स्वयंपाकघराशी रोमान्स...

लहानपणापासून मला घरकामाची अजिबात आवड नव्हती. घरांत आई व बराच वेळ बाई असल्याने माझ्यावर वेळही आली नाही. कधीतरी बाई आजारी पडल्या किंवा पुण्याला सगळे जमलो असताना, कधी केर काढणे व स्वतःच्या पांघरुणाची घडी घालणे, ही कामे करायला लागायची. पण स्वैपाक? कधीतरी दुपारच्या खाण्याची तयारी करून ठेवणे, दाणे भाजणे व खोबरे खवणे, ही कामे स्वतःहून घेतलेली होती. कारण दाणे हवे तसे खमंग भाजून हक्काने थोडेसे तोंडात टाकता यायचे. पुण्यात काय किंवा आमच्या घरी बडोद्याला, सर्वांनाच नवनवीन पदार्थ व चांगलेचुंगले खाण्याचा शौक होता व आहे. घर स्वच्छ व नीटनेटके असण्याची सवय होती, पण त्यासाठी कष्ट करायला लागतात हे लक्षात आलेले नव्हते. सर्व लक्ष अभ्यास, वाचन व नाचणे-गाणे यातच असायचे. वयाच्या १९व्या वर्षा पर्यंत मी अनुमानधपक्याने चहा-कॉफी करायची. सगळ्या नातेवाईकांना, विशेषत: बाहेरून लग्न करून आलेल्या स्त्री नातेवाईकांना आम्हा “मुलींचे” फारच लाड होतात असे वाटायचे. त्यामुळे कधीतरी आईलाही वाटायचे! त्यावरून एक दिवस आईबरोबर वाद घालताना, मी तिला स्पष्ट सांगितले की मला हे काहीही करायला आवडत नाही; मोठी झाल्यावर त्यासाठी मी नोकर ठेवेन.
त्यावर आई म्हणाली, “ठीक आहे! तुझी सांपत्तिक स्थिती तेवढी चांगली असो; असा मी आशीर्वाद देते. पण एवढे लक्षात ठेव की तुला काही येत नाही - हे लक्षात आल्यावर तुझ्या आवडीचे नाही, तर नोकरांच्या आवडीचे तुला खायला लागेल.”
काही दिवसांनी आई गावाला गेल्यावर त्याची प्रचीती आलीच ! ताबडतोब मी सूत्र हातात घेतली व धाकट्या बहिणींना सांगितले की मी बनवेन तसे खायचे. बाबांचा प्रश्न नव्हता कारण मुलींनी बनवलेले कसेही असो, ते वाखाणूनच खायचे. नेहमी सारख्या चवींच्या भाज्या रोज बनवणे, म्हणजे काळा मसाला, मिठगुळ घालून बनवणे फार बोर व्हायचे, म्हणून माझे चवीतले प्रयोग सुरु झाले. काही फसलेले प्रयोग आठवतात, म्हणजे एकदा मी फ्लॉवरच्या भाजीत खूप धने-जीऱ्याची पूड घातली. मलाच ती भाजी जाईना; पण बाबांनी वाखाणून खाल्ली. तसेच एकदा मी वाचून किंवा ऐकून, चनाजोरगरम घरी बनवायला गेले. ते इतके तेलकट झाले की पुढे कित्येक वर्षे मी चनाजोर खायचेच सोडले. एक यशस्वी प्रयोग म्हणजे मी बटाट्याची कढी करायची - ती बहिणींना खूप आवडायची. आई कुठे गेली की त्यांची फर्माईश असायची की ती कढी कर! आता मला त्याची कृती आठवतच नाही. आई व बाई असताना फारसे काही करायची वेळ यायची नाही. हे एम.ए. होई पर्यंत चालले व मग मी दिल्लीला होस्टेलवर आले. मुळात आवड नव्हती व आता गरज नव्हती, त्यामुळे स्वैपाक मी ठार विसरले. तरीही एकदोन कंत्राटदारांना हाकल्यावर आमच्या होस्टेलमध्ये पूर्णवेळ स्वैपाकी व त्यांचे मदतनीस नेमले गेल्यावर, आम्हा विद्यार्थ्यांवर मेनू ठरवण्याची व ते करून घेण्याची जबाबदारी पडली. आमच्या होस्टेलमध्ये संपूर्ण भारतातील जवळजवळ सर्व प्रांतातील विद्यार्थी होते. मला वेगवेगळ्या खाण्याची आवड असल्याने व सर्व काही खाऊन बघण्याची साहसी वृत्ती असल्याने, मी त्यांना आपापल्या प्रांतातील पदार्थ करून घेण्याचा आग्रह केला. त्यामुळे तेंव्हापासूनच राईच्या तेलातील पदार्थ, खोबरेल तेलातील पदार्थ खायची सवय झाली. विविध प्रांतातील पदार्थही चाखले. कधीतरी आमचे पुरुष मित्र कुरकुर करायचे पण आम्ही आमचे उद्योग थांबवले नाही. असेच एकदा मला युएस एम्बसीकडून कॉकटेल पार्टीचे आमंत्रण आले. तिथे कसे कपडे करायचे, कसे वागायचे वगैरे आमच्या सिनियर्सनी सांगून आम्हाला तयार केले. मग माझा सिनियर मित्र पुष्पेश पंत याने व मी, तिथे बनवलेले कॉकटेल स्नॅक्स बनवण्याचा उद्योग करून पाहिला. तो पुढे फूड स्पेशालीस्ट झाला. पण त्याच्या बरोबर सुरवातीच्या काळात मी अनेक पदार्थ बनवून पाहिले.
पुढे मी सोविएत युनिअन मधील युक्रेनची राजधानी कीव ला, पुढील शिक्षणासाठी गेले. तिथे आणिकच वेगळी तऱ्हा, आपल्याकडील काहीच मिळायचे नाही. मी गेले सप्टेंबर मध्ये, त्यामुळे सर्व ताज्या भाज्या संपल्या होत्या. पुढील काही महिने बटाटे, कांदे, टोमाटो, कोबी व गाजर याच पाच भाज्या मिळणार होत्या. कधीकधी ग्रीनहाऊस मध्ये पिकवलेला पातीचा कांदा. नॉनवेज मध्ये फक्त बीफ, कधीतरी कोंबडी, कधीतरी गोड्या पाण्यातील मासे मिळत. सुरवातीला अंड्यांचे पण दुर्भिक्ष होते. पण ब्रेड, लोणी, चीज, दूध मुबलक व स्वस्त होते. तिथे जेवणाची सगळी पद्धतच बदलली. मैत्रिणींचे पाहून बोर्श, गुल्याश, रशियन सलाड, खारवलेल्या बाटलीबंद काकडी-टोमाटो यावर जगायला शिकले. उन्हाळ्यात मात्र बऱ्याच भाज्या मिळायच्या. तुलनेने आपल्याकडे बारा महिने भाज्यांची रेलचेल असते. तिथे डाळ हा प्रकार नाहीच, म्हणजे प्रोटीन साठी नॉनवेजच. तिकडे जाण्यापूर्वी मी कच्चे नॉनवेज बघितलेही नव्हते. मटन-चिकन खाणे वडिलांनी बाहेर नेऊन शिकवले होते, पण बनवायला तिकडेच शिकले. तिथे पूर्ण कोंबडी विकत घ्यायला लागते. तिकडून परत आल्यावर मला सराईतपणे कोंबडी कापून साफ करताना, मासे साफ करताना पाहिल्यावर, आईच्या अंगावर काटा आला. तिथल्या माझ्या मित्र-मैत्रिणींना भारतीय पदार्थ खायला घालायला म्हणून, गाजर हलवा, शिरा, सावर क्रीम वापरून फ्रुट सलाड, अक्रोडाचे कूट घालून गाजराची कोशिंबीर, असेही प्रयोग केले.
अजूनही नेटवर बघून स्वैपाकात विविध प्रयोग चालू आहेत, पण आईची आठवण करत! मला पोळ्या करायला अजिबात आवडत नाही, पण खायला पोळ्या आणि भाकरीच लागते. त्यामुळे या कामाला मी आधी बाई ठेवली. भाज्यांमध्ये पालेभाज्या जास्त आवडतात. निवडत बसायला वेळ नाही; मग ते बाईवर सोपवले. आजची मी जरी रोजचा स्वैपाक करत नसले तरी, घरी स्वैपाकाला येणाऱ्या मुली मानतात की त्यांना स्वैपाकाचे विविध प्रकार मी शिकवले.  खाण्याची आवड असली की चांगले बनवले जातेच, असे मला वाटते.



वासंती दामले.

सुपरवूमन व्हायला जाऊ नये !



मी ज्या संस्थेत एके काळी काम करायचे तिथले खूप वरिष्ठ संस्थापक एकदा म्हणाले होते, कि इंजेक्शन देणे खूप सोपे आहे, त्याला काही विशेष कला लागत नाही (ते स्वतः डॉक्टर असल्याने आम्ही निमूट ऐकले), त्यापेक्षा पोळ्या करणे अवघड आहे! आजसुद्धा कोणी माझ्या पोळ्यांना नावे ठेवली तर मी लगेच हे लॉजिक पुढे करते! मला पोळ्या काही केल्या छान जमल्या नाहीत,किंबहुना त्या अजुनही जमत नाहीत. मला आठवते, मला आधीपासूनच स्वयंपाकाची फारशी आवड नव्हती. पण रडतखडत का होईना मी अंड्याची भुर्जी, बटाट्याची भाजी, पोहे, वरण भात, कोशिंबीर, आईच्या काही खास भाज्या इत्यादी शिकले. तेव्हा आई ओरडायची, "अगं .... बनवायला आवडत नाही म्हणतेस, खायला तर आवडते ना? मग आपल्यासाठी का होईना बनवता आले पाहिजे.."
आईचं म्हणणं योग्यच होतं, ‘स्वयंपाक’ हा शब्द जर बारकाईने बघितला तर त्यात स्वतः साठी अन्न बनवणे असा अर्थ अभिप्रेत आहे. पण बऱ्याच मैत्रिणींच्या बाबतीत " बाईच्या जातीला स्वयंपाक नं येऊन कसे चालेल? सासरी जाऊन इज्जत काढशील आमची…" असे टोमणे असायचे. कारण आपल्या संस्कृती मध्ये मात्र स्वयंपाक येणे आणि तो उत्तम येणे हा प्रत्येक स्त्रीच्या गुणवत्तेचा मापदंड समजला जातो. माझ्या घरचे त्या मानाने पुरोगामी विचारांचे म्हणायचे!

हे देखील वाचाअन्न, स्त्रीवाद आणि मी

माझ्या दुर्दैवाने माझे लग्न एका मागास विचारांच्या कुटुंबात झाले, आणि तिथे जाऊन स्वयंपाकच सगळ्यात महत्त्वाचा ठरला! त्यात हे लग्न भिन्न जातीमध्ये झाले ... मी ब्राम्हण घरातली ... लग्न झाले मराठा कुटुंबात ...त्यात सासरकडचे कट्टर शाकाहारी आणि मी मांसाहारी (यातील विरोधाभास लक्षणीय म्हणावा लागेल). इतकेच नव्हे तर माझे सासूसासरे कांदा, लसूण खात नाहीत त्यामुळे मला काही पदार्थ बनवायला अडचण यायची. आईने बऱ्याच युक्त्या दिल्या - फोडणीत जिरे घाल, जिरेमिरचीखोबरं वाटून घाल, कोथिंबिरीचा वापर जास्त कर. पण मला काही पदार्थ बिना कांदालसूण अजिबात आवडत नाहीत, मग प्रत्येक गोष्ट दोन वेळा बनवणे ... दोन वेगळ्या फोडण्या, हे सगळे मला नकोसे व्हायला लागले आणि मी सरळ सगळ्यांच्या स्वयंपाकाला आचारी ठेवला.

मग काय आधीच थोड्याफार विरोधातच लग्न झाले होते, परजातीची सून नावडती व्हायला किती वेळ लागतो ? घरातले सगळे बघून, पुढे मुलांना सांभाळून नोकरी करून, नवऱ्याचे फिरतीचे शेड्युल सांभाळून सगळी गाडी रुळावर ठेवताना, इतर कामासाठी बाया ठेवणे अनिवार्य होत गेले. यात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली - माझ्यात इतर खुप गुण आहेत, मनमिळाऊ स्वभाव, गाण्याची आवड, लिखाणाची आवड, मुलांचे लाड ... पण “स्वयंपाकात रस नाही”, हा अवगुण या सर्व गुणांपेक्षा मोठा ठरला. खाणाऱ्यांच्या टीकास्त्रांना घाबरून मी स्वयंपाक घरापासून आणखी लांब गेले.

