नवजिवतीची कहाणी

ऐक मानवा तुझी कहाणी, एक आटपाट नगर होतं.

तिथं होता एक राजा, घरात त्याच्या नव्हता गाजावाजा, सुना त्याचा ओटा, सुना त्याचा सोफा.

त्या राजाला होती राणी, सुनी झाली होती तिची वाणी. घरात किलबिलत नव्हती बालगाणी.

पाहुणेराउळे त्यांना बोलवत, पण येताजाता टोमणे मारत.

राजाराणी खट्टू झाले, सगळ्या जगावर रागवू लागले. नाही नाही ते उपाय करू लागले.

त्यातून त्यांच्यातला संवाद हरवला. एकमेकांचे गुणदोष टोचू लागले. उणीदुणी काढू लागले.
एके दिवशी काय झाले?
भांडता भांडता त्यांना शेजारच्या घरातून हसण्याखिदळण्याचा आवाज आला, पावलांचा आवाज येवू लागला. गाणी ऐकू आली.
काय असेल बरं शेजारी? राणीला वाटले कुतूहल भारी, राणी गेली शेजारघरी.
राणीने विचारलं, “बाई बाई तुझं घर असं हसतं खेळतं कशानी झालं? त्यासाठी तू कोणतं व्रत केलं?”
शेजारीण म्हणाली,“ माझं व्रत अगदी सोप्पं आहे. ते आहे नवजिवतीचं व्रत. स्त्री-पुरुष दोघंही ते करू शकतात.”
राणी म्हणाली,“ बाई बाई मला व्रत सांग, उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.”
शेजारीण सांगू लागली, “तसं तर हे व्रत अगदी सोप्पं आहे, तू फक्त तुझ्या पोटी मूल येईल असा विचार करू नको. आपल्या आसपास हजारो मुलं आहेत त्यांच्याकडे मायेच्या नजरेनं बघ. त्यांचा हात तुझ्या हाती घे.”
राणीच्या मनी शंका आली, “म्हणजे तुझ्या घरातली ही मुलं तुझी नाहीत ?”
“ही मुलं आपलीच आहेत, त्यांना हवं आहे प्रेम, माया, आपुलकी आणि शिक्षण.”
“पण. . . ”
“पण नाही आणि बिण नाही. लोक काय म्हणतील हा विचार करू नको, या मुलांचा हात धरला तर आपल्या भोवती एक छान वातावरण निर्माण होईल. मुलांना आणि आपल्याला एक छान मार्ग मिळेल.”
“मी तर हे व्रत करेन, कारण प्रत्येक बाईत असतेच एक आई. पण पुरुषाच्या मनात निर्माण होईल का दुसऱ्याच्या मुलाबद्दल प्रेम?”
“अग प्रत्येक पुरुषातसुद्धा असते एक आई, त्याला लेबल लावण्याची नको करू घाई.”
“बाई असल्याशिवाय कसं साधणार आईपण?”
“अग प्रत्येक स्त्रीला बाळ होवू शकत नाही हे जसं नैसर्गिक, तसंच काहींना आई व्हायची इच्छा नसते हेही तितकंच नैसर्गिक. प्रत्येक बाईने बाळाला जन्म द्यायलाच हवा अशी सक्ती असू नाही; तसं पुरुषांना सुद्धा सापडतं आपल्या आतलं आईचं मन, तेही तितकंच आहे नैसर्गिक. म्हणून म्हणते बाळासाठी होवू नये अगतिक.”
“असं कसं?”
“तूच आजूबाजूला बघ बरं. कितीतरी जणी आपल्या कामावर प्रेम करतात, ते काम त्यांचं बाळच असतं. त्या कामासाठी त्या दिवसरात्र एक करतात. त्या नवनवीन संशोधन करतात. त्या स्वतःला ओळखतात. त्यांच्या कामातून समाजाचा सुद्धा विकास होतो.”
राणीला हळूहळू शेजारणीचं बोलणं उमजायला लागलं - “कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फळ?”
“तू अनेकांची आई होशील, तुझ्यातला संकुचितपणा नाहीसा होईल. समाजाकडे नव्या निकोप दृष्टीने पाहशील, तुझ्या चेहऱ्यावर आनंद पसरेल.”
“हे व्रत कसं करायचं?”
“स्त्री-पुरुषांनी हातात हात घेवून हा वसा घ्यावा. निकोप समाजासाठी नवजिवतीचं व्रत घ्यावं. यात कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. जसं एखाद्या जोडप्याला मूल नसतं, तसे अनेक मुलांना आईबाबा नसतात. बाळ होणं आपल्या हातात नाही पण अनेक मुलांच्या चेहऱ्यावर हसू पसरवणे तर आपल्या हातात आहे. तुम्ही सजग व्हाल, तर समाजाचे पालक व्हाल. जिथंजिथं बाळासाठी रडणारी आई असेल तिथंतिथं तुम्ही पोहचा आणि तिचा हात तुम्ही हाती घ्या. हे व्रत सर्वांना सांगा. जशी नवजीवतीने माझ्यावर कृपा केली, माझं घर आनंदी केलं; तशी ती सर्वांवर कृपा करेल. अशी ही अनेक प्रश्नांची कहाणी एका उत्तरी सुफळ संपूर्ण!”

