यांनी तर सिनेमॅटोग्राफर स्त्रीयांची संघटना बांधायचा प्रयत्नही केलाय. पण मोठ्या बजेटची कामं अजूनही स्त्रीयांना मिळत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आता छोट्या डिजिटल कॅमेऱ्यावर, मोबाईल फोनवरही चित्रपट बनू लागल्यामुळे अधिक स्त्रीया या क्षेत्रात येतात का बघावे लागेल.
ज्यांची नावं आपल्यासमोर येत नाहीत, त्यांची फारशी नोंदही होत नाही अशाही अनेक स्त्रीया चित्रपटसृष्टीत अनेक विभागात काम करताहेत. त्यांचा टक्का वाढतो आहे.तरीही आपलं काम करताना अजूनही वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक पातळ्यांवर संघर्ष करताहेत. अनेक धोक्यांना पार करताना धडपडताहेत, पुन्हा उठताहेत, पुढे जाताहेत. #metoo च्या लाटेत चित्रपट सृष्टीतल्या काही स्त्रीयांनी आपापल्या कहाण्या उघड केल्या परंतु. एक इंडस्ट्री म्हणून पडद्यावरच्या आणि या पडद्या मागच्या, स्त्रीयांचं कार्यक्षेत्र अधिक सुरक्षित व्हावं असे संघटित प्रयत्न मात्र होताना दिसत नाहीत. आपल्या देशात इतरत्र आहे तशी परिस्थिती चित्रपट क्षेत्रातही आहेच. शूटिंगच्या ठिकाणची स्वच्छतागृहांची कमतरताही दूर झालेली नाही. हाताखालच्या पुरुषांबरोबर काम करताना अजूनही त्यांना इतर पुरुषांइतकी अथॉरिटी नेहमीच मिळत नाही. कामाच्या मोबदल्यातही तफावत आहे. हे या स्त्रीयांच्या मुलाखती इंटरनेटवरून शोधल्यास आढळते.
चित्रपट हे तंत्राधिष्टित, गटानं निर्मिती करायचं कला माध्यम आहे. त्यामुळे आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी इतरांचा आधार लागतोच. तो मिळविताना अनेकींना इंडस्ट्रीतल्या, कुटुंबातल्या आणि एकूण समाजातल्या लिंगभेदभावामुळे त्रास होतो. आता अनेकींना कुटुंबाचा,जोडीदाराचा,सहकाऱ्यांचा,संघटनांचा आधारही मिळतो आहे. ही चांगली गोष्ट होते आहे.
नुसतं सुंदर दिसण्याच्या पलीकडे जाऊन चित्रपट सृष्टीतलं कुठलंही आव्हान या स्त्रीया पेलताहेत. आशय-विषय-मांडणी-तंत्रज्ञानाचा वापर या सगळ्याच प्रांतात मोलाची भर घालून चित्रपटसृष्टीचा चेहरा मोहरा बदलण्यात महत्वाचा वाटा उचलताहेत हे नक्कीच अभिमानास्पद आहे. भारतीय चित्रपट सृष्टीच्या निर्मितीचा मोठा आवाका आणि दीर्घ कार्यकाळ पाहता या आढाव्यात अनेक स्त्रीयांची नावं राहून गेली असणार. त्या सगळ्याच पडद्यामागच्या स्त्रीयांना रुपेरी सलाम!

सुषमा दातार

मास कम्युनिकेशन आणि चित्रपट
यांच्या निवृत्त व्याख्यात्या,
अभ्यासक आणि लेखिका