दिवस उपासांचे सुरू जाहले...


नुकतीच आषाढी एकादशी झालीये... हा वर्षातला सगळ्यात मोठ्ठा उपास मानला जातो. बऱ्याच घरांमध्ये लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळेच जण हा उपास करतात. एकदा हा उपास झाला की मग त्याच्या पाठोपाठ अनेक व्रतवैकल्य घेऊन श्रावण येतो. पुढे कार्तिकी एकादशी पर्यन्त कसले ना कसले नेमनियम सुरूच राहतात. चातुर्मासात दसरादिवाळी सारख्या सणांची सुद्धा रेलचेल असते. पण व्रतं आणि उपासांची संख्या त्यापेक्षा काहीशी जास्तच असेल. यातली बहुसंख्य व्रतं बायकाच करतात! आणि ह्या नेमनियमांच्या आणि उपासांच्या मागे मुलांचे, नवऱ्याचे किंवा घरातल्या इतरांचे भले व्हावे – अशी इच्छा असते. पण उपास करताना स्वत:च्या शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यावर काय परिणाम होईल, याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केलं जातं!
बऱ्याच व्रतांच्या निमित्ताने या दिवसांत अन्नग्रहणावर वेगवेगळ्या पद्धतीची बंधनं घालून घेतली जातात. ते आरोग्याला अपायकारक आहे की उपायकारक आहे – याबद्दल नेहमीच उलटसुलट मतं मांडली जातात. चातुर्मासातले उपासतापास अंधश्रद्धा नसून ते आवश्यक असतात असंही अनेकांना वाटतं! उपास करणं आरोग्याला हितकारक असतं, असं अनेक जणांचं म्हणणं असतं. आयुर्वेदात लंघन करणे हा उपचार म्हणून देखील सांगितलेला आहे. त्यामुळे शरीर डीटॉक्स होते. ‘चातुर्मासात पावसाळा असल्यामुळे निसर्गाचे रूप पालटलेले असते. भूक फारशी लागतच नाही, कारण या काळात जठराग्नी मंद झालेला असतो. पचनशक्तीही जरा कमकुवत झाल्यामुळे उपास करणं हे आरोग्यासाठीही चांगलं असतं !’ असेही म्हटलं जातं. शिवाय वजन घटवण्यासाठी देखील उपासांचा उपयोग होतो – अशी श्रद्धा तरुण मंडळींमध्ये वाढायला लागली आहे. पण आपल्याच संस्कृती मधल्या काही ग्रंथात उपास न करता विविध धान्य, कडधान्य, भाज्या, दूधदुभते असा व्यवस्थित आहार घ्यावा आणि योगाभ्यास करावा असे सांगितले आहे – त्याचा उल्लेख मात्र फारसा केला जात नाही.
चातुर्मासात वेगवेगळ्या ठिकाणी आहारविहाराचे वेगवेगळे नेमनियम पाळले जातात. अनेक लोक या दिवसांत कांदालसूण आणि मांसाहार वर्ज्य करतात. काही लोक पर्णभोजनाचे म्हणजे पानावर जेवायचे व्रत करतात तर काहीजण दिवसातून एकदाच जेवायचे (एकभुक्त) असा नेम धरतात. अनेक स्त्रिया चातुर्मासात ‘धरणे-पारणे’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास, असे सतत चार महीने करायचे असते. हे व्रत ‘इंटरमिटंट फास्टिंग’चा प्रकार आहे – असे सांगितले जाते. श्रावणात तर एकेकदा इतके उपास एकत्र येतात की अनेकजणींना आठवडाभर उपास घडतो. नवरात्र, नागपंचमी, हरतालिका यासारखे अनेक उपास तर सणांना जोडूनच येतात. म्हणजे एकीकडे सणवार म्हणून घरातल्या मंडळींसाठी गोडधोडाचा स्वयंपाक करायचा आणि त्याचवेळी स्वत: मात्र उपासाचे पदार्थ खाऊन राहायचं अशी अनेक बायांची अवस्था असते. काही उपास ‘निर्जळी’ म्हणजे अगदी पाणीसुद्धा न पिता करावे लागतात. पण उपासाचे बरेचसे पदार्थ छानपैकी चविष्ट असतात आणि त्यात भरपूर वैविध्य आणलं जातं. बटाटे, साबूदाणा, रताळी अशा पिष्टमय पदार्थांच्या बरोबरीने तेलातुपाचा सढळ हाताने वापर केलेला असतो. यूट्यूबवर तर उपासाचा डोसा, उपासाचा दहीवडा, उपासाची इडली अशा मजेदार रेसिपीज् पहायला मिळतात. पण उपासांच्या निमित्ताने खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये पोषणमूल्यं कितीशी असतात, हा मात्र सध्या वादाचा विषय आहे. 