आगळ्या व्रताची वेगळी कहाणी

आटपाट नगर होतं. नगरात लहानमोठी कुटुंब राहत होती. सण येत होते, जात होते. घराघरात गोडधोड होत होतं. मुली झाल्या की लोक नाक मुरडत होती. पण बहीण भाऊ आपलं बालपण मजेत घालवत होते. भांडत होते, रडत होते, चेष्टा करत होते, मस्करी करत होते. आनंदाने वाढत होते.
एका घरातले बहीणभाऊ असेच एकमेकांच्या साथीने मोठे होत होते. दोघे एकाच शाळेत जात. भाऊ नेहमी बहिणीची काळजी घेई. तरी वयात आलेल्या बहिणीचा अवकाश संकोचू लागला. तिच्या खेळण्यावर, हसण्यावर,बोलण्यावर आईवडिलांनी बंधने घातली. भावावरची जबाबदारी वाढली. तो बहीणीवर जास्त लक्ष ठेवू लागला. बहीण कुणाशी बोलते, कुठे जाते, काय करते – त्याची माहिती आईवडलांना देऊ लागला. बहीण हळूहळू घरातच जास्त वेळ राहू लागली. आई जवळ घरकाम शिकू लागली. अभ्यासात मन रमवू लागली. घराबाहेरच्या लोकांशी हसेना, बोलेना. पण ती अभ्यासात हुशार होती. चांगल्या गुणांनी परीक्षा पास झाली. तिला मोठ्या गावात कॉलेजात जायची इच्छा होती. पण रोज तासभराच्या प्रवासात तिला कोणी त्रास देईल. तिला वाईट संगत लागेल नाहीतर ती जातीबाहेरच्या मुलांच्या प्रेमात पडेल – अशा विचारांनी तिला कॉलेजात घातले नाही. बहिणीचे मन खट्टू झाले - याची जाणीव भावाला झाली. तो दुःखी झाला, कष्टी झाला. कॉलेजात तिच्यासोबत जावे का? तिचे रक्षण कसे करावे ? आपण तिला कुठे कुठे पुरणार? तो विचारात पडला. एके दिवशी काय झाले? बहिणीसाठी लग्नाचे स्थळ आले. मुलाची जातपात, पैसाअडका, जमीनजुमला सगळे पाहून आईवडिलांनी तिचे लग्न ठरवून टाकले. लगोलग साखरपुडा ठरला. घरात सगळे आनंदात होते. पण बहीण मात्र दु:खी दिसू लागली. कष्टी वाटू लागली. भावाला तिची नाराजी दिसत होती. सगळे छान असूनही आपली बहीण आनंदात का नाही, ते त्याला उमजेना.
तो मित्रांकडे गेला, मैत्रीणीना भेटला. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याने अनेक पुस्तके वाचली. तरी त्याला उत्तर सापडेना. दिवसेंदिवस कोमेजत चाललेल्या आपल्या बहिणीला कशी मदत करावी? हे त्याला कळेना. त्याला काही उमजेना. त्याचं दुःख संपेना, त्याला उत्तर सापडेना.
एक दिवस असाच दुःखीकष्टी होवून तो आपल्या मित्राकडे गेला. मित्राच्या घरात सगळं छान चाललं होतं. सगळीकडे आनंद होता. मित्र आणि त्याची बहीण हसतखिदळत, एकमेकाला टाळ्या देत गप्पा मारत होते.
त्याने विचारले, “मित्रामित्रा तू एवढा आनंदी कसा? तुझी बहीण एवढी निवांत कशी? तुझ्या बहिणीची तुला काही काळजी वाटत नाही का?”
मित्र म्हणाला, “बाबारे, बहिणीची काळजी मलासुद्धा वाटते. पण त्यासाठी तोंड वाकडे करून बसायची काही गरज नाही. आम्ही दोघं बहीणभावंड एक आगळेवेगळे व्रत करतो आणि आनंदी रहातो.”
“ हे व्रत काय आहे, ते मला सांग.”
मित्र म्हणाला, “ हे व्रत फार कठीण असते. ते जन्मभर निभवावे लागते. तू उतशील, मातशील घेतला वसा टाकून देशील!”
त्याने मित्राला वचन दिले, “उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही ! व्रताची सुरुवात कशी करावी?”
मित्र व्रत सांगू लागला, “ हे व्रत पुरुष मनात आलं की कधीही करू शकतात. व्रताची सुरुवात करताना आधी बहिणीला मनोमन बरोबरीचे स्थान द्यावे. आपल्या इतकाच बहिणीलाही शिक्षणाचा, खेळण्याचा, हसण्याचा, हिंडण्याफिरण्याचा हक्क आहे – हे कधी विसरू नये. तिच्याबरोबर हसावे, खेळावे, गाणी म्हणावी, सिनेमा-नाटक बघावे. तिच्या आवडी-निवडी लक्षात ठेवाव्या. बहिणीचा मित्र बनावे. आईवडील जर तिच्यावर बंधने घालत असतील तर तिच्या बाजूने त्यांनाही समजावून सांगावे. सारखी तिची राखणदारी करू नये. आपली बहीण एक स्वतंत्र व्यक्ती आहे – हे नेहमी लक्षात ठेवावे. तिला गरज असेल तेव्हा पाठिंबा द्यावा पण तिच्याभोवती पिंजरा उभा करू नये. आपल्यासारखाच तिला स्वतंत्रपणे जगायचा आणि चुकायचा देखील हक्क आहे याची जाणीव ठेवावी. स्वत:च्या मर्दानगीच्या कल्पना गुंडाळून ठेवाव्या. बहिणीला स्वावलंबी व्हायला मदत करावी. कुटुंबाच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये बहिणीला समान वाटा द्यावा. तिच्याकडून हक्कसोडपत्र मागू नये. तिचे लग्न तिच्या मर्जीवाचून लावून देऊ नये. लग्नाच्या वेळी हुंडा देऊ नये. त्यापेक्षा तिच्या नावावर बँकेत रक्कम ठेवावी. आपल्या जवळ आपलं असं काहीतरी आहे, हे जाणवून तिला बरं वाटेल. गरज पडली तर आपण आपलं उभं राहू शकू, वेगळं काही काम करू शकू असा आत्मविश्वास तिला येईल. दुर्दैवाने तिला घरातून हाकलून लावले तर तिच्याकडे तिचे हक्काचे काहीतरी असेल.”
व्रत ऐकता ऐकता भावाला स्वत:च्या चुका उमजू लागल्या. मनातल्या शंका दूर होऊ लागल्या. त्याने मित्राचे आभार मानले. तो मित्राला म्हणाला,“ मित्रा, मी हे व्रत आजपासूनच सुरू करतो. व्रत ऐकण्याचे इतके फळ तर व्रत करण्याचे काय फळ? व्रताचे उद्यापन कसे करावे?”
“आपण भावांनी जन्मभर हे व्रत करायचं आहे - आपल्या बहिणीसाठी, आपल्या पहिल्या बालमैत्रिणीसाठी. तरी हे व्रत फक्त आपल्या बहिणिपुरते मर्यादित ठेवायचे नाही. आपले लग्न झाल्यावर आपल्या पत्नीलाही बरोबरीचा दर्जा द्यावा तिच्याशी मैत्री करावी. पत्नीच्या भावालाही हे व्रत समजावून सांगावे. असे केल्यामुळे जशी बहीण मोकळेपणाने जगू शकते तशी मर्दानगीच्या जोखडातून भावाची थोडी सुटका होऊ शकते.”
व्रताचे फळ समजून भाऊ मनापासून आनंदी झाला. घरी जाऊन बहिणीला भेटला. तिची विचारपूस केली आणि तिची माफी मागितली. “ताईताई मला ओशाळल्यासारखं होत आहे, तुझ्याच पिढीतला असून मला तुझी गरज कळली नाही. ताई तुला सक्षम करण्याचं सोडून मी तुला बंधने घालून दुबळं केलं. आता तुझ्याबरोबर मी आहे आणि माझ्या बरोबर तू आहेस. मी तुझ्या मर्जीशिवाय तुझं लग्न होऊ देणार नाही. तुला शिकायचे आहे, तर मी आईबाबांना समजावून सांगेन. तू मला क्षमा कर.”
बहिणीने भावाला क्षमा केली. त्या दोघांनी आनंदात आणि दुःखात एकमेकांच्या सोबत राहण्याचे ठरवले. जशी भावाला उपरती झाली आणि बहिणीला बळ मिळालं. तसं तुम्हाआम्हांला मिळो आणि आपल्या परिवारातल्या महिलांना त्यांचे हक्क मिळोत.
अशी ही असंख्य प्रश्नांची कहाणी अनेक उत्तरी सुफळ संपूर्ण.

अश्विनी बर्वे 


नवं रक्षाबंधन

कालच एक ताजीताजी जाहिरात बघितली. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने बनवलेल्या ह्या मिठाईच्या जाहिरातीच्या माध्यमातून पुण्याच्या ‘चितळेबंधू’ यांनी करोनाकाळात असंख्य भावांचं आणि त्यांच्या परिवाराचं प्राणपणाने रक्षण करणाऱ्या ‘सिस्टर्स’साठी कृतज्ञता व्यक्त केली आहे. “आपल्या जगण्याचा गोडवा ज्यांनी वाढवला, त्या सगळ्या भगिनींना आम्हा बंधूंकडून ही आदराची, प्रेमाची भेट!” - असं म्हणत यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त आपले नाव ‘चितळेबंधूभगिनी मिठाईवाले’ असे केले आहे. सध्या सोशल मिडियावर या जाहिरातीचं बरंच कौतुक होतंय. म्हणजे अनेकांना ह्या जाहिरातीतून मांडलेली बहीणींविषयी कृतज्ञता व्यक्त करायची कल्पना आवडली असावी! मिठाईवाल्या चितळे बंधूंनी एक दिवसापुरती तरी स्वत:च्या ब्रॅंडनेममध्ये बहिणीलाही जागा दिली – हा नक्कीच चांगला बदल आहे.


