तराजू

ट्रेन आणि बसने प्रवास करताना मी शक्यतो हाफ शर्ट घालणे टाळतो कारण बाजूला बसलेल्या अनोळखी किंवा जवळीक नसलेल्या लोकांचा स्पर्श माझ्या शरीरास झाल्यास मला अस्वस्थता जाणवते. कुमारवयीन झाल्यापासून माझा स्वभाव जास्तच लाजरा बुजरा झाला आहे. त्यात कोणी माझ्याकडे टक लावून पाहिलेलं, मला स्पर्श केलेलं, विनाकारण चर्चा केलेलं मला सहन होत नाही.

तोही एक प्रवासाचा दिवस होता. एक्सप्रेसमध्ये तीन लोकांचे सीट एकमेकांना लागून होते. एक जाड अंगकाठी असलेला पुरुष आणि माझी बहिण ह्या दोघांच्या मध्ये मी हाफ टी शर्ट घालून बसलेलो होतो. माझ्या बहिणीने फुल बाह्यांचा कुर्ता आणि वरून स्टोल घेतलेला होता. भरदार अंग असल्याने तो पुरुष अर्धा माझ्या सीटवर येऊन त्याचा दंड माझ्या दंडाला स्पर्शत होता. जे की फारच सामान्य आहे पण मला ते आवडत नव्हते. अर्थातच तो समलैंगिक नाही हे अवगत असलेल्या ज्ञानामुळे मला एव्हाना कळले होते परंतु मला ते स्पर्श नकोसे होत होते. माझी अस्वस्थता वाढू लागली. ताईकडून तो स्कार्फ घेऊन स्वतःच्या खांद्याभोवती गुंडाळून घ्यावा असं मला वाटू लागलं. पण तो लेडीज स्कार्फ.. लोकं काय म्हणतील? मी तिला काय सांगू? की ह्या पुरुषाचा स्पर्श मला सहन होत नाहीये आणि मग ती मोठमोठ्याने हसेल.. ती काय विचार करेल?? पण नाही.. मला काहीतरी करणे भाग होते.. मी तिच्या कानाजवळ झुकून कचरतच तिला म्हणालो... 

"मला हे ना.. म्हणजे असं हाफ शर्ट असेल तर बाजूच्या व्यक्तीचा स्पर्श सहन नाही होत अंगाला.. हे..."

"मग मी बसू का तिथे?? तू ह्या बाजूला बस.. मी फुल हातांचा कुर्ता घातलाय आणि माझ्याकडे स्कार्फ पण आहे.." 
ती मधेच माझं बोलणं तोडत म्हणाली आणि उठून उभीही राहिली.. मी लगेच तिच्या जागेवर सरकलो आणि ती मधल्या सीटवर बसली. ती तिथे बसताच तो पसरलेला पुरुष त्याच्या सीटवर व्यवस्थित अंग चोरून बसला. 
माझे विचारचक्र चालू झाले.. 'हिला काहीच वाटलं नसेल?? ही मला असंही म्हणाली नाही की ‘तू मुलासारखा मुलगा आणि बहिणीला त्या पुरुषाच्या बाजूला बसवतोस’?? हिने थोडाही लिंगभेद केला नाही?? आणि तेव्हा मला जाणवलं की इथे लिंगभेद करणं गरजेचंच नाही... इथेच नाही पण कुठेच लिंगभेद करणं गरजेचं नाही. हा लिंगभेद म्हणजे ज्याला ज्यात स्त्रियांना दुय्यम आणि कमजोर मानले जाते तो नाही... तर जिथे पुरुषांनी फारच मजबूत आणि कणखर असणं आवश्यक मानलं जातं तो लिंगभेद ! 
ह्याचा पाया पालकांपासून रोवला जातो. आपण नेहमी पाहतो की मुलांना जितकी मोकळीक दिली जाते तेवढी मुलींना मिळत नाही. काही संधी असतील तर मुलांना त्यात प्राधान्य दिले जाते...पण कधीकधी काही गोष्टी मुलांवर लादल्या जातात. मुलगा आहेस, तू बाहेर गेलंच पाहिजेस, तू मेहंदी, रांगोळी ह्यासारख्या कलांपासून दूर राहा, मुलगा आहेस तर रडायचं नाही, तुला तर गाडी चालवता आलीच पाहिजे, दहा मिनिटांच्या आत अंघोळ झाली पाहिजे, क्रिकेट खेळता आलं पाहिजे, बाहेर रात्री एकटं घाबरायचं नाही.. कारण मुलांचा बलात्कार होत नाही!!!
मी एक असा मुलगा आहे की जो स्वतःची लैंगिकता स्वीकारताना खुप एकटा होता. मला विभिन्न मानसिक आजार जडले आहेत. पण मुलगा असल्याने मानसिकरित्या दुर्बल असण्यालाही मनाई आहे. जेव्हा मी मानवी वस्तीपासून दूर असलेल्या एमआयडीसीमध्ये अपरात्री कामासाठी जायचो तेव्हा दुचाकींवरून येजा करणारे लोकं मला ऑफिसपर्यंत सोडून देत. परंतु काहींनी धमकावून मोबाईल पळवण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी मलाच अंधाऱ्या वळणावर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. अर्थातच ह्या घटनांचा परिणाम म्हणून मला सुनसान रस्त्यांवरून चालताना अचानक जवळ एखादी दुचाकी आल्यास धडकी भरू लागत असे. प्रयोग म्हणून ऑफिसमध्ये माझी ही भीती सांगितली असता - 'काय घाबरतो?? तू मुलगी आहेस का? तुझा काय रेप होणार आहे??' 'तुझ्याच मागे असे लिंगपिसाट माणसं का लागतात?? तुझं चालणं बोलणं जरा मुलांसारखं सुधार...' असं ऐकावं लागलं.
मी मुलींसारखा वागतो.. पण मी मुलगा आहे.. मला मुलं आवडतात.. पण मी मुलगा आहे.. माझ्यात कोणी स्त्री दडलेली नाही तर एक शृंगार आवडणारी, पुरुषांचे आकर्षण असणारी व्यक्ती आहे जी सुद्धा पुरुषच आहे. मी हिजडा नाही.. मी स्त्री नाही.. मी पुरुष आहे.. पुरुष आहे मी!! मी पुरुष असून स्त्रीसारखा वागतो, त्याने काही फरक पडत नाही ! खरंतर मी पुरुष नसेल तरीही काहीच फरक पडत नाही!!!
हा कसला अहंकार?? स्त्री किंवा हिजडा असण्यात वाईट काय?? ती ही मनुष्याचीच लिंग आहेत. कोणी माझ्या पुरुषत्वावर बोट ठेवतं तेव्हा मला इतका का संताप येतो?? मला कोणी त्याबद्दल चिडवलं की राग का येतो????
समाजाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे मुलगा नाही वागला की तो मुलगाच नाही... तो हिजडा!! अरे असू दे ना हिजडा.. त्यात गैर काय?? एखाद्याच्या लिंगावरून त्याला हिणवले कसे जाऊ शकते?? केवळ स्त्री आणि पुरुष तुमच्या सडलेल्या विचारांचा वंश पुढे चालवू शकतात म्हणून ते लाडाचे? त्यापैकीही स्त्री स्वतःचा नाही तर दुसऱ्याचा वंश वाढवणार म्हणून ती दुय्यम.. पुरुष प्रथम.. हिजडा ते करू शकत नाही म्हणून त्याला थेट उपेक्षित घटक म्हणून घोषित केले आणि निर्दयीपणे दूर फेकून देण्यात आले. अरे किती हा स्वार्थीपणा ह्या मनुष्याचा??
आपण आज जागोजागी पाहतो की स्त्रियांवर युगानुयुगे होणाऱ्या अत्याचारांना वाचा फुटू लागल्या आहेत. स्त्रियांच्या समान हक्कांसाठी अनेक ठिकाणी चळवळी पाहायला मिळतात. काही ठिकाणी फेमिनिजमच्या नावाखाली नको त्या गोष्टी केल्या जातात आणि पुरुषांना त्रास दिला जातो ह्याला फेक फेमिनिजम असे म्हणतात. स्त्रियांकडून पुरुषांवर केले जाणारे आरोप नेहमीच खरे असतील हे गरजेचं नाही हे सिद्ध करण्याच्या मागे लागले. परंतु ह्याच समुदयापैकी एखाद्या पुरुषाने स्वतःवर बलात्कार झाल्याचे सांगितले तर त्याला मदत करण्याऐवजी त्याच्याकडे कुतूहलाने बघितले जाते. आणि मग माजतो एकच हस्यकल्लोळ!! का?? कारण समलैंगिक आणि गर्लिश वागणाऱ्या मुलांना पुरुष म्हणून ओळखलेच जात नाही... तर अश्या लोकांसाठी लढणं लांबच राहील. फेमिनिजम आणि मेनिनिजमचे युद्ध नेहमीच पाहायला मिळते. सत्यमेव जयते ह्या मालिकेत कमला भसिन ह्यांनी सांगितलं की "फेमिनिजमच्या विरुद्ध मेनिजम कधीच नसते. तर ह्या दोघांच्याही विरुद्ध असते ती म्हणजे समानता."
जोपर्यंत पुरुषांना जे हक्क आहेत ते महिलांनाही मिळतील तेव्हा किंवा पुरुष जी कामं करतात ती स्त्रियांनी केल्यावर तिच्याकडे जेव्हा घृणेने पाहिले जाणार नाही तेव्हा समानता येईल असे बऱ्याच लोकांना वाटते. जे की काही अंशी खरे आहे! परंतु, खरी समानता ही केवळ स्त्रियांना सशक्त केल्याने नाही येणार. जेव्हा स्त्रियांच्या माथी मारून ठेवलेली कामं, कृती, छंद, पेहराव हे सर्व पुरुषांनीही केली तरी ते खुल्या मनाने स्वीकारले जाईल, तेव्हा येईल!!
एखादी व्यक्ती चांगली की वाईट हे तिच्या लिंगावरून न ठरवता ती काय करत आहे ह्यावरून ठरायला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, अरेरावी करणे, शिव्या देणे अशा सर्व गोष्टी कोणीही केल्या तरी त्या वाईटच समजल्या गेल्या पाहिजेत! एक पुरुष करत आहे म्हणून त्याने काही फरक पडत नाही; मात्र एक स्त्री करत असल्यास तुमच्या भुवया वर जात असतील तर तुम्हाला इलाजाची गरज आहे. अगदी तसेच घरकाम, कलाकुसर ह्या चांगल्या गोष्टी वाटत असतील तर त्या कोणत्याही मनुष्याने केल्यास त्या चांगल्याच म्हणायला कचरू नये! मनुष्यात कोणते लिंग कशावरून श्रेष्ठ हे कोणी ठरवलं ? कोणी बांधला हा अवाढव्य तराजू??!! तोडा त्याला..!! कठीण आहे? अशक्य तर नाही!! माणसाने स्वतःला ह्या दोन लिंगांपुरते सीमित करून घेतले आहे. पण प्रत्यक्षात मात्र इतरही अनेक प्रकारची लिंग अस्तित्वात आहेत !! कोणी व्यक्ती एका विशिष्ट लिंगाचा आहे म्हणून तो हे किंवा ते करेलच ह्या विचारांना कुलूप ठोकूयात... तराजूच्या पारड्यातून उतरून जमिनीवर येऊयात!! आणि समानतेने जगुयात!!


 लेखकाला स्वत:चे नाव जाहीर करायची इच्छा नाही.  

 

हॅप्पी वटपोर्णिमा... !

