गंदी बात

“ABCD पढ ली बहोत, अच्छी बाते कर ली बहोत, अब करूंगा तेरे साथ – गंदी बात, गंदी बात!” असं हक्काने सांगणारा शाहिद कपूर आठवतोय का? आणि ‘डिकेबोस’ला धावायला सांगणारा इम्रान खान पण आठवत असेल ना? आणि ‘विल यू बी माय छ्म्मकछल्लो?’ अशी प्रेमळ विचारपूस करणाऱ्या शाहरुखला नाही विसरलात ना? ही गाणी त्यातल्या अपशब्दांच्या म्हणजेच शिव्यांच्या वापरामुळे गाजली होती. सेन्सॉर बोर्डाने सिनेमातल्या संवादातल्या शिव्यांच्या जागी जरी ‘बीप’ करायला लावलं तरी गाण्यांमध्ये मात्र त्यांच्या नाकावर टिच्चून अनेक शिव्यांचा वापर केला गेलाय आणि ती गाणी गाजली देखील आहेत. म्हणजे प्रेक्षकांना देखील त्या शिव्या COOL वाटल्या असणार! आता इंटरनेटवर दिसणाऱ्या वेबसिरीजला तर कसल्या सेन्सॉरशिपचं सुद्धा बंधन नसतं. त्यामुळे त्यात तर शिव्यांचा मुबलक वापर केला जातो आणि त्यावर प्रेक्षकही फारसा आक्षेप घेत नाहीत. निवडणुकीच्या काळात राजकीय नेते भाषणातून प्रतिपक्षावर अगदी हसतहसत अपशब्दांचे वार करतात. तरुण वयात अनेकजण सहज, गंमत म्हणून किंवा थ्रिलसाठी किंवा कधीकधी फक्त दोस्ती दाखवण्यासाठी शिव्या देत असले तरी अजूनही पालक आपल्या मुलांना ‘शिव्या देऊ नये’ असंच शिकवतात. म्हणजे अजूनतरी शिव्या देण्याला – गंदीबात – मानलं जातं आहे.

पण गेल्या काही वर्षांपासून अपशब्दांच्या वापराबद्दल जे सामाजिक संशोधन झालं आहे त्यातून असे निष्कर्ष निघाले आहेत की माणसाच्या निरोगी जगण्यासाठी शिव्या आवश्यक आहेत. अपशब्द वापरताना एंडॉरफीन संप्रेरकांचा स्त्राव होतो. त्यांना Feel Good रसायने असंही म्हणतात. तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी शिव्या किंवा अपशब्द वापरल्याने माणसाचा तणाव कमी होतो, वेदनेपासून सुटका मिळाल्यासारखं वाटतं, हताश होण्याऐवजी परिस्थितीवर ताबा मिळवण्याचा हुरूप येतो आणि काही अंशी रक्तदाब स्थिरावण्यासाठी मदत होते – असं काही मानसोपचार तज्ञांचं निरीक्षण आहे. शिव्या घालून भावनांचा निचरा करून टाकला तर शारीरिक हिंसा टाळता येऊ शकते अशीही शक्यता काहीजण सांगतात. 
म्हणून अपशब्द वापरणे हा एक मनोवैज्ञानिक उपचारसुद्धा आहे – असं काही विचारवंताना वाटतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जवळजवळ हेच सगळे फायदे रडण्यामुळेसुद्धा होऊ शकतात. रडण्याच्या क्रियेविषयी देखील जगात बरंच संशोधन झालेलं आहे. रडणं हेसुद्धा उत्कट अभिव्यक्तिचं माध्यम असतं. तीव्र वेदनेच्या किंवा भावनिक उद्रेकाच्या प्रसंगी जेव्हा रडू फुटतं तेव्हादेखील एंडॉरफीन संप्रेरकांचा स्त्राव होतो, रडल्यामुळे माणसाचा तणाव कमी होतो, वेदनेपासून सुटका मिळाल्यासारखं वाटतं आणि मनस्थिती सुधारते. रडणाऱ्या व्यक्तीची असहायता लोकांना दिसून येते आणि अशा व्यक्तीला लोक मदत करायला पुढे येतात.
अशा प्रकारे शरीरशास्त्रीयदृष्ट्या जरी रडणं आणि शिव्या देणं यात खूपच साम्य असलं तरी दोन्हीच्या बाबतीतला सामाजिक दृष्टिकोनात मात्र प्रचंड तफावत आहे. रडणं हे सामान्यत: बायकांचं काम समजलं जातं आणि शिव्या देणं हा मर्दानगीचा आविष्कार मानला जातो. मागच्याच वर्षी रडण्याविषयी जगातल्या पाच देशात झालेल्या ताज्या संशोधनातही असं दिसलं की स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक सहजपणे, जास्त वेळा आणि जास्त तीव्रतेने रडतात. याचा अर्थ स्त्रिया फक्त रडतात आणि पुरुष नुसत्या शिव्या देतात; असा होतो का? अर्थातच नाही! भांडताना कचकचून शिव्या देणाऱ्या बायका सगळ्यांनीच पाहिल्या असतील आणि अनेकदा पुरुषही भावनिक होऊन डोळे पुसताना दिसतात. तरीही आयुष्यात कठीण प्रसंग ओढवल्यास पुरुषाने न डगमगता खंबीरपणे उभं राहावं आणि जिवाचा कितीही संताप झाला तरी बाईने आवाज चढवून बोलूदेखील नाही अशीच अपेक्षा साधारणपणे केली जाते. पुरुषांनी राग व्यक्त करायला आणि स्त्रियांनी असहायता व्यक्त करायला समाजाची आडकाठी नसते.

पण अगदी लहान मुलगा देखील रडत असेल तर त्याला – “रडतोस काय मुलीसारखा?” असं ऐकवलं जातं. मुलाचा पुरुष होताना त्याने आक्रमक असले पाहिजे असंच त्याच्या मनावर बिंबवलं जातं. पितृसत्ताक समाजात पुरुषाला कुटुंबाचा संरक्षक म्हणून भूमिका निभवावी लागते. त्यासाठी घराबाहेर पडून जेव्हा संघर्ष करावा लागतो तेव्हा चारदोन रट्टे देण्याघेण्याची, अरेलाकारे करायची तयारी ठेवावी लागते. जो पुरुष आक्रमक नसेल त्याला बुळया, बायल्या, नेभळट - असं चिडवलं जातं! कधीकधी ‘छक्का’, ‘हिजडा’ असे काही शब्द पुरुषांचा अपमान करण्यासाठी वापरले जातात. कधी कधी पुरुषाच्या निष्क्रियतेचा धिक्कार करण्यासाठी त्याला - बांगड्या भर - असं सांगितलं जातं किंवा ‘षंढ’ म्हटलं जातं. म्हणजे त्यांची बायकांशी आणि तृतीयपंथीयांशी तुलना केली जाते.

आक्रमक भाषा किंवा अपशब्द वापरल्याने हिंसा टाळता येते – असं म्हटलं जातं. पण खरंतर शिव्या देणे हीसुद्धा शाब्दिक हिंसाच आहे. ज्याप्रमाणे जनावरं हल्ला करायच्या आधी गुरगुरतात तसंच हाणामारीच्या आधी शिवीगाळ केली जाते. शिव्या देताना जोरजोराने हातवारे केले जातात, आवाजाची पट्टी वाढलेली असते. शिव्यांमध्ये लैंगिक अवयवांचे, संभोगक्रियेचे किंवा उत्सर्जनाच्या क्रियांचे उल्लेख करणारे शब्द वापरले जातात. डॉक्टरांशी बोलताना जर योनि, लिंग, गुदद्वार अशा शब्दांचा उपयोग केला जात असेल तरी भांडणात त्याच अर्थाचे जे शब्द अपमान करण्यासाठी वापरले जातात ते अगदीच वेगळे असतात. बरेच अपशब्द भ, झ नाहीतर फ अक्षरापासून सुरू होतात. ही अक्षरं उच्चारताना फुफ्फुसातून जोराने हवा बाहेर फेकावी लागते. अपशब्दांविषयी संशोधन करणारे म्हणतात की शिवी देत असताना त्या शब्दांचे शब्दकोषातले अर्थ माणसाच्या मनात नसतात, तर राग व्यक्त करण्यासाठी त्यानं ती शब्दयोजना केलेली असते. अनेक माणसांना बऱ्याचशा शिव्यांचे खरे अर्थ माहितसुद्धा नसतात. जरी अपशब्दांचे अर्थ माहीत असले तरीही रागाच्या भरात माणसं बेधडकपणे बोलून जातात. भांडणाऱ्या माणसाच्या भावना महत्वाच्या असतात, शब्द नव्हे – असंही शास्त्रज्ञ म्हणतात. दोन पुरुषांच्या भांडणात अनेकदा एकमेकांच्या आई, बहिणीला वेश्या ठरवणारे उल्लेख येतात किंवा ह्या स्त्रियांवर बलात्कार करण्याचे उल्लेख केले जातात किंवा तशा अर्थाच्या धमक्या दिल्या जातात, तेव्हा पुरुषांना कमालीचा राग येतो. याचं कारण काय असेल बरं?
याचं कारण पितृसत्तेने स्त्रीपुरुषांसाठी ज्या चौकटी आखून दिलेल्या आहेत – त्यामध्ये दडलेलं आहे! पुरुषप्रधान संस्कृतीने पुरुषांकडे कमवण्याचं, पोसण्याचं आणि बाईच्या संरक्षणाचं काम दिलेलं आहे. जो हे काम व्यवस्थित पार पडतो – तो चांगला पुरुष मानला जातो. पुरुषाने कुटुंबातल्या बायकांचं ‘संरक्षण’ करायचं म्हणजे काय - तर आपल्या जाती, धर्माबाहेरच्या पुरुषाशी त्यांचा संबंध येऊ द्यायचा नाही. त्यासाठी त्यांच्यावर निर्बंध घालायचे, त्यांना विशिष्ट नियमांच्या सहाय्याने ताब्यात ठेवायचे. जेव्हा दोन जाती, धर्म किंवा देश यांच्यात संघर्ष होतात तेव्हा शत्रूपक्षातल्या पुरुषांवर वर्चस्व दाखवण्यासाठी त्यातल्या महिलांवर बलात्कार केले जातात. एखाद्या महिलेवर बलात्कार केला जातो तेव्हा ती ज्याच्या अधिपत्याखाली होती त्या पुरुषाचाही तो अपमान ठरतो. म्हणून जेव्हा ‘आई झवली’ सारखी शिवी दिली जाते – तेव्हा पुरुषांना जास्त राग येतो. कधीकधी इतके थेट शब्द वापरण्या ऐवजी ‘तेरी मां की आंख’ किंवा ‘आईच्या गावात’ असं म्हटलं जातं – तरीही याचा काय अर्थ होतो ते बोलणारा आणि ऐकणारा दोघांनाही चांगलंच माहीत असतं. असे बलात्काराच्या धमकीसारखे वाटणारे अपशब्द जरी प्रत्यक्ष कृतीत उतरवले जाणार नसले तरीसुद्धा अशा वाक्प्रचारांमुळे लैंगिक हिंसेला एकप्रकारे क्षुल्लक ठरवलं जातं – हा आणखी एक मोठा धोका असतो.
याचीच दुसरी बाजू अशीही आहे की बाईला स्वतंत्र अस्तित्व असणं पितृसत्तेला मान्य नसतं. पुरुषाच्या आश्रयाला राहाणारी बाई म्हणजेच - चांगली बाई – असं मानलं जातं. बाप, भाऊ, मुलगा किंवा नवरा अशा एखाद्या पुरुषाच्या अधिपत्याखाली जी बाई नसेल, तिच्यावर कोणताही पुरुष लैंगिक हल्ला करू शकतो अशी समजूत असते. विधवेसाठी ‘रांड’ हा शब्द आहे आणि याच शब्दाचा अर्थ ‘वेश्या’ असा देखील आहे. जेव्हा पुरुषांना अक्करमाशा, बास्टर्ड अशा शिव्या दिल्या जातात तेव्हा त्या पुरुषाच्या आईचे अनेक पुरुषांशी शरीरसंबंध असल्याचं सुचवलं जातं. जी बाई स्वतंत्रपणे जगायचा प्रयत्न करते, स्वत:ची लैंगिकता स्वत:च्या मर्जीनुसार व्यक्त करते तिला अनैतिक ठरवलं जातं. अशा ‘वाईट’ बायकांसाठी कुलटा, उठवळ, छम्मकछल्लो असे भरपूर अपशब्द असतात. पण स्वत:च्या मर्जिने निर्णय घेणाऱ्या पुरुषांसाठी असे काहीच अपशब्द भाषेत सापडत नाहीत, कारण पुरुषाने निर्णय घेणं हे स्वाभाविक आणि ‘चांगलं’ समजलं जातं. जर क्वचित कधीतरी धडाडीने वागणाऱ्या बाईचं कौतुक करायचं असेल तर तिला ‘मर्दानी’ म्हणजे पुरुषयसारखी म्हटलं जातं. उदा. ‘खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी’ किंवा सिनेमात हाणामारी करणारी राणी मुखर्जी पण ‘मर्दानी’ असते.