हा लेख सुद्धा वाचा - उपास एक अन्यायकारक प्रथा 


आपल्या देशात धार्मिक कारणांमुळे केल्या जाणाऱ्या उपासांचा पोषणाशी काय संबंध असतो – यावर बरेच संशोधन झालेले आहे. या संशोधनात मुस्लिम धर्मात रमादानच्या निमित्ताने केले जाणारे रोजे आणि ख्रिश्चन धर्मात केल्या जाणाऱ्या उपासांचा ही समावेश आहे. उपासाच्या निमित्ताने केव्हा आणि काय खाल्लं जातं तसंच काय वर्ज्य केलं जातं यावर त्याचे फायदे तोटे अवलंबून असतात. त्यासोबत उपास करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्याची पातळी कशी आहे, त्यावरही कुठले पदार्थ खावेत किंवा खाऊ नयेत – हे ठरवले पाहिजे – असं आहारतज्ञ सांगतात. उदाहरणार्थ, मुस्लिम धर्मीय लोक रोजे करतात तेव्हा दिवसभर पाणीदेखील पीत नाहीत. त्यानंतर उपास सोडताना संध्याकाळी अचानक भरपूर कॅलरीज् असलेले तेलकट, तळकट पदार्थ खाल्ले तर ते शरीराला अपायकारक ठरू शकतं. तसंच डायबेटीस असलेल्या व्यक्तीने उपास करताना खूपच काळजी घ्यावी लागेल. ज्यांच्या आरोग्याची पातळी मुळातच खालावलेली आहे- अशा लोकांनी उपास केले तर त्यांना जास्तच त्रास होईल.
जरी हिंदूंच्या उपवासपद्धतीत खूप विविधता असली तरी बहुसंख्य उपासाच्या पदार्थात प्रथिनांचा वापर मात्र अगदी कमी असतो. आपल्या देशातल्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिला आणि मुलींना अनिमिया असतो. तसंच महिलांना प्रथिनांची, कॅल्शियमची आणि त्याचबरोबर D आणि B12 जीवनसत्वांची कमतरता असते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे देखील हिमोग्लोबीन बनण्यात अडथळा येतो. आहारतज्ञ सांगतात की गरोदर महिला आणि कुपोषित, अशक्त लोकांनी लंघन किंवा इंटरमिटंट फास्टिंग देखील करू नये. पण हिंदू धर्मात तरी बहुसंख्य महिला स्वत:च्या आरोग्याची अजिबात पर्वा न करता अगदी डायबेटीस असला तरीही उपासतापास करतात. मागच्या वर्षी उत्तर भारतातल्या काही हॉस्पिटल्समध्ये डायबेटीस असलेल्या लोकांसोबत एक अभ्यास करण्यात आला. त्यात विविध धर्माचे लोक सहभागी झाले होते. हे पेशंटस् उपासांच्या निमित्ताने काय खातात, कधी खातात, उपासाच्या काळात डॉक्टरांच्या संपर्कात असतात की नाही – अशा अनेक बाबींचा त्यात विचार केलेला होता. या अभ्यासात दिसून आले की डायबेटीस असूनही महिला मोठ्या प्रमाणात उपास करतात. बहुसंख्य पेशंटस् उपास सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतच नाहीत. मुंबईतल्या डॉ. कामाक्षी भाटे सांगतात की महिला मोठ्या प्रमाणात स्वत:च्या आरोग्याची हेळसांड करतात आणि अगदी पाइल्स सारखा आजारदेखील आपोआप बर होईल म्हणून दुर्लक्ष करतात. दोन वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये एक अभ्यास करण्यात आला होता, त्यात असे आढळले की – निरोगी दिसणाऱ्या शहरी स्त्री-पुरुषांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जीवनसत्वांची कमतरता असते. बी कॉम्प्लेक्स गटातल्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डिमेनशिया, कॅन्सर असे अनेक आजार होऊ शकतात. भारतीय स्त्रियांच्या आरोग्याचे हे वास्तव लक्षात घेतलं तर बायकांनी कुठल्याही प्रकारचे उपास करणं त्यांच्या आरोग्याला घातक आहे, हे सहज लक्षात येईल. खेड्यातल्या गरीब महिला तर अनेक कारणांनी कुपोषित असतातच. तसंच शहरातल्या नोकरी बाईला तर घरकाम, बाहेरची धावपळ या बरोबरीने स्वत:चा चौरस आहार आणि व्यायाम हे सर्व सांभाळण्याची कसरत अजिबात झेपत नाही.जरी घरातल्या सर्वांचे भले व्हावे – अशा उदात्त हेतूने महिला उपास करत असल्या आणि त्यातून त्यांना अध्यात्मिक आनंद मिळत असला तरी त्यांच्या शारीरिक आरोग्याची हेळसांड होत आहे, याकडे त्यांच्या घरातल्या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. 
... किंवा महिलांनी तरी कुठलेच उपासतापास न करण्याचे नवे व्रत अंगिकारले पाहिजे!