सहज गंमत म्हणून एक पोस्ट फेसबुकवर टाकली - वड पुजणाऱ्या बाया मनात काय विचार करत असतील?
बाई १. जन्मोजन्मी असाच साधा भोळा हवा.
बाई २. पुढच्या जन्मी नवा दे आणि जरा बरा दे.
बाई ३. पुढचे सहा जन्म कोणताही दे, पण हा नको.
बाई ४. पुढच्या जन्मी हा माठ बिलकुल नको.
बाई ५. बाईचा जन्मच नको पुढल्यावेळी.
बाई ६. नवराच नको कोणत्याच जन्मी...
ही यादी अजून कितीही वाढवा म्हटलं ... तशी अनेकांनी यादी वाढवत नेली. अनेकांनी उत्फुर्त आणि मिश्किल प्रतिक्रिया दिल्या...
'जो आहे त्याला पुर्नजन्म नको, दुसरीचे भोग तरी वाचतील!', 'याची देही याच डोळा पितृसत्ताक रीती आणि रूढी नष्ट होऊ दे', 'सात जन्मांचं टेन्शन नको याच जन्मात सात दे', 'लग्न संस्थाच नष्ट होऊदे', 'वड पुजणेच बंद होऊ दे', 'जरा ह्या जन्मात सात जमतात का बघा ना', 'पुढच्या जन्मी या नवऱ्याची बायको न होता नवरा होवू दे जरा उट्ट काढायची संधी मिळू दे', 'पुरूष वड कधी पुजणार?' अशी बरीच गंभीर आणि गमतीदार मतं आली.
'अगं बाई अरेच्च्या' या चित्रपटात वडपूजेचा प्रसंग फार गमतीदार रंगवला आहे. नटूनथटून नऊवारी नेसून साग्रसंगीत पूजा करणाऱ्या आणि वडाला फेऱ्या मारणाऱ्या बायका मनातल्या मनात काय विचार करतायत हे या चित्रपटाच्या नायकाला ऐकू येतं. "याच जन्मात जगणं नकोसं केलंय तर "पुढच्या जन्मी कशाला मागू याला?", "जरा म्हटलं आज माझ्यासोबत उपवास करा तर नाही ते पण जमत नाही यांना", "चांगलं त्या डॉक्टरचं स्थळ चालून आलं होतं, त्यालाच हो म्हणायला हवं होतं." अशा अर्थाची किती अन् काय काय स्वगते बायकांच्या मनात चाललेली असतात. संपूर्ण चित्रपटातच बायकांच्या मनातले विचार त्याला ऐकू येत राहातात. तो त्रस्त होतो. बायकांच्या बडबडीचा त्याला राग येतो, त्रास होतो. पण हे ऐकू येणं मात्र तो थांबवू शकत नाही. एक स्त्री मानसोपचार तज्ज्ञ त्याचे समुपदेशन करतात आणि स्त्रियांच्या मनात चाललेली घुसमट, तगमग, त्रागा, मनस्ताप याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी त्याला प्रदान करतात आणि हा नायक आपल्या आई, बहिण, आजी, बायको आणि इतर बायकांच्या मनातला कोंडमारा ओळखून त्यांच्या मनासारखं वागू पाहतो. अतिशय गमतीशीर आणि मार्मिक पध्दतीने स्त्रियांच्या जगण्याचा, तगमगीचा वेध घेणारा हा सिनेमा आहे. पण त्यांना समजून घेणारे नायक प्रत्यक्ष जीवनात फारच कमी आहेत. उलट स्त्रियांवर सत्ता प्रस्थापित करू पाहणारे, तिला पारंपारिक चौकटीतून बाहेर पडू न देणारे पुरुष आजही घरोघरी आहेत.
‘परिकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का?' 'कही तो मिल जायेगा, मेरा बलमा', ' किसी दिन बनूंगी, मै राजा की रानी' अशी स्वप्न पहात मोठ्या होणाऱ्या मुली - शिक्षण, करियर, नोकरी यांपेक्षा 'लग्न' या गोष्टीला महत्त्व देऊन वाजत-गाजत नवऱ्याच्या घरी नांदायला जातात. आणि मग वर्षानुवर्षे अशी पातिव्रत्य, पुनर्जन्म, पावित्र्य, मांगल्य यात सार्थकता मानणारी व्रतवैकल्यं करत राहतात. कधी नटण्या-मुरडण्याची हौस म्हणून, तर हल्ली एक इव्हेन्ट म्हणूनदेखील अशा सणवार-व्रतांकडे पाहिलं जातं.
पूर्वी म्हणजे साधारण ऐंशी ते नव्वदच्या दशकात 'दिल्या घरी तू सुखी रहा' टाईपच्या मुलींची संख्या खूप होती. 'डोली चढके मे आई, कांधे पे जाऊंगी', असे म्हणत गप्प राहून सहनशीलतेचा कळस गाठणाऱ्या पोरी दर वटपौर्णिमेला नटून-थटून वडाभोवती दोरा गुंडाळायला जायच्या. मग दारू पिऊन किंवा दारू न पिता मारणारा, घराबाहेर काढणारा नवरा असो की गप्प राहून खेळी करणारा आई-वडिलांचा 'श्रावणबाळ' असो - 'मेरा पति मेरा देवता है' म्हणत बायका पुढचे सात जन्म त्यालाच मागण्यासाठी वडाभोवती फेर्‍या मारायच्या. मग त्या पुरुषाने दोन-दोन लग्नं केली तरी 'मै तुलसी तेरे आंगन की' म्हणत दोघीही त्याच्या दीर्घायुष्याची आणि पुढच्या जन्मी पुन्हा हाच नवरा मिळावा, यासाठी दुवा मागत राहायच्या. म्हणजे पुढच्या जन्मी परत हीच कहाणी कन्टीन्यू...
हिंदी सिनेमातलं 'करवा चौथ' असो वा मराठी सिनेमातलं 'वटपौर्णिमा' व्रत. एकीकडे आधुनिकीकरणामुळे मध्यमवर्गीय समाजात बोकाळलेला चंगळवाद आणि त्यांचे होणारे ग्राहकीकरण; तर दुसरीकडे व्रते व ते साजरे करण्याची पध्दत अशी विरोधाभासी परिस्थिती दिसत आहे. बॉलीवूडमधल्या दिग्दर्शकांनी 'डीडीएलजे', 'कभी खुशी कभी गम', 'हम दिल दे चुके सनम' अशा अनेक चित्रपटांमधून करवा चौथ प्रचंड लोकप्रिय केला. चित्रीकरणातील भव्यता, गाणी, पोषाख दागदागिने यांची सामान्य दर्शकांवर भुरळ पडत गेली. मग ड्रेसेस, साड्या, ज्वेलरी मार्केटिंगने बाजी मारली. मुंबईसारख्या महानगरापासून ते छोट्या शहरापर्यत मेहेंदि सर्विसेस, पूजा थाळी, मिठाई आणि फुले, ज्वेलर्सकडून तसेच टेलर आणि ब्युटी पार्लरकडून वेगवेगळी सूट मिळू लागली. बॉलिवूड तारका, सेलिब्रेटींनीही या कंपन्यांच्या वस्तू परिधान करुन इन्स्टाग्राम ट्विटरसारख्या सोशल मिडियावर विधीवत पूजेचे सेल्फी शेअर करत 'हॅप्पी करवा चौथ' केले. अशा कंपन्यांनी स्पॉनसर केलेल्या पार्ट्या, विविध स्पर्धा यांना उत्सवी रुप आले. हल्ली तर अमरावतीसारख्या छोट्या शहरातही अशा इव्हेंटला मिसेस अमरावती, बेस्ट मॉम, बेस्ट वाईफसारख्या सौंदर्य स्पर्धा होऊ लागल्यात आणि वारेमाप पैसा खर्च करत, घराघरातून संघर्ष करत साध्या भोळ्या 'सुहागनस्' त्यात नशीब आजमावू लागल्यायत. जागतिकीकरणाच्या काळात स्त्रीत्वाचा हा नवा अवतारच जणू. 
अशा झगमगटात अडकून मग सामान्य बायकाही 'सदा सुहागन' बनून मूर्खपणाचे ढोल वाजवत राहिल्या. आणि आपल्या येणार्‍या पिढीतही ही परंपरा रुजवत राहिल्या. बरं या बाया-आया सगळ्याच अशिक्षित होत्या असं नाही, शाळेत गणित, विज्ञान शिकविणाऱ्या शिक्षिका, डॉक्टर, इंजिनिअर असलेल्या बायासुद्धा आपल्या विवेकाचं गाठोडं दूर बांधून ठेवून, 'मै तुम्हरी दासी, जनम की प्यासी, तुम्ही हो मेरा सिंगार साजन!' असे म्हणत नटूनथटून वडपूजेला जाऊ लागल्या.
वीस पंचवीस वर्षापूर्वी वडाचे चित्र काढून किंवा मुलांकडून काढून घेऊन व्रत पूर्ण करणाऱ्या भोळसट बाया होत्या. तर, शहरी भागात वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून किंवा विकत आणून पर्यावरण वगैरे कल्पना धादांत खोट्या ठरवत पूजा करणाऱ्या माता-भगिनी होत्या आणि अजूनही आहेत. वर्षानुवर्षे पुरुषसत्ताक विचारांनी स्त्रीचे स्वातंत्र्य बांधून टाकून तिला वेगवेगळ्या धार्मिक, उदात्त, पवित्र संकल्पनांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. तिची सृजनशक्ती फसव्या प्रतिमेत अडकवून तिला कायम अबला बनवण्याचा प्रयत्न केला गेला. स्त्रीने परंपरेला सोडू नये आणि आधुनिकतेला अंगिकारू नये, यासाठी ही पुरूषसत्तेची आत्यंतिक धडपड होती आणि त्यात ते यशस्वीही झाले. सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले यांनी खुल्या केलेल्या स्त्री शिक्षणाच्या वाटेवरून चालताना मात्र प्रत्यक्ष स्त्रीने आपल्या विवेकाचा वापर न करता स्वतःची बुद्धी गहाण टाकून अशा गुलामीतच राहणे पसंत केले.
व्रतवैकल्ये केल्याने कोणी दीर्घायुषी होईल का? पुढच्या जन्मात हवी ती व्यक्ती अशी मागून मिळते का? मुळात पुनर्जन्म वगैरे कल्पनांवर आजची सुशिक्षित मुलगी विश्वास ठेवते हेच हास्यास्पद आहे. वड ऑक्सिजन देतो म्हणून किंवा रोजच्या कामातून बाहेर पडण्याची संधी म्हणून शिकल्यासवरल्या, नोकरी करणाऱ्या मुलीसुद्धा वाहिन्यांवरच्या नेभळट नायिके सारख्या नटूनथटून, भरपूर मेकअप करुन सोशल मीडियावर “हॅप्पी वटपोर्णिमा” म्हणत लाईक आणि कमेंटची वाट बघत दिसतील तेव्हा फार आश्चर्य वाटून घ्यायला नको !

सारिका उबाळे

वटसावित्री आणि पुरुष

काही सन्माननीय अपवाद वगळता भारतातल्या सर्व पुरुषांना वटसावित्री हा सण फार आवडतो!

एकतर स्वत:ला काहीही तोशिस न लागता त्यांना आयतेच दीर्घ आयुष्य, वैभव, मुलेबाळे, त्याच्या आई वडिलांचा सांभाळ...हे सगळं त्यांच्या बायकोच्या केवळ एका उपासाने साध्य होत असेल तर कुणाला आवडणार नाही? माझ्या ओळखीतले माझ्या वडिलांच्या वयाचे आणि लहानपणी आजोबांच्या वयाचे पुरूषही वटसावित्री आणि हरतालिका या दिवशी भलतेच मृदू बनत. त्यांना आतून गुदगुल्या होत असाव्यात. अर्थात प्रत्येकाला बायकोप्रती उदंड प्रेम वाटत असले तरी त्यांच्या एक्सप्रेशनची पध्दत निरनिराळी होती. या दिवशी आमचे आजोबा आजीसाठी दारचे शेलके पेरू मुद्दाम काढवून घेत. आम्ही पोरे त्यावर डल्ला मारायच्या बेतात असलो तर - ‘वडाचा उपास आहे नं...’ - असं काही तरी आजीलाच कळेल अशा आवाजात काहीतरी पुटपुटत. तेवढ्यानेही आजीला आकाश ठेंगणे होई आणि ती उदार मनाने ते पेरु आम्हाला वाटून टाके. पण आजी आणि आजोबा दिवसभर आनंदात...काहीबाही गुणगुणत असत.

