रुपेरी पडद्यामागच्या स्त्रीया (भाग 3 )

मागच्या दोन लेखात भारतीय चित्रपटसृष्टी मध्ये निर्माती , दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांची उदाहरणं पहिली. आता थोडं संगीत क्षेत्राकडे बघूया. 
लोकप्रिय अभिनेत्री नर्गिस हिची आई जद्दनबाई या व्यावसायिक गायिका होत्या. त्यांच्या ग्रामोफोन रेकॉर्ड निघाल्या होत्या. अभिनेत्री म्हणूनही काही चित्रपट त्यांनी केले.१९३५ मधे त्यांनी स्वतःची 'संगीत फिल्म्स' ही कंपनी सुरू केली आणि 'तलाश ए हक' हा चित्रपट केला. त्यात त्यांनी भूमिका केली आणि संगीतही दिलं. याच काळात मुख्तार बेगम, गोहर कर्नाटकी, मुन्नीबाई यांनीही संगीत दिग्दर्शन केलं
सरस्वती देवी याही त्याच काळातल्या. त्यांचं खरं नाव खुर्शिद होमजी. माणेक आणि खुर्शिद या पार्शी कुटुंबातल्या दोघी बहिणी विष्णु नारायण भातखंडे यांच्याकडे हिदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकलेल्या होत्या. मुंबईत ऑल इंडिया रेडिओ सुरू झाल्यावर या बहिणी संगीताचा कार्यक्रम करू लागल्या. हिमांशु राय यांनी त्यांना 'बॉम्बे टॉकीज' या आपल्या कंपनीत संगीताचं डिपार्टमेंट सांभाळण्यासाठी बोलावून घेतलं.१९३५ मधे 'जवानी की हवा' या चित्रपटाला खुर्शिद यानी संगीत दिलं.परंतू पारंपरिक विचारांच्या काही पार्शी मंडळींना त्यांचं हे धाडस आवडलं नाही. खूप विरोध झाला.पण हिमांशू राय यांनी मार्ग काढला.
सरस्वती देवी 
खुर्शीदचं सरस्वती देवी आणि माणेकचं चंद्रप्रभा असं नामकरण करून त्यांची खरी ओळखच लपवली. पुढच्या गाण्यांच्या क्रेडिट्स मधे सरस्वती देवी असं नाव येऊ लागलं.१९३६ सालातल्या 'अछूत कन्या' या चित्रपटातलं 'मै बनकी चिडिया बनके बन बन डोलू रे' हे अशोक कुमार,देविका राणी यांनी गायलेलं लोकप्रिय गीताचं संगीत त्यांनी केलंय. 'कोई हमदम ना रहा' हे गाणंही मुळात यांचंच. पुढे ते 'झुमरू' या चित्रपटातून किशोर कुमार मुळे प्रसिध्द झालं.५०-५५ सालापर्यंत सरस्वतीदेवींनी संगीत दिग्दर्शनाचं काम केलं.गाणंही शिकवत राहिल्या. जीवनाच्या शेवटाला मात्र चित्रसृष्टीसाठी त्या जवळजवळ विस्मृतीत गेल्या. 
आता स्नेहा खानवलकर हे नाव 'हटके' चित्रपटांच्या 'हटके' संगीतामुळे पुढे आलं आहे.'सरकार राज,लव्ह सेक्स और धोका,भेजा फ्राय' सारखे वेगळ्या धाटणीचे कथापटपट आणि ‘मालेगावके सुपरमॅन’ या माहितीपटासाठी केलेलं तिचं काम महत्वाचं ठरलं.
स्नेहा खानवलकर 
अनेक प्रांतातलं लोकसंगीत आणि परिसर ध्वनी गोळा करून, त्याचा अभ्यास करून, त्याचा आधुनिक ध्वनितंत्रज्ञानाशी मेळ घालून तिने एम टीव्ही साठी साउंड ट्रिपिन हा कार्यक्रम केला. 'गॅंग्ज ऑफ वास्सेपूर' या चित्रपटातल्या "ओ वुमनिया" या गाण्यानं तिला प्रसिद्धी मिळाली.
उषा खन्ना
या दोन्ही टोकांच्या मधे खूप मोठी कारकीर्द असलेल्या उषा खन्ना यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून,१९५३ मधल्या 'दायरा' पासून २००३ मधल्या 'दिल परदेसी हो गया' पर्यंत पन्नास वर्ष काम केलं तेही महत्वाचं आहे. लता मंगेशकर यांनीही आनंदघन या नावानं मराठीत संगीत दिग्दर्शन केलेलं आपल्याला माहीतच आहे.
एकूणच भारतीय चित्रसृष्टीत स्त्रीयांची कार्यक्षेत्रं विस्तारत गेली, हे नक्की. ज्यांची नावं आपल्यासमोर येत नाहीत, त्यांची फारशी नोंदही होत नाही अशाही अनेक स्त्रीया चित्रपटसृष्टीत अनेक विभागात काम करताहेत. त्यांचा टक्का वाढतो आहे. पुढच्या लेखात चित्रपटांच्या निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या आणखी काही स्त्रियांच्या विषयी माहिती करून घेऊ.


सुषमा दातार

मास कम्युनिकेशन आणि चित्रपट
यांच्या निवृत्त व्याख्यात्या,
अभ्यासक आणि लेखिका

 

अस्सं सासर सुरेख्ख बाई !

