मनाचिया घावांवरी मनाची फुंकर

“देव सगळीकडे असू शकत नाही म्हणून त्याने 'आई ' बनवली”
“परक्या घरी गेली तरी वेळेला मुलगीच उपयोगी पडते!”
“तू माझी 'प्रिन्सेस' आहेस!”
अशी स्त्रियांच्या त्यागाची, कौतुकाची जी वाक्य आपण नेहमीच ऐकतो - ती ऐकताना आपल्याला कसं ‘बनवलं’ जातंय, इमोशनल ब्लॅकमेल केलं जातंय हे आपल्या लक्षात येतं का? जर हे तुमच्या लक्षात येत असेल तर तुमच्या मानसिक आरोग्याची पहिली आणि महत्त्वाची पायरी तुम्ही गाठली आहे असं म्हणायला हरकत नाही. पण अडचण अशी आहे कि बऱ्याच बायका याच पायरीवर अडकून बसतात आणि त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त संख्येने बायका या पायरीपर्यंत सुद्धा पोहोचत नाहीत. मला कल्पना आहे की आता लगेच तुम्ही म्हणाल की "माझं कुटुंब नाही बाबा मला असं ब्लॅक मेल करत!” - शक्य आहे; पण कदाचित सामाजिक दबावाने ते काम आधीच केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेली वीसेक वर्ष मानसोपचाराचं काम करताना मला आलेले अनुभव आणि त्यातून मला दिसलेले काही कॉमन प्रश्न आणि स्त्रियांच्या विचार करण्याच्या कॉमन पद्धती याबद्दल मी लिहिणार आहे. मानसिक समस्या ह्या नेहमी मनोसामाजिक स्वरूपाच्या असतात, असच मला दिसून आलेलं आहे - कारण आपण काही isolation मध्ये जगत नाही!
कोरोनासत्र सुरु झाल्यापासून मला समुपदेशनासाठी ज्या स्त्रियांचे कॉल येऊ लागले, त्यात मुख्यत्वे कुटुंबाची काळजी, मरणाची भीती - स्वतःपेक्षा जास्त नवरा, मुलं, आई वडील, सासूसासरे यांच्या मरण्याची भीती ही दिसून येते आहे. एका महिलेशी बोलत असताना ती तर सहजपणे म्हणाली – “मी मेले तर फार काही फरक पडणार नाही, काही दिवसांनी 'हे' दुसरं लग्न करतील. मला रिप्लेस करणं फार अवघड नाही. पण 'ह्यांना' काही झालं तर मात्र आमच्या सगळ्यांचं आयुष्य उध्वस्त होईल. 'ह्यांची' काळजी घेणं जास्त महत्वाचं.” दुसरी एक जण म्हणाली , “मी घरी आणलेलं सामान , भाज्या २-२, ३-३ वेळा धुते. सासरे म्हातारे आहेत, त्यांना काही झालं तर?”
या उदाहरणांतून बऱ्याच गोष्टी लक्षात येतात.
स्वतःला दुय्यम मानणे
लहानपणापासून हेच तर संस्कार झालेत ना आपल्यावर ? तू मुलगी आहेस त्यामुळे घरातल्या सगळ्यांना खुश ठेवणं हे तुझं काम आहे. तुझी ख़ुशी महत्वाची नाही. आणि फार विचार करायची संधी न मिळालेल्या मुली त्यांच्याही नकळत हेच सत्य मानून जगायला शिकतात. त्यामुळे कित्येक स्त्रियांना 'तुला काय केलं कि आनंद होतो ? ' किंवा ' तुला काय खायला आवडत?' अशा सध्या प्रश्नांचं सुद्धा उत्तर देता येत नाही, विचारच केलेला नसतो आपल्या आवडी निवडीचा! खोटं वाटतंय का हे ? कारण हे वाचणाऱ्या बऱ्याचशा जणी शिकलेल्या , स्वतःचा विचार आणि जाणीव असलेल्या असतील. पण लक्षात असू द्या तुम्ही minority मध्ये आहात. माझ्याकडे समुपदेशनाला येणाऱ्या ह्या स्त्रिया स्वतःसाठी आलेल्या पण नसतात. त्यांच्या मुलांच्या कोणत्यातरी समस्येसाठी शाळेने त्यांना सल्ला दिलेला असतो समुपदेशनाला जाण्याचा. लहान मुलांच्या समस्या ह्या बहुतेक वेळा पालकांच्या समस्यांचं extension असत , मग पालकांबरोबर काम करावं लागत. खूप वेळा ह्या स्त्रियांचे नवरे तक्रार सांगतात कि - 'ही मुलांना मारते, रागावते खूप, मी कधीच नाही मारत.' ( फक्त मुलं चुकली की हिला मारतो, मुलांकडे नीट लक्ष देत नाही म्हणून ) तर या स्वतःला महत्त्व न देणाऱ्या स्त्रिया घरातील प्रत्येकाच्या आरोग्याची, आनंदाची जबाबदारी स्वतःवर घेतात, स्वतःच्या सगळ्या इच्छा, अपेक्षा, आनंद दाबून टाकतात, मारून टाकतात आणि विविध मानसिक समस्यांच्या शिकार होतात.
सुंदर दिसण्याचा ताण - आठवतंय? गुजराथमध्ये काही वर्षांपूर्वी हजारो स्त्रियांनी ब्रेस्टइम्प्लांट नामक surgery करून घेत होत्या. नवरा ‘आपला’ राहायला हवा असेल तर हे करणं गरजेचं होतं म्हणे. पिढ्यानपिढ्या हे असले सौदंर्यांचे मूर्ख साचे आणि त्याचा आपल्या नात्यांशी जोडलेला संबंध आजही स्त्रियांच्या मनातील काळजीचे, ताणाचे कारण बनलेला दिसतो. हा ताण सर्व आर्थिक, सामाजिक स्तरात आणि सर्व वयाच्या स्त्रियांमध्ये दिसतो. मी एका अत्यंत उच्चभ्रू कॉलेजमध्ये काम करते. तिथे अनेक अत्यंत देखण्या मुली सुद्धा या विचाराने आपला self-esteem ( स्वतःचे मूल्य ) गमावून बसलेल्या दिसतात. त्यात पुन्हा असेच कपडे घातले पाहिजेत, असंच दिसलं पाहिजे, वागलं पाहिजे, इथेच जाता कामा नये, इतक्या वाजता घरी आलंच पाहिजे असे सामाजिक, कौटुंबिक दबाव असतात ते वेगळेच.