आजवर आपण रक्षाबंधनाच्या जाहिरातींमधून बरेचदा बहीणभावाच्या प्रेमाची गोडगोड कौतुकंच पाहिली होती. बरेचदा अल्लड वयातले ‘छोटेसे बहीणभाऊ’ या जाहिरातींमध्ये दिसायचे किंवा क्वचित अगदीच वयोवृद्ध भावंडं दाखवली जायची. पण जाहिराती असोत किंवा गाणी असोत, नाहीतर टीव्ही मालिका – बहुतेक वेळेला भावालाच रक्षणकर्त्याच्या भूमिकेत ठेवलेलं असतं! वास्तवात जरी अनेकदा बहिणीच भावाचं संगोपन आणि रक्षणसुद्धा करीत असल्या तरी परंपरेने भावाला दिलेली राखणदाराची भूमिकाच माध्यमातून मांडली जात असे. काळानुसार बहीणींच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडत गेला, तरी रक्षाबंधनाचा सण साजरा करायच्या पद्धतीत मात्र आपण बदल केलाच नाही! बहिणीने भावाला राखी बांधून त्याला ‘रक्षण करायची विनंती करणं किंवा आठवण करून देणं’ यात काही विषमता आहे – हे कदाचित समाजमनाला फारसं जाणवलं देखील नव्हतं. जेव्हा कधी स्त्रीवादी दृष्टिकोनातून भारतीय सणांचं विश्लेषण करायचा प्रयत्न झाला तेव्हा त्यावर कडाडून टीका केली जात असे. पण आता टीव्ही मालिकांसारख्या पॉप्युलरमीडिया मधून बहिणीला राखी बांधणाऱ्या भावाची गोष्ट सांगितली जाते – तेव्हा त्याचं कौतुक केलं जाऊ लागलं आहे. हा नक्कीच स्वागतार्ह बदल आहे! पण इतक्याशा प्रतीकात्मक बदलावर थांबून राहणं आता पुरेसं नाहीये.
लुंबा राखी 
आपले सण म्हणजे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. म्हणूनच संस्कृतीचा प्रवाह सुरू ठेवायचा असेल तर सण साजरे करताना त्यात कालानुरूप बदल देखील करायला पाहिजेत. खरंतर आपल्या देशात एकच सण वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात विविध पद्धतींनी साजरा केला जातो. अगदी राखीपौर्णिमेचंच उदाहरण पाहूया. राखी पौर्णिमा जास्त करून उत्तर भारतात साजरी केली जात असे. भावाच्या मनगटावर बहिणीने रेशमाचा धागा बांधायची प्रथा बहुतकरून सगळीकडे दिसते. पण राजस्थानात भावाच्या बरोबरीने त्याच्या पत्नीला सुद्धा राखी बांधायची पद्धत असते. ही राखी जास्तच सुशोभित असते. तिला लुंबा राखी असं म्हणतात. कर्नाटकातल्या काही गावांमध्ये श्रावणात तंगी बीज आणि अक्कन तीज नावाचे सण असतात. 'तंगी बीज' या दिवशी मोठी भावंडे धाकट्या बहिणीला ओवाळतात. त्यांच्यासाठी गजरे तयार करतात. त्यांच्या आवडीचे पदार्थ करतात. एवढेच नाही तर बहिणीचे जे नेहमीचे घरकाम असेल तेही करतात. धाकट्या बहिणींची लग्न झाली असतील तर मोठे भाऊ आणि बहिणी धाकट्या बहिणीच्या सासरी फराळाच्या आणि नव्या कपड्याच्या टोपल्या घेऊन जातात. तिथे जाऊन त्यादिवशीची तिच्या शेतातली आणि घरातली सगळी कामे करतात. भाऊ भावजय आणि मोठी बहिण आणि तिचा नवरा हेही त्यामध्ये सामील होतात. तसंच 'अक्कन तीज' हा मोठ्या बहिणींचा सण असतो. एवढी गोड प्रथा अगदी दूरवरच्या छोट्या खेड्यातच फक्त पाळली जाते, बाकी तिथल्या जवळच्या मोठ्या गावातील लोकांनाही त्याबद्दल क्वचित माहिती आहे. पण रक्षाबंधनाच्या सणालाही अशा निराळ्या पद्धतीने साजरा करता येऊ शकेल ना?
पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन साजरं करताना भावावर बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी टाकली जाते. बहीणीवर संकट आलं तर तिच्या मदतीला धावून जाणे – हे तर महत्त्वाचं आहेच. पण काही भाऊ ही जबाबदारी इतकी मनावर घेतात की बहिणीच्या मोकळेपणाने वावरण्यावर, पोषाखावर आणि घराबाहेर जाण्यायेण्यावर देखील ते बंधनं घालायला लागतात. असे भाऊ एकप्रकारे बहिणीला मानमर्यादांच्या पिंजऱ्यात जखडून टाकतात. थोडक्यात, बहिणींच्या संरक्षणाची जबाबदारी म्हणजे भावांच्या हातची छडी बनते. आपल्या सगळ्याच सणांच्या मुळाशी असलेली पितृसत्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीणभावात देखील अशी विषमता तयार करते! पण त्याऐवजी बहीणभावाच्या नात्यातली समता दृढ करण्याची संधी म्हणून देखील रक्षाबंधनाच्या सणाकडे पहाता येईल. बहीणीवर संकट आलं तरी ती कोलमडून पडणार नाही, परावलंबी व्हायची वेळ येणार नाही - यासाठी तिला पाठिंबा देण्याचे काम भावांना करता येईल!
आज अनेकदा असं घडतं की वैवाहिक जीवनात समस्या निर्माण झालयावर स्त्रियांना नवऱ्याच्या घरातून बाहेर हाकलून लावलं जातं. बहुतेकवेळा स्त्रियांना सासरी छळ सहन करीत जगत राहायची किंवा छळामुळे मरून जायची वेळ येते – कारण त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र असण्यासाठी तिचा संपत्तीवरचा हक्क महत्त्वाचा ठरतो. स्त्रियांचा जन्मघरच्या आणि वैवाहिक, अशा दोन्ही ठिकाणच्या संपत्तीचा हक्क डावलला जातो. स्त्रियांच्या नावावर अतिशय कमी संपत्ती असते आणि त्यापैकी त्यांच्या नियंत्रणात असलेली संपत्ती आणखीनच कमी आहे! हे चित्र बदलावे यासाठी राखीपौर्णिमेच्या निमित्ताने भावांनी बहिणींचा संपत्तीतला हक्क मान्य करायला हवा आणि त्यासाठी कायदेशीर पाऊल देखील उचलायला हवे. समजा सध्या भावांच्या नावावर संपत्ती नसली, तरी पुढे जेव्हा केव्हा ती होईल तेव्हा बहिणींना त्यांचा हक्काचा वाटा मिळेल असे वचन भावांनी बहिणींना जाहीरपणे दिले पाहिजे! अनेक कुटुंबातून संपत्तीची वाटणी करायची वेळ आल्यावर बहीणींच्या कडून ‘हक्कसोडपत्र’ घेतले जाते. मुलींच्या लग्नात खर्च केला जातो, कधीकधी हुंडा दिला जातो – त्यामुळे स्त्रियांनाही आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटणी मागणे योग्य वाटत नाही. पण स्त्रियांनीसुद्धा असा अपराधभाव बाळगायची गरज नाही, हे लक्षात घ्यायला हवे. लोकशाही उत्सव समितीतर्फे स्त्रियांच्या संपत्तीच्या हक्कांसाठी मोहिम सुरू केली जात आहे. 
(वर्षभर चालणाऱ्या मोहिमे विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया सीमा - 9890568577, शंकर -9552167702, राधाकृष्ण देशमुख - 9011620595 या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा.)

लोकशाही उत्सव समितीने असे सुचवले आहे की राखी पौर्णिमेच्या दिवशी भावंडांनी एकमेकांना पाठिंबा देण्याचा, बहिणींना संपत्तीत सुद्धा समान हक्क आहेत हे समजून घेण्याचा, एकमेकांच्या मदतीला येण्याचा संकल्प मात्र जरूर करावा आणि तो पाळावा देखील! स्त्री ही रक्षण करण्याची 'वस्तू' नाही, जिवंत 'माणूस' आहे म्हणून शक्य असेल तर राखी बांधणे आणि बांधून घेणेच पूर्णपणे नाकारावे! किंवा त्याऐवजी भाऊ आणि बहीण यांनी एकमेकांना आणि हवंतर बहिणीने बहिणीला, भावाने भावालासुद्धा राखी बांधावी! एकत्र येऊन आनंद साजरा करण्याला समतेचं अधिष्ठान असेल तर सणाची गोडी नक्की वाढेल नाही का? तुम्हाला काय वाटतं?