लग्न होऊन सासरी आले तेव्हा मला स्वयंपाकघरातली कोणतीच कामं येत नव्हती.माझ्या माहेरी सुरुवातीला एकत्र कुटुंब होतं, त्यामुळे माझ्या आत्या, काकवा होत्या. त्यामुळे भांडी जागच्या जागी लावणे,कपड्यांच्या घड्या करणे आणि कधीमधी घर झाडणे आणि पानं घेणे अशी कामे आम्हा लहान मुलांना करावी लागत. त्यामुळे प्रत्यक्ष स्वयंपाक घरात काय आणि कसं करायचं याचा अनुभव मला शून्य होता. तसेच माहेरी चिंच गुळ वापरत होते का? घडीची पोळी करत का? कढीत हळद घालत का? याबद्दल मला खरंच काही माहिती नव्हती. मी सासरी अगदी कोरीपाटी घेवून आले होते. लग्नाच्या आधी मी बाहेरगावी राहत असल्याने मला अनेक गोष्टी माहित नव्हत्या. पण सासरी आल्यावर तुमच्याकडे कसं? आपल्याकडे असं... हे काहीच ऐकायला मिळाले नाही.
मी माझ्या चुलत सासूबाई सुषमा बर्वे यांच्याबरोबर राहत असे. आम्ही राहत होतो ते गाव अगदीच छोटं होतं/आहे. तिथं दिवसातून एक वेळा बस यायची,दळणवळणाची साधनं फारशी नव्हती. तर माझ्या सासूबाई या खूप निगुतीने स्वयंपाक करणाऱ्या आहेत. पण त्यांनी मला कधीही ऑर्डर सोडली नाही, त्या म्हणायच्या – ‘मी हे करतेय, तू काय करशील?’ मग मी एखादं काम सांगायचे. उदा.मी कुकर लावते असं म्हटलं,तर त्या म्हणत – ‘घरात कितीजण आहेत? त्यानुसार भात लावायचा.’ त्यांचं प्रमाणाचं एक भांड होतं, त्यांनुसार एका भांड्यात दोनजणांचा भात होतो. त्या पद्धतीने त्यांनी मला मोजमाप करायला शिकवले. भाजी बटाट्याची करायची तर किती बटाटे एकाला त्यानुसार मी करायचे. यामुळे एक झालं की,मी सुरुवातीपासूनच मोजूनमापून स्वयंपाक करायला शिकले. आमच्या घरात असं म्हणतात की स्वयंपाक हे विज्ञान आहे. म्हणजे कुकरची शिट्टी करायची नाही. शिट्टी होईल असं वाटलं की gas बंद करायचा. मी हे सगळं पहिल्यांदाच करत होते आणि त्या गावात बाहेर जावून काही करण्यासारखे नव्हते. त्यामुळे मला हे शिकतांना खूप मजा आली.
आमच्या या घरात पुरुष काम करतांना दिसत. म्हणजे मला आठवतंय की धान्याची सगळी काळजी घेणे, चिंच वर्षभर पुरेल अशी तयार करून ठेवणे, तांदूळ निवडून ठेवणे अशा ज्या गोष्टी असतात ती सर्व कामे माझे सासरे करत. मुख्य म्हणजे आमच्या घरात जो तो ज्याचं त्याचं जेवणाचं ताट घासून टाकत असत. पाहुणे आले तरी ते आमच्या घरातल्या लोकांचे बघून ताट घासत असत. तसेच जो तो ज्याचे त्याचे कपडे धुवून टाके. त्यामुळे मी एका खेड्यात जरी राहत होते तरी घरात फक्त स्त्रियांनीच काम करायचे असा काही नियम नव्हता. त्यामुळे माझं स्वयंपाक घरातलं शिक्षण हे मजेत झालं. भाकरी थापतांना दोन्ही हात कसे वापरायचे,त्याला पापुद्रा येण्यासाठी ती मळायची कशी आणि त्यामागे काय विज्ञान आहे हे मला माझे सासरे मस्त सांगत. अर्थात त्यामुळे मी सगळं छान करू शकले असं नाही, पण मी प्रयत्न करू लागले. त्यांच्याकडूनच मी कच्चा चिंचेचे तोखं, कवठाची जेली, जाम, च्यवनप्राश अशा गोष्टी शिकले.म्हणजे ते करत असत आणि मला उत्सुकता वाटली आणि मी काही विचारलं तर ते सांगत. पण मी ते केलं पाहिजे अशी जबरदस्ती नव्हती.
अजून एक फार महत्वाची आणि वेगळी गोष्ट या घरात होती, ती म्हणजे कोणी आलं की चहा न करण्याची. आमच्या घरात वाळलेल्या,उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा असत, कधी आंबे असत, तर कधी सुकवलेली केळी असत, काहीवेळेस माझे सासरे मसाल्याचे दाणे करून ठेवत. या गोष्टी पाहुणे किंवा कोणी गप्पा मारायला,भेटायला आलेल्यांना दिले जाई. चहा आणि त्याचे कप विसळणे हे काम करावे लागत नसे. माझं लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात या गोष्टी मला फार महत्वाच्या आणि कौतुकाच्या वाटल्या.
कधी कधी दिवाळीत किंवा लग्न कार्याच्या वेळी घरात बाहेरगावी राहणारे नातेवाईक येत. त्यावेळी माझ्या चुलत सासूबाई सगळ्यांना आपापली कामं वाटून देत. त्यात पुरुषपण असत. त्या काकुंचे अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एखादा नवीन पदार्थ केला असेल आणि तो सर्वांना पुरेल की नाही; अशी शंका असेल तर त्या तो पदार्थ सगळ्यांना म्हणजे घरतल्या स्त्रियांना सुद्धा योग्य पद्धतीने वाटत. किंवा सरळ काढून ठेवत आणि म्हणत की आता संपला. तसेच शिळा पदार्थ सुद्धा सगळ्यांना सारखा वाटत. त्यामुळे आम्हांला कोणालाच शिळं एकट्याने खाण्याची सवय नाही.एकतर त्यांच्या पद्धतीने केले तर उरायचे नाहीच.या सगळ्याचा खूप चांगला परिणाम माझ्यावर झाला.
अजून एक खूप चांगली गोष्ट माझ्या सासरी होती ती म्हणजे काम सोप्पं होईल अशा यंत्रांची आवड. त्यामुळे कपडे धुण्याचे मशीन, मिक्सर, मायक्रोवेव्ह या वस्तू घरातील स्त्रियांबरोबर पुरुष सुद्धा वापरत. त्यात हल्लीच्या स्त्रियांना कसं काम नसतं हा भाव नव्हता. त्यामुळे घरातले पुरुष काम करत आहेत याबद्दल माझ्या मनात कधीही अपराधीभाव निर्माण झाला नाही. 
खरंतर ते काम आम्हांला मदत म्हणून नव्हते तर त्यांना स्वतःला कामाची आवड होती आणि आपल्याला सगळं येतं हा भाव पण होता. माझी या भावनेला हरकत असण्याचे काही कारण नव्हते! पण आमच्या घरातील काही स्त्रियांना पुरुषांचे असे स्वयंपाक घरात काम करणे, लुडबुड करणे आवडायचे नाही. त्यांना पुरुष सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी हे करतात असेही वाटे. पण माझं असं काही मत नव्हतं. पुरुषांना स्वयंपाक येत असल्याने आम्हांला स्त्रियांना कुठे जायचे असेल तर आता स्वयंपाकाचं काय? हा प्रश्न पडत नसे.
मला वाटतं आमच्या घरातले पुरुष स्वयंपाक घरात काम करतात याचे श्रेय हे माझ्या आजे सासूबाईना( सावित्री बर्वे ) जातं. कारण माझे आजेसासरे स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामुळे ते घरात कधीच नसत. अशावेळी या मुलांना हाताशी घेवून त्या अनेक कामं करत. त्यांना पाच मुलं आणि तीन मुली होत्या. पण खूप सारी कामे त्या मुलग्यांना सांगत कारण मुली बाहेर शिकायला ठेवल्या होत्या. या मुली पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत - असा त्यांचा आग्रह होता आणि तो त्यांनी पूर्ण केला. म्हणून मला वाटते की माझे सासरे काम करतात म्हणून माझा नवरा करतो आणि तो करतो म्हणून माझा मुलगा करतो. मला असे वाटते की कोणतेही काम लहान-मोठे नाही. आपल्याला स्वतंत्रपणे राहायचे असेल तर सगळ्याप्रकारची काम करताच आली पाहिजे मग आपण मुलगा असो की मुलगी!

