महिला पशुपालकांचे पर्यावरण संरक्षणातील योगदान


ज्याप्रमाणे ‘शेतकरी’ या शब्दाबरोबर नांगर धरलेल्या पुरुषाची प्रतिमा मनात येते, अगदी त्याचप्रमाणे ‘पशुपालक’ या शब्दाबरोबर गायींच्या कळपामध्ये उभा राहून पावा वाजवणाऱ्या कृष्णाची प्रतिमा मनात येते!
आपल्या देशात ८० टक्के शेतीची कामे महिलांकडून केली जात असली तरीही महिलांना ‘शेतकरी’ म्हणून ओळख मिळू शकलेली नाही. अगदी त्याचप्रमाणे पशुपालनातील महिलांच्या सहभागाचीही दखल घेतली गेलेली नाही. गेल्या 25 वर्षांपासून राजस्थानात रायका ह्या पशुपालक समूहासोबत काम करणार्‍या इल्सा कुलर रोलेफ्सन म्हणतात, ‘Women are the invisible guardians of animal diversity’. या महिलांच्या अस्तित्त्वाबद्दलच जाणीव नसल्यामुळे बदलत्या काळातल्या त्यांच्या गरजा, समस्या यांच्याकडेही दुर्लक्ष होत आलेले आहे. त्याचा परिणाम म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. ‘फूड अँड अॅग्रिकल्चरल ऑर्गनाइज़ेशन ऑफ यूनायटेड नेशन्स’(FAO) चा अहवाल असे सांगतो की जगातल्या एकूण पशुपालकांपैकी दोन तृतीयांश महिला आहेत. या महिलांना सक्षम केले तर पर्यावरणाच्या संवर्धन आणि संरक्षणाच्या दृष्टीने मोठा उपयोग होऊ शकतो असे FAO च्या या अहवालात म्हटलेले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या देशातली आणि राज्यातली परिस्थिती समजून घेऊया.
आपल्या देशात पर्यावरणाचे संरक्षण आणि पशुपालन यांचा परस्परसंबंध दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालला आहे. एकीकडे बदलत्या राजकीय वातावरणात गोवंशहत्याबंदीचे कायदे होत आहेत; त्याचवेळी जंगलात गुरांना चरण्यासाठी देखील कायद्यानुसार बंदी आहे. शहरातल्या लोकांना फक्त मोठमोठ्या गोठ्यांमध्ये बांधलेल्या गायीम्हशीच माहीत असतात. पण अजूनही निमशहरी भागातील रस्त्यांवरून शेळ्या-मेंढ्या आणि गायीगुरांचे कळप घेऊन भटकंती करणारे लोकदेखील सहज बघायला मिळतात. जंगलात जाऊन चरणाऱ्या गुरांमुळे पर्यावरणाचे नुकसान होते – अशीही एक समजूत असते. पण सजल कुलकर्णी म्हणतात की – “ जर एकाच क्षेत्रात सलगपणे चराई केली तर जंगलांवर दुष्परिणाम होतात. पण धनगर, रब्बारी, बंजारा यासारखे समूह सतत फिरत असतात, त्यांचे वर्षभराचे ठराविक मार्गांनी जाण्याचे कॅलेंडर असते. आपल्या मार्गावर असलेल्या रानात ते गुरे चरायला सोडतात. गुरांचे शेण जंगलात पडते. त्याचा झाडांना फायदा होतो. यांच्या मागोमाग हरणे, निलगायी, चिंकारा इ. प्राणीसुद्धा फिरतात.” - महाराष्ट्रातल्या भटक्या पशुपालकांचे जीवन, त्यांच्या फिरतीचे मार्ग, पशुधनाची बाजारपेठ आणि या सर्वांचा पर्यावरणाशी असलेला संबंध याचा सजल कुलकर्णी अभ्यास करतात. भटक्या पशुपालकांची जीवनपद्धत पर्यावरणपूरक असते, असे त्यांना वाटते. हे समूह पशुधनाचे संवर्धन करून दूध, मांस, कातडे, लोकर याशिवाय शेतीसाठी बैलशक्ती आणि शेणखत, लेंडीखत पुरवतात. “आपल्या देशातल्या दूध आणि मांसाच्या उत्पादनात या समाजाचा मोठा वाटा आहे. ढोबळ आकडेवारी प्रमाणे भारतात भटक्या पशुपालकांचे एकंदर आर्थिक योगदान हे 35 हजार कोटी आहे” असेही सजल कुलकर्णी यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार मानवी इतिहासात शेती आणि पशुपालन विकसित होण्यात महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे.
याचे उदाहरण म्हणून त्यांनी काही पशुपालक समाजातील महिलांची दिनचर्या सांगितली - “ ढेबरिया रब्बारी महिलाची दिनचर्या बघितली तर या सकाळी चारला उठतात मेंढ्यांची कोकरं, वाडा यांची सोय लावली की स्वतःच्या परिवारासाठी पाणी आणणे, स्वयंपाक करणे आणि मेंढ्या चरायला जाण्याआधी सगळ्या परिवाराची न्याहारी करणे इतकी कामे या महिला तीन तासात करतात कारण सात वाजता मेंढ्या चरायला निघायला हव्या कारण आपण दुसर्‍याच्या शेतात राहतो.” धनगरांच्या डेऱ्यावरचे घोडे, कुत्रे, मेंढ्यांची कोकरे यांच्यापासून घरची लहान मुलं या सगळ्यांची काळजी आणि यांची जोपासना करण्याचे निर्णय आणि नियोजन हेदेखील महिलाच करतात असेही कुलकर्णी यांचे निरीक्षण आहे. त्यांना पिढ्यानपिढ्या आपल्या आई, आजीकडून पशुधनाच्या संवर्धनाचे अनुभवजन्य ज्ञान मिळालेले असते. या ज्ञानाचा उपयोग करून गावोगावी पशुसंवर्धनाचे काम करणाऱ्या मुद्रिकाबाई मुंढ, शालनबाई निमसरकर, राजाबाई राठोड सारख्या अनेक महिलांची ते उदाहरणे देतात. अशा महिलांच्या मेहनतीमुळे स्थानिक हवामानात तग धरून राहणाऱ्या अनेक प्रजाती टिकून राहिलेल्या आहेत.
