भीती


हो, भीती वाटतेय मला..

बलात्कारांच्या वाढत्या घटनांची

हा आजार वाढतोय, दिवसेंदिवस..

रोज अनेक लहान थोर स्त्रियांवर बलात्कार केला जातोय..

म्हणून भीती वाटतेय मला ..

भीती तुम्हालाही वाटतेय, 

पण तुम्ही भिताय स्त्रियांसाठी व मुलींसाठी

त्यांच्या सुरक्षिततेसाठी

माझी भीती निराळी आहे

माझी भीती आहे मुलांसाठी

निरागस कोवळ्या मुलांसाठी

जी मोठी होऊन बनणार आहेत - एक पुरुष

भीती वाटतेय की

त्यांच्यातील प्रेम, निरागसता संपणार आहे..

उरणार आहे फक्त "रेप कल्चर" चा आजार..

नक्की कधी होतो हा बदल

मुलापासून पुरुष होण्याचा..

मला माहित नाही... 

थांबवता येईल का तो क्षण? 

मला माहित नाही... 

हा आजार सर्वांमध्ये आहे जे सहमत आहेत या पळवाटेशी - 

Men will be men

तुम्ही म्हणाल - "सर्वच पुरुष रेप करणार नाहीत" 

नक्कीच नाहीत ... 

किती आहेत आपल्या अवती भोवती असे " चांगले " पुरुष...

ते कसे करतील रेप ... छे!  

अगदी मान्य..

पण  हा आजार हजार प्रकारे दिसतो..

चांगले पुरुष -

विचारात, कल्पनेत, नजरेत कधी केला असला रेप - 

तरी प्रत्यक्ष नक्कीच करणार नाहीत ..

धक्का , शिट्टी, गर्दीचा फायदा नव्हे गैरफायदा हे "रेप " नाहीत  

प्रत्यक्ष घडलाच "चुकून " रेप तरी असा पाशवी नक्कीच नसणार...

अनोळखी स्त्री असेल सुरक्षित त्यांच्यापासून... नात्यातील नसल्या सुरक्षित तरी ठीकच ..

पत्नी तर हक्काची असते... तिचा नकार गुन्हा असतो..

नाही का? 

किंवा  ते स्वतः करणार नाहीत मात्र समर्थन करतील

म्हणतील, " स्त्रियांचे कमी कपडे  आणि मोकळे वागणे चुकीचे आहे - बंद करा" 

"मुलींना सांभाळून तिजोरीत ठेवा " 

कारण

"आमच्या " पासून कोणी सुरक्षित नाही..

जोवर रेप कल्चर मान्य आहे तोवर नक्कीच नाही.. .

एकच विनंती

सांभाळा, खूप सांभाळा

तुमच्या "मुलांना "

निरागस कोवळ्या मुलांना

या आजारा पासून

पुरुष बनण्यापासून

या रेप कल्चर पासून !!

ही काळाची गरज आहे !!

खूप मोठी जबाबदारी आहे...

"मुलांच्या " पालकांवर !

जगातल्या स्त्रियांना सुरक्षित ठेवण्याची.......

डॉ. प्रिया देशपांडे

पुरुषत्वाच्या विविध छटा

‘ग्लोबल मॅस्क्युलिनिटीज् : इन्टरोगेशन्स अ‍ॅण्ड रीकन्स्ट्रक्शन्स’
संपादन : डॉ. मंगेश कुलकर्णी / रिमझिम जैन
प्रकाशक : रूटलेज
पृष्ठे: २६५, किंमत : ६९५ रुपये

प्रा. मंगेश कुलकर्णी यांनी संपादित केलेले पुस्तक आज अनेक संदर्भात महत्त्वाचे आहे. अकादमिक क्षेत्रातील बुद्धिवंत आणि स्वयंसेवी संस्थांतील कार्यकर्ते यांनी कुटुंब, पितृत्व, स्थलांतर, विकास, हिंसा अशा मुद्यांच्या च्या चौकटीत ‘पुरुषत्वा’ची केलेली उकल या पुस्तकात वाचायला मिळते. मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, सार्वजनिक आरोग्य ते मज्जाजैविकी (न्यूरोबायोलॉजी) असा प्रचंड आंतरविद्याशाखीय आवाका असलेल्या या पुस्तकात ‘पुरुषत्वा’चा धांडोळा घेतला आहे. संपादकीय प्रस्तावना आणि १३ संशोधनपर प्रकरणांमधून अगदी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्य़ातील आदिवासी जमातीतील पुरुषत्वापासून आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील पुरुषत्वाचे एक वैश्विक कोलाजच रेखाटले आहे.

पहिल्याच प्रकरणात नोलवाझी मखवांझी यांनी दक्षिण आफ्रिकेतील खोसा भाषा बोलणाऱ्या समाजातील मुलांचा पुरुषत्वाकडे होणारा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजातील सुंता करण्याच्या प्रथेतून पितृसत्ताक पुरुषत्व कसे बिंबवले जाते, याबाबत सुमारे दीड दशकभर संशोधन करून समोर आलेल्या माहितीच्या आधारे मांडणी केली आहे. आरोग्याबाबतच्या शास्त्रीय मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून पारंपरिक सुंता कायदा २००१ साली अस्तित्वात आला, तरीही या प्रथेचा गैरवापर होत राहिला आणि पुरुषत्वाची रूढ चौकट भंगली नाही, या निष्कर्षांप्रत मखवांझी येतात. दुसऱ्या प्रकरणात संजीव उप्रेती यांनी सांस्कृतिक धारणा, सामाजिक संरचना आणि कायदा यांमार्फत पुरुषप्रधान व्यवस्था कशी दृढ होते, हे काठमांडू (नेपाळ) येथील न्यायालये, स्वयंसेवी संस्था, पोलीस ठाणी आणि माध्यमे यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींकडून मिळविलेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट केले आहे. तिसऱ्या प्रकरणात हॅना राइट यांनी पुरुषत्वाच्या बदलत्या रूपांमधून व दृष्टिकोनांतून संघर्षांस प्रतिबंध होऊ शकतो काय, याबाबत केल्या गेलेल्या पाच खंडांमधील विविध प्रयत्नांचा आढावा घेतला आहे. स्त्रीवादी सैद्धांतिक मांडणीतून आणि चळवळीतून संघर्ष प्रतिबंध आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण झालेल्या विपुल साधनसामग्रीचा ऊहापोह करून तिच्या काही मर्यादाही त्यांनी दाखवून दिल्या आहेत. शशिश कमल या बांगलादेशी संशोधकाने संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींचा वापर करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हिंसक वर्तन कसे आकाराला येते, हे चौथ्या प्रकरणात स्पष्ट केले आहे.
सॅन्डी रक्सटन, मार्टिन रॉब, ब्रिड फेदरस्टन आणि मायकेल वॉर्ड यांनी सहलेखन केलेल्या पाचव्या प्रकरणात तरुण मुलांवरील समवयस्कांचा प्रभाव तसेच ‘रोल मॉडेल्स’ आणि मार्गदर्शक यांची पुरुषत्वाच्या जडणघडणीतील भूमिका यांबाबत विवेचन केले आहे. सहाव्या प्रकरणात बॅरन ओरॉन आणि अ‍ॅलिस वेलबॉर्न यांनी मज्जाजैविकीय परिप्रेक्ष्यातून लिंगभेदाधारित हिंसाविषयक जाणीवजागृती करण्यासाठी कारमोजा (युगांडा) इथे नऊ महिने चाललेल्या प्रशिक्षण कार्यशाळेतून समोर आलेल्या तथ्यांच्या अनुषंगाने मांडणी केली आहे. प्रशिक्षणार्थीमध्ये सुरक्षिततेबाबतचे आश्वासक भान, हिंसामुक्त सहजीवनाचा स्वीकार, जी कामे स्त्रियांची समजली जातात अशा कामांमध्ये पुरुषांचा वाढता सहभाग आणि राजकीय साक्षरता यांचा परिपोष झाल्याचे आढळले. सातव्या प्रकरणात प्रबू दीपन आणि लिझल लूट्स यांनी आफ्रिकेतील बुरुंडी, रिपब्लिक ऑफ कॉन्गो आणि रवांडा या भागातील १,२३३ लोकांचा अभ्यास करून धर्म, लिंगाधारित हिंसा आणि पुरुषत्व यांतील संबंधांचा वेध घेतला आहे. मुक्तिप्रवण धर्मशास्त्राद्वारे या भागातील पुरुषत्वाची विधायक फेररचना करण्यासाठी त्यांनी उपाययोजना सुचविल्या आहेत. पुढील प्रकरणात मायकेल फ्लड यांनी स्त्रियांच्या विरोधातील हिंसेचा प्रतिबंध करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची मूलगामी चिकित्सा केली आहे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे.
साना कॉन्ट्रॅक्टर, श्रीती शाक्य, महेंद्र कुमार आणि सतीश सिंग यांनी लिहिलेल्या नवव्या प्रकरणाचा रोख मध्य प्रदेशमधील गर्भनिरोधनाच्या साधनांच्या वापरातील पुरुषांच्या सहभागावर आहे. गर्भनिरोधनाची व कुटुंबनियोजनाची जबाबदारी ही केवळ स्त्रीची आहे अशा प्रकारचा अलिखित नियमच असावा, अशी अवस्था असल्याने या संदर्भात पुरुषांचा सहभाग वाढावा तसेच पूरक धोरणात्मक बदलही केले जावेत, अशी आग्रही भूमिका या अभ्यासकांनी मांडली आहे.
दहाव्या प्रकरणात स्नेहा मक्कड आणि मीरा सद्गोपाल यांनी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्य़ातील पुरुष दाईंच्या भूमिकेची मांडणी केली आहे. दुर्गम भागात कोणत्याही सोयीसुविधा नसताना या दाईंचे प्रसूतीच्या वेळेला लाभणारे साहाय्य महत्त्वाचे ठरते. महिला दाईंसोबत सहकार्य करून पुरुष दाई ‘पारंपरिक पुरुषीपणा’ची चौकट मोडतात. ११ व्या प्रकरणात सरजन दुसानिक यांनी बोस्निया आणि हझ्रेगोविना येथील पितृत्वाच्या नव्या संकल्पनांसंदर्भात कोणत्या प्रकारच्या संधी आणि आव्हाने निर्माण झाली आहेत, याविषयी विश्लेषण केले आहे. १२ व्या प्रकरणात व्हॅलेन्टिना उतारी यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेलेल्या पत्नीसोबत तेथे वास्तव्य करणाऱ्या इंडोनेशियातील पुरुषांच्या पुरुषत्वाच्या धारणा आणि घरकामातील त्यांचा सहभाग यांतील बदलांचा आढावा घेतला आहे. अखेरच्या प्रकरणात २० ते ५९ वर्षे या वयोगटातील सुमारे पाच कोटी पुरुषांचे आरोग्य जपण्यासाठी २००९ साली ब्राझीलने स्वीकारलेल्या धोरणाची एदुआर्दो श्वार्झ आणि डॅनियल कोस्टा लिमा यांनी सविस्तर चर्चा केली आहे.
या पुस्तकातून पुरुषत्वाच्या अभ्यासाची सद्धांतिक चौकट अधिक विस्तृत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. आर. डब्लू. कॉनेल यांनी मांडलेल्या ‘प्रभुत्वशाली पुरुषत्व’ व ‘पितृसत्ताक लाभांश’ या संकल्पना, मायकेल किमेल यांनी वर्णिलेले पुरुषांचे सत्तेसोबतचे अंतर्विरोधपूर्ण संबंध, मृणालिही सिन्हा यांचे ‘वासाहतिक पुरुषत्व’विषयक भेदक विश्लेषण, एरिक अ‍ॅण्डरसन यांनी केलेला ‘समावेशी पुरुषत्वा’संबंधीचा विवाद्य दावा.. अशा वैचारिक पाश्र्वभूमीवर प्रत्यक्ष अनुभवजन्य अभ्यासातून हे लेखन केले गेले आहे. प्रा. मंगेश कुलकर्णी यांनी संपादकीय प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, जगड्व्याळ पितृसत्तेविरुद्ध लढण्यासाठी दुहेरी रणनीतीची आवश्यकता या पुस्तकातून मांडली आहे. ती रणनीती अशी : पुरुषी धुरीणत्वाची सतत चिकित्सा करणे आणि आबालवृद्ध पुरुषांचा सहभाग मिळवून लिंगभाव समानतेच्या दिशेने मार्गक्रमण करणे. सिद्धांत आणि व्यवहार या दोन्ही पातळ्यांवर सक्रिय राहण्याची निकड यातून अधोरेखित होते.
या पुस्तकात अकादमिक क्षेत्रातील बुद्धिवंत आणि स्वयंसेवी संस्थांतील कार्यकत्रे यांनी कुटुंब, पितृत्व, स्थलांतर, विकास आणि िहसा अशा बहुविध घटितांच्या संदर्भात आंतरविद्याशाखीय परिप्रेक्ष्यातून पुरुषत्वाची उकल केली आहे. लिंगभावात्मक न्यायावर आधारित समाज-उभारणीस उपकारक मार्गदर्शनही या अभ्यासकांनी सादर केले आहे. ‘चिकित्सक पुरुष-अभ्यास’ या विद्याशाखेच्या प्रमुख संस्थापक प्रा. रेविन कॉनेल यांनी प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे संशोधन आणि कृतिशीलता यांचा मिलाफ हे या पुस्तकाचे बलस्थान होय.