अश्विनी बर्वे

  

रुपेरी पडद्यामागच्या स्त्रीया (भाग 2 )

पहिल्या लेखात आपण सरस्वती फाळके, देविकाराणी, मीनाक्षी नारायणन या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या महिलांच्या वैविध्यपूर्ण कामाबद्दल समजून घेतलं. (पहिला लेख )
 त्याचसोबत फ्रान्समधल्या अॅलिस गी (Alice Guy- Blache') या पहिल्या सिने-दिग्दर्शक महिले विषयी माहिती करून घेतली. त्या अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि तंत्रज्ञ सुध्दा होत्या. अलिसची चित्रनिर्मिती भरात होती तेव्हा भारतात स्त्रीयांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटांत प्रवेश करायला सुरवात केली होती. 
कमलाबाई
बहुतेक स्त्रीयांचा चित्रपटसृष्टीतला प्रवेश हा अर्थार्जनासाठी झाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.परंतु एकदा कार्यक्षेत्र निवडल्यावर बहुतेक जणींनी सक्षमपणे यात प्रगती केली. १९१३ साली दुर्गाबाई कामत आणि त्यांची मुलगी कमलाबाई कामत (नंतरच्या गोखले) यांनी दादासाहेब फाळक्यांच्या ‘मोहिनीभस्मासूर’ या मूकपटात काम केलं. अभिनयापाठोपाठ स्त्रीयांचं कार्यक्षेत्र विस्तारू लागलं.
फातिमा बेगम या पहिल्या स्त्री दिग्दर्शक. उर्दू नाटकांत काम करणाऱ्या या अभिनेत्रीनं १९२२ साली 'वीर अभिमन्यू' या आर्देशर इराणी यांच्या चित्रपटातून पदार्पण केलं. फक्त छानछान दिसण्यात समाधान न मानता फातिमा बेगमना दमदार भूमिका हवी होती. इतर कुणी ती आपल्याला देईल अशी वाट न पाहता त्यांनी चक्क स्वतःची 'फातिमा फिल्म्स' ही कंपनी काढली.१९२६ साली 'बुलबुल ए परिस्तान' हा मोठ्या बजेटचा, स्पेशल इफेक्ट्स असलेला, कल्पनारम्य चित्रपट काढला. लेखिका,अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती असे रोल निभावले.
त्यांच्या कर्तबगारीला वाव मिळाला.परंतु त्या गुजरातेतल्या एका संस्थानाच्या नबाबाची पत्नी होत्या. प्रतिष्ठेच्या कल्पनेपायी पतीचा विरोध होत राहिला. तरीही आर्थिक गरज होतीच. हे कार्यक्षेत्र न सोडता पतीला सोडचिठ्ठी देऊन त्या काम करत राहिल्या. 
त्यांच्या झुबेदा,सुलताना,शेहजादी या मुली अभिनेत्री म्हणून गाजल्या.पैकी झुबैदा हिनं १९३१मधे 'आलमआरा' या पहिल्या भारतीय बोलपटात नायिकेची भूमिका केली होती.