 म्हणजेच जैवविविधता टिकवून धरण्यात या महिलांची महत्त्वाची भूमिका असते. अनेक समूहामध्ये दूध काढणे ही देखील महिलांचीच जबाबदारी असते.याशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी संपूर्ण बिऱ्हाड बांधण्याचे कौशल्य महिलांकडेच असते. 
परंतु फिरस्तेपणाच्या जीवनशैलीमुळे या महिलांना धोका देखील असतो. त्या असुरक्षित असतात आणि  प्रसूती , मासीकपाळी विषयीच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवरही त्यांना मदत मिळत नाही. अनेकजणींची बाळंतपणं जंगलात, शेतात इ. असुरक्षित वातावरणात होतात. करोनाच्या प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाउनचा या स्त्रियांवर बराच विपरीत परिणाम झाला. कारण जिल्हाबंदीमुळे त्यांना एकाच ठिकाणी अडकून पडावं लागलं. अनेक गावांच्या आत शिरायला बंदी केल्याने दूधविक्री करता आली नाही. दळणवळणावर बंदी असल्यामुळे विक्रीसाठी तयार केलेली जनावरं बाजारात नेऊन विकता आली नाहीत. ह्या जनावरांच्या व्यवस्थापनाचे, पालनपोषणाचे काम वाढले. तरीही, या समूहांनी आपल्या वर्षानुवर्षांच्या अनुभवांवर आणि पारंपरिक ज्ञानाच्या बळावर या समस्येवर मार्ग शोधले. सजल कुलकर्णी सांगतात की जनावरांच्या रोगाच्या साथी येणे हे या समाजाला नवीन नाही आणि त्यावर त्यांच्याकडे पारंपरिक क्वारंटाईन सदृश उपायदेखील आहेत. आधुनिक जगातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करण्याचे हे कौशल्य नक्कीच वाखणण्यासारखे आणि अंगीकारण्यासारखे आहे. पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीतले पशुपालक महिलांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना नियोजनात सामील करून घेणे गरजेचे आहे.

पर्यावरणाच्या साथी - परिसर भगिनी

पर्यावरण विषयक समस्यांमध्ये ‘कचरा’ ही एक महत्त्वाची समस्या असते. वाढत्या शहरीकरणासोबत कचर्‍याची समस्या वाढतच गेली आहे. महाराष्ट्रात रोज २२,५०० टन हून अधिक घनकचरा निर्माण होतो. यापैकी ५०% कचरा मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांमधून निर्माण होतो. जास्त उत्पन्न गटातले लोक जास्त कचरा निर्माण करतात. या कचऱ्याची विल्हेवाट लावतानाही पर्यावरणाचे प्रदूषण वाढायची शक्यता असते. म्हणून कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्यावर योग्य प्रक्रिया करणे गरजेचे असते. कचरा वेचणारे लोक हेच काम करतात. त्यांचे स्थानिक अर्थव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य याबाबतीत मोठे योगदान असते. पण बरेचदा आपल्याला त्याबद्दल जाणीव नसते. अजूनही कचरावेचक हा समाजातला सर्वांत उपेक्षित घटक राहिलेला आहे. अनेक मध्यमवर्गीय लोकांना वाटते की हे लोक चोरीच्या उद्देशाने फिरत असतात किंवा ते रस्त्यावर कचरा पसरवून ठेवतात. पण नवी मुंबईत अनेक वर्षांपासून कचरावेचक महिलांसोबत काम करणार्‍या वृषाली मगदूम म्हणतात – “ या महिलांचा शहराच्या स्वच्छतेत खूप मोठा वाटा आहे. जरी या महिला कचरा गोळा करून त्यातून पैसे मिळवत असल्या तरी त्या पर्यावरणाच्या रक्षणाचं कामच करत असतात.”
शहरात जी वेगवेगळ्या प्रकारची अनौपचारिक कामं केली जातात त्यात कचरा वेचणे हे सगळ्यात खालच्या दर्जाचे काम मानले जाते. ज्यांना रोजगाराचे इतर कुठलेच साधन उपलब्ध नसते असे गरीबातले गरीब आणि जातीच्या उतरंडीतले सर्वात खालच्या पायरीवरचे लोक हे काम करतात असे WIEGO (Women in Informal Employment : Globalizing and Organizing) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पाहणीत आढळले आहे. भारतात कचरा वेचण्याचे काम करणाऱ्यांमध्ये ९०% महिला आहेत. गेल्या काही वर्षांपासून काही शहरांमध्ये विविध संस्था या महिलांसोबत त्यांच्या समस्यांवर काम करू लागल्या आहेत.