श्रीरंजन आवटे

(हा पुस्तकपरिचय मागच्या वर्षी लोकसत्ता मधील बुकमार्क या सदरात प्रकाशित झाला होता. लेखक श्रीरंजन आवटे यांनी हा लेख तो पुन:प्रकाशित करायची परवानगी दिल्याबद्दल ‘पुन्हास्त्रीउवाच’ त्यांचे आभारी आहे.)

 

 

लोकप्रिय वेबसिरीज मधील पुरुषत्त्वाच्या प्रतिमा

गेल्या दोन महिन्यात म्हणजे ऑक्टोबर – नोव्हेंबेर ह्या सुमारास मिर्झापूर 2, सुटेबल बॉय, हर्षद मेहता, बिच्छू का खेल, सिम्पल मर्डर, लॉकडाउन रिश्ते अशा अनेक वेबसिरीज रिलीज झाल्या आहेत. यापैकी अनेक वेबसिरीजच्या ट्रेलर मध्येच Politics, Sex, Scandals, Greed, Money, Power, Drugs, Glamour असे शब्द असतात. त्यावरूनच या वेबसिरिज मध्ये काय पाहायला मिळेल याचा आपल्याला साधारणपणे अंदाज येऊ शकतो. अर्थात पुढे जाऊन स्पर्धा, व्यसन, सतत जिंकणं, नग्नता, हिंसा, पोलिस, अपहरण इत्यादी शब्दांशी संबंधित अनेक घटना आपल्याला वेबसिरीज मध्ये पाहायलाही मिळतात.
आता असं वाटू शकतं की या व अशा सगळ्या गोष्टी, संकल्पना, घटना इत्यादि, कुठल्याही वेब सिरीज मध्ये बघणे तसं काही नवीन नाहिये; मग याबद्दल अशी नवीन ती काय चर्चा होऊ शकते? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण सध्या कोरोना साथीच्या कालावधीमध्ये विशेषतः लोकांच्या करमणुकीसाठी प्रामुख्याने उपलब्ध असणारी सिनामागृहे बंद ठेवली आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये अनेक OTT प्लॅटफॉर्म हेच आता करमणुकीचं प्रमुख माध्यम म्हणून हळूहळू नावारुपास आलेली आपणांस दिसून येईल. अर्थात मल्टिप्लेक्स सिनेमागृहे सुरु असतानाही ’सेक्रेड गेम’ सारख्या वेब सिरीज ने आपली लोकप्रियता दाखवून दिलीच होती. भारतात तरी खर्‍या अर्थाने सर्वसामान्य, मध्यम वर्गात तेव्हाच वेब सिरीजचं फॅड जोर धरताना आपल्याला दिसून आलं. नेटफ्लिक्स वरील या वेबसिरीजच्या आधीही OTT प्लॅटफॉर्म वरती अनेक वेबसिरीज होत्याच, इतकेच काय तर YouTube वरही गर्लियापा, वाय फिल्मस्‍ किंवा फिल्टर कॉपी हे वेगवेगळ्या वेब सिरीज बनवतच होते आणि त्यांचे एपिसोडस् पाहण्यासाठी अगदी मोफत उपलब्ध होते. परंतु ‘सेक्रेड गेम’ची निर्मिती ज्या प्रकारची जाहिरातबाजी आणि अतिशय वैविध्यपूर्ण कलाकारांना घेऊन करण्यात आली, त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांची ओढ त्या दिशेने जाताना पाहायला मिळाली. त्यात दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवणे, नीरज घायवान ही त्रिमूर्ती असणं ही आणखी एक जमेची बाजू होती.
’सेक्रेड गेम’ची मौखिक लोकप्रियता प्रचंड होती, मला आठवतंय memes वगैरे बनायच्या आधीही लोक त्याबद्दल प्रचंड प्रमाणात चर्चा करत होते, अगदी आमच्या पाहुण्या-रावळ्यांमधील मध्यमवयीन, OTT प्लॅटफॉर्मशी फारशी तोंडओळख नसलेले पुरुषही या बाबतीत बोलू लागले. जिथं-तिथं त्याच वेब सिरीजची चर्चा, आम्ही मित्रांनीही ’सेक्रेड गेम’ मुळेच नेटफिक्सला साईन–अप केलं व पुढे जाऊन कधी पेड सबस्क्रिप्शन केलं समजलं सुद्धा नाही आणि अशा प्रकारे करमणुकीच्या माध्यमांत, आणखी एका माध्यमाची भर पडली. मग केवळ स्टारकास्ट आणि दिग्दर्शक हेच या यशामागचं कारण आहे का? तर तसंही नाहिये. या वेब सिरीजच्या माध्यमातून, हवं त्याप्रकारे विषय मांडता येत होता, भाषेचा वापरही बिनधास्तपणे करता येत होता, सेन्सॉर बोर्डाचा तसा प्रत्यक्ष काही संबंध नाही. नग्नता, हिंसा, गुन्हेगारी, शिव्या या व अशा अनेक रोजच्या आयुष्याचा भाग असणार्‍या घटना प्रेक्षकांच्या पसंतीस पडत होत्या. सिनेमा आणि आता वेब सिरीज वरील किंवा टेलीव्हिजनवरील मालिका सुद्धा समाजाचा आरसा असतात. कुठल्याही संवादाच्या माध्यमांबद्दल हे म्हणता येतं! जे सिनेमात घडतं, त्याचा प्रभाव समाजावर पडताना आपल्याला दिसतो तर समाजात जे घडत असतं ते तितक्याच तीव्रतेने सिनेमांमध्ये ही पाहायला मिळतं. प्रसिद्ध शायर आणि गीतकार, गुलज़ार यांनीही हेच म्हटलंय की ‘समाजाचं प्रतिबिंबच तुम्हाला सिनेमामध्ये पाहायला मिळते. 
महिलांवरील होणारा हिंसाचार हा सिनेमामध्येच जास्त वाढलाय, त्या माध्यमापर्यंतच या मुद्द्याची मर्यादा आहे, असं नाहिये तर समाजाच्या सर्व स्तरांत आणि वर्गात आपल्याला तो वाढलेला दिसून येईल’. समाजातील या बदलत जाणार्‍या परिस्थितीचा आपल्याला राष्ट्रीय गुन्हे नोंदणीतून आढावा घेता येईल. आता ’महिलांवरील हिंसाचार’ हा एक मुद्दा झाला पण अशा अनेक मुद्द्यांना घेऊन या सर्व वेब सिरीजचे विश्लेषण करता येणं शक्य आहे. त्यातल्याच काही मुद्द्यांना घेऊन आज आपण या लेखामध्ये चर्चा करणार आहोत.
पुरुषत्त्वाच्या प्रतिमांकडे पाहता आणि ज्या प्रकारच्या जडणघडणीची उदाहरणे या वेब सिरीज मध्ये दाखवली आहेत, तर सर्वसाधारणपणे सध्याच्या घडीला अनेक वेब सिरीज मधून हेच दिसून येईल की यांत दाखवल्या जाणार्‍या बहुतेक पुरुषांच्या प्रतिमा या अतिशय जातीयवादी, पितृसत्ताक, धर्मांध, हिंसा करणार्‍या, व्यसनी, कायम लैंगिक शोषण करणार्‍या, महिलांकडे ’वस्तू’ म्हणून पाहणार्‍या, महिला/मुलींना संधी नाकारणार्‍या अशाच आहेत. अर्थात याला अपवादही आहेतच! या सर्वच वेब सिरीज मधील महिला आणि मुलींच्या व्यक्तिरेखांबद्दलही खूप महत्त्वाचा लेख लिहिता येऊ शकतो, इतर भाषांत लिहिलाही असेल.
सेक्रेड गेमस् सीजन १ आणि सीजन २ च्या बाबतीत, लोकप्रियते बद्दलच्या वर नमूद केलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त हिंसा, नग्नता आणि शिव्यांचा दिलखुलास वापर या काही विशेष, खास गोष्टी या वेब सिरिजमध्ये लक्षवेधक ठरल्या. अर्थात कथेची ’तशी गरज’ असणं किंवा त्या-त्या लेखकाची / दिग्दर्शकाची शैली यांचाही त्यात मोठा वाटा आहेच. यात गायतोंडे, बंटी, सरताज सिंग, खन्ना गुरुजी, शाहीद खान, डी. सी. पी. पारुळकर, काटेकर, इन्स्पेकटर माजीद अली खान, माल्कम मौराद, बिपीन भोसले अशा कितीतरी पुरुषी व्यक्तिरेखा आपल्याला यांत पाहायला मिळतील. नमूद केलेल्या व्यक्तिरेखांमध्ये गुरुजी (आश्रम सांभाळणारा) पासून ते व्हाया पोलिस जाऊन आतंकवाद्यापर्यंतच्या व्यक्तिरेखांचा सामावेश आहे. पण त्या सगळ्या व्यक्तिरेखा कुठल्या ना कुठल्या प्रकारे, कशा ना कशाच्या नावाखाली, हिंसेचं किंवा शोषणाचं समर्थनच करताना दिसत आहेत. तसं पाहायला गेलं तर आत्ताची सामाजिक परिस्थितीही तशीच आहे. अगदी वेबसिरीज मध्ये दाखवल्याप्रमाणे, कुणी धर्माच्या नावाने, कुणी राजकारणाच्या आडून, कुणी राष्ट्रवादाचा दाखला देत, कुणी मानवी वंशासाठी ’बलिदान देना होगा’ म्हणून - वंचित गटांवर, महिलांवर व बालकांवर केल्या जाणार्‍या जातीयवादी हिंसेचं समर्थन करणारे अनेकजण आपल्याला दिसतील. वेबसिरीज मध्ये लैंगिक हिंसेचा, शिव्यांचा वापरही केलेले अनेक संवाद खूपच लोकप्रिय आहेत, अगदी memes बनवेपर्यंत त्यांचा ’पूरेपूर’ वापर तरुण-तरुणींनी केलेला आहे. उदाहरणादाखल, आपल्याला बदला घ्यायचा आहे हे सांगण्यासाठी गायतोंडेच्या तोंडी एक संवाद आहे, “अपुन किधर था मालूम नहीं, अपुन को बस गांX मारनी थी”