आमच्या लहानपणी बायका तीन दिवस वटसावित्रीचे व्रत करत म्हणजे उपास करत. तिस-या दिवशी मुंज झालेल्या वडाचीच पूजा करत. असे वड बहुधा गावाबाहेर असत. ठेवणीतल्या साड्या आणि दागिने घालून आणि उपासामुळे ‘तेजस्वी’ दिसत असलेल्या बायका एकमेकींना वाण देत. ते तीन्ही दिवस त्यांचे नवरे त्यांच्याशी विलक्षण प्रेमाने वागताना मी पाहिलेत. माझे काकाकाकू एकमेकांशी क्षुल्लक कारणाने सतत भांडत असत. पण या तीन दिवसात त्यांचे भांडणारे घर हसरे आणि ओलसर बने. काही कारणाने त्यावेळी काकू आजारी असेल किंवा तिच्यावर शाळेच्या कामाचा अधिक भार पडला म्हणून ती वटसावित्रीचा उपास करू शकणार नाही असे वाटले तरी काका कावरेबावरे होत. पण काकूने निग्रहाने, ‘काही झाले तरी ती उपास करणारच आहे’ , असे सांगितले की काकांचा जीव भांड्यात पडत असे. आमच्या नात्यागोत्यात तसे 'चांगले पुरुष' बरेच होते...ते घरातल्या मोठ्यांच्या आणि चावट पोरांच्या नकळत ते या दिवसात बायकोच्या कामात जमेल तसे हातभार लावायचा प्रयत्न करत.या दिवसात त्या सर्व पुरुषांना आपली बायको अप्सरेपेक्षा काकणभर अधिकच सुंदर आहे याचा साक्षात्कार होत असणार..शिवाय तिच्यात असलेले नसलेले गुणही दिसत असणार याबद्दल मला काहीच शंका नाही!

पण असे असले तरी वटसावित्रीचा सण आला की सगळ्या सोशल मिडियावर त्या व्रताच्या टवाळक्यांना ऊत येतो. अंधश्रध्दा निर्मूलनवाले, पुरोगामी आणि पर्यावरणवादी (वडाच्या फांद्या तोडून पूजा करण्यामुळे) अशा सर्वानाच यावर हिरीरीने आणि पोटतिडकीने मते मांडायची असतात. कारण एकतर स्त्रीवादी मताच्या लोकांना सावित्रीची एकंदर कथा आणि हे व्रत म्हणजे पुरुषप्रधानतेचे अगदी ठळक उदाहरण वाटते आणि दुसरे म्हणजे त्यामध्ये नंतर कधी तरी जोडलेले ते सात जन्मी हाच नवरा मिळू दे यासाठी हे व्रत करायचा आहे ही बकवास समजूत आणि अर्थातच त्यामुळे निर्माण होतात विनोद...

केवळ चिकाटीने, धैर्याने आणि योग्य दिशेने प्रयत्न केल्यास अशक्य ते साध्य होऊ शकते, या दृष्टिकोनातून सावित्रीच्या कथेकडे पाहिल्यास त्या व्रताची खिल्ली उडवावी असे वाटणार नाही. मग हे व्रत केवळ स्त्रियांनी का करायचे, याचे साधं उत्तर असे आहे की आपल्या संस्कृतीतील स्त्रियांचे दुय्यम स्थान पहाता स्त्रियांना स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी अधिक झगडावे लागते. उपासामुळे निश्चय / ठामपणा या गुणात वाढ होते हे तर सर्वश्रुत आहे. आता राहिले पर्यावरण.. आपण या दिवसात नवे कोंब यावेत म्हणून झाडांची छाटणी करतोच मग वडाच्या छोट्या फांद्या काढल्या म्हणून काय बिघडले? निदान शहरात रहाणा-यांना त्या झाडाची ओळख तरी होते.

strangler fig
खरे तर या निमित्ताने पावसात सैर व्हावी, उपयुक्त असलेल्या वनस्पतींची माहिती घ्यावी हा गावाबाहेर जाऊन वडाची पूजा करण्याचा हेतू असणार..वडाचे औषधी उपयोग तर आहेतच पण दुष्काळात वडाची कोवळी पाने, फळे खाल्ली तर तहान आणि भूक दोन्हीही भागते. वडासारख्या पारंब्या असलेल्या आणि बहुगुणी झाडाची जपणूक करण्यासाठीच्या अशा प्रकारच्या प्रथा जगाच्या कानाकोपर्‍यातल्या सर्व जून्या संस्कृतीत अजूनही आवर्जून पाळल्या जातात. काळाप्रमाणे त्यात काही बदल होतात इतकेच. 
उदाहरणार्थ पूर्व अफ्रिकेतल्या अनेक देशात या वड जातीतल्या झाडाची पूजा केली जाते. त्यावर भुतांची वस्ती असल्याची वदंता असल्याने त्या झाडाला आपोआपच सरंक्षण आहे. पण या झाडाची साल उगाळून दिली तर कितीही अवघड प्रसुती सुलभ होते. पारंब्यांचा रस रक्तशुध्दीसाठी वापरला जातो. हे झाले मुख्य उपयोग पण इतरही बरेच उपयोग आहेत. झाडाची साल काढण्याच्या अगोदर त्या गरोदर बाईचा नवरा, सासरा, दिर वगैरे मंडळी झाडाभोवती पाण्याचे रिंगण करतात. त्यावर फूले ठेवतात आणि त्यापुढे नैवेद्य ठेवून गाणी गातात. प्रसुती झाल्यावर नवजात बाळाला त्या झाडापुढे ठेवले जाते, त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. मग बाळाचे आई आणि बाबा मिळून त्या झाडाची जिथून साल काढली असेल तिथे त्याच झाडाचा चीक लावून त्यावर एक लांब कापड बांधून मलमपट्टी करतात. त्यावेळी ते झाड त्या नवरा बायको आणि मुले यांना आशीर्वाद देते असे मानले जाते.
आफ्रिकेमधली strangler fig ची पूजा काय किंवा वटसावित्री ही प्रथा काय या सर्व प्रथा झाडाचे संवर्धन, मनुष्याचे निसर्गाशी नाते आणि कौटुंबिक नातेसंबंध जपणे यासाठी कृतज्ञता हे मूल्य जोपासावे यासाठीच असतात.
कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी त्याग करते आहे...ही भावनाच मनाला मोठे करणारी असते. आपल्या नात्यांचे महत्व आणि ते कसे जपावे यासाठी अशा प्रथांचा मोठा उपयोग असतो. नवरा बायकोचे नाते हे खरे तर कृत्रिम असते. त्यात भावनिकतेचा ओलावा निर्माण करायला अशा प्रथा खरोखरच मदत करतात. कारण दसरा, पाडव्यासारखे यात काही देणेघेणे नसले तरी नव-याला कृतकृत्य वाटून निदान त्या जन्मापुरते तरी त्याने बायकोच्या ऋणात राहणे...हे घडते. अगदी आमच्या घराजवळच्या झोपडपट्टीमधले दारू पिऊन बायकोला मारणारे नवरे सुध्दा या दिवशी त्यांच्या बायकोने वटसावित्रीचा उपास केला असला तर..त्या दिवशी पोरांच्या अंगावर डाफरून..." मम्मीला तरास देऊ नगासा, न्हाय तर हाणतो एकेकाला"...असं बजावत असतात.

पण याचा अर्थ एखाद्या बाईची इच्छा नसताना केवळ प्रथा आहे म्हणून तिच्यावर व्रताची जबरदस्ती करणे असा मात्र अजिबात नाही. पण एखादीला मनापासून नव-याप्रती कृतज्ञता वाटत असेल तर ही एक गोड प्रथा आहे. सावित्री ही स्त्री होती म्हणून स्त्रियाच ही प्रथा पाळतात पण एखाद्या पुरुषालाही त्याच्या बायकोसाठी, तिच्या भल्यासाठी आणि कुटुंबासाठी असे व्रत करावेसे वाटले तर त्याचेही आपण स्वागतच करायला हवे. करवाचौथच्या वेळी अनेक नव-यांनीही उपास केल्याचे आपण टीव्ही वर पहातोच की...अन्यायकारक नसलेल्या प्रथा अगदी जशाच्या तशा नाही तरी काळाप्रमाणे हवे तर बदल करून पाळायला काय हरकत आहे? म्हणून नात्यातला गोडवा जपणा-या या व्रताची चेष्टा करण्यापेक्षा आपल्या संस्कृतीचा भाग म्हणून त्याचा अभिमानच वाटायला हवा.

मंजूषा देशपांडे

कल, आज और कल .. .

आम्ही चार भाऊ. त्यातला मी तिसरा. त्यामुळे माझ्यात आणि वडिलांमध्ये पस्तीस वर्षाचं अंतर होतं. माझे वडील सरकारी नोकर होते. तीस बत्तीस वर्ष त्यांनी मंत्रालयात नोकरी केली. आई सांगते की ते फक्त शाळेच्या पहिल्या दिवशी मला शाळेत सोडायला आले होते. त्यानंतर ते कधीही शाळेत आले नाहीत. पण मला रविवारी मात्र ते फिरायला घेऊन जात. त्यांचं बोट धरून मी फिरत असे. मासे बाजारात मला आवर्जून घेऊन जायचे. त्यावेळी घरी कोंबडी आणून कापायची प्रथा होती. स्वतः कोंबडी कापायचे आणि मला पण त्यात सामील करून घ्यायचे. दिवाळीच्या सुट्टीत एक दिवस तरी मंत्रालय म्हणजे त्यावेळच्या सचिवालयात घेऊन जायचे. त्यावेळी मंत्रालयात  आता सारखी strict entry नव्हती.