वंदना खरे 
संपादक,
"पुन्हास्त्रीउवाच" 

छळवाद .. !

स्त्रियांच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या वारंवार बघाव्या लागतात. पत्रकार, मंत्री, अभिनेते, दिग्दर्शक, शिक्षक, डॉक्टर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले पुरुष निर्लज्जपणे हा गुन्हा करत असतात. म्हणूनच, महिलांसाठी अजून कोणतेही कार्यक्षेत्र सुरक्षित नाही, असं परतपरत म्हणण्याची वेळ येते. कारण प्रत्येकच क्षेत्रात महिलांचे लैंगिक शोषण होताना दिसते. अगदी “प्रगल्भ, बुद्धिमान, सोज्वळ” समजल्या जाणाऱ्या साहित्यिक लोकांच्याकडूनही महिलांचा लैंगिक छळ करण्यात आल्याची उदाहरणे घडतात. खरंतर अशा घटना घडणं, हे काही समाजाला तसं नवीन नाही. फक्त पूर्वी सोशल मीडियाचे प्रमाण जास्त नसल्यामुळे एकमेकांशी संपर्क करण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या, एवढंच! सोशल मीडियामुळे भौगोलिक अंतर जास्त असलेल्या माणसांच्यातही संपर्क होणे सहज शक्य झालंय. पण त्याचबरोबर त्रास देण्याचेही अनेक रस्ते खुले झाले आहेत. कारण पुरुषांनी स्वत:च्या हातातल्या सत्तेचा गैरवापर करून महिलांचा लैंगिक छळ करण्याची वृत्ती काही अजून संपलेली नाही! जेव्हा आपल्या आसपासच्या माणसांच्या बाबतीत अशी एखादी घटना घडते, तेव्हा तर हे अधिकच जाणवते.
नव्यानेच लिहू लागलेल्या माझ्या एका मैत्रीणीने फेसबुकच्या दुनियेत पाऊल टाकले आणि काही दिवसातच ती तिथल्या भुलभुलैय्यामध्ये हरवून गेली. घराच्या चौकटीच्या आतमध्ये, छोट्याशा वहीत लिहिलेल्या शब्दांचे कौतुक कोणी करत नसे. पण फेसबुकच्या दुनियेत तिला भरभरून कौतुक अनुभवायला मिळत होते. साहजिकच ती भारावून गेली. नवनवीन लोकांच्या ओळखी होत होत्या. तसेच नवनव्या विषयांवर लिहिण्यासाठी तिला प्रेरणाही मिळत होती. एकूणच ती आभासी दुनियेत आनंदाच्या डोही तरंगत होती. काही मोठ्या लेखक मंडळीचे मार्गदर्शन मिळत होते, लेखनात सुधारणा होत होती आणि तसे तिला स्वत:च्या शब्दांना पुस्तकरूपात प्रकाशन करायचे वेध लागू लागले. याचे कारण म्हणजे फेसबुकातल्या आदरणीय, माननीय लेखकांनी तिला दिलेले प्रोत्साहन! त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला होता. तिलाही आता नावापुढे ‘लेखिका’ हा शब्द जोडण्याची ओढ वाटायला लागली. ओळखीच्या लोकांकडे ती याविषयी बोलू लागली. मेसेंजरवरून, नंबर शिवाय अगदी कॉलची ही सोय असल्याने कुणालाही संपर्क करणे तिला सोयीचे झाले होते. आपल्या नावाचे पुस्तक प्रकाशित व्हावे, हीच एक आस ! म्हणून तिने घरच्यांना न सांगताच अनेकांशी संपर्क करायला आणि व्यवहाराची बोलणी करायचं ठरवलं.