हे देखील वाचा – स्वयंपाक माझ्या नावडीचा

आता मी आणि माझ्या मुली अशा तिघीच राहतो आणि नोकरी सोडून मी कन्सल्टन्सी करते. माझ्या मुलींना जेव्हापासून खाण्यात रस निर्माण झालाय आणि मला थोडा फावला वेळ मिळायला लागलाय तेव्हापासून स्वयंपाकात पुन्हा रुची निर्माण झालीये ... पदार्थ ब्राह्मणी असो, मराठा असो, किंवा अगदी इटालियन असो, करून बघायला काय हरकत आहे? असे म्हणून आम्ही बनवतो. lockdown मध्ये तर पोळ्या पण ठीकठाक जमायला लागल्या आणि खूप नवनवीन पदार्थ केले. मला मुलींना धडा द्यायचा आहे कि स्वयंपाक येणे हे दुय्यम आहे! त्यांनी उगीच माझ्यासारखं अनेक वर्षे या बाबतीत गण्ड बाळगून  राहू नये आणि सुपरवूमन व्हायला जाऊ नये …

रेणुका मुकादम

 

  


सीमा विस्तारताना

लहानपणी खानाखजाना पहायला मला प्रचंड आवडायचं. कॉलेजला असताना कधीतरी भूकेसाठी त्यातले सोपे पदार्थ प्रयोग करत बनवायला लागली. पण स्वयंपाकघरातली आवराआवर, भांडी घासणं हे मला कधीच आवडायचं नाही. आईच्या आजारपणामुळं किचनमधला वावर वाढू लागला. कोकणातल्या पद्धतीचं रोजच जेवण मला नीट यायचं. आवराआवरीकरता मदतनीस असायची. पुढं मग स्वयंपाकाकरताही मदतनीस आली तरी माझ्या कामाच्या वेळांमुळं, मला माझं शॉर्टकट हेल्दी फुड स्वतःच करायला लागायचं. वेगवेगळ्या पद्धतीचं खाणं खायला, करायला, खाद्यसंस्कृती जाणून घ्यायला मला आवडत असलं; तरी किचनमध्ये फार वेळ घालवायला दोघांनाही अजिबात आवडत नाही. खूप सामान आणि वेळ लागणारे पदार्थ करण्याच्या भानगडीतही पडतच नाही. मूड असला की पानभर पदार्थ आणि नाहीतर सरळ खिचडी, दहीभात असतो. रात्री हलका आहार असल्यानं सकाळचा नाश्ता मात्र दणदणीत लागतो. त्याकरता दूध-पोहेही चालतात. नवरा लग्नापूर्वी एकटा राहत असला तरी स्वयंपाक आणि चकचकीत स्वच्छता यात एकदम पटाईत. त्याच्या ‘आपल्या दोघांचं घर तर कामंही दोघांचं’ या स्वभावामुळं माझ्याही सर्व अंगवळणी पडलं. आमच्याकडं मदतनीस नाही. दोघं मिळून कामं केल्यानं काम चटकन होतात. तयारी, स्वयंपाक आणि त्यानंतरची स्वच्छता याकरता १ तासापेक्षा जास्त वेळ आम्ही दोघंही देत नाही. मी किंवा तो सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवणं सकाळी या एका तासातचं करतो. रात्रीकरताही वन पॉट मीलकडं आमचा भर असतो. हे तर झालं माझ्या इथल्या घरापुरतं. आमच्या आंतरजातीय आणि आंतरराज्य लग्नामुळंही गोड-तिखट अनुभव आले. चांगली गोष्ट म्हणजे गोड अनुभव आणि माणसांचं पारडं जड आहे.
मी महाराष्ट्रीय आणि सुधाकर कन्नड. गावात सुधाकरच्याच ज्ञातीतल्या लोकांची वस्ती आहे. माझं आणि सुधाकरचं लग्न ठाण्यात झाल्यावर गृहप्रवेश गावी झाला. आमच्या गृहप्रवेशाच्या दिवशी पंगतीत मी हौसेनं वाढायला गेले. हिंदी शिक्षक असणारे एक महाशय अडून बसले. म्हणे, “इसको हव्याकामें क्या कहते हैं बोलो फिर परसो”. मला क्षणभर सुचेना काय करावं. इतक्यात मागनं माझे दिर आले आणि हिंदीत म्हणाले, “अण्णा आपको चाहिए तो लिजिए, हमारी नयी बेटी को तंग मत किजीए” हे ऐकल्यावर आपल्याला या घरात जड जाणार नाही हा विश्वास आला. सख्खे ९ भाऊ, ४ बहिणी असं मोठ्ठ कुटुंब. माहेरी आम्ही सख्खी चुलत भावंड मिळून हा स्कोर आहे. माहेरी एक चुलत वहिनी आमच्याच ज्ञातीतली असली तरी देशावरची. मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या या वहिनीला स्वयंपाकावरून अजूनही टोचतात. माझ्या बाबतीत तर प्रांत आणि ज्ञातीही वेगळी त्यामुळं काय होईल ही शंका मनात होतीच.

११ वर्षांपूर्वी भाषा येत नसल्यामुळं मला सासरी काय बोलायचे हे कळायचं नाही. तिथली भाषा आणि संस्कृती शिकल्याशिवाय या घरातली होणार नाही, या विचारानं मी कर्नाटक-केरळ बॉर्डरवर असणाऱ्या आमच्या गावी एकटीच राहायला आले. घरात सासूबाई, सर्वात मोठे दिर आणि जाऊ. बाकी सर्व कामाच्या ठिकाणी. सुदैवानं दोन्हीकडं भात आणि नारळ मुख्य आहार असल्यानं जेवणाची पद्धत वेगळी असूनही, मला फार अडचण नाही आली. उलट मी नारळ खोवताना वगैरे त्यांच्या तोंडावर आश्चर्य असायचं. अरे हिला नारळ खोवता येतो! खाणा-खूणा, निरिक्षण यातून त्यांच्या पद्धतीच्या पाककृती समजून घेत होते. सासूबाईंनी घरातून पूर्ण निवृत्ती घेतलेली. त्यामुळं सगळा कारभार मोठ्या जावेकडं. ती माझ्या आईच्याच वयाची. तिच्याकरता महाराष्ट्र उत्तर दिशेला. उत्तरेकडचे लोक खूप तिखटजाळ, तेलकट खातात असा तिचा समज होता. त्यामुळं ती मला प्रत्यक्ष स्वयंपाक बनवू द्यायची नाही. खोबरं खोवणं, चिराचिरी याकरताची मदत घ्यायची. या सुरवातीच्या काळात माझी मोठी नणंद मला काही दिवसांकरता तिच्याकडं घेऊन गेली. तिचे 75 वर्षांचे सासरे म्हणाले, “रोज संध्याकाळी तुझ्या माहेरच्या पद्धतीचा नाश्ता किंवा जेवणाचा पदार्थ बनवायला लागेल. सामान काय लागेल ते आणून देऊ” - मी रुळण्याकरता त्यांची ही आयडीया. माझी कळी खुलली कारण तोवर मला गावी येऊन महिना झाला होता. कितीही ठरवलं तरी आपल्या जेवणाची आस असतेच ना. तिथं असेपर्यंत मला माझ्या पद्धतीचा पदार्थ या घरी रोज खाता आला. आपल्या पदार्थांना ते उत्स्फुर्त दादही द्यायचे. श्रीखंड, कोथिंबीर वडी, भरल्या मिरच्या, उसळी, गोडं वरण, टोमॅटोची भाजी, चपातीचा लाडू हे पदार्थ त्यांच्या घरच्या मेन्यूमध्ये आजही बनतात.

दर ४-५ महिन्यांनी मी गावी जाणं सुरूच ठेवलं. सासरच्या पद्धतीचे पदार्थ शिकताना त्यासंबंधीची इतर माहितीही मी घ्यायची. कदाचित माझ्या पेश्यामुळं ही सवय लागलेली. माझ्या उत्सुकतेमुळं माझ्या सासूबाई, नणंदा, जावा आणि घरातल्या पुरुषांनीही हातचं राखून ठेवलं नाही. त्यांची भाषा, संस्कृती, माहिती, माझ्या असंख्य प्रश्नांची उत्तर द्यायचे. त्यामुळं लग्नानंतर वर्षभरातच मी घरात चांगली रुळले. रोजच्या सोबत समारंभाचं जेवणंही बऱ्यापैकी बनवू लागले. ठाणे, बंगलोरच्या आमच्या घरी आलेले नातेवाईक ‘हव्याका’ पदार्थ उत्तमपणे जमत असल्याचं आवर्जून सांगू लागले. 
आता मी मराठी पाहुण्यांकरता कन्नड पद्धतीचं आणि कन्नड पाहुण्यांकरता मराठी स्वयंपाक बनवते. पण गावच्या मुख्य घरात मला प्रत्यक्ष स्वयंपाक करायला 4 वर्ष जाऊ द्यावी लागली. जरा मुरल्यावर मीच पुढाकार घेऊन तिथल्या वास्तव्याच्या काळात रोज एखादा पदार्थ करायला सुरू केलं. मला एक पक्क माहित होतं, मी विहिरीच्या आतली बेडूक नाही. माझं जग विहिरीच्या बाहेर आहे. या जगात माझी खूप चांगली माणसं आहेत. १-२ व्यक्तींमुळं आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. आणि खरंच माझ्या सासूबाई, इतर जावा, नणंदा व त्यांच्या कुटुंबीयांशी खूप छान स्नेह निर्माण झाला. मोकळ्या मनानं मला सर्व काही देतात. कोकणी मसाला, मुरांबा, वेगवेगळ्या वड्या आणि उसळींची गावी स्पेशल फर्माईश असते.

मी पक्की मत्स्याहारी आणि सासर पूर्ण शाकाहारी. माझं मत्स्याहारी असणं मी लपवलं नाही. एवढ्या मोठ्या कुटुंबात सर्वच गोड कसं असणार. तर तिखटाकरता मला दोन जावा आहेत. या दोघी माझ्या मांसाहारावरून कायम टोमणे देत. गंमत म्हणजे मोठ्या जावेचा मुलगा शहरात कोंबडीची हाडं चावायचा. लग्नानंतर ४ वर्षांनी आम्ही बंगलोरला शिफ्ट झाल्यावर तिथल्या दिर-जावांना पहिल्यांदा घरी जेवायला बोलावलं. एक जाऊ मराठी स्वयंपाकाच्या वासानं ‘कसंतरी होतंय’ असू म्हणू लागली. जेवण वाढल्यावर अगदी चमचाभर घेतलेलं जेवण नंतर दाबून खाल्लं. कोकणी पद्धतीच्या घरगुती तिखट मसाल्याला नाकं मुरडलेली आता मागून नेते.

या प्रकारांसोबत एक वेगळीच गोष्टही सुरवातीला घडली. धाकट्या नणंदेच्या घरी एका पूजेकरता मी गेले होते. जेवणाच्या पंगतीत शेजारी बसलेल्या बाईनं मी कोण, माहेर कुठलं ही चौकशी सुरू केली. मी महाराष्ट्रातली आहे सांगितल्यावर म्हणजे ‘ओ माऱ्हाटी’ असं म्हणत पंगतीतून उठून गेली. माहेर कळल्यावर असे तुच्छतेचे कटाक्ष 4-5 वेळा मिळाले. मी शेवटी घरात विचारलं काय भानगड आहे? तर कळलं की दोन-तीनशे वर्षांपूर्वी युद्धाकरता महाराष्ट्रातून आलेले काही सैनिक इथचं स्थायिक झालेत. हे लोक इथल्या वाड्यांमध्ये गडी म्हणून काम करतात. त्यांना इथं ‘माऱ्हाटी’ म्हणतात. या चौकटीतल्या लोकांकरता महाराष्ट्रातले सर्व लोक ‘माऱ्हाटी’ आहेत. शहरात वाढलेल्या आणि सामाजिकदृष्ट्या उच्च समजल्या जाणाऱ्या जातीत जन्मलेल्या माझ्याकरता हा अनुभव विचित्र होता. पुस्तकात, लेखात वाचलेली अस्पृश्यता मी प्रत्यक्ष अनुभवली. ह्या नणंदोईंना हा प्रकार कळल्यावर त्यांना खूप वाईट वाटलं. माझ्याकडं सुरवातीला म्युझियममधल्या वस्तूसारखं बघणाऱ्या नजरा; लग्नाच्या 3-4 वर्षात बदलल्या. या नजरांमध्ये माझ्याबद्दल कौतुक आणि मान असतो.

साधना तिप्पनाकजे

मुक्त पत्रकार 

आपल्याकडे असं असतं

 ‘आपल्याकडे असं असतं’, हे वाक्य लग्नानंतर जवळपास वर्षभर तरी मी ऐकतच होते. मुळातच त्या आपलेपणात आपल्याला सामवून घेतलं जातंय याचं समाधान असल्यामुळे माझ्या स्वभावाविरुद्ध करावे लागत असलेले सगळे बदलही मला काही काळ आपलेसे वाटत होते. पण हळूहळू या आपलेपणाच्या नादात फक्त आपणच बदलतोय हे जाणवू लागलं.


मी लग्न करून ४०० किलोमीटर दूर नाशिकला आले. एकाच जातीत लग्न करूनही खूप फरक आहे अनेक पद्धतींमध्ये. अगदी औक्षण करण्यापासून भाजीला वाटण कसं आणि कोणतं लावायचं इथपर्यंत. लग्न झाल्यानंतर नवीन गोष्टी जाणून घेण्याची, शिकण्याची थोडी हौस वाटली म्हणून शिकत गेले. पण आता १० वर्षात मागे वळून पाहताना कधीकधी वाटतं - अनेक बदल मनाला अजिबातच पटत नसतानाही मी केले आहेत. काही पद्धती मला मनापासून आवडलेल्या असल्या, तरी काही निव्वळ कान, डोळे बंद करून मी स्वत:वर लादलेल्या आहेत हे आज शंभर टक्के सांगू शकते. न पटणाऱ्या गोष्टी नाकारण्याची हिंमत असतानाही मी त्या केल्या. कारण काय तर, आपल्या घरचे लोक आपल्यावर प्रेम करतात, सगळं स्वातंत्र्य देतात, मग काय हरकत आहे बदलायला, हा विचार! मला वाटतं बदल करण्याची, जुळवून घेण्याची वृत्ती मुलींमध्ये झिरपत गेलीये. त्यामुळे आपण किती लहान-सहान तडजोडी करतोय हे लक्षातही येत नाही. माझ्याबाबतीतही तेच झालं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी अशाच घरात वाढले जिथे आईने स्वत:मध्ये केलेले अनेक बदल मी पाहिले. चार माणसांनी बदलण्यापेक्षा एकाने बदलणं कधीही चांगलं, हेच सबकॉन्शस माईंडमध्ये कुठेतरी पक्क बसलं होतं. ही बदल करणारी व्यक्ती नेहमीच त्या घरातली सून असते!