काहीजण यावर असा उपाय सुचवतात की स्त्रीवादी लोकांनी नवीन शिव्या तयार कराव्यात. म्हणजे ‘आईघाल्या’ च्या ऐवजी ‘बापघाल्या’ म्हणावे. स्त्रियांच्या चारित्र्याशी संबंधित शिव्या देण्यास बंदी करावी अथवा कायद्याने शिक्षा असावी. खरंतर भारतीय दंड विधानाच्या कलम 509 अंतर्गत स्त्रीचा अनादर करणारा ‘छम्मकछल्लो’ हा शब्द वापरल्याबद्दल शिक्षा झाल्याचे उदाहरण घडलेले आहे. काही सामाजिक संस्था कॉलेजातील युवकांसाठी ‘गालीबन्द अभियान’ चालवतात. महाराष्ट्रात युनिसेफने शाळेतल्या मुलांसाठीही ‘शिवीबंद अभियान’ केले होते. गावोगावी मुलांनी शिव्या न देण्याची शपथ घेतली होती. पण ती शपथ किती प्रमाणात पाळली गेली त्याची काही माहिती सध्या तरी उपलब्ध नाही. पण त्यापेक्षा थोडेसे निराळे उपाय स्त्रीवादी लोकांनी शोधून काढले आहेत. Slut walk – हे त्याचे एक उदाहरण म्हणता येईल. काही वर्षांपूर्वी एका पोलिस अधिकाऱ्याने म्हटले होते की बलात्कारांना आळा घालायचा असेल तर स्त्रियांनी वेश्यासारखे (Slut ) कपडे घालणे बंद केले पाहिजे. बलात्कारासाठी बायकांना दोष देण्याच्या वृत्तीचा महिलांनी निषेध केला जगातल्या ‘बलात्कार संस्कृती’ विरोधात देशोदेशी Slut Walk नावाचे मोर्चे काढले गेले. एकप्रकारे Slut ह्या अवमानकारक शब्दाचे एका सामर्थ्यशाली शब्दात रूपांतर केले. असाच एक छोटासा प्रयोग माझ्या ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी ’ ह्या नाटकातही केला जातो. हे नाटक म्हणजे The Vagina Monologues ह्या इंग्लिश नाटकाच मराठी रूपांतर आहे. नाटकातल्या एका प्रवेशात एक मैत्रीण म्हणते की - ‘चूत' हा शब्द सार्वजनिक ठिकाणी जागोजागी लिहिल्याचे पाहून तिला लाज वाटते. पण अशी लाज वाटून घेण्याऐवजी हाच शब्द आपण वेगळ्या प्रकारे उच्चारून त्याच्यावर पुन्हा एकदा स्त्रियांचा हक्क प्रस्थापित करायचा असं त्या ठरवतात. मग पारंपरिक गाण्याच्या चालीवर तो शब्द खेळवत खेळवत आपलासा करून घेतला जातो. थोडक्यात, त्या शब्दातला ‘शिवी’पणा त्या काढून टाकतात! असं सगळ्याच अपशब्दांच्या बाबतीत करता येईल का?

लिंगभेदी भाषा हिंसक आहेच पण जो लिंगभेद समाजात आहे तोच शिवीत दिसतो आहे. समाजातल्या विषमतेचं आणि सत्ताकारणाचं प्रतिबिंब भाषेत दिसून येतं. पुरुष स्त्रीसारखा असणे हा अपमान मानला जातो मात्र स्त्री पुरुषासारखी असणे ही अनेकदा अभिमानाची बाब मानली जाते. सध्या जगात पुरुषांचं वर्चस्व असल्याने स्त्रीया आणि ट्रान्सजेंडर लोकांना दुय्यम लेखणारे, त्यांच्यावर लैंगिक हल्ला करण्याचं समर्थन करणारे आणि स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाबद्दल आणि लैंगिकतेबद्दलही तुच्छता दाखवणारे शब्द हे जगातल्या प्रत्येक भाषेत आपल्याला दिसतात. असे शब्द पितृसत्ता कायम ठेवायला एक प्रकारे मदतच करत असतात. जोपर्यंत आपण पितृसत्तेच्या अनुषंगाने येणारी स्त्रीपुरुषातली विषमता नष्ट करत नाही – तोपर्यंत ‘शिवीबन्द अभियान’ सारख्या मोहिमा राबवणे हा वरवरचा उपाय ठरेल. फक्त काही शब्दांना ‘गन्दी बात’ म्हटल्यामुळे ही लिंगभेदाची व्यवस्था बदलणार नाही. मुळात समाजात अशा प्रकारची लिंगाधारीत भेदभावाची व्यवस्था असणं हीच एक ‘गन्दी बात’ आहे!
(हा लेख 'शब्दोत्सव दिवाळी 2020' मध्ये प्रकाशित झाला होता.) 
 

वंदना खरे 

संपादक, 'पुन्हास्त्रीउवाच' 

स्त्रियांची भाषा (भाग २)


लेखाच्या पूर्वार्धात स्त्रियांच्या जगण्यावर असलेल्या बंधनांचा त्यांच्या भाषेवर झालेला परिणाम लेखिकेने मांडला आहे. आता उत्तरार्धात स्त्रियांच्या भाषेची आणखी काही वैशिष्ट्ये समजून घेऊया.
पूर्वार्ध वाचण्यासाठी - https://punhastriuvach.blogspot.com/2021/04/blog-post_16.html


स्त्रियांच्या वागण्यातला गूढपणा

स्त्रियांच्या बोलण्याचा वाच्च्यार्थ आणि लक्ष्यार्थ विविध प्रसंगात वेगळा असतो असेही दिसून येते. समोरची स्त्री जे बोललीच नाही त्यावरून त्या स्त्रीच्या मनाचा अंदाज घेणे, लेकी बोले सुने लागे प्रमाणे बोलणे, एकमेकींना हसत हसत टोमणे मारणे. स्त्रिया एखादी गोष्ट नको म्हणत असतील तर त्याचा अर्थ हो असा असणे. अगदी माहेराहून साडी किंवा नातेवाइकांकडून भेटवस्तू घेतांना बायका नाही नाही नको म्हणत असतात याचा अर्थ त्यांना ती वस्तू नको असते असा नसतो. पण एखादी गोष्ट वस्तू लगेच स्विकारायचं नाही, पट्कन घ्यायचं नाहि.हे त्यांना परंपरेनं शिकवलेलं असतं.म्हणून त्यांच्य होकारात नकार आणि होकारात नकार असु शकतो.मनातला संभ्रम,संकोच लज्जा यामुळे त्यांच्या मनातली नेमकी भावना कळू शकत नसल्याने त्यांचे वागणे गूढ आहे असे वाटते. उदा. जेव्हा 
एखादी बाई आपल्या नवऱ्याला सांगते की वीस-पंचवीस रुपयाचे खेळणं घेऊन या म्हणजे जास्त महाग आणू नका असा त्याचा अर्थ.तिथे वीस पंचवीस म्हणजे अगदी तेवढेच नाही.

स्त्रियांची समृद्ध भाषा

अय्या ! इश्श ! अगंबाई ! असे उद्गार फक्त स्त्रियांच्या तोंडी असतात. पुरुषांच्या भाषेत सतत अधिकार गाजवण्याचा भाव डोकावतो. त्यामुळे आक्रमक भीडभाड न ठेवणारी शिव्या देणारी भाषा असं पुरुषांच्या भाषेचे वैशिष्ट्य जाणवतं याला कारण पुन्हा सामाजिक संस्कार किंवा सामाजिक संकेत असं आहे. याउलट भरपूर म्हणी,वाक्प्रचार,अनेक किस्से घटना,गोष्टी,अनुभव आठवणी आसतात त्यामुळे स्त्रियांची भाषा समृद्ध आहे असं लक्षात येतं.

स्त्रियांच्या बोलण्यात सहसा प्रादेशिक हेल अधिक असलेले दिसून येतात. जसे नांदेड जिल्ह्यातील किनवट व परिसरातील भागातल्या भाषेवर तेलुगु भाषेचा प्रभाव असलेला दिसून येतो ‘अय्यो!आब्बबा!अय्यो पापबिचारी!’ अशा उद्गारवाचक शब्दांचा वापर असतो. तसं नाही म्हणण्याऐवजी ‘अं अं’ एवढेच नकारात्मक उत्तर तिथल्या स्त्रियांच्या बोलण्यात दिसून येते. तर लातूरकडील भाषेवर कन्नड चा प्रभाव असलेला दिसून येतो 'अगं अगं अगं तुझा मुडदा बशिवला न्हीवून' असा कानडी हेल दिसतो. हरियाणा छत्तिसगड मध्यप्रदेश अशा वेगवेगळ्या प्रदेशातून अन्य ठिकाणी रहायला आलेल्या कुटुंबातील स्त्रियांची भाषा जाणिवपुर्वक तशीच टिकून असलेली दिसते. यामागे स्त्रियांचं कुटुंबातुन बाहेर न जाणं,एकमेकींशी चट्कन मैत्री होणं या गोष्टी पण कारणीभूत असतात. स्त्रियांची भाषा ही जात्याच मायाळू हळवी प्रेमळ काळजीची असते. असंही लक्षात येतं.याला कारण पुन्हा संस्कृती ममत्व मातृत्व अशा गोष्टी कारणीभूत ठरतात. नांदेडच्या आसपास असलेल्य भागात 'बरी तर हाइस की माय? कवा आलीस? जेवलीस माय?' -अशी मवाळ वाक्य बायकांच्या तोंडी असतात. या बायकांना भेटताक्षणी अगदी फारच जीवाभावाचं माणूस भेटल्याचा आनंद होतो. शेवटी प्रेम, माया, आत्मियता ही बोलणाऱ्याच्या भाषेतूनच व्यक्त होत असते.

स्त्रियांची भाषा कुजबुजणारी मनातली गुपितं सांगणारी अशी असते.

साधारणतः जवळपास सर्वच घरांमध्ये कोणत्या न कोणत्या प्रकारे बायकांची घुसमट होत असते. प्रत्येकीचे प्रश्‍न वेगवेगळे असतील परंतु प्रत्येक स्त्रीने आपल्या आयुष्यात कधी न कधी मानसिक घुसमट सोसलेली असते. घरात कुटुंबात समाजात सार्वजनिक ठिकाणी कामाच्या ठिकाणी कुठे ना कुठे ती शोषणाची शिकार झालेली असते. तरीसुद्धा वरील सर्व ठिकाणी मात्र ती आपल्या मनात चाललेली घुसमट जाहीर करू शकत नाही अनेकदा त्याची वाच्यता करू शकत नाही. तिच्या शारीरिक समस्या आजार मासिक पाळीच्या तक्रारी अडचणीबद्दल सुद्धा ती मोठ्याने बोलू शकत नाही. पुरुष सहकारी, कुटुंबातले पुरुष यांच्यासमोर या गोष्टींची चर्चा करू शकत नाही. या सगळ्यांमध्ये मग स्त्रियांची आपापसात कुजबूज वाढते. काही नाजूक गोष्टींवर स्त्रिया अतिशय हळू आवाजात आजूबाजूला कोणी ऐकणार नाही याची दक्षता घेत कुजबुजत राहतात मी अशा अनेक बायकांना पाहिलेलं आहे की त्यांचं बोलणं फक्त आणि फक्त तिला आणि ज्या समोरच्या स्त्रीला सांगायचं आहे तिलाच ऐकू येतं; इतका तिचा आवाज हळूवार असतो. ऐकणारी स्त्रीसुद्धा जिवाचा कान करून ते ऐकत असते त्यांच्या बाजूला असणार्‍या तिसऱ्या व्यक्तीला जवळ असूनही त्यांच्या बोलण्याचा अंदाज येत नाही. अनेकदा स्त्रियांच्या काही लैंगिक समस्या असतात, गरजासुद्धा असतात, जोडीदारा विषयीच्या तक्रारी असतात. कुटुंबातल्या कुटुंबात होणारं लैंगिक शोषण असतं; तसंच परित्यक्ता, विधवा, अविवाहित बायकांच्या शारीरिक गरजा असतात. त्या पूर्ण होण्याची कुठलीही व्यवस्था, आपल्याकडे असणाऱ्या पितृसत्ताक समाजात अस्तित्वात नाही. याविषयी समाजात त्यांना कुठेही न्याय मिळत नाही. अशा अनेक गोष्टी स्त्रिया एकमेकांजवळ कुजबुजत असतात, व्यक्त करत असतात,आपल्या मनातली गुपितं खोलत असतात. एकमेकींच्या केसांना तेल लावून देणे, विंचरुन देणे, वेणी घालून देणे, गुंता काढून देणे एकमेकींच्या पाठी घासून देणे अशा नित्यकर्मातून ही स्त्रिया वर्षानुवर्षे एकमेकींच्या मनातले गुपित एकमेकींजवळ उकलत राहतात.
खरंतर पुरुषांच्या दुनियेत सर्व स्त्रियांना घरात-समाजात सगळीकडेच दुय्यम दर्जा राहिलेला आहे त्यामुळे स्त्रियांना होणारे कष्ट, मेहनत, सासरी होणारा छळ, मारहाण, मानसिक कुचंबणा जवळपास सगळ्याच जणी सोसत असतात. तरी त्यातल्या त्यात जरा बर्‍या स्थितीत असलेली एक स्त्री आपल्यापेक्षा जास्त त्रासात असलेल्या स्त्रीची मदत करते, तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करते. म्हणूनच माहेरी येणाऱ्या स्त्रीला न्हाऊ माखू घालून तिचे दुःख समजून घेणे तिला साडी-चोळी घेणे ही कामे उत्साहाने करत असते. म्हणूनच स्त्रियांची भाषा ही समजूतीची, मदतीची मवाळ अशी असते. एकमेकींच्या कामात मदत करणे, एकमेकींना शेवया-पापड-कुरडया करू लागणे अशी कामे पूर्वी स्त्रिया स्वतःच्या घरचं काम समजून करायच्या आणि त्यानिमित्ताने आपापली दुःख एकमेकींजवळ मोकळी करायच्या. अगदी नडलेल्या गर्भारणीला सुईण आणण्यापासून ते बाळंतपण होऊन बाळबाळंतिणीला आंघोळ घालून निश्चिंत होईपर्यंत सोडून जायच्या नाहीत.
स्त्रियांच्या भाषेत एक प्रकारचा उदारपणा असतो. आपल्याजवळ जे आहे ते इतरांसोबत वाटून घेण्याची भावना असते. इतरांच्या गरजेला कामी येण्याची भावना असते. पूर्वी स्त्रिया नवीन साडी आणली की स्वतः नेसायच्या नाहीत तर आपल्या जवळच्या दुसऱ्या स्त्रीला किंवा अगदी शेजारणीला सुद्धा घडी मोडायला नवीन साडी द्यायच्या. 'मला तर काय आता नेसायचीच आहे आधी तू नेसून घडी मोड', असे औदार्य असायचे त्यात. पुरुषांमध्ये असली देवाण-घेवाण चालल्याचं पाहण्यात नाही. एखादा सोन्याचा दागिना केला तरी तो घरातल्या दुसर्‍या स्त्रीच्या गळ्यात घालून पाहतात बायका. लग्नसमारंभासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी सोन्याचे दागिने बाहेरगावी सुद्धा घेऊन जाण्यासाठी देतात बायका. अजूनही मुली बायकांमध्ये मैत्रिणीची साडी किंवा ड्रेस हक्काने मागणे देणे घेणे या गोष्टी सर्रास चालतात. केवळ निखळ आनंद, हौस यापलीकडे या देवाणघेवाणीत फार काही चालत असावं असं वाटत नाही. एखादीने साडी मागितली तरी 'घे ना मग त्यात काय एवढं? तु नेसलीस तर फाटणार थोडीच आहे?’ अशी मनमोकळी भाषा असते त्यांच्यात. फक्त कपडे दागिनेच नाही तर इतर जीवनावश्यक गोष्टींची ही देवाण-घेवाण स्त्रिया खूपच सहजपणे करतात. अगदी तिखट-मीठ विरजनाच्या दह्यापासून ते गहूतांदूळ, तुपसाखरेपर्यंत जिनसा देखील स्त्रिया एकमेकींना उसन्या देऊघेऊ शकतात. छोट्या-मोठ्या कसल्याही अडचणी फार खळखळ न करता भागवत राहतात. वेळ पडली तर आपल्या जवळची साठवलेली रक्कम अडीनडीला दुसऱ्यांना द्यायलाही तयार असतात. त्या स्त्रियांच्या या आर्थिक देवाण-घेवाणीने कित्येक वेळा तब्येतीच्या तक्रारी ते मोठी कामे पार पडलेली आपल्या पाहण्यात असतात. एखाद्याला आयुष्यभर लक्षात राहावी अशा मदती सुद्धा खुल्या मनाने स्त्रिया करत असतात.