मुंबईत १९९८ साली स्त्रीमुक्ती संघटनेने कचरावेचक महिलांचे सर्वेक्षण केले होते तेव्हा त्यांना असे दिसून आले की बहुतेक सर्वजणी दलित समाजातील आहेत. त्या अत्यंत भयानक परिस्थितीत दारिद्र्य रेषेखालचे वंचित आयुष्य जगत होत्या. त्यांना निरक्षरता, अनारोग्य, बालविवाह, कर्जबाजारीपणा, फसवणूक अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने स्त्रीमुक्तिसंघटनेने मुंबईतील कचरावेचक महिलांना संघटित करून ‘परिसर विकास’ उपक्रम सुरू केला. आता या उपक्रमाचा विस्तार नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांतही झाला आहे. गेल्या वीस वर्षात संघटनेने नवी मुंबईतील ७०० कचरा वेचक महिलांना संघटित केले असून त्यांना ‘परिसर भगिनी’ अशी ओळख मिळाली आहे. या महिलांना महापालिकेकडून ओळखपत्र दिले जाते. या महिलांना कामात सामावून घेणारी नवीमुंबई महानगर पालिका एकमेव पालिका आहे असं नवी मुंबईतील परिसर विकास उपक्रमाच्या समन्वयक वृषाली मगदूम यांनी सांगितलं. गेल्या वीस वर्षातल्या कामाची वाटचाल सांगताना त्या म्हणतात – “या महिलांना संघटनेने ओल्या कचर्‍यापासून खत तयार करायचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांचे स्वयंसहायता गट बनवून त्या गटांची ‘परिसर सखी विकास संस्था’ नावाची फेडरेशन उभारली आहे. यात कचरा वेचक बायकांचीच लीडरशिप आहे आणि स्त्रीमुक्ति संघटना मार्गदर्शन करते. सध्या रुक्मिणी पॉल ही कचरावेचक महिला ह्या फेडरेशनची अध्यक्ष आहे. तिच्यात उत्तम नेतृत्वगुण आहेत. हिशोबासहित संस्थेची सगळी कामं ती बघते. दूरदर्शनवर ‘हॅलो सखी’ कार्यक्रमातही ती सहभागी झाली होती.
रुक्मिणी पॉल 
आम्ही या महिलांमध्ये नेतृत्व आणि इतर गुण तयार होण्यासाठीदेखील प्रशिक्षण देतो. रेशनसारख्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठीही आम्ही त्यांना तयार करतो. पूर्वी अक्षरओळख नसलेल्या अनेक बायका आता सही करू लागल्या आहेत. आता त्या महापालिकेच्या माध्यमातून सोसायटी मध्ये काम करायला लागल्या आहेत. त्यांना त्याबद्दल मानधन मिळतं. त्या खूप लांबून कामासाठी येतात म्हणून सोसायटी कडून प्रवासखर्च पण मिळतो.” हल्ली लॉकडाउनमुळे दोन महीने काम बंद होतं तरीही त्यांना मानधन देण्यात आलं याबद्दल वृषाली यांनी आवर्जून उल्लेख केला.
कचरावेचक महिलांच्या कामाविषयी जास्त तपशीलवार माहिती देताना वृषाली मगदूम यांनी संगितले की – “सध्या या महिला विविध हाऊसिंग सोसायट्यातून कचरा घेतात आणि ओल्या,सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण करतात. जो कचरा रीसायकल होऊ शकत नाही असा - बिस्किटांच्या पाकीटाची आवरणे वगैरे सारखा कचरा वेगळा करून निर्मिती करणार्‍या कंपन्यांना परत दिला जातो. ओल्या कचर्‍याचं खत बनवतात. त्याबद्दल त्यांना मानधन मिळते. रोज 500 किलो ओल्या कचर्‍याचं खत केलं जातं. त्यामुळे तो कचरा बाहेर डंपिंगग्राऊंडवर जात नसल्याने महापालिकेचा ट्रान्सपोर्ट खर्च वाचतो. त्याशिवाय वस्तीपातळीवर दारोदार फिरून त्या 2000 घरांचा कचरा जमवतात आणि त्याचेही वर्गीकरण करून खत बनवतात. काही महिला पहाटे 4.00 वाजता डंपिंगग्राऊंडवर जाऊन कचरा वेगळा करतात. प्लॅस्टिक, कागद इ. कोरडा कचरा विकून पोट भरतात. तिथे त्यांना पाण्याची आणि टॉयलेटची बेसिक सुविधा तरी मिळायला पाहिजे! एकेक महिला रोज 25 किलो कचरा पाठीवर घेऊन येते. असा कचरा विकत घेणारे काटेवाले असतात. तुर्भेला बरेच काटेवाले आहेत. कारण डंपिग ग्राऊंड जवळ आहे. पण या काटेवाल्यांकडून सुध्दा त्यांची फसवणूक होते. म्हणजे जर त्याने दोन रुपयांना प्लॅस्टिक विकत घेतला तर तो दहा रुपयांना विकतो. हे काटेवाले गरजेनुसार कर्जपण देतात आणि मग त्यातूनही या महिलाचं शोषण होतं. या सगळया महिला झोपडपट्टी मध्ये राहतात. बहुतेक सगळी घरं महिलाच चालवत आहेत. या महिलांमध्ये अनेकजणी एकल पालक आहेत. ज्यांना नवरे आहेत त्यापैकी बरेच दारूडे आणि संशयी आहेत. त्या महिलेने आणलेले पैसे बळकावून, त्याची दारू पिऊन तिचाच संशय घेऊन मारहाण केली जाते. अशा परिस्थितिमध्ये त्यांना आरोग्याच्याही अनेक समस्या असतात. कचऱ्यात काम करत असल्यामुळे त्यांना डोळयाचे विकार होतात; तसंच श्वसनाचे विकार असतात, अनेकींना कायमस्वरूपी खोकला असतो आणि त्वचारोगांचंही बरंच प्रमाण असतं. सतत वाकून काम करण्यामुळे आणि ओझं उचलून चालत राहावं लागल्याने मणक्यांचे आजारही होतात. यासाठी वस्ती पातळीवर जाऊन महिलांशिवाय त्यांच्या संपुर्ण कुटुंबाची डॉक्टर्स कडून तपासणी करून औषधोपचार केले जातात. त्याकरता एलअँडटी कंपनीने मोबाईल व्हॅन दिलेली आहे. प्रत्येक वस्ती मध्ये महिन्याला एकदा अशी पनवेलपर्यंत ती व्हॅन जाते. पनवेल मध्येही आपण 500 महिलांबरोबर काम करतो. काही क्रिटीकल केसेस डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये भरती केल्या जातात. तिथे फीमध्ये सवलत मिळते. नुकतीच एका महिलेची बायपास सर्जरी मोफत झाली आणि तिच्या औषधांचा खर्च करायला एक एन.जी.ओ. पुढे आली. असे अनेकांच्या सहकार्याने हे काम सुरू आहे. डॉ. रामास्वामी सारख्या आय.ए.एस. अधिकार्‍यांची आम्हाला सगळयाच बाबतीत खूप मदत झाली आहे.”