गॉसिप - गॉसिप हे महिलांच व्हेण्टआऊट होण्याचं एक माध्यम आहे. मानसशास्त्र सांगतं की जगात असं कुणीही नाही जे गॉसिप करत नाही. माझे स्वतःचे कितीतरी पुरुष मित्र माझ्यासोबत सुद्धा गॉसिप करतात. मात्र स्त्रियांच्या गॉसिपवर एवढी टीका होते, त्याची एवढी टर उडवली जाते की बऱ्याच महिलांना गॉसिप केल्याबद्दल अपराधी तरी वाटतं किंवा लाजिरवाणं तरी. याचा अर्थ दुसऱ्याला त्रास देण्याच्या हेतूने किंवा मानहानी , खोट्या गोष्टी पसरवण अशा प्रकारच्या गॉसिपच मी समर्थन करते आहे असं नव्हे. पण घरात होणारे त्रास मैत्रिणीला सांगणं, नवऱ्याच्या तक्रारी सांगणं इ. प्रकारच्या गोष्टी भावनांना वाट करून देतात आणि उपयोगी ठरतात. तेंव्हा त्याची टवाळी करणं किमान आपण महिलांनी तरी बंद केलं पाहिजे आणि त्याचा अपराधी भाव बाळगता काम नये. गॉसिप करावं लागण्यामागचं एक महत्वाचं कारण असं आहे कि घरातील पुरुष ऐकून घेत नाहीत , सासूची तक्रार नवरा ऐकून घेत नाही, कटकट करू नको म्हणतो किंवा ‘तुझं तू बघून घे, मला यात पडायचं नाही’ असं म्हणतो, खरंतर नुसतं ऐकून, समजून घेतलं तरी निम्मं दुःख हलकं होतं - पण घरात तसं घडत नाही. आणि दुसरं कारण म्हणजे समोरासमोर बोलण्यासाठी (confrontation) हिम्मत नसते.
आर्थिक परावलंबित्व - ही बोलायची हिम्मत नसते कारण बऱ्याच गोष्टीत या स्त्रिया परावलंबी असतात. 'उद्या नवऱ्याने हाकलून दिल तर?' ची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर असते. माहेरचे लोक ही आधार देत नसतात. अशा वेळेस चालवून घेणे, गप्प बसणे हाच पर्याय त्या निवडतात. पण म्हणून मनात वाटलेल्या भावना, मनस्ताप, परावलंबी असल्याबद्दलची लाज, सतत दुसऱ्याला खुश करताना येणारा ताण थोडाच नाहीसा होतो? तो तसाच राहतो मनाच्या कोपऱ्यात आणि कधीतरी मानसिक समस्येच्या स्वरूपात डोकं बाहेर काढतो. यातूनच अंगात येण्या सारख्या घटना घडू शकतात आणि त्यातून पसरणारी अंधश्रद्धा मानसिक आजारांना अजूनच खतपाणी घालते.
सहानुभूतीची अपेक्षा / सवय - जेंव्हा आपल्या समस्येबद्दल आपण काहीच करणार नसतो , करू शकणार नसतो तेंव्हा मग एक वेगळी सवय लागते. सवय कसली त्याला व्यसनच म्हणता येईल - ते म्हणजे सहानुभूती मिळवण्याचं. जिथेतिथे आपली रडकथा ऐकवून दुसऱ्यांकडून "तू किती बिचारी” हे ऐकण्याचं व्यसन. आपली रडकथा ऐकवू नये असे मी मुळीच म्हणत नाही, पण ती ऐकवून , चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याऐवजी जेव्हा फक्त तू खूप चांगली आणि बिचारी हे ऐकायची सवय लागते तेंव्हा आपल्याला यातून मार्ग काढताच येणार नाही किंवा यातून काही मार्गच नाहीये या विचारावर पुन्हापुन्हा शिक्कामोर्तब होत राहतं. परिणामी निराशेचे विचार वाढत, तीव्र होत जातात. भारतात महिला आणि त्यातही गृहिणींमध्ये नैराश्याचा आजार आणि आत्महत्यांचं प्रमाण खूप जास्त आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे.
हे सगळं वाचल्यावर पुढे आपण काय करू शकतो याचा विचार ओघानेच आला! तर आपण - स्त्रिया व स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचे महत्व वाटणारे इतर सर्व - यांनी काही पथ्य बाळगूया. काही सपोर्ट तयार करू या. यात पाहिलं म्हणजे तू तुझ्यासाठी ( म्हणजे फक्त तुझ्यासाठी असं नव्हे ) जगायचं आहेस, हा विचार लहानपणापासून मुलींना सांगू या. तरुणींना सौन्दर्याच्या संकल्पनांचा पुनर्विचार करायला सांगू या, आकर्षक असणं आणि टिपिकल सौन्दर्य यातला फरक सांगू या. आकर्षण हे फक्त लैंगिक नसतं आणि नुसतं लैंगिक आकर्षण पुरेसं नसतं - हे सांगू या. तुमचे आचार विचार, आत्मविश्वास तुम्हाला कसा आकर्षक बनवू शकतात हे सांगू या. स्त्रियांच्या गॉसिपला ' problem solving ' कडे नेऊ या. एकमकींना नुसती सहानुभूती देण्यापेक्षा आधार देऊ या, मदत करूया. तुला हवं त्या पद्धतीने जगायचा तुला अधिकार आहे याची आठवण करून देऊया. हे सगळे करून मानसिक समस्या संपतील असे नाही, पण निदान आपण एकटे नाही हा दिलासा असेल असे बघूया. शेवटचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक समस्येकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून बघूया. शारीरिक आजारांप्रमाणेच मानसिक आजारसुद्धा कुणालाही होऊ शकतात, हे मान्य करून - आपण त्यापासून वाचण्यासाठी काही preventive पावलं उचलली तरी, गरज पडल्यास कोणताही किंतु न बाळगता उपचार घेऊया!!
खरं म्हणजे पुरुषांना पण अनेक प्रकारची दडपणं आणि दबाव आजच्या सामाजिक परिस्थितीमुळे जाणवतात. उदाहरणार्थ कुटुंबातील "प्रॉब्लेम सॉल्व्हर” ची भूमिका, ‘कमावलेच पाहिजे’चे compulsion किंवा भावना व्यक्त करण्याला मज्जाव किंवा सतत खंबीर असण्याची अपेक्षा. या ताणांचा परिणाम म्हणून विविध प्रकारच्या मानसिक समस्यांना त्यांनाही तोंड द्यावं लागतं. रडून चालत नाही म्हणून दारूचा पर्याय निवडणारे पुरुष काही कमी नाहीत! थोडक्यात, स्त्रिया आणि पुरुष दोघांचा ही शत्रू एकच आहे, तो म्हणजे - पुरुषसत्ताक पद्धती. समतेवर आधारित समाज तयार झाला तर दोघांनाही मदतच होणार आहे. स्त्री व पुरुष हे एकमेकांच्या समोर शत्रू म्हणून उभे असण्याऐवजी एकमेकांना पूरक व्हायला हवेत. एक समजूतदार, सर्वाना व्यक्त होण्याची संधी देणारा आणि आधार देणारा समाज सर्वांच्याच मानसिक आरोग्याला उपयोगी ठरेल. कोरोनाने आपल्याला शिकवलेला सगळ्यात मोठा धडा हाच आहे की एकेकट्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी संपूर्ण समाजाच्या आरोग्याचा विचार आपल्याला केला पाहिजे. तेच तत्व मानसिक आरोग्यालाही लागू आहे - अशा समाजनिर्मितीसाठी आपण कोणतं योगदान देणार ?