काही दिवसांनी तिला एका प्रकाशकाने पुस्तकासाठी लिहिलेले साहित्य घेऊन बोलावले. तिला फार आनंद झाला पण घरी लेखनाचे कारण सांगितलं तर वाद निर्माण होतील असं तिला वाटलं. म्हणून तिने आपल्या मैत्रीणीकडे जात असल्याचे सांगितलं. एसटीत बसल्यावर तिला कोण आनंद झाला होता! आता थेट पुस्तक प्रकाशित करूनच घरच्यांना सांगू अशा विचारात तिने आनंदात शहर गाठले. आभासी दुनियेत सज्जन भासणाऱ्या प्रकाशकाचा खरा विखारी पुरुषी चेहरा प्रत्यक्ष भेटीत तिच्यासमोर आला.
संबंधित प्रकाशकाकडे गेल्यावर त्यांनी तिला पुस्तक प्रकाशनाची हमी तर दिली. पण त्याचबरोबर "आपण दोघं काही वेगळे आहोत का? आपल्यामध्ये पैसा आणू नकोस, तू फक्त लिहित रहा." - असं सांगत शारीरिक जवळीक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र ती घाबरली व कशीबशी घरी निघून आली. आता घरच्यांच्या अपरोक्ष काहीही करायचे नाही, असंच तिने ठरवलं ! पण तिने अनवधानाने व्हाट्सअप नंबर दिला होता. त्या भेटीनंतर तो प्रकाशक तिला सतत फोन करू लागला. आणि शरीरसुखाची मागणी करू लागला.
आता त्याला ब्लॉक करण्याचा सोपा पर्याय तर तिच्याकडे होता, परंतु तिचे साहित्य त्याच्या ताब्यात गेले होते. त्या लिखाणावर तिने दोनतीन वर्षे वेळ खर्च केला होता. एकीकडे पुस्तक प्रकाशित होण्याची आस व दुसरीकडे अवास्तव मागणी यामुळे धास्तावून ती अस्वस्थ झाली. शिवाय तिला साहित्य क्षेत्रातील, प्रकाशनाच्या संदर्भातली काहीच माहिती नव्हती. काय करावे तिला सुचेना! शेवटी तिने धीर एकवटून नवऱ्यालाच सर्व प्रकार सांगितला. तो देखील सुरूवातीला तिच्यावर भडकलाच, पण नंतर शांतपणे परिस्थिती समजून घेतली. लवकरच त्या प्रकाशकाला गाठून नवऱ्याने खास ‘पुरुषी’ शैलीत त्याची कानउघडणी केली. तिचे अडकून पडलेले लिखाणही त्याच्याकडून परत मिळविले. तोपर्यंत, तिला प्रचंड मानसिक ताण येत होता. स्वतःच्या बेसावधपणाबद्दल तिने स्वत:ला भरपूर दोष दिला. ती घरी न सांगता एका पुरुषाला भेटली म्हणून तिला अद्दल घडली, असं तिला बराच काळ वाटत राहिलं !
पण खरंतर अशीही अनेक उदाहरणं मला माहिती आहेत, की जिथे जवळच्या ओळखीतले किंवा अगदी नात्यातले पुरुष देखील महिलांचे लैंगिक शोषण करतात. आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का लागायच्या भीतीने त्या मुकाट्याने सहन करीत राहतात. थोडक्यात काय, तर कामाची जागा असो किंवा घरगुती असो - लैंगिक शोषणाचे दडपण बाईला नेहमीच असते! साहित्य क्षेत्रात महिला सुरक्षित आहेत – असं समजून गाफील राहता येणार नाही. प्रकाशन क्षेत्रात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या महिला प्रकाशक आहेत. त्यातही काहींचे फक्त कागदोपत्री नाव असते, पण कारभार तर घरचे पुरूषच हाताळतात. मोठमोठया साहित्य संमेलनातही पुरूषवर्गाची मक्तेदारी चालते आणि महिलांना दुय्यमपणाची जाणीव करून दिली जाते. मुख्य म्हणजे कुठलंही क्षेत्र असलं तरी सत्तेचा दुरुपयोग करून महिलांचा लैंगिक छळ करणारे सगळीकडे असतातच!