स्त्रियांची भाषा भयाची, श्रद्धेची असते.

जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सतत पुरुषी सत्तेच्या दडपणाखाली राहिलेल्या स्त्रियांची भाषा ही कधीकधी भयाची, दहशतीची बनते असेही दिसून येते. लहानपणी वडील, भाऊ, तरुणपणी नवरा, म्हातारपणी मुलगा असं आयुष्यभर कुणाच्यातरी आधाराने जगत असणाऱ्या स्त्रियांच्या मनात पुरुषी सत्तेचा एक प्रकारचा धाक निर्माण झालेला दिसतो. त्यातून बाहेर पडणं त्यांना शक्य होत नाही आणि कित्येक वेळा त्या तसा प्रयत्नही करताना दिसत नाहीत. अशा वेळी बहुतांशी स्त्रिया ह्या घरातच किंवा एका सुरक्षित चक्रात राहणे पसंत करतात. बऱ्याच वेळा स्वतःच्या आयुष्याचे मुलांच्या बाबतीतले महत्त्वाचे निर्णयही त्या घेऊ शकत नाहीत. दरवेळी कुठल्यातरी पुरुषावर अवलंबून राहण्याची त्यांना सवय लागते. त्यामुळे त्यांचे अंतर्मन मात्र भयभीत झालेलं असतं. काहीतरी वाईट घडेल का, अशी मनात भीती सतत डोकावत राहते. त्यातूनच मग जवळपास ९० टक्के स्त्रिया देवभोळ्या, अंधश्रद्धाळू बनत जातात. देव-धर्म, कर्म-कांड, उपास-तापास, सण-वार या पारंपारिक चक्रात अडकत जातात. पितृसत्ताक व्यवस्थेला हे हवंच असतं! मग एखादी गोष्ट अमूक पारंपारिक पद्धतीने झालीच पाहिजे, आमच्या आईचा असा आग्रहच आहे, बायकोला हे चालणारच नाही -अशा सबबी आडून रितिरिवाज बिनबोभाट चालत राहतात. भुताखेतांचे वेताळाचे कुलदेवतांचे प्रकोप होऊ नयेत अशा भयाने स्त्रिया चिंतेत असतात व तशीच भाषा बोलत राहतात. पुढच्या पिढीतही हीच श्रद्धा भय दहशत झिरपवत राहतात.

काळानुसार आता स्त्रियांची भाषा बदलते आहे. लेखिका आशा बगे, सानिया, मेघना पेठे, गौरी देशपांडे, उर्मिला पवार, प्रिया तेंडूलकर, कविता महाजन, प्रज्ञा दया पवार, शिल्पा कांबळे, कल्पना दुधाळ, सुनिता झाडे, सुनिता डागा, योगिनी राऊळ, अशी बरीच नावं घेता येतील. स्त्रिया गद्द्यपद्य ललित लेखनातून निर्भिडपणे व्यक्त होऊ पाहताहेत. खरंतर व्यवस्थेला स्त्रियांच्या व्यक्त होण्याची, बोलण्याची भीती वाटते आहे, सत्ता संपुष्टात येण्याची भीती वाटते आहे. कदाचित म्हणूनच स्त्रियांची भाषा अधिकाधिक बंडखोर होते आहे. परंतु स्त्रिया जेवढ्या मोकळेपणाने बोलतात, तेवढ्या अजूनही लेखनातून मोकळ्या होत नाहीत - असंही एकीकडे जाणवत राहतं. अगदीच विद्रोही, रोखठोक किंवा अगदीच मिळमिळीत, तोचतोपणा असलेले लिखाणही आज दिसून येतं. कदाचित रूढीपरंपरा, व्यक्त होण्याच्या मर्यादा - याचा परिणाम त्यांच्या लेखनावर अजूनही होत असावा, असं वाटतं. स्त्रियांच्या लेखनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण, लेखनातून खाजगी जीवनाची चाचपणी केली जाणे यामुळे स्त्रियांच्या लेखनात म्हणावा तसा मोकळेपणा येत नसावा. तरीही स्त्रियांची भाषा सुंदर आहे असं वाटतं. फक्त व्यवस्थेने लादलेली बंधन सैल व्हायला हवीत. एकूणच स्त्रियांच्या काय किंवा पुरुषांच्या काय जगण्यावरील ताण हलके व्हावेत, जातवर्गवर्णसत्ता यातून भाषेनेही मोकळा श्वास घ्यावा. ती अधिकाधिक सुंदर व समृद्ध व्हावी. नव्या पिढीने ज्ञानाची, अभ्यासाची, विद्वेष विरहित, मुक्तीची एक नवी भाषा शोधावी अशी अपेक्षा इथे व्यक्त करावीशी वाटते.

संदर्भ –
भाषा,समाज आणि संस्कृती (सोनाली देशपांडे गुजर - शब्दालय प्रकाशन)
बहिणाबाईची गाणी (सुचित्रा प्रकाशन)


सारिका उबाळे, अमरावती

 

 





स्त्रियांची भाषा (भाग १ )

भाषा ही मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. आता आपण भाषाविहीन समाजाची कल्पनाही करु शकत नाही. विचारांचे भावनांचे आदानप्रदान करण्याच्या जाणिवेतून भाषा तयार झाली असावी असे अभ्यासकांचे मत आहे.

भाषेच्या संदर्भात विचार करत असतांना आपल्याला मानवी उत्पत्तीपासून विचार करावा लागेल. मानव आणि मानवेतर सृष्टीतील संप्रेषण पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास,भाषांचाअभ्यास यासारख्या अनेक गोष्टीतून अभ्यासातून,काही अंदाज मांडले गेले. या अंदाजानुसार सुमारे दोन लाख ते साठ हजार वर्षांपूर्वी मानवी समुहात भाषा अस्तित्वात आली असावी आसा अंदाज आहे. अर्थात याला अनेक मत-मतांतरेही असू शकतात.

आता स्त्रियांची भाषा हा विचार करत असताना पुन्हा भाषेच्या उगमाकडेच जायला हवं. मानवी उत्पत्तीच्या नंतर व्यक्त होण्याचे साधन म्हणून भाषा तयार झाली. मौखिक स्वरूपातून लिखित स्वरूपात आली. आणि कालांतराने जशीजशी समाजात पुरुषी सत्ता वाढत गेली तशी तशी स्त्रियांची भाषा बदलत गेली. खरंतर भाषा ही स्त्री आणि पुरुष अशी भेदांची न राहता ती एकच असायला हवी होती. परंतु आपल्या व्यवस्थेत स्त्रियांच्या जगण्यावर त्यांच्या बोलण्या-चालण्या- राहणीमानावर जी बंधने आहेत त्याचा भाषेवर खूप जास्त परिणाम दिसून येतो. या दृष्टीने विचार करतांना असे दिसून येते की स्त्रियांची भाषा खूप वेळा प्रश्नार्थक कधी संभ्रमाची कधी संकोच भीती लज्जेची झाली.

त्यांच्या भाषेत बोलण्यात नेहेमीच खूप प्रश्न असतात. त्या सतत परवानगी मागत राहतात. त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी ती गोष्ट केली असं कधीच होत नाही. त्यांना स्वतःला काही काम असलं तरी सतत दुसऱ्यां कुणाची तरी परवानगी मागत राहावी लागते.
' बाहेर जाऊ का?'
'पार्लरला जाऊन येऊ का'
'आज स्वैंपाक काय करु?'
'जेवायला वाढू का ?'
रोजच्या जगण्यात असे किती अन् काय काय प्रश्न असतात, जे स्त्रिया सतत दुसऱ्या कुणालातरी विचारत असतात.