विभा पिटकेदेशपांडे 

मानसोपचार तज्ञ


डॉ. इलीना सेन

मागच्या आठवड्यात डॉ. इलीना सेन यांचे निधन झाले. त्या एक महत्त्वाच्या स्त्रीवादी अभ्यासक आणि कार्यकर्त्या होत्या. गेली काही वर्षे त्या वर्ध्यातील महात्मा गांधी हिन्दी विश्व विद्यालयात आणि नंतर मुंबईतल्या टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस इथे women’s studies चे अध्यापन करीत होत्या. इलीना यांनी आदिवासींच्या मानवी हक्कांसाठीही छत्तीसगढ मधून अनेक वर्षे संघर्ष केला. विविध सामाजिक चळवळींमध्ये काम करणाऱ्या महिलांनी चळवळीच्या अंतर्गत असलेल्या पितृसत्तेला कशाप्रकारे आव्हान दिले आणि त्यातून स्वायत्त स्त्रीवादी चळवळीचा झालेला उदय – याविषयी त्यांनी A Space Within The Struggle या पुस्तकात मांडणी केलेली आहे. जेव्हा डॉ. बिनायक सेन यांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली, त्यानंतर इलीना यांनी त्यांच्या सुटकेसाठी अविरत प्रयत्न केले. कदाचित त्यामुळे डॉ. विनायक सेन यांची पत्नी अशी त्यांची मुख्य ओळख बनून राहिली होती. इलीना यांची मैत्रीण आणि छत्तीसगड मधील ‘रूपांतर’ संस्थेच्या कामातील सहकारी भारती दिवाण यांनी त्यांच्याविषयीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. 

भारती दिवाण सध्या मुंबईत महिला आणि मुलांसोबत जाणीव जागृतीचे काम करतात.

डॉ. इलीना सेन अब हमारे बीच नहीं रहीं यह खबर अलग अलग माध्यमों से मेरे पास आ रही थी| कॅंसर जैसी बीमारी में यह अपेक्षित ही था, फिर भी मैं कुछ क्षणों के लिये सुन्न रह गई| इलीना से मेरी पहचान कॉलेज के दिनों में हुई थी| होशंगाबाद का हमारा घर उन दिनों आस-पास के गांव और शहर के कार्यकर्ताओं का अड्डा हुआ करता था| उन दिनों डॉ. बिनायक सेन ‘फ्रेण्डस रुरल सेंटर’ होशंगाबाद में काम करते थे, इलीना उन्हीं के साथ एकाध बार हमारे घर आई थी| मुझे धुंदली सी याद है, कि इलीना से उन्ही दिनों मेरी पहली मुलाकात हुई थी|
कॉलेज की पढाई के बाद मैं विभिन्न सामाजिक संस्थाओं के साथ काम करने लगी| उसी दौर में मेरा छत्तीसगढ़ भी जाना होता था| तब छत्तीसगढ़ मध्यप्रदेश का हिस्सा था| एक दिन मुझे इलीना का संदेश मिला, “मिलने आओ, बात करना है”| मैंने ‘हां’ तो कह दी, लेकिन अंदर से थोड़ी धुकपुक शुरु हो गई| इलीना सीनियर है, कई वर्षों से वह सामाजिक काम कर रही है, ‘छत्तीस गढ़ मुक्ति मोर्चा’ जैसे बड़े संगठन के साथ काम करने का अनुभव है, J.N.U. से Ph. D. की है और महिला मुद्दो पर लेख लिखती हैं, राष्ट्रीय स्तर के संगठनों/संस्थाओं से जुड़ी हैं आदी आदी - सभी डर और संकोच के साथ मैं इलीना से मिलने तिल्दा ( रायपुर के पास ) गई|
मेरी सारी धुकपुक, डर और संकोच पहले घंटे में ही खत्म हो गये| कुछ घंटे मिलने का तय करके भी मैं इलीना के साथ दो दिन रही| हमने दो दिन बहुत ही सहजता से विभीन्न विषयों पर बातचीत की और तय हुआ कि मैं इलीना को एक अध्ययन में मदत करुंगी| विषय मेरी भी रुचि का था, ‘वनवासी कल्याण आश्रम’ और ‘ईसाई मिशनरीज’ का महिला शिक्षण में योगदान| हमें छत्तीसगढ़ के विभिन्न जिलों में स्थापित चर्च और आश्रम में जाकर बातचीत करना थी, आसपास के गांव में महिला शिक्षण का जायजा लेना था और विश्लेषण करना था| इस काम के करते हुये, इलीना से मेरी नई पहचान होती गई| इसी दौर में इलीना ने ‘रुपांतर’ की संकल्पना मेरे सामने रखी और तब से मैं ‘इलीना’ और ‘रुपांतर’ दोंनो से जुड़ गई| मैने इलीना के साथ पांच साल काम किया है| ये साल मुझे व्यक्तिगत रुपसे समृध्द करनेवाले थे | इलीना के साथ वैचारिक लेन-देन तो होती ही थी, इसके अलावा काम की बारिकियों को समझाना,प्रोत्साहित करना, गलतियों को बिना निराश किये बताना, हमेशा सकारात्मक सपोर्ट करना इलीना की खासियत थी| मैंने अभी तक जिन संस्थाओं के साथ काम किया था, वहां मेरे काम पहले से कोई और तय करता था, मगर इलीना हमें मुध्दे तय करने कि एक हद तक छुट देती थी| जरुरत पड़ी तो वह मार्गदर्शक की भूमिका निभाती थी| कभी कभी तो छोटे मोटे प्रोजेक्ट हम खुद बनाते थे, जो हमें आत्मविश्वास देता था| यह अनुभव मुझे पहले कभी नहीं हुआ था|
मेहनत से काम करना और आनंद लेना इलीना की खासियत थी| इसिलिये हमारे सारे कार्यक्रम ( मिटींग, कार्यशालायें, सेमिनार ) बिना सास्कृतिक कार्यक्रम पुरे नहीं होते थे| गाना आये या ना आये गाना चाहिये, नाच आये या ना आये नाचना ही चाहिये - यह हमारे कार्यक्रम की मुख्य गतिविधी थी| मध्यप्रदेश महिला मंच हमारा एक और मिला जुला कार्यक्रम था| महिला मंच में तमाम संस्थाओं की महिलाये व्यक्तिगत रुपसे जुड़ी थी| तब छत्तीसगढ़ म. प्र. का हिस्सा था| यह जो अनौपचारिक मंच है वो आज भी जिन्दा है| इलीना और डॉ. बिनायक सेन से मेरा भावनात्मक रिश्ता रहा है| मेरे कई सारे व्यक्तिगत निर्णयों में उन्होने मुझे सपोर्ट किया है| इन पांच सालों में और बाद में भी मेरे हर दुख और तनाव के दौर में उन्होने मुझे हिम्मत और सलाह दी है| पिछले कई साल इलीना के संघर्षमय रहे है और मुझे अपराधबोध है कि मैं इस दौर में इलीना के साथ पूरी तरह से खड़ी नही हो पाई| इसके बावजूद हम जब भी मिले अश्रूपूर्ण आंखो से गले मिले| इलीना ने कोई भी शिकायत नहीं की| इलीना चली गई, यह सुनकर आज मेरी आंखों में एक भी आंसू नहीं है, क्यो मुझे नहीं मालूम|