वृषाली मगदूम
वृषाली मगदूम यांनी 2000 साली नवी मुंबईतल्या डम्पिंगग्राऊंडवर जाऊन एकेका कचरावेचक महिलेशी बोलून त्यांच्या परिस्थितीचा सर्व्हे केला होता. तेव्हा त्यांचं भयाण आयुष्य बघितल्यानंतर त्यांना या महिलांसोबत काम करायची प्रेरणा मिळाली. “त्याकाळी अनेकजणी आपल्या मुलांना पण डंपिंगग्राऊंडवर आणत असत. पण आता स्त्रीमुक्तीसंघटनेच्या प्रयत्नामुळे त्या मुलांना आणत नाहीत. संघटनेने इथल्या मुला-मुलींच्या शिक्षणावरही खूप लक्ष दिले आहे. 2000 साली जेव्हा आम्ही काम सुरू केलं, तेव्हा त्यांच्याकडे मुलांचे जन्म दाखलेही नव्हते. त्यांची आई अंदाजाने सांगायची की अमुक दिवशी त्यांचा जन्म झाला त्याप्रमाणे शाळेत घातले जाई. पण आता सर्व मुला मुलींकडे जन्म दाखले असतात. साताठ वर्षांपासून प्रत्येक वस्तीमध्ये अभ्यास वर्ग सुरू आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्याला अभ्यास वर्गासाठी शाळेची खोली दिली आहे. तिथे आपण स्थानिक शिक्षक नेमतो. गॅलेक्सी नावांची कंपनी आहे ती या शिक्षकांच्या पगाराचा खर्च उचलते. नेरूळला राधाकृष्ण नावाचे गृहस्थ आहेत त्यांनी या वर्षी 180 मुलांची फी भरली. दरवर्षी अनेकजण दहावी, बारावी होतात. आता मुलीसुध्दा खूप शिकल्या आहेत. बरीच मुलं-मुली उच्च शिक्षण घेता आहेत. एक मुलगा पी.एच.डी करतो आहे. काही इंजिनिअर झाले आहेत, काही फार्मसीला आहेत.” – हे सांगताना त्यांना खूप अभिमान वाटतो. स्त्री-मुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती म्हापसेकर यांनी कचरा वेचक महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी अशी विनंती अधिकाऱ्यांकडे केली आहे.
एकीकडे या महिलांच्या कामाचं स्वरूप सुलभ व्हावं यासाठी संघटना प्रयत्न करते पण त्यांनी या कामातून बाहेर पडायला पाहिजे हे स्त्रीमुक्ती संघटनेचं मोठं उद्दीष्ट आहे. जागरूकता, प्रशिक्षण आणि आत्मनिर्भरतेद्वारे कचरा व्यवस्थापनातील समस्या सोडविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून या महिलांना हातगाडया दिल्या आहेत आणि काही महिला आता संध्याकाळच्या वेळी 3-4 तास भाजी विकतात, चणे शेंगदाणे किंवा चहा विकतात. नवी मुंबईतील सर्व विभागांतील सफाई कामगारांसाठी कचरा व्यवस्थापन व व्यसनमुक्ती अशा विषयांवर प्रशिक्षणही सुरू असते. साधारण अशाच प्रकारचे काम पुण्यातली कागदकाचपत्राकष्टकरी पंचायत देखील ‘स्वच्छ सहकारी संस्थे’ द्वारे करते आहे. बंगळुरू आणि हैदराबाद मधील काही संस्था देखील कचरावेचक महिलांना थोडेफार हक्क मिळवून देण्यात यशस्वी झाल्या आहेत. पण कचरा गोळा करणार्‍या लोकांच्या कामात सुलभता यायला हवी असेल आणि त्यांचे त्रास कमी व्हायला हवे असतील तर कचरा निर्माण करणार्‍या लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे.

मुंबईतील स्त्रीमुक्तिसंघटना आणि पुण्यातील स्वच्छ सहकारी संस्थेच्या कामाला मदत करायची असेल तर https://streemuktisanghatana.org/covid19-donate/ आणि https://fundraisers.giveindia.org/nonprofits/kashtakari-panchayat-trust ह्या लिंकवर आर्थिक सहाय्य करता येईल.