पुरण केलं की भजी करायचीच, दिवाळीपूर्वी कराष्टमीच्या पूजेनंतर रात्री १२ ला जेवायचं. भाजीला शेंगदाण्याचा नाही तर तिळाचाच कूट लावायचा. कढीला वरून तुपाची फोडणी, त्यात हळद नाही. लाल भोपळ्याला डांगर म्हणायचं, घोसाळ्याला गिलकं म्हणायचं, पोह्याच्या चिवड्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे, मोदकाच्या सारणात खवा हवाच असं आणि बरंच काही. , हे तुला करायलाच हवं – असा माझ्यावर थेट कोणताही दबाव नव्हता. पण लग्न होऊन आपण ज्या घरात गेलो आहोत त्या घरातील पद्धती आपल्या आहेत, ही एक मुलींमध्ये त्यांच्याही नकळत भिनलेली गोष्ट असते. मग त्या पटोत अथवा न पटोत आपण स्वीकारतो. तशा मी सुद्धा स्वीकारल्या. एक-दोन वेळा पद्धत बदलली. माझ्या पद्धतीने केलं तर, ‘आपल्याकडे या पद्धतीने इतर लोकांमध्ये करतात’ असं ऐकल्यावर मी धन्यच झाले! आता मी या बदलांना सरावलेले असले, तरी मुळात हे बदल मी केलेच का? असा विचार अनेकदा अस्वस्थ करतो. मग माहेरी गेल्यावर आईच्या हातचे पदार्थ यथेच्छ खाऊन मी ही अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला उत्साहाच्या भरात खाण्या-पिण्याच्या या बदलांचा मला झालेला फायदा एकच, की मी अनेक पदार्थ वेगवेगळ्या पद्धतींनी बनवू शकते.

खाण्या-पिण्यासोबतच इतर प्रथापरंपरा हासुद्धा घरच्या सुनांसाठी मोठा विषय आहे आणि मला वाटतं तो जरा अधिक त्रासदायक आहे. माझ्या सासरी तुळशीचं रोप लावण, वाढदिवस किंवा अन्य सणांना औक्षण करणं, बारसं करणं, वाढदिवस करणं हे सगळं कित्येक वर्षे चालत नसे. कारण त्याचा संबंध काही दुर्घटनांशी जोडला गेला होते. याउलट माझ्या माहेरी मात्र या गोष्टी मी लहानपणापासून पाहत आले होते. अखेर माझ्या पुतण्याचं बारसं घरात करून आणि कुंडीत तुळशीचं बी पेरून माझ्या सासुबाईंनी तब्बल ३५ वर्षांनी या प्रथा मोडल्या. सोमवारी नारळ वाढवायचा नाही, डोक्यावरून अंघोळ करायची नाही, शनिवारी मीठ आणि तेल आणायचं नाही, तेल आणि तूप एकत्र आणायचं नाही - असे अनेक नियम माझ्या घरी आजही आहेत. कारण मी लग्न झाल्यापासून सासू-सासऱ्यांसोबत राहते. आपण जेव्हा विभक्त कुटुंबात राहतो तेव्हा आपल्या मनाने काही गोष्टी करण्याची आपल्याला मुभा असते. पण जेव्हा एकत्र कुटुंबात असतो, तेव्हा मात्र तो संसार आधीपासूनच कोणाचातरी असतो. आपण तिथे फक्त फॉलोअर्सच्या भूमिकेत असतो. मुळात अशा प्रथा, परंपरा माझ्या माहेरी नव्हत्या का? - तर नक्कीच होत्या, आहेत. माझ्या माहेरच्या सुनेलाही त्या पाळाव्या लागत असतीलच! कारण बदल करण्याची वृत्ती आपणच पोसली आहे.

पत्रकार म्हणून काम करताना स्त्री स्वातंत्र्य वगैरेवर मी बरंच लिहिलं आहे. पण आचरणात आणणं प्रचंड कठीण काम आहे. कारण तुम्ही ‘मला हे जमणार नाही’, हे वाक्य बोलणं म्हणजे एखाद्या घराचे संस्कार नाकारणं असं समजलं जातं. मग नात्यांमधल्या इतर घरातल्या सुना हे सगळं कसं उत्तम पद्धतीने करतात याची उदाहरणं तुम्हाला ऐकवली जातात. माझ्यापुरतं बोलायचं तर मी केलेले अनेक बदल मला मान्य नसले, तरी मी ते घरच्यांच्या प्रेमापोटी केले. कारण नोकरीसाठी आणि माझ्या स्वत:च्या म्हणून काही गोष्टी आहेत, त्यासाठी मला सासरच्यांचा नेहमीच खूप मोठा आधार मिळाला (जो अनेक मुलींना अजिबात मिळत नाही). आपल्या कोणत्याही जबाबदाऱ्यांमध्ये आपण एकटे नाही आहोत, ही जाणीव तुम्हाला दुप्पट बळ देते. अगदी गुंतागुंतीच्या बाळंतपणापासून आठ महिन्यांची मुलगी सासू आणि नवऱ्याजवळ सोडून सहा दिवस ट्रेनिंगला जाण्यासारख्या अनेक गोष्टीत मला कुटुंबाची साथ मिळाली. त्यामुळे हे बदल नकोसे वाटत असले, तरी काही प्रमाणात मी स्वीकारले. हे एका पद्धतीचं निगोशिएशनच म्हणावं लागेल! पण मला न पटणाऱ्या काही गोष्टीही मी कराव्यात ही घरच्यांची अपेक्षा मला आजकाल सतत जाणवत होती. तेव्हा लक्षात आलं, की आपल्या बदल करण्याच्या सवयीला गृहित धरलं जातंय! त्यामुळे लग्नाच्या दशकपूर्तीनंतर मात्र बदल किती स्वीकारायचे आणि किती नाकारायचे याबाबत काही गोष्टी मी स्वत:शी ठरवून घेतल्या. खरंतर हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, पण खूप गरजेचं आहे!

गायत्री कुलकर्णी



सोईचं आणि सुटसुटीत

आई, आजी आणि जेवण बनवायला आवडणारी मोठी बहीण माहेरी असल्यामुळे माझा जेवण बनवण्याशी फारसा कधी संबंध आला नाही. मासे साफ करून देणं, शिंपल्या विळीवर चिरून देणं, फणसाची भाजी करायची असेल तर तो चिरून देणं, ताडगोळे पाणी बाहेर न येता सोलणं, फळे चिरणं - ही थोडीशी अवघड आणि कौशल्याची कामं करायला मी नेहमी तयार असायचे; पण गॅसजवळ उभं राहून रोजचं जेवण किंवा साग्रसंगीत स्वयंपाक यात कधी रस नव्हता. आई पण नोकरी करणारी असल्याने, लहानपणापासून पोळ्या करायला बाई होती. सकाळी सगळ्यांच्या डब्यासाठी पोळी आणि सुकी भाजी असायची. रविवारी मासे. पप्पा मासे खात नसल्याने त्याच्यासाठी वेगळं व्हेज जेवण बनायचं. माझी आई सारस्वत, वडील कऱ्हाडे, वडिलांची आई - पंढरपूरला राहणारी कोकणस्थ ब्राह्मण, तर आजोबा कोकणांत वाढलेले - हे यासाठी सांगतेय की जेवणाचे अनेक वेगवेगळया पद्धतीचे पदार्थ मला लहानपणापासून पहायला चाखायला मिळाले. घरात ह्याच प्रथा पाळल्या पाहिजेत वगैरे कुठलीच भानगड नव्हती. दिवाळीचा फराळही आम्ही बाहेरून आणायचो, फक्त चिवडा किंवा शन्करपाळे घरी करायचो. देवाचं वगैरे पाळणं असलं काहीच नसल्याने - चतुर्थीला मोदक किंवा नैवेद्य वगैरे सगळ्यावर काट होती. घरी कधी हळदीकुंकू, सत्यनारायण, गणपती, नवरात्र असले काहीच नसल्याने - भरपूर लोकांसाठी स्वयंपाक करणं वगैरेही नव्हतं.

तरीही आज जरा निरखून सगळ्या आठवणींकडे पाहिलं की जाणवतं,घरातल्या पुरुषावर स्वयंपाकघरातील कुठलीच जबाबदारी नव्हती. आईने नोकरी सांभाळून हे सगळं सांभाळायचं हे न बोलता ठरल्यासारखं होतं आणि आईनेही हे बदलण्यासाठी कधी फार आग्रह धरल्याचं मला आठवत नाही. आईने सारस्वत पद्धतीने काही केलं की ते टेस्ट करून पाहायला पप्पा फारसा उत्सुक नसायचा. अजूनही त्याला ठरावीक चवीचंच जेवण लागतं. आई शक्यतो तिच्या आवडीचे सारस्वत पदार्थ हमखास, ती एकटी असताना करायची. कारण नाहीतर तिला बाकीच्यांसाठी वेगळं काहीतरी बनवायला लागायचं. घरी मासे केल्यावर, ‘केवढा वास भरलाय” - असं एक वाक्य हमखास ऐकायला यायचंच आणि त्यात कुठेतरी हे आपल्याच घरातल्यांचं आवडतं जेवण आहे हा स्वीकार नसायचा. मला ही भाजी नको, मग मला वेगळं काहीतरी कर वगैरे नखरे माझ्यापासून सगळ्यांचे असायचे आणि आई ते का खपवून घ्यायची? असा मला आज प्रश्न पडतो. तिच्यावरचे जेवणाचे ताण मला मी जेवण बनवायला लागल्यावर प्रकर्षाने जाणवू लागले.
ह्या सगळ्या अनुभवातून, मी लग्न झाल्यानंतर जेवण बनवायला लागले तेव्हा मी माझ्यापुरत्या काही गोष्टी पक्क्या केल्या होत्या. किचन ही फक्त माझी जबाबदारी नसेल हे मी आधीच माझ्या जोडीदाराशी बोलले होते. आजही जेव्हा त्याची सुट्टी असते तेव्हा जेवण तो बनवतो. पोळ्या करायला मला खूप कंटाळा येतो . त्यामुळे पोळ्या करायला आमच्याकडे बाई येतात. त्यांची सुट्टी असेल तर मी थालीपीठ, आंबोळ्या, खिचडी काहीही करते पण पोळ्या लाटत बसत नाही. मला स्वयंपाकाची विशेष आवड नसल्याने ( फक्त माश्याचे जेवण हा अपवाद ) मी झटपट होणाऱ्या भाज्याच करते . भांडी लावायला मला कंटाळा येतो, जेवण झाल्यावर ओटा पुसणे, शेगडी पुसणे, पोतेरं फिरवणे ही माझी दोडकी कामं आहेत. ती शक्यतो नवरा करतो. आता माझा ६ वर्षांचा मुलगा पण - ताटं घेणे, पोतेरं फिरवणे - वगैरे कामे करतो. काहीवेळा जेवण बनवता बनवता मल्टी टास्किंग करतेय असं स्वतःला सांगून मी भांडी लावून टाकते. लग्नाला ७ वर्ष होऊन गेलीत तरी मी अजून घरी पुरणपोळी, गुळपोळी, मोदक, बिर्याणी, श्रीखंड, फराळ असले वेळखाऊ आयटम बनवलेले नाहीत. बाहेर घरगुती पद्धतीने बनवलेले हे पदार्थ आणून आपला किचनमधला वेळ वाचवावा आणि एखाद्या बाईला पण त्यातून रोजगार मिळावा हे मला आवडतं. हे ही लग्नाआधीच स्पष्टपणे बोलले होते. सासूची जेवण बनवण्याची पद्धत व माझी यात खूप फरक आहे. त्या किंवा मी एकमेकींकडे जातो तेव्हा - मी बनवेन तेव्हा माझी पद्धत आणि त्या बनवतील तेव्हा त्यांची ! इतका साधासोपा मार्ग काही न बोलताच ठरून गेलाय. उलट एकमेकींना वेगळ्या काही रेसिपी विचारून कधीतरी केल्याही जातात.
अजून एक मी कटाक्षाने पाळते, सगळ्यांनी एकत्र जेवायला बसणे आणि आपापलं वाढून घेणे. मी वाढपी नाही. घरी पाहुणे आले तर ‘पुरुष आधी, बायका नंतर’ - असले प्रकार माझ्या डोक्यात जातात. त्यामुळे त्यावर फुली आहे. पाहुणे येणार असतील तरीही झटपट होणारे प्रकारच मी करते. वाटलं तर २ पदार्थ घरी आणि २ बाहेरून मागवते. पण माझा किचन मधला वेळ उगीचच वाढणार नाही हे आधी पाहते. तसंच मी सारखी किचनमध्ये आणि पाहुणे बाहेर - असं होणार नाही आणि मला पण गप्पा मारायला वेळ मिळेल असेच पदार्थ मी निवडते. (उदा - पाहुण्यांना गरम गरम डोसे काढून देणे असा मेनू मी कधीच ठेवणार नाही. उलट आयत्यावेळी गरम करून खाता येतील असे पदार्थ मी करते.) बाई सुगरण असली पाहिजे वगैरे गोष्टी मला ओव्हररेटेड वाटतात. किचनचा वेळ कमी करून स्वतःला आवडेल त्या गोष्टी करायला वेळ काढण्यासाठी मी नवीन नवीन पर्याय शोधत असते. आणि हो; याचा कोणताही गिल्ट किंवा फुकाचा अभिमान मी बाळगत नाही.