गुरगाँव नावाच्या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार्‍या पुरुषत्त्वाच्या प्रतिमांना विशेष सांस्कृतिक, प्रादेशिक, भौगोलिक आणि राजकीय संदर्भ आहे. विविध ठिकाणच्या संस्कृतीमध्ये राहणीमान, सणावारांमध्ये, खाद्य संस्कृतीत किंवा भाषेमध्ये जसा आपल्याला फरक पाहायला मिळतो तसा तो त्या-त्या ठिकाणच्या गुंडामध्येही पाहायला मिळतो. म्हणजे मुंबईचा भाई वेगळा, उत्तर प्रदेशचा भैय्या वेगळा आणि या गुरगाँव वेब सिरीज मधला बापू पण वेगळा. अस्सल हरियाणवी बोलणारा पण मॉडर्न बंगल्यात स्वतःचा स्विमिंग पूल असणार्‍या या बापूच्या कुटुंबातील एका मुलीच्या अपहरणाची ही एक कथा आहे, यामधील त्या मुलीचा भाऊ असो, तो बापू किंवा त्याला या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मदत करणारा गोपी असो, या वेब सिरीज मधील पुरुषांच्या व्यक्तिरेखा तशाच हिंसात्मक, पितृसत्तात्मक प्रतिमांना बढावा देणार्‍या आहेत. बाकी वेब सिरीज मध्येही तुम्हाला हे सहज पाहायला मिळेलच पण या मध्ये ’कुटुंबप्रमुख’ म्हणूनची बापू ची व्यक्तिरेखा ही कुटुंब म्हणून अत्यंत महत्त्वाची, सामाजिक संस्थेमधील पुरुषांचं वर्चस्व अधोरेखित करणारी आहे. सगळे बरेवाईट निर्णय तोच घेतो.
‘पाताललोक’ नावाची अॅमेझॉन प्राईम वरील आणखी एक वेबसिरीज आहे तिची बांधणी/मांडणी, आपल्याला वर्णव्यवस्थेची आठवण करून दिल्यावचून राहत नाही. ‘जगात तीन लोक आहेत, स्वर्ग लोक – जिथं देवता राहतात, धरती लोक – जहाँ आदमी रहते हैं आणि (सबसे नीचे) पाताल लोक’ - यातदेखील आदमी म्हणजे मानवप्राणी असं त्यांना म्हणायचं असेल, असं आपण ’गृहीत’ धरूया. भाषा आणि तिचे गृहित अर्थ याच्यावर आपल्याला वेगळी चर्चा करायला हवी. (उदा. अगदी राजकीय पक्षाला दिलेलं ’आम आदमी पार्टी’ म्हणून पक्षाचं नाव का असेना.) अर्थात जसं मी आधीही या लेखात नमूद केलं आहे, तसं - कथेची मांडणी ही त्या त्या वेब सिरीजची ’गरज’ म्हणूनही त्यात तडजोड केलेली असते. या वेब सिरीजमध्ये दाखवल्या गेलेल्या अनेक पुरुषांच्या प्रतिमांच्या बाबतीत असं म्हणता येऊ शकतं की वर्गाधारित भेदभाव स्पष्टपणे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसून येतो. संजीव मेहरा नावाची एक सवर्ण व्यक्तीरेखा आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजाने ’तयार/निर्माण’ केलेल्या पुरुषांच्या प्रतिमा किंवा त्या तयार केल्या जात असताना त्यांच्यावर झालेले सामाजिकदृष्ट्या झालेले रचनात्मक अन्यायअत्याचार या दोन्हींत अनेक घटनांमधून तफावत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही अगदी पत्रकार असो, वा ’हिरो’ हाथीराम चौधरी, त्यांचा मुलगा किंवा ते गुन्हेगार, या सर्व व्यक्तिरेखा आपल्या वेगवेगळ्या भुमिकेमध्ये एकतर भरपूर हिंसा करताना दिसतात. तसंच ते त्यांच्या नात्यांमध्येही असंवेदनशील असलेले किंवा काहीनाकाही लैंगिक अॅक्टिविटी करत असणारे दाखवण्यात आलेल्या आहेत. पण उच्चवर्णीय पत्रकार जास्त असंवेदनशील आहे, मुस्लिम असिस्टंट मात्र कमी हिंसक आहे.

डिज्ने + हॉटस्टार वरील ‘स्पेशल OPS’ वेब सिरीज संसदेवरील आतंकवादी हल्ल्यासंदर्भात आहे, त्यामधील ही हिम्मत सिंग, इक़लाख ख़ान, फारूक अली, रुहानी खान, अविनाश, बालकृष्णा वा जूही असो या सगळ्या व्यक्तिरेखा आपापल्या भूमिकेमध्ये अनन्यसाधारणपणे हिंसा करतानाच दिसतात. हा हिम्मत सिंग अतिशय सनकी अधिकारी आहे आणि कितीही लोक मेले तरी चालतील पण त्याला इक़लाख ख़ानची माहिती पाहिजे आहे.
अशा या वेब सिरीजमध्ये खूप महत्त्वाच्या अशा काही महिला व्यक्तिरेखाही असतात - ज्या पितृसत्तात्मक भूमिकांचंच प्रतिनिधीत्त्व करतात. खासकरून ‘स्पेशल OPS’ या वेब सिरीजच्या अनुषंगाने पुरुषत्त्वाचे मुद्दे, महिलांच्या पितृसत्तात्मक व्यक्तिरेखांची आखणी याबद्दलही विश्लेषण करायला भरपूर वाव आहे. तरूण मुलीची आणि तिच्या मोठ्या बहिणीची धर्मांधतेच्या विळख्यात न फसता इतर लोकांना वाचवण्याची भूमिका, हिंदू – मुस्लिम समाजातील विविध विचारधारा, त्याचा पितृसत्तात्मक नियंत्रण व हिंसेशी असलेला संबंध आणि त्यांचे मालक म्हणून मिरवणार्‍या पुरुषांच्या व्यक्तिरेखा वगैरे अनेक अंगाने या वेब सिरीजचे विश्लेषण करता येणे शक्य आहे.
खरं तर OTT प्लॅटफॉर्म वर आलेल्या प्रत्येक वेब सिरीज किंवा चित्रपटावर एक लेख किंवा चर्चासत्र आयोजित करता येणं सहज शक्य आहे आणि इतक्या नाविन्यपूर्ण पद्धतीने बनवलेल्या, निर्माण केलेल्या कलाकृतींच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकता येईल. या सर्व वेब सिरीज चे प्रोडक्शन हाऊस कोण आहेत हे बघायला विसरू नका. भांडवलवादी, बाजार, धंदा, TRPची चढाओढ, या सर्वांना किती आणि कसे महत्त्व आहे हे पाहण्यात एक वेगळीच गंमत आहे. मी इथे खूप कमी उदाहरणे दिली आहेत, तुम्ही प्रत्यक्षात या वेब सिरीज पाहिल्या तर लक्षात येईल की या लेखामध्ये नमूद केलेले मुद्दे किंवा पुरुषत्त्वाच्या प्रतिमा या खूप मर्यादित स्वरुपात मांडल्या गेल्या आहेत. या व्यतिरीक्तही ’द फॅमिली मॅन’, ’लूटकेस’, ’माफिया’, ’अभय १ आणि २’, ’असुर’ या व अशा अनेक वेब सिरीज ऑनलाईन, विविध OTT प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहेत. माझा वैयक्तिकदृष्ट्या या सगळ्या वेब सिरीज पाहतानाचा अनुभव खूप रोमांचकारी होता.
अॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, डिज्ने + हॉटस्टार, झी 5, वूट सेलेक्ट, सोनी लीव, एम्‍. एक्स. प्लेअर, एरोस नाऊ आणि बिगफ्लिक्स (जीओ सिनेमा म्हणून एक वेगळा प्लॅटफॉर्म पण आहे) हे काही सर्वसाधारणपणे, माहितीतले OTT प्लॅटफॉर्म आहेत. याव्यतिरिक्त आवर्जून नमूद करावेसे म्हणजे Ho!Cho!, अल्ट बालाजी, उल्लू, फ्लिझ मूव्हीज हे पण असे काही प्लॅटफॉर्म आहेत, की ज्यांची लोकप्रियता ही केवळ अर्धनग्नतेच्या आधारावर सर्वज्ञात आहे! यांत’मस्तराम’ आणि इतरही वेब सिरीजचाही सामावेश आहे. अशा प्रकारच्या सेमीपॉर्न वेबसिरीज बनवणार्‍या प्लॅटफॉर्म बद्दलही कुणीतरी विश्लेषण करणे गरजेचे आहे कारण त्या सगळ्या कथा कहाण्या बघताना आपल्याला १९७०-८० च्या दशकातीलच चित्रफिती आपण परत २०२० मध्ये पाहत असल्याचा आभास कायम होत राहतो. त्यांत दाखवलेल्या सामाजिक मूल्यांमध्ये तर एक विलक्षणरित्या, प्रतिगामित्वाची झलक पाहायला मिळते. पण प्रेक्षक वर्गाच्या ’कामाचं’ जे आणि जेवढं आहे, ते तितकंच बघत असावेत. मजेदार गोष्ट ही आहे की Alt बालाजी हे बालाजी टेलिफिल्मस्‍ निर्मीत OTT प्लॅटफॉर्म आहे, यामध्ये तुम्हाला महिलांचं जसं ज्या प्रकारे ’वस्तूकरण’ केलं जाऊ शकतं या प्रकारच्या वेबसिरीज आहेत पण त्यांनीच ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ (२०२०) या चित्रपटांची निर्मितीही केली आहे. 
कधीकधी ते अपवाद म्हणून प्रतिकात्मकदृष्ट्या महिलांचं समाजातील ’महत्त्व’ अधोरेखित करतात! बालाजी टेलिफिल्म्स हे फक्त एक उदाहरण आहे, पण तुम्ही इतरही प्रॉडक्शन हाऊसेस बघा, मग यशराज असेल किंवा धर्मा प्रॉडक्शन - ’जब बात धंदे पे आती है’ - कसल्याही पद्धतीची विचारधारा निर्मात्यांसाठी अजिबात महत्त्वाची नसते. एकच प्रॉडक्शन हाऊस, दोन अगदी टोकाच्या विचारधारांना घेऊन चित्रपट किंवा वेब सिरीजची निर्मिती करू शकतात आणि त्यातून त्यांना अमाप पैसाही मिळतो. पैसा कसा कमवायचा त्याचं कौशल्यही त्यांच्याकडे आहे. त्यांना फक्त गुंतवणुक, करमणुक, बाजार आणि भांडवल हेच कळतं व त्यातच त्यांना स्वारस्य आहे. इथे प्रेक्षक म्हणून आपणही या भांडवलवादी व्यवस्थेचा खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आहोत हे विसरता कामा नये! म्हणूनच प्रेक्षकवर्ग, Consumer म्हणूनही आपली जबाबदारी खूपच जास्त आहे. 
खरं सांगायचं झाल्यास, हा लेख लिहायचा म्हणून, ’पुरुषत्त्वाच्या विविध प्रतिमा’ आपण पाहिलेल्या कोण कोणत्या वेब सिरीज मध्ये, वेगवेगळ्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असं शोधायचा प्रयत्न मी जेंव्हा OTT प्लॅटफॉर्म वर केला तर माझ्या हे लक्षात आले की, हिंसक पितृसत्तात्मक, धार्मिक, जातीयवादी, सत्तासंबंधारित शोषण याविषया व्यतिरिक्त कितीतरी जास्त वेब सिरीज आणि फिल्म्स सुद्धा या सर्वच ठिकाणी उपलब्ध आहेत. यांत काही फक्त OTT प्लॅटफॉर्म वर रिलीज झालेल्या आहेत तर काही आधीच सिनेमागृहात रिलीज झाल्या होत्या पण आत्ता सहजरित्या आपल्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. यातील काही उदाहरणे आहेत - दिल्ली क्राईम, She, गुंजन सक्सेना, हंड्रेड, आर्या, छप्पड फाड के, चिंटू का बर्थडे, मी रक्सम, अटकन चटकन, छोरिया छोरो से कम नहीं होती, अ सुटेबल बॉय, बुलबुल, स्त्री, बरेली की बर्फी, लुका छुपी, राजमा चावल, चॉपस्टीकस्‍, डॉली किट्टी और वो चमकते सितारे, लस्ट स्टोरीज्, हाऊस अरेस्ट, मस्का, नीरजा आणि बर्‍याच अशा वेब सिरीज आणि चित्रपट आहेत ज्यामधील पुरुषत्त्वाच्या प्रतिमा, पुरुष-स्त्रियांच्या व्यक्तिरेखाना ठराविक चौकटीच्यापेक्षा वेगळे असे अनेक पदर आहेत. नेटफ्लिक्स वर तर ’वुमन इन लीड रोल’ किंवा ’मुव्हीज डीयरेक्टेड बाय वुमेन’ अशा वेगळ्या कॅटेगरीज पण आहेत, आणि ही अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे. कारण इतक्या हिंसक पितृसत्तात्मक, जातीयवादी, धर्मांध, शोषणाधारित इंटरनेटवरील या OTT प्लॅटफॉर्म वर अनेक ’सकारात्मक’, ’आशादायी’ Audio-Visual साहित्यसामग्री मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, ही खरंतर जमेची बाजू म्हणता येईल.
वेबसिरीजचा आशय हा मुद्दा तसा क्लिष्ट आहे - कलाकृतींचं, कलाकारांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तिरेखांना देता येणारा न्याय, समाजातील सत्य परिस्थिती पण दाखवायची आहे, पण कलाकृतीचा प्रभाव मात्र पडला पाहिजे, संदेशपण पोहोचायला हवा – त्याचसोबत पुरुषत्त्वाची एखादी सकारात्मक प्रतिमा पण प्रेक्षकांसमोर यावी, एखाद्या महिला व्यक्तिरेखाला आत्मविश्वासपूर्ण दाखवता यावं, दलित, आदिवासी, ट्रांस व्यक्ती, मुस्लिम समाजाच्या व्यथा-कथा सगळं एकाच कलाकृतीमध्ये सामावून घेतल्या जाव्या - अशा अनेक अपेक्षा कदाचित पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे आपणच स्वतःला वैचारिक फिल्टर लावणे अधिक योग्य ठरेल. माऊंटन डयू च्या जाहिरातीत हृतिक रोशन “डर के आगे जीत है” म्हणत डोंगरावरून बाईक घेऊन दरीत उडी मारतो किंवा सलमान खान हेलिकॉप्टर घेऊन थम्स अप आणायला जातो, पण आपण तसं करतो का, वागतो का? आपल्याला माहिती आहे असली स्टंटबाजी आपल्याच्यानं शक्य नाही. आपण अशा actions अमलात आणायच्या का नाही याचा विवेक बुद्धीने निर्णय घेतो ना, तसंच प्रेक्षक म्हणून आपल्याला वेबसिरीज बद्दलही अजून सुजाण आणि सुज्ञ होण्याची जास्ती गरज आहे, कारण इथून पुढची परिस्थीती तर आणखी बिकट होण्याचीच शक्यता, खरंतर जास्त आहे, हाय का नाय?