बाबांच्या कामाच्या ठिकाणी जायला मला खूप आवडायचे. कारण तिथे खूप मुली असायच्या. त्या वयाने मोठया - पंचविशीतल्या आणि मी दहा बारा वर्षाचा. त्यामुळे गोळ्या, बिस्कीटं असा खाऊ त्या द्यायच्या. वडिलांना मेंडिकोट खेळायला खूप आवडायचं आणि कॅरम खेळायला पण. त्यामुळे आमच्या त्या चाळीतल्या घरात शनिवारी रात्री पत्त्याचा डाव तरी जमत असे किंवा कॅरमचा. त्यांना चाळीतील मुलांना जमवून गप्पा मारायला खूप आवडायचं. गप्पांचा विषय राजकारण ते खेळ काहीही असे! मला चवथीत असताना चांगले मार्क्स मिळाले म्हणून त्यांनी Metro टॉकीज जवळ च्या sports gear च्या दुकानातून क्रिकेट बॅट घेऊन दिली. त्यावेळी तशा बॅटने test player खेळत असत! सातवीत middle school scholarship मिळाली म्हणून चॅम्पियन कॅरम बोर्ड घेऊन दिला. मी अकरावीत असताना ते आम्हाला एका सहलीला घेऊन गेले. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र त्यांनी दाखवला. नोकरीत त्यांना कधीही लाच खाण्याचा प्रसंग आला नाही. कारण ते जे टेबल सांभाळायचे तिथे लाच मिळण्याचा प्रश्नच नव्हता. पण सरते शेवटीं रिटायरमेंटला आल्यावर त्यांची बदली Rural Development Department ला झाली. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने गावोगावी विहिरी खणून देण्याची scheme आणली होती. त्याच contract वाटप बाबांकडे होत. एक गुजराथी कॉन्ट्रॅक्टर बाबांना लाच देऊन कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचा प्रयत्न करत होता. बाबांनी मला विचारलं काय कराव? मी त्यांना सांगितलं आत्तापर्यन्त तुमच्या पगारात आम्ही चार भाऊ आणि आई मजेत जगलो. तेव्हा असा कलंक तीस वर्षाच्या प्रामाणिक नोकरीला लाऊन घेऊ नका. हे ऐकून त्यांना समाधान वाटल! मी Architect झाल्या वर त्यानी मला Yamaha Rx  मोटरसायकल घेऊन दिली. त्यावर पुण्यात हुंदडून खूप हीरोगिरी केली. रिटायर झाल्यावर मात्र त्यांनी बराच काळ गावी म्हणजे देवरुखला काढला. तिथे असतानाही ते बऱ्याच वेळा मला मदतीला बोलावत असत. मोटरसायकलवर गावाला जायला खूप मजा यायची. नंतर मीच त्यांना माझ्या गाडीने संपूर्ण कोकण फिरवून दाखवला. तसे ते strict होते, पण उभ्या आयुष्यात त्यांनी कधीही माझ्या वर हात उगारला नाही. मात्र माझ्याकडून तरखडकर grammar करून घेताना चुका झाल्या तर थोडा मार बसायचा. वय वर्ष ० ते वय वर्ष १८ पर्यन्त दरवर्षी गावाला घेऊन जायचे. त्यानी शेवटी २००९ मध्ये इहलोकाची यात्रा संपवली. आणि मी माझा एक जुनाजाणता मित्र हरवून बसलो!
माझ्यात आणि माझ्या बाबांमध्ये पस्तीस वर्षाचं अंतर होतं, तसच माझ्यात आणि प्रथम मध्येही आहे. प्रथमचा जन्म लग्नानंतर पाच वर्षांनी झाला. एकदा रत्नागिरीला मावशीकडे गेलो होतो. गणपती पुळे जवळच; म्हणून तिकडेही गेलो. मावशीच्या घरी प्रसादाचा नारळ आणुन फोडला पण तो नासका निघाला. संगिता घाबरली, पण मावशी म्हणाली ‘अग नारळ नासका निघाला म्हणजे आता तुला बाळ होणार’ तिचे शब्द खरे ठरले  आणि 'प्रथम' जन्मला आला. खरंतर, दुसऱ्या बाळाचा अजिबात विचार नव्हता पण २००० साली आमचा millennium boy शतम् जन्माला आला.
मी माझ्या बाबांना ‘अहो बाबा’ अशी हाक मारायचो कारण माझी आई बाबांना अहोजाहो करायची. पण संगिता मला एकेरीत संबोधते म्हणून मुल ही "ए बाबा !" अशी हाक मारायला लागली. ती त्यांच्या आईला मम्मी म्हणतात पणं मला मात्र बाबा अशीच हाक मारतात. हे अगदी सहजपणाने झालं . मला पण त्या एकेरी हाकेची खूप मजा वाटायची. त्यामुळे एक झालं की मुलांबरोबर मित्रत्वाचं नातं होत गेलं.
माझ्या बाबांप्रमाणेच मी पण त्यांचं शाळेत admission घेण्या पलीकडे ती दहावी होईपर्यन्त अभ्यास ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष केलं. संगीताला जमेल तसा तीच त्यांचा अभ्यास घेत होती. अभ्यासात दोघांची प्रगती यथातथाच होती. पण धाकटा मात्र football champion होता. पण दहावी नंतर त्याचा खेळ सुटला.
प्रथमने नववीत असतानाच मला आर्किटेक्टच व्हायचं आहे अस सांगून टाकलं होतं . स्वतःची aptitude दाखवायला त्यानें google Sketch up वर मला आमच्या फ्लॅटचं स्केच करून दाखवलं. त्यामुळे निर्णय पक्का झाला. त्याने architecture ला admission घेतल्यावर तर तो माझा पक्का मित्रच झाला. कॉलेज नाशिकला असल्यामुळे रोज भेट व्हायची नाही. पण महिन्या दोनमहिन्यातून मी नाशिकला चक्कर मारत असे. सुट्टी असली की तो घरी येत असे. मी तिकडे गेल्यावर बऱ्याचदा मी त्याच्या room mates ना पार्टी देत असे. पण त्याच्या assignments च्या डिझाईन  मध्ये मी लुडबूड केलेली किंवा कॉमेंट केलेल्या त्याला खपत नसे. त्यावरुन आमची भांडण व्हायची. तशी अजूनही होतात, पण तेवढ्या पुरतीच. कारण दोघेही आता एकमेकांवर अवलंबून आहोत.
शतमचं जरा वेगळंच होतं! तो दुसरी- तिसरीत असताना त्याने एक चित्र काढलं; ते बघून संगिता त्याला हसली. त्याचा त्याला इतका राग आला की त्याने चित्रं काढायचंच थांबवलं. अचानक बारावी झाल्यावर त्याने मी animation करणार असं जाहीर केलं! माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. ज्या मुलाने गेली दहा बारा वर्ष चित्रं काढायला pencil हातात धरली नाही तो animaton कसं करणार? पहिल्या प्रयत्नात त्याला admission ही मिळाली नाही. एक वर्ष फुकट गेलं पण पठ्ठ्याने दुसऱ्या attempt ला admission मिळवली. आता तोच मला चित्रं काढायला शिकवतो. त्याचा स्वभाव थोडा चिडखोर आहे, त्यामुळे मला लहापणापासूनच त्याला चिडवायला खूप मजा वाटते. आठवड्यातून एखाद दुसरे भांडण ठरलेले आणि मग संगिता मध्यस्थी करते. पण त्याचंही बाबावर खूप प्रेम आहे. अर्थात सध्या च्या चालीरीती नुसार – ‘आपला बाबा मागासलेला आहे. त्याला computer, मोबाईल नीट वापरता येत नाही’ - हा दोघांचा समज पक्का आहे. आणि शतमसाठी प्रथम सांगेल तेच खरं आणि बाबा सांगेल ते चूक हा प्रकार असतो!
माझ्या बाबांबरोबरची मैत्री पन्नास वर्ष टिकली आणि त्यामुळे खूप मुरली होती . मुलांबरोबरच्या friendship ने अजून पंचविशीही गाठलेली नाही. त्यातून अजून त्यांच्याही आयुष्यात बरीच स्थित्यंतर यायची आहेत. बघू भविष्यात काय घडतं ते!

राजन माने 

बाप का बाप होना जरुरी है क्या?