याउलट पुरुषांची भाषा –
' मी बाहेर जाऊन येतो,मला यायला उशिर होइल, वाट बघू नको.’
‘आज मी सुट्टी घेतली आहे.’
‘ मी सिनेमाला जातोय. मी पार्टीला जातोय.' – पुरुषांची भाषा अशी काहीशी सूचनावजा, जरब, आदेश असलेली दिसुन येते.
अशा पद्धतीने स्त्री आणि पुरुषाची वेगवेगळी भाषा आपल्याकडे दिसून येते.
वर्षानुवर्षे इथल्या स्त्रियांवर बंधने आहेत त्यांना परावलंबी बनवलं गेलेलं आहे म्हणून स्त्रिया परावलंबनाची भाषा बोलतात,संभ्रमाची भाषा बोलतात.
जसं की एखाद्या बाईला साडी घ्यायची आहे, तेव्हा ती बाई आधी मुलांचा विचार करेल मुलांना कपडे घेऊया. आपल्याला घेतले नाही तरी चालेल असा विचार करेल. नवऱ्याला तीन वेळा प्रश्न विचारेल आणि तेव्हा कुठे ती एक साडी घेईल. स्वतःसाठी खर्च करतांनाही त्यांच्या मनात सदैव एक अपराधी भाव असतो. कसं दिसेल, कुणाला काय वाटेल ? या सगळ्या भावनेतून त्या आपल्या आधी इतरांचा विचार करतात. आणि हे अपराधीपण त्यांच्या मनात परंपरेने रुजवलेलं असतं. त्यामुळे स्त्रिया कुटुंबात खूप स्वार्थीपणाने आप्पलपोटेपणाने विचार करण्यास धजावत नाहीत.
हिंदू तत्त्वज्ञान, धर्मग्रंथ, पुराणे वर्षानुवर्षे स्त्रियांची भाषा कशी असावी हे सांगत आले आहेत त्या दृष्टीने रामायणातील दोन उदाहरणे पाहूया. 
  • वनवासात असताना जंगलातील वाटेवरून चालत असताना सीता रामाला म्हणते हे प्रिय पतीदेव केवळ इंद्राच्या तलवारीचा संग घेऊन तो ब्राह्मण इतका पतित झाला असेल तर मी तुम्हाला विनंती करते की यापुढे ऋषींना छळणार्‍या रक्षकांना मारण्याच्या हेतूने आपण आपल्या हाती धनुष्य धारण करावे. कृपया निष्पाप राक्षसांना देखील मारू नका. मग इतर जीवांबद्दल काय बोलावे, अर्थातच मी एक अल्पमती स्त्री आहे आणि धार्मिक तत्वांच्या बाबतीत तुम्हाला उपदेश देण्याची माझी योग्यता नाही. पण तुम्हाला योग्य वाटत असेल तर कृपया माझ्या म्हणण्यावर आपले विचार मांडा. आणि तुम्हाला जे सर्वोत्तम वाटेल ते करा.'
(आपले मत मांडण्यासाठीही स्वतःकडे जास्तीत जास्त कमीपणा घेऊन पुरुषांना विनंती करण्यातच स्त्रीचे हित आहे.हे इथे स्पष्ट होते.)
  • सीतेने मारीचाचा आवाज ऐकला तेव्हा तिला वाटले की श्रीराम नक्कीच मदतीची याचना करीत आहेत. त्यामुळे भयभीत होउन ती लक्ष्मणाकडे वळून म्हणाली, 'तुम्ही तात्काळ जा आणि काय घडले ते पहा श्रीराम मदतीसाठी आक्रोश करीत आहेत त्यांना तुमची गरज आहे.हे लक्ष्मण, माझे हृदय धडधडत आहे आणि मला श्वास घेणे कठीण होत आहे. राक्षसांनी श्रीरामांना निश्चितच घेरलेले असावे.' परंतु सीतेचे रक्षण करण्याची श्रीरामाची आज्ञा लक्ष्मणाने दृढपणे मनात ठेवली होती. आणि त्यामुळे तो तसूभरही हलला नाही. त्याची ही वरकरणी दिसणारी उदासीनता पाहून सीता खूप अस्वस्थ झाली आणि लक्ष्मणाची कठोर शब्दांत खरडपट्टी काढत म्हणाली 'तुम्ही असे केवळ उभे काय राहिला आहात ? श्रीरामाचा मृत्यू व्हावा अशी तुमची इच्छा आहे का? आता मी समजले की खरे पाहता मित्राच्या रूपात तुम्ही तुमच्या ज्येष्ठ बंधूचे शत्रू आहात मला वाटते की श्रीरामांनी प्राणत्याग करावा अशी तुमची इच्छा आहे कारण त्यामुळे माझा उपभोग घेण्यास तुम्ही मुक्त व्हाल नाहीतर तुम्ही त्यांच्या सुटकेसाठी ताबडतोब गेला असता. लक्ष्मणा, तात्काळ जा. माझे पती संकटात असतील तर माझ्या जिवंत आणि सुरक्षित राहण्याचा उपयोग तरी काय?' बाणांसारख्या या धारदार शब्दांनी लक्ष्मणाचे ह्दय घायाळ झाले आणि तो हात जोडून म्हणाला ,
विमुक्त धर्माः चपलाः तीक्ष्णा भेदकराः स्त्रियः |
न सहे हि ईदृशम् वाक्यम् वैदेही जनक आत्मजे || ३-४५-३०
श्रोत्रयोः उभयोः मध्ये तप्त नाराच सन्निभम्
(हे मिथिला राजकुमारी तुम्ही मला देवते प्रमाणे आहेत आणि म्हणून मी प्रत्युत्तरादाखल कठोरपणे बोलू शकत नाही मी जाणतो की मित्रांच्यात मतभेद निर्माण करणे हा स्त्रियांचा स्वभाव असतो स्त्रिया या चंचल आणि कठोर असतात हेच खरे. त्या एका विशिष्ट इच्छेने पछाडलेले असतात तेव्हा त्या नैतिकतेच्या साऱ्या जाणिवांचा त्याग करतात.)

महाकाव्ये, पुराणे, धर्म या सगळ्यांनी स्त्रियांची भाषा कशी असावी याचे संकेतच तयार केलेले आहेत. आणि जनमानसात ते अजूनपर्यंत जाणिवपूर्वक जपून ठेवलेले दिसतात.याच पुराणांचे धर्माचे आदर्श ठेऊन तिने वागले पाहिजे. या समजूतीचे दडपण स्त्री पुरुष दोघांवरही असते. त्याचा परिणाम भाषेवर दिसुन येतो.

स्त्रियांची भाषा ही खूपवेळा मौनाचीही आहे असे दिसून येते. स्त्रियांची भाषा अबोल्याची, रागावण्याची, रुसण्याची अशी पण आहे असं दिसतं. स्त्रियांच्या बोलण्यात लटका राग, रुसवेफुगवे बऱ्याचदा आढळून येतात. बायका ह्या परिस्थितीशरण असतात आपलं म्हणणं नीटपणे मांडण्यासाठी त्यांना अवकाश मिळत नाही. मग कधी रागावून कधी रुसून तर कधी अबोला धरून मौन बाळगून त्या आपलं म्हणणं खरं करण्याचा प्रयत्न करत असतात,'जा मी बोलणारच नाही' असं म्हणून रुसून बसणाऱ्या, रागावून, भिऊन, संकोचून अबोल राहणाऱ्या, बायका घरात शेजारी-पाजारी आपण नेहेमीच पाहतो. एखादी आई जेंव्हा अशी वागते, तेव्हा त्याचा परिणाम नकळतपणे मुलीवरही होत असतो. म्हणून कधीकधी लहानपणी कट्टी करण्याचे प्रमाणही मुलांपेक्षा मुलींमध्येच जास्त असलेलं दिसून येतं. लहान मुली आपसात सतत ‘कट्टी दो, कट्टी दो’ चा खेळ खेळत असतात. हे घरातल्या मोठ्या बायकांचं एक प्रकारे अनुकरणच असतं.
समाजाकडून व व्यवस्थेकडून मिळणारं कायम दुय्यमत्व या गोष्टीचाही परिणाम बायकांच्या भाषेवर झालेला दिसून येतो. 
 उदाहरणार्थ - 'मला मेलीला कशाला हवंय एवढं ? तुम्ही पोटभर जेवा'
                    'मला काय कोरभर भाकरी असली तरी चालेल.'
                    'मी काय कुठेही पडून राहील सांदीकोपर्‍यात'
                    ‘मी खाइन हे शिळं अन्न, तुम्ही गरम गरम खाउन घ्या.’
अशी कायम स्वतःकडे दुय्यमत्व घेण्याची भाषा स्त्रिया बोलत असतात. हिन्दी चित्रपटांमध्येही बायकांच्या तोंडून स्वतःला हिनदीन, कनिष्ठ लेखणारी भाषा बोलवली जाते. 
उदाहरणार्थ 'मै तुमरी दासी, जनम की प्यासी ! तुम्ही हो मेरा सिंगार साजन', 'मै हुँ चरणो की बस धूल','तू चंदा मै चांदनी' - अशा गीतांमधून चित्रपटांमधून हे दुय्यमत्व कायमच अधोरेखित होत असतं. ते सतत समाजमनावर बिंबवलं जातं, म्हणून स्त्रियाही स्वतःला कायम दुय्यमच लेखत असतात. नवऱ्याला, घरच्या पुरुषांना आधी जेवायला वाढणे, आपण उरलंसुरलं खाणे, लग्नात सार्वजनिक कार्यक्रमात पुरुषांची पंगत आधी बसणे, घरी आलेल्या पाहुण्या पुरुषाला आधी चहा जेवण विचारुन पाहुण्या बाईला कनिष्ठत्व देणे - यासारख्या उदाहरणांमधून सुध्दा आपल्याला हे दुय्यमत्व दिसून येतं. मराठवाड्यात तर सर्रास नवऱ्याला 'मालक' हे संबोधन वापरलं जातं. आपला कुणीतरी मालक आहे, आपण कुणाच्या तरी मालकीच्या आहोत. ही जाणीव मनात रुजलेली असल्यामुळे सुध्दा त्या स्वतःला कमकुवत दुबळ्या मानत असतात.
त्याचबरोबर स्त्रियांची भाषा लज्जेची आणि संकोचाची आहे असेही एकीकडे दिसून येतं. स्त्रियांनी कसे वागावे याचे ठराविक संकेत समाजात आढळून येतात. स्वतःहून एखाद्या गोष्टीची मागणी न करणे, जे मिळेल ते घेणे, त्यातच समाधान मानणे, संकोच करणे, लाज बाळगणे, विनम्र असणे हा स्त्रियांचा हा खरा दागिना आहे - हे स्त्रियांच्या मनावर लहानपणापासून बिंबवलं जातं. त्यामुळे संसारात, प्रेमात, सार्वजनिक ठिकाणी पुढाकार घेणारी स्त्री - उध्दट, आगावू, दिडशहाणी - समजली जाण्याचाच समाजाचा दृष्टीकोण आहे. हल्ली परिस्थिती थोडीफार बदलेली दिसून येते. मुलीही मुलांना प्रपोज करू लागल्यात. आपल्या हक्कासाठी बोलू लागल्यात, भांडू लागल्यायत. पण मग त्या बोल्ड, निर्लज्ज आणि अति शहाण्या अशा समजल्या जाण्यामुळे तिला पाहून बाकीच्या मुली स्त्रिया पुढं येण्याऐवजी चार पावलं मागेच राहातात हे सुध्दा लक्षात घेणं आवश्यक आहे.

स्त्रियांची स्वतंत्र भाषा
अशी वेगवेगळी उदाहरणे जर आपण पाहिली तर खरोखरच स्त्रियांची भाषा वेगळी आहे असे दिसून येते त्यांना मिळणारे दुय्यमत्व व्यवस्थेने स्त्रियांकडे केलेले कायम दुर्लक्ष, त्यांचं म्हणणं ऐकून न घेण्याची वृत्ती, तिच्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोण यातून स्त्रियांची आपली आपली एक वेगळी भाषा जन्माला आली असं दिसतं. कारण पूर्वी स्त्रीला बैठकखोली दिवाणखाना सोडून घरातल्या इतर भागातच वावरावं लागायचं. तिने चार माणसांत दिवाणखान्यात येऊ नये असे काही संकेत प्रचलित होते. त्यामुळे तिच्या मर्यादित विश्वात भाषेचे वेगवेगळे प्रयोग जन्माला आले.आणि हे जगभर घडलेले दिसतं जसे चिनी महिलांची 'न्यू श्यू' ही भाषा. आपल्याकडेसुद्धा अशी फक्त स्त्रियांचीच असलेली एक विशिष्ट भाषा बोलली जाते. प्रदेशानिहाय काही शब्द अक्षरे वेगवेगळी असू शकतात. पण वेगवेगळी भाषा बोलली जाते हे नक्की. उदाहरणार्थ 'चकारी' ची भाषा. म्हणजे 'चिझंतू चिवना चियआहे काय ? (तुझं नाव काय आहे)चिव तू चिलाम चिपखु चिवडतोआ.( मला तु खूप आवडतो किंवा आवडते.) मग कधी कधी यातलं अक्षर बदललेलं असेल. कुठे 'न' कूठे 'अ' तर कूठे 'प' उदाहरणार्थ- ए पोरं पोरी मी मार मारलं तर तर तिकडे जर जाऊन पर पडशील ना (ऐ पोरी जर मी मारलं तर तिकडे जाऊन पडशील ना.) - अशी ही गमतीची भाषा साधारण पंचवीस तीस चाळीस वर्षांपुर्वी अनेक छोट्या गावात, खेड्यात बोलली जात असे. आताही बोलली जात असावी. ही भाषा मुली शाळेत आपसात गमतीने आणि गंभिरपणेही बोलत असत.
आजकालच्या तरुण मुलांमध्ये 'डंब शराज' हा एक खेळ फार प्रसिद्ध आहे.हा एक चित्रपटांची गाणी, नावं इ. ओळखण्याचा खेळ आहे. या खेळात एका गतातले लोक एक नाव हातांच्या खाणाखुणा करून सांगतात आणि दूसरा गत ते नाव ओळखतो. अशाच प्रकारे गोंधळी समाजातही ही कर पल्लवीची भाषा आहे. देवीच्या गोंधळ जागरण प्रसंगी अनेकजण गोंधळ्याच्या साथीदाराला कानात एक नाव सांगतात. मग तो हातांच्या, बोटांच्या खाणाखूणा करुन आपल्या सवंगड्याला ते समजावतो आणि गोंधळी ते नाव ओळखून दाखवतो. मनोरंजन किंवा गमतीचा भाग सोडला तर ही एक प्रकारची सांकेतिक आणि सुरक्षेसाठी वापरली जाणारी नवी भाषाच आहे यात शंकाच नाही. अशाच प्रकारच्या सांकेतीक भाषा स्त्रियांच्याही बोलण्यात पहायला मिळतात. ह्या आणि अशा अनेक वेगवेगळ्या भाषा सुरक्षितेच्या दृष्टीने निर्माण झाल्या. तशीच ही स्त्रियांची भाषाही तयार झाली असावी.