सूरज पवार, दिल्ली.






 आज पुरुषार्थाविषयीच्या दोन कविता

कवी आहेत – लोकनाथ यशवंत आणि एकनाथ ढोकळे

सादरीकरण – नरेश गुंड (रंगकर्मी आणि लेखक)   







# नॉट ऑल मेन



गेल्या चारपाच वर्षांपासून आपल्या देशात 19 नोव्हेंबरला पुरुषांना International Men’s Day निमित्त शुभेच्छा द्यायला सुरुवात झाली आहे. त्यातल्या अनेक शुभेच्छा व्यंगचित्राच्या किंवा memes च्या रूपात देखील असतात. पण त्याआधी फक्त वर्तमानपत्रातल्या किंवा न्यूज चॅनेल वरच्या बातम्यामध्ये ‘जागतिक पुरुष दिवसा’च्या कार्यक्रमांबद्दल कळत असे! बरेचदा Save Indian Family Faundation किंवा पुरुष हक्क संरक्षण समिती सारख्या काही संस्था ह्या निमित्ताने महिला धार्जिण्या कायद्यांच्या विरुद्ध निषेधमोर्चा काढत. एकदा अशाच एक संघटनेने पुरुषांना त्रास देणाऱ्या महिलांच्या फोटोना चपलांनी मारण्याचा इव्हेंट केल्याची बातमी पहिली होती आणि एकदा पत्नीपीडित पुरुषांनी लाक्षणिक संन्यास घेऊन नवऱ्याला त्रास देणाऱ्या बायकांचे श्राद्ध घातले होते.
एकदा एका वर्तमानपत्राने पुरुषांना शुभेच्छा देण्यासाठी जागा देऊ केली होती - तिथेही काहीजण महिलांवरचा राग व्यक्त करत होते. मागच्या वर्षी मात्र आयुष्मान खुरानाने ‘जंटलमन किसे कहते है’ ही कविता सादर करून जागतिक पुरुष दिनाला एक वेगळंच वळण दिलं होतं! त्यानंतर ‘पुरुषत्वा’चा असा वेगळा विचार करणाऱ्या इतरही काही कविता यूट्यूब वर दिसू लागल्या आहेत. खरंतर आपल्या देशात किमान दहा वर्षांपासून तरी सेंटर फॉर हेल्थ अँड सोशल जस्टीस, मावा, मासूम, सूत्र अशा अनेक संस्था पुरुषांच्या जाणीव जागृतीचे काम करीत आहेत. पण ह्या संस्थांच्या सकारात्मक कामाविषयी ‘जागतिक पुरुष दिवसा’च्या निमित्ताने प्रसारमध्यमातून बातम्या झाल्याचे पाहायला मिळत नसे. एका बाजूला ‘पुरुष हक्क संरक्षण समिती’ सारख्या 19 नोव्हेंबर साजरा करणाऱ्या संस्था आणि दुसऱ्या बाजूला मावा, MASVAW, FEM अशा संस्थांचे या दिवसाकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे ह्या व्यतिरिक्त कुठल्याच चळवळीशी संपर्क नसलेल्या पुरुषांना 19 नोव्हेंबर विषयी काय वाटत असेल; याबद्दल मला फार कुतूहल वाटत असे. म्हणून यावर्षी मी वेगवेगळी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या काही पुरुषांशी बोलायचं ठरवलं! 
मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदनगर, लातूर,जालना अशा लहानमोठ्या शहरातल्या 25 ते 60 वयोगटातल्या वीस मध्यमवर्गीय पुरुषांना मी आणि माझ्या दोन मैत्रिणीनी ‘जागतिक पुरुष दिना’विषयी तीन प्रश्न विचारले. प्रत्येकाशी आमचं साधारण पाच ते पंधरा मिनिट बोलणं झालं. ‘जागतिक पुरुष दिन असतो हे तुम्हाला माहीत आहे का?’ – हाच बहुधा आमचा पहिला प्रश्न असायचा. वीसपैकी पाच जणांना ह्या दिवसाबद्दल माहीत होतं आणि त्यापैकी चार जण कुठल्या ना कुठल्या सामाजिक चळवळींशी जोडलेले आहेत. अक्षय शिंपी अभिनेता आहे; तो म्हणाला की मागच्या वर्षी एका सिरीजचे शूटिंग करत असताना सेटवरती एका न्यूज चॅनेलचे लोक बाईट्स घ्यायला आले होते- तेव्हा त्याला असा काही दिवस असतो – हे समजलं. पंकज पंचरियाने सांगितलं की नगरला एक संस्था काही मोर्चा किंवा तत्सम अॅक्टिविटी करून हा दिवस साजरा करत असल्याचे त्याने पहिले होते आणि ते एखाद्या व्यंगचित्रासारखे त्याच्या लक्षात राहिले होते. काहीजण म्हणाले की दरवर्षी कधीतरी ‘पुरुषदिना’ बद्दलचे विनोद येऊन जातात – पण तो दिवस नेमका कधी असतो - हे त्यांच्या लक्षात राहात नाही! तसा जागतिक महिला दिन देखील त्यांच्या लक्षात रहात नाही, असंही त्यांनी सांगितलं. पण पुरुषांसाठी असा दिवस असावा की नाही यावर वीसपैकी बारा जणांनी अशा विशेष दिवसाची गरज नाही असं स्पष्टपणे सांगितलं. आपल्या देशात पितृसत्ता आहे आणि पुरुषांना वर्षभर स्वत:च्या मनासारखं वागता येतं त्यामुळे पुनः असा काही वेगळा दिवस साजरा करायची गरज नाही असंच बहुतेक जणांचं मत दिसतं आहे.
अजय भोसले एक सरकारी अधिकारी आणि ब्लॉगर आहेत – ते म्हणतात की अनंत कालपासून पुरुष त्याच्या मर्दानगीचा उत्सव करतोच आहे, त्यात आणखी एक दिवस असायची गरज नाही. गुजरातीतून लिखाण करणारे राजू पटेल यांनी वर्ग संघर्षाचे उदाहरण देत सांगितलं की – ‘जसा मजूर दिवस असू शकतो, पण उद्योगपती दिवस असू शकत नाही! तसंच पुरुष दिवस असायची काही गरज नाही!’ आदेश बांदेकर आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे राजकारणात सक्रिय असलेले पुरुष आहेत. त्या दोघानाही असं वाटतं की समतेचं मूल्य एखादा दिवस नव्हे तर जन्मभर सर्वांनीच पाळायला पाहिजे.
रंगकर्मी अतुल पेठे म्हणाले की ‘वैयक्तिक पातळीवर विचार केला तर अशा दिवसाची मला आवश्यकता वाटत नाही पण समष्टीच्या पातळीवर असे विशेष दिन असण्याचं एक वेगळं महत्त्व आहे. कारण त्या निमित्ताने काही महत्त्वाच्या मूल्यांची आठवण करून देता येते.’ चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनाही पुरुष दिवस असावा असं वाटतं आणि या दिवसाचं प्रयोजन काय यावरदेखील नीट विचार झाला पाहिजे असं त्यांना वाटतं. पंकज पंचरिया आणि आरोह वेलणकर या दोघा तरुण अभिनेत्यांना समतेच्या दृष्टिकोनातून विचार करता पुरुषांसाठी खास दिवस असावा असं वाटतंय. तर शाऱ्दूल सराफ म्हणतो की तो एकूणच असे विशेष दिन साजरे कशासाठी करायचे याबद्दल संभ्रमात आहे. ग्राफीक डिझायनर मकरंद म्हसाणे देखील कुठल्याही गोष्टी ‘साजऱ्या’ करायच्या विरोधात आहेत – तरीदेखील असा विशेष दिवस पाळल्यामुळे काही जनजागृती होणार असेल तर ह्या दोघांनाही त्याबद्दल हरकत नाही!
‘जागतिक पुरुष दिवस’ असावा की नाही याबद्दल आपल्याकडे काही चॉइस राहिलेलाच नाही – असं अनेक वर्षे ‘मर्दानगी’ संकल्पने विषयी पुरुषांच्या सोबत काम करणारे मिलिंद चव्हाण यांना वाटतं. मिलिंद आणि त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्षे ह्या दिवसाकडे दुर्लक्ष केले होते पण दिवसेंदिवस त्याचे प्रस्थ वाढत चालले आहे. सध्या त्याला जे विकृत रूप आलं आहे ते कसं बदलायचं हे मुख्य आव्हान आहे – असं त्यांना वाटतं. सध्या ‘पुरुषहक्क संरक्षण समिती’ सारख्या संस्था पितृसत्ताक संरचनेचा विचार करण्याऐवजी पुरुषांवर स्त्रियांकडून झालेल्या हिंसेची तुरळक उदाहरणे देत राहतात. काही पुरुषांना महिला त्रास देत असतील तरी एकूण पुरुषप्रधानता तशीच राहते. या रचनेत पुरुषांकडून पुरुषांवर होणाऱ्या हिंसेबद्दल चकार शब्द न काढता ह्या संस्था फक्त देशातले ‘महिला धार्जिणे’ कायदे बदलायची मागणी करतात ते प्रतिगामी मानसिकतेतून आलं आहे आणि ते चूक आहे – असंही त्यांनी स्पष्ट केलं. 
सध्या महिला दिनाचं जसं व्यापारीकरण झालं आहे, तसं पुरुष दिवसाचं होऊ नये अशी मिलिंदची इच्छा आहे. महिला दिनाला जशी कामगार महिलांच्या संघर्षाची, मानवी हक्कांच्या लढ्याची पार्श्वभूमी आहे तशी जरी पुरुष दिवसाला नसली तरी पुरुषांना समतेच्या विचारातून माणुसपणाकडे नेण्यासाठी ह्या दिवसाचा उपयोग व्हावा यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या दिवसाकडे पहावे असे मिलिंद चव्हाण यांना वाटते. पुरुष दिनाच्या निमित्ताने पुरुषांनी आत्मपरीक्षण करायची संधी घ्यावी असं सुनील सुकथनकर यांनी सुचवलं आहे. पुरुषांना बरेचदा असा भ्रम असतो की आपणच जग चालवतो आहोत आणि स्वत:मध्ये काही बदल न करण्याकडे पुरुषांचा कल असतो – असं निरीक्षण सांगून ते म्हणतात की मी स्वत:च्या मानसिकतेत काय बदल करायचा असा विचार पुरुष करू शकला तर सामाजिक बदलाला चालना मिळेल! बळिराम जेठे हा कार्यकर्ता देखील सोलापूर, उस्मानाबाद जवळ निमशहरी भागामध्ये अनेक वर्ष पुरुषांसोबत काम करत आहे. त्यालाही वाटतं की पुरुष अनेकदा ‘मर्दानगी’ विषयी चुकीच्या कल्पनेतून निष्कारण जोखीम घेतात, ताणतणाव ओढवून घेतात. त्याऐवजी आपली कमजोरी किंवा बलस्थान काय, आपल्या पुरुषीपणाच्या कल्पना काय आहेत त्याबद्दल सामूहिक चर्चा करायची संधी पुरुषदिना निमित्त घ्यावी. अक्षय शिंपीने सुचवलं आहे की लिंगवाचक शिव्या देणार नाही आणि ‘बायकी’ असण्याबद्दल कुठल्याही चेष्टा करणार नाही; अशी पुरुषदिनाला पुरुषांनी शपथ घ्यावी आणि ती जन्मभर पाळावी! शार्दुल सराफनेही एक मजेदार अॅक्टिविटी सुचवली आहे. त्याला असं वाटतं की पुरुषांनी दिवसभर महिलांसारखे कपडे घालून, त्यांची इतकी कामं करून पहावीत म्हणजे त्यांना महिलांच्या त्रासाची थोडीतरी कल्पना येईल. त्याने स्वत: एका नाटकाच्या निमित्ताने तसा अनुभव घेतला आहे – आणि त्याच्या जाणिवेत फरक पडला – म्हणून त्याला ही कल्पना सुचली. पण अतुल पेठेना जास्त गांभीर्याने लिंगभाव आणि मर्दानगीबद्दल, चर्चा व्हावी तसंच शाळा आणि घर दोन्ही पातळीवर समज वाढावी म्हणून प्रयत्न व्हावेत असं वाटतं. पूर्णानंद वाडेकरला वाटतं, 'जागतिक पुरुष दिनाचे औचित्य साधून पुरुषांनी स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी बोलणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, त्यांचा सन्मान करणे अशा गोष्टी कराव्यात आणि याची सुरवात स्वतःच्या घरातूनच करावी. रोज असे केल्यास विशेष असा ‘मेन्स डे’ साजरा करण्याची गरज उरणार नाही. आपल्याला प्रत्येक स्तरातून, माध्यमातून, शालेय शिक्षणातून अशा प्रकारचे शिक्षण देणे अनिवार्य झाले आहे.' बऱ्याच पातळ्यांवर बरीच मंडळी अशा प्रकारचे काम करतायेत पण समाज म्हणून आपणच अपुरे पडतोय कि काय – अशी शंका पूर्णानंदने व्यक्त केली आहे. ही शंका रास्तच आहे - तरीही मी ज्या पुरुषांशी बोलले त्यांच्या ‘जागतिक पुरुषदिना’विषयीच्या प्रतिक्रिया ऐकून मला असं वाटलं की सगळेच पुरुष काही महिलांना शत्रू मानत नाहीत. #NotAllMen काही पुरुषांना स्वत:च्या खास अधिकारांची जाणीव सुद्धा आहे. महिलांच्या विषयी आदर आणि अनुकंपा बाळगणारे आणि समतेचे महत्त्व उमगलेले पुरुष देखील आहेत. अशा पुरुषांच्या साथीने समताधिष्ठित समाजाचं स्वप्न नक्कीच प्रत्यक्षात येऊ शकेल! 