पर्यावरणाच्या रक्षणाचे काम करणाऱ्या कचरावेचक महिलांच्या विषयीचा हा लेख - डॉ. सीमा घंगाळे आणि प्रणित गिरकर यांनी घेतलेली वृषाली मगदूम यांची मुलाखत आणि इंटरनेट वरील पूरक माहिती यावर आधारलेला आहे.


स्त्रिया, समाज आणि पर्यावरणीय स्त्रीवाद


बरेचदा असा अनुभव येतो की ज्याविषयी आपण प्रदीर्घ काळ अनभिज्ञ किंवा गोंधळलेले असतो ते कुठल्याशा क्षणी अचानक आरशासारखे स्वच्छ आणि स्पष्ट दिसू लागते. असे नवा दृष्टीकोन देणारे क्षण एखाद्याच्या विचारामध्ये मूलभूत बदल घडवत असतात. साधारणपणे तीस वर्षांपूर्वी भारतीय स्त्रीवादी चळवळीमध्ये अग्रेसर असणाऱ्या छाया दातार यांसोबत अनौपचारिक गप्पा सुरू असताना असाच एक क्षण मी अनुभवला. पर्यावरणविषयक साहित्याबाबतच्या या चर्चेत निसर्ग आणि स्त्रियांमधील नाते, छाया दातार यांनी त्यांच्या खास शैलीत त्यांच्या स्वतःच्या तसेच त्यांची ज्येष्ठ मैत्रीण प्रा. मारिया मीएस यांच्या कामाचा आधार घेऊन उलगडून सांगितले. त्यांची मांडणी इतकी बिनतोड होती की त्यांनी सांगितलेली इकोफेमिनीझमची तत्वे माझ्या तात्विक समजेचा एक महत्वाचा घटक बनली. मला त्याचा उपयोग केवळ स्त्रीविषयक प्रश्नच नव्हे तर समाज आणि पर्यावरण यांचे एकमेकांशी असणारे नाते, त्यामधील बारकावे आणि विविध छटा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी झाला. मी प्रस्तुत लेखामध्ये या संबंधांविषयी काही प्राथमिक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे करताना मी प्रामुख्याने पर्यावरणीय स्त्रीवादावर विपुल प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा आधार घेतला आहे. 
पर्यावरणीय स्त्रीवादामधील मुख्य सिद्धांतानुसार स्त्रिया आणि निसर्ग हे एकमेकांशी नुसतेच जोडलेले नाहीत तर त्यांच्यात सामाजिक आणि जैविक संबंधांची अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीची गुंफण आहे. यामधील पहिले नाते हे स्त्रियांच्या मूल जन्माला घालण्याच्या जबाबदारीशी म्हणजेच जैविक घटकाशी स्पष्टपणे संबंधित आहे. स्त्री दीर्घकाळ गर्भ धारण करते ज्यामध्ये प्राथमिक अवस्थेतील गर्भापासून ते मूल जन्माला येईपर्यंतचा काळ समाविष्ट असतो. शारीरिक पुनरुत्पादन अथवा पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेतील स्त्रीची ही भूमिका तिला या महत्वाच्या नैसर्गिक घटनेच्या केंद्रस्थानी आणून ठेवते. मानवी समाजाच्या सभोवताली असणाऱ्या विविध नैसर्गिक घटकांची स्थिती आणि गुणवत्ता ही जरी संपूर्ण समाजासाठी महत्वाची असली तरीही ती माता आणि गर्भाच्या दृष्टीने अधिक महत्वाची आणि निर्णायक ठरते. यामागचे कारण असे की ही दोघंही अत्यंत संवेदनक्षम असतात आणि सभोवतालच्या परिस्थितीतील बदलांचा त्यांच्यावर भला-बुरा परिणाम सर्वप्रथम होत असतो. उदाहरणादाखल, पाण्याच्या प्रदूषणाबद्दल समाज बेपर्वा असल्यामुळे सगळ्यांच्या आरोग्याला जरी धोका निर्माण होत असला तरीही, या स्त्रिया आणि तिच्या पोटातील बाळ हे या प्रदूषणाचे सर्वात आधी आणि सर्वात वाईट बळी ठरतात. 

शारीरिक पुनरुत्पादनाच्या पलिकडेही स्त्रिया सामाजिक पुनरुत्पादनाची प्रचंड मोठी जबाबदारी विविध मानवी संस्कृत्यांमध्ये युगानुयुगे निभावत आल्या आहेत. येथे, सामाजिक पुनरुत्पादन ही संज्ञा जगणे व उपजिविका यासंबंधातील विविध कामे अशा अर्थाने वापरली आहे. यामधे, लहान मुले आणि वृद्धांच्या काळजीसह कुटुंबाच्या रोजच्या जगण्याशी निगडित कामे, आव्हानात्मक परिस्थितीत तगून राहण्यासाठी निभवाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या तसेच कुटुंबासंबंधातील इतर अनेक जबाबदाऱ्या सांभाळणे या साऱ्यांचा समावेश होतो. स्त्रियांवरच्या या साऱ्या जबाबदाऱ्या त्यांना निसर्गाच्या किंवा भवतालाच्या (म्हणजेच पर्यावरणाच्या) अगदी जवळ घेऊन जातात, आणि नेमकी हीच गोष्ट पर्यावरणीय स्त्रीवादाच्या दृष्टीने अभ्यासविषय म्हणून महत्वाची मानली आहे. ग्रामीण भागामध्ये पाणी भरण्यापासून तर लहान मुले आणि वयस्कर माणसांची काळजी घेण्यापर्यंत, आणि प्रसंगी त्यांच्याकडे असणाऱ्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे वनौषधी गोळा करून आजाऱ्यांवर औषधोपचार करण्यापर्यंतची ही सारी कामे स्त्रिया सातत्याने करीत असतातच. परंतू, अगदी मुंबईतही मी अशा एका साठ वर्षीय महिलेस ओळखतो जी कोविड-साथीच्या काळात बाजारात गर्दीच्या ठिकाणी जाऊन घरातील व्यक्तींसाठी दूध आणि भाजीपाला आणण्याचे अत्यंत धोक्याचे काम निडरपणे करते आहे.