 

वंदना खरे 

संपादक, 'पुन्हास्त्रीउवाच' 

 

 

प्रकृती देवीची कहाणी



ऐका प्रकृतीदेवी तुमची कहाणी.
एक आटपाट नगर होतं, त्या नगरात खूप माणसं राहत होती.
धावत होती, पळत होती ,पळत होती, धावत होती.
कोणी कोणाला ओळखत नव्हते आणि सगळेच सगळ्यांना ओळखत होते.
एकमेकांचे मित्र होते आणि तरीही एकमेकांना भेटत नव्हते.
काळाचा पट्टा धावतोय असे वाटून त्याचा वेग माणसं पकडू पाहत होती.
नगरातली स्त्री कमावती होती... रोज पहाटे उठायची, घाईगडबडीत आंघोळ करायची. असेल ते अन्न रांधायची. रांधता रांधताच चहा प्यायची. भराभरा डबे भरायची.
लेकाचं करायची, नवऱ्याचं करायची,सासू सासऱ्यांचं करायची.
आल्या गेल्याची सोय पहायची आणि ऑफिसच्या दिशेने धावत सुटायची. राबराबून पैसे मिळवायची. मिळवलेल्या पैशातून घरदारसाठी सुखाच्या शोभेच्या वस्तू जमवत राहायची.
असे ती वर्षोनुवर्षे करत होती. करता करता तिचे वय वाढू लागले. तिच्या कष्टाने कमावलेल्या वस्तू घरात दारात दिसू लागल्या. नवनवीन वस्तूंचा साठी ती आणखी धावत राहायची. धावता धावता एक दिवस तिचे पाय दुखू लागले, कंबर वाकू लागली. डोळ्याखाली काळी वर्तुळे होवू लागली. डोळ्यावरती चश्मा लागला. गळ्याभोवती पट्टा लागला. केस अकाली पिकू लागले. जिने चढताना धाप लागायला लागली. चालता चालता घेरी येऊ लागली. एके दिवशी काय झाले?
नेहमीप्रमाणे घरातून काही न खातापिता निघालेली बाई ऑफिसकडे धावता धावता अचानक रस्त्यात कोसळली. तिला कोसळताना पाहून एक शहाणी बाई पुढे झाली, तिला आधार दिला. रस्त्याच्या कडेच्या बाकावर बसवले. स्वत:कडचे पाणी प्यायला दिले. स्वत:कडचे फळ खायला दिले. तिला म्हणाली, “घाबरू नकोस, भिऊ नकोस. आजच्या दिवस विश्रांती घे.”
त्यावर घेरी आलेली बाई म्हणाली, “अग, बाईच्या जातीला विश्रांती शोभायची नाही. घरीदारी माझ्याशिवाय खोळंबा होईल. ऑफिसात बॉसचे अडेल. घरी नवऱ्याचे नडेल.”
शहाणी बाई म्हणाली, “काही कुणाचे अडत नाही, काही कुणाचे नडत नाही. विश्रांती हा प्रत्येकाचा हक्क आहे. बाईने तर विश्रांती घेतलीच पाहिजे.”
“विश्रांतीसाठी वेळ कसा काढावा?”
“त्यासाठी तुला प्रकृतीदेवीचे व्रत करावे लागेल!”
“हे व्रत कसे करावे?”
“आपल्या जीवनातले प्राधान्य ओळखावे. घरातल्यांशी छान संवाद साधावा.तिने घरातली कामे सगळ्यांना वाटून द्यावी. प्रत्येकाने आपल्या कामांची यादी करावी, आणि एकमेकांना आनंद देत ती कामे पूर्ण करावी. कोणते काम छोटे-मोठे नसते, हे घरातल्या लोकांवर बिंबवावे.प्रत्येकाला आपआपले काम करण्यास सांगावे. आपण रोज सकाळी उठावे, एखादे फळ खाऊन दिवस सुरू करावा. हलकासा व्यायाम करावा. न्याहारी करून शांत चित्ताने ऑफिसला जावे. परत घरी आल्यावर सगळ्यांची विचारपूस करावी. सगळ्यांनी मिळून दुसऱ्या दिवशीची तयारी करावी. असे दरदिवशी करावे”
ऐकता ऐकताच हे व्रत त्या घेरी आलेल्या बाईला फार फार आवडले, तिच्या मनात मोर नाचू लागले,तिला कामं वाटून देण्याची कल्पना आवडू लागली. तिने विचारले, “ बाईबाई एवढे व्रत सांगितले पण या व्रताच्या संपूर्णाला काय करावे ते ही सांग.”
शहाणीबाई म्हणाली,” हे व्रत कधीच सोडायचे नसते. उताय चे नाही, मातायचे नाही, घेतला वसा टाकायचा नाही. सुटीच्या दिवशी सावकाश उठावे, उठल्यावर गरम गरम पाणी प्यावे, मस्त आळोखेपिळोखे देत छान व्यायाम करावा. नवऱ्याने केलेला गरम गरम चहा प्यावा,मनात येईल तेव्हा सचैल स्नान करावे. मन प्रसन्न राहील अशी गाणी ऐकावी. आपलेच गाव पुन्हा नव्याने पाहावे, नाहीतर चित्रपट पहावा,आपल्या हातात रिमोट ठेवावा, नाहीतर एखादे पुस्तक वाचावे, गप्पा ठोकाव्या, चित्र काढावे, काहीही करावे आणि दिवस आनंदात घालवावा. होता होईल तितक्या अशक्त बायांना हे व्रत सांगावे. सर्व अडल्यानडल्या बायांचे आरोग्य सांभाळायला मदत करावी!”
व्रताचा महिमा ऐकून घेरी आलेली स्त्री उत्साहाने उठली. समोरच्या हॉटेल मध्ये जाऊन नाश्ता केला. ऑफिसला रजा टाकली. घरी जाऊन घरच्यांना व्रत सांगितले. तिची प्रकृती सुधारायला लागली. घरीदारी मान मिळू लागला.
मग तिला प्रकृतीदेवी प्रसन्न झाली. मग ती कधी कोमेजली नाही, ती आपली वाट शोधून पुढे जावू लागली.
अशी ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.     

                                                                                         अश्विनी बर्वे 

                                                                     

स्वातंत्र्याचा साक्षात्कार 2

अनामिका

३ वर्षापूर्वी, तारुण्याच्या ऐन भरात नवीन स्वप्नांनी आशेने आणि उत्साहाने मन ओसंडून वाहत असतांना ...आयुष्यातल्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर जवळपास ६ वर्षानंतरच्या Toxic रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यानंतर, पहिल्यांदा असं वाटलं आपण खरच "स्वतंत्र" आहोत! बाकी जिंदगी गुलझार है ....और हम पूरी तरह आझाद!
माझी चूक काय? माझ्यात काही दोष आहे का? मी प्रयत्न केले नाही का? अश्या नकारात्मक विचारांनी खूप मोठ्या भावनिक- मानसिक आंदोलनातून जावं लागलं. अश्या आणि इतक्या वाईट प्रकारे हे नातं संपेल, याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता...! तरीही आपण कोणत्या तरी कारणाने त्या दुष्टचक्रातून बाहेर तरी पडलो - या गोष्टीचा आनंदच अधिक आहे मला...
त्यानिमित्ताने नैराश्य आणि कडवटपणा आला होता स्वभावात... त्यावर वेगळं काम करावं लागलं....वेळीच समुपदेशन आणि self –awareness च्या अनेक प्रयत्नांमधून स्वतःला Re-discover आणि Refresh करायला मला वाव मिळाला. कधी नव्हे त्या राहून गेलल्या wish list मधल्या अनेक गोष्टी – वाचन, ट्रेक, विपस्सना, मित्र-मैत्रिणीशी गप्पा, जिम वर्कआउट आणि माझे पुढील career plans अश्या गोष्टींचा उपयोग करून मी स्वत:ला त्यातून बाहेर काढलं – मीच जणू काय माझी “कबीर- बुद्ध” झाले ! हीच मला आजवरची माझी सर्वात मोठी प्राप्ती वाटते!
मी काही लेचीपेची नाही...असं स्वतःला सांगून मी हे आव्हान स्वीकारलं आणि नेटाने माझ्या ड्रीम कॉलेज मधला माझा ड्रीम प्रोजेक्ट आणि डिग्री दोन्ही उत्तम रित्या पूर्ण केलं. अशी घातक आणि बेभरवशाची नाती आणि त्यातील माणसं माझ्या आयुष्यातून लवकर गेली आणि लौकिकार्थाने मी अधिक “माझी” झाले; म्हणून मी स्वतःला खूपच सुदैवी मानते. आयुष्याबद्दल आणि नवीन अनुभवांबद्दल मी निराश आणि उदासीन झाले नाही उलट अधिक सजग आणि स्वच्छ नजरेने पाहायला शिकले आणि नवीन अनुभव घ्यायला सज्ज झाले.
“The thing which does not kill you,always makes you strong” - याची त्या कठीण काळानंतर खात्री पटली. यापुढे कितीही मोठी संकटं येवोत - यापेक्षा वाईटात वाईट अजून काय होणार ? - आणि जे काही होणार त्यासाठी मी पुरेपूर तयार असेन. 
मला माझ्या भीती- शंकांपासून मुक्त करणारा हा अनुभव मला निश्चितच माणूस आणि बाईमाणूस म्हणून अधिकच समृद्ध करणारा होता हे खरं ! डोळे खाडकन उघडणारा आणि एका झटक्यात आत्मभान देणारा हा ब्रेकअप चा अनुभव प्रत्येक बाईच्या आयुष्यात येवो! जगातल्या सगळ्या बायांचा विखारी नात्याबद्दल भ्रमनिरास होवो.