वंदना खरे



 



Men's Day

पुरुषांचे अश्रू दिसत नाहीत 
दबून जातात परंपरांच्या ओझ्याखाली 
"पुरुषांनी खमकं असायला हवं" - 
या आणि अशा असंख्य जोखडांखाली 
कण्हत कण्हत अखेरचा श्वास घेतात 
बर्‍याच माणूस होऊ पाहणार्‍या पुरुषांच्या संवेदना 

त्यांच्या हळुवार मनांचे दगड बनवले जातात 
पुरुषांकडूनच... कधी स्त्रियांकडूनही... 

आणि त्या दगडांना शेंदूर फासून 
घर घेऊ शकणारा 
नोकरी करू शकणारा 
अंगमेहनतीची कामं करू शकणारा 
वंशावळ पुढे चालवू शकणारा 
बाईला मुठीत ठेवू शकणारा 
मुलांवर डोळे वटारू शकणारा 
मर्द बनवलं की धन्य होतात 
पुरुषसत्ताक परंपरेच्या पालखीचे भोई 

त्यातूनही काहीजण सुटतात सहीसलामत 
स्वत:चाच मार्ग शोधत काट्याकुट्यांतून 
टोमण्यांतून खच्चीकरणातून 
माणूसपणाचा अंकुर जपत 
वटवृक्ष होऊन बहरतात 
अनेकांना सावली देतात 
कित्येकांना पंखांखाली घेतात 

अशाच पुरुषांसाठी साजरा करायचा असतो 
एक दिवस 'मेन्स डे' म्हणून 

नाहीतर इतर सगळे दिवस तसेही 
स्वत:चं पौरुष मिरवणार्‍या 
पुरुषांचेच असतात 

 संदेश कुडतरकर.

सणातली पुरुषप्रधानता

 

सणांचा आनंद घेण्याची सगळ्यांना सारखीच संधी मिळते का? सर्वजण श्रम आणि मजा सारख्या प्रमाणात करू शकतात का? की सण साजरे करायच्या पद्धतीतून देखील पितृसत्ता डोकावते? मर्दानगी, पुरुषत्व या संकल्पनांशी सणांचा काय संबंध आहे? आज डॉ. सीमा घंगाळे यांच्या ‘सणातली पुरुषप्रधानता’ ह्या लेखाच्या निमित्ताने थोडंसं आत्मपरीक्षण करूया.   