सई तांबे  

 

 

 

माझ्या स्वयंपाकाची टिमकी

मला किचनमध्ये काम करताना पाहून आई खूप चिडायची. मुलांनी इकडे लुडबूड करण्याची गरज काय? असा तिचा प्रश्न असायचा. कॉलेजमध्ये असताना पुढे चहा, मॅगी करण्याची मुभा मिळाली. नंतर कधीतरी एखादी नवीन रेसिपी करून बघुयात, म्हणून किचनमध्ये गेलो कि तिचं नेहमीच पालुपद चालू व्हायचं - हा भांडी खूप काढणार, किचनमध्ये सगळा पसारा होणार, पाणी खूप उपसणार, तेल सांडवून ठेवणार वगैरे वगैरे. एकदा घरी मित्र-मॆत्रिणी आले होते, त्यांच्यासाठी जेवण बनवण्याचा प्लॅन होता, ते सगळे हॉलमध्ये बसून आहेत आणि मी किचनमध्ये घुसून बसलोय म्हणून तिला राग आला, "घरातल्या बायका बसून आहेत आणि तू बाईसारखा जेवण बनवतोय" ती माझ्यावर ओरडली. मला तेव्हा झालेल्या अपमानाचा खूप राग आला आणि लाजिरवाणं पण वाटलं. मग दुसऱ्या शहरात रहायला गेल्यावर एकटा राहून आपला मुलगा बिचारा जेवण (म्हणजे दररोज खिचडी) करून खातो, हे ऐकून तिला उमाळे यायचे.


पण मी काही जेवण बनवणं थांबवलं नाही. एक म्हणजे रोज बाहेर खाण्यासाठी पैसे नव्हते आणि दुसरं कारण म्हणजे खानावळीतला डब्बा खूपच कंटाळवाणा झाला होता. त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं कारण म्हणजे मला माझ्या हातांनी जेवण बनवायला आवडायला लागलं होतं. मग हळू-हळू आमच्यात जेवण हा एक फोनवर बोलण्याचा मुद्दा झाला. ‘कसा आहेस’ आणि ‘जेवलास का?’ या फोनवरच्या दररोजच्या अपडेट्समध्ये 'मग आज काय खाल्लं?' याची भर पडली. मी तिला कधी-कधी फोन करून तिच्या रेसिपीज विचारू लागलो, रात्रीच्या उरलेल्या चपात्यांचा चिवडा तर बेस्टच असतो तिचा, मी व्हिडिओ कॉलवर तो एकदा शिकून घेतला. ती मसाले कशी बनवते? घरात अख्खे धने नसतील तर त्याच्या जागी काय घालायचं पासून ते फ्रिजमध्ये भाज्या जास्त दिवस टिकाव्यात म्हणून ती काय युक्त्या वापरते; असं थोडं-थोडं ती शिकवत राहिली.

 हे देखील वाचा - "मेल्या पीठ नीट मळ घसरा देऊन"    

आपला मुलगा घरापासून लांब राहतोय पण तरीही माझ्या हातच्या जेवणाची त्याला आठवण येत राहते आणि त्याला आपण आपल्या खास रेसिपीज शिकवतोय याचा तिला आनंद व्हायचा खरा. पण हे सगळं त्याला ऑफिसचं काम सांभाळून, किचन लावून-आवरून करावं लागतंय याची खंत वाटायची. तिचं हळहळणं आजही सुरुच असतं. पण आमच्या इतर नातेवाईकांना ती अभिमानाने मी कसा व्यवस्थित स्वतःचं स्वतः करू शकतो, तो कुठं ही गेला तरी त्याचं जेवणाचं अडत नाही असं सांगत राहते. आणि खरंच माझं अडत नाही, मी फिरायला बाहेर गेलो किंवा दुसऱ्या देशात-शहरात असलो तरी आनंदाने पोटापुरतं बनवून खातो आणि सोबत असणाऱ्या लोकांना खाऊ घालतो. माझ्या आफ्रिकेतल्या मित्रांना मी वांग्याची मस्त शेंगदाण्याचा कूट टाकून बनवलेली भाजी खायला घातली. मी शिकवलेली मसूरची डाळ, चिकनकरी अजूनही तिथली आफ्रिकन मैत्रीण कधीतरी बनवते, मला तिच्या जेवणाचे फ़ोटो पाठवते. आम्ही मस्त गप्पा मारतो. तिला आणि तिच्या पार्टनरला आता इंडियन रोटी शिकायची आहे. (आणि मग ती शिळी करून त्यांना चपातीचा चिवडा कसा करायचा हे पण मी शिकवेन, कदाचित ते आपली हि एकदम exotic dish म्हणून खातील!).
मला जेवण बनवायला, खायला, खायला घालायला आवडतं. जेवण बनवणं, किचन आवरणं, ते नीट लावणं, भांडी घासणं, वाणसामान आणणं मला आवडतं. त्याचं ओझं न वाटता रिलॅक्स होण्याची एक ऍक्टिव्हिटी म्हणून मी एन्जॉय करतो. बनवलेल्या पदार्थांचे फोटो-व्हिडीयो काढून त्यामार्फत कौतुक मिळवतो. पण हे करण्यात मला सहज लाभलेले पुरुष असण्याचे प्रिव्हिलेजेड किती आहेत याचा मी विचार करतोय !
 एक तर जेवण शिकलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे अशी माझ्यावर कोणी कधी सक्ती केली नाही. मी बनवून खाल्लं पाहिजे अशी अपेक्षाही नाही आणि तशी अपेक्षा नसताना सुद्धा मी जेवण बनवतोय याचं अप्रूप असल्यामुळे मी करपवून टाकलेल्या चपातीची पण वाहवा केली जाते. मी आता वर्क फ्रॉम होम, ऑफिस टेन्शन, कॉल्स सगळं सांभाळून रोज घरी संपूर्ण जेवण करून खातोय याचं तर किती कौतुक! बाजरात असताना, मला कोणाला काय आवडतं याचा विचार करून कधी खरेदी करावी लागत नाही. जे मला आवडतं ते मी मस्त विकत घेतो आणि ते घेताना काटकसर, महिन्याचं बजेट वगैरेचा असासुद्धा जास्त विचार नसतो. अशा आणि इतर खूप साऱ्या मोकळीकीमुळे कदाचित माझ्यासाठी जेवण बनवणं हि एक रिलॅक्स करणारी गोष्ट झालीये. मी मस्त गाणी लावून किंवा युट्युबवर काही-बाही बघत जेवण बनवून घेतो. वीकेण्डला फोनवर मित्रांशी गप्प्पा मारता-मारता जेवण कधी बनवून होतं ते कळत देखील नाही. पण माझी ही मोकळीक जर काढून घेतली आणि सक्तीने जेवण बनवणं हे माझ्या वाटणीचं काम झालं तर मला ते ओझं होणार नाही, याची खात्री नाही.

व्यंगचित्र -शुभा खांडेकर 
रोज लवकर उठून चहा-नाश्ता, डबे, दोन-वेळचं जेवण आणि ते सुद्धा इतरांच्या आवडी-निवडी, वेळा, पथ्य सांभाळून बनवणं किती टेन्शनचं आणि जबाबदारीचं काम आहे. माझी आई आणि ताई हे कित्येक वर्ष करत आल्यात, करताहेत. पण बहुतेक वेळा त्यांची कामं अदृश्य राहतात. मला आठवतंय लहानपणी एखाद दिवशी जेव्हा आम्हाला शाळेसाठी डब्बा मिळायचा नाही तेव्हा आम्ही भावंड किती रागाने फणफणत घरा बाहेर पडायचो आणि आईचा संपूर्ण दिवस अपराधी भावनेत जायचा. आपण चांगली आई नाही - हे तिने स्वतःला दिलेलं दूषण तिला त्रास देत राहायचं.
गेल्या वर्षीच्या लॉकडाउन मध्ये मी एकदा घराच्या साफ-सफाईचं काम काढलं, किचनच्या तेलकट, चिपचिपित भिंती आणि स्वीचबोर्डवरचा मळ जेव्हा रगडून स्वच्छ पुसून काढला, भिंती चकाचक झाल्या, बोर्ड पांढरा दिसू लागला, त्याच्या बटणांवर ऑन-ऑफ लिहिलेली अक्षरं वाचता येऊ लागली. मला खूप आनंद झाला. ते काम करायला सगळा पसारा खाली काढून वर चढून तासभर मेहनत करावी लागली होती. पण आई-ताई वर्षानुवर्षे त्या भिंती, शेगड्या, काचेच्या खिडक्या, तेलाच्या बरण्या, गॅस-सीलिंडरच्या तळाच्या गंज लागत राहणाऱ्या फरश्या, मांडणीतल्या तांब्या-पितळाची भांडी, असं स्वच्छ करतच राहिल्यात आणि हे अधिकचं काम आहे आणि याची नोंद केली पाहिजे असं सुद्धा वाटलं नाही. आमच्या तर कधी हे काम लक्षात सुद्धा आलं नाही. मला प्रश्न पडतो, असलं सहज रोजच्या जेवण बनवण्याचा भाग म्हणून मी ही बारीक-सारीक कामं करेन का? आणि केलीच तरी त्या कामाची नोंद सुद्धा घेतली गेली नाही याचा किती राग येईल.
खरं म्हणजे जेवण बनवणं, ताटात वाढलं जाणं, त्याचे इंस्टाग्रामवर फोटोज पाहणं ही जेवण प्रकियेची छानशी दिसणारी बाजू आहे. थोडीशी गुलाबजाम सिनेमातल्या हिरो सारखी ! तिथला हिरो परदेशातून भारतात स्वतःचं पॅशन शोधायला येतो, इथलं 'अस्सल' जेवण एका खाणावळ चालवणाऱ्या बाईकडून शिकतो, त्याला सुंदर स्वरूप देतो आणि मग त्याचं स्वतःचं रेस्तराँ अमेरिकेत सुरु करतो. जेवण बनवणं किती प्रणयरम्य आहे वगैरे दाखवलं जातं. पण जेवण-प्रकियेची दुसरी बाजू आहे जी आपल्याला दिसत नाही. ‘आपल्याला’ म्हणजे बहुतेक पुरुषांना दिसत नाही, ती बाजू असते ताटातल्या त्या सुंदर जेवणामागच्या पसाऱ्याची! 
जेवण झाल्यानंतर किचनसिंकमध्ये जमा झालेल्या उष्ट्या भांड्यांची, भाज्यांच्या साली, दांड्या, टरफलं यांनी भरून गेलेल्या कचऱ्याच्या डब्याची, दुधाच्या पिशव्या, दळणं, मसाले यांच्या आठवणींची, किराण्याच्या सामानाच्या याद्या, त्यांची बिलं नीट एकत्र करून फ्रिजवरच्या सुंदर विणलेल्या रुमालाखाली जपून ठेवलेल्या घड्यांची. ही दुसरी बाजू अदृश्य असते, आकर्षकतेच्या भासाच्या खाली ती दडपवून टाकलेली असते. ही बाजू घामाने भिजलेली, कोंदट आणि दमलेली असते. नीरज घायवान याने दिग्दर्शित केलेल्या 'ज्यूस' लघु-चित्रपटात ही बाजू उत्तमपणे मांडलेली आहे. किचनमध्ये घामाघूम झालेली, वैतागलेली नायिका हॉलमध्ये येऊन कुलरची थंडगार हवेचा अनुभव घेण्यासाठी आसुसलेली आहे. तर या वर्षीच्या गाजलेल्या मल्याळम 'द ग्रेट इंडियन किचन' चित्रपटातली नायिका किचन बेसिनच्या खराब नळाने त्रस्त झालीय. तिथून सारखं सांडपाणी बाहेर येत राहतं, तो तुंबत जाणारा सिंक आणि त्याचा येणारा घाणेरडा वास सगळं तिच्या सहनशक्ती पलीकडे जातंय . हे दोन्ही सिनेमे पाहताना, पुरुष असल्यामुळे मला मिळालेले ट्रम्पकार्ड किती पॉवरफुल आहे हेच अधोरेखित होत गेले. या प्रिव्हीलेजसना वेगळं करून मला माझा किचन मधला वावर सहज करता येईल का? जेवण, किचन आणि घर सांभाळणे हे एक अनेक जीवन जगण्याचे कौशल्यांपैकी एक म्हणून शिकता-शिकवता येईल? इतरही ते तसेच जेंडर-विरहित पाहू शकतील? असे प्रश्न या निमित्ताने पुढे आले. मला वाटतं, स्त्री-पुरुषांच्या कप्प्यांमध्ये विभागलेल्या कामांना बदललं गेलं पाहिजेच पण त्यासोबतच या लिंगभेदाच्या मुळाशी असलेल्या पितृसत्तेला उपटून टाकता आले पाहिजे. या सत्तेने स्त्रियांना जशी ही कामं आपलीच आहेत म्हणून त्यांना निभावत राहायला भाग पाडलंय तसंच पुरुषांना किचन पासून लांब ठेवलं. हे तेव्हाच बदलेल जेव्हा माझ्या घरातली नवीन पिढीतली मुलं-मुली सगळीच काम लिंगभावाचा कुठलाही चष्मा न घालता सहजपणे करू शकतील. आणि हे होऊ शकतं याचा मला विश्वास आहे.
ता.क. - पॉवरची पण किती गंमत असते! मी प्रिव्हीलेज्ड भूमिकेतून जेव्हा हे सगळं लिहितोय, माझ्या पॉवरची कबुली देतोय तेव्हा त्याचंपण कौतुक केलं जाणार हे माहित असल्यामुळे असं लिहिणं, व्यक्त होणं सोप्पं तर आहेच पण त्याहीपेक्षा नवीन कौतुक मिळवण्यासाठी उपयुक्तपण आहे.

सुनील गंगावणे 

 

 

मदत नव्हे भागीदारी

फोटो - श्रीनिवास पतके 
 एक पक्षी त्याच्या उडायला शिकलेल्या पिल्लाला चोचीने भरवत होता. लेक म्हणाली, “बघ. पक्षी सुद्धा मोठ्या झालेल्या पिलाना भरवतात. तुला कधीतरी सांगितलं तरी भरवत नाहीस.” तिला म्हटलं, ‘पक्षी करतीलही पिलांना भरवण्याचे लाड. त्यांना काय शिजवायचं, भाजायचं, तळायचं नि लाटायचं; थोडक्यात स्वयंपाकाचं काम थोडंच असतं?’ स्वयंपाक म्हणजे साहित्याची जमवाजमव, नसेल त्याचा पर्याय शोधणे, पदार्थ बिघडू लागला तर त्याला रेसिपीत नसलेल्या कृतींचा टेकू देणे आणि नंतरची आवराआवरसुद्धा.