दुपारच्या वेळी मी काहीतरी लिहित बसलो होतो. आणि माझा मुलगा अबीर माझ्याकडे आला. “आज असं झालं... मग मी असं magic केलं. तर तो उडून गेला...” हे असलं काहीतरी भव्यदिव्य सांगत होता आणि मी एक महत्वाचा मेल वाचण्यात अडकलो होतो. मला त्याचं फार लक्ष देऊन ऐकता येत नव्हतं. तरी मी जमेल तेवढ्या शक्तीनं ‘हो का?’ वगैरे अभिनय करत होतो. अबीरच्या लक्षात आलं की बाबाचं आपल्याकडे काही लक्ष नाहीये. “असं काय हे? मी सांगतोय ना तुला... खरंच magic झालं...” हे सगळं त्याच्या मनात येत असणार. पण मला त्याच्याकडे बघता येत नव्हतं. माझी concept एका channel ला आवडली होती आणि त्याच्याबद्दल तो मेल होता. 
अबीर खट्टू झालाय हे माझ्या लक्षात आलं आणि मी त्याला सांगत होतो. “अबीर, मला कळतंय की मी तुझं नीट ऐकलं नाहीये. पण खूप महत्वाचं काम करतोय पाच मिनिट दे. मग तुझं सगळं ऐकतो. चालेल?” 
“मग क्रिकेटची एक match पण खेळायला लागेल.” - मला हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. मी हो... म्हटलं. 
तो धावत जाऊन बॉल घेऊन आला आणि तीन सेकंदात परत तिथेच उभा. अजून चार मिनिट ५७ सेकंद जायचे होते. मी काही आता मेल करू शकणार नाही असं मला वाटायला लागलं आणि मागून माझ्या बाबांचा म्हणजे अबीरच्या आजोबांचा आवाज आला. “मी खेळतो तुझ्याबरोबर... पण मला क्रिकेट खेळता येत नाही. काय खेळूया?” “उनो खेळूया? ओके चला मी तुम्हाला शिकवतो” अबीर लगेच टण टण उड्या मारत गेला. युद्ध टळलं होतं. मी हुश्श केलं.
मेल करून झाला आणि बाजूला पाहिलं, अबीर आजोबांना (म्हणजे माझ्या बाबांना) ‘उनो’ हा खेळ शिकवत होता. आणि ते पण शांतपणे शिकून घेत होते. आयुष्यात पत्ते ह्या गोष्टीचा तिटकारा असलेला हा माणूस स्वतःच्या नातवाकडून पत्त्यांचा एक खेळ शांतपणे शिकून घेतोय. माझ्याशी खेळले होते का कधी पत्ते? मी आठवू लागलो आणि “कधीच नाही...” हे उत्तर आलं. क्रिकेट, फुटबॉल, लगोरी, विटीदांडू, गोट्या, लपंडाव यांपैकी काहीच नाही. मी काही काळ gymnastics ला जायचो. त्यांनीच आग्रह धरला होता. Badminton, चेस, कॅरम हे सगळं आणलं, शिकवलं त्यांनीच. पण मोकळा वेळ काढून आम्ही खेळतो आहोत असं कधी फार घडलं नाही. आम्ही खूप खूप खेळलो तो खेळ म्हणजे नाटकाचा. तो त्यांनीच शिकवला. नाटक म्हणजे हे, नाटक म्हणजे ते! नाटकाच्या समुद्रात त्यांनी मला उभं-आडवं पोहायला शिकवलं. आणि आता ते बसून ‘उनो’ शिकत आहेत.
अबीरच्या ह्या डिमांडकडे त्यांनी तसे एरव्ही कदाचित दुर्लक्ष केले असते. पण आताची सिच्युएशन थोडी वेगळी आहे. अबीरची आई शुटींगच्या निमित्ताने गेले फिफ्टी डेज सिल्व्हासामध्ये आहे. त्याला चुकुनही आईची कमतरता भासू नये ह्यासाठी आमची सगळ्यांची धावपळ सुरु असते.
सकाळी तो उठला की बराच वेळ त्याच्यासोबत लोळत बसतो. “काय लोळतोय गर्दभासारखा...!” असं आजोबा म्हणाले तरी ते बाबाला पण लागू होतं. मग आम्ही खळखळून हसतो. गर्दभ असण्याची जबाबदारी शेअर होते. गिल्ट म्हणून नाही. मी त्याला गेल्या वर्षीपासून हात धुवायला शिकवले आहे. आता ह्या वर्षी हात – पाय स्वच्छ कसे करायचे हे शिकवलं आहे. सध्या आंघोळीचे क्लासेस सुरु आहेत. आंघोळ करताना साबण कसा लावायचा? किती लावायचा हे क्लासेस offline सुरु आहेत. त्यातही पाणी कसं कमी वापरायचं हा कोर्स आजोबा घेतात. तो अभ्यासक्रम पण तसा कठीणच आहे. मग मी पण त्याच्यासोबत आंघोळीला बसतो. साबण माझ्यापण हातून सटकतो. दोघे एकमेकांना साबण लावतो, एकमेकांना पाणी घालतो. आणि शेवटी बादलीत उरलेलं पाणी डोक्यावरून घेताना दोघे वर बादलीकडे पाहतो आणि धबधब्यात न्हाऊन निघतो. कंटाळा आला तरी “चल आपण दोघे मज्जा मज्जा करू...” म्हटलं की तो आंघोळीला एका पायावर तयार होतो. शरीर स्वच्छ कसं करायचं? हे त्याला मी शिकवलं आहे. ते क्रेडीट माझं. कॉलर टाईट करण्यात मला काहीच गैर वाटणार नाही.
मी त्याच्यासोबत क्रिकेट – टेनिस खेळतो तेव्हा पूर्णपणे मनापासून खेळतो. काही वेळा बरेच जण फक्त batting करतात, मुलांनाच बॉल आणायला पळवतात. एकाच जागेवर उभे राहून खेळतात. झोपल्या झोपल्या बॉलिंग करतात, मी मात्र तसं करत नाही. मी पण त्याच्या इतकाच धावतो, कदाचित थोडा जास्तच. खेळताना धावावंच लागतं. त्याचा कंटाळा करून चालत नाही हे कळावं असा माझा उद्देश असतो. मी एक्साईट पण होतो. Match हरलो तर नाराज पण होतो. पण चिडत नाही. तो चिडला तर मला सांगता येतं... मी चिडलो होतो का? नाही ना? मग तो पण हार सोडून पुढची match अजून त्वेषाने खेळतो. खरेतर मी स्पोर्ट्स वगैरे खेळणारा असा धावगडी असा कधी नव्हतो, पण आता मी स्वतःला तसं थोडं बनवलं आहे. केवळ त्याच्यासाठी. आपले बाबा आपल्यासोबत फार खेळले नाहीत, ह्याचे तरी खेळू देत.
मी एकदा माझ्या आजीला विचारलं होतं, “बाबा लहान असताना कधी खेळलेच नाहीत का गं?” तर ती म्हणाली होती. “कुठे वेळ होता त्याला? हा मधला पडायचा. मोठे भाऊ शिक्षण सोडून नोकऱ्या करत होते. बाकीचे लहान. हा मला मदत करायचा. स्वयंपाक – घरकाम. मी भात शिजायला ठेवायचे. हा रस्त्यावर सापडलेले कुठले कुठले कागद आणायचा आणि चुलीजवळ वाचत बसायचा. वाचनाचा आणि स्वयंपाकाचा नाद त्याला. खेळणार कधी?” बाबा कच्चा लिंबू असणार असं म्हणत मी बाबांसोबत नकोच खेळायला म्हणत हा विषय तेव्हा सोडूनच द्यायचो.
अबीरच्या आईने त्याला टीव्ही टाईमची सवय करून दिली आहे, दुपारी ४ ते ५.३०. इतर वेळी फार हट्ट करत नाही. पण ही वेळ मात्र तो काय वाट्टेल ते झालं तरी सोडत नाही. ही आपली हक्काची वेळ आहे, हे त्याला पक्के ठाऊक आहे. आणि त्यावेळेला घरात टीव्ही सोडून बाकी कशाचाच आवाज करायचा नाही, हे आम्ही कटाक्षाने पाळतो. रात्री झोपताना फार मजा येते. बराच वेळ इकडून तिकडे करायचे. आजीच्या कुशीत थोडावेळ, मग माझ्या छाताडावर थोडावेळ, मग डोक्यावर पांघरून घेऊन “चल बाबा... चिकटून चिकटून झोपूया...” अशी मस्ती होते. झोपायच्या आधी आज त्यानं काय काय मजा केली हे मलाच त्याला सांगावं लागतं. मग त्याला आठवतं. नाहीतर लक्षात सगळं असलं तरी आठवायला कुणाला वेळ आहे? आजचा दिवस एकुणात भरपूर खेळण्यात – आनंदात गेला आहे. हे फिलिंग आलं तर तो गप्प झोपतो. तसं फिलिंग आलं नाही तर मात्र झोप लांबते.
अबीर तान्हा असल्यापासूनच कमी झोपतो. तान्हं बाळ बावीस तास झोपतं वगैरे त्यानं झूट ठरवलं आहे. एक दिवसाचा असताना पण तो १०-१२ तासच झोपायचा. कसलीतरी anxiety आहे म्हणून त्याला स्वतःचे ओठ दातात घट्ट धरून आणि बाजूला झोपणाऱ्याचा कान घट्ट पकडून झोपायची सवय आहे. कधी कधी आपल्या कानाचा चिवडा होतो. पण तो कान सोडत नाही. पण तोवर तो अर्धवट झोपेत असतो. मी त्याला कळवळून सांगतो. “अबीर, माझा कान खूप दुखतोय रे... कान सोडतोस माझा?” तेव्हा त्या अर्धोन्मीलित डोळ्यांनी तो आपल्याकडे पाहतो. आपल्या गळ्यात हात टाकून आपल्याला घट्ट जवळ ओढतो आणि माझ्या दंडावर डोकं ठेवून झोपून जातो. झोपला की आठ दहा तास चिंता नाही. तो झोपलाय ह्याची खात्री झाली की मी माझा दंड सोडवून घेतो आणि जाऊन कामाला बसतो.
हे सगळं झाल्यावर ‘आईची ऊब’ वगैरे कविकल्पना आहेत की काय? असं मला वाटतं. मला झोपायला आईच असेल आणि बाबा हा ऑप्शनच नसेल तर मी ‘आईची ऊब’ बद्दलच कविता करणार. ‘बापाचा बलदंड दंड’ ह्यावर ओळी खरडायला कोण रिकामं बसलंय? मला आठवतं, मी लहान असताना बाबांजवळ झोपायचो कधीतरी. बाबा दर शनिवारी रात्री घरी यायचे. तेव्हा ते औरंगाबाद – जालना प्रवास करून आलेले असायचे. आम्ही झोपेला आलेलो असायचो ते पटकन आमच्या जवळ आडवे व्हायचे. त्याच्या घामाचा मंद सुवास मला अजूनही सहज आठवून जातो कधीतरी. पण तो फक्त शनिवारी. रविवारी रात्री ते पुन्हा औरंगाबादला जायचे. मी पुन्हा आईची ऊब घेतच झोपायचो.
परवा एक किस्सा घडला. मी एका खूप महत्वाच्या कॉलमध्ये होतो. काहीतरी लिहून अर्जंट पाठवायचे होते. मी ते लिहित होतो. एक वाक्य सुचेना, शिवाय त्या पात्राला एक बिझिनेस द्यायचा होता. तो सापडेना. आणि अबीर मला काहीतरी सांगायला आला. त्याला सांगायचं होतं आणि मला काही लक्ष देता येईना. मी पाच मिनिटांनी ऐकतो असं सांगितलं तरी तो ऐकेना. आपल्या आयुष्यात काहीतरी फार महत्वाचं घडलेलं असताना आपल्याला इग्नोर केलं जातंय ह्याचा त्याला त्रास होऊ लागला. त्याने चिडचिड करायला सुरुवात केली. आजोबा आले, ते काहीतरी समजावू लागले, आजी आली तिनं सांगितलं पण तो ऐकत नव्हता. माझी पण चिडचिड होऊ लागली. मला परत परत फोन येत होते. एका मिनिटात कॉन्फरन्स कॉल करूया असा मेसेज आला. आता जर आपण हा कॉल अटेंड नाहीच केला तर? नाही नको... हे काम हातचं जाणार. असा माज दाखवणं बरं नाही. काय म्हणतील ते सगळे? माझ्याबद्दल काय मत होईल? मी असा नाहीये. पण वाटलं त्यांना की आहे असाच तर काय फरक पडणार आहे? पण मला नाही जमणार असं बोलायला. की मी असाच माजखोर आहे? तुसडा आहे? नाही नसेल. म्हणजे माहित नाही. हे सगळं चालू आहे आणि अबीरचं कुठे ऐकू आता? माझ्या कानात गुइं... वाजायला लागलं. पाठीत दुखायला लागलं. आता गोष्टी माझ्याही कंट्रोलच्या बाहेर होत्या तसा मी पण संतापलो. माझा स्वर तिखट होऊ लागला. (असं बऱ्याचवेळा घडतं आणि तेव्हा बाबापणाची मोठी परीक्षा येते, मी mostly नापास झालोय, हे कबूल करतो. त्यावेळी त्याची आईच कामी येते. तिला हे सगळं manage करता येतं.) शेवटी मी “नंतर ऐकतो ना रे...! बरं सांग काय झालं ते?” असं म्हणालो. त्याने पण एका वाक्यात काहीतरी सांगून टाकले. त्याचा पण मूड गेला होता. मला वाईट वाटायला लागायच्या आत फोन वाजला. कॉन्फरन्स कॉल आला होता. मी बोलू लागलो. अबीर त्याच्या कारशी खेळताना मला दिसत होता.
रात्र झाली. गाद्या घातल्या, झोपायची तयारी सुरु होती. आणि पाऊस आला. मी खिडक्या लावायला धावलो. एक खिडकी बंद होऊनही त्यातून पाणी येऊ लागलं. बाबा धावत आले. त्यांनी काहीतरी आयडीया काढून ते पाणी बंद केलं. “आपण तेव्हाच ही खिडकी बदलून टाकायला हवी होती...” मी कुरकुरलो. बाबा हसत पण थोड्या निराशेच्या सुरात म्हणाले... “हो... तेव्हा सगळ्याच खिडक्या बदलायला हव्या होत्या खरं तर. पण बजेट वाढलं असतं. तुझं – ताईचं लग्न पण होणार होतं, म्हटलं आता कुठं खर्च वाढवणार? पुढे कधी तरी बदल करू घरात तेव्हा बघू... पण ती वेळ काही आलीच नाही. आता काही नाही, ही अशी... बंद केली की नाही येत पाणी...” ते गेले.
मी जाऊन आडवा झालो. सकाळचं अबीरचं आणि आताचं बाबांचं माझ्या डोक्यात फिरत होतं. माझ्या लग्नाचं असं काय टेन्शन असणार होतं? का त्यांनी टेन्शन घेतलं असेल? लग्नाची हौस मौज करणारे तर आपण नव्हतोच. पण तरी ह्याला बोलाव त्याला बोलाव असं त्यांनीच ठरवलं. त्यांच्यासाठी ते करणं गरजेचं असेल. महत्वाचं असेल. आणि केलं नसतं तर लोकांना काय वाटेल? ह्याचं ओझं जास्त असणार. श्या! ते असायला नको होतं. आणि नसतंच तर?? काय झालं असतं? बाबांनी मला गोष्टी सांगितल्या असत्या, गाणी म्हटली असती, नाचले असते आणि मुख्य म्हणजे खेळले असते. मला एकदम गुदगुल्याच झाल्या. मी हसलो. आणि अबीरचा आवाज आला. “बाबा, फ्री फायर खेळायचं का?” ‘फ्री फायर’ म्हणजे ‘भारर्री व्हिडीओ गेम’ आहे. बंदूक घेऊन दोन सैनिक शत्रूच्या छावणीत घुसतात आणि लोकांना मारत सुटतात. मग आम्ही लपत छपत, गुडघ्यांवर चालत, सरपटत, रांगत घरभर फिरतो. तेल – पावडरीचे डबे उडवतो. आजीचे डोळ्यांचे drops उडवले की आम्हाला ‘वन मिलियन डॉलर’ मिळतात. मग आम्ही एकमेकांचा कान धरून झोपून जातो.
आता मला काही काम नव्हतं, जबाबदारी नव्हती. मग मी कितीही खेळू शकतो. 
अबीर झोपेला आला होता. थोपटलं. झोपला. 
मी उठून पलीकडे झोपलेल्या बाबांकडे पाहिलं. ते झोपले होते. झोपले तरी त्यांच्या कपाळावरच्या आठ्या मिटत नाहीत. त्यांना आताही काहीतरी काम आहे, जबाबदारी आहे.
“बाप का बाप होना जरुरी है क्या?” असा प्रश्न विचारत मी कपाळावर आठ्या घेऊन झोपून गेलो.


शार्दुल सराफ
नाट्य दिग्दर्शक, लेखक,अभिनेता

 

आणखी किती दीपाली ...?