शुभांगी दळवी

सातारा

हॉस्पिटल्समधल्या लैंगिक छळाचा विषाणू

  • भागलपूर रुग्णालयात करोनाबाधित पती आणि आईची काळजी घेणाऱ्या महिलेचा लैंगिक छळ
  • दिल्लीच्या कोविडकेअर सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीवर बाथरूममध्ये नराधमाचे लैंगिक अत्याचार
  • जामनगर मधील रुग्णालयात परिचरिकेचा सुपरवायझर कडून लैंगिक छळ
  • कल्याण महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलेचा विनयभंग

या आहेत फक्त गेल्या दोनतीन महिन्यातल्या काही बातम्या!
करोनोत्तर काळात देशातल्या विविध भागांतून अशा अनेक बातम्या आपण बघत आहोत. या काळात जशी घरगुती हिंसाचारात वाढ झाली; त्याचप्रमाणे कोविड सेंटर्स, क्वारंटाईन केंद्रात आणि रुग्णालयांमध्येही लैंगिक छळाची असंख्य प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महिला डॉक्टर, परिचारिका, महिला रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईक महिलांनाही लैंगिक छळाला सामोरे जावे लागले आहे. थोडक्यात, करोना विषाणूच्या बरोबरीने लैंगिक छळाच्या विषाणूचा सामना देखील महिलांना करावा लागतो आहे. अशा घटना म्हणजे एक प्रकारे रुग्णालयांमधल्या कमकुवत सुरक्षेचे प्रतिबिंब आहेत. भारतातल्या रूग्णांना सुरक्षिततेचा मूलभूत हक्कदेखील नाकारला जातो.
करोनापूर्व काळात सुद्धा डॉक्टरांनी किंवा इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांचे लैंगिक शोषण करण्याच्या घटना घडतच असतील! पण ह्या महामारीच्या काळात सामान्य माणसांच्या मनातली भीती आणि हतबलता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्याचा गैरफायदा घेऊन वैद्यकीय माहिती आणि तंत्रज्ञान हातात असलेल्या लोकांना आपल्या सत्तेचा दुरुपयोग करणं जास्तच सोपं झालं आहे. काही जणींनी त्यांच्यावर होणाऱ्या हिंसेबद्दल बोलायची हिंमत दाखवली असली तरी प्रत्यक्षात मात्र अशा कितीतरी घटना दडपल्याच गेल्या असतील. कारण एखाद्या महिलेचा लैंगिक छळ होत असेल तर तिलाच दोषी ठरवायचे आणि तिचीच बदनामी करायची – ही तर आपली थोर परंपराच आहे. याच भीतीमुळे अनेक जणी लैंगिक शोषणा विरोधात तक्रार नोंदवत नाहीत.