पोहे व बटाट्याची भाजी एवढीच स्वयंपाककलेची शिदोरी घेऊन मी सासरी आले. माहेरी काही भाज्यांमध्ये चवीपुरता गूळ आणि पक्वाने बेताची गोड, सासरी भाजीत गूळ नाही मात्र पक्वान्ने प्रचंड गोड. आजी पुरणपोळीत जाणवण्याइतपत सुंठ घालायची. आजीच्या कोकणी स्वयंपाकातला हिंग सासरी परभणीकरांनी “कसा वास येतोय? यॅक” म्हणून नाकारला. माहेरी भात मुख्य आणि वेगवेगळ्या आमट्या असायच्या. कांदा खोबऱ्याच्या वाटपाच्या कडधान्यांच्या आमट्या; हिरवी आमटी म्हणजे मिरची, लिंबूपाणी, शेवग्याच्या शेंगा, करकरीत भेंडी अश्या कश्यालाही हिंग मोहरीची फोडणी देऊन ओल्या नारळाचं वाटप व चिंच गूळ घालत. पण सासरी डाळ एके डाळ आणि भाकरी चुरून खाण्यासाठी पातळ भाजी. लहानपणापासून बघितलेले फुलके लगेच जमले. पण सासरी घडीच्या ‘त्रिकोणी’ पोळ्या. अगदी छान, चारही पदर सुटलेले त्रिकोण. नवऱ्याने उलगडून सांगितलेलं, “आई माहेरी गेली की नाना स्वयंपाक करायचे. चपात्या त्रिकोणी करायचे. मग तश्याच कर म्हणून आम्ही आईच्या मागे लागायचो. हळूहळू त्रिकोणी चपात्या हा आमच्या घरचा ट्रेडमार्क झाला.” माहेरी मटणासोबत आंबोळी हा खास पाहुण्यांसाठी बनवल्या जाणाऱ्या कोकणी मेन्यूपैकी एक. सासरी मटणाला भाकरीचीच जोड लागते. भाकरी ऐनवेळी करावी लागते, बिघडूही शकते त्यापेक्षा आंबोळी सेफ वाटते. पण एरवी आंबोळी प्रचंड आवडणाऱ्या नवरोजींना मी पाहुण्यांसाठी मटण-आंबोळी करते म्हटलं की पाहुण्यांच्या अपमानाचाच घाट घातलाय असं वाटतं.

स्वयंपाक हा आता माझ्या नैमित्तिक कामापैकी एक झालाय. माझं सर्वात उशीरा जेवून होतं. त्याचा फायदा घेत उरलेलं काढून ठेवणं, भांडी मोरीत टाकून भिजवून ठेवणं ही कामं मी घरातल्या मेंबरांकडून करून घेते. जेवल्यानंतरचा थोडा वेळ टिव्ही, फोनाफोनी, गप्पा यांना दिला की आवराआवरी करते. त्यामुळे आपण एकटेच काम करतोय आणि बाकीचे जेवून गप्पा हाणतायत याने होणारी चिडचिड होत नाही. बरेचदा गप्पांच्या नादात नवरा, मुलगी मदतीलाही येतात. पदार्थ करणं, खाऊ घालणं यात मी अप्रूप वाटून घेते मात्र वेळखाऊ प्रकार मला आवडत नाहीत.
बाई लेकरू जन्माला घालते, स्तन्य देते. ही जैविक जबाबदारी विस्तारत पोटाला करून घालण्याचं काम जीवनभर तिच्या मागे लागतं. आपलं नाव लावणाऱ्या लेकराच्या पोटाला करून घालायची अर्धी जबाबदारी पुरुषांनी स्वतंत्रपणे का पेलू नये? खरं तर स्वयंपाकघराची संपूर्ण जबाबदारी महिन्यातले पंधरा दिवस वा वर्षाआड पुरुषांची, असा नियम असायला काय हरकत आहे? कोणाच्या हाताशी हवं ते साहित्य, तर कोणी पाण्याला फोडणी देतं पण प्रत्येक स्वयंपाकघर रोज उत्पत्ती स्थिती लय चक्रावर स्वार होत असतं. स्वयंपाकात किती काम अंतर्भूत असतात याला साक्षी असतं. स्वयंपाकघरातील अशी बहुपेडी जबाबदारी निभवायला लागल्यास पुरुषांच्या नसत्या अपेक्षांवर आपोआप बंधने येतील. जबाबदारीचे केवळ वाटप नव्हे तर ती पूर्ण पेलण्यातील भागीदारी नवरा बायकोतील सख्य वाढवेल. स्वयंपाक हे काम मनाला सतत कार्यरत ठेवतं. त्याची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागल्याने मनाला रिकामे रहाण्याची सक्ती नसण्याचा अनुभव मिळेल. इगो, स्वप्नरंजन यांचे पुरुषी मेंदूंवरील शेवाळ दूर होईल, भावनांचा निचरा होईल, व्यक्तित्व विकासाला दिशा मिळतील. प्रत्येक संसारातील जेवणाची जबाबदारी पेलण्यातील भागीदारी निभावण्याचा नियम मानवजातीच्या खाद्यसंस्कृतीचा भाग झाल्यास जगातील गुन्हे किमान निम्म्याने कमी होतील हे नक्की!

अंतरा आनंद

 

गावाकडच्या झोपड्यातलं किचन

‘पुन्हास्त्रीउवाच’ची किचन संदर्भातील पोस्ट वाचली. त्यामध्ये फोटोत एका फ्लॅटमधील किचन जे अतिशय मोहक सुबक पद्धतीने सजवलेलं दिसलं. फक्त जेवलेले खरकटे भांडे एवढंच विस्कळीत दिसलं. पण आमचं जे किचन होतं ते असं नव्हतं! आम्ही जिथं खाल्लंपिल्लं ती जागा एवढी सुबक,स्वच्छ, जिथल्यातिथं ठिवलेल्या वस्तु - असं काही कधी नव्हतंच. जिथं चूल असायची त्या झोपड्याचा कूड वारं आल्यास चुल ईझु नये म्हणून मातीच्या चिखलानं लिपल्याला असायचा. मी एकदा कुडाला टेकन देऊन झोपले रातरचं, अन माय पाटल्यावर वाटण वाटायला गेल्याली; तवर मह्या केसाच्या झुंग्यात नाग येटाळा घालून बसला होता अन आम्ही पाळल्याला बोका त्याला पंजे मारीत होता. मायनं आयड्यानं त्यो नाग काढला होता.
आमचं घर अन किचनचं जर वर्णन आणि आम्ही सैपाक करताना आम्हांला आलेले अनुभव ईथं सांगायचं म्हणलं, तर आमची खोली मातीच्या भितीची असायची. त्याच घराच्या पुढं एक झोपडं कधी एक पाख्ख्याचं तर कधी दोन पाख्याचं - त्या झोपड्यातच पांढऱ्या मातीची चूल असायची. तुर्हाट्या पळ्हाट्यानं शेकारल्यालं जे झोपडं असायचं ना त्या झोपड्यातुन चुलीचं धुपन निघुन जायचं. चुली भवतालचं अंगण शेणानं सारविल्यालं असायचं. आमची चूल घरात नसायची कारण पत्रे काळे व्हायचे. घरातले कपडे, दोनचार डब्बे काळे व्हायचे अन एकच दरूजा असल्याने घरात सारं धुपन कोंडुन रहायचं. पण पावसाळ्यात झोपडं गळायला लागलं की मंगच चूल घरात असायची. तच्यामुळं डोळ्यात लय पाणी यायचं, डोळे दुखायचे.
माईला मटनाचा खेमा आवडायचा. मंग तच्यात मेथीची भाजी टाकून माय लय नादर बनवायची. तिला तव्यात केल्याली मेथीची भाजी हमखास आवडायची. आमच्या घरात तवा साधं कुकर पण नसायचं. तच्यामुळं मटण म्हणलं की यरवाळीच चुलीवर शिजु लावावं लागायचं. तच्यासाठी भगुण्याला माती लाऊन ते चुलीवर ठिऊन चुलीला ढणढण जाळ पेटु लावला की मंग दोनचार घंटे शिजायला लागायचं. ह्या यरवाळी मटण शिजविण्याच्या नादात मह्या एकुनत्या एक भावाचा चुलीतल्या जळत्या लांबलचक काडीवर पाय पडुन ती पेटती काडी तच्या नड्डयाला चिटकुन भाऊ लय जळाला होता. 
मटण शिंदण्याला जास्त येळ लागत नसं. वजडी शिंदायला लय येळ लागायचा. म्हजी सारविलेल्या अंगणात घागरभर पाणी दोन भगुने घेऊन ती वजडी निटनाटकी कराव लागयची. त्याचे इळकीला चिकटलेली चाटीबोटी मांजरीला खाऊ घालायचे. मटण शिंदीतानी चाटीबोटी काढताना इळकी लागायची अन बोटं कापायचे. मग कवा तच्यात हळद तर कवा माय हटकुन पाटल्यावर वाटायला लावायची. का? तर त्यानंच जखम रहायची, असं ती म्हणायची. मटणाच्या कोड्डयाश्यात भाकर चुरून काला करून खाल्लं की, कापल्याल्या बोटात तिखट रसा जाऊ नये म्हणून ते बोट वर करून खायचोत.
आमच्याकडं फ्रीज, मिक्सर, ग्रायंडर असं नव्हतं; सरळसरळ पाटल्यावरचं वाटण वाटुनघोटून कोड्डयाश केलं जायचं. फ्रीज नसल्यानं रातरचं उरल्यालं शिळं कोड्ड्याश इटु नये, म्हणुन माय टोपल्यात पाणी टाकुन त्यात ते भगुनं ठिवायची. कवाकवा फेस आल्याल्या कोड्डयाश्याचा वास घरात सुटायचा अन मंग ते उकाड्यांवर फेकून द्यायचो.
आमच्या सैपाक घरात कुडाच्या शेजारी एक माचुळी तच्यावर सरपण त्याच कुडाला एक लाठणं, पिठलं हालवायची तुर्हाटीची तिन फनगड्याची काडी खोसल्याली असायची. बाजुलाच एक मातर्याच्या जवारीच्या कनिगं एक पिठाचा डब्बा, लाल मिरच्याची पिशवी, मीठमिरच्याचे सामान. घरात चारदोन लोटके, उतरंडीला मीठ मसाल्याचे गाडगे अन त्या खड्याच्या मीठात चार दोन रूपये लपून ठिवलेले. 
पण मायीच्या पेटीत दोन पितळाचे ताटं,दोन लोट्या एक मोठं भगुनं एक पळी असायची. पाण्याची एक गंगाजमुना घागर असायची. माय ह्या वस्तु घरात कमी पण गहान ठुयला जास्त वापरायची. एक घागर,एक मोठं भगुनं असच गावातल्या सावकाराकडं डुललं होतं म्हणं. 
तर आमच्या घरात सैपाकासाठी जे भांडे असायचे ते लयमटे नसल्याने तेचतेच धुऊन घासून वापरायचोत. जे खरकटे भांडे घासायला पडायचे, खासकरून मटणाने आळलेले - ते घासायचा लय कटाळा यायचा. मी घाशीन का बहिण घाशीन, यावरून लय भांडणं व्हायचे अन ह्या नादात तेच भांडे कुतरे चाटुन जायचे. कारण चुलीवरचे काळेझर झालेले भगुने घासुच वाटत नसत कारण हातं काळे होयचे. उजव्या हाताचे नखं तुटुतुटु अर्धैच रहायचे. आजही गावाकडच्या बायांचे नखं बघीतल्यावर हे दिसतं. अन हे खरकटे भांडेबासणं घासण्यासाठी आजच्या सारखे विम बार, एक्सपर्ट, पिंताबरी न् निरनिराळ्या घासण्या असलं कुठं काय होत आमच्या घरात? नारळाच्या शेंडींची चोळणी चुलीतली राख,बारीक कुटलेल्या कोळशाचा भुगा,जून्या चौकटी इटकरीचा भुगा त्यात जरासा सोडालिंबु टाकुन भांडे घासायचोत.आज बी कोळश्यानं जर्मलचे भगूने, इटकरीनं पितळाचे, राखानं इस्टीलचे भांडे घासले की चमाचमा चमकतेत.
आज थोडासा बदल घरात झालाया म्हणा! गावाकडच्या बाया चुलीवर भगूने काळे होऊ नयेत म्हणुन चूलीवर घडगी ठेवत्यात त्यानं भुगुण्याचं फक्त बुडच काळे होते. आजपण बाया पाटल्यावर वाटत्यात, पण मिरच्याऐवजी भुरकी असते मसाल्यासोबत वाटायला. आज मी जास्त भांडे घासत नाही. मी मटनही शिंदीत नाही. माझा नवरा मला ह्यात मदत करतो. आमचं किचन शहरातल्या, श्रीमंत बायांच्या किचनसारखं सुखसुविधानं भरलेलं नसायचं. जसं होतं तश्यातच दिवस काढुन मोठे होऊन जगत आलोत. आज दोघं नवरा बायको दोघं ही ज्याला जे जमतंय ते सैपाक घरातलं काम करतोत.