झुबेदा 
तामीळ चित्रसृष्टीतल्या टी.पी.राजलक्ष्मींची दखलही घ्यायला हवी.तंजोर जिल्ह्यातल्या पारंपरिक शास्त्री कुटुंबात १९११ साली जन्मलेल्या या मुलीचा बालविवाह झाला होता.काही मतभेदामुळे ती सासरी नांदायला गेलीच नाही. मग वडिलांच्या मृत्यूनंतर आर्थिक परिस्थिती खालावली. आईनं या गोड गळ्याच्या,रूपवान मुलीला तामीळ नाट्यसृष्टीचे पितामह शंकरदास स्वामिगल यांच्याकडे नेलं. चांगल्या मार्गदर्शनाखाली या मुलीचं रूपांतर एका लोकप्रिय अभिनेत्रीत झालं.परंतु दूरस्थ पतीनं मात्र याला आक्षेप घेतला आणि तिला सोडचिठ्ठी दिली. 
राजलक्ष्मी 
आपल्या कामातून आत्मभान, समाजभान गवसलेल्या राजलक्ष्मी ह्या फक्त लिहून दिलेले संवाद,गाणी म्हणणाऱ्या अभिनेत्री नव्हत्या. त्या नाटकात धाडसानं देशभक्तीपर गाणी म्हणत असत. मग त्यांना अटक होई आणि नाटककंपनीवाले त्यांना सोडवून आणत असं बरेच दिवस चाललं. नाट्यक्षेत्रात जम बसल्यावर त्यांनी सहकारी अभिनेते टी.व्ही.सुंदरम याच्याशी विवाह केला.त्या काळात नकोश्या मुलींना मारून टाकण्याची प्रथा चांगलीच प्रचलित होती. अशा एका मुलीचा जीव वाचवून या दांपत्यानं तिला दत्तक घेतलं होतं. त्यांना स्वतःचीही एक मुलगी होती. पुढे चित्रपटांची लोकप्रियता वाढायला लागल्यावर त्याही तिकडे वळल्या.१०३१ साली 'कालीदास' या पहिल्या तामीळ बोलपटात त्या नायिका होत्या. त्यानंतर १९३६ साली त्यांनी स्वतःच्याच कादंबरीवर आधारित 'मिस कमला' हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यात अभिनय केला आणि संकलनही त्यांनीच केलं. खूप प्रसिध्दी आणि पैसा मिळाला पण कुटुंबाचं करता करता या अर्धशिक्षित दांपत्याला आपली संपत्ती गमवावी लागली. बेताच्या परीस्थितीत शेवटचे दिवस घालवावे लागले.

चित्रपट हे करमणुकीचं माध्यम म्हणून समाजमान्य झाल्यावर अनेक अभिनेते, अभिनेत्रींना प्रचंड प्रसिध्दी आणि पैसा मिळाला. काहींनी तो परत चित्रनिर्मितीत घातला. परंतु व्यवसाय आणि कौटुंबिक मागण्या नीट हाताळता न आल्यानं अनेकांची शोकांतिका झाल्याचं दिसतं. तर काहींनी आपली मुलंमुली चित्रसृष्टीत आणली आणि त्यांच्या अर्थार्जनावर कुटुंब तगवलं असंही दिसतं.
चित्रपट क्षेत्रातल्या या व्यावसायिक स्त्रीयांच्या खाजगी आयुष्याबद्दल का बोलायचं? असा प्रश्न काहींना पडेल.परंतु ते सांगितल्यानं त्यांच्या कर्तुत्वाचा संपूर्ण आलेख आपल्या डोळ्यासमोर येतो. त्या काळातली सामाजिक,कौटुंबिक पार्श्वभूमी कळते. त्यांना या क्षेत्रात आणणारी परिस्थिती आणि होणारा विरोध कळल्यानं त्यांचं कर्तुत्व अधिक स्पष्टपणे समोर येतं. प्रतिष्ठित कुटुंबातली असो नाही तर नसो, स्त्रीनं पुरुषाच्या आधाराशिवाय राहणं समाजात जवळजवळ अमान्यच होतं - तेव्हा अर्थार्जन आणि कार्यक्षेत्रातल्या कर्तबगारी बरोबर कौटुंबिक नाती सांभाळणंही आवश्यक ठरत असे.काहीना ही तारेवरची कसरत जमली,काहींना जमली नाही.परंतु या सगळ्या स्त्रीया नव्या वाटा तयार करत गेल्या.त्यावरून पुढच्या पिढीतील स्त्रीया चुकतमाकत,शिकत चालू लागल्या.

सुषमा दातार

मास कम्युनिकेशन आणि चित्रपट
यांच्या निवृत्त व्याख्यात्या,
अभ्यासक आणि लेखिका

 

कहाणी बालिका दिवसाची

एक होती आटपाट नगरी. त्या नगरीत होत्या अनेक डगरी.

डगरींवर राहत होत्या अनेक जणी

त्यात होती एक राणी

तिच्या डोळ्यासमोर असत साऱ्याजणी

सगळेजण सुखाने राहत होते.

आपआपल्या घरात मस्तीत जगत होते.

तरीही राणी मात्र दुःखात होती. तिला काहीतरी बोचत होतं,काहीतरी टोचत होतं.

राणीने ठरवलं यातून आपण बाहेर पडायचं आणि योग्य उपाय करत संकटाला दूर लोटायचं.