बलात्कार, विनयभंग, कामाच्या ठिकाणी शारीरिक आणि लैंगिक शोषण हे विषय आता स्त्रियांसाठी नवीन राहिले नाहीत, इतका जरडपणा या विषयात आता आला आहे. मथुरा बलात्कार प्रकरणात अशा घटनेसाठी मोर्चे काढायला सुरुवात झाली. त्यावेळी विदर्भात सीमा साखरेंसोबत आम्ही साऱ्या महिला संघटनांनी रान उठवले होते. अनेक वर्षांनंतर निर्भया प्रकरणानंतर पुन्हा अख्खा देश पेटून उठला होता. त्यात ज्या प्रमाणात तरुण मुलांपासून तमाम समाज सहभागी झाला, तो उद्रेक बघून, ती जागरूकता बघून मनात कुठेतरी आशेची पालवी जागी झाली होती. पण निर्भयाची राख थंड होण्याअगोदरच शक्ती मिल प्रकरण घडलेच आणि लैंगिक शोषणाच्या तर लाखो केसेस घडताहेत!
सध्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्रप्रकल्पात काम करणारी वनक्षेत्रपाल (आरएफओ) दीपाली चव्हाण हिचे प्रकरण तिच्या आत्महत्येमुळे आणि तत्पूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमुळे गाजत आहे. दीपालीने २५ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता हरिसालच्या तिच्या राहत्या शासकीय घरात स्वतःच्या छातीवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना झाल्याझाल्या मी स्वतः हरिसालला जाऊन आले. दीपाली चव्हाणच्या सहकाऱ्यांना भेटले. तिच्या सासरी जाऊन तिच्या पतीला आणि सासरच्या सर्व मंडळींना भेटले. तिच्या आजुबाजूला वावरणाऱ्या अनेकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्यासोबत चर्चा केली आणि हे प्रकरण नेमके काय आहे, हे शोधून काढण्याचा प्रयत्न केला.
साताऱ्याहून आलेल्या दिपालीने हौस म्हणून वनखाते स्वीकारले नव्हते. गरीब कुटुंबातून आलेल्या या मुलीने कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन यूपीएससी पास करून ती वनखात्यात आली. जिथे आजपर्यंत फक्त पुरुषांचीच मक्तेदारी होती, अशा ठिकाणी दिपालीने कामात स्वतःला झोकून दिले होते. जंगलातील कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी ती सक्षम होती. पण तिचा वरिष्ठ शिवकुमारने तिला अक्षरशः वेडे करून सोडले होते. तीन गावांचे पुनर्वसन केल्यावर हजार कुटुंबियांना मिळणारी रक्कम त्यांच्या स्वाधीन करण्यासाठी सर्वांचे बँकखाते काढून देणे, शासनाकडून आलेला निधी प्रत्येकाच्या खात्यात टाकण्याचे काम स्वतः दीपालीला करावे लागले, कारण त्याच वेळी संबंधित कारकुनाची बदली शिवकुमारने केली होती. ते जोखमीचे काम करत असताना शिवकुमार ‘दहा मिनिटात संकुलावर ये’ असे फर्मान काढायचा आणि ती नाही पोचली की वाट्टेल तशा शिव्या देत असे. तिला रात्री २ वाजताही बोलवायचा! जंगलची ड्युटी २४ तासांची असते, त्यामुळे तिला जाण्यावाचून पर्याय नसायचा. स्वतः रोज तिच्या कार्यालयात येऊन तिच्या खुर्चीवर बसायचा आणि तिला स्वतःसमोर उभा करायचा. त्याच्या गाडीचा हॉर्न जरी वाजला तरी दिपालीचेच नव्हे तर तिच्या सहकाऱ्यांचेही बीपी २०० च्या वर जात असे. तिच्या सहनशक्तीचा अंत झाल्यावर तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यापूर्वी तिने मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीना, आपल्या पतीला आणि आपल्या आईला पत्रं लिहिली आहेत. त्याआधी तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्रासाबद्दल तक्रार केली होती. एक वर्षांपूर्वी त्या अमरावतीच्या खासदार श्रीमती नवनीत राणा आणि अमरावती पालकमंत्री तसेच महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांच्याशीही बोलली होती. शिवकुमार तिला का त्रास देत होता? दीपाली प्रेग्नन्ट असताना तिला दगडधोंड्याच्या कच्च्या रस्त्यावरून ६-७ किलोमीटर का चालायला लावले? तिचे ऍबॉर्शन झाल्यावर तिला का पायपीट करायला लावली? दिपालीसारख्या सामान्य कर्मचाऱ्याचा इतका राग राग करण्याचे शिवकुमारला कारण काय? तक्रार करूनही रेड्डींनी शिवकुमारला पाठीशी का घातले? बाकी कर्मचारी वेळीच दिपालीच्या पाठीशी का उभे राहू शकले नाहीत? नवनीत राणाबाई आणि ठाकुर बाईनी दीपालीला एक वर्षांपासून मदत का केली नाही? एका बाईची हाक या खासदार- आमदारांच्या हृदयापर्यंत का गेली नाही? प्रश्नच प्रश्न आहेत.
सोशल मीडियावर जेव्हापासून ही बातमी आणि तिने लिहिलेली पत्रे झळकलीत, तेव्हापासून आपापली मते देण्याची अहमहमिका चालू आहे. बहुतांशी सूर असा आहे की, तिने आत्महत्या करायला नको होती, आधीच तक्रार करायला हवी होती, आमच्यासारख्यांना सांगितले असते, तर आम्ही मदत नसती का केली? याला मी बसल्या जागेवर तोंडची वाफ दवडणे म्हणते! कशी मागणार ती तुम्हाआम्हाला मदत? सोशल मीडियावरून? आणि आपला जीव धोक्यात घालून तुम्ही जाणार तिला मदत करायला? तिने सुट्टीवर जायला हवे होते, ही सूचना बरोबर आहे; पण ती सुट्टी मंजूर कोण करणार? शिवकुमारने सुट्टी मंजूर केली असती? तिने आत्महत्या करायला नकोच होती. पण तिने ती केली, याचा अर्थ ती किती मजबूर असेल?

स्त्रीला सल्ला देणं सोपं आहे. पण जिच्यावर बितते ना, तिलाच कळतं! तक्रार करायला गेलेल्या स्त्रियांना पोलीस स्टेशनमध्ये रात्री १२ वाजेपर्यंत बसवून ठेवतात. तिलाच सांगतात,’ जरा सबुरीने घे बाई, जरा सहन कर!’ पोलीस तक्रार घेत नाहीत, अनेकदा विरोधी पार्टी तिला साधा वकील मिळू देत नाहीत, तिची कोंडी करतात. काही स्त्रिया यातून मार्ग काढतात, काही फसतात, काही नोकरी सोडतात, तर काही आत्महत्या करतात. पण दिपालीने नोट लिहून ठेवली आहे. हे सर्वात मोठे सबूत आहे. शिवकुमार, रेड्डी या मृत्यूला - नव्हे खुनाला - कारणीभूत आहेत. त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी.
मध्यंतरी शिवकुमार आणि रेड्डीला अटक झाली. आम्हाला थोडा दिलासाही मिळाला. पण रेड्डीला पोलीस कोठडी न देता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. इतके सबळ पुरावे, सुसाईड नोट, ऑडियो व व्हिडीओ क्लीप असूनही रेड्डिबाबत शासन आणि प्रशासनही सतत बचावाचा पवित्रा का घेत आहेत? रेड्डीला तीन दिवसांची पोलीस कास्टिडी मिळताच अमरावती एस.पी. त्याला भेटायला जातात. यानंतर लगेच या विषयाला कलाटणी मिळते! चार दिवसात रेड्डीला बेल मिळते, म्हणजे चौकशी हा केवळ फार्स होता का? चौकशीसाठी वेगवेगळ्या समित्या बसविल्या. वनविभागातून चौकशी, पोलीस खात्यातून चौकशी, अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे मॅडम कडून चौकशी. मात्र कुणी काय चौकशी केली, आम्हाला काहीही माहिती मिळायला मार्ग नाही. चौकशा झाल्यात पण चौकशी समितीची बैठकच झाली नाही, हे काय गौडबंगाल आहे?
हा केवळ दीपालीचा प्रश्न नाही, हा लढा केवळ दिपालीसाठी नाही; तर अशा अनेकजणी या पुरुषी मानसिकतेच्या बळी आहेत. ज्योती बिसेन नामक कर्मचारी महिलेचीही आपबिती फार काही वेगळी नाही. मुलींनी शिकावं, करिअर करावं, ताठ मानेने उभं राहावं - अशा वल्गना आम्ही सारेच करतो. या पुरोगामी महाराष्ट्रात वनखाते आणि पोलीस खाते या पुरुषीसत्ता असलेल्या दोन्ही क्षेत्रात १५-२० वर्षांपासून मुलींची भरती व्हायला लागली; मात्र तिथे मुलींना प्रचंड दहशतीत काम करावे लागत आहे. आपल्या मुलींचे, पत्नीचे अशा पद्धतीने शोषण होत असेल तर कोण पालक, कोण पती आपल्या मुलींना अशा क्षेत्रात नोकरीला जाऊ देतील? का जाऊ द्यावे? हीच का आपली पुरोगामी महाराष्ट्राची भूमिका?
एकाच ठिकाणी काम करत असताना सहकाऱ्यांमध्ये आपापसात एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी, सहानुभाव, मैत्र निर्माण होणे अगदीच स्वाभाविक आहे, एखाद्या स्त्री किंवा पुरुषा बद्दल आकर्षण वाटणे हीसुद्धा स्वाभाविक बाब आहे. पण जी आवडते, तिने नकार दिला म्हणून तिला त्रास द्यायचा, तिचे लैंगिक शोषण करायचे ही न पटण्यासारखी बात आहे…
अशीच आणखी एक केस - रेखा तिघरे. ही पवनी कोर्टात स्वीपरच्या कामाला होती. तिच्याकडे साफसफाई, झाडूपोछा करणे, बगिच्याला पाणी देणे,पाणी भरणे, मुत्रीघर स्वच्छ करणे वगैरे कामे होती. ती सकाळी साफसफाई करताना न्यायमूर्ती अजयप्रसाद रामनाथ यादव साहेब कोर्टात लवकर येऊन तिच्या आजूबाजूला घोटाळत असायचे. हळूहळू "तू कितनी सुंदर है” वगैरे बडबड करायचे. तिने सुरुवातीला तिकडे दुर्लक्ष केले. एक साधी चतुर्थश्रेणी कर्मचारी न्यायाधीशाला काय बोलणार? मात्र एक दिवस त्यांनी सरळसरळ शरीरसुखाची मागणी केली; तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती आपल्याला भीक घालत नाही, हे बघून बाकी शिपायांना तिच्याविरुद्ध भडकविले. आता सर्वच तिला त्रास द्यायला लागले. एके दिवशी तिच्यावर साहेब जबरदस्ती करणार, तेवढ्यात संधी घेऊन ती बाहेर पळाली. तिने न्यायाधीशांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली. त्यांना तर काहीच शिक्षा झाली नाही, मात्र तिची बदली झाली. ६ .११.१९ रोजी तिला १६ पानी बंद लिफाफ्यात समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांच्या सहीनिशी अहवाल प्राप्त झाला. त्यात अजयप्रकाश रामनाथ यादव साहेब, न्यायाधीश पवनी कोर्ट यांच्यावर समितीने योग्य तो कार्यवाहीचा आदेश पारित करावा, असे नमूद होते. तरीही न्यायाधीशांवर काहीही कारवाई नाही. मात्र २ दिवसात तिला पुन्हा कार्यालयात बोलावून तिच्याजवळील पूर्ण अहवाल प्रेशर देऊन परत मागून घेतला. मात्र तिच्या यजमानांनी त्याची झेरॉक्स करून ठेवल्यामुळे आजही तो तिच्याजवळ उपलब्ध आहे. तिच्यावर चोरीचा आरोप लावून तिला कोणतीही शोकॉज नोटीस न देता, तिला ३१-०३-२१ ला नोकरीतून सेवामुक्त करण्यात आले. एक सातवी शिकलेली स्त्री स्वाभिमानाने, आपले स्वत्व सांभाळून जगू इच्छिते, तर हा समाज तिला जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. पुरुषाच्या इच्छेविरुद्ध काही झाले की घरातच नव्हे तर नोकरीच्या ठिकाणीही बाईला जगता येत नाही.
अशीच काहीशी परिस्थिती मुर्तिजापूरच्या एका प्राध्यापिकेवर ओढवली आहे. प्राचार्यांनी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली आणि बाईंनी नकार देताच तिला छळायला सुरुवात केली. तिला सर्वांसमक्ष घाणेरड्या शिव्या देणे, कॉलेज मध्ये उशिरापर्यंत थांबवून ठेवणे, तिचा सी.आर. खराब करणे, "तू इथे राहतेच कशी हे मी पाहतोच" अशी सतत धमकी देणे वगैरे प्रताप सुरु झाले. मॅडमने मॅनेजमेंट, पोलीस स्टेशन, कुलगुरू सर्वांना तक्रारी केल्यात. अगदी महिला आयोगाकडेही गेली, पण काहीही फायदा झाला नाही. मी या केसबद्दल सोशल मीडियावरून आवाज उठवताच हालचाल सुरु झाली आणि आता सारे जागे झालेत. तरीही बाईला न्याय कधी मिळणार याची वाट बघावीच लागणार.
मॅडमने सर्वप्रथम प्राचार्यांच्या गैरवागणुकीची तक्रार मॅनेजमेंट कडे केली. महाविद्यालयाच्या अध्यक्षांकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही असे पाहून मॅडमने मूर्तिजापूर पोलीस स्टेशनला तक्रार केली; पण संबंधितांकडून काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यांना कुठेच दाद मिळाली नाही. शेवटी अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूकडेही लेखी तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने विद्यापीठाकडून एक चौकशी समिती गठीत करण्यात आली. त्या चौकशी अहवालानुसार प्राचार्य संतोष ठाकरे हे सकृतदर्शनी दोषी आढळलेले आहेत. तरीही त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. मॅडमच्या बाजूने काही तरुण प्राध्यापक प्राचाऱ्यांशी बोलायला गेलेत तर भयंकर घाणेरड्या भाषेत जे बोलले, ते ऐकवत नाही.
अत्याचारग्रस्त प्राध्यापिकेने विविध वरिष्ठ प्राधिकरणाकडे तक्रारी पाठविल्या आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राज्यमंत्री संजय धोत्रे , मनुष्यबळ विकास मंत्रालय, दिल्ली, राष्ट्रीय महिला आयोग (दिल्ली), अध्यक्ष, राज्य महिला आयोग, (मुंबई) राज्यपाल, पोलीस आयुक्त अमरावती अशा अनेकांना सादर केल्यात. परंतु अद्याप कुणाकडूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यांच्या सहकाऱ्यांनी मूर्तिजापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि तेव्हा मात्र प्राचार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु पोलीस स्टेशनला विशाखा समितीचा अहवाल गरजेचा होता. महाविद्यालयात विशाखा समिती होती पण ती विद्यापीठाच्या नियमानुसार नव्हती.
इतक्या मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होऊन व गुन्हा दाखल होऊनही आणि विद्यापीठाने दोषी ठरवूनही प्राचार्यांविरुद्ध कोणतीही कारवाई न होण्यामुळे पीडिता दिवसेंदिवस मानसिकरित्या थकलेली आहे. आता तिने काय करायला हवे? सर्वांनी दीपाली सारखी आत्महत्या करायची का? समाज म्हणून, सहकारी म्हणून आमचीही काही जबाबदारी आहे की नाही? द्रुत गती न्यायालय स्थापन करणे, महिला न्यायालय, महिला पोलीस अधिकारी यांची नेमणूक करण्याने प्रश्न सुटणार नाहीत. कारण या सगळ्या तात्कालिक उपाय योजना आहेत. स्त्री बदलली, ती शिक्षित झाली, निर्णयक्षम झाली, हे सहन न होऊन जर तिचा कुणी छळ करत असेल तर पोलीस व प्रशासन यंत्रणेसह समाजाच्या सर्व उपांगांमध्ये स्त्रीविषयी संवेदनशीलता वाढवणे हा मुख्य उपाय आहे!