अंगणवाडी कर्मचारी

 मागच्या महिन्यात लॉकडाऊनच्या काळातही घराबाहेर जाऊन काम करणाऱ्या मुंबईतल्या एका डॉक्टरचे अनुभव आपण वाचलेत. आज आपण कोकणातल्या दोन अंगणवाडी सेविकांचे अनुभव समजून घेऊया. त्यांच्या अनुभवांचे शब्दांकन सुनीता गांधी यानी केले आहे. सुनीता गांधी अनेक वर्षापासून विविध सरकारी आणि गैरसरकारी संस्थांच्या सोबत प्रशिक्षणाचे काम करणाऱ्या स्त्रीवादी कार्यकर्ती आहेत.

कल्पना वाघे  

16 मार्चला मात्र आमचे आयुष्यच जणू बदलून गेले! करोना नावाची जागतिक महामारी आल्याचा बातम्या येत होत्या. पण 16 मार्चला आम्हाला आदेश आला की मुलांना आंगणवाडीत बोलावू नका. लॉकडाऊन नावाचा नवीन शब्द पहिल्यादाच ऐकला. सगळ्या देश,राज्य,जिल्ह्याच्या सीमा बंद केल्याचे समजले. कोकणात गावांनी निर्णय घेऊन गावच्या सीमाही बंद केल्या. आमच्या गावची परिस्थिती वेगळी नव्हती. मी चिपळूण तालुक्यातील निर्व्हाळ गावात आंगणवाडी सेविका म्हणून 29 वर्ष काम करते आहे. लॉकडाउनच्या सुरवातीच्या काळात गाव करोना मुक्त ठेवण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न सुरू केले. सरकारी आरोग्ययंत्रणा कामाला लागली, पण मनुष्यबळ कमी पडू लागले. अशातच आंगणवाडी बंद ठेवून अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी गावाच्या करोना विषयक सर्व्हे,जनजागृती च्या कामात सहभागी होण्याचे ग्रामविकास खात्याचे आदेश आले. आजवर मुलांसोबत काम करताना गावविकासाच्या वेगवेगळ्या अभियान,उपक्रमात सरकार आम्हाला हक्काने सामील करून घेते, आम्ही पण या सगळ्या कडे एक अनुभव म्हणून पहातो.
आमच्या नेहमीच्या कामात गावातली 0 ते 6 वयोगटातली मुलं आणि गरोदर, स्तनदा मातांच्या सोबत लसीकरण, आहार, आरोग्य यासाठी आम्ही काम करतो. आमचे रोजचे साडेचार तासाचे वेळापत्रक तयार असते. यात मुलांना खेळ, गाणी,स्वछता शिकवणे.पोषक आहार देणे ही प्रत्यक्ष आंगणवाडीत मुलांसोबत कामे करायची असतात.या कामासाठी आम्हाला मदतनीस मदत करते. याच सोबत वेगवेगळी 11 रजिस्टर भरणे आणि 4/5 विविध नोंदीही करायच्या असतात. हे काम वेळापत्रका प्रमाणे केले तर मासिक अहवाल बनवणे सोपे जाते.याच सोबत दैनदिन गृहभेटी हा पण आमच्या कामाचा महत्त्वाचा भाग असतो. या मध्ये किशोर वयीन मुलीचा आहार,मार्गदर्शन ही कामे असतात. गावामध्ये राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय अभियानाच्या कामांसाठी आम्ही हक्काच्या कार्यकर्त्या असतो. अनेकदा आम्ही ते सामाजिक बांधिलकी म्हणून करत असतो. त्याचा स्वतंत्र मोबदला आम्हाला मिळत नाही. पण या नव्या आदेशानंतर आमची कामाची चौकट पूर्ण बदलली. जागतिक महामारीच्या संकटाच्या निर्मूलनाचा आम्ही एक भाग झालो. सोशल डिस्टन्स ,क्वारन्टाईन...असे एकेक नवनवीन शब्द समजत होते. लोकांनी सुरक्षित रहाण्यासाठी घरातून बाहेर पडू नये - हे सांगत असताना आम्ही मात्र सगळी दिनचर्या बदलून घरातली कामे उरकून सकाळी 9 ते रात्री उशिरा पर्यंत घराबाहेर रहात होतो. पण कामाची नेहमीची एक ठराविक वेळ आणि त्यानुसार घरची कामे, जबाबदाऱ्या यांचे केलेले वैयक्तिक नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले. सर्व्हे, जागृती, मार्गदर्शन करतानाच स्वतःसोबत कुटूंबाच्या आरोग्याची चिंता,भीती सतावत होती. 
सरकारला आमच्याकडून काम करवून घ्यायचे होते. पण आमच्या सुरक्षेची कोणतीही जबाबदारी घेतली नाही. मास्क, सॅनिटायझर पुरवले नाहीत. 60 वर्षाच्या पुढील व्यक्तींना धोका अधिक आहे – असे आम्हीच सांगत होतो – पण तेव्हा वयाची साठी ओलांडलेल्या अंगणवाडी कार्यकर्त्या मात्र या कामात सहभागी होत्या. आमच्या संघटनेच्या सततच्या पाठपुराव्या नंतर 4 महिने सातत्त्याने काम केल्यावर ICDS (एकात्मिक बालविकास) च्या आयुक्तांनी अखेर आंगणवाडी सेविकांना काम थांबवण्यासाठी चे आदेश दिले. करोना काळातील कामाचे स्वतंत्र मानधन ग्रामपंचायत मधून मिळेल असे सांगण्यात आले.आधीच आम्हाला जेमतेम साडेआठ हजार इतके तुटपुंजे मानधन मिळते! चौदाव्या वित्त आयोगातून 80 टक्के सेविकांना हे मानधन फक्त एका महिन्याचे मिळाले.आता ग्रामपंचायत म्हणते आम्हाला शासनाचे आदेश नाहीत. त्यामुळे 3 महिन्याचे मानधन अजून मिळाले नाही आणि मिळेल की नाही याची शंका आहे. कारण अजून गेल्या 2 वर्षाचा प्रत्यक्ष प्रवास खर्च आणि भोजन भत्ता गेली मिळणे बाकी आहे. 
आम्ही जेव्हा करोना दरम्यान काम करत होतो तेव्हा सतत घरच्यांची चिंता त्रास द्यायची. या फिरण्यामुळे आपण आपला आणि कुटूंबाचा जीव धोक्यात घालतोय असे वाटत रहायचे. घरचे म्हणायचे,'एकीकडे सरकार घरी रहा म्हणतंय आणि दुसरीकडे तुम्हाला गावभर फिरायला सांगतय, हे दुटप्पीपणाचे आहे.' तर गावातील लोक म्हणत, ‘गावात बाहेरगावावरून कोणी आलय त्याची माहिती यंत्रणेला द्या’ - या सगळ्यातून सुवर्णमध्य गाठायचा प्रयत्न करताना खूप तारांबळ उडायची. आजपर्यन्त घरच्यांनी सांभाळून घेतलय. अजूनही मुलाची वजने,लसीकरण यासाठी बाहेर पडावेच लागते. भीती वाटतेच, पण तरीही सामाजिक बांधिलकीची भावना स्वस्थ बसू देत नाही. अजून किमान आमच्या गावातल्या आरोग्य यंत्रणेने तरी करोनापासून गाव सुरक्षित ठेवलाय. पण आता भीती आणि नवे आव्हान आहे...गणपतीसाठी येणाऱ्या चाकर मान्याचे! दरवर्षी गणपती आणि चाकरमानी मंडळीची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. पण या वर्षी मात्र विघनहर्त्याने - चाकरमान्यांना गावी न येण्याची बुद्धी द्यावी - अशी जरा विचित्र प्रार्थना करावीशी वाटतेय. अशी प्रार्थना पण खूप वेदनादायी आहे.पण या विचित्र संसर्गजन्य करोनामूळे आमचा पण नाईलाज झालाय.