सणातली पुरुषप्रधानता

लग्न झाल्यावर लगेचच नवीन शहरात नोकरी मिळाल्यामुळे वर्षाला माहेरी जायला मिळाले नाही. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीची ती विशेष वाट पाहत होती. तीन दिवस सासरी दिवाळी करून दोन दिवस आईकडे जावे असे तिला वाटले. 'पण तुला भाऊ नाही तर तू दिवाळीत माहेरी जाऊन काय करणार?' या प्रश्नाने तिला धक्काच बसला! म्हणजे जिला भाऊ आहे तीच दिवाळीला माहेरी जाऊ शकते का? सहा वर्षानंतर तिच्या बहिणीचे लग्न झाले तेव्हा बहिणीच्या सासूने तर कहरच केला;'दिवाळी सणाला भाऊ घ्यायला येतो तेव्हाच आम्ही सुनेला माहेरी पाठवतो. तुला भाऊ नाही तर तू कशी जाणार?' लहानपणापासून दिवाळी सण हा दिव्यांचा, आनंदाचा, नात्यांचा आणि आपल्या माणसांसोबत उत्साहाने साजरा करायचा उत्सव आहे -असं मानणाऱ्या मुलींच्या आयुष्यात लग्नानंतर त्या सणाच्या आनंदाला पुरूषप्रधानतेचा दणका बसला. ह्या घटना काही स्वातंत्र्यपूर्व काळातील नाहीत, तर अगदी अलीकडच्या दिवसातील अल्ट्रामॉडर्न म्हणवणाऱ्या समाजातल्याच आहेत.
घरात पुरुष माणूस नसेल तर गुढीपाडवा, गणपती हे उत्सव कसे साजरे होणार? गुढी उभारायला पुरुषमाणूस पाहिजे, गणपती आणायला घरात पुरुष असतील तर ठीक, बायकांनी कशी त्याची स्थापना करावी! असे प्रश्न पडतातच. दहीहंडीचा थरार मुलांनी अनुभवायचा. त्यातूनही स्पर्धा करून थर वाढवायचे, जोखीम घ्यायची आणि मर्दानगी दाखवायची. म्हणजे दहीहंडी किंवा दहीकाला हे बाळकृष्णाच्या लीलांचे रिक्रिएशन नसून जणू काही एखादा पावर गेम आहे. आता त्यावर कळस म्हणजे मुलीही मुलांपेक्षा कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत असं म्हणत मुलींचेही दहीहंडीचे थर लावले जातात. म्हणजे परत कोणासारखे वागून दाखवायचे - तर मर्दासारखे! 
रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या प्रेमाचा सुंदर सण. पण त्यातही भावाला बहिणीचे संरक्षण करण्यासाठी शिकवायचे आणि बहिणीला त्याच्या आधाराने जगायला. प्रत्येक स्त्रीला कसा प्रथम भावाचा आणि नंतर नवऱ्याचा आधार लागतो हे मनावर बिंबववायचे. वास्तवातलं चित्र पाहिलं तर कितीतरी बहिणी शिकून नोकरी करून आपल्या भावांना शिकवतात, पाठीशी उभे राहतात. आयुष्यात अडचणी आल्या की प्रसंगी मदतसुद्धा करतात तरीही त्यांनी सणाच्या निमित्ताने संरक्षणासाठी भावाला गळ घालायची. किती गम्मत!! 
ज्या घरात फक्त मुली आहेत तिथे नेहमी बहिणींना विचारले जाते - 'तुम्ही रक्षाबंधन कसे साजरे करता?' जणू काही - भाऊ नाही तर तुम्हाला त्या सणाचा काय उपयोग? जणू काही तो नात्यांचा उत्सव नसून नियमाप्रमाणे फॉलो करायचा एखादा प्रोटोकॉल आहे. लिंगधारीत समाजाने पिढ्यानपिढ्यांच्या मेंदूचे असे कंडिशनिंग केले आहे की नात्यांकडे लिंगनिरपेक्ष दृष्टीने पाहताच येत नाही.
काही सण फक्त पुरुषांसाठी साजरे होतात आणि बायकांच्या वाट्याला येतो उपवास ! नवरा चांगला मिळण्यासाठी उपवास, पतीव्रता आहे म्हणून उपवास, सवाष्ण मरण यावे म्हणून उपवास! वटपौर्णिमा, करवा चौथ, हरतालिका, भावाच्या दीर्घायुष्यासाठी नागपंचमी. असे वेगवेगळ्या प्रकारचे उपास-तापास! त्यासोबत हळदीकुंकू करणे, त्यामध्ये घटस्फोटीत, परित्यक्ता, विधवांना जाणीवपूर्वक सहभाग नाकारणे यातून सणांमधली पुरुषप्रधानता अधिकच प्रकर्षाने जाणवते.एकीकडे सामाजिक दडपणामुळे स्त्रियांवर असे उपासतापास करण्याची सांस्कृतिक जबरदस्ती असते आणि त्याचसाठी त्यांच्यावर विनोदही केले जातात. अगदी दिवाळी सारखे निखळ आनंदासाठी केले जाणारे सण पाहिले तरी त्यात फराळ, घराची साफसफाई, सजावट यांच्यासाठी घरोघरी बायकाच राबत असतात. पुरुषांना मात्र कौतुकाने तेल-उटणे लावून रगडून आंघोळ घातली जाते. 
विवाहपूर्व व विवाहोत्तर आणि नवरा मेल्यावर विधवा या तीनही अवस्थांमध्ये सणांच्या निमित्ताने नवऱ्याच्या अस्तित्वाभोवती स्त्रीचे आयुष्य फिरवत ठेवण्यात आले आहे. कौटुंबिक नातेसंबंधातील सर्वात विषमसंबंध हा पती-पत्नीचा आहे. पतीला देव आणि पत्नीला दासी असे चित्र उभे केले आहे. या देवाच्या पुरुषार्थामध्येच पत्नीचे अस्तित्व झाकोळून जाते आणि मग आयुष्यभर कुटुंबसंस्था स्त्रीला स्वतःची ओळख मिळू देत नाही. पुरुषप्रधानतेचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आणि त्यातून स्त्रियांना दुर्बल म्हणून दडपून ठेवण्यासाठी, सगळ्या प्रेमाच्या नात्यांना समाजनिर्मित भेदात तोलून पुरुषत्व आणि स्त्रीत्व अशा दोन टोकांवर नेऊन ठेवले जाते.
स्त्रीपुरुषातल्या शारीरिक भेदांना अशा समाजनिर्मित लिंगभावाने झाकोळून टाकल्याने पुरुषांना फक्त वर्चस्वाचा फायदा होतो का? तर नाही!! दांभिक मर्दानगीच्या कल्पनांनी पुरुषही दबलेलाच आहे. 'पुरुषासारखा राहा, मर्द बन, पुरुषासारखा वागायला शिक' असे बोलून किशोरवयीन मुलांमध्ये सत्ता, स्पर्धा,अधिकार आणि त्यातून येणारी हिंसा हे समाजच रुजवतो. ओशो पुरुषाला सांगतात तुझ्यामध्ये वडिलांची कणखरता आणि आईची मृदूममता या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे पुरूषाने स्वतःमधल्या स्त्रीत्वाचा आणि स्त्रीने स्वतः मधल्या पुरुषपणाचा शोध घेतला पाहिजे. लिंग हा एक शारीरिक तपशील आहे. बाईचे आणि पुरुषाचे माणूसपण फक्त या एका तपशीलावर मांडून त्याच्या आयुष्याला ढोंगी साचेबद्ध पणा देणे, आता बदलायला हवे.
'स्त्री जन्माला येत नाही तर ती घडवली जाते', हे वाक्य जेंडर स्टडीज मध्ये नेहमी अधोरेखित केले जाते. भारतीय पितृसत्ताक समाजजीवनाचा विचार केला तर 'पुरुष जन्माला येत नाही तर घडवला जातो' हे वाक्यदेखील तितकेच खरे ठरते. पितृसत्ता स्त्रियांप्रमाणेच पुरुषालाही साच्यात बंद करून माणूस म्हणून त्याचा विकास होऊ देत नाही. पण बाईमाणसासारखा तो शोषित, दुबळा राहत नाही तर तो आश्चर्यकारकरीत्या 'वर्चस्ववादी' होतो आणि जन्माला येते मर्दानगी ! अधिकार, सत्ता, हिंसा, स्पर्धा या पॉवरपॅकने तयार झालेली वर्चस्ववादी संरचना म्हणजेच विखारी मर्दानगी. सणांच्या निमित्ताने अशी चुकीची मर्दानगीची कल्पना दृढ करायची की मर्दानगीचे सकारात्मक पैलू शोधायचे?

 डॉ सीमा घंगाळे

 

 

                                                                         

 


सध्या आपण मर्दानगीची विविध रूपं निरनिराळ्या साहित्य प्रकारांतून समजून घेत आहोत.
आज कवितांच्या माध्यमात दिसणारे पुरुषत्वाचे प्रतिबिंब पाहूया!

‘बापाच्या कविता’ या अजित अभंगच्या कविता मालिकेतील काही कविता.

(यांतील काही कविता काही नियतकालिकांत पूर्वप्रकाशित झालेल्या आहेत.)

१.
अलख

जन्म घेऊनही कुस तुझी
उजवली नाही मी
नी मी डावेजलेला,
जन्मलेला नव्हे निपजलेला
कानिफनाथ

अतर्काला जन्म घालणारा
बिल न फाट्या नियोगी

मी कानफाट्या
अलक्ष योनींतला निरंजन
पेटलेला/ पेटवलेला
काहीही

हत्तीही मीच, नी कानप्या पण

२.
टोटली होप-हेल्पलेस

भिरभिरतोय जगण्यातला तिढा सोडवताना
बाळा तुझ्यावर कसं फिरवू मोरपीस?

कळतंय तुझं, जाणिवांचं वाढतं केंद्र आणि
नकळत्या प्रत्येक अन्वयाला ताडण्यासाठी
माझं बोट पकडण्याची तुझी जबरी इच्छा

तुझ्या नि:श्वासातून झिरपतायत हल्ली हल्ली
निरागसतेच्या ताटव्यावरून भिरभिरणाऱ्या
सर्दशांत तरंगातल्या निरुत्साहाच्या लहरी

माझ्या बेजार मनाला लागलेल्या
पानगळतीच्या चिंता
आणि हिशेबी जगण्यासाठी
अपडेटेड काऊंट्सचा सोस...

मी फेकलीय खरवडून
अंगावरची संवेदनशील चामडी
आणि घेतलंय स्टेराॅईड
कलंदर जगण्यासाठी म्हणून...

पिल्ला मी खोटं बोलतोय चक्क
हे कळायच्या वयात तू आलीयेस...
त्याचमुळे जाणवतोय
तुझ्या नि:शवसातला खिन्नतेचा वास
म्हणून चढत्या भाजणीने
वाढतच चाललाय माझा अपराधीपणाचा सल...

मी नव्हतो भावनाशील किंवा नव्हतोच
मुळात निरागस कधीच...
उरलेल्या अहंकाराच्या दरडीखाली
गेलेत दडपून गुदमरून तुझी इवलिशी फुफ्फुसं

रोज संध्याकाळी एखादं फळ
एखादं चॉकलेट प्रचंड ओथंबून देत असताना
मला बोचते हल्ली तुझी कृतज्ञ नजर

मग नकोसं होतं पसाऱ्यात विखुरलेलं जगणं
तू मग येतेस जवळ
लाडीक हक्कानं
भीड चेपून भाबडेपणा घेऊन... त्यावेळी
तुझ्या प्रत्येक शब्दागणीक माझी
झालेली असते सुरुवात एकेक पायरी उतरत जाण्याची
खिन्नतेच्या विहीर-बारवांची डिप्रेस्ड स्यूसाईडसाठी

बेटा आय लव्ह यू बोलून
समाधान होईल तुझं किंवा
तुझ्या गालावर फिरणाऱ्या माझ्या ओठांचा
कापरेपणा कळण्याइतपतही
काही तू मोठी नाहीयेस अजून

त्याचमुळं हाच गुंता पुन्हा की
तुला आठवेल फक्त माझं तुला झिडकारणं

बाळा आय अॅम टोटली होप-हेल्पलेस...

.
सॅन्टाक्लॉजचा क्लॉज

त्यानं दाखवलं हरीण
हरखत मी धावलो हरणांच्या स्वप्नांत,
पण त्याला
मला आभाळात दिसलेला सॅन्टाक्लॉज
माझ्यासह
स्वीकारता आला नाही...

रात्री बिलगून पडल्यावर त्याला
तो आभाळातली बाज दाखवायचा चार पायांची नी
तीवर झोपलेला माणूस नी
मध्यारात्रीनंतर त्याच्या बाजल्याला
घेरणारे तीन चोर...

चोर त्याला कळले नाही
कारण आभाळावर नव्हता त्याला विश्वास

पण आता आभाळाचे वेध लागलेल्या त्याला
मी दाखवलेले जमीनीवरचे
चोर दिसलेच नाहीत कधी

स्पप्न पहाणं
सर्वथैव स्वप्न वाटलं त्याला
गांधार रात्रीचा अंधार वाटला त्याला,
त्याचवेळी माझ्यातली सतार उगवत राहिली
झंकारत राहिली गात्रं,
तो ठार झोपलेला असायचा तेव्हा
नक्षत्रांतली रात्रगर्दी,
आणि रात्रगर्दलेली नक्षत्र यांची
बेरीज वजाबाकी करीत जागत राहीलोय मी...

रात्र भेसूर होत गेल्यावर
त्यानं कधी उठवलं नाही
,
सिग्रेटीनं करपलेलेल्या बोटांतला पेन काढून घेऊन
म्हटला नाही
, की पोट्ट्या बंद कर नाईट लॅम्प,
तुझ्यासोबत गच्चीवर येतो
मी मळतो बार
, तू शिलगव सिग्रेट
मध्यत्रीनंतरचे नक्षत्र दाखवतो पुन्हा तुला...

तो आभाळाला लागल्यावर
मी आभाळाएवढा होत जाणं हे थोर पातक वाटतं
कळतंय एकही तारा त्याचा तिथं रुजणार नाही
ना रुजणार माझा...

काही का असेना स्वप्न रुजवण्याचा दोष
तुझ्या माथी तुझ्या या वयात
तुझ्यावर लावावासा वाटत नाही...