अरुणा सबाने

अध्यक्ष माहेर संस्था, नागपूर

एक बार फिर से ... तहलका

गेल्या महिन्यात ‘तहलका’ मासिकाचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक शोषण तसंच बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपांतून निर्दोष सुटका झाली आहे. २०१३ मध्ये 'तहलका'च्या माजी संपादकांवर एका महिला सहकाऱ्याने गोव्याच्या एका लक्झरी हॉटेलच्या लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. आता 21 मे रोजी गोवा फास्टट्रॅक कोर्टानं तब्बल आठ वर्षांनी हा निर्णय सुनावला आणि जनमानसामध्ये वेगळाच तेहेलका निर्माण झाला! पुरोगामी स्त्रीवादी गटांमध्ये तर खूप चर्चा झाली, किंबहुना अजूनही चर्चा सुरु आहेत. या निर्णयाचा निषेध करणारे कार्यक्रम झाले. इतकेच नाही तर Network of Women in Media, India ह्या गटानेही निकालाचा निषेध करणारे पत्रकही प्रसिद्ध केले. कारण त्या निकालपत्रातील काही विधाने आपल्याला थेट 1970 – 80 च्या दशकात घेऊन जातात! त्याकाळी लैंगिक शोषणाच्या घटनेबद्दल प्रश्न असायचे - पीडित महिला कोण होती? तिचे कपडे कसे होते? तिचे वागणे बोलणे कसे होते? ती रात्री अपरात्री घराबाहेर का गेली होती? थोडक्यात काय तर पीडित महिलेवर झालेल्या अन्यायाचे खापर तिच्याच माथी फोडले जात असे. आम्हा स्त्रीवादी लोकांना असे वाटले होते, की निदान आता तरी अशा गैरसमजामधून समाज पुढे आला आहे! पण दुर्दैवाने ‘तहलका’ प्रकरणाच्या निकालाने आमचा हा समज चुकीचा ठरलाय. कारण आरोपी तरुण तेजपालची निर्दोष मुक्तता करताना न्यायाधीशांनी पीडितेच्याच वागणुकीवर ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाचा निकाल हा प्रत्यक्ष घटना आणि त्यातील तथ्य यावर आधारित असतो. पण हा निकाल आरोपीनी काय केले, हे बघणारा नाही तर - पीडितेने काय केले नाही, यावर भर देणारा आहे! लैंगिक शोषण झालेल्या व्यक्तीचे वागणे कसे पाहिजे, तसे वागणे तिचे नव्हते आणि याचा अर्थ ती “आदर्श पीडिता” नाहीये – असा काढण्यात आला. या निकालामध्ये न्यायालयाने तिलाच गुन्हेगार ठरवल्यासारखे भासते. त्यामुळेच 40 वर्षांपूर्वीच्या ‘मथुरा बलात्कार खटल्या’तील निकालाची इथे आठवण होते.

मथुरा ही तरुण आदिवासी मुलगी कैदेत असताना तिच्यावर गडचिरोलीतील दोन पोलिस कर्मचार्‍यांनी बलात्कार केला होता. पण पीडिता लैंगिक संबंधाना सरावलेली होती ( “habituated to sexual intercourse”) आणि तिच्या शरीरावर जखमा दिसत नाहीत म्हणजेच तिने प्रतिकार केलेला नाही – असे निष्कर्ष काढून सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना दोषमुक्त केले होते. त्याविरुद्ध स्त्रीयांच्या चळवळीने आंदोलन उभारले आणि परिणामी बलात्कार कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. आता लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत निरपराधित्व सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर असते. शिवाय १९९७ मध्ये सुद्धा ‘कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ’ या विषयाची दखल सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेमुळे घेतली होती. राजस्थान मधील साथीन भँवरीदेवी हिने बलात्काराविरुद्ध आवाज उठवला आणि स्त्रीवादी गटांनी हा मुद्दा उचलून धरला. या याचिकेमुळे ‘विशाखा मार्गदर्शक तत्वे’ तयार करण्यात आली. महिलांसाठी सुरक्षित कार्यस्थळ निर्माण करण्याची जवाबदारी व्यवस्थापनावर टाकण्यात आली. त्यानंतर २०१३ मध्ये यासाठी वेगळा कायदा सुद्धा आला. 
गेली बरीच वर्ष मी कार्यस्थळी महिलांचा होणारा लैंगिक छळ याविषयावर काम करत आहे. या कायद्या अंतर्गत प्रशिक्षण आणि जाणीवजागृती चे कार्यक्रम घेणे बन्धनकारक असते. पण तेव्हा आस्थापनांकडून आम्हाला ऐकवले जाते की - "मॅडम, तुम्ही महिलांच्या डोक्यात फार काही कल्पना घालू नका बरं", " खोट्या तक्रारींचा मुद्दा पण स्पष्ट करा", “तुम्ही फक्त कायदा सांगा, ते जेन्डर वगैरेच्या वाटेला नको जायला", " आजकाल या मुली वाटेल ते कपडे घालून येतात, तेव्हा मॅडम थोडं ड्रेसकोड बद्दल पण बोला" थोडक्यात, चुकीची वर्तणूक म्हणजे काय आणि लैंगिक अत्याचाराच्या व्याख्येत काय येऊ शकते, याबाबत गेल्या काही वर्षांत थोडी जागरुकता आली असली तरी  आपल्याला अजून बरीच मजल गाठायची आहे.
प्रिया रामाणी 
असं असलं तरी न्यायालये लैंगिक शोषणाच्या मुद्द्याकडे खूप संवेदनशील दृष्टीकोनातून सुद्धा बघू शकतात, हे आपल्याला काही महिन्यांपूर्वी एम.जे अकबर यांनी प्रिया रामाणी यांच्या विरुद्ध केलेल्या मानहानीचा खटल्याबाबत दिल्लीच्या एका न्यायालयाने दाखवून दिले आहे. म्हणूनच नोव्हेंबर २०१३ मध्ये घडलेल्या तहलका प्रकरणामध्ये पुन्हा पीडितेलाच दोष दिला जाणे तरी अपेक्षित नव्हते! जरी त्यावेळी महिला लैंगिक शोषण (मनाई, प्रतिबंध आणि निराकरण ) कायदा अजून यायचा होता, तरी ‘विशाखा निवाडा’ अस्तित्वात होता. ‘तहलका’ सारख्या पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या कार्यस्थळी, विशाखा समिती अस्तित्वात असायला हवी होती. पण ती नव्हती. तक्रार करणारी मुलगी तरुण तेजपाल यांना वडिलांप्रमाणे मानायची. तिला तरुण तेजपाल यांच्या बद्दल आदर होता, आणि ती त्यांची ऋणी होती कारण तिच्या आयुष्यातली पहिली नोकरी त्यांनी दिली होती. ती त्यांना mentor या भूमिकेत बघायची. शिवाय तिच्या आणि त्यांच्या कुटुंबांची घट्ट मैत्री होती, आणि त्यांची मुलगी सुद्धा तिची जवळची मैत्रीण होती. अशा व्यक्तीकडून जेव्हा रात्री 12.30 वाजता लैंगिक गैरवर्तन घडलं, तेव्हा ती किती गोंधळून गेली असेल? हा प्रसंग घडला, आणि तिथे ‘तहलका’चा मोठा ग्लोबल इव्हेंट सुरु होता. तरीही, ती तीन सहकर्मींकडे लगेच या घटनेविषयी बोलली. मान्यवर वकिलांचा सल्ला घेतला. संस्थेच्या मॅनॅजिंग एडिटर शोमा चौधरी यांना इमेल सुद्धा लिहिला. त्यांनतर तरुण तेजपाल नी स्वतः आपल्या गुन्ह्याची कबुली देत माफी मागणारा इमेल पाठवला. त्यात त्यांनी नमूद केले होते की, तुझी इच्छा नसताना माझ्याकडून तुझ्याशी लैंगिक गैरवर्तणूक झाली, आणि मी त्याबद्दल बिनशर्त माफी मागतो. पण कोर्टाने हे ईमेल पुराव्यादाखल ग्राह्य मानलेच नाही. 
खरंतर पीडितेच्या मागणीनुसार, विशाखा समिती नेमून नीट चौकशी झाली असती, तर या एका इमेल वरून सुद्धा तरुण तेजपाल दोषी आहे - हे सिद्ध झाले असते आणि पीडितेला न्याय मिळाला असता. पण तहलकामध्ये ही व्यवस्था नव्हती आणि खूप गदारोळ झाल्यावर जेव्हा आम्ही समिती बसवू असे शोमा आणि तरुण यांनी जाहीर केले, तेव्हा पीडितेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला होता. 