या चर्चेमध्ये यापुढे जाण्याआधी दोन मुद्द्यांबद्दल स्पष्टता आणणे आवश्यक आहे. प्रथमतः मला याची जाणीव आहे की काही स्त्रीवादी विचारवंतानी सामाजिक पुनर्निर्मितीमध्ये स्त्रियांच्या असणाऱ्या या महत्वाच्या भूमिकेचे रोमांटिसायझेशन करण्यातील धोके अधोरेखीत केले आहेत. मला त्यांचे म्हणणे पटते. यातील पहिला धोका असा की अशा प्रकारच्या रोमांटिसायझेशनमुळे स्त्रियांचे उद्दात्तीकरण केले जाते ज्यामध्ये सामाजिक पुनरुत्पादनाच्या स्त्रियांवर पडणाऱ्या अतिरेकी ओझ्याचे समर्थन अनुस्यूत असते. परिणामी, या ओझ्यामुळे स्त्रियांना झेलाव्या लागणाऱ्या कष्ट, हालअपेष्टा, आणि परावलंबित्व याकडे (हेतूपुरस्सर?) दुर्लक्ष केले जाते. दुसरे म्हणजे, स्त्रिया आणि निसर्ग यांच्यातील परस्परसंबंधांची मांडणी अर्कवादी (इसेन्शिअलीस्ट) भूमिकेतून करण्यावर काही विचारवंतांनी रास्त शंका उपस्थित केल्या आहेत. ही अर्कवादी भूमिका, स्त्रियांमध्ये असे काही निसर्गदत्त आणि जैवशास्त्रीय गुणधर्म असल्याचे मानते की जे समाजव्यवस्थेने त्यांना दिलेले नसतात आणि अश्या निसर्गदत्त नात्याद्वारे स्त्रिया निसर्गाशी जोडलेल्या असतात. अशा प्रकारचा अर्कवाद स्त्रियांवर असणारी शारीरिक पुनरुत्पादनाची जबाबदारी आणि त्यातून येणारे ओझे याची योग्य ती दखल घेण्याचे नाकारतो आणि त्यास निसर्गदत्त काम किंवा नशीबाचा भाग (फेट-अकम्पली) समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणूनच स्त्रियांच्या शारीरिक आणि सामाजिक पुनरुत्पादनाच्या जबाबदाऱ्यांची चर्चा करताना या दोन मुद्द्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

कोविड साथीच्या काळामध्ये धैर्याने तोंड देणाऱ्या स्त्रिया आणि पाण्याच्या प्रदुषणाचा गर्भवती स्त्रियांवर होणारा परिणाम ही याआधी सांगितलेली उदाहरणे पर्यावरणीय स्त्रीवादाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या चिंतेला अधोरेखीत करतात. सर्वच मानवी समाजांनी पिढ्यांपिढ्या तगून राहण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक वाढीसाठी लागणाऱ्या सर्व भौतिक संसाधने आणि ऊर्जेच्या साधनांचा स्रोत म्हणून निसर्गाचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे जगण्यासाठीचे आणि आर्थिक वाढीसाठीचे उपक्रम करताना त्यातून निर्माण होणारा टाकाऊ माल व कचरा टाकण्यासाठी देखील निसर्गाचा वापर उकीरडा म्हणून केला जात आहे. मात्र, साधारण चार शतकांपूर्वी झालेल्या औदयोगिक क्रांतीने मानव आणि निसर्गामध्ये असणाऱ्या दुहेरी नात्यामध्ये संपूर्णतः परिवर्तन घडवून आणले. परिणामतः, प्रामुख्याने गेल्या दोनशे वर्षांमध्ये स्रोत आणि उकिरड्याची जागा अशा दोन्ही स्वरूपात नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्याच्या पद्धती आणि अशा वापराचे प्रमाण यात पराकोटीचे बदल झाले आहेत. त्यामुळे निसर्गाचा वापर केवळ जगण्यापुरता व वाढीपुरता मर्यादित न राहता उपभोग व चैन-ऐषोआरामासाठी केला जात आहे. आता आपण केवळ स्थानिक जंगले उध्वस्त करणे आणि स्थानिक जल-संस्था प्रदूषित करण्यापुरते समर्थ राहिलो नाहीत तर आपल्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे आपल्या भोवतालच्या पर्यावरणाला आकार देणाऱ्या मुलभूत नैसर्गिक प्रक्रियांमध्ये मानवाच्या कारवायांमुळे अडथळा येतो आहे. म्हणूनच निसर्गामध्ये होणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या हस्तक्षेपांमुळे विविध प्रकारचे प्रतिकूल परिणाम पर्यावरणावर व मानवी समाजावर होताना दिसतात. विविध प्रकारचे प्रदूषण आणि कोवीड सारखे रोगकारक विषाणू निर्माण होणे हा याच दुष्परिणामांचा एक भाग असल्याचे मानणारा एक मोठा वर्ग आहे.