तुझ्या डोळ्यांतून आभाळ पाहण्याचा
क्लॉज आपल्या अलिखित करारात नव्हता ठेवायचास
रे सॅन्टाक्लॉज

४.
आई हत्ती येव्हढी

आई होली काऊ,
बैल असावा सोशीक बाप

काय... तुम्ही मेलेलं अर्भक नायात?
कोंबडीचं
, डुकराचं
बक्रीचं,
कचराकुंडीतला बास्टर्ड
कुत्ते का बच्चा तथा
सनौफ बीच
कुणाचंही
!

कुणाचीही आई
कुणी दाखवण्यापूर्वी आठवत नसेल
एव्हा तेव्हा पासलं पडावं लागलेली आई
?

भेंचो लै डिफ्रन्स है...
बैलाची आय
कोबड्याची आय
डुक्राची आय
सशाची
, गोगलबैलाची आय....
कोण्णाची बी आय

आय घातली
सोशल व्यवस्था
बाळंतली
,
तिनं व्यायली
संवेदनशील बाळं

बाळं हळहळली
बाळंही व्यायली
,
संवेदनशील होलीकाऊनैस

बैलाचा बच्चा
कोंबड्याचा बच्चा
डुक्राचा बच्चा
सशाचा
, गोगलबैलाचा पूत
कोण्णाची बी
बी-बियाणं घेऊन
तू उगवलायस
?

तुझ्या आईला
घोडा...

तू बैल नाहीस
आहेस होली घोडा

अश्वमेधाचा होली घोडा!

५.
तो-मी हरलेला जिंकलेला

बारा गावचं पाणी प्यायलो
किती वर्ष
? (अनुत्तरीत)
किती घरदारं
? (अनुत्तरीत)
किती बलत्कार
? (अनुत्तरीत)

भोक्सं झालेल्या भगदाड मानानं
बाप म्हणायचा
, तुला पोऱ्हं हौ दी
मग कळंन...

पाण्याची चव
फक्त बदललेली
शहरागणीक,
क्लोरीनच्या प्रमाणानुसार
तेवढं ठाऊक

मोरांडीच्या रानातल्या यह्यरीचं
खारं पाणी तुझा नॉस्टेल्जिया ठरला
, तर
क्लोरोफॉर्म अल्कोहोलचा
माझ्या पोरांना प्रश्न विचारण्याची
देणार नाही शुद्धही

मी तुझ्यापेक्षा जादा गावठी हिप्पी,
मराठीत कविता लिहिणारा बापा

बारा गावांतील किमान चार घरांतील
अठ्ठेचाळीस नळांतलं
फिल्टर्ड क्लोरोफाईड पाणी पिणारा
ग्लोरिफाईड बाप

मी सुखीये तुझ्यापेक्षा
गांवढळ फटिचर माणसा...

६.
आता माझ्याकडं राशन कार्डंय

माझ्याकडं राशन कार्डंय
ज्यात बदललेला
पाचवा पत्ता अपडेट केलेला नैय्येय

माझ्याकडं आधारकार्ड है
पण निराधार झालेल्या
पोरकपणाला कोन्तंच
सर्टिफिकेट नैये

पोरं जातीचा दाखला
विचारत ने है
तोपर्यंत चाल्लंय,
तोवर ते इनोसन्टैत

बापगाव- आयगाव दोन्ही
बोलतवताहेत
पण
जायचं कारणच कळत नैय्येय

सर्कारनं मला दिलेलं  राशन
मी त्यांना काय देत नैय्ये,
मग कविता ल्हेतो ते पण
भाषण वैग्रे काय नाय्ये

कविता म्हणजे काय लिखित
पुरावा नाय्ये...

मी असल्याच पुरावा
देऊ शकतो माझा बाप,
मी बाप असल्याचे
पुढं अपडेट्स पोरांनी मागितले

तर...
सर, काय देऊ
?

७.
रॅट रेस

हरणं
तुझं

तुझं 
हरणं
मला कळणं

मला
ती
जाणीव
तुझ्या वा 
कुणाच्याही हरण्यापेक्षा
स्वत: हरल्याची 
मोठी

असतात गोष्टी मोठ्या
त्या 
सांगता आल्या पाहिजेत 
हार-जिंकल्याच्या पुढल्या

तुझ्याकडे 
गोष्टी नव्हत्या,
माझ्याकडे 
ऐकण्याची तयारी होती
जिंकण्या हरण्याच्या
पलीकडल्या माणसांच्या 
तरी

तरी
हरण्यापेक्षा
जिंकण्यापेक्षा
कर्तबगारीच्या…
वानगीदाखल तू सांगतोस तेव्हा…
मी पाहतो
थिजलेल्या नजरेनं…
भिजते तुझी नजर तेव्हा
तुला तुझा पराभव वाटतो!

माझ्या तुझ्या थिजलेल्या 
डोळ्यांत,
तू मी जगाइतकाच
आंधळा… 

८. पेरुयेरुमचा बाप

पेरुयेरुमचा बाप
नाच्या होता
म्हणून हतबल झाल्यावर
सेंटी बनून पेरुयेरूम
त्याच्या लुंगीत घुसला
कॉलेजात ये सांगायला,
नाच्या बापही गेला कॉलेजात
नम्र मर्द बनून...

मग त्याची तीच लुंगी
नाच्या म्हणून फेडल्यावर
तो मरेस्तोर पळाला
त्याच्यातला पुरुषार्थ राखण्यासाठी

तो मरेस्तोर पळताना तू...
तू कमरेचं सोडून डोक्याला गंडाळणारा
मर्द म्हणूनच का येतोयेस नजरेपुढे
?

तुला मरेस्तोर गर्व राहील
बाप झाल्याचा
,
तुझ्या बायकोनं
माझ्या बारशाच्या घुगऱ्या वाटल्याचा
तसं
, आता
तुला नसेल ठाऊक
पण मलाही माझ्या रडकं स्त्रैण असल्याचा
हल्ली माज वाटतो....

पहिलं पिवळं पुस्तक सापडलं तेव्हा
माझे कानं रंगवून
तू ते माझ्यासमोरच वाचत बसलास
त्याचा सूड उगवला होता मी,
शाळा बुडवून मॉर्निंग फिल्म पाहून
नी शाळेची नोटीस आली गैरहजेरीबद्दल
तेव्हा
मी मर्दासारखी
तुझी सही केली होती पत्रावर
मर्द बनून

हे तुला सांगण्याचं
कारण अर्थात काहीच नाही
मीही बाप बनलेलोचंय
पण मला नागडं होण्याची भीती तरी वाटते
पोरांसमोर इतकंच

हरलेला तो ना मी जिकलेला

९.
उ:शाप

चार-दोन घडीपार
बनून पळत राहणार तडीपार

हा शोध कसला?
तुझा? माझा?

बापबापच असतो का अर्धनारी नटेश्वर?
बाप नसतो ईश्वर

हे तुला सांगता आलं असतं तर?
हे मला समजून घेता आलं असतं तर?

तर...
रुंदवली नसती दरी
लुप्त झाली नसती सरस्वती


नदीसारखी माय
तुझी त्याची हिच्या तिच्यासारखी
पळलो असतो किनाऱ्यानं जर तिच्या 
तर उदरातल्या तिच्या गवसल्या असल्या संस्कृती

तुझ्यासोबत फिरलो वेळोवेळी घडीपार
झालो तडीपार

तुझ्यामाझ्या मधल्या दरीत लुप्त झालेली

आहे सरस्वती

थोडं तिच्याकडे थोडं कान्या नजरेनं का होईना पण पाहू

तुला तुझ्या भटकंतीचा वाटेल पश्चाताप, होशील मोकळा
मला लागणार नाही अश्वत्थाम्याचा शाप

बाप नसतो कधीच बाप

बीज हाच तुझामाझा उ:शाप 


या महिन्यातल्या ‘पुरुषभान’ ह्या विषयसूत्रामध्ये आपण काही पुस्तकांची ओळख करून घेणार आहोत. आज प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांनी लिहिलेल्या ‘रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष’ ह्या पुस्तकाविषयी समजून घेऊया. भारतीय मनात राम आणि कृष्ण यांना खूप महत्त्वाचे स्थान असते. अनेकजण त्यांना आदर्श मानतात. त्याकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहायला हे पुस्तक मदत करते. हा पुस्तक परिचय किशोर मांदळे यानी करून दिला आहे. त्यांच्या मते ‘लिंगभावी समतेसाठी काम करणाऱ्या स्त्रीपुरुषांना स्वत:प्रती संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष करण्यासाठी एक नितळ दृष्टी देणारे हे पुस्तक अवश्य वाचायला हवे.’

मिथकांचा वास्तवाने उलगडा ! 

पुस्तक परिचय : रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष
लेखक : (प्राच्यविद्यापंडित) शरद पाटील
प्रकाशक : मावळाई प्रकाशन, शिरूर
पाने : १५० किंमत : १२०/-

रामायण व महाभारत या महाकाव्यांविषयी भारतीय मन उदासीनता व उत्सुकता या परस्पर विरोधी भावनांवर हिंदोळत असते. हे भारतीय मन पूर्णांशाने आधुनिक मन नाही. आणि परंपरेचा अर्थ तर प्राचीनत्व एवढाच करण्याकडे त्याचा कल आहे.
कुंतीला कर्ण सूर्यापासून झाला, जमीन नांगरताना नांगराच्या फाळाने पडलेल्या सरीतून सीता उपजली ... यासारखी मिथके उदासीनता निर्माण करतात तर या महाकाव्यातील नाट्यमय कथने व त्याभोवती गुंफलेले छळ, कपट, संहार, क्रौर्य व त्याचवेळी प्रेम, वात्सल्य, द्वेष, असुया, मत्सर व कारुण्य असा सारा बहुपेडी पट असल्याने उत्सुकताही निर्माण होते. पण काही झाले तरी या महाकाव्यांना 'इतिहास' मानायला मन तयार होत नाही.
इतिहासाचा शब्दश: अर्थ होतो : इति + हास = इतिहास. इति म्हणजे इथपर्यंतच्या आणि हास म्हणजे गोष्टी. पण तरिही, इतिहास म्हणजे घडून गेलेली व आता कुलूपबंद झालेली संहिता नव्हे. वर्तमानाच्या चावीने ती पुन्हा पुन्हा उघडली जाते व आजच्या वास्तवाने इतिहासाची नवीनच उकल होत असते. इतिहास जसा वर्तमानाचा अर्थ लावायला उपयोगी पडतो तसाच वर्तमान देखील इतिहासाचा नवा अन्वयार्थ लावत असतो.