७ - ८ नोव्हेंबर २०१३ : तरुण तेजपाल यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका सहकारी महिलेकडून करण्यात आला

२२ नोव्हेंबर २०१३ : गोवा पोलिसांनी तरुण तेजपालविरुद्ध एफआयआर दाखल केली.

३० नोव्हेबंर २०१३ : तेजपाल यांना अटक करण्यात आली

१९ मे २०१४ : तरुण तेजपाल यांना जामीन देण्यात आला 

सप्टेंबर २०१७ : म्हापुसा कोर्टानं तेजपाल यांच्या विरोधात आरोप निश्चित केले. 

२१ ऑक्टोबर २०१९ : पीडितेची चौकशी सुरू झाली. 

२० डिसेंबर २०१९ : गोव्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं तेजपाल यांची याचिका फेटाळली.

२१ मे २०२१ : तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता

सात-आठ वर्षांचा हा खडतर प्रवास तिच्या साठी सोपा नव्हता. अनेक वृत्तपत्र, वेबसाईट आणि न्यूज चॅनल्सने तरुण तेजपाल आणि संबंधित महिला सहकाऱ्याने एकमेकांना आणि ऑफिसला लिहिलेले ई-मेल्स परस्पर प्रसिद्ध करण्यात आले. कोर्टात तिच्या अनेक वैयक्तिक बाबींची आणि चारित्र्याची चर्चा झाली. तिच्या आयुष्याची सगळी घडी विस्कटली,वेळोवेळी सुनावणीसाठी गोव्याला जायचे, तिथे प्रतिकूल वातावरण असायचे, त्यात सोशल मीडिया वरील आरोप प्रत्यारोप - पण तरीही ती लढत राहिली.ती खोटारडी आहे आणि तिच्यावर विश्वास ठेवता येत नाही असे सिद्ध करायला - तिच्या फोन मधील मेसेजेस, तिचे राहणीमान, व्यक्तिमत्व, तिचे अतीत, तिचे नातेसंबंध यांचीही न्यायालयात चर्चा झाली.  
बऱ्याच लोकांनी आणि निकाल देणाऱ्या महिला न्यायाधीशाने सुद्धा म्हटले आहे, की तिने विरोध का केला नाही? तिने त्याला ढकलले का नाही? ती घटने नंतर काम का करत राहिली? ती शिकलेली होती, कर्तबगार होती, याचा अर्थ असा कुठेच होत नाही की तिला भीती वाटली नसेल! तिला नोकरी गमवायची नव्हती त्यामुळे, नोकरीसाठी जे करणे गरजेचे होते, ते ती करत राहिली. हा सगळा प्रकार एका मोठ्या कार्यक्रमाच्या दरम्यान घडला होता, जिथे खूप प्रतिष्ठित लोक आले होते, हे आपण विसरायला नको! तिला कुठे माहीत होते, की काही वर्षांनी कोर्ट तिला जाब विचारेल, "तुझे लैंगिक शोषण झाले होते, तर या फोटोमध्ये तू हसतेस कशी? किंवा तू आरोपी च्या मेसेजला उत्तर कसे दिलेस? तू कुठे आहेस हे कसे सांगितलेस?"
 

आदर्श पीडिता कशी असावी ?

तिने काय करायला हवं होतं?  धिंगाणा घालायला हवा होता? रडारड करायला हवी होती? धावत धावत पोलिस स्टेशन गाठायला हवं होतं? आरडाओरडा करायला हवा होता? मग तिच्या प्रतिष्ठेचं काय? प्रतिष्ठा काय फक्त तरुण तेजपालची असते? प्रत्येक स्त्री आपल्या विरुद्ध गुन्हा घडला कि विचार करतेच - मी कुठे चुकले का? माझ्या समजण्यात काही चूक झाली का? ज्या माणसाचा इतका दबदबा आहे, ज्याच्याकडे इतकी सत्ता तो माणूस असे करू शकतो, हे पचवायला आधी वेळ लागतो. एकदा का तिने स्वीकारले की खरंच हे घडलय आणि आता मला याची वाचा फोडायची आहे, कि मग पुढचे प्रश्न भेडसावतात - माझ्यावर कोणी विश्वास ठेवेल का? की सत्तेच्या या उतरंडीत माझा बळी घेतला जाईल? पण निदान न्यायप्रक्रियेनी तरी माझ्यावर झालेल्या अन्यायाची दखल घ्यावी. पण इथे तर न्यायालयाने आपल्या निकालातून "आदर्श पीडिता" कशी असावी याचा जणू काही पाठच दिलाय!
तिला कायद्यांबद्दल माहिती होती, बलात्काराबद्दल तिने लेख लिहिले होते, तिने काही वकिलांचा सल्ला सुद्धा घेतला होता. - याचा निष्कर्ष तिचा आरोपच खोटा आहे असा कसा निघतो?

#MeToo मोहिमेमध्ये अनेक महिलांनी त्यांचा बाबतीत झालेलया लैंगिक छळाबद्दल सोशलमिडिया द्वारे वाचा फोडली होती. आंतरराष्ट्र्रीय स्तरावर सुरु झालेल्या या मोहिमेमध्ये, भारतीय स्त्रियांनी सुद्धा कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक छळाबद्दल बोलण्याची हिम्मत दाखवली, अनेक क्षेत्रांमधील अनेक मोठी नावे घेतली गेली. या प्रतिष्ठित व्यक्तींपैकी काहींनी प्रत्युत्तर म्हणून या महिलांवर मानहानीचे दावे दाखल केले. अशाच एका दाव्यामध्ये न्यायालयाने महिलांवर कार्यस्थळी होणारे लैंगिकशोषण आणि त्याचा मानसिक आघात याची दखल घेतली. समोरची व्यक्ती प्रतिष्ठित आहे, म्हणून ‘असे’ वागणार नाही, ही संकल्पना फेटाळली. अशा घटनांमध्ये महिला त्यांच्यावर होणाऱ्या चिखलफेकीला घाबरून गप्प बसतात असे स्पष्ट केले. महिलांना आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल बोलायची मोकळीक दिलीच पाहिजे, आणि कोणाची प्रतिष्ठा दुखावली जाईल म्हणून महिलांचा आवाज दाबणे हे चुकीचे आहे, असे अत्यन्त पुरोगामी विचार न्यायालयाने नोंदवले.
पण पुन्हा तेजपाल खटल्यासारखे निकाल आले, कि समाज मागे चाललाय असे वाटते. सध्या उच्च न्यायालयाने गोवा सत्र न्यायालयाच्या ह्या निकालाला स्थगिती देऊन, सर्व कागदपत्र मागवल्याचे कळते. आता हा निर्णय बदलला जाईल का? आता तरी उष:काल होईल का ? की एक बार फिर से ... तहलका ?

रेणुका मुकादम

Consultant Trainer & External Member

(Prevention of sexual harassment at the workplace)

 


गोगुंदा भाभी

“रात के सोने एक बाद निंद खुली नही तो अच्छा होगा,ऐसा मुझे हर सुबह लगता है!” गोगुंदा भाभी सांगत होत्या.
त्या आणि मी लस घेण्यासाठी एका रांगेत उभे होतो. आतापर्यंत झाकून ठेवलेलं त्या तोंडावर मास्क लावून आज उघड करून सांगत होत्या. त्या गेल्या २५ वर्षांपासून इथे राहत आहेत. त्यांच्या नवऱ्याचा सिमेंट,फरशा विकण्याचा व्यवसाय आहे. तो ३० वर्षापूर्वी राजस्थान मधून इथे आला आणि इथलाच झाला. गोगुंदाभाभी लग्न होवून इकडे आल्या तेव्हा त्या मोठा घुंगट घ्यायच्या. हातात कोपरापर्यंत रंगेबेरंगी बांगड्या, केसात बिंदी आणि ओठाला लिपस्टिक असायची. आता मात्र त्या कधीमधीच घुंगट घेतात.
भाभी म्हणाल्या,“अभी आज का च देखो ना ,मुझे लस लेने के लिये ईधर आना था,तो बोले - रोटी जादा करके रख, नही तो तेरा हाथ दुखेगा और मैं भूखा रह जाऊंगा”
त्यांनी घेतली का लस?
“ली ना! उसका नाटक तो पुछो मत. घर आते ही सो गये. जैसे कोई बिमार आदमी है,सब खानापिना बेड पर ही मांगा,”
अहो, काहींना त्रास होतो
“मैने सुना है की १२ घंटे बाद तकलीफ होती है, मगर ये तो आतेही शुरू हो गये.”
तुम्ही कधी पासून स्वयंपाक करता?
“मैं बहुत छोटी याने की पहिली दुसरी की कक्षा मैं पढती होगी, तबसे मैं रोटी बेल रही हुं.”
तेव्हापासून तुम्हांला यायला लागल्या?
“तो?  हमारे मे तुम्हारे जैसा लाड नही होता. आदमी लोग भी पाचवी कक्षा से दुकान पे या साईट पे काम करने के लिये जाता है, गोकुळ के पापा तो बहुत छोटे थे तभी से फरशी लगाने के काम करते हैं.”
तुम्हांला कंटाळा नाही का येत स्वयंपाकाचा?
“मैं तो हमेशा बोलू की औरत का मरने का टाईम आयेगा ना, तो भी वो बोलेगी -रुको मैं किचन का ओटा साफ करके आती हुं” - असं म्हणून त्या जोरजोरात हसू लागल्या.त्या हसण्यामागे खूप काही त्या लपवत असणार.
तुम्ही सगळा स्वयंपाक करून आल्या का मग?
“हां तो! अरे इतनाच नहीं, आज इनके रिपोर्ट आये तो उन्हे समझा की उन्हे शुगर नहीं है. तो बोले, ‘आज थोडा सुजी का हलवा बना, नही तो खीर बना’ मैं बोली आके बना देती हुं, तो बोले, नही नही तुम्हांला हाथ दुखेगा तो तुमसे नहीं होगा. फिर मैं बोली, आप आपने हाथ से बनाओ. उन्हे सबकुछ आता है,लेकिन करने का नहीं. बोलते है कि तुम्हांरे जैसा नहीं बनता.”
तुम्हांला खूप कंटाळा येतो का स्वयंपाक करण्याचा?
“आके भी क्या कर सकती हुं मैं? बाहर जाके काम करेंगे तो भी रसोई तो करनी ही पडती हैं, इसलिये तो मैं बोलती हुं, सोने के बाद निंद खुले ही नहीं मेरी. पर क्या करे हर रोज सुबह होती है और एक कप मसाले की चाय पी लेकर मैं काम करने की हिंम्मत जुटती हुं. गांव जाके जादा थकने से यहां अच्छा हैं. मैं आपने मन की मालिक तो हुं. आसपास गप्पे मार सकती हुं आणि थोडा फार सिलाई करके पैसा भी बचाती हुं.”
त्या पैशाचे काय करता?
“सच बोलू - बाजार करने के लिये जाती तब ढोकळा,काजू कतली,पाव लेकर आती हुं, ऐसी मैं खुद को छुट्टी लेती हुं” - हे सांगतांना त्या फार खुशीत होत्या.
“देखो आज घर जाके मैं भी बिलकुल लेट जानेवाली हुं,देखना तुम,”
तेवढाच तुम्हांला आराम...
“आराम कैसा करने का मैं सिख रही हुं” असं म्हणत गोगुंदा भाभीनी आपल्या डोक्यावरचा पदर सावरला आणि लस घ्यायला गेल्या.

अश्विनी बर्वे
नाशिक