रूपाली परब 

चिपळूण मध्ये राहणारी पण जवळच्या ग्रामपंचायती च्या हद्दीतल्या  मिरजोळी,कोल्हेखाजन येथील अंगणवाडी सेविका. वयाची साठी ओलांडलेली,सर्वासोबत हसतखेळत असणारी,मनमिळावू अशी ही कार्यकर्ती. दर महिन्याला होणारी मीटिंग आणि चार सहा महिन्यांनी कधीतरी होणारी ट्रेनिंग हाच त्यांचा विरंगुळा! सख्याना भेटायचे,सुख दुःखाच्या गोष्टी सांगायच्या.आनंद साजरा करायचा आणि दुःखात धीर द्यायचा.हे सगळ घडू शकायच मीटिंग मुळे. आज ते एकत्र भेटणे, तो विरंगुळा पण नाहीये. 
कुटुंबात मुलगा, सून आणि 6 महिन्याची नात. सून माहेरी बाळंतपणाला गेली होती आणि जानेवारीत नात झाली. 2 महिन्यांनी नातीला, सुनेला घेऊन यायचे, नातीचे कोडकौतुक करायचे – असे आजीने ठरवले...पण मार्चमध्ये करोनाचे संकट आले. नुसते संकट आले नाही तर कामाचा दुप्पट ताण आणि भीती घेऊन आले! स्वतः सोबत कुटूंबातील व्यक्तींना पण आपण संकटात टाकू शकतो - अशी धास्ती रोज घर गाठताना सोबतच असायची. त्यामुळे इतक्या छोट्या बाळाला संकटात नको टाकायला म्हणून आजपर्यत परबबाईंनी नातीला आणि सुनेला माहेरातून घरी आणलेले नाही. करोनासारख्या आपत्तकालीन स्थितीत सरकारने हक्काच्या अशा अंगणवाडी सेविकांना ड्युटी दिली..परंतु कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही. वृद्ध व्यक्तींना धोका आहे हे माहीत असूनही परब बाईंनी 3 महिने काम केले. नियमितपणे ठराविक वेळेत आंगणवाडीत काम करणाऱ्या व्यक्तीला वेळेचे भान न ठेवता दिवसरात्र काम करावे लागले. या अतिरिक्त कामाचा ना मोबदला मिळाला, ना या कामाची साधी दखल शासन दरबारी घेतली गेली - याची खंत परब बाईंना वाटतेय. 
आज ना उद्या सरकार अंगणवाडी सेविकांना मानधनाऐवजी पगार देईल, चार पैसे पेंशन मिळेल, म्हातारपणाचा आधार होईल - या आशेवर अशा अनेकजणी सेवेत आहेत. अखेर संघटनेच्या पाठपुराव्या नंतर 3 महिन्यांनी त्यांची ही अतिरिक्त कामे थांबवली गेली. अजूनही मुले अंगणवाडीत येत नसली तरी नियमित सर्व्हे, वजन घेणे, लसीकरण यासाठी गावात जावेच लागते. बाहेरच्या संपर्कातुन धोका आहेच हे लक्षात घेऊन आजही आज्जी नातीला घरी आणू शकत नाहीये. त्याचसोबत नातीला भेटायला जाणेही शक्य होत नाहीये. आज करोना संदर्भातील काम थांबले असले तरी 3 महिने केलेल्या कामाच्या अतिरिक्त काम,सर्व्हे यामुळे असणाऱ्या गुढघेदुखीचा अधिकच त्रास सुरू झालाय, सांधेदुखी वाढली. आज या परिस्थितीत त्या प्रार्थना करत आहेत...”जगावरचे करोना चे संकट लवकर टळू दे." खरंच असंच होऊ दे. लवकरात लवकर आज्जी आणि नातीची भेट होऊ देत, नातीच्या खोड्यानी परबबाईंचे घर भरू देत!

लैंगिकतेवर बोलू काही – कोण? कधी? कुठे? का ?






























मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांकरता मी एक विषय शिकवते – “लैंगिकतेचे नीतिशास्त्र” (Ethics in Human Sexuality). जर त्यांना विचारलं की ‘‘शाळेतील मुलांना सेक्स एज्युकेशन कसे द्याल?’’ तर ते म्हणतात, “त्यात काय सांगायचं? इतकं सगळं नेटवर तर आहे.”
“ गर्भात मुलगा किंवा मुलगी कसे बनतात, हे मुलां-मुलींना कसे समजावून सांगाल? आणि तसे सांगणे का आवश्यक आहे?”
यावर ते उलट मलाच म्हणतात, “त्यांना जीन्सच्या जोड्या वगैरे कसे लक्षात येणार?” मला एक माहीत होते की, वैद्यकीय विद्यार्थी शरीरशास्त्र (Physiology), शरीर रचनाशास्त्र (Anatomy) शिकतात पण, लैंगिकतेबद्दल कुठंच शिकत नाहीत. आजारपणाची सामाजिक कारणे व प्रतिबंध यावर आमचा ‘रोग प्रतिबंध आणि सामाजिक वैद्यक विभाग’ काम करतो. वस्ती पातळीवर, शाळां-कॉलेजांमध्ये लोकांना आरोग्य, रोग, औषधे आणि रोग प्रतिबंध हा विषय सोपा करून कसा सांगायचा(Health Education) हे पण आमच्या विभागाचे काम आहे.
मी तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना विचारते, “मुलां-मुलींना लैंगिकता शिक्षण कोणत्या वयात दिले पाहिजे?”
तर अगदी ठासून उत्तर येतं - “टीनएजमध्ये”
“पण नेमकं केव्हा? टीनएज तर १३ ते १९ वर्षापर्यंत आहे. यापेक्षा आधी नाही का देता येणार? म्हणजे दहाव्या वर्षी ?नवव्या वर्षी ?पाचव्या वर्षी ? ” - माझा प्रश्न. मग वर्गात एकदम जहाल शांतता पसरते ! जणू काय, हे काय काहीतरीच - असं त्यांना वाटतं! पण खरं तर आपल्याला हवं असलं किंवा नसलं तरी लैंगिकता शिक्षणाची सुरुवात बाळाच्या जन्माबरोबर होते! आपल्या सर्वांना माहीत आहे की बाई बाळंतीण होते, तेव्हा पहिला प्रश्न काय विचारते? श्रांत चेहऱ्याने, तोंडातून आवाज फुटायच्या आधी भुवया उंचावून ती डोळ्यानेच विचारते ‘काय झालं’? “मुलगा” हे शब्द ऐकायला कान टवकारून विचारलेला प्रश्न! कारण तिला वाटतं की मुलगा झाला तर आपल्याला उंच मानेने घरात जाता येईल. कौटुंबिक हिंसाचारातून तात्पुरती का होईना सुटका होईल, नाहीतर टोमणे आणि नालस्तीला सामोरे जावे लागेल. म्हणजे ते बाळ मुलगा म्हणून वाजतगाजत घरी येईल की मुलगी म्हणून गुपचूप पदराखालून येईल, पेढे वाटले जातील की नुसते नाक उडवले जाईल - हे सगळं आई आणि परिवारातील लोक बाळाला आपल्या वागण्यातून,कृतीतून शिकवतात. हेदेखील लैंगिकता शिक्षणच आहे! याचा अर्थच लैंगिकता शिक्षणाची सुरुवात जन्मापासून होते.
वैद्यकीय विद्यार्थ्यांना विचारलं की ‘तुमच्यापैकी कुणाला वयात येताना कोणते बदल होतात व ते का याबद्दल माहिती मिळाली होती का?’ तर बऱ्याच वेळानंतर एकदोन हात उठतात, ते सगळे मुलींचे हात असतात.
“मला आईने सगळंच उघडपणे सांगितले, कुठला पॅड वापरायचा आणि का ते पण सांगितले.”
“पण रक्तस्त्राव कुठून होतो, रक्त अशुद्ध नसतं वगैरे सांगितलं होतं का? बरं, तुमच्या पालकांनी गुड आणि बॅड टच (Good & Bad Touch) बद्दल माहिती दिली असणार ना?”
यावर सगळे मुलगे मुलींकडे पाहू लागले, जणू Bad Touch हा केवळ मुलींनाच होतो! खरंतर लहान मुली आणि मुलगे दोघांचेही लैंगिक शोषण सारख्याच प्रमाणात असू शकते. काही वेळा मुलग्यांचे शोषण फार काळपर्यंत लक्षातही येत नाही. मुली वयात यायला लागल्यावर तू असे कपडे नको घालू, इकडे उभी राहू नको, मुलांशी बोलू नको, अंगचटीस जाऊ नको असे सल्ले पालक मुलींना देतात. पण मुलगे लहान असताना कोणालाही तुझ्या अंगांना हात लावू देऊ नकोस, कुणीही घरात किंवा शाळेत तसा प्रयत्न केला तर न घाबरता सांग - असे आपण त्यांना बजावत नाही. शिवाय काही वेळा मुलांनी कुणाची तक्रार करण्याचा प्रयत्न केला तरी पालकांचा विश्वास बसतोच असे नाही. त्याही पुढे जाऊन त्यांना काही करता येतेच असे नाही. इथे मी दोन उदाहरणे देते, वस्ती आरोग्य केंद्रात कार्यरत असताना एक जरीकामगार महिला आपल्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन आमच्या वैद्यकीय समाजसेविकेकडे आली, तिचा ‘मुलगा तिला मारतो आणि सकाळी ती कामाला जाऊ लागली की शिव्या देतो.’ त्या महिलेला बाहेर थांबवून समाजसेविकेने त्याच्याशी थोडं बोलायचं ठरवलं. त्याने सांगितलं - “आई कामावर गेल्यावर माझा मामा मला सतत उचलून घेतो आणि मला खाली सोडतच नाही. मला तोच भरवतो, बाहेर खेळायला जाऊ देत नाही मी माझ्या आईला सांगितले पण ती माझं ऐकत नाही.” चेहऱ्यावर अत्यंत राग व रुसवा. त्या मुलाला बाहेर काही खाऊ देऊन बसवले आणि त्याच्या आईला आत बोलावून विचारले - “तुझ्या मुलाने तुला काही तक्रार केली का ?”
ती बाई हमसून रडत होती. ती म्हणाली, “एकदा अंघोळ घालताना त्याची पप्पुडी(पेनिस) सुजली होती आणि माझ्या मुलाने मला सांगितले की मामा दिवसभर पप्पुडीला चिमटीत पकडून ठेवतो आणि रडेपर्यंत सोडत नाही. मी माझ्या अम्मीला तक्रार केली, पण ती म्हणते, ‘माझा मुलगा तुझ्या कारट्याला दिवसभर संभाळतो, त्याचे लाड करतो. तलाकनंतर तुला तुझ्या मुलाबरोबर इथं राहू दिलं, तर तू माझ्याच मुलावर आळ घेतेस, जायचं तर दार खुलं आहे’ मॅडम मी कुठं जाऊ? कामावर नाही गेले तर काय खाऊ?” तिच्याकडे मार्ग नव्हता आणि आमच्याकडे उत्तर नव्हते.