लेखामध्ये आधी म्हटल्यानुसार, सामाजिक पुनरुत्पादनाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्त्रियांना आघाडीवर राहून सभोवतालच्या निसर्गाशी झगडावे लागते. परिणामी, निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेले दुष्परिणाम सर्वप्रथम व मोठ्या प्रमाणात स्त्रियांना भोगावे लागतात. वर दिलेल्या उदाहरणातील ६० वर्षीय महिलेच्या धैर्यातून, विशेषतः प्राणघातक कोविड आजाराच्या साथीमध्ये ती पत्करत असलेल्या धोक्यातून हे ठसठशीतपणे दिसते. त्याचप्रमाणे जंगलांचा विनाश आणि भूगर्भातील पाण्याचा अनिर्बंध उपसा झाल्यामुळे दुर्मिळ झालेले सरपण किंवा पाणी मिळविण्यासाठी संपूर्ण दिवस रानामध्ये वणवण फिरण्याची वेळ आलेल्या ग्रामीण महिलेच्या दिनक्रमातूनही ही बाब तितक्याच प्रकर्षाने जाणवते. ६० ते ८० फूट खोल परंतु पूर्णपणे आटलेल्या विहिरीतून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाणी काढण्याची कसरत करणाऱ्या महिलांचे चित्र आपल्यापैकी अनेकांनी अनेक वेळा पाहिले असेल. अगदी अशीच परिस्थिती मुलींवर ओढवते जेव्हा ग्रामीण आणि शहरांमधील घराघरातील मुलींना शाळेत जाण्याऐवजी पाण्याच्या टँकरची वाट पाहण्यासाठी रांगेत उभे केले जाते. 
सामाजिक आणि शारीरिक पुनरुत्पादनाच्या कामात मध्यवर्ती भूमिका पार पडताना स्त्रियांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या असुरक्षित स्थितीची तीव्रता जगभरातील विविध सभ्यता-संस्कृत्यांमध्ये असणाऱ्या पुरुषप्रधानतेच्या विकृतींमुळे केवळ वाढते आहे असे नाही तर, यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषणही होते आहे. पुण्यामध्ये माझ्या वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी रोज येणारी बाई पुण्याजवळील एका गावातील दलित कुटुंबातून आलेली आहे. लग्नापूर्वी, अगदी लहानपणापासूनच ती एका वीटभट्टीवर मजुरीचे काम करायची. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी लग्न झाल्यापासून ती घरोघरी फरशी पुसणे आणि साफसफाईचे हे पाठदुखीचे काम गेली जवळपास पंधरा वर्षे करते आहे. या उण्यापुऱ्या चौदा-पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये तिला पाच मुली, आणि अर्थातच वयाने सगळ्यात लहान असलेला एक मुलगा झाला. या सगळ्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी एकटयाने सांभाळताना तिच्या व्यसनाधीन नवऱ्याची तिला काडीची मदत नाही, उलट अनेक वेळा मारहाण सहन करून तिला नवऱ्याच्या दारूसाठी पैसे देणे भाग पडले आहे. नवऱ्याकडून होणारी सततची मारहाण आणि छळाबाबत तिने अनेक वेळा पोलिसांकडे नवऱ्याच्या विरोधात तक्रारी नोंदवल्या, प्रसंगी नवऱ्याला मारावे यासाठी तिने पोलिसांना लाचही दिली. असे असले तरीही ती तिच्या नवऱ्याला सोडून देण्यास अथवा त्याला घराबाहेर काढण्यास तयार नाही, कारण यामुळे वस्तीमध्ये राहण्याच्या दृष्टीने ती आणखी असुरक्षित आणि असहाय्य होईल असे तिला वाटते. एखाद-दोनदा तिने तिच्या गावी जाण्याचाही प्रयत्न करून पाहिला. पण तिच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागतील इतकी उपजीविका तिच्या पाण्याचे सततचे दुर्भिक्ष्य असलेल्या दुष्काळप्रवण गावात मिळणे दुरापास्त होते. पाठ मोडून निघेल असे शारीरिक काबाडकष्ट, तीव्र कुपोषण, सततची आणि कधीकधी क्रूरपणे नवऱ्याकडून होणारी मारहाण, आरोग्याकडे होणारे घोर दुर्लक्ष, आणि तिच्या मुलींच्या सुरक्षिततेच्या काळजीमुळे येणारा सततचा तणाव या सगळ्यांशी अवघ्या तिसाव्या वर्षी लढत लढत तिला कुटुंबाचा गाडा हाकावा लागतो आहे. वस्तुत: अशी उदाहरणे आपल्या नित्य परिचयातली आहेत. पण, या उदाहरणाकडे आपण शारीरिक आणि सामाजिक पुनरुत्पादनाच्या जबाबदाऱ्या, पुरुषप्रधान विकृती, नैसर्गिक संसाधनांच्या नाशामुळे ओढवलेली स्थिती, आणि या सगळ्यामध्ये स्त्रियांचा सर्वप्रथम जाणारा बळी अशा दृष्टिकोनातून पाहू शकतो का? 