स्त्रियांच्या भाषेची वैशिष्ट्ये.
सामाजिक संकेतामुळे किंवा दडपणामुळे अनेक संबोधने उद्गारवाचक अभ्यास्त शब्दांचा भरपूर वापर, भरपूर विशेषणे ही स्त्रियांच्या भाषेची वैशिष्ट्ये आहेत असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ 'कडू' हा शब्द. 'कडू' हा शब्द चव दर्शवतो तसेच 'कडू' हा शब्द मराठवाड्यात एखाद्याच्या बाबतीत विशेषण म्हणूनही वापरला जातो. उदाहरणार्थ कडू कारलं, कडू भाड्या, कडू कार्ट आता ह्या विशेषनात दुसरा फरक असा आहे की तो शब्द कधी लाडाने कधी लटक्या रागाने तर कधी भांडणात शीवीसारखा पण वापरला जातो. लहान मुलांना लाडाने ही 'कडू' म्हणतात तर रागात किंवा चेष्टेनेही कडूच म्हणतात . मराठवाड्यातील बायका या शब्दाचा सर्रास वापर करतात. कडू सारखाच 'कळवातीन' हा शब्दही दोन अर्थाने वापरला जातो. खरंतर - 'कळवातीन' म्हणजेच 'कलावंतीन'. उदाहरणार्थ सुंदर दिसणे म्हणजे कळवातीन. आणि नाचणारी बाहेरख्याली स्त्री या अर्थानेही 'कळवातीन' हा शब्द वापरला जातो.
विदर्भात भामट्या/भामटी, बह्याड ,भयताड हाही शब्द द्वयर्थी वापरला जातो. कधी चेष्टा मस्करीत आणि कधी रागाने सुध्दा या शब्दाचा भरपूर वापर होतो. अशी ही भाषेची गंमत स्त्रियांच्या भाषेत पाहायला मिळते.

स्त्रिया खूप बडबड करतात असा एक आरोप स्त्रियांवर लावला जातो परंतु हा आरोप पूर्णतः खरा नाही असं मला वाटतं. व्यवस्थेने स्त्रियांचं म्हणणं कधी ऐकूनच घेतलं नाही. उदाहरणार्थ- घराघरातल्या स्त्रियांची अवस्था पहा. आपली आई, आपली आजी, आत्या ह्या खूप बोलतात. कारण त्यांच्या बोलण्याकडे पुरुष जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. म्हणून त्या पुन्हापुन्हा बोलत राहतात आणि आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत राहतात. मग त्या बडबड्या आहेत असा शिक्का मारला जातो. पूर्वी स्त्रियांना शिक्षणाच्या कमी संधी, बाहेर पडण्यचं स्वातंत्र्य नसणे, जाणीवपूर्वक व्यवहार ज्ञान होऊ न देणे आणि यावरुन त्यांना काही कळत नसल्याचा भाव, त्यांच्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाला कारणीभूत ठरतो. घर, ऑफिस, शाळा इथल्या गप्पातून प्रत्येक स्त्रीला व्यक्त व्हायचं असतं; मोकळं व्हायचं असतं. परंतु सत्तेने कायम त्यांना डावललेलं, दुर्लक्षिलेलं आहे.

'सखाराम बाईंडर' या नाटकात एक स्त्री पात्र आहे सखारामची बायको रोज स्वैपाकखोलीत एका मुंगळ्याशी बोलत असते, खिडकीतून चिमण्यांशी बोलत असते, पक्षांशी बोलत असते. एके दिवशी सखाराम घरी असतांना आपल्या पायावर चढणाऱ्या एका मुंगळ्याशी तिचा संवाद चाललेला असतो आणि सखारामचा गैरसमज होऊन तो तिला पाहण्यासाठी येतो तेव्हा ती मुंगळ्याशी बोलतांना दिसते. तेंव्हा सखाराम अतिशय विषादाने म्हणतो की 'नवरे काय अवस्था करुन ठेवतात ही बायकांची.'
अलंकाराचा सोस, मनकवडेपणा या गुणांमुळे स्त्रीची भाषा चित्रमय आणि अलंकारिक होत असते. "आज मात्र समाजाचे स्त्रीवरील दडपण कमी झाल्यामुळे स्त्रियांचे शतकानुशतकांचे मौन बोलके होऊ लागले आहे." असे नीलिमा गुंडी यांना वाटते तर मिलिंद मालशे यांच्या मते "स्त्रियांची भाषा आणि पुरुषांची भाषा वेगवेगळी होण्याचे मुख्य कारण सामाजिक किंवा सांस्कृतिक आहे त्यातही स्त्रियांची भाषा असा स्वतंत्र विचार जसा केला जातो तसा पुरुषांची भाषा असा मात्र केला जात नाही" याचा अर्थ असा की पुरुषसत्ताक संस्कृतीमुळे पुरुषांची भाषाच प्रमाणभूत मानली जाते. तर भाषेच्या प्रत्यक्ष सामाजिक वापराचा विचार केला तर स्त्रियांची बोलीच प्रमाणभाषेच्या जवळ असते .

जात वर्ग निहाय स्त्रियांची भाषा 
आपल्याकडे वेगवेगळ्या जाती उपजाती यांच्याही विविध भाषा आहेत. प्रादेशिक नव्हे - प्रादेशिक भाषा वेगळ्या. तेलगु, तमिळ, पंजाबी, गुजराती इत्यादी. आणि जाती उपजाती नुसार त्या त्या समाजा अंतर्गत बोलल्या जाणाऱ्या वडार, कैकाडी, बंजारा, अशा भाषा वेगळ्या. गावातली स्त्री असो वा शहरातली सुशिक्षित स्त्री असो किंवा नोकरी करणारी झोपडपट्टीतली वा वेगवेगळ्या जाती धर्मातली किंवा आदिवासी पाड्यावरची स्त्री असो सगळ्या स्त्रियांचे प्रश्न, समस्या वेगवेगळ्या आहेत म्हणून त्यांची भाषा ही वेगवेगळी असू शकते.
शहरी किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीची भाषा ही शिक्षण आणि वाचनाने समृद्ध झालेली समजूतदार, प्रगल्भ, शिष्टाचार असलेली असू शकते तर अर्थार्जन करणार्‍या स्त्रीची भाषा आत्मविश्वासाची असू शकते. याउलट कष्टकरी मजूर किंवा झोपडपट्टीतल्या स्त्रियांची भाषा ही संतापी, उद्रेकी, शिव्याशाप देणारी, भांडखोर, आक्रमक अशीही असू शकते. एखादी मजूर स्त्री दिवसभर कष्ट करते, पुरुषांच्या बरोबरीने काम करते तरीही तिला मोबदला मात्र पुरुषांपेक्षा कमी मिळतो. शिवाय घरी गेल्यानंतर तिच्या वाटणीचे काम कोणी करून ठेवत नाही तर तिलाच सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवावा लागतो, धुणीभांडी करावी लागतात. या वर्गात पुरुष व्यसनी, जुगारी असण्याचं प्रमाणही जास्त असतं. मग एकट्या स्त्रीला घराची मुलांची काळजी करून जबाबदारी पेलून कामही कष्टही करावे लागतात अशी स्त्री मग शिवीगाळ करत असेल, संतापत असेल तर तर त्यात नवल ते काय ? अशा स्त्रियांची भाषा साहाजिकच त्यांच्या जगण्यातून आलेली भाषा असते. तसेच जातीनिहाय, वर्गनिहाय ही भाषा वेगवेगळी असू शकते. राजकारणात सत्तेत असलेल्या स्त्रिया सामान्य स्त्रियांपेक्षा वेगळी भाषा बोलू शकतात. दबलेल्या पिचलेल्या स्त्रिया या हतबलतेची भाषा बोलू लागतात.
अशा प्रकारे जगण्याच्या संदर्भानुसार वेगवेगळ्या परिस्थिती नुसार स्त्रियांची भाषा बदलत असते.

स्त्रियांची भाषा सुंदर आहे.
जातवर्ण व्यवस्था, राजकारण, सत्ताकारण या सर्व गोष्टी जरी असल्या तरी या सगळ्यांच्या पलीकडे असणारी स्त्रियांची अशी स्वतंत्र भाषा आहे आणि ती खूप सुंदर आहे. स्त्रियांचं स्वतःचं एक भावविश्व आहे, सुंदर स्वप्ने आहेत,त्या स्वतंत्र विचार करू शकतात,त्यांची निरीक्षणे त्यांच्या नोंदी यातून त्यांची स्वतःची स्वतंत्र सुंदर अशी नवी भाषा निर्माण होते. काव्य निर्माण होतं. साहित्य निर्माण होतं. मग बहिणाबाईं सारखी कवयित्री म्हणून जाते – ‘अरे खोप्यामंदी खोपा सुगरनीचा चांगला /देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला.’ ज्या बहिणाबाई शाळेत कधी गेल्या नाहीत त्या फक्त जात्यावर दळता दळता निश्वास टाकावा इतक्या सहजपणे गाणी रचतात कवने रचतात. धरीत्रीच्या कुशीत झोपलेलं बी-बियाणं प्रगट होताना किंवा चूल पेटेनाशी झाली तरी त्यांना काव्य दिसतं. शेतकऱ्यांच्या कष्टाचे जीवन आणि त्यांच्या जीवना बद्दल कृतज्ञता बाळगून विठ्ठलावर विश्वास ठेवावा हे सुध्दा बहिणाबाई आपल्या काव्यातून व्यक्त करतात. त्या बद्दल एक ना अनेक सुंदर सुंदर संदर्भ सांगता येतील.
'डोईचा पदर आला खांद्यावरी' असं जनाबाई कितीतरी शतकांआधी म्हणून जातात.तर 'देहासी विटाळ म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध! देही चा विटाळ देहीच सोवळा, सोवळा तो झाला कवण धर्म! विटाळा वाचुनी उत्पत्तीचे स्थान कोण देह निर्माण नाही जगी’ असे सोयराबाई म्हणून जातात. बहिणाबाई मुक्ताबाई जनाबाईंच्या साधेपणातील काव्य असो किंवा 'हरेक ऋतुचक्रात फुटतातच मुंग्यांनाही पंख, म्हणूनच आमचं दुःख अबाधित आहे’ अशी अस्सलतेची त्याचे परिमाण लेऊन येणारी अनुराधाताईंची प्रतिमासृष्टी असो - जगण्याच्या अनुभवातून स्त्रियांची भाषा अधिकाधिक सुंदर होत जाते, हेच खरं! (क्रमशः)

सारिका उबाळे

अमरावती  

                 

                           

फडावरचा गुढीपाडवा

फड म्हणजे साखर कारखान्याच्या शेजारी वसलेली गाडीवाल्या ऊसतोडणी कामगारांची हंगामी वस्ती. आपल्यासाठी गुढीपाडवा म्हणजे वर्षाची सुरूवात तर त्यांच्यासाठी तो सण म्हणजे त्या वर्षीच्या साखर हंगामाची अखेर. त्यामुळे त्यांचा गुढीपाडवा म्हणजे एक प्रकारे ती वस्ती सोडण्याचा निरोप समारंभ! हंगाम संपल्याची हुरहूर आणि गावाकडे जाण्याचे लागलेले वेध अशा संमिश्र मनःस्थितीतला त्या वस्तीवरचा तो गुढी पाडवा. हा सण मी हुपरीच्या जवाहर साखर कारखान्याच्या परिसरातील त्या वस्तीत अनुभवला.