अंजली म्हसाणे


नेमेचि येतो तसा यावर्षीही १५ ऑगस्ट आलाय. प्रत्येकाची त्या त्या दिवसाची एक वेगळीच आठवण असते.
मला 15 ऑगस्टच्या दिवशी माझी स्वतंत्र सायकल मिळाली होती. लालचुटुक रंगाची चकचकीत. रेसर. तीन गियर्स पण होते तिला. साध्या रस्त्यावर, खडबडीत वाटेवर, चढावर, उतारावर.. सगळीकडेच सायकल मस्त सहज आणि जोरात पळायची. कानात वारं भरायचं. वेगाची झिंग चढायची.
सायकल मिळेपर्यंत मात्र हे सुख नव्हतं. चालत जायचं नाहीतर बसवर अवलंबून !
भराभरा आवरून शाळेसाठी बस गाठताना, गर्दीशी सामना करताना जीव गोळा व्हायचा. एक बस असायची. तिला आम्ही स्कूलबस म्हणायचो. ती वेगळी दिसायची नाही पण असायची! तिच्यात फक्त शाळेच्या मुलांनाच प्रवेश असायचा. एका दिशेने वाटेत येणार्‍या अनेक शाळांची मुलंमुली त्या बसमधे असत. वेगवेगळे गणवेश दिसायचे. एकमेकांशी ओळख व्हायची. गप्पा हसणं खिदळणं मस्त चालायचं. 'ए बघ तो तिच्याकडे बघतोय'… असं पण असायचं. आपल्याकडे पण कुणीतरी बघावं अशी नाजुक चोरटी इच्छा पण असायची. 'ज्ञानेश्र्वर कोणंय? पुढे या. म्हसोबा उतरा आता' असं गंमतीशीर बोलणारा कंडक्टर पण होता.
पण बर्‍याच वेळा ती बस चुकायचीच. बसस्टॉपवर पोहोचेपर्यंत ती येऊन गेलेली असायची. मग नेहमीच्या 'बिन स्कूल'बसमधून जावं लागायचं. माध्यमिक शाळेत जाणारी अडनिड्या वयातली मी दिसायला मोठी झाले होते. समज मात्र बाल्यावस्थेतली. गर्दीत बसमधे लोकांचे स्पर्श टाळता यायचे नाहीत. अत्यंत किळस भरून यायची. काय होतंय आणि का होतंय ते समजायचं नाही. लोक असा कुठेकुठे हात का लावताहेत ते कळायचं नाही. मग अंग चोरायचं. स्वेटर,कोट,रेनकोट यांचं चिलखत घालून संरक्षण करायचा प्रयत्न करायचा. बसमधे ओला रेनकोट घातला की शिव्या खायला लागायच्या. लोकांपासून लांब रहाण्याच्या प्रयत्नात 'कुठ्ठे जाऊ नाही' असं वाटायचं. माझ्या काही मैत्रिणी असं काही झालं की काहीतरी टोचरी वस्तू वापरायच्या. पण म्हणून हा अनुभव चुकत नव्हताच.
आणि अचानक एखाद्या देवतेसारखी ती सुंदर सायकल माझ्या आयुष्यात अवतरली. लालचुटुक रंगाची चकचकीत रेसर! माझ्या आयुष्याचा नूरच बदलून गेला. आता माझ्याभोवती तिच्या चाकांच्या लांबीचं आणि हँडलच्या रुंदीचं एक मस्त कवच तयार झालं होतं.आता ती स्पेस माझी होती.मी कधीही कुठेही जाऊ शकत होते. सायकल ही माझी खरी मैत्रीण होती. सुखात, दुःखात सदोदित बरोबर असणारी. फार नखरेही नव्हते तिचे. हवा भरली की झालं. मग ऊन पाऊस थंडीवारा चढउतार गर्दी याची पर्वा करण्याचं काही कारणच नव्हतं. त्या सायकलमुळे मला मिळालेलं स्वातंत्र्य अवर्णनीय होतं. नकोशा स्पर्शांच्या जाचातून तिने मला मुक्त केलं होतं!

प्रदिप कोकरे


सहावीची परीक्षा आटपली होती. घरच्यांनी पुढं शिकायचं नाही असं ठरवून टाकलेलं. मला पुढे शिक्षण घ्यायचंय का? वगैरेचा विचार घरात कुणीही केला नाही. वर्षभर अन्न पुरेल एवढी शेती होती. थोड्या म्हैशी होत्या आणि मोजकी गुरं. त्यांना सांभाळायचं म्हणून मी शिकायचं नाही हे त्यांचं त्यांनीच ठरवून टाकलं. सातवीचे वर्ग भरले. शिक्षक घरी समजावायला आले. पण त्यानं फार फरक पडला नाही. मला शिकायचंय हे मला माहित होतं. शिक्षण अर्धवट सोडून मुंबईला धुणीभांडी करायला गेलेली गावातली माणसं मला माहित होती. मला शिक्षण सोडून आयुष्यभर असं करणं शक्य नव्हतं. घरी आईला सांगायचो, “मला शाळेत घातलं नाय तर मी बावीवर नायतर खाणीत जीव देईन - सांगून ठेवतो.”
कुणी लक्षच देत नाही म्हटल्यावर खरंच मी जीव देण्यासाठी खाणीवर पळायला लागलो. जांभा दगडाच्या खाणी आमच्या घराशेजारीच होत्या. पावसाळ्यात तिथलं काम बंद असायचं. चिरा काढून काढून त्या बऱ्याच खोल गेलेल्यामुळे पावसाळ्यात पाणी भरलेलं असायचं. मी पुढे आणि माझ्यामागे पळणारी आई. हे असं दोनतीनदा झालं. मी हट्टी होतो. खरंच जीव वगैरे द्यायचो म्हणून नाईलाजाने दोन महिन्यांनी मला पुन्हा शाळेत घालण्यात आलं.
सातवीत वर्गातून दुसरा आलो तेव्हा घरचे म्हणाले, “काम करून शिक. तुला शिकवायची काय आमची ऐपत नाय.”
आणि मग मी काम करून शिकायला मुंबईत आलो. मुंबईनं स्वतःच्या पोरासारखा माझ्या टाळूवरून हात फिरवला. दादरला एका कुटुंबाकडे मी घरकाम करायला राहिलो. अट एवढीच की मी त्यांच्याकडे काम करायचं आणि त्या बदल्यात त्यांनी मला शिकवायचं. पुढे वरळीला एका रात्रशाळेत दहावीपर्यंत शिकलो. तिथेच एका प्रॉडक्शन हाऊस मध्ये दिवसा काम आणि रात्री शाळा. दहावीला वर्गातून तिसरा आलेलो. शाळेच्या दिवाळावर फोटोसहित नावाचं बॅनर पाहून वरळी सीफेसला जाऊन रडलेलो. हे लख्ख आठवतंय. परळच्या एका रात्र महाविद्यालयात मराठीत बीए आटपून घेतलं. गावात पदवीधर होणारा मी पहिला मुलगा.
सीएसटीला पत्रकार संघात पत्रकारितेच्या कोर्सला प्रवेश घेतला. तिथेही तिसरा आलो. कोर्सला शिकवायला येणाऱ्या एका जेष्ठ पत्रकाराच्या ओळखीवर मराठीतल्या एका बड्या पेपरात जागा आहे म्हणून कळवलं. मुलाखतीला जायच्या आधी कळलं चार हजार पगार आहे. मी तर एवढे पैसे दर महिन्याला आईला गावी पाठवत होतो. नाद सोडला! 
एमएला मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला. आणि एका प्रकाशन संस्थेत सहाय्यक संपादक म्हणून काम करायला लागलो. पैसे फार मिळत नसले तरी जेवढे मिळतात तेवढे या ढासळत्या काळात मला महत्त्वाचे वाटतात. गावात पोस्ट ग्रॅज्युएट होणार मी पहिला आहे.
अजून एक सांगायचं तर मी ‘टिंब’ या माझ्या फेसबुक पेजवरून पुस्तकं विकतो. चांगली पुस्तकं चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचवणं हे त्यामागचं कारण. थोडे पैसे मिळतात, दगदग होते पण ती हवीहवीशी वाटते. स्वतःवरचा विश्वास आणि पडेल ते काम करण्याची माझी तयारी असल्यामुळे मी सगळं निभावून नेलं. माझ्यातल्या व्यक्तिस्वातंत्र्याला मी असं जपलं. ‘स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव’ अशी ढोबळ आणि वरवरची व्याख्या आपल्याकडे केली जाते. मुळात स्वतःला ओळखणं हे स्वतंत्र असण्याशी कुठेतरी बांधलेलं आहे असं मला अनेकदा जाणवत आलंय. माझ्या स्वातंत्र्याच्या व्याख्या किंवा त्याची दिशा मी स्वतःच ठरवली म्हणून कदाचित मला ते जपता आलं.