मुंबईजवळ मीरारोड इथे असलेल्या कोविड सेंटर मध्ये एका महिलेला तिच्या 10 महिन्याच्या मुलीसोबत एका खोलीत क्वारंटाइन करण्यात आले होते. या लहान मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन केंद्रातील कर्मचाऱ्याने महिलेवर अत्याचार केले. आपल्या कुटुंबाची बदनामी होईल या भीतीपोटी पीडित महिलेनं तेव्हा तक्रार दाखल केली नव्हती. पण अखेर संतापाचा उद्रेक झाल्यामुळे या महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

मागच्या वर्षी महाराष्ट्रातल्या अमरावतीमध्ये करोना चाचणी करायला गेलेल्या एका महिलेच्या योनीतून स्वॅब घेण्यात आला होता. करोना चाचणीसाठी फक्त नाक आणि घशातूनच स्वॅब घेतला जातो – ही माहिती जेव्हा तिला समजली तेव्हा तिने पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर त्या लॅब टेक्निशियनला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या घटणे विषयी बोलताना अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी इतर अनेक महिलांच्या बाबतीत देखील असा गुन्हा घडला असण्याची शक्यता बोलून दाखवली होती. अशा गुन्ह्याला बळी पडलेल्या महिलांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी – असे आवाहन त्यानी केले होते.

पण वस्तुस्थिती अशी आहे की लैंगिक शोषणाबाबतच्या तक्रारींकडे अनेकदा गांभीर्याने बघितलेच जात नाही. खरंतर कोविड पेशंटस् आणि त्यांचे नातेवाईक सुद्धा अतिशय बेचैन मनस्थिती मध्ये असतात. परिस्थितीवर आपलं काहीच नियंत्रण नाही अशी त्यांची भावना झालेली असते. त्यांच्या आजूबाजूला PPE सूटमधले कर्मचारी वावरत असतात, त्यामागच्या माणसाला ओळखणे कठीण असते. तक्रारीसाठी पोलिसांकडे धाव घेणेही तितकेसे सोपे राहिलेले नाही. कारण या काळात पोलिसांच्या प्राथमिकता बदललेल्या आहेत. म्हणूनच या काळात सुरक्षेबद्दलच्या विद्यमान यंत्रणा बळकट करणे जास्त गरजेचे झाले आहे.

लैंगिक शोषणाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रुग्णालये, दवाखाने अशा ठिकाणी कोणकोणत्या सुविधा असाव्यात याविषयी कायद्यामध्ये उल्लेख असला तरीही प्रत्यक्षात मात्र जगभरात बहुसंख्य ठिकाणी ते कायदे पाळले जात नाहीत; असे विविध संशोधनात्मक अभ्यासातून सिद्ध झालेले आहे. आपल्या देशात सुद्धा महिला लैंगिक शोषण (मनाई, प्रतिबंध आणि निराकरण ) कायदा आहे. त्यानुसार रुग्णालयांचे कर्मचारी आणि रुग्ण आशा दोघांनाही संरक्षण मिळणे अपेक्षित आहे. रुग्णालयाची अंतर्गत तक्रार समिती रुग्णांच्याही तक्रारींवर कारवाई करू शकते. पण अंतर्गत तक्रार समितीपर्यन्त कसे पोचता येईल – याबद्दलची माहिती रुग्णांना दिली जाते का? बहुतेक रुग्णालयांमधे अशी समिती तयार केलेलीच नसते. इंदोरच्या मेदांता हॉस्पिटलला अशी समिती गठित न केल्याबद्दल 50,000/- चा दंड देखील झाला होता. पण परिस्थिती मध्ये कितीसा फरक पडलेला दिसतो?