होळी आणि धुळवड संपली तसे वस्तीवरचा प्रत्येक जण गुढीपाडव्याबद्दल बोलायला लागला होता. कुणी म्हणे पाडव्याला घरी परत जायची बांधाबांध सुरू करू तर कुणी म्हणे पाडव्याच्या मुहुर्तावर कारभारणीला सोन्याचे चार मणी आणि चांदीची पैंजणे विकत आणू़. कुणाला त्या दिवशी घरी न्यायला चार भांडी खरेदी करायची होती. कुणाला दवाखान्यात जाऊन पुढच्या सहा महिन्यासाठी औषधे आणायची होती. पोराबाळांना नवे कपडे तर मिळणारच होते. पाडव्याच्या दिवशी वस्तीवरच्या सर्व बायकांना हुपरीच्या अंबाबाईची खणानारळानी ओटी भरायची होती.
खरे तर हंगामाची अखेर आली की ऊस तोडणी कामगार सकाळी आणि संध्याकाळीही काम करत. पण गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र फक्त सकाळचे काम असणार होते. त्या दिवशी दुपारी दोन नंतर सगळे आपापले राजे. शेवटी एकदाचा तो गुढीपाडवा उजाडला. त्या पाडव्याच्या दिवसाबद्दल इतकी चर्चा झाल्यामुळे मी केवळ उत्सुकतेपोटी आदल्या दिवशी कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर राहिले होते. त्या खोलीच्या खिडकीतून सगळया वस्तीचा नजारा दिसे.
गुढीपाडव्याच्या दिवशी साधारण चार ते साडेचारच्या दरम्यान सगळया झोपडया जाग्या झाल्या होत्या. एरवी वस्तीवरचे बापई म्हणजे.. उठले की निघाले शेतावर. बायका मात्र भराभर भाकऱ्या थापायच्या त्याच तव्यात भाजी परतायच्या आणि उगीच कसला अनर्थ घडू नये म्हणून त्या पेटलेल्या चूलीवर पाणी ओतून विझवायच्या आणि मग शेतावर पळायच्या.
पण ती पहाट वेगळी होती. त्या दिवशी वस्तीवरच्या अगदी सर्वांनी आंघोळी केल्या आणि प्रत्येकाच्या घरी साखर घालून दुधाचा चहा झाला. त्यासाठीचे दूध आदल्या दिवशीच आणले होते. एरवीचा म्हणजे बिनदुधाचा गूळ घातलेला काळा चहा - साखरकारखान्यासाठी काम करत असूनही अगदी हंगामाच्या शेवटी प्रत्येक कुटुंबाला पाच किलो साखर मिळे. त्यानंतर प्रत्येक झोपडीच्या बाहेर गुढया उभारल्या गेल्या. या गुढीला उसाचे तुरे, खण आणि पांढऱ्या न् गुलाबी देवचाफ्याच्या माळा लावल्या होत्या. मात्र त्यावर भांडे पालथे न घालता पितळीचा डाव अडकवला होता. एव्हाना मी वस्तीत पोचलेच होते. माझी त्यांच्याबद्दलची उत्सुकता आता त्या सर्वांना माहिती असल्याने जवळ जवळ प्रत्येकाने मला गुढीला डाव लावण्याचे कारण सांगितले. डाव म्हणजे लवकर गावाकडे पोचवणारा शकून असल्याने वस्तीवरच्या गुढीवर डाव लावण्याची पध्दत होती. प्रत्येक गुढीच्या समोर एक पितळी थाळी ठेवलेली होती. त्यात हळद़ कुंकू़ बुक्का आणि खोबऱ्याचे तुकडे ठेवले होते. संध्याकाळी गुढी उतरली की खोबरे साखर खायची आणि वाटायची.
गुढीला साखरगाठीच्या माळा लावल्या नव्हत्या पण झोपडीच्या दाराच्या दोन्ही बाजूला ऊस वाढयासकट उभे केले होते. गुढीभोवती रांगोळया काढल्या होत्या. त्या दरम्यान पोरांनी आम्ही साखर शाळेत शिकविल्याप्रमाणे केलेल्या पताका वस्तीभर लावल्या. त्या सकाळी स्वैपाक करायचा नव्हता. ज्याच्या शेतातला ऊस तोडायचा होता त्या शेतकऱ्याच्या घरातून पोहे येणार होते. त्यात घरातून नेलेल्या शेव कुरर्मुयात शेतातले कांदे आणि कोथिंबिर मिसळून त्याचा शेतातच नाश्ता होणार होता.
त्या दिवशी दुपारी वस्तीवरच्या प्रत्येक घरात पाडव्यासाठी म्हणून पुरणाचा स्वैपाक होणार होता. आता ऊसाच्या फडात कुणी ठेवणीतले कपडे घालून जातं का़ पण आमच्या बायांना काय त्याचे - त्यांनी बाप्यांच्या कटकटीला न जुमानता चांगल्या चकमकीत जरीच्या साडया नेसल्या आणि वरून जुनेरं पांघरलं होतं.
स्वतः मुकादमाने वस्तीतल्या प्रत्येक पोरग्याला वीस रूपये दिले होते. त्यामुळे आज त्यांना कारखान्यासमोरच्या गाडयांवर चहा़,पाव़,वडा़,भजी... काय पाहिजे ते खाता येणार होते. मुकादम आक्काने म्हणजे त्याच्या बायकोने पाडव्याच्या निमित्ताने वस्तीमध्ये वाटण्यासाठी म्हणून गावातला आचारी बोलावून बुंदीचे लाडू करून घेतले होते.
एरवीचे कजाग असणारे मुकादम नवरा बायको आज भलतेच नरम झाले होते. दररोज गाडीतला ऊस कारखान्यात उतरवून झाला की त्या दिवसाचा हिशेब देण्यासाठी प्रत्येकाला मुकादमाच्या दारात थांबावंच लागे. वस्तीवरच्या बाया मात्र दुपारी जेवणं झाली की मुकादमिणीकडे जात. ही मुकादमीण म्हणजे बडं प्रस्थ होतं. ती होती मुकादमाची तिसरी बायको. ती वस्तीवरच्या घरातल्या कटकटी आणि अडचणी हातासरशी सोडवीत असे. हंगामात कधी कुणाला गावाकडे जायची गरज असेल आणि रजा हवी असेल तर तिच्याकडे रदबदली केली की मुकादम निमूटपणे ते मान्य करी.
तर त्या पाडव्याच्या दिवशी ती दुपारी बारापासूनच तिच्या दारात बुंदीच्या लाडवाचा एवढा मोठा हारा घेऊन बसली होती. त्याच्याबरोबर कडूनिंबाच्या पानांची जिरे़ धणे़ चिंच आणि गूळ घालून केलेला चटणीचा सट होता. दुसरीकडे मोठा पाण्याचा डेरा होता आणि तिचा गडी हैबती ओगराळयाने अलमिनचे ग्लास पाण्याने भरून ठेवत होता. ही आक्का दूपारहून शेतातून घामेजून आलेल्या प्रत्येक कामगार बाईच्या हातात़ तिच्या घरातल्या माणसाच्या संख्येनुसार लाडू आणि कडूनिंबाची चटणी ठेवत होती. वर पाडव्याच्या दिवशी ती कडू चटणी खायची म्हणून दमही भरत होती.
बायकाही मग चटणी तोंडात धरून हैबतीकडून घेतलेले पाणी गटागट पिऊन घराकडे पळत होत्या. घरी आल्याबरोबर हात पाय धुवून भराभर कामाला लागत होत्या. एरवी आई घरी आली की भूकेने कालवा करणारी पोरे आज गाडयावरचं हे-ते खाऊन तृप्त होती. या बायांनी पोळया करायच्या म्हणून प्रथम कणिक आणि मूगाचे पीठ घालून मोठे कणकेचे गोळे भिजवले होते. एकीकडे पुरणाची डाळ रटरटत होती. ठेचलेल्या बटाटयाच्या भाजीसाठीचा हिरवा मसाला दगडावर वाटत होत्या. त्याबरोबर पोरीबाळी कटाच्या आमटीसाठी कोरडा मसाला तयार करत होत्या. पुरण वाटण्यासाठीचा मात्र खास पाटा. तो काही प्रत्येकीकडे नव्हता. वस्तीत चारपाच पाटे फिरत होते.
कृष्णा म्हणजे मुकादमिणीची खास. कारण ती तिच्या माहेर गावातली. तिने तिच्या चार पोळया झाल्याबरोबर एक गुढीला नैवेद्याला काढली. दुसरी पोरग्याच्या ताटलीत दिली. मग एका ताटलीत दोन पोळया़ थोडा भात़ एका वाडग्यात भाजी आणि मोठया तांब्यात कटाची आमटी घेऊन ती मुकादमाच्या दारात गेली.
मुकादमिणीने तिला पाडव्याचं हळदकुंकू लावता लावता तिच्या ताटावर बारीक नजर फिरवली. 
"पोळयाची कणिक जरा जाड होती जणू?" ती म्हणाली. 

"न्हाई आक्कासाब. तुमच्यागत कुटल्या आमच्या पोळया व्हायला." कृष्णी वरमून म्हणाली.

"असूं दे ग..पाडवा गोड म्हनायचा बग. जा. जेव जा आणि देवीची ओटी भराया संग जाऊ." मुकादमिणीने असं म्हणता क्षणी कृष्णीचा जीव थंडा झाला.

ती पटापट घरी आली. ताटं केली.. तर तिचं मालक म्हणालं "तळण कुटं हाय ग?” झालं का! तिनं डब्यातल्या चार कुरडया़ पापडया तळून पोराला मुकादमाच्या घरी पिटाळलं. "आये मुकादम काकीने आणखी दोन लाडू आणि चिच्चची चटणी दिल्या बग.." असं म्हणत पोरगं ताट घेऊन बसलं. हंगामाच्या दिवसात रोज अर्धपोटी रहायची सवय पडली होती. त्यामुळे आज एकदम पोट भरल्यावर झोपा यायला लागल्या.

‘फडावर झोपून कुठं चालतंय.. ते बी पाडव्याच्या दिवशी..’ असं म्हणत तिनं भांडी घासली. चूल सारवली. स्वतःचं आणि पोराचं तोंड धुवून पावडर टिकली केल्यावर..तिच्या मालकाला त्याची बायको कृष्णी ओळखेनाच झाली.. "कोण म्हनायच्या शहरातल्या आक्का काय वो.". असं तो चेष्टेनं म्हणाला.

तशी "जावा तिकडं तुमी!”..असं म्हणून कृष्णीनं जो मुरका मारला की तिच्या मालकालाच काय पण रिकामं फिरत असलेल्या मलाही कृष्णी म्हणजे अप्सराच वाटली.

हळूहळू मुकादमाच्या घरी पोळयाचा ढीग जमला. भात़, भाजी़, कटाची आमटी़, तळण, सगळं पोचवलं गेलं. वस्तीतल्या प्रत्येकाकडे हेच जेवण बनवलेलं होतं. आता वस्तीतून गावाकडे परतेपर्यंत मुकादमाच्या घरी स्वैपाक नव्हता. पुढचे काही दिवस घरातले कोयते कामाला गेल्यावर त्या वस्तीत राहिलेली पोरेही सकाळचे मुकादमाच्या घरीच जेवणार होती.
सगळयांची जेवणं उरकेपर्यंन्त संध्याकाळ झाली. गुढया उतरल्या. थाळीवर डाव वाजवले आणि सगळया वस्तीत खोबरे साखर वाटली. मग प्रत्येक घरातले नवरा बायको आणि मुले देवाला आणि खरेदीसाठी बाजाराला निघाले. हरणी आणि तिची सासू दोघीच फडावर आल्या होत्या त्यांच्या घरी बापई नव्हतं मग मुकादमिणीनेच त्या दोघींनाही कृष्णीबरोबर तिच्या रिक्षात घेतले.
थोडया वेळापूर्वी गजबजलेली वस्ती एकदमच शांत झाली. आजचा दिवस फारच आनंदाचा होता. वस्तीवर भांडण नाही. मारामारी नाही. आज वस्तीवर मी सोडून बाहेरचे कुणीही आलेले नव्हते.

आठच्या सुमाराला देवी दर्शन आणि खरेदी उरकून मंडळी परत आली. सगळी खरेदी बेतशीर लावून सर्व मंडळी मुकादमाच्या घरासमोरच्या मोकळया जागेत जमली. "यळकोट यळकोट जय मल्हार" करत हैबती नाचायला लागला होता. मुकादमाने भंडारा उधळला. चारपाच गडी मशाली घेऊन नाचत आले. बारकी पोरं पण नाचायला लागली.
हैबती तिथला हरकाम्या... स्वैपाक म्हणू नका...झोपडी बांधायचं म्हणू नका..सगळया कामात तरबेज. त्याच्याकडे बायको मात्र टिकत नसे त्यामुळे साऱ्या वस्तीचा तो चेष्टेचा विषय असे. तो ही ते हसण्यावारी नेई. हैबतीचा खंडोबा नाच संपल्यावर गळयात टाळ घातलेले पंढरीचे वारकरी उठले - "ग्यानबा तुकाराम... मीच तो रे आत्माराम" हा नाद घुमायला लागला. टाळकरी बायका पण उठल्या. एकीच्या हातात तुळशी वृंदावन. दोन पोरं घोडा बनली. उरलेल्या बायकांनी फेर धरला. "खाली वाकून धुणं धुते शालू भिजला.. आमच्या भावानं बांधियेला गाडी बंगला". अशी चार पाच गाणी गाऊन फेर धरल्यानंतर फुगडया सुरू झाल्या. साधी फुगडी़, घसर फुगडी़, जातं असे नाना प्रकार.. मग कुणीतरी मुकादमाला आणि त्याच्या बायकोला फुगडी धरायला लावली. मुकादम असा लाजला का नाही.. की त्याची बायको पण हसायला लागली. मग सगळेच नवरा बायको एकमेकांच्या उखाळया पाखाळया काढत फुगडी घुमवायला लागले. अशावेळी वस्तीवरच्या बापयांना तरण्या पोरींबरोबर फुगडी खेळायचा पण नाद करता आला. त्या दिवशी सगळं चालत होतं.
एकाएकी बारीक आवाजात पण तार स्वरात लकेरी ऐकू आल्या. हरणाबाई आणि तिची सासू.. नव्या नथी घालून .. आली ठुमकत नार लचकत..हिरव्या रानी.. म्हणत गात होत्या. त्यांच्या मागून कृष्णीचा नवरा "गऽ साऽजणी.." म्हणून जोरात गायल्यावर पोरांनी ढोलकी वाजवून नाचायला सुरूवात केली. मग एकामागून एक गायची चढाओढच लागली. मंडळी भलतीच सूरात होती.
अजून गुजर आणि लमाण मंडळी बाजारातून आली नव्हती. "लमाणाची आणि गुजरांची आली की बगाच तुम्ही..राधी म्हणत होती. एरवी या दोन्ही जमाती इतर वस्तीतल्या कामगारांशी फटकून वागत पण आजचा दिवस वेगळा होता.
गुजरांनी आल्या आल्या दूध आणि माव्याचे लाडू वस्तीला वाटले कारण त्यांच्याकडे दूध दूभते भरपूर असते. वास्तविक त्यांच्या जातीत बायकांवर खूप बंधने असतात. पण आज गुजरांच्या बायका आणि पोरांनी "श्रीकृष्णाच्या घरातील रूक्मिणी आणि तिची सून गायकी यांची ‘साँस बहू की लडाई' ही नृत्यनाटिका केली. त्यात हनुमानापासून कोणीही पात्रे होती. रूक्मिणी आणि गायकी या ऊसतोडीसाठी जातात आणि तिथल्या कामावरून दोघींच्यात झगडा होतो. मग कृष्ण येऊन दोघींची समजूत काढतो. घरी येऊन स्वैपाक करताना पण दोघी भांडायला लागल्यावर मग कृष्ण एक ऊसाचं कांडकं घेऊन दोघींना देतो दोन फटके.. आणि मग दोघी सरळ होतात. ही त्या नाटकाची गोष्ट! वस्तीतल्या सर्वांना ती गोष्ट बहुधा माहिती होती आणि सर्वाना ती फारच आवडत होती.