अरुणा सबाने

नुकतंच मी नवऱ्याचं घर सोडलं होतं. खरं म्हणजे त्या घरातून, त्या संसारातून सुटका होणं म्हणजे अक्षरशः तुरुंगातून सुटण्यासारखंच होतं. आता मी माझ्या मनाप्रमाणे मी जगु शकणार होते. म्हणजे काय? तर मी मला आवडतात ते पदार्थ बनवून खाऊ शकणार होते, जिथे जावेसे वाटेल, तिथे जाऊ शकणार होते, ज्या ठिकाणी बसावेसे वाटेल, त्या ठिकाणी बसू शकणार होते, आवडती गाणी ऐकू शकणार होते, पुस्तके वाचू शकणार होते, मला हव्या तशा कथा लिहू शकणार होते. आता मला ''हा नायक कोण, तो तुला कुठे भेटला, असे प्रणय प्रसंग तू का उभे केलेस, हा अनुभव तू कुठे घेतला?’ असले पांचट प्रश्न मला कुणीही विचारणार नव्हते. मला हार्मोनियम शिकायचे होते, खूप काम करायचे होते, मोर्चात सहभागी व्हायचे होते. गेली १७ वर्षे मी केवळ कुणाला चांगलं वाटावं म्हणून जगले होते. पण ज्याच्यासाठी मी माझी शक्ती खर्ची घालत होते, त्याला त्याचं काहीही सोयरसुतक नव्हतं. तो त्याच्या गुर्मीत जगात होता. पण शेवटी एक दिवस जेव्हा सगळंच सहनशक्तीच्या पलीकडे गेलं तेव्हा मी घर सोडलं. आईकडे गेले. मानसिक अवस्था सावरण्यात दीडदोन महिने गेलेच. एकदिवस मी आईला म्हणाले, ''आता मी नोकरी करणार''.

''का? कशाला? कुठे? इतकी काय घाई आहे? थांब बेटा जरा.''

''नाही ग. आता थांबायला कुठे वेळ आहे? मी नागपूरला जाते आणि नोकरी शोधते.''

बरीच चर्चा झाल्यावर नाईलाजास्तव तिने शेवटी होकार दिला आणि तिथून माझ्या वर्धानागपूर चकरा सुरु झाल्या. वर्ध्याहून सकाळी ९ च्या बसनी नागपूरला यायचं, संबंधित कार्यलयांमध्ये चकरा मारायच्या सायंकाळी वर्ध्याला घरी परतायचं. नोकरी काही सापडेना. एक दिवस सकाळपासून भटकून एकही काम नीट झालं नाही. सात वाजले. बसेस आल्या पण खचाखच भरून. जीव पूर्ण कावलाच होता. तेवढ्यात कुठलीशी एक बस येऊन माझ्या पुढ्यात थांबली. मी काहीही विचार न करता बसमध्ये चढले. बसायला बऱ्यापैकी सीट मिळाली. बसल्याबरोब्बर रिलॅक्स वाटले. जरा वेळाने टिकटिक करत कंडक्टर आलाच,
“कुठे?”

“शेवटचा बस स्टॉप कुठला?”

“भरत नगर”

“एक तिकीट द्या” 
मी पैसे दिले, त्याने तिकीट दिले. बस आपल्या तालात धावत होती, मी माझ्या तालात डोळे मिटून शांत बसले होते. शेजारी कोण येऊन बसलं, कुठे उतरलं काही माहिती नाही. शेवटचा बस स्टॉप आला, कंडक्टर ओरडला, "अहो बाई, उतरत नाही का?"

त्याला म्हटलं, "आता ही बस कुठे जाणार?"

"परत सोनेगाव."

"मग चला, मला तिकडेच जायचंय." विचित्र नजरेनं त्यानं माझ्याकडे पाहिलं, त्याला मी ठार वेडी वाटले असेल.
१५ मिनिटानंतर बस सुटेल, असे जोरात ओरडून तो गेला. मलाही कुठे घाई होती? निवांत बसून राहिले. आजूबाजूला बघितलं तर पाणीपुरीवाला उभा. त्याच्याजवळ जाऊन आरामात पाणीपुरी खाल्ली. टेलीफोन बुथवर जाऊन आईला फोन केला, “उशीर होतो आहे, काळजी करू नको”
जरा वेळानं कंडक्टरनं बसची बेल मारून आवाज दिला, मी बसमध्ये बसले.
"कुठे?"
"छत्रपती नगर चौक."
त्यानं माझ्याकडे तिकीट देताना, 'मूर्ख आहे का ही बाई? आता तिथूनच आली, तिथेच चालली,' या अर्थी माझ्याकडे बघितलं; पण आज मला कोण काय म्हणतय याचा विचारच करायचा नव्हता. छत्रपती चौकला पोचेपर्यंत आठ वाजून गेले होते. वर्ध्याच्या भरलेल्या बसेस येत आणि झर्रकन पुढून निघून जात. शेवटी रात्री ९ ची रातराणी थांबली. त्यातही खिडकीत जागा मिळाली. रात्रीच्या केवळ २ तासांच्या त्या प्रवासाची लज्जत आजही माझ्या मनावर रेंगाळत आहे. रात्रीचा प्रवास तर मला आजही प्रचंड आवडतो. आज वाटतं, किती क्षुल्लक गोष्ट आहे ही! त्यानंतर जपान, अमेरिकेपर्यंत एकटीने प्रवास करून आलेली, रात्रभर गाडी ड्राईव्ह करून औरंगाबाद, पुण्यापर्यंत जाणारी मी! मला त्याक्षणी हा साधा 2 तासांचा प्रवास किती सुखदायी वाटला. माझ्या स्वातंत्र्याचं जणू सिलिब्रेशन होतं ते. तो २ तासांचा प्रवास माझ्या पुढल्या मुक्त आयुष्याची नांदीच होती जणू!