या पार्श्वभूमीवर रामायण-महाभारत हा इतिहास आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे उत्तर शरद पाटील असे देतात की - ‘राम व कृष्ण हे काल्पनिक नाहीत. द्वारका समुद्रतळाशी सापडल्यामुळे कृष्ण ऐतिहासिक व्यक्ती ठरला आहे. रामायण बौद्ध व जैनांमध्येही असल्याने व कृष्णाच्या ऐतिहासिकतेमुळे रामही ऐतिहासिक पुरुष मानावा लागतो. रामाचे ऐतिहासिकत्व अमान्य केले तरी रामायण हे भारतीय इतिहासाचे एक साधन असल्याचे अमान्य करता येत नाही.’
रामायण व महाभारत ही मुळात लोककाव्ये होती. त्याचे व्यवस्थितीकरण अनुक्रमे वाल्मिकी व व्यास यांनी केले. लिखित इतिहास विरुद्ध मौखिक परंपरा हा पेच इथेही आहे. लिखित इतिहास जरी जास्त विश्वसनीय असला तरी मौखिक परंपरा ज्या स्मरण परंपरेने चालत येते, त्यावरून तो इतिहास अविश्वसनीय असू शकत नाही. वेद हे मौखिक परंपरेने चालत येऊनही त्यात कानामात्रेचाही फरक पडलेला नाही. तेच बौद्ध त्रिपिटकांचेही. तेही शेकडो वर्षे मौखिक परंपरेने चालत राहिले. वेद व त्रिपिटक धर्मग्रंथ आहेत. त्रिपिटक इतिहास मानले जातात तर वेद 'इतिहासाची साधने' मानली जातात. तर मग पुराणांनाही तोच दर्जा दिला पाहिजे. त्यातून इतिहास कसा मिळवायचा हा अन्वेषणपद्धतीचा (methodology) भाग आहे. असे शरद पाटील (शपा) यांचे मत आहे.
पुस्तकाच्या शीर्षकातील तिसरा शब्द आहे - वर्णसंघर्ष ! हा शब्द पूर्णार्थाने भारतीय आहे. " जगाचा इतिहास हा 'वर्गसंघर्षाचा' इतिहास आहे." हे मार्क्सचे इतिहासाच्या संबंधाने मूलभूत विधान आहे. पण ब्रिटीश आगमनापर्यंत भारतीय समाज हा वर्गसमाज नव्हता. जगभर वर्गसमाज अस्तित्वात असताना जंबुद्वीप भारत मात्र 'वर्ण-जाती' समाज होता. त्यामुळे भारतीय इतिहासाच्या संदर्भात 'वर्णसंघर्षा'चे हे अनन्यत्व वादातीत आहे. ते टाळून भारतीय इतिहास लिहिता येत नाही.
आधुनिक काळात, भारतीय इतिहासाला प्रथम वर्णजातिसंघर्षाचा दृष्टीकोन दिला तो महात्मा फुल्यांनी. त्यामुळे मार्क्सच्या वर्गसंघर्षी तत्त्वज्ञानाला फुले-आंबेडकरी तत्त्वज्ञानाची जोड द्यावी, अशी मागणी दलित विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्याकडून आली. त्यानंतर शपांनी प्रथम माफुआ (मार्क्स-फुले-आंबेडकर) व नंतर सौमा (सौत्रांतिक - मार्क्सवादी) ही तत्त्वज्ञानात्मक मांडणी केली. 'माफुआ'ला उदंड प्रतिसाद मिळत असतानाच, माफुआ विचारसरणी म्हणजे तत्त्वज्ञान होऊ शकत नाही असा निष्कर्ष काढून शपांनी माफुआपासून डिपार्चर घेतले व त्यांनी बौद्ध महायानी आचार्य दिग्नागच्या सौत्रांतिक विज्ञानवादाची मार्क्सवादाशी सांगड घातली. माफुआपासून डिपार्चर का घेतले व 'सौमा' का निर्मिले, यात आता आपण जाणार नाही आहोत, पण हे पुस्तक वाचताना शपांचा हा प्रवासही लक्षात घ्यावा लागतो म्हणून त्याचा ओझरता उल्लेख केला आहे.
संघ परिवाराने हायजॅक केलेली जयप्रकाश नारायणांची दुसऱ्या स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात असताना शपांची महाराष्ट्रभर रामायण महाभारतावर व्याख्याने सुरू झाली होती. ती व्याख्याने लेखबद्ध होऊन अनेक वृत्तपत्रे व नियतकालिकांतून प्रसिद्ध होत राहिली. प्रस्तुतचे पुस्तक म्हणजे अशा (१९७५ ते १९८३ पर्यंत) प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचे एकत्रिकरण आहे. जातिअंतक प्रबोधनापुढे त्या काळात उभ्या राहिलेल्या आव्हानांचा प्राय: मुकाबला करीतच ही व्याख्याने व लेखन घडले असल्याने त्यातील विवेचनही धारदार बनले आहे.
'रिडल्स ऑफ राम अॅण्ड कृष्णा' या आंबेडकरांच्या मांडणीला झालेला विरोध, पांडुरंग शास्त्री आठवले यांनी 'स्वाध्याय' परिवारामार्फत बहुजनांतील नवशिक्षित मध्यमवर्गीयांचे चालविलेले ब्राह्मणीकरण आणि टीव्हीवर गाजत असलेल्या रामायण महाभारतावरील मालिका. या सर्वांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परामर्श घेतच ही व्याख्याने व लेखन घडल्याने 'वर्णसंघर्षा'ला शीर्षकात स्थान मिळाले आहे.
आधी सांगितल्याप्रमाणे रामायण महाभारत ही महाकाव्ये त्यातील नाट्यमयतेमुळे मनाला मोहिनी घालतात, हे नाकारता येणार नाही. खुद्द शपांना आपली या महाकाव्यांवरील व्याख्याने देखील सवाद्य गाऊन कीर्तनासारखी व्हावीत, असे वाटत होते ! कौमार्यात कर्णाला नाईलाजाने जन्म दिल्यावर कुंती ते अर्भक अश्वनदीत एका काष्ठ पेटाऱ्यातून सोडताना ती नदीमाता वगैरे देवी देवतांना (या पुत्राला सुरक्षित ठेवण्यासाठी) आळवते तो महाभारतातील सर्वात हृदयद्रावक अध्याय असल्याचे शपा नमूद करतात. (दुर्गा भागवत 'व्यासपर्व'मध्ये या शोक, कंप, कोमलता व ताटातूटीवर जे भाष्य करतात ते मूळातून वाचावे असेच आहे) हा अध्याय कोरसने सवाद्य गायला जावा व त्याचे निरूपण कीर्तनाच्या शैलीत व्हावे एवढेच सांगून ते थांबत नाहीत तर अशी रसाळ व्याख्याने 'हिंदुत्ववादी रामा'चा पराभव करतील, असा त्यांना विश्वास होता.
रामायण म्हणजे प्रभूराम विरुद्ध राक्षस रावण आणि महाभारत म्हणजे परमेश्वर कृष्णप्रणित पांडव विरुद्ध राक्षसावतार कौरव यांचा संघर्ष ...हे ब्राह्मणी प्रबोधन हजारो वर्षे चालू आहे. त्याविरोधात जाऊन शपा, रामायणाचे सूत्र मावळती स्त्रीसत्ता व उगवती पुरुषसत्ता (राम विरुद्ध सीता) असल्याचे व महाभारताचे आंतरिक सूत्र देखील पांडव विरुद्ध द्रौपदी असल्याचे सांगतात.
त्यांच्या मते - रामाची युद्धे स्त्रीसत्ताक गणराज्याशी होत हा योगायोग नाही. स्त्रीवध निषिद्ध असणे हा स्त्रीसत्ताक समाजाचा 'धर्मपूर्व धर्म' होता. ताटकेचा वध करायला युवक रामाला प्रोत्साहन देताना विश्वामित्र म्हणतो - " न हि ते स्त्रीवध-कृते घृणा कार्या नरोत्तम l चातुर्वर्ण्य-हितार्थं हि कर्तव्यं राज-सूनुना ll " पुरोषोत्तमा ! स्त्रीवध करावा लागतो आहे म्हणून मनात दया आणणे योग्य नाही. चातुर्वर्ण्याच्या हितासाठी झटणे हेच राजपुत्राचे कर्तव्य आहे.
पुढे शरद पाटील असेही म्हणतात की कौसल्येला राम दशरथापासून झाला नव्हता. तो 'नियोग' पद्धतीने ब्रह्मन् ऋष्यशृंगाने वीर्यरूपी बीज (कौसल्या या दशरथाच्या शेतात) टाकण्यातून झाला होता. हा स्त्रीसत्ताक धर्मपूर्व धर्माचा अवशेष होता. 'योनिशुचितेसाठी' सीतेचा त्याग करणारी नवी मूलव्यवस्था अद्याप यायची होती. ती आल्यावरच दुर्गम वनात नदीपार आपल्याला सोडायला आलेल्या दिराजवळ सीता, " लक्ष्मणा ! माझी काया विधात्याने खरोखर दु:ख भोगण्यासाठी घडविली आहे ! " असा आकांत मांडते जो सबंध स्त्रीजातीचा प्रातिनिधिक चित्कार होता ! सर्व स्त्रियांना गुलाम करण्यासाठी पुरुष एकत्र आले आणि नंतरच पुरुषांनी पुरुषांना गुलाम केले. 'शंबुका'च्या हत्येच्या अंकाचा पडदा वर जाण्यासाठी, सीतेला 'दे माय धरणी ठाय' करणारा स्त्रीसत्तानिर्मूलनाचा अंक पार पडणे अटळच होते.
आज प्रत्यही घडणाऱ्या निर्घृण बलात्काराच्या घटना व दलितांना मृत्यूदंड देण्यातल्या अपरिमित क्रौर्याचा अर्थ लावताना आपण 'मनुस्मृती'ला अधोरेखित करतो. तरीही या घटनांच्या नंतर समाजातील उच्चभ्रू व मध्यम जातवर्गीयांच्याच काय खुद्द दलित-मागास स्त्री-पुरुषांच्या येणाऱ्या निषेधाच्या व समर्थनाच्या अशा दोन्हीही प्रतिक्रियांकडे सूक्ष्मपणे पाहिले तर त्यामागे रामायण महाभारताने घडविलेले पितृसत्ताक ब्राह्मणी विषमतावादी मन प्रच्छन्नपणे दिसते. भारतीयांच्या मेंदूत जाणिवेतला ब्राह्मणवाद व नेणिवेत गाडला गेलेला अब्राह्मणी समतावाद या विरोधांची एकजूट होऊन प्रबोधनाची समस्या कशी जटिल बनते ते जाणण्याची अंतर्दृष्टी घडवायला हे पुस्तक मदत करते. नेणिवेचे सकारात्मक प्रबोधन कसे शक्य आहे, याचीही दिशा दर्शवते.
शपांनी, जेत्यांच्या लिखित साहित्यातील व पराभूतांच्या मौखिक परंपरेतील शब्दांचे मूळ अर्थ व बदलत जाणारे अर्थ घेऊन शब्द व्युत्पत्तीशास्त्राच्या आधारे ही नवी इतिहास मीमांसा घडविली आहे. मलपृष्ठावर या मीमांसेचे सुस्पष्ट असे प्रयोजन त्यांनी दिले आहे : “जातिअंतक भांडवलदारी लोकशाही क्रांतीची यशस्वीता समाजवाद उभारणीच्या पूर्वतयारीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रबोधनाचा परीघ स्त्रीराज्यापर्यंत जातो. ब्राह्मणी प्रवाहाने स्त्रीराज्यापासूनचा अब्राह्मणी प्रवाह नष्टप्राय व बदनाम केल्यामुळे त्यातून या अब्राह्मणी प्रवाहाला मुक्त केल्याशिवाय प्रबोधनच काय पण समाजवादाची उभारणी देखील शक्य नाही.”
परिवर्तनाची आस असलेल्या व विविध समाज घटकांत चळवळीचे काम करणाऱ्या सर्वांनीच हे पुस्तक वाचले पाहिजे. पण त्यातही लिंगभावी समतेच्या चळवळीत काम करणाऱ्यांनी ते आवर्जून वाचले पाहिजे. कारण, समतेची सर्वोच्च कसोटी ही स्त्री-पुरुष तथा लिंगभावी समता हीच आहे. या समतेसाठी स्त्री आणि पुरुष दोघांनाही एक आतला असा स्वत:प्रती संघर्ष करावा लागणार आहे. तो संघर्ष करण्यासाठी एक नितळ दृष्टी देणारे हे पुस्तक अवश्य वाचायला हवे.


किशोर मांदळे

लेखक, कवी आणि सत्यशोधक कार्यकर्ता