मग आली लमाणांची टोळी... त्यांनी सगळयांसाठी गोड आणि तिखट शेवकांडे़, शेवगाठी आणि त्यांचे खास खडीसाखर घातलेले मोहाचे शरबत आणले होते.
माझ्या कानात कुणीतरी कुजबुजले, " पिऊ नका ताई ... वंगाळ दारू असती ती.."
लमाणी बायका भलत्याच सुंदर दिसत होत्या. त्यांचे ते लांब घागरे.. कथलाचे चकाकते दागिने. त्यांच्या लमाण टोळीतले सगळे फेर धरून झूलायला लागले. "क्रिश्‍ना कही राधा को..जाती कहा रंग छोडके, आती हू घटिका मे सय्याजी को परोसके.." या गाण्याची धून छान होती. त्यांचा नाच म्हणजे फक्त वर्तुळाकार फेऱ्यात एकमेकांच्या कंबरेला धरून मागे पुढे आणि दोन्ही बाजूला डोलणं एवढंच होतं ..हळूहळू वस्तीतले बाकीचेही त्या डोलनृत्यात सामील झाले. डोलाची गती वाढली तशी टाळया वाजायला लागल्या.
मशाली घेऊन नाचणारी पोरे त्या वर्तुळामध्ये उडया मारत होती. दिवसभराच्या धांदलीनंतरही कोणी थकलं नव्हतं..रात्रीचे बारा वाजून गेले होते. एव्हाना बारकी पोरं झोपी गेली होती.
नाच संपवून सगळी निवांत बसली होती. कुणाला घराकडे जावेसे वाटत नव्हते. एकदम गणपत शिरप्याला म्हणायला लागला.. "दादा मी तुज्या गाडीतून ऊस काढून माज्या गाडीत भरीत व्हतो रे रोज.." म्हणून रडायला लागला.. म्हणजे निरोपाचा कार्यक्रम सुरू झाला. सगळीच एकमेकांना काही ना काही कबूल्या करून रडत होती. एरवी एकमेकांच्या जातीमुळे जरा वेगळया ठिकाणी पालं ठोकणारी आणि एवढया तेवढया कारणावरून एकमेकांच्या जीवावर उठणारी ही सगळी मंडळी एकमेकांना गर्ळा मिठया घालून रडत होती. सर्वच मोठी माणसे त्या हंगामातल्या कडूगोड आठवणी सांगत रडत आणि हसत सुध्दा होती.
"आपण सगळी एकच रे ... आपली जात गबाळी" असं शेवटी मुकादम म्हणाला. सर्वांनी माना डोलावल्या. मग एकदाचा मुकादमाच्या बायकोने दिलेला घोटभर चहा पिऊन सगळी त्यांच्या झोपडीकडे परतली. मी ही जड पावलाने गेस्ट हाऊसवर परतले. मला तिथपर्यन्त पोचवायला हैबती आणि मुकादम आक्का आल्या होत्या. रस्त्यावर अंधार असला तरी चैत्राचं चांदणं होतं. प्रतिपदा असल्यामुळे आकाशात चांदण्यांचा नुसता खच होता.
वर्षाचा पहिला दिवस.. म्हटले तर माझ्या रोजच्या विश्‍वापेक्षा अगदी भिन्न समुदायात सहवासाने निर्माण झालेल्या प्रेमामुळे श्रीमंत झालेला - असा वर्षारंभ माझ्या आयुष्यातला पहिला आणि कदाचित शेवटचाही होता.
त्या माझ्या संशोधन काळात मी त्या वस्तीची किती भयाण रूपं पाहिली होती. भीतीने थरकाप उडेल असे अत्याचार पाहिले होते. आपसातील प्रेमप्रकरणे, त्यामुळे होणारी भांडणे़, पैशाच्या हव्यासापोटी आपल्या बायकांचा गावातल्या टवाळ पोरांशी केलेला सौदा़, घरात धान्य भरले असले तरी रांधलेले नाही म्हणून भूकेपोटी रडत रडत झोपी जाणारी छोटी छोटी मुले़... गरोदरपणात अगदी बाळंतपण होर्इपर्यन्त काम करणाऱ्या स्त्रिया़, मुकादमाने दमात घेऊन मुद्दाम कमी दाखवलेले वजन... कितीही गरज असली तरी रजा देण्यास दिलेला नकार... त्यामुळे ओक्साबोक्षी रडणारी माणसे... त्या वस्तीत जाऊन आले की मला वेठबिगारी आणि गुलामीच आठवत राही!
पण त्या दिवशी मात्र ही सगळी काजळी पुसून टाकणारे .. त्या वस्तीत क्वचितच प्रगटणारे मानवी संबंधाचे किती सुंदर आणि आनंदी पैलू माझ्याकडे जणू घरंगळत आले होते. खरेतर अगदी क्षणभंगूर म्हणावा असा तो केवळ एका रात्रीपुरता सामूहिक स्नेहाचा अविष्कार आणि त्यावेळी आपसातले गळून पडलेले भेद.. दुसऱ्या दिवशी पासून सगळं पूर्वीसारखे रहाटगाडगे सुरू होणारच... पण तिथल्या कोणाच्या तरी मनात त्या रात्रीच्या प्रेमाचा अविष्कार कायम झिरपत राहिलच की आणि हळुहळू खरोखरच सगळा दुष्टावा संपून जाईल का... या विचाराने माझ्या डोळयांना धारा लागल्या होत्या.
माझ्या मनातले विचार मुकादम आक्काने जणू वाचले असल्यासारखे तिने माझ्या हातावर आश्‍वासक थोपटले आणि तिनेही मला रडत रडत घट्ट मिठी मारली. ती म्हणाली.. ’ताई पहाट आता दूर न्हाई’ तिचे ते शब्द माझ्या काळजात जणू रूतून बसले आहेत. मला आतापर्यन्त मिळालेल्या नववर्षाच्या सगळयात यथार्थ शुभेच्छा होत्या त्या...

 

मंजूषा देशपांडे

सूक्ष्मजीवशास्त्रात M.Sc, 
Ph.D in Women's Studies, 
2002 पासून शिवाजी विद्यापीठातील लोकविकास केंद्राची संचालक

 

‘अनिता’ नावाची एक डेरेदार सावली!

दोन आठवड्यापूर्वी ज्या व्यक्तीशी 'एका पुरवणीत महिला दिनासाठी लेख लिहिशील का?' म्हणून चर्चा केली त्याच व्यक्तीवर आज लगेच आदरांजलीपर लेख लिहावा लागणं हे हात थरथरवणारं आहे. अजूनही, अनिता गेलीय, ‘अनिता पगारे इज नो मोअर’ हे मनाला पटलेलं नाही; पण फेसबुकवर दिसणाऱ्या तिच्याविषयीच्या पोस्टस बघून मेंदू सतत सतत ती नसल्याची आठवण करून देत राहतो.
अनिताची आणि माझी पहिली ओळख खरंतर फोनवरच्या एका छोट्याशा भांडणातून झाली. “असं कसं तुम्ही करता? ही काय पद्धत झाली का?” हे एका घटनेच्या अनुषंगाने तिच्यात आणि माझ्यात झालेल्या संवादाचा (किंवा विसंवादाचाच म्हणा) काय तो सारांश होता. नंतर सामाजिक क्षेत्रात जरा रुळल्यानंतर अनिता पगारे हे नाव सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, सोशल मिडीयावरच्या खऱ्याखुऱ्या अनुभव लेखनामध्ये, पोलीस स्थानकांमध्ये, अनेक महिलांच्या तोंडून, पुस्तकांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये ऐकून, वाचून अनिता जरा जास्त ओळखीची झाली आणि “असं कसं तुम्ही करता? ही काय पद्धत झाली का?” हा प्रश्न अनेक ठिकाणी वर्षानुवर्षांपासून उभ्या असलेल्या संरचनांना विचारून हादरे देणारी प्रचंड पावरफुल बाई आहे हे कळलं. जिथेजिथे प्रश्न विचारण्याच्या, प्रतिप्रश्न करण्याच्या शक्यता कुणीतरी पुसून टाकल्या आहेत अशा ठिकाणी प्रश्नांची पोती घेऊन त्यांची उत्तरं मिळाल्याशिवाय परत न फिरणारी अनिता हि एक चिकित्सक, ज्ञानपिपासू आणि खमकी बाई होती अशी ती हळूहळू मला उमगत गेली.
पण मला एखाद्या लेखात वाचतांना भेटलेली अनिता आणि प्रत्यक्ष कुठल्यातरी कार्यक्रमात भेटून पाठीवर धप्पा देऊन “काय मॅडम काय म्हणताय?” असं म्हणणारी अनिता खूप सारखी होती. म्हणजे तिच्या लेखणीत, प्रत्यक्ष ट्रेनिंग घेण्याच्या पद्धतीत किंवा फक्त टपरीवर उभं राहून अघळपघळ गप्पा मारण्याच्या शैलीत कुठेच काहीच फरक नव्हता. भाषा, टोन, शब्द, लकब ह्यात अजिबात दोन समांतर बाजू उभ्या न करता ती त्याच सरलतेने आणि तरलतेने सुद्धा बोलायची. कदाचित याच गोष्टीमुळे अनिता सगळ्यांना आणि विशेषत: माझ्यासारख्या तरुण आणि नव्याने आपल्या कामाची नाडी ओळखू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना जवळची, आपली आणि आपल्यासारखी वाटायची.
अनिता सडेतोड, काहीच्या भाषेत फटकळ होती. पण मला नेहमी तिचा हा स्वभाव म्हणजे एक रचनात्मक विद्रोह वाटत आलाय. एक बाई म्हणून जगतांना, त्यातही एक खालच्या म्हणवल्या गेलेल्या जातीतील, गरीब, छोट्याशा वस्तीतलं जगणं अनुभवलेली, फारसे प्रीव्हीलेजेस नसलेली बाई म्हणून तिला आलेले अनुभव, त्यातून पुढे जाऊन ती पाहत असलेलं सगळ्या बायकांच्या मुक्तीचं स्वप्न आणि ह्या सगळ्यात सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच पितृसत्तात्मक विचारांच्या माणसांचा करावा लागणारा सामना या सगळ्यातून येणारी हतबलता काय पातळीची असेल हे वर्णन करून सांगता येणार नाही. पण हा राग, क्रोध सगळा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे होणा-या व्यवस्थात्मक शोषणातून येतो आणि हा शोषितांचा आक्रोश आक्रस्ताळेपणाने नाही पण प्रचंड रचनात्मक पद्धतीने मांडून ती या व्यवस्थेविषयीचा आपला राग, आपली नाराजी इतकी संतुलितपणे व्यक्त करत असे कि माझ्यासारख्या अनुभवांचं मडकं आताच कुठे भरायला सुरुवात झालेल्या कार्यकर्तीसाठी भर उन्हात चालून आल्यानंतर एखाद्या डेरेदार झाडापाशी शांततेत सावली अनुभवत बसावं असं होतं.
स्त्रीवादी पद्धतीला जगण्याची पद्धत म्हणून निवडल्यानंतर जवळपास सगळ्याच पावलांवर भेटणाऱ्या प्रचंड पितृसत्ताक वल्लींकडे पाहून राग, चीड, हतबलता आणि निराशा वाट्याला येत जाते. हे आतलं संचित व्यक्त करण्याच्या पुरेशा सुरक्षित आणि योग्य जागाही फारशा उपलब्ध नसतात. पण ह्याच सगळ्या नकारात्मक भावनांचा निचरा करण्यासाठी,त्या त्या वेळची ती निराशा, शब्दांना कुठलंच फिल्टर न लावता व्यक्त करण्याची जागा माझ्यासाठी अनिता होती. ह्या सगळ्या नकारात्मक उर्जेला आणि वाईट अनुभवांना एकत्र बांधून ह्यातून रचनात्मक विचार कसा जन्माला घालायचा, ह्याचं कौशल्य आणि त्याच वेळेला अनुभवांवर आधारित भक्कम वैचारिक बैठक अनिताकडे होती. सगळ्यांनाच आणि विशेषत: तरुण कार्यकर्त्यांना अशा डेरेदार सावलीच्या जागा अनिताने देऊ केल्यात. त्यासाठी तिला खूप थँक्यू म्हणायचं राहून गेलंय.
तरुण वयापासूनच परिवर्तनवादी चळवळीत कार्यकर्ती म्हणून जोडली गेलेल्या अनिताने पुढे अशा अनेक चळवळींचं नेतृत्व केलं. डाव्या, परिवर्तनवादी, दलित आणि सम्यक विचारांच्या जागांवर, चळवळीमध्ये अनिता पगारे हे नाव मोठ्या आदराने सगळ्यांच्याच आतून बाहेर यायचं. फक्त सामाजिक क्षेत्रातचं नाही तर अगदी कोर्पोरेटमध्ये काम करून तिथल्या सुद्धा अनुभवाचं एक गाठोडं घेऊन ती आपल्या कामाचे आयाम अधिकाधिक विस्तारत होती आणि हाच तिचा स्वभाव होता. पोलीसस्थानकांतल्या महिलासेलमध्ये समुपदेशक म्हणून किंवा नंतर संगिनी महिला जागृती केंद्राच्या माध्यमातून अनेक बायका, त्यांची आयुष्य, त्यांच्यावर होणारी हिंसा, बायकांचे अधिकार, स्वत:ची जाणीव अशा विषयांवर ती खूप भरीव काम करत होती. जेंडरसोबतच जातप्रश्नाविषयीसुद्धा अनिताची समज खूप पक्की होती. आपण ज्या जातीत जन्माला आलो ती नाकारणं आणि तिच्याच बऱ्यावाईटाची चिरफाड कडून नव्या वाटा, नवे पर्याय शोधणं - ही तिची ह्या सगळ्या सामाजिक संरचनांना प्रश्न विचारण्याची पद्धत होती. एखादी गोष्ट समजावून सांगण्याची तिची पद्धत आणि हातोटी तर आपली खूप जवळची व्यक्ती, आपल्यासारखीच भाषा बोलणारी आपल्याच घरातली कुणीतरी कान पिळून किंवा प्रेमाने समजावून सांगतेय असं वाटावं इतकी विलक्षण आणि रोजच्या जगण्यातलं वाटावं अशी होती.
अनिताचं नेतृत्वकौशल्य अफाट आणि विलक्षण होतं. ती एक उत्तम संवादक आणि उत्तम संघटकसुद्धा होती. सम्यक विचार मांडणारी आणि मांडलेला प्रत्येक विचार जगणारी ती एक द्रष्टी बाई होती. मी पुन्हा अनिताला व्यक्ती न म्हणता ‘बाई’ असं म्हणतेय ते एका कारणाने. माझं आणि अनिताचं नातं त्याच एका बाईपणाच्या धाग्याने जोडलेलं होतं. तिच्यातलं भक्कम आणि लढाऊ स्त्री तत्वचं मला नेहमी तिच्याकडे खेचत आलं. आपल्यासारखं जगणारी आणि आपल्यासारखाच विचार करणारी पण तरी अनुभवांनी अक्ख्या दोन पिढ्या पुढे असलेली एक खमकी बाई म्हणून ती माझ्यासाठी माझ्याच प्रतलातली एक समांतर रेष होती.
अजूनही ‘होती’ हा शब्द लिहितांना थोडं बिचकायला होतंय. पण हे आता स्वीकारायला हवं हेही समजतंय. मला आठवतं काही महिन्यांपूर्वी अनिताला मी शेवटचं भेटली होती, ते संगिनीच्या नव्या ऑफिसात. तिच्या डेस्कजवळ बसून बाहेरच्या मोठ्याच मोठ्या आणि दाट झाडांमध्ये काही काळ माझी तंद्री लागली तेव्हा मध्येच तंद्री न मोडता नंतर ती हळूच म्हणाली कि, “माझ्याकडे बायका असं नवऱ्याचं, सासरच्या लोकांचं गाऱ्हाणं घेऊन येतात आणि बोलता बोलता अशाच या बाहेरच्या झाडांमध्ये हरवून जातात. नवऱ्याने रात्री दिलेला बेदम मारही त्या काही काळ विसरतात. अशाच हिंसेचे, पितृसत्तेचे दुखरे व्रण घेऊन आलेल्या बायकांना काही काळ तरी त्यांचा वर्तमान विसरून ही झाडं आणि ही जागा आनंद देऊ शकते म्हणून मला ही जागा खूप आवडते!” कधी प्रत्यक्ष तर कधी अशी विचारांची आधाराची, प्रेमाची आणि धीराची सावली देणारी अनिता त्याच झाडांमध्ये एखाद्या बाईचं बोट धरून हरवली असेल का? 
कुणास ठाऊक; आता अशा प्रश्नांमध्ये फारसा अर्थही नाही. पण जेव्हा जेव्हा लढाई करण्याची वेळ येईल, आपलं म्हणणं ठासून सांगण्याची आणि प्रसंगी त्यासाठी मागे लागून कृती घडवून आणण्याची वेळ येईल, कुठलीतरी वस्तीतली मुलगी शिक्षण पूर्ण करायचं म्हणून आई वडिलांशी भांडून हवं ते करण्याचा प्रयत्न करेन तेव्हा त्या प्रत्येक वेळी अनिताची आठवण येईल. शोधिनी म्हणून काम करणाऱ्या गावातल्या सगळ्या मुलींनाही अनिताने त्यांचं केलेलं भरभरून कौतुक आठवतंय. “तुम्ही माझ्या हिरोइन्स आहात!” असं म्हणत त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजार राहून पाठीवर कौतुकाची आणि आधाराची थाप देणाऱ्या मुली खरंच एक दिवस सगळ्यांच्याच हिरोइन्स होतील अनिता, हे नक्की!
तू लढत असलेल्या मूल्यांसाठी, तत्वांसाठी आणि तू स्वप्न पाहत असलेल्या समताधीष्टीत जगासाठी आणखी कसोशीने प्रयत्न करणं, हतबलतेचीसुद्धा एका मोठ्या रचनात्मक उद्दिष्टासाठी रचनात्मक मांडणी करणं आणि व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून आणि बाई म्हणून सन्मानाने उभं राहणं, अनेकांना उभं करणं हि तुझी शिकवण स्वत:त आणण्यासाठी काम करायचंय. अनिता, तुला सतरंगी सलाम!
तू असतांना हा लेख लिहिला असता तर वाचून चटकन फोन फिरवून मन भरून कौतुक केलं असतंस आणि ‘इतका मस्का का मारलास मला’ म्हणून जरा सुनावलं सुद्धा असतंस. तो फोन मला आला असं मी समजते!