सत्यभामा सौंदरमल

सचिव,
निर्धार सामाजिक संस्था
बीड

भेंडीची भाजी... ते... 'मॉडर्न लव'

फोटो - श्री पतके 
मी अकरावी बारावीत असताना आमच्याकडे मेस होती. इंजिनिअरिंग कॉलेजची बॅचलर मुलं आमच्याकडे जेवायला यायची. मुंबईतलं आमचं ते चाळीतलं छोटंसंच घर असलं तरी बहुतेक मुलं घरी येऊन जेवायची, डबे क्वचित काही जणांना जायचे. रोज घरातल्या सगळ्यांचा आणि मेसचा असा मिळून पंचवीस, तीस लोकांचा स्वयंपाक असायचा. आम्ही पाच बहिणी आणि आई अशा सहाजणी असल्याने कामं वाटून घेतली जात. पण माझी ‘पाकप्रतिभा’ बघता मला लसूण सोलणे, भाज्या निवडून देणे, भांडी घासणे, पीठ मळून देणे अशी लिंबूटिंबू कामं दिली जात. पण एकदा काही तरी कारणाने भाजी करायची वेळ माझ्यावर आली. समोर होती भेंडी! भरलेली भेंडी करणे मला शक्य नसल्याने मी चिरुन भाजी करायचं ठरवलं. भेंडी धुवून पुसून घेतली, नीट कोरडी झाल्यावर चिरली. त्याला खमंग फोडणी दिली, त्यात भेंडी नीट परतून घेतली. अंदाजे मीठ, हळद वगेरेही घातलं होतं. आता भाजी शिजायला पाणी तर घालावंच लागेल ना...असं म्हणत मी त्यात तांब्याभर पाणी ओतलं आणि झाकण ठेवलं. तोवर माझ्या बहिणीची कोशिंबिर करून झाली आणि पाचेक मिनिटांनी तिने कढईवरचं झाकण काढून पाहिलं तर त्यात तो शेंबडासारखा चिकट द्रव! मला ज्या काही शिव्या बसल्या की काही विचारू नका. प्रसंगावधान राखत माझ्या बहिणीने पटकन सुकं पिठलं केलं ... पण सगळी भावंडं मला इतकी चिडवू लागली की बास्स! नेमकं तेवढ्यात माझा क्रश असलेला मुलगा जेवायला आला. घरातल्या सगळ्यांनीच त्याला माझा प्रताप सांगून ती कढईच दाखवली. तो पण इतका हसत  सुटला... जेवताना त्याला दोन तीनदा तरी ठसका लागला असेल. माझ्या बहिणीनी त्याच्यासमोर माझा पचका केल्याने माझा अस्सा पापड मोडला होता की दोनचार दिवस मी त्याच्यासकट कुणाशीच बोलले नाही.
नंतर तो माझ्यासाठी मेतकूट घेऊन आला आणि माझा राग शांत झाला. आमच्या घरचाच एक सदस्य झालेला हा मित्र बऱ्याचदा रात्री आमच्या घरी गप्पा मारत थांबायचा. मग गप्पा मारता मारता लसूण सोलून द्यायचा, भाजी निवडायला मदत करायचा. त्याची अशी स्वयंपाकातली लुडबूड मलाही आवडायची, तो कधी कधी त्यांच्याकडच्या खानदेशी रेसिपीही सांगायचा. आमचं 'काही तरी खास सुरू आहे' असा अंदाज मेसवर येणाऱ्या आमच्या काही कॉमन मित्रांना आला होता, तर ते त्याला डबेवाली म्हणून अधून मधून चिडवत असत, तेही मला फार गोड वाटायचं. खरंतर खूप गप्पांव्यतिरिक्त आमचं खास काही सुरू नव्हतं, कदाचित झालं असतं पण तोवर त्याचं इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष संपलं आणि पुढे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी तो पुण्याला गेला आणि आमच्या किचनमधल्या खास मैत्री कम पोन्टेशियल लव्हस्टोरीचा तिथेच अगदी फिल्मी दि एन्ड झाला!

पुढे मग लहान बहिणीने, आईने शाळा घेतल्यावर काही भाज्या वाफेवरच शिजतात, त्यासाठी पाणी घालण्याची गरज नसते, याचा साक्षात्कार झाला. पण तरीही पुढे मला कोणतीच भाजी बनवण्याची जबाबदारी कोणी दिली नाही. असंही मला स्वयंपाकाची खास आवड नाहीच. पण वेगवेगळ्या पदार्थांबद्दल माहिती, पाककृती, खाद्यसंसंस्कृती बद्दल वाचायला मात्र मला आवडतं. स्वयंपाकाबद्दल वाचणं माझ्यासाठी स्ट्रेसबर्स्टर आहे. आता मला वरण, काही आमट्या, भात, भाज्या, खाण्या लायक चपात्या, छोट्या भाकरी बनवता येतात. रोज करत नसले तरी जेव्हा कधी स्वयंपाक बनवण्याची वेळ माझ्यावर येते, तेव्हा मी तो विनातक्रार आणि बरा करते. तीनचार वर्षे पुण्यात एकट्याने राहताना बऱ्याचदा स्वतः स्वयंपाक करण्याला काही पर्यायही नव्हता. 
मग मी काही युक्त्या शोधून काढल्या. पौष्टिक आणि कमी वेळात, कमी घटकांत बनणारे वन डिश मिल्स बनवू लागले. सगळा साग्रसंगीत स्वयंपाक मी वेळ पडेल तेव्हा करतेही, पण त्यात वेळ खूप जातो. एक तर स्वयंपाकाच्या बाबतीत माझ्या हाताला उरक नाही, त्यामुळे अशी वेळ येते तेव्हा मी सरळ कुकरमध्ये डाळ, तांदूळ, बटाटे शिजायला घालते. एकाचवेळी हे तिन्ही शिजलं की फक्त वरणाला फोडणी घालणं आणि उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी. मग चपात्या बाहेरून मागवणं शक्य असेल तर मागवायच्या नाही तर स्वतः करायच्या. वरण भात, भाजी, चपाती सगळं तुलनेने पटकन तयार होतं. एखादवेळी कोणी पाहुणे येणार असले आणि पूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर पडली की तेव्हाही मीच हाच मेनू करते फक्त बाहेरून मागवलेलं श्रीखंडाची त्यात भर पडते. अगदीच खासे पाहुणे असतील तर चपातीऐवजी पुरी करणं..आणि तेही शक्य नसेल तर हुशारीने बुंदी रायता, पापड भाजणं असे सोपे पदार्थ काम करतात. खूप न करताही आपण काही तरी स्पेशल केलंय, असा आभास तयार होतो. आता अर्थात मी आणखी काही भाज्या, काही रेसिपी शिकले आहे, पण त्या तब्येतीने कराव्यात, एवढा वेळ माझ्यापाशी कधीच नसतो. खाणं ही प्रत्येकाची मूलभूत गरज असल्याने त्यात लिंगनिरपेक्षता असावी आणि प्रत्येकाने किमान पोट भरता येईल इतकं आत्मनिर्भर असावं असं मला वाटतं.
स्वयंपाकाशी निगडित मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे बाजारातून भाज्या खरेदी करून आणणं आणि निवडणं. खासकरून पालेभाज्या निवडायला मला खूप आवडतं. ही माझ्यासाठी एक थेरपीच आहे जणू. आमच्याकडे भाज्या निवडायचं काम मी नियमितपणे करते. याव्यतिरिक्त किचनमधली बाकी कामं मला फारशी आवडत नाहीत. वाटण करणं, शेंगदाणे भाजून कूट करून ठेवणं, दळण करणं, वाणसामान सगळ्या बरण्यात भरून ठेवणं, किचनची साफसफाई हे फारच कंटाळवाणं वाटतं. मला किचन स्वच्छच लागतं पण उगीचच रैक पुसत बसणे, सतत काही तरी भराभर करणे, सतत ठेवणीतली भांडी घासायला काढणे हे प्रकार डोक्यात जातात. असं करणाऱ्या सगळ्या बायकांना थोडासा रिकामा वेळ मिळाला तर हे सगळं करण्यापेक्षा एखादं छान पुस्तक वाचत लोळत पडता येत नाही का? असा प्रश्न नेहमी पडतो.

आता मी शोधलेल्या काही युक्त्या

मी दोन दिवसांच्या काकडी, गाजर, बिटाच्या स्लाईस करून वेगवेगळ्या एअरटाईट डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे दुपार संध्याकाळ दोन्ही वेळा चिराचीर करण्याचा वेळ वाचतो. पूर्वी मला कामं करताना वेळ वाया जातोय, असं वाटायचं. इतक्या वेळात मी किती लिहिलंवाचलं असतं, असं सारखं वाटायचं. मग मी पॉडकास्ट किंवा स्टोरीटेलवरच्या स्टोरीज किंवा नॉन फिक्शन ऑडियो बुक ऐकण्याचा मार्ग शोधून काढला. कालच मी पीठ मळताना न्यूयॉर्क टाईम्सचं 'मॉडर्न लव' हे कोरोनाकाळातल्या प्रेमावरचं पॉडकास्ट ऐकलं. किचनमध्ये काम करताना एप्रन वापरते. एप्रनच्या खिशात मोबाईल ठेवता येतो आणि इयरफोन्स कानात घालून चांगली पॉडकास्ट ऐकता ऐकता काम करता येतं. त्यामुळे किचनमधलं कामही होतं आणि त्यात एकदोन तास वाया गेल्याची भावनाही येत नाही.

प्रियांका तुपे 
पत्रकार 

विसरलेले खाद्यपदार्थ: स्थलांतरांचा परिणाम

मानवी स्थलांतरामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्कॄतीचा संकर होतो आणि नव्या संस्कॄती निर्माण होतात हे सर्वश्रुत आहे. याला खाद्यसंस्कॄतीचाही अपवाद नाही. या प्रक्रियेत काही पदार्थ टिकतात. काही पदार्थ पूर्णपणे विस्मॄतीत जातात. काही पदार्थ तेच राहिले तरी ते पदार्थ तयार करण्याच्या पध्दतीत बदल होतो. अनेकदा घटक पदार्थ बदलतात. त्यामुळे त्या पदार्थांचे नाव जरी तेच राहिले तरी रूप, रंग आणि चव याबाबतीत सर्वस्वी भिन्न पदार्थ खाल्ले जातात. 
याचे एक उदाहरण म्हणजे विदर्भाच्या खेडोपाडयात केली जाणारी तुरीच्या डाळीची खिचडी. तिकडे डाळ , तांदूळ , मीठ आणि हळद एवढेच घालून खिचडी बनवतात. ती तळलेल्या मिरच्या सांडगे आणि फोडणीचे तेल याबरोबर खातात. पण विदर्भातली मंडळी खानदेशात स्थलांतरित झाली की मसाल्याची खमंग खिचडी खायला लागतात. पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित झाली की तूरीची डाळीच्या ऐवजी मूगाची डाळ वापरतात. त्यात भाजलेलं जिरं आणि खोबरे वाटून घालतात. त्यावर ओले खोबरे आणि कोथिंबिर पेरतात. गुजराथमध्ये गेली तर डाळतांदूळ भाजून लवंगा, दालचिनीची फोडणी घातलेली आणि घोटलेली खिचडी खायला लागतात. म्हणजे स्थलांतराच्या प्रक्रियेत साधेसुधे कोणतेही आभूषणे नसलेले पदार्थ अगोदर विस्मॄतीत जातात.

खीर कानवले 
किचकट प्रक्रिया असलेले पदार्थ देखील विस्मरणात जातात. जसे की जळगाव कडचे दराब्याचे लाडू किंवा विदर्भातले कानवले या दोन्ही पदार्थांचा आकार, चव, करण्याची पध्दत सगळंच वेगळं आहे. दराब्याचा लाडू हा गोड पदार्थ तर कानवला हा रूमाली रोटीसारखा पदार्थ असतो. हे दोन्ही पदार्थ करण्यासाठी गहू ओलावून त्याची सपिठी काढावी लागते आणि दोन्ही पदार्थ तयार करण्यासाठी खास सुगरणीचा हात लागतो. तेच पुरणाच्या किंवा तूप साखरेच्या मांडयाचेही आहे. हे तीन्ही पदार्थ एका ठिकाणावरून दुसऱ्या गावी किंवा गावातून शहरात गेल्यावर केले जात नाहीतच आणि त्याच बरोबर ते आजीआईकडून मुलीकडे किंवा सुनेकडेही स्थलांतरित होत नाहीत त्यामुळे घरातल्या स्वैपाकघरातून ते कायमचे लुप्त होतात.
काही विस्मॄतीत गेलेल्या पदार्थांचा सबंध ते बनविण्यासाठी आवश्यक असर्णाया घटक पदार्थातही असतो. उदाहरणार्थ लातूर उस्मानाबादकडे केलं जाणारे ‘पोकळयाचे पाणी’ ही पातळ भाजी मुंबईत करणे शक्यच नाही. बोरं घालून केलेली पालकाची भाजी, मसालेदार पोपटयाची भाजी, चंद्रपूर गडचिरोलीकडे केला जाणारा साधारण कांजीवडया सारखाा दिसणारा पण वेगळया चवीचा ‘डाळीचं पाणी’ हा खरं तर करायला सोपा असलेला उडदाच्या डाळीचे वडे आणि त्यावर कट असा आपल्या कटवडयासारखा पदार्थही चंद्रपूरकरांच्या पुढच्या पिढीला माहितीच नसतो. पूर्वी विदर्भामध्ये उन्हाळयात भाज्या मिळत नसत त्यामुळे हिवाळयात मिळणाऱ्या भाज्या टोमॅटो, पालक, गवार, वांगी अशा प्रकारच्या भाज्या हळदमीठ लावून वाळवून ठेवत. त्यांना खूला म्हणत. अशा भाज्या घरोघरी मोठाले डबे भरून ठेवलेल्या असत. उन्हाळयाच्या दिवसात या खूलाच्या तिखट आणि मसालेदार तर्रीदार भाज्या खात. आता दळणवळणाची साधने वाढल्यामुळे खेडोपाडयातही उन्हाळयात भाज्या मिळतात. त्याचप्रमाणे ऋतूनुसार मिळणाऱ्या हंगामी भाज्यामध्ये रानभाज्यांच्याही समावेश आहे.