दुसरी केस BMC च्या शाळेतली. मुंबईत BMC च्या १२०० शाळा आहेत. अगदी गरिबातली गरीब मुले या शाळांत येतात, त्यात मुलींची संख्या दुप्पट असते, कारण गरीब माणूस मुलीला BMC मराठी/हिंदीत पाठवून मुलग्याला खाजगी इंग्लिश शाळेमध्ये पाठवतात. बृहन्मुंबई महानगर पालिकेने २००३-४ मध्येच एक अत्यंत पुरोगामी पाऊल उचलले होते आणि प्रत्येक झोनमध्ये एक अशा सात अंतर्गत तक्रार समित्या स्थापन केल्या. एकदा समितीपुढे शाळेतल्या एका अत्यंत हुशार मुलीची केस आली. तिला आपण वर्षा म्हणू. नुकतीच वयात आलेली ही मुलगी घरातली सर्व कामे करून कोणत्याही क्लासला न जाता गणितात ९०% मार्क मिळवत होती. एक दिवस बातमी पेपरला वाचली की तिच्या शाळेतील एका शिक्षकाच्या तोंडाला काळे फासलेले कारण काही मुलांनी एका रविवारी त्या शिक्षकाला वर्षाबरोबर स्टेशनच्या बेंचवर बसलेलं पाहिलं होतं. पेपरमध्ये बातमी म्हटल्यावर ताबडतोब केस स्त्री संसाधन केंद्राला आली. मुलीला आम्ही भेटायला गेलो तर तिच्या पालकांनी तिला बिहारला आजोळी पाठवलेलं. त्या शिक्षकाला बोलावलं तर तो अगदी साळसूदपणे म्हणाला, “ती हुशार होती म्हणून मी तिला गणित इंग्लिशसाठी मदत करीन म्हटले. ती फार चाप्टर निघाली. ती मला नेहमी इशारे करायची. त्या दिवशी फोन करून मला म्हणाली की ‘तुम्ही स्टेशनवर भेटायला नाही आला तर मी जीव देईन’, म्हणून मी आलो - तर ती माझा हातच धरून बसली. मुलांनी आम्हाला स्टेशनवर बघितले आणि दुसऱ्या दिवशी लोकांनी येऊन मला बडवले व तोंड काळे केले.मला सस्पेंड केलंय. मी कोर्टात जाईन. मी लग्न झालेला गृहस्थ आहे, मला एक तान्ही मुलगी आहे. ती पोरगी चालू आहे!” तिथे ती मुलगी तर उपस्थित नव्हती. परंतु त्यांच्या शाळेतील एका शिक्षिकेने सांगितले की वर्षा शाळेला आलेली नसताना या शिक्षकाने एका चिटोऱ्यावर स्वतःचा मोबाईल नंबर लिहून दुसऱ्या एका मुलीला दिला आणि म्हणाला त्यांच्याच चाळीत तो ट्युशन घेणार आहे वर्षाला यायचे तर येऊ दे. वर्षासारख्या गरीब हुशार मुलीला या वयात जर कोणी म्हणाले, की ‘तू हुशार आहेस, बोर्डात येऊ शकतेस मी मदत करेन. मी तुझी फी घेणार नाही’ यावर ती मुलगी काय करेल? एक तर तिच्या वयात कौतुकाने हुरळून जाईल. दुसरे आपल्याला पैसे न घेता शिकवायला तयार झालेल्या शिक्षकाला देवदूत मानून कोणतीही शंका न घेता क्लासला जाईल. शिक्षक म्हणेल त्या गोष्टीला वर्षा तयार झाली असल्याचे नाकारता येणार नाही. शिवाय एखाद्या मुलीने जीव देते अशी धमकी दिली असताना त्याने पोलिसांनाही कळवले नव्हते! वयात येणाऱ्या मुलांच्या मानसिक, भावनिक बदलाच्या काळात त्यांना जाळ्यात ओढून घेणे सोपे असते. सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राने ‘मुलामुलींचा लैंगिकछळ’ ह्या विषयावर सर्व शाळांसाठी हिंदी आणि मराठीतून चार पोस्टरचे संच तयार केले आहेत. दर जून महिन्यात हे पोस्टर १२०० शाळांना नोटीस बोर्डला लावण्यासाठी देण्यात येतात.
 वयात येताना मुलगे आणि मुली यांच्यात शारीरिक, मानसिक व भावनिक बदल होत असतात. मुलींना पाळी आली की जननअंगाच्या स्वच्छतेबद्दल जुजबी माहिती तरी मिळते. मुलग्यांना मात्र कोणीच कसली माहिती देत नाही. वीर्यपतनाबद्दल नाही आणि जननअंगाच्या स्वच्छतेबद्दल तर मुळीच नाही. मुलगे या सर्वांबद्दल काळजी करीत असतात. मुलांना लैंगिक अवयवांची स्वच्छता शिकवली नाही तर ते किती मोठ्या अडचणीत सापडू शकतात त्याचं उदाहरण मला STD क्लिनिकमध्येच मिळालं. एका मुलाला अस्वच्छतेमुळे ‘फायमोसीस’ झाला, म्हणजे लिंगावरची त्वचा जंतुसंसर्गामुळे लिंगाला चिकटते आणि लिंगाला ताठरपणा येतो तेव्हा त्वचा मागे न सरकल्याने वेदना होतात. या मुलाने मित्राला जेव्हा सांगितले की लिंग उत्तेजित होताना दुखतंय तर तो त्याला म्हणाला, ‘अरे तुझं लग्न होईल तेव्हा तुझी फजिती होईल, तू थोडं सेक्स ट्राय कर!’ एक दिवस रात्री त्याला रक्तबंबाळ अवस्थेत हॉस्पिटलला आणलं, सेक्स ट्राय करताना त्याच्या लिंगावरची चिकटलेली त्वचा फाटली होती, इमर्जन्सी सुंता (Circumcision) करावी लागली होती. पुढे या मुलाच्या तीन महिन्या नंतरच्या चाचणीत एच.आय.व्ही. देखील डिटेक्ट झाला. अज्ञानाची किती भयानक किंमत! लोकांच्या मनातील भीती आणि गैरसमजाना घेऊन त्याला खतपाणी घालण्यासाठी गल्लीबोळात, रस्त्यावर किंवा व्हॅनमध्ये चाललेली सेक्सक्लिनिक खोटेनाटे प्रचार करतात. वर्तमानपत्रात जाहिराती असतात – ‘स्वप्नदोष, विर्यपतन, लिंगाचा वाकडेपणा यावर हमखास उपचार!’ खेडेगावात सुद्धा भिंतीवर अशा जाहिराती असतात. शिवाय असा समज असतो की लग्नानंतर सेक्सची सर्व माहिती असण्याची अवजड जबाबदारी पुरुषांची असते. मुलींना सेक्समधलं काही समजत नाही म्हणून त्यांना खूश करणे हे केवळ मुलावर असते! हे सेक्स ट्राय करणं  - फक्त मुलांसाठी! मुलींनी मात्र एकदम समर्पित प्रेमच करायचे!! आणि त्याची परिणती लग्नात झाली, तर बरं, नाहीतर ती वाया गेलेली मुलगी बनते. मुलींना सेक्सबद्दल माहिती नसावी आणि असली तरी त्याबद्दल कुणाला कळू द्यायचे नाही, कारण मुलींना ही माहिती असणं चांगली गोष्ट मानली जात नाही असे पालक मुलींना शिकवतात. पण मुलींनाही अनेक लैंगिकतेच्या मुद्यांवर कुतूहल असते. कॉलेजमध्ये मुलींच्या कडून हमखास येणारा प्रश्न असतो - हायमेन(योनिपटल) म्हणजे काय? आपला सेक्स आधीच झाला असेल तर नवऱ्याला कळते का? पालकांना मुलीचे लग्न उरकण्याची घाई असते, पण तिला लैंगिक संबंधाबद्दल काही सांगण्याची गरज वाटत नाही. मुलींना संबंधाबद्दल माहिती असण्याची गरज नाही पण गर्भानिरोधनाची जबाबदारी मात्र तिची! घरात देव धर्म असला तर पाळी पुढेमागे करायला तिला आले पाहिजे अशी माहेर-सासर दोन्हीकडून अपेक्षा!