 

स्वातंत्र्याचा साक्षात्कार - 1

 

शालिनी आचार्य

तसे पाहिले तर आम्ही चौघी बहिणी आणि पाचवी माझी आई अशा स्रीयांच्या चौकटीत मी मोठी झाले. तू बाईची जात आहेस, मुलीच्या जातीने असं असावं, तसं वागावं, कमी बोलावं, जास्त हसू नये - याची समज आम्हा बहिणींना अगदी चौथी,पाचवीत असल्यापासून आई,वडिलांनी करून दिली. समजायला लागल्यापासून अनेक प्रश्नांची सरबत्ती मनात असायची, उकल मात्र कोणाकडेच करता यायची नाही. आपल्याला नेमके काय हवयं ते सांगताच यायचे नाही. मनाची घालमेल व्हायची. स्वतंत्र विचार तर फार लांबची गोष्ट होती माझ्या साठी...
लग्नानंतरसुद्धा नवऱ्याला विचारायची सवय लागली. पण त्याने मात्र माझी ही सवय मोडून काढण्याचा प्रयत्न केला. मी तर असं म्हणीन की, त्यानेच माझ्या स्वतंत्र विचाराचा पाया घातला - ‘तू तुला हवे ते कर, तुझे निर्णय स्वतः घे. तुझं तू ठरवत जा.’
मला थोडं गोंधळल्यासारख होत असे. पण मी लग्नानंतर हळूहळू माझ्या घरात तरी निर्णय घ्यायला लागले.
एक छोटासा अनुभव आहे. एकदा 26 जानेवारीला माझ्या मुलींना कळसूबाई शिखरावर गिर्यारोहणसाठी जायचं होतं. फी जरा जास्त होती. पण मुलींना जायचंच होतं. आणि पैसे तर मिस्टरांकडून घ्यायचे होते. पण ते तयार नव्हते, - “इतक्या लांब मुली जाणार कश्या? अनोळखी लोक असणार, तू कसं काय पाठवते? पैसे सुद्धा जास्त आहेत” अशी एकेक कारणं पुढे आली.
मुलींची तोंडं छोटी झाली. मग मी त्या टीमशी बोलून पैसे कमी करण्याची विनंती केली. त्यांनीही ते मान्य केले. आता राहिला प्रश्न नवऱ्याच्या परवानगीचा. पण ती काही मिळाली नाही !
मग आम्ही तिघीही परवानगी न घेताच रागारागात निघालो. मी मुलींना म्हणाले, “चला, मी आहे सोबत...”
अलिबाग वरून पुण्याची बस पकडली. ज्या मैत्रीणकडे जाणार होतो ती खूप दूर होती. रात्रीच्या वेळी कसं करावं, हा प्रश्न मनात निर्माण झाला. पण प्रवासात बहिणीचा फोन आला. ती म्हणाली, “माझ्या मैत्रिणीकडे आकुर्डीला जा.” तिला मी ओळखतही नव्हते. पण मग ठरवलं जाऊयात! घरी कुणालाच विचारलं नाही,सांगितलं नाही. माझा मीच निर्णय घेतला.
तिथे पोचल्यावर मात्र कळवले, ‘मी बहिणीच्या मैत्रिणीच्या घरी सुरक्षित आहे.’
त्या मैत्रिणीने, तिच्या वडिलांनी खुप मदत केली. मला अजिबात परक्यासारखं वाटलं नाही. मुली कळसूबाईला गेल्या, दोन दिवस मी तिथेच राहिले. तिसऱ्या दिवशी आम्ही घरी अलिबागकडे निघालो. पण आम्हाला मिस्टर घ्यायलाही आले नाही. घरी गेल्यावर मुलींनी त्यांना सगळं सांगितल्यावर मात्र ते खूश झाले. मग डोळ्यांनीच मला थँक्यू म्हणाले.
आधी मी आई वडीलांची मुलगी, भावाबहिनीची बहीण,नवऱ्याची बायको, मुलींची आई होते आणि अजूनही आहे ... पण आता मी स्वतःवर प्रेम करणारी, ठाम निर्णय घेणारी माझी मी झाले आहे. आता नो पिछे मुड...अभी तो आगे ही चलना है.

असु देवकी

आई वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या लग्नाची घाई सुरु झाली. त्यामुळे माझ्या वहिनीने लग्नाची जबाबदारी स्वत:वर घेतली होती.
‘आता लग्न कर. तू एकटा कसा जगशील?’ असे ती मला नेहमी म्हणत असे.
मी एक मुलगा असलो तरी मला मुलगेच आवडतात - हे सांगणे मला कठीणच वाटायचे. माझ्यावर लग्नाचा दबाव वाढतच चालला होता. सध्या जरी सौम्य भाषेत हे सगळे प्रकरण सुरु असले तरी सतत ही चर्चा चालू असायची.
शेवटी एका संध्याकाळी मी सांगूनच टाकले, कि मी "गे" आहे. पण माझ्या घरी ‘गे’ म्हणजे काय तेच समजले नाही. लग्नाची चर्चा सुरूच राहिली.
मग मी त्यांना स्पष्ट शब्दात समजाऊन सांगितले, “ मी गे आहे म्हणजे मी समलिंगी आहे. म्हणजे मला मुलगे आवडतात. मला मुली आजिबात आवडत नाही. मी फक्त मुलांसोबत प्रेम आणि सेक्स करतो!”
त्यानंतर काही दिवस घरात सन्नाटा पसरला होता.
मग मीच एक दिवस विचारले, “काय झाले? तुम्हाला माझ्या लैंगिकतेची ओळख पटली का?
तेव्हा वहिनी म्हणाली, “तुमच्या चित्रपट क्षेत्रात हे चालतेच बाबा ...”
माझ्या लक्षात आलं की वहिनीने आणि भावाने बहुतेक "गे" म्हणजे काय, हयाविषयी हे गूगल केले होते. आणि गूगलने चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची माहिती दाखवली होती. पण त्याचा फायदा असा झाला की यानंतर कोणताही मानसिक त्रास न देता मला माझ्या संपूर्ण परिवाराने स्वीकारले. मला एखादा मित्र मिळाला आणि मी त्याच्यासोबत राहीलो तरी माझ्या वहिनीला चालणार आहे! माझ्या वहिनीची बहिण ज्योतिषतज्ञ असल्याने आता ती माझ्या साठी चांगल्या मुलांच्या पत्रिका जुळवून पाहते. बघू आता मला मनासारखा मुलगा कधी मिळतोय !!!
पण माझी लैंगिकता त्यांनी स्वीकारल्यानंतर मला ‘स्वतंत्र’ असल्याचं फीलिंग आलं, एवढं मात्र खरं !


सोनाली देशपांडे


स्वातंत्र्य शब्दाला खूप छटा आहेत. खास करून दिव्यांग व्यक्तींसाठी मात्र हा अनुभव खूप वेगळा असतो.

माझ्या आईबाबांच्या घरी मी स्वातंत्र्यातच जगत होते . अनेक मोठे निर्णय घेताना घरचे कधीच आड आले नाहीत. दहावीनंतर कुठे जायचं, नोकरी, जोडीदार अशा अनेक महत्त्वाच्या बाबतीत माझे मीच निर्णय घेतलेले आहेत. लग्नानंतरही सहमतीने काही ठरवलं तरी स्वातंत्र्य संपलं असं कधीच वाटत नाही.
इतकं सगळं मोकळं वातावरण असतानाही, एका क्षणी मी स्वतंत्र असल्याचा खास आनंद झाला. त्याची थोडक्यात पार्श्वभूमी म्हणजे - माझा एक मामा त्याच्या उतारवयात बंगलोरला जाऊन स्थायिक झाला होता. माझं आणि मामाचं चांगलं गुळपिठ जमायचं. बंगलोरला असताना तो सीरियस झाला. त्यावेळी मला त्याला भेटायला जायचं होतं. अनेक नातेवाईकांना माझ्या सोबत चला, विमानाने जाऊया – असं सांगूनही कुणी तयार झालं नाही. काही दिवसांनी मामा जग सोडून गेला आणि त्याला भेटू शकले नाही ही हुरहुर आजही आहे. त्यावेळी नुसती हुरहुर नाही तर हेल्पलेसनेसची भावना होती!
नंतर काही वर्षांनी ibnlokmat मध्ये काम करताना आमचे संपादक निखिल वागळे सरांनी मला गोव्याला जाऊन फिल्म फेस्टिव्हल कव्हर करायला सांगितलं. कंपनीने विमानाचं तिकीटही दिलं. मला एकटीने प्रवास करायचा होता. मनात धाकधुक होतीच. पण विमानतळावर गेल्यापासून विमानात बसेपर्यंत व्हीलचेअर घेऊन माणूस सोबत होता. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीसाठी विमान प्रवास किती सोपा हे जाणवलं आणि पहिल्यांदाच एका वेगळ्या स्वातंत्र्याची जाणीव झाली. आपण बंगलोरलाही एकटे जाऊ शकलो असतो, हे लक्षात आलं.
कुणाच्याही मदतीशिवाय छोटीशी गोष्ट करणं ही अपंग व्यक्तींसाठी स्वातंत्र्याची भावना असते. इथे तर मला किती मोठी गोष्ट गवसली होती. याच बळावर पुढचे अनेक प्रवास सोपे झाले!