कुर्डू, शेवळा, टाकळी सारख्या भाज्या शहरात सहसा मिळतही नाहीत एवढेच कशाला सहयाद्रीच्या खोऱ्यात अगदी विपूल प्रमाणात उगवणाऱ्या आवाळू, तोरणे, धामण्या, कांगूण्या सारख्या फळभाज्यानाही मागणी नसल्यामुळे आणि जंगले नष्ट होण्याच्या अमर्याद कारणांमुळे ही रानफळेही आता जंगलातही क्वचितच मिळतात. वास्तविक कांगूण्याचे निळे सरबत उष्णता वाढल्यामुळे होणारे आजारही कमी करते. त्या भागातून माणसे शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडली की या चिमणचाऱ्याची चवही विसरून जातात.

त्याचप्रमाणे हल्ली कितीतरी कडधान्ये आणि तॄणधान्यांच्या जाती पेरल्याच जात नाहीत. त्यामुळे ती धान्ये आणि त्यापासून तयार केले जाणारे खाद्यदार्थ दोन्हीही विलयाला गेलेले आहे. कोल्हापूरच्या भागात पूर्वी काळी गजली नावाचा तांदूळ मिळायचा. शिजवल्यावर मोगऱ्याच्या कळ्यांसारखा दिसणारा चवदार भात व्हायचा. हा तांदूळ टिकाऊ मात्र नसतो. त्यामुळे कुणी पेरत नाही. या तांदळाच्या रव्यापासून कापसासारखा फुलणारे गोड डोनट बनवले जात असत. या पदार्थाचे नावही आता कोल्हापूरात माहिती नाही.

कोल्हापूरकडच्या भागात पूर्वी करडईचे किंवा तिळाचे तेल वापरले जाई. काही सुखवस्तू घरातच शेंगदाण्याचे तेल वापरण्याची पध्दत होती. त्याचप्रमाणे विदर्भातल्या खेडोपाडयात जवसाचे तेल वापरत. कालांतराने या तेलाच्या घाण्या बंद झाल्या तसे हे तेल मिळणेही बंद झाले. त्यामुळे त्या तेलांचा वापर करून केल्या जाणारे पदार्थ आपोआपच विस्मॄतीत गेले.

हल्ली लोकांच्या घरांमध्ये सरसकट फुलके करतात. कितीतरी तरूण मुलांना घडीच्या पोळ्यासुध्दा माहिती नसतात, तर पाच पदरी आणि सात पदरी पोळ्या माहिती असणे दूरच. शेतात काम करणाऱ्या लोकांच्या जेवणामध्ये ताकातली भाकरी, तिथेच चूलीत भाजून ठेचून केलेल्या भाज्या असतात. कोणत्याही प्रकारच्या कोवळ्या कणसांच्या अगदी ज्वारी, गहू सारख्या धान्यांच्या उसळी किंवा खिरी आणि त्याच्या कोवळ्या धांडयांचे तुकडे करून आमटया बनवल्या जात. शेतीतला किंवा शेताजवळ चा रहिवास संपला की या पदार्थांचे अस्तित्वही आपल्या मनातून पुसले जाते. जे पदार्थ एका पिढीतून दुर्सया पिढीत किंवा एका ठिकाणाहून दुर्सया ठिकाणी स्थलांतरित होऊ शकत नाहीत असे पदार्थ विस्मॄतीत जातात. यामध्ये किती प्रकारच्या चटण्या, कोशिंबिरी, लोणची, भाज्या यांचा समावेश आहे. या विस्मॄतीत गेलेल्या अनेक पदार्थांचे औषधी उपयोग असतात. स्थानिक लोकांना ते माहिती असतात. असे पदार्थ विसरले की त्याचे औषधी उपयोग आणि त्याभोवती प्रचलित असलेल्या मिथ्यक कथाही विस्मरणात जातात.

काही पदार्थ सामुहिकरित्या बनवायचे असतात. उदा. एक मोठा भोपळा फोडून त्यामध्ये मसाला भरलेले बटाटे, कांदे, वांगी, वेगवेगळ या प्रकारच्या शेंगा आणि मिरच्या असं टाकतात मग तो अख्खा भोपळा एका मोठया तोंडाच्या मडक्यात टाकतात. त्यामध्ये ओल्या भुईमुगाच्या दाण्याचे वाटलेले भरपूर दूध टाकतात आणि मग तो शेकोटीत शिजवतात. अशा प्रकारचे कितीतरी पदार्थ आता नामशेष झालेले आहेत. अनेक घरांमध्ये कुळाचार आणि देवदेवतांचे सण साजरे करतात त्यासाठी विशिष्ट पदार्थ केले जात उदाहरणार्थ झाडीपट्टीतले आंध्र प्रदेशातून स्थलांतरित झालेले लोक नागदिवाळी साजरी करतात आणि त्यावेळी घराण्यातल्या प्रत्येक वंशजाच्या नावाचे नागदिवे करतात. वरदा महालक्ष्मीच्या नैवेद्याला आप्पाल करतात. या प्रदेशातून दुर्सया प्रदेशात स्थायिक झालेल्या नोकरदारांना असला घाट घालणे शक्यच नसते. दुसऱ्या पिढीला हे पदार्थ आवडतही नाहीत - असे पदार्थही कालौघात मागे पडतात.

पूर्वी लोक प्रवासाला जाताना बरोबर शिधा घेऊन जात. बरोबर चटण्या आणि लोणची असत. प्रवासामध्ये कुठे तरी पाणवठा पाहून तीन दगडांच्या चूलीवर वरर्णभात आणि पोळ्या रांधत. तिथे पोळपाट लाटणे नसे त्यामुळे मग कणकेचा गोळा गुडघ्यावर फिरवून पोळ्या किंवा कणकेचा गोळा वडाच्या पानात बांधून पानगे करत. प्रवासात न्यायला उपयुक्त अशा दुधातल्या दशम्या, तहान लाडू आणि भूक लाडू - म्हणजे भूक आणि तहान लागू नये म्हणून तूपात भाजलेल्या कणकेत सुका मेवा, डिंक आणि मध घालून केलेले लाडू. दुधात भाजलेले कोरडे पिठले आणि भाजलेले तांदूळदेखील एकत्र नेत. प्रावासातल्या थांब्यावर कुठे तरी पिठले भात शिजवत. धनगरांसारख्या भटक्या लोकांच्या फिरतीवरच्या साध्या साध्या खाद्यपदार्थांमध्ये किती विविधता असायची घोळूची पाने आणि लसणाची पात घातलेली भाकरी त्याबरोबर नुसते मीठ आणि तिखटाची भुकटी घातलेले आणि कसलासा पाला पाचोळा घातलेले मटण करत. असेही पदार्थ पूर्णपणे विसरलेले आहेत. तसले पदार्थ धनगर समाजातल्या सुशिक्षितांना माहिती असायची काहीच शक्यता नसते.

काही वेळेला एका सामाजिक आर्थिक परिस्थितीतून दुसऱ्या विशेषत: वरचढ सामाजिक आर्थिक परिस्थितीत गेल्यानंतरही अगोदरचे काही पदार्थ विसरले जातात. उदाहरणार्थ कोंडयाची भाकरी, मक्याची सोजी, मूग किंवा हूलग्याचे माडगे, पळसाच्या किंवा फणसाच्या पानातल्या उकडीच्या करंज्या, भाकरीचे लाडू, राजगिरा आणि गूळाच्या वडया असे कमी आर्थिक गटातले पदार्थ अधिक आर्थिक गटात गेलेल्यांच्या घरात बनवत नाहीत. माझ्या अभ्यासकाळात मला एक प्राध्यापिका भेटल्या होत्या. त्यंनी अठरा विश्व दारिद्रयातून कष्टाने शिक्षण घेतलेलं होतं. त्यंच्या लहानपणी त्या आईबरोबर घरकाम करत. आईला बरे नसले की सकाळच्या शाळेत जाण्याच्या अगोदरही त्या एखाद दोन घरी भांडयाची कामं करून जात. त्यापैकी एका घरची मालकीण त्यांना चहाच्या चोथ्यात पाणी घालून उकळून थोडी साखर आणि अगदी थेंबभर दूध टाकून चहा आणि वर्की(कडक पाव) देई. सकाळच्या थंडीत तो चहा उबदार वाटेच पण शाळेतून घरी जाईपर्यन्त त्या चहात बुडवलेल्या वर्कीचाही आधार वाटे. अजूनही त्यंना आणि त्यंच्या बहिणीला तो चहाचा चोथा टाकून उकळलेला चहाच अधिक आवडतो. कौटुंबिक किंवा वैय्यक्तिक आठवणींशी निगडित असलेले अनेक पदार्थही पुढच्या पिढीत संक्रमित होत नाहीत असे दिसते.

काही पदार्थ जोड पदार्थ असतात. काही वेळा त्या जोडया ज्या त्या घरापुरत्या मर्यादित असतात उदाहरणार्थ वर्धा नागपूरकडच्या घरात आंब्याच्या रसाबरोबर कांद्याची भजी, मराठवाडयात पुरणपोळी तर कोकणात उकडीची पोळी करायची पध्दत असते. या घरातून स्थलांतरीत झालेल्यांच्या घरात प्रत्येक उन्हाळ्यात आंब्याचा रस तर बनतो पण त्याच्या बरोबरचे हे पदार्थ अभावानेच बनतात.

स्थलांतरामध्ये टिकणाऱ्या आणि विस्मॄतीत जाणाऱ्या पदार्थाचा संबंध सत्तासंबंधाशीही असतो त्यामुळेच सुमारे अडिचशे वर्षापूर्वी स्थलांतरित झालेला चहा अजूनही टिकून आहे. पण सकाळी उठून पिण्याचे कण्हेर, लापशी, आंबिल, माडगे हे पदार्थ मात्र विस्मॄतीत जमा झालेले आहेत. आंतरजातीय लग्नांमध्येही तथाकथित उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतले पदार्थ टिकतात. मुली लग्न होऊन सासरी गेल्या की खाद्यसंस्कॄतीसकट नव्या घरातली संस्कॄती आत्मसात करणे अपेक्षित असते. विभक्त कुटुंब असले तरी नवऱ्याच्या घरच्या चवीचाच स्वैपाक होतो; मग एकत्र कुटुंबात तर विचारायलाच नको. खाद्यसंस्कॄतीच्या विस्मरणामध्ये जेंडरचा प्रभाव फारच पहायला मिळतो. सत्तासंबंधाच्या उतरंडीवर वरच्या बाजूला असलेले पदार्थ टिकून रहातात. नवरे गावाला गेले किंवा घरातली पुरूष माणसे जेवायची नसली तर बायका अगदी कमी कष्टात आणि पटकन होणारे पदार्थ करतात. उदाहरणार्थ कच्च्या मुरमुऱ्याचा मोहरीचं तेल लावलेला चिवडा, लोणचे घालून शिजवलेला भात, भाज्या घालून केलेली भाकरी, शेवयाचे कुटार, चपातीमध्ये कसली तरी भाजी घालून भाजलेल्या करंज्या, गोड सोजी असे कितीतरी पदार्थ फक्त बायकांचे पदार्थ असतात आणि त्यांच्याबरोबरच संपतात.

‘खाद्यसंस्कॄती आणि स्थलांतर’ या विषयाचे अभ्यास असे सांगतात की स्थलंतरितांच्या पहिल्या पिढीत मूळ ठिकाणचे खाद्यपदार्थ जपण्याचा अट्टाहास असतो. दुसऱ्या पिढीतल्यांना निदान त्या पदार्थांची नावे आणि वर्णन ऐकून किंवा क्वचित ते पदार्थ चाखूनही माहिती असतात. परंतू तिसऱ्या पिढीमध्ये मात्र विशेष प्रयत्न करूनच या विसरलेल्या खाद्यपदार्थांना पुनरूज्जीवन देता येते. परंतू खाद्यसंस्कॄती म्हणजे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लागणारी साधने, लागणारे घटकपदार्थ आणि महत्वाचे म्हणजे त्या पदार्थाचे सामाजिक, आर्थिक, सांस्कॄतिक आणि भौगोलिक महत्व हे ही असतंच आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या पदार्थाचे लिंगभावाशी नाते (Gender Relations). स्थलांतराच्या प्रक्रियेत खाद्यसंस्कॄतीच्या यापैकी किती आयामांना धक्के लागून ते गळून पडतात त्यावर त्या पदार्थाचे टिकणे किंवा विस्मॄतीत जाणे अवलंबून असते.
प्रस्तुत लेख ‘लेट अरूण टिकेकर फेलोशिप’ (द्वारा एशियाटिक सोसायटी, मुंबई) साठी केलेल्या 
Forgotten Food: Impact of Migration and Urbanisation ह्या अभ्यासाचा भाग आहे. 

मंजूषा देशपांडे 

सूक्ष्मजीवशास्त्रात M.Sc,
Ph.D in Women's Studies,
2002 पासून शिवाजी विद्यापीठातील लोकविकास केंद्राची संचालक



दादा नव्हे दिदीच…

सध्या बंगालच्या निवडणुकीतल्या विजया बद्दल ममता बॅनर्जी यांचं कौतुक होत आहे. पण त्यासाठी जे शब्द वापरले जात आहेत त्यातून राजकारणातल्या महिलांविषयी कोणती मानसिकता दिसते आहे? ही मानसिकता कशी बदलणार?


पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्याविरोधात प्रचाराला उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची असंसदीय पातळी गाठली. टपोरीपणा करत त्यांनी ममता बॅनर्जी यांना जाहीरपणे नौटंकी करुन संबोधलं. त्यांची देहबोली, त्यांच्या आवाजातलं नाट्य, दोन वेळा मुख्यमंत्रीपद भुषविलेल्या महिलेला मारलेला टोमणा सगळचं पदाची पातळी सोडून केलेलं वर्तन होतं. पण जेव्हा ते ही भाषा बोलत होते, तेव्हा त्यांना प्रेक्षकांमधून पुरुषांचे चित्कार प्रतिसादात मिळत होते. महिला मात्र त्यांच्या टगेबाजीला भुलल्या नव्हत्या हे व्हिडिओ वरून दिसतंय. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलेचा अपमान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ममता बॅनर्जींना 'दिदी' म्हणून टोमणे मारणाऱ्या मोदींनी सोनिया गांधींना ‘काँग्रेसची विधवा’ असं संबोधलं होतं. २०१८ मधलं त्याचं ते वादग्रस्त विधान कधीही विसरता येणार नाही. याचं कारण मोदींनी ‘विधवा’ पणाचा केलेला तो अपमान होता. “काँग्रसेची ती कोण विधवा आहे, जिच्या खात्यात सगळे पैसे जात होते”, असा प्रश्न त्यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विचारला होता. राजकीय विरोधकांवर कितीही टीका करण्याचे स्वातंत्र्य या देशात आहे. प्रश्न टीका करण्याचा नाहीये. तर त्यापलीकडे महिला सन्मानाचा आहे. राजकारणी महिलांना ते कशा रितीने वागवतात याचं   ही भाषा निदर्शक आहे! जाहीरपणे महिलाविरोधी भाषा  वापरतात,असे नरेंद्र मोदी हे एकटेच राजकारणी आहेत का? या प्रश्नाचं उत्तर खेदाने – नाही- असंच द्यावं लागतं ! सर्व पक्षांमध्ये हीच संस्कृती आहे. 
समाजातल्या ५० टक्के घटकाला जाहीरपणे कमी लेखलं तरी ते अनेकांना आक्षेपार्ह वाटत नाही. त्याबद्दल जेव्हा आम्ही लिहितो तेव्हा अगदी समविचारी पुरुष पत्रकारांपासून अनेकजण सांगतात की, हे तुमचं नेहमीचं रडगाणं उगाळत बसायची ही वेळ आहे का? जाऊदे, दुर्लक्ष करा. आपण आत्ता राजकारणाबद्दल, निवडणुकीच्या विजयाबद्दल, विश्लेषणाबद्दल बोललं पाहिजे. पण म्हणजे मुख्य प्रवाहातल्या राजकारणात वापरल्या जाणाऱ्या महिलाविरोधी भाषेबद्दल बोलण्यासाठी असा काही खास मूहूर्त काढायचा का? कधीचा आहे हा मूहूर्त? हा मूहूर्त आपण दररोज साधायला पाहिजे. 
कारण - महिलांचं संसदेमधलं, विधीमंडळातलं, राजकीय पक्षांच्या निर्णय प्रक्रियेतील स्थान हेच मर्यादित आहे. त्यामुळे सगळा पुरुषी कारभार... देशातल्या राजकारण नावाच्या गेमचे सर्व रूल्स पुरुषांनी ठरवलेले आहेत. अगदी उजव्या विचारणीला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षातही, कौटुंबिक परिघातील महिलांच्या पलीकडे महिलांचा निर्णयप्रक्रियेतला सहभाग अपवादात्मक रित्या दिसतो, याचं कारणही - राजकारण हे पुरुषसत्ताक विचारांचं क्षेत्र असल्यातच दडलेलं आहे. एखाद्या राजकीय पक्षाची ‘पुरुष आघाडी’ असल्याचं ऐकलंय का हो कधी? पण सगळ्या पक्षांची ‘महिलाआघाडी ’ असते .
“आम्ही आमच्या लेकी-सुनांना घराच्या उंबरठ्याच्या आत सगळं स्वातंत्र्य देतो हं! पण बाहेर नाही पडायचं” – असं काही लोक म्हणतात ना...तसंच आहे हे… विमेनस् विंगच्या पलीकडे मुख्य निर्णयप्रक्रियेत किती महिला असतात? हल्ली या मॅनेल्सवर (पॅनेल्स नव्हेतच ती) टीका व्हायला लागली...म्हणून प्रतिनिधीत्वा पुरत्या महिलांना स्टेजवर संधी दिली जाते. याविषयावर खूपच सविस्तर मांडणी खरतर करता येईल, पण आत्ता मी ते लिहित नाहीये. माझा मुद्दा असा आहे की, पुरुषसत्ताक मनोवृत्ती वेगळी काही नसते. समाजातील सर्व स्तरातील पुरुषप्रधान वृत्तीच्या लोकांत ती दिसून येईल. मी एप्रिल २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रचारातील भाषणांबद्दल फेसबुकवर लिहिलेली एक नोट इथे शेअर करते. “उद्धव ठाकरे यांना कुणीतरी सांगावं की, समाज / मतदार / voters हा फक्त मर्द/ पुरूष / Male / Men नसून त्यात महिला आणि तृतीयपंथीयांचाही समावेश असतो. सारखं आपलं मर्द, नामर्द अशी outdated / disconnected language बोलत असतात! किती घरात आई मुलाशी, पत्नी नवऱ्याशी, आजी नातवाशी, बहीण भावाशी, कुणीही कुणाशी मर्द / नामर्दगिरीच्या भाषेत बोलते?”
राजकारणात एखाद्याला कर्तृत्वाने कमी लेखायचं असेल तर त्याला बाईपणाशी जोडलं जातं म्हणजे ते कमकुवतपणाचं लक्षण माानलं जातं... “आम्ही बांगड्या भरल्या नाही, तो बायकांसारखा रडतो, आम्ही मर्दाची औलाद आहोत, अमुक तमुक षंढ आहे,” हे म्हणून वर “आमच्या आया-बहिणी” असंही म्हणत राहिलं म्हणजे महिलांचा सन्मान केल्यासारखा दाखवता येतो. खरंतर भाषा खूप evolve झाली आहे. राजकारण्यांनी जनतेशी संवाद साधताना जेंडर सेनसेटीव भाषा म्हणजे जाणीवपूर्वक महिलांचा सन्मान करणारी भाषाच वापरली पाहिजे. आता आपल्यात नसलेले, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी २०१४ ला एक सहज विधान केलं होतं. त्याबद्दल नंतर त्यांनी माफी मागितली...म्हणजे त्यांना माफी मागावी लागली. बलात्काराच्या खटल्यात आरोपी असलेल्या एका उमेदवाराबद्दल ते म्हणाले होते की, “... तर त्याने निवडणुकीनंतर बलात्कार करायचा होता…” तत्कालीन गृहमंत्री असलेल्या आर आर पाटील यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं की ते महिलांचा अपमान करू इच्छित नव्हते. पण कसं आहे ना, अगदी लोकमान्य टिळकांपासून ते सावरकरांपर्यंत तत्कालीन सुधारणावादी राजकारण्यांनी हे दाखवून दिलंय की महिलांचा सन्मान हा विषय दुय्यम आहे. टिळकांच्या काळातला संमती वयाचा कायद्याचा वाद असो की इतिहासाची सहा सोनेरी पाने मध्ये विनायक दामोदर सावरकारांचे ‘सद्गुण विकृती’ या चौथ्या प्रकरणात एक्स्पोज झालेले विचार असोत. ‘कुठल्याही धर्माच्या बाईवर बलात्कार करून सूड उगवावा म्हणणारे सावरकर मला नामंजूरच आहेत’ - असं विधान किती राजकारणी आज करू शकतील? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांसारख्या नेत्यांना म्हणूनच व्हिजनरी आणि क्रांतीकारी म्हटलं जातं. कारण त्यांनी महिला सहभागाचं - विकासाचं राजकारणं केलं. दिखाव्याचे, महिला लांगूलचालनाचे ढोंगी डाव त्यांनी कधी टाकले नाहीत.
जसं पुरूषाला दुय्यम दाखवायला स्त्रिलिंगी असण्याचे किंवा बाईपणाचे टोमणे मारले जातात, तसंच बाईचं कौतुक करताना पुरुषी उपमांची भाषा वापरली जाते, हे तुम्ही बघितलंय का? आत्ताच्या पश्चिम बंगालच्या निकालानंतरच्या प्रतिक्रियांकडे पुन्हा जाऊया. एक महिला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनली तर तिला 'दादा' म्हणून संबोधण्यात आलं. अनेक पुरोगामी पत्रकारांनी तिला कौतुकाने दादा म्हटलं, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या पुरूषाला 'दिदी' म्हटलेलं ऐकलंय का हो कधी? नाही ना? 'आमची मुलगी म्हणजे आमच्या घरातला मुलगाच आहे' असं कौतुकाने बोलतात तसंच हे देखील आहे. त्यात मुलगापणाचा उदोउदो अध्याहृत असतो. मुलीच्या जेंडरचा आदर मात्र हरवलेला असतो. एखादी मुलगी-बाई निर्भिड असेल तर तिला tomboy म्हणणं ही पण गावा-खेड्यात रूळली गेलेली पुरूषी भाषा आहे. म्हणजे पुरुष बनणं, हेच काय ते या जगातलं अंतिम यश असाच जणू त्यांचा दृष्टिकोन असतो. मी अशा लोकांना सांगेन की, यश मिळवलेल्या व्यक्तीला ‘स्त्रिलिंगी’ संबोधताना तुम्हाला जड वाटत असेल तर निदान जेंडर न्यूट्रल संबोधनं तरी वापरा.
‘पश्चिम बंगालचा दादा ममता बॅनर्जी’, ‘ममताही बन गयी दादा’ वगैरे स्टिंग्स वाचून, पाहून मला हसू आलं. पण चीड अजिबात नाही आली; कारण ‘दीदीओSSSदीदी’ असं अपमानास्पद संबोधणाऱ्या व्यक्तीला या देशाने पंतप्रधानपदी निवडून दिलंय! पंतप्रधान महिलांचा हा जो अपमान करतात, त्याला त्यांचा सुप्त पाठिंबा आहे, हेच दिसून आलंय. म्हणून अधिकाधिक महिलांनी राजकारणा बद्दल सजग झालं पाहिजे. ड्रेस-साडी-कपडे-कानातले-नाकातले याबद्दल जरूर बोलावंच. पण ते झालं की स्थानिक - राष्ट्रीय राजकारण, राजकीय पक्ष, तुमच्या आवडीच्या महिला राजकारणी, जगभरातल्या महिला राजकारणी, तरूण महिला राजकारणी असेही विषय चर्चेला घ्यावेत. 
माझ्या अनेक मैत्रिणी सांगतात की - ते राजकीय पक्ष, त्यांचे नेते, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, महानगरपालिका वगैरे या सगळ्यातले फरक आम्हाला कळत नाही. पेपर वाचायचा प्रयत्न करते. पण डोक्यात काही जात नाही. तर अशा मुलीना - महिलांना मला एवढंच सांगायचं आहे की, कुठूनतरी सुरूवात करा. तुमचं वय कितीही असूदे. ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधीमंडळ आणि संसद याबद्दलच्या बातम्या वाचून, गप्पा मारून सुरवात करा. तुमच्या जवळच्या पुरूषांना - भावाला, नवऱ्याला, मित्राला विचारा. अनेक ज्योतिबा असे आहेत जे महिलांना मदत करायला तयार आहेत. त्यांची मदत घ्या. नागरी भागात राहणाऱ्या महिलांनी स्वत:च्या हाऊसिंग सोसायटीच्या बैठकांना हजेरी लावावी. सोसायटीच्या किती मिटिंग्जना महिला जातात? सतत घरकामामध्ये गुरफटून अडकून जाण्याऐवजी स्वत:साठी वेळ काढावा. महिला राजसत्ता आंदोलन सारख्या संस्था या महिलांना ट्रेनिंग द्यायला तयार आहेत. तुम्हाला राजकारणात उतरावसं वाटत असेल तरी या संस्थेची मदत मिळेल. काहीच नाही तर नागरिकशास्त्राचं पुस्तक वाचून तरी समजून घ्या, पण महिलांनो राजकारणात सहभागी व्हा.
राजकीय वातावरणात महिलांना दडपण येतं कारण, रात्री उशिराच्या बैठकांना सर्व महिला हजेरी लावू शकत नाहीत. मद्यपान करत होणाऱ्या गप्पांमध्ये अनेकदा शिवराळ भाषा वापरली जाते, त्यात मिसळून जाणं सगळ्यांनाच नाही जमत. राजकारणातली ही पुरुप्रधान संस्कृती तेव्हाच बदलेल, जेव्हा अधिकाधिक महिलांचा त्यातील सहभाग वाढेल. वाईट याचं पण वाटतं की निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींनीही अपवाद वगळता या प्रश्नावर फार आवाज उठवलेला नाही. सरकारी कार्यालयातल्या महिला टॉयलेट्मध्ये दरवाजाला एक हूक लावण्यापासून ते राजकीय पक्षांच्या निर्णयप्रक्रियेत सहभाही होण्यापर्यंत खूप मुद्दे आहेत. तरी लेख संपवताना २०१९ ची आठवण सांगावीशी वाटते. 
मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ या दोन तरूण महिला खासदारांनी संसदेच्या बाहेर आधुनिक वेषभूषेत फोटो टाकले, म्हणून त्यांना ट्रोल केलं गेलं. म्हणजे भले तुम्ही खासदार म्हणून निवडून याल पण तुम्ही कसं दिसायचं, कसले कपडे घालायचे याचं स्वातंत्र्य द्यायला हा पुरुषप्रधान समाज सहजी तयार नाहीत. या दोन तरुण खासदारांनी त्याला सडेतोड उत्तर दिलंच, हे वेगळं सांगायला नको. सावित्रीमाईने दगड-शेण-गोटे सहन केले त्यातून तिने किती पिढ्यांसाठी उर्जेचा झरा तयार केलाय...तो असा सहज आटणार नाही.
PS - अशा विषयावरच्या लेखांची शीर्षकं पाहून नाक मुरडून पुढे जाऊ इच्छिणाऱ्या माझ्या मित्रांनो, भावांनो, देशवासीयांना महिला सन्मान, महिला सक्षमीकरण, महिलांना समान संधी आणि समान वेतन हे सगळं जोपर्यंत राजकारणात उतरत नाही तोपर्यंत तुमच्या घरात विकास पोचणार नाही. इतकं हे सोपं आहे आणि खूप गुंतागुंतीचं देखील . . .

अलका धुपकर 
पत्रकार
टाईम्स इंटरनेट लिमिटेड