दुसऱ्या दिवशी सकाळ झाली,राणीकडे काम करणारी सखी आली.
ती काम करू लागली आणि तिची लहान मुलगी लाली तिच्या मागे मागे फिरू लागली.

राणीनं विचारलं, “अग अग सखी, ही मुलगी का तुझ्यामागे सारखी? या वयात हवी शाळा, तर पिकेल तिच्या विचारांचा मळा”
“राणीताई राणीताई मुलीला शाळेत कधी पाठवू? अभ्यास कसा घेवू? तिच्याकडे कसं लक्ष देवू?
मी करते घरोघरी काम, नाहीतर मला मिळणार नाही छदाम”
राणी म्हणाली, “लालीला मी घालेन शाळेत, तिच्याकडे लक्ष मी ठेवेन.”

मग लाली रोज शाळेत जावू लागली
राणीने तिला कपडे दिले,पुस्तके दिली,तिला अभ्यासाला मदत केली.
हळूहळू लाली मोठी होवू लागली. तिला अभ्यासाची गोडी वाटू लागली.
तिची राणीशी दोस्ती झाली. 

लालीची प्रगती बघून सगळ्याजणी सखीला विचारू लागल्या, “बाईबाई तू असं कोणतं व्रत केलं? ज्याने तुझ्या मुलीला मोठं शहाणं केलं? ते व्रत आम्हांला सांग, आम्ही फेडू तुझे पांग.”
सखी म्हणाली, “ व्रत मी नाही केलं, व्रत केलं राणीनं आणि त्याने सर्व झालं.”
सगळ्याजणी गेल्या राणीकडे, त्यांनी राणीला व्रत विचारलं. राणीकडे एवढ्या सख्या जमा झालेल्या पाहून राणीच्या मैत्रिणीही आल्या.
तेव्हा राणी म्हणाली, “बायांनो हे आहे भगिनीभावाचं व्रत, ते करावं अविरत”
“पण हे व्रत काय आहे? हे व्रत कोणी करावं? या व्रतासाठी काय काय लागतं? म्हणजे आमच्या सख्यांच्या मुलीही होतील हुशार आणि निर्भीड.”
राणी म्हणाली,“मी तर व्रत सांगेन,पण ते ऐकतील फक्त तुमचे कान आणि वाया जाईल माझं ज्ञान,”
“नाही नाही राणी,आम्ही मनापासून ऐकू. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.”
राणी सांगू लागली. “माझ्या सखीची मुलगी लाली शाळेत जात नव्हती,म्हणून मी तिला शाळेत घातलं,पुस्तकं दिली आणि जमेल तसा तिचा अभ्यास घेतला.त्यामुळे तिच्यात आत्मविश्वास आला,ती स्वतःचे निर्णय विचार करून घेवू लागली,आईला मदत करू लागली.लहान भावंडांना शिकवू लागली.”
राणीच्या मैत्रिणीना राणीचं म्हणणं पटेना, “ .. पण एवढा पैसा आपण कशाला खर्च करायचा? आपण आपल्या मुलांना शिकवतो ते पुरेसं नाही का?”
राणी म्हणाली, “मी म्हटलं होतं ना? तुम्ही घेवू शकत नाही हा वसा,उगाच पडला कोरडा माझा घसा.”
पण राणीची दुसरी मैत्रीण म्हणाली, “राणी ग राणी मला पटली तुझी कहाणी,जर आपल्या मुलांबरोबर या मुलीही शिकल्या तर समाजात एक समतेचं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल.या मुली एकमेकींना भगिनीभावानं आधार देतील. शिक्षणामुळे स्वावलंबी होतील. मुली तर्कशुद्ध विचार करतील. त्यांची लवकर लग्नं टळतील. स्वतःचं रक्षण स्वतः करतील मी घेईन हे व्रत आणि करेन अविरत.”
राणी म्हणाली, “ताई तुला व्रत कळलं, ते आपण सगळ्यांनी घेतलं आणि मनोभावे आनंदाने केलं तर अशा अनेक लाली शिकून तयार होतील. त्या समाज पुढे न्यायला सरसावतील. त्यांना कळेल त्यांच्यावरचा अन्याय,त्यांना कळेल अभ्यासाचे महत्व.”
सखीच्या सगळ्या सख्याना राणीचे हे व्रत आवडले. “ राणीराणी आम्ही सुद्धा आमच्या मुलींना शिकायला मदत करू, मुलांबरोबर त्यांनाही शाळेत घालू”
राणीच्या मैत्रिणी म्हणाल्या, “बाई बाई व्रत ऐकल्याचं हे फळ तर व्रत केल्याचं काय फळ”
राणी म्हणाली, “निदान सगळ्या मुली यामुळे शिकतील, आपलं जग समजून घेतील.चांगल्या वाईटाचा विचार करतील.”
जशी राणीला,तिच्या मैत्रिणींना आणि तिच्या सख्यांना ललितेचं शिक्षण व्रत समजलं तसं तुम्हा आम्हाला समजो.
ही साठा प्रश्नांची कहाणी शिक्षणाने सुफळ संपूर्ण होवो.