 

4 ऑगस्ट कशासाठी साजरा करायचा?

आज 4 ऑगस्ट – ‘काम करणाऱ्या एकल महिलांचा दिवस’ आहे. काल मी माझ्या बऱ्याच मैत्रिणींना या दिवसाबद्दल कळवलं, तेव्हा अर्थातच अनेक जणींना त्याविषयी माहिती नव्हतं! साहजिकच आहे – आपल्याला मातृदिन माहीत असतो, मदर्स डे / फादर्स डे किंवा फॅमिली डे माहीत असतो. Valentine day तर अनेक कारणांनी गाजत असतो! आता जागतिक महिला दिवस तर नको तितका प्रसिद्ध झालेला आहे. UNO ने 2011 साली जाहीर केलेल्या International Widows Day विषयी देखील आपण काही दिवसांपूर्वी बातम्यांमध्ये वाचलं असेल. पण आपल्याला ‘काम करणाऱ्या एकल महिलांचा दिवस’ मात्र माहीत नसतो. खरंतर बार्बरा पेन या महिलेने SWWAN(Single Working Women’s Affiliate Network) या तिच्या संस्थेतर्फे 2006 पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. समाजातील एकल महिलांचे महत्व लक्षात घेण्यासाठी हा दिवस साजरा करायचे त्यांनी ठरवले. कदाचित यातल्या “साजरा करण्याला” बरेच जण आक्षेप घेतील!

कारण एकल महिलांच्या बाबतीत समाजात फारशी कौतुकाची भावनाच नसते. विधवा महिलेबद्दल निदान काही प्रमाणात कणव तरी असू शकते – पण नवऱ्यापासून विभक्त बाईसाठी तर परित्यक्ता म्हणजेच “टाकलेली बाई” असा शब्द वापरला जातो. लग्न न केलेल्या किंवा घटस्फोटित महिलेला तर अनेकदा “वाईट बाई”(चवचाल, आगाऊ) ठरवले जाते. अशा बायांना शक्यतो सणसमारंभा पासून दूर ठेवलं जातं. कारण आपल्या देशात पितृसत्ताक रचनेमुळे लग्नसंस्थेला अतोनात महत्त्व आहे आणि जिचे लग्न टिकलेले आहे आणि जिला मुलं (शक्यतो मुलगे) आहेत अशा बाईलाच चांगलं समजलं जातं. ह्या “सौभाग्यवती”ला जरी नवऱ्याच्या लाथा खाऊन जगावं लागत असेल तरी स्वत:च्या हिमतीवर कमवून स्वाभिमानाने जगणाऱ्या बाईपेक्षा जास्त मान असतो, प्रतिष्ठा असते! एकल बाईने शक्यतो मान खाली घालून, बिचारेपणाने आणि दु:खी चेहऱ्याने जगावं अशीच समाजाची अपेक्षा असते. पूर्वी नाटक-सिनेमातून सुद्धा एकल महिलांचं असंच दु:खीकष्टी चित्रण केलं जात असे. पण आता काही प्रमाणात ह्या चित्रणामध्ये बदल होतोय आणि वास्तव देखील बदलत आहे.

गेल्या काही वर्षांपासून स्वेच्छेने अविवाहित राहणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत जगभरातच वाढ होताना दिसतेय. आपल्या देशातही अनेक मुलींचा लग्न टाळण्याकडे किंवा पुढे ढकलत राहण्याकडे कल वाढतो आहे. भारतात 2001 पासून 2011 पर्यंतच्या कालावधीत एकल महिलांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात अर्थातच अविवाहित, घटस्फोटित, विभक्त आणि विधवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एकल महिलांचा समावेश आहे. जनगणनेतल्या माहितीनुसार सध्या आपल्या देशात साधारण साडेसात कोटी (74.1 million) एकल महिला आहेत. ही आपल्या देशाच्या आतापर्यंतच्या इतिहासातली एकल महिलांची सगळ्यात मोठी संख्या आहे. तरीही एकल स्त्रिया अजूनही भारतातील सर्वात असुरक्षित गटातच आहेत! कारण त्यांच्याविषयी समाजाच्या दृष्टिकोनात मात्र फार सकारात्मक बदल घडलेला नाही.

“एकल महिलांच्या समोरची सगळ्यात मोठी समस्या असते – ती सन्मानाने जीवंत राहण्याची.” 

पारुल चौधरी म्हणतात; “एकल महिलांच्या समोरची सगळ्यात मोठी समस्या असते – ती सन्मानाने जीवंत राहण्याची.”  त्या National Forum for Single Women’s Rights च्या कार्यकर्त्या आहेत. अनेक जणीना निव्वळ डोक्यावरच्या छपरासाठी सासर/माहेरच्या लोकांवर अवलंबून राहावं लागतं. एकल महिलांना भाड्याने घर देण्यासाठी अगदी मुंबई पुण्यातल्या शहरात देखील लोक राजी नसतात. कोणत्याही कारणाने एकल असलेल्या महिलेला स्वत:चं आणि अनेकदा मुलांचंही पोट भरण्यासाठी घराबाहेर पडून कामधंदा करणं भागच असतं. अशावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात पिळवणुकीला बळी पडावं लागतं. ActionAid ही संस्था गेल्या दोन दशकांपासून एकल महिलांच्या सोबत काम करते. त्यांच्या अनुभवानुसार सर्वच प्रकारच्या एकल महिलांना आजही लैंगिक आणि भावनिक हिंसेला सामोरे जावे लागते. ग्रामीण आणि शहरी भागातही त्यांना शिक्षण किंवा आरोग्यासारख्या मूलभूत सुविधा आणि संपत्तीमधल्या हक्कापासून देखील वंचित राहावे लागते. म्हणून Action Aid ह्या संस्थेने एकल महिलांसाठी एक ड्राफ्ट पॉलिसी तयार करून विविध सरकारी विभागांच्या कडे सादर केली आहे.

ह्या मसुदयाकडे कुठल्या सरकारी विभागाचे कधी लक्ष जाईल आणि सरकारी धोरणांत कधी बदल घडून येईल – ते काहीच सांगता येणार नाही. पण तोपर्यन्त इतक्या अडचणींना तोंड देत स्वकमाई जोरावर जगात पाय रोवून उभ्या रहाणाऱ्या एकल महिलांना सामाजिक पाठिंबा देणे आणि त्यांच्या रस्त्यात अडथळे निर्माण न करणे तरी नक्की केले पाहिजे. आणि किमान एकल महिलांनी स्वत: तरी स्वत:ची पाठ थोपटून घेतली पाहिजे. 
आज 4 ऑगस्ट – ‘काम करणाऱ्या एकल महिलांचा दिवस’ आहे – आज तुम्ही एखाद्या तरी एकल महिलेचं कौतुक केलंत का ? नक्की करा. 
आज नाही केलं तरी अजून वेळ गेलेली नाही - SWWAN(Single Working Women’s Affiliate Network) संस्थेतर्फे 8 ऑगस्ट पर्यंतचा आठवडा एकल महिला सप्ताह म्हणून जाहीर केलाय. चीयर्स!

वंदना खरे 

संपादक 
पुन्हास्त्रीउवाच