जेव्हा रुग्णालयात एखाद्या महिलेचे लैंगिक शोषण केले जाते – तेव्हा बरेचदा आपल्या बाबतीत जे घडते आहे त्याला ‘लैंगिक छळ’ म्हणतात हे देखील अनेक जणींना माहीत नसते. जरी माहीत असले तरी तिच्यावरचे संस्कार त्याविरुद्ध तक्रार करायची हिंमत तिला येऊ देत नाहीत. एखादीने तक्रार करायचे ठरवले तरी तिच्या कुटुंबातले लोकच तिला नाउमेद करतात. चुकून एखाद्या बाईला कुटुंबियांचा पाठिंबा मिळून ती हॉस्पिटलच्या समितीकडे तक्रार करायला पोचलीच तर तिला समितीचे सदस्य तक्रारीपासून परावृत्त करायचा कसोशीने प्रयत्न करतात. बहुतेक वेळा समितीचे सदस्य सहसा आरोपीच्या बाजूने बोलतात, पीडितेची गैरसमजूत झालीअसेल   – असं म्हणतात. किंवा नुसती माफी मागण्यावर निभावण्याचा प्रयत्न करतात. एक तर पीडिता आधीच आजारपणामुळे गांजलेली असते. त्यातच आरोग्य अधिकाऱ्यांशी पंगा घेतला तर आणखीनच प्रतिकूल परिणाम होण्याची तिला भीती वाटते. आणि मग बहुतेक स्त्रिया या प्रकरणाचा पाठपुरावा न करण्याचाच निर्णय घेतात.
खरंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने सुद्धा रुग्णांच्या सुरक्षिततेची नैतिक जबाबदारी डॉक्टरांवरच दिलेली आहे. व्यावसायिक गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टर्स वरती कारवाईचा बडगा उगरण्याचे अधिकार मेडिकल कौन्सिल कडे असतात. परंतु, महिला लैंगिक शोषण (मनाई, प्रतिबंध आणि निराकरण ) कायद्याची किंवा मेडिकल एथिक्सची अंमलबजावणी धडपणे केलीच जात नाही. करोना काळातील लैंगिक छळाच्या अनेक घटनांनंतर महाराष्ट्र सरकारने कोविड/क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल महिलांच्या सुरक्षेसाठी मे महिन्यात SOP जारी केली आहे. परंतु त्यात अनेक बाबतीत संदिग्धता आणि त्रुटी आहेत असे दिसते. त्यामुळे या SOP ची अंमलबजावणी तरी कशी होईल याबद्दल शंकाच आहे.
मुळात रुग्णांच्या हक्कांविषयी वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये अधिक जागरूकता येण्याची गरज आहे. आपल्या तक्रारींची वेळेवारी दखल घेतली जाईल आणि कुणाच्याही पदाचा किंवा प्रतिष्ठेचा मुलाहिजा न ठेवता लैंगिक शोषण करणाऱ्याला शिक्षा होईल अशी खात्री वाटली तरच तक्रार करायला पीडिता पुढे येतील. करोनाचा प्रसार थांबवणे तर गरजेचे आहेच, पण उपचारांच्या दरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केले तर लैंगिक छळाची एक नवी साथ पसरायला वेळ लागणार नाही!



वंदना खरे
संपादक -पुन्हास्त्रीउवाच