अश्विनी बर्वे



आवड ते नावड

मी चाळीतल्या मध्यमवर्गीय घरात लहानाची मोठी झाले. आईला स्वैपाकाची आवड होती. आई स्वैपाक करत असताना एक स्टुलावर उभी राहून मी तो बघायचे. आईला पुरणपोळी, मोदक, श्रीखंड, गुलाबजाम सगळे छान करता यायचे. मी ते बघून करायला शिकले. शेजारी गेले की त्या काकू भाजी, गहू, तांदूळ निवडत असतील तर त्यांना मदत करायचे. मी 10 वर्षांची झाले आणि आई ऑफिसात जायला लागली. ती सकाळीच एकदा पोळ्या करून ठेवायची. सकाळी आम्ही पोळीभाजी खाऊन शाळेत जायचो. शाळेतून आल्यावर खाण्यासाठी ती उपमा वगैरे करून ठेवायची किंवा धिरड्यांचे पीठ भिजवून ठेवायची. माझा भाऊसुद्धा धिरडी करून खायचा. वडील आईच्या आधी ऑफिस मधून यायचे. ते तिला घरी आल्यावर आयता चहा द्यायचे. मीही स्वैपाकात मदत करायचे. पण रोजचा स्वैपाक कधी शिकले नाही. आई पण म्हणायची की तू अभ्यास कर. तरी शेजारच्या काकूकडे रोज शेवटची पोळी लाटून भाजायला शिकले होते. मेडिकल ला गेल्यावर मात्र आवड होती तरी स्वैपाकाची सवय अगदीच सुटली.
लग्नानंतर सासर चाळीतच मिळाले. माझी लग्नाआधी 3rd MBBS ची परीक्षा झाली होती. त्यात मी फेल झाले. म्हणजे 6 महिने घरीच बसायचे होते. ज्या दिवशी आम्ही हनिमूनहुन आलो त्या दिवशी सासू ताप आल्याने झोपून होती. (नंतरच्या अनुभवामुळे ते सोंग असावे असे आता वाटते). मी नणदेच्या मदतीने वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतले. मग जशी आली तशी कणिक भिजवली आणि एक भाजी केली. कुकर लावायला मला सासर्यांनी शिकवला. पोळ्या जरा जाड झाल्या होत्या. बाकी ठीक झाले होते. दुसऱ्या दिवसापासून सासूने स्वैपाक शिकवायला सुरुवात केली. भाजीत गूळ घातला की सगळे आवडीने खातात हा मंत्र दिला. सासर्यांचे हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटचे ऑपरेशन झाले होते आणि डायबेटिस होता. ते सकाळी जेवून आणि डबा घेऊन 9 ला निघायचे. नवरा डबा घेऊन साडेनऊ ला निघायचा. सासूने सकाळचे सगळे काम माझ्यावर टाकले.
सासू नोकरी करत नसली तरी तिचे भजनी मंडळ होते. ते तिचे करियर होते. रोज दुपारी साडेतीनला स्वतःपुरता चहा करून घेऊन ती जी बाहेर जायची ती भाजी घेऊन साडेआठला घरात एन्ट्री करायची. तोपर्यंत सासऱ्यांचे जेवण आटपून ते हात धुवायला उठत असायचे. त्यांना उभे राहून वाढायला लागायचे; ते हाताने काही घ्यायचे नाहीत. सासू आली की ती स्वतःपुरते काहीतरी चविष्ट करून खायची. ते फक्त तिच्या आवडत्या लोकांना म्हणजे माझ्या नवऱ्याला मिळायचे.
मला आवड असल्याने मी वेगवेगळे पदार्थ शिकून घेतले. पण हा रोजचा स्वैपाक गळ्यात पडल्याने माझी आवड नष्ट होऊ लागली. सहा महिन्यांनी मी परीक्षा पास झाले आणि माझी इंटर्नशिप सुरू झाली आणि त्याच बरोबर प्रेग्नन्सी सुद्धा. मला सकाळी सातलाच घराबाहेर पडायला लागायचे. त्यामुळे सकाळचा स्वैपाक मी करू शकत नव्हते. संध्याकाळी मी घरी आल्यापासून मला कामाला जुंपण्यात यायचे. मी सासूला न विचारता मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे कौतुकाऐवजी माझ्यावर जास्तीतजास्त काम लादणे सुरू झाले. कशीबशी मी इंटर्नशिप पूर्ण केली तेव्हा माझा मुलगा 4 महिन्यांचा होता. तेव्हा माझ्या नवऱ्याने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि MD ला प्रवेश घ्यायला लावला. त्यानंतर स्वैपाक, मुलगा आणि सासऱ्यांचे आजारपण अशी माझी तिहेरी कसरत सुरू झाली. नवऱ्याची काहीच मदत होत नसे, त्यामुळे मी रुटीन स्वैपाकालाही वैतागवाडी म्हणू लागले. त्या काळात मी नायर हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी करत होते. तिथे एखादी पार्टी असेल तर असे वाटायचे आता आपल्यालाच सगळे आवरायचं आहे. खरं म्हणजे तिथले नोकर आवरावरी करायचे. ते पाहून बरे वाटायचे. एखादा पुरुष काम करतोय आणि आपण बसलोय ही भावनाच सुखवायची.
आमच्या घरी सासू पावकिलोच्यावर काही सामान आणायची नाही. पोहे करायचे ठरवले तरी ते आणण्यापासून तयारी करावी लागायची. घरातले पुरुष इकडची काडी तिकडे करायचे नाहीत. हे सगळे फारच दुःखदायक होते. माहेरी पूर्ण स्वातंत्र्य अनुभवल्यावर तर हे सहन होणे शक्यच नव्हते. तरीही मी 11 वर्षे त्या गुलामीत काढली. आणि शेवटी मी अनेक गोष्टींना कंटाळून एकदाचे ते घर सोडले. त्यानंतर आता मी फक्त स्वतःपुरता स्वयंपाक करते. असं वाटतं की मला कोणी सुगरण नाही म्हटले तरी चालेल. एवढी मी त्या स्वयंपाकाला वैतागले आहे.
मी एकटी राहत असले तरी जेवणात खूप आवडीनिवडी असल्याने स्वतःच स्वैपाक करते. मात्र मी तेव्हा पोळ्या करकरून खूप वैतागले असल्यामुळे बरीच वर्षे पोहे, भात ह्यावरच राहिले. जोपर्यंत वडील होते तोपर्यंत ते माझ्याकडे आले की पोळीभाजी करायचे. एरवी मी इडली, डोसे, थालीपीठ वगैरे करायचे पण जास्त करून भातच खात असे. ह्याने मी स्वतःचे खूप नुकसान करून घेतले. 
दोन वर्षांपूर्वी मी बिकानेर मध्ये जॉब साठी गेले. तिथे जिम चालू केले आणि त्यांनी डाएट सांगितल्याप्रमाणे फक्त पोळी आणि भाजी किंवा आमटी एवढंच करू लागले. मुंबई बाहेर जॉब करताना एम्प्लॉयर राहायला घर आणि बेड, फ्रीज वगैरे देतात पण किचन चे काही सामान देत नाहीत. मी इंडक्शन वापरत होते, त्यामुळे विशेष भांडी नव्हती. 2019 डिसेंबर मध्ये मी हरियाणात जॉब घेतलाय. इथे त्यांनी गॅस सिलिंडर आणि शेगडी दिली आहे. त्यामुळे मी बरेच पदार्थ बनवू शकते. मी बिडाचा तवा, कढई नॉनस्टिक फ्रायपॅन वगैरेही घेतले आहे. पण आता खास वेगळे पदार्थ बनवावेसे वाटत नाहीत. दुपारी टिफिन मागवते. सकाळ संध्याकाळ पोळीभाजीच खाते. कधी तरी स्टाफसाठी एखादा खास पदार्थ करून नेते. खरंतर स्वतः खाण्यापेक्षा करून वाढायलाच आवडते. असं वाटतं की माझ्यातले वात्सल्य उपाशीच आहे! जॉब सोडल्यावर कदाचित सोशलवर्क म्हणून असे लोकांना खाऊ घालण्याचे काम करत राहीन...