शिक्षकांना पण गर्भनिरोधकाची माहिती मुलींना सांगण्याची ‘भीती’ वाटते! दर वर्षी आम्ही काही डिग्री कॉलेज मध्ये फायनल वर्षीच्या मुलींना ‘फॅमिली लाईफ’ची माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेतो. त्यात गर्भनिरोधक साधनांचे सत्र असते. त्यांना सर्व गर्भनिरोधक साधने हाताळायला देतो. कॉँडोमचे महत्त्व पुनःपुन्हा सांगतो. तेव्हा मुलींचे प्रश्न, विशेषत: कॉँडोम हाताळणे त्यांच्या शिक्षकांना अस्वस्थ करते. “डॉक्टर इतकं उघड उघड सगळं सांगू नका, या मुली या माहितीचा गैरवापर करतील नं! ” असे ते बऱ्याच वेळा बोलून दाखवतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसते! एक तर गर्भनिरोधकाचा गैरवापर होऊच शकत नाही, त्याचा फक्त उपयोग होऊ शकतो. गर्भनिरोधके नको असणारी गर्भधारणा रोखतात. लहान वयात नको असणारा गर्भ राहणं हे एक डिझॅस्टर होऊ शकते. आम्ही बऱ्याच वेळा कॉलेजेसना सांगितले की अशी सत्रे फक्त मुलींसाठी न ठेवता मुलग्यांसाठी पण असावीत. पण अजुन तसा विचार कोणी केला नाही!
आम्ही एका संस्थेसाठी वस्तीत एक लैंगिकता शिक्षणाचा कार्यक्रम करीत होतो. सत्र संपल्यावर, लता आमच्याजवळ येऊन म्हणाली, “ आई बोलावते”. तिचा आवाज थोडा मुलासारखा घोगरा वाटला.
लताची आई ३-४ घरची भांडी घासते, त्यांच्या छोट्याश्या खोलीत लताच्या बक्षिसाच्या कपांचा ढीग होता ती स्टेट लेवल कब्बडी चेम्पियन आहे. लता १८ वर्षाची आहे. अजुन पाळी नाही, ती मुलासारखेच कपडे वापरते, आवाज मुला सारखा येतो, केस कापलेत. लताची आई म्हणाली, “आधी काही वाटत नव्हते आता थोडं अवघड वाटतंय.” परंतु लोक काय म्हणतील म्हणून, डॉक्टरना दाखवलं नव्हतं. पालकांना ती मुलगीच राहावी असं वाटत होतं! तिची तपासणी केली तेव्हा तीचे बाह्यअंग साधारण मुली सारखं असलं तरी शरीरात गर्भाशय, अंडाशय नव्हते तर पुरुष बिजाशय अपरिपक्व अवस्थेत होते. तिचे समुपदेशन केले तेव्हा तिने सांगितलं कि ‘तिला मुलगाच होऊन रहायचं आहे.’ तिच्या पालकांचेही समुपदेशन केलं. संघटनेने पण ही केस अत्यंत संवेदनाक्षम पणे हाताळली, आणि पालकांची समजूत काढली. तसं बघायला गेलं तर बी.डी.डी. चाळीत अश्या व्यक्तिला इतक्या सहज स्वीकारलं गेलं नसणार. पण लताच्या स्वत:च्या कष्टामुळे , आईच्या हिमतीने आणि के ई एम च्या सोशल वर्करच्या मदतीने हे होऊ शकले.
आपल्या देशात गर्भ लिंग तपासणी आणि गर्भलिंग ओळख या विरुद्ध कायदा येऊन २७ वर्षे झाली तरीही, अजुनही चोरून- मारून( बेकायदा) गर्भलिंग ओळख केली जाते आणि असं करणारी मंडळी उच्चशिक्षित डॉक्टर. म्हणजे महिलानां, मुलीना कमी लेखण्यात उच्च शिक्षित काही मागे नाहीत. शिक्षणाने यांच्या हीन विचारात काहीच बदल नाही झाला आणि शिवाय डॉक्टर मंडळी या व्यापाराचे मुख्य सूत्रधार असतात ! म्हणून मेडिकलच्या विद्यार्थ्यांना लैंगिकतेचे नीतिशास्त्र (Ethics in Human Sexuality) शिकवणे आवश्यक असते.
मी शिकवताना शेवट असा करते की,
1) प्रत्येक मुलाला -मुलीला आपल्या शरीराबद्दल माहिती हवी आणि ती त्यांना मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि आपण डॉक्टरांनी त्यांच्याशी बोलायला पाहिजे.
2) वयात येताना मुलां-मुलींना गर्भनिरोधनाबद्दल माहिती देणं जीवनदायी (Life Saving) आहे.
3) आपल्या देशात कितीतरी महिलांना मुलगा झाला नाही म्हणून घरातून घालवून दिले जाते.मुलाचा गर्भ राहण्या न राहण्यामध्ये स्त्रीचा काही वाटा नाही, हे मुलामुलींना माहीत पाहिजे.
4) पाळीचं रक्त अशुद्ध नसतं, ते पूर्णपणे शुद्धच असतं, पाळी मागे पुढे करू नये. याबद्दल माहिती हवी. पाळीची स्वच्छता, कापड किंवा पॅड वापरले तरी दिवसातून कमीत कमी ३-४ वेळा बदलावेत, मायांगाची स्वच्छता साबण व पाण्याने दिवसातून दोन वेळा तरी व्हावी.
5) मुलींना पाळी येते तसे मुलग्यांमध्ये वीर्यस्खलन होते, त्यामध्ये कोणताही दोष नाही.उपचारांची गरज नाही, हे मुलांना आणि सर्व काही विसरून गेलेल्या पालकांना माहीत पाहिजे,जे सांगणे आपले कर्तव्य आहे .
6) चांगला आणि वाईट स्पर्श याची जाणीव करून देणे, कोणाला सांगू शकता, त्यात तुमची काही चूक नसते, हे मुलांना माहीत पाहिजे
7) मुलगी आणि मुलगा असा भेद करून, गर्भलिंग ओळख करणे बेकायदेशीर आहे, तसं करणाऱ्या डॉक्टरची गय करू नये. तसेच आपल्या मुलांमध्ये असा भेद करून मुलींना शिक्षणात मागे ठेवणे अमानवीय आहे. मुला मुलींना घरातली व बाहेरची कामे शिकवावीत.
8) स्त्रीपुरुष संबंधात प्रेम आणि विश्वास महत्त्वाचा, हे संबंध परस्पर अनुमती आणि आदराचे असणे आवश्यक आहे. म्हणूनच एकमेकांच्या सुरक्षेची जवाबदारी घेणे हेच विश्वासाचे प्रतिक आहे. एकमेकांपासून काही रोग पसरू नये, आपल्यामुळे त्या व्यक्तीला इजा होऊ नये हे पाहणं म्हणजेच प्रेम. 

या सर्व गोष्टी वयात येणाऱ्या मुलां-मुलींना सांगणे, हा लैंगिक शिक्षणाचा भाग आहे.


    

डॉ. कामाक्षी भाटे