काजल बोरस्ते.

लेखिका आणि कार्यकर्ती 

आठवणीतली अनिता.....

साधारण दोनहजार सालची गोष्ट असेल; आम्ही इंग्लिश डिपार्टमेंटच्या विद्यार्थिनी कॉलेज मॅक्झिनमध्ये लेख देण्यासाठी माहिती गोळा करत होतो. विषय असा होता की नाशिक भागामध्ये ज्या सामाजिक कार्यकर्त्या वेगवेगळ्या चळवळीतून काम करतात त्यांच्या मुलाखती घ्यायच्या आणि त्या मुलाखती एकत्र करून माहितीपर लेख तयार करायचे. मार्गदर्शन करणाऱ्या प्रोफेसरने बरीच नावे सुचवली त्यामध्ये अनिता पगारे यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांना भेटायचे ठरले. ती पहिलीच भेट होती, तरी अतिशय आपुलकीने, ओघवत्या भाषेत, त्यांच्या खुमासदार शैलीत त्यांनी आपल्या कार्याबद्दल आम्हाला माहिती दिली. आमच्यासारख्या समाजकार्य प्रेरणेने प्रभावित झालेल्या विद्यार्थिनींना त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. ह्या नंतर बराच काळ लोटला. जवळ संभाषणाची काही साधने नव्हती. अनिता मॅडम एक सामाजिक कार्यकर्ता आहेत एवढीच तोपर्यंत ओळख माहिती होती. बऱ्याच वर्षांनी नंतर पुन्हा एकदा फेसबुक वरून मॅडमशी कनेक्ट झाले.आता त्यांची भेट होईल आणि परत वैचारिक गप्पा होतील या भावनेने, मला खूपच आनंद झाला. 

आता त्यांचं कार्य खूपच पुढे गेलेलं होतं. त्यांच्या कार्याबद्दल बर्याच ठिकाणी वाचनात आलं आणि एकूणच त्यांच्या कार्याचा आवाका पाहून मी अवाक झाले. आता लक्षात आले की आता अनिता मॅडम खूप मोठ्या कार्यकर्त्या झाल्या आहेत. कामेही खूप आहेत. त्यांचा फोननंबर मिळवला पण त्या आपल्याला वेळ देतील की नाही या संभ्रमात होते. त्यावेळी नाशिकला गेल्यागेल्या प्रथम मॅडमला फोन लावला आणि त्यांनी लगेच ‘उद्या ये’ म्हणून सांगितले. मला विश्वासच बसत नव्हता की आज स्वतःच्या कार्यामध्ये इतक्या व्यस्त असलेल्या आणि मोठ्या झालेल्या व्यक्तीने माझी काहीही ओळख नसताना माझ्यासाठी वेळ राखून ठेवला आणि मनापासून मला मार्गदर्शन केले. माझे पीएचडीचे संशोधन स्त्रीवादी कादंबऱ्यांवर होते आणि मॅडम स्वतः स्त्रीवादी चळवळीत होत्या. तर मला माझ्या संशोधनाला आजच्या परिस्थितीमध्ये जोडून हायपोथेसिस टेस्ट करता येईल का हे बघायचे होते. या कामात अनितामॅडमच्या अनुभवाची आणि एकूणच त्यांच्या कार्याची खूपच मदत झाली. परत एकदा समोरचा कितीही अनोळखी असू देत त्याला आपलेसे करून संभाषण करणे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करणे हा त्यांचा स्वभाव खूप भावला. 

आज जर त्यांच्याबद्दल जे काही आठवते त्यामध्ये सर्वप्रथम हीच गोष्ट सांगावीशी वाटते की चळवळीत असू देत किंवा मैत्रिणींमध्ये असू देत, लिखाणात असू देत त्यांच्या विचारांची स्पष्टता आणि स्वभावातला पारदर्शकपणा नेहमीच लक्षात राहण्याजोगा आणि नमूद करण्याजोगा आहे. या भेटीमध्ये मी दिशा शेख यांच्या कार्याबद्दल उल्लेख केला आणि त्यांनी लगेच मला दिशाबरोबर जोडून दिले. ज्या दिवशी भेटलो त्याच दिवशी संध्याकाळी अचानक दिशा त्यांच्या घरी आली तर त्यांनी स्वतःहून लक्षात ठेवून मला फोन केला आणि परत एकदा आम्ही भेटलो. खूप गप्पा,वेगवेगळे विचारप्रवाह आणि सामाजिक जाणिवा घेऊन मी मुंबईला परतले. मग जेव्हाही कधी फोन व्हायचा तेव्हा विचारांचे, प्रश्नांचे आदान-प्रदान होत राहिले. पुढे वंदना खरे यांनी माझ्या कामाची दखल घेऊन ‘पुन्हास्त्रीउवाच’ च्या संपादक मंडळांमध्ये मला स्थान दिले. तिथे जेव्हा परत अनिता मॅडम संपादक ग्रुपमध्ये भेटल्या तर कोण आनंद झाला! कारण तिथे प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर वैचारिक देवाणघेवाण होणार होती, त्यांचे विचार, त्यांचे कार्य अजून जवळून बघायला, ऐकायला मिळणार होते.

कोणत्याही प्रसंगावरचे, कार्यक्रमातले त्यांचे विचार ऐकताना भारावून गेल्यासारखे व्हायचे. एखाद्या विशिष्ट घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून आणि अभ्यासातून पाहायच्या आणि फक्त प्रश्न उपस्थित करणे हेच एका कार्यकर्त्याचे काम नसून त्यासाठी मदत शोधून त्यातून मार्ग काढणे हे काम किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी नेहमी पटवून दिले. त्यांच्या नेटवर्कमध्ये कोणत्याही कार्यकर्त्यांचे काम आवडले किंवा त्यातून प्रेरणा मिळाली आणि त्यांना त्या संदर्भात विचारले तर अशा सगळ्या मित्र-मैत्रिणींबरोबर त्या लगेच जोडून देत. त्यांच्या स्वभावातली ही पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा क्वचितच कुठे पाहायला मिळतो. 
अगदी जानेवारी 2021 मध्ये एका महाविद्यालयात व्याख्याता म्हणून जायचे होते तेव्हाही त्यांच्या 'सावित्रीच्या लेकी' या चळवळीचा दाखला देऊ केला. त्यांना त्याबद्दल विचारले असता माझ्या भाषणाच्या संहितेत अतिशय पुरोगामी मुद्दे सांगून एकूणच माझा कार्यक्रम enriching आणि आयओपनर असा बनवून टाकला. अशा अनिता मॅडम ज्याच्या आयुष्याला स्पर्श करतील त्याचे विचार खरोखरच चकचकीत करून टाकत. असा 'मिडास टच' मेंटॉर तुमच्या आयुष्यातून अचानक निघून जातो तेव्हा लक्षात येते - खूप काही सांगायचे, खूप काही बोलायचे आणि खूप काही करायचे राहून गेले. आजपर्यंत सगळ्यांनी त्यांच्या आठवणी मध्ये त्या कोणकोणत्या क्षेत्रात काम करत होत्या, वेगवेगळ्या चळवळीतले त्यांचे योगदान, शोषितांसाठी, गरिबांसाठी, स्त्रियांसाठी, आदिवासी जमातीसाठी, नर्मदा बचाव आंदोलनासाठी, तरुणांसाठी, कष्टकरी जनतेसाठी, मदत आणि मार्गदर्शन दोन्ही आघाड्यांवर किती धडाडीने आणि हिरिरीने काम केले याबद्दल लिहिले आहे. पण माझे हे आजचे शब्द म्हणजे आठवणींची ती फुले आहेत की ज्यांनी माझे आयुष्य आणि विचार सुगंधीत केले, कणखर केले. म्हणूनच अनिता मॅडम आता हाकेच्या अंतरावर फोनच्या अंतरावर किंवा नाशिकला घरी गेल्यावर घरात नाहीत हे सत्य मन मानायला तयार नाही!

डॉ. सीमा घंगाळे

(सदस्य, 'पुन्हास्त्रीउवाच' संपादक मंडळ)