डॉ. मंजिरी मणेरीकर


रुपेरी पडद्यामागच्या स्त्रीया ( भाग १ )

चित्रपटसृष्टी आणि स्त्रीया असा विचार करताना कोण पटकन आठवतं ?... डोळ्याला सहज दिसणाऱ्या आणि लोभावणाऱ्या अभिनेत्री किंवा कानाला सहज ऐकू येणाऱ्या गायिका आठवतात. एकूणच दिग्दर्शक,संगीतकार,गीतकार यांचे काही अपवाद सोडले तर चित्रपटातील अभिनेते हे आपल्याकडच्या चित्रपटांचा चेहरा असतात. मग त्या खालोखाल गायक-गायिका येतात. सर्वसामान्य प्रेक्षकाला यांच्यामुळे चित्रपट लक्षात राहतो.पण पडद्यावर दिसणाऱ्या-ऐकू येणाऱ्या गोष्टींच्या मागे चित्रपट-निर्मितीचं एक खूप मोठं विश्व असतं. ते अजूनही पुरषप्रधानच आहे. अजूनही स्त्रीया त्यात फार कमी संख्येनं येतात आणि आल्या तरी टिकून राहण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. कौशल्य सिध्द करावं लागतं. मग सुरवातीच्या काळात ज्या महिलांनी या सृष्टीत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला तो एव्हरेस्ट चढण्या इतका धाडसाचा आणि महत्वाचा म्हणावा लागेल नाही का!! या स्त्रीयांचा प्रवास अवाक करणारा आहे तसा कधी करूणही आहे. पण प्रेरणादायी मात्र नक्कीच. म्हणूनच या सहज न भेटणाऱ्या,नव्या वाटा चोखाळणाऱ्या रुपेरी पडद्यामागच्या स्त्रीयांची ओळख करून घेऊया.

सरस्वतीबाई फाळके 
२०१३ या वर्षात भारतीय चित्रपटसृष्टीचं शतक आपण साजरं केलं. दादासाहेब फाळके यांचा "राजा हरिश्चंद्र" हा चित्रपट १९१३ साली आला आणि त्यांची चित्रपट निर्मितीची कारकीर्द बोलपट येईपर्यंत झळाळती राहिली. पण परेश मोकाशी यांचा "हरिश्चंद्राची फॅक्टरी" हा चित्रपट आला आणि त्यांच्या पत्नीची - सरस्वतीबाई फाळकेंची एक वेगळी ओळख झाली. पत्नी,आई,गृहिणी अशी सरस्वतीबाईंची ओळख त्यात आहेच. परंतु चित्रपट निर्मितीसाठी आपले दागिने देऊ करणारी स्त्री म्हणजे त्या फायनान्सरच म्हणायच्या. कशाबशा जमा केलेल्या पुरुषांच्या टीमला जेवायला घालणाऱ्या, म्हणजे आताच्या भाषेत केटररच. हे माध्यमच नवं असल्यानं तज्ञ माणसांची वानवाच होती त्यामुळे तयार झालेली चित्रफीत डेव्हलप करणं, त्या तुकड्यांची जोडणी करणं म्हणजे एडिटिंग करणं हे कामदेखील करताना आपल्याला त्या दिसतात. सतत नवे उद्योग-उपद्व्याप करू पाहणाऱ्या नवऱ्याच्या मागे फरपटत जाणारी बायको नव्हे तर वेगवेगळ्या भूमिका उत्सुकतेनं,लीलया पार पाडणारी स्त्री म्हणून त्या आपल्याला चित्रपटातून भेटतात म्हणून मला 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' महत्वाचा वाटतो.
देविकाराणी  
सरस्वतीबाईंचं काम महत्वाचं असलं तरी ते तसं घरगुती स्वरुपाचं राहिलं. त्या नंतर स्टुडिओ-काळात चित्रसृष्टीत आलेल्या इतर स्त्रीयांना घराबाहेर पडून पुरुषबहुल क्षेत्रात काम करावं लागलं. फर्स्ट लेडी ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री म्हणजे देविकाराणी या आपल्याला उच्चशिक्षित,पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव असलेल्या अभिनेत्री म्हणून माहीत आहेत.परंतु त्यांनी पती हिमांशु राय यांच्या पहिल्या मूक चित्रपटाचं कला दिग्दर्शन आणि ड्रेस डिझाईन केलं होतं. त्यांनंतर त्या दोघांनी जर्मनीत चित्रपट निर्मितीचं रीतसर शिक्षण घेतलं. भारतात परत आल्यावर बॉम्बे टॉकीज हा निर्मिती-स्टुडिओ स्थापन केला. १९४० मधे राय यांच्या मृत्यू नंतर पाच वर्षं त्या निर्मात्या-दिग्दर्शक म्हणून कार्यरत होत्या.
मीनाक्षी नारायणन्  

सरस्वतीबाईसारख्याच एक तामिळी महिला, मीनाक्षी नारायणन. यांना भारतातल्या पहिल्या महिला साऊंड इंजिनिअर म्हटलं जातं. त्यांचे पती ए नारायणन तीसच्या दशकात तामीळ चित्रपट क्षेत्रातले मोठे निर्माते-दिग्दर्शक होते. त्यांनी जर्मन तंत्रज्ञ आणून पत्नीला शिकवलं. मग नऊवारी लुगड्यातल्या या बाई सेटवर जाऊन ध्वनीमुद्रण करू लागल्या. शिकणं आणि त्याचा उपयोग करणं दोन्ही धाडसाचं!

आपण अशा भारतीय स्त्रीयांच्या कर्तबगारीची दखल घेणार असलो तरी आधी जगातल्या पहिल्या दिग्दर्शक स्त्रीची ओळख करून घेणं मला महत्वाचं वाटतं.फ्रान्स मधल्या अलिस गी (Alice Guy- Blache') या पहिल्या महिला सिने-दिग्दर्शक आणि नॅरेटिव्ह फिल्ममेकिंग करणाऱ्या पहिल्या दिग्दर्शकांपैकी एक समजल्या जातात. त्या अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि तंत्रज्ञ सुध्दा होत्या. हे त्या काळातच काय अजूनही विशेष आहे. 
१९०६ मधे त्यांनी "The Birth, the Life and the Death of Christ" हा चित्रपट बनविला.त्या काळात हा तांत्रिक दृष्ट्या मोठ्या आवाक्याचा चित्रपट होता(हा अर्ध्या तासाचा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे) आता खूप बायका इंजिनिअर झालेल्या दिसतात पण प्रत्यक्ष यंत्राबरोबर काम करणाऱ्या, विशेषतः चित्रपट क्षेत्रात,अजूनही अल्पसंख्यच आहेत.१८९८ ते १९२० या काळात त्यांनी ४०० चित्रपट केले त्यातले २२ पूर्ण लांबीचे कथापट होते.वडील आणि भावाचा मृत्यू झाल्यानं एकविसाव्या वर्षी त्यांनी अर्थार्जनासाठी एका कंपनीत सेक्रेटरीची नोकरी धरली.चल-चित्रपट येऊ लागल्यावर त्या कंपनीचं रूपांतर चित्रपटनिर्मिती करणाऱ्या कंपनीत झालं आणि ञॅलिसचं क्षेत्र बदललं.
Alice Guy- Blache'
१८९६ ते १९०६ त्या कंपनीत चित्रपट-निर्मिती प्रमुख होत्या. १९०७ मधे याच क्षेत्रातल्या हर्बर्ट ब्लाशे यांच्याशी लग्न झालं.लग्न झाल्यामुळे त्यांना नियमानुसार कंपनी सोडावी लागली.त्यानंतर ब्लाशे पतिपत्नींनी १९१०मधे अमेरिकेत स्वतःची फिल्म कंपना काढली.हॉलीवुडपूर्व काळातली ती सर्वात मोठी कंपनी होती.या कार्यमग्न काळातच त्यांच्या दोन्ही मुलींचा जन्म झाला. परंतु हा विवाह टिकला नाही. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर नव्यानं विकसित होणाऱ्या हॉलिवुडमधे नशीब आजमावण्यासाठी एका सहकारी अभिनेत्री बरोबर नवरा निघून गेला. तो सोडून गेल्यावरही खचून न जाता १९२० पर्यंत त्या चित्रपट तयार करत राहिल्या. त्यानंतर त्यांनी फ्रान्सला परत येऊन या माध्यमाविषयी व्याख्यानं दिली.
अॅलिसची चित्रनिर्मिती भरात होती तेव्हा भारतात स्त्रीयांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटांत प्रवेश करायला सुरवात केली होती. बहुतेक स्त्रीयांचा चित्रपटसृष्टीतला प्रवेश हा अर्थार्जनासाठी झाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.परंतु एकदा कार्यक्षेत्र निवडल्यावर बहुतेक जणींनी सक्षमपणे यात प्रगती केली. पुढच्या भागात अशाच काहीजणींच्या बद्दल समजून घेऊ.

सुषमा दातार 

मास कम्युनिकेशन आणि चित्रपट 
यांच्या निवृत्त व्याख्यात्या, 
अभ्यासक आणि लेखिका