या सर्व परिस्थितीला आणखीन एक बाजू देखील आहे. ही बाजू म्हणजे पितृ-सत्ता आणि निसर्गाचा होणारा विनाश यांच्या एकत्रित परिणामांना तोंड देण्यामध्ये, प्रतिकार करण्यामध्ये स्त्रिया बजावत असलेली आघाडीची भूमिका. निसर्गाच्या विनाशाला कारणीभूत ठरणाऱ्या विकास प्रकल्पांच्या तसेच नैसर्गिक संसाधनांवर कब्जा करण्याच्या उद्योगांच्या व सरकारच्या प्रयत्नांच्या विरोधातील जगभरातील लढ्यांमध्ये स्त्रिया अग्रस्थानी राहिल्या आहेत. स्त्री आणि निसर्ग यांमधील परस्पर संबंधांवर काम करणाऱ्या अनेक पर्यावरणीय-स्त्रीवादी विचारवंतांनी व कार्यर्त्यांनी हा मुद्दा पुढे आणला आहे. यात जागतिक पातळीवरील प्रख्यात संशोधक आणि कार्यकर्त्या वंदना शिवा व मेधा पाटकर यांच्या बरोबरीने आपल्यामधील कार्यकर्त्या-मैत्रीणी सीमा कुलकर्णी, सुनिती सु र, सुजाता खांडेकर, मुमताझ शेख, सुप्रिया जान यांचा समावेश करता येईल. वंदना शिवा यांनी हिमालयातील पर्वतमय भागातील स्त्रियांच्या संघर्षाबददल विस्तारपूर्वक लिहिले आहे. मेधा पाटकर सरदार सरोवर आणि त्यासारख्या महाकाय विकास प्रकल्पांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांविरोधातील लढाया स्थानिक स्त्रियांसोबत लढत आहेत. स्थानिक स्त्रियांसोबत लवासा सिटी प्रकल्प आणि वांग-मराठवाडी धरणग्रस्ताच्या प्रश्नावर सुनीती सु.र. काम करीत आहेत, तर सीमा कुलकर्णी पाण्यासह स्थानिक ठिकाणच्या संसाधनांवर स्त्रियांना हक्क मिळावेत यासाठी सातत्त्याने दक्षिण महाराष्ट्रात काम करीत आहेत. याचप्रमाणे मुमताज शेख, सुजाता खांडेकर, सुप्रिया जान मुंबईतील महिलांसाठी पुरेशा संख्येने शौचालये उपलब्ध व्हावीत यासाठी 'राईट टू पी ' हे आंदोलन चालवित आहेत.
  अशाप्रकारे, पर्यावरणीय स्त्रीवादाचा दृष्टीकोन हा जगभरातील स्त्रियांना होणारा त्रास ओळखून-समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतो कारण त्यांचे कुटुंब जगवण्यासाठी तसेच उपजीविका मिळवण्यासाठी स्त्रियांना रोज कराव्या लागणाऱ्या संघर्षावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो मदत करतो.







सुबोध वागळे ( प्राध्यापक आयआयटी मुंबई )
अनुवाद - ललिता जोशी (सहायक संशोधक आयआयटी मुंबई )







पर्यावरण आणि स्त्रीया

मी शाळेत असतानाची घटना आहे. इंग्लिशचा वर्ग चालू होता आणि आमच्या बाई व्याकरणातील जेण्डर हा भाग शिकवत होत्या. वर्गात माझे एक उत्तर चुकले आणि चूक सुधारताना त्यांनी सांगितले, nature नेहमी 'she' असते 'he' नव्हे! तेव्हापासून मला नेहमीच ही उत्सुकता वाटत असे की इंग्लिश मध्ये nature स्त्रीलिंगी का आहे? भारतीय साहित्यातदेखील धरती आणि स्त्री या दोन्हीला जननी रूपात पहिले जाते – असे माझ्या नंतर लक्षात येऊ लागले. परंतु पर्यावरणीय स्त्रीवाद अभ्यासाला घेतल्यापासून ह्या कोड्याचे उत्तर किंचित हाती लागल्यासारखे वाटायला लागले. लिंगभाव आणि पर्यावरण या दोन स्वतंत्र संकल्पना एका समान सूत्रात बांधून त्यावर विचार व कृती करणारा हा दृष्टीकोन आहे. निसर्गातल्या वेगवेगळ्या प्रक्रियांची म्हणजे फुलणे, फळणे, बहरणे, पुनरुत्पादन, संवर्धन यांची आणि स्त्रियांच्या आयुष्यातील विविध अवस्थांची पर्यावरणीय स्त्रीवाद या संकल्पनेत सांगड घातलेली दिसते.
स्त्री आणि निसर्ग यांच्यातील नाते हे पुरुष आणि निसर्ग यांच्यातील नात्या पेक्षा जास्त अतूट असते असा या विचार प्रवाहाचा मूळ गाभा आहे. पर्यावरणाची होणारी हानी आणि ह्रास यांचा सर्वात जास्त परिणाम स्त्रियांवरच होत असतो कारण पुरुषांपेक्षा स्त्रियांच्याच कामाचा जास्त संबंध निसर्गाशी येतो, जसे की पाणी आणणे - ही स्त्रियांची पारंपरिक जबाबदारी आहे (असे इथली पुरुषसत्ता मानत असते.) पाण्याची सहज सुलभ उपलब्धता ही सर्व स्त्रियांचे श्रम हलके करते परिणामी त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. याउलट वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण घटते, विहिरी तलाव व इतर जलाशय कोरडे पडतात. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी स्त्रियांना मैलोनमैल पायपीट करावी लागते याचे अतिशय दूरगामी परिणाम स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत असतात. माझ्या आईकडून मी तिच्या पाणी भरण्याच्या कहाण्या ऐकल्या आहेत. ती सांगते, विहिरीवरून पाणी भरून घरी घेऊन येत येत शाळेची वेळ होउन जायची, तसेच पळत पळत शाळेत आले कि खूप थकव्यामुळे वर्गात झोप लागायची. त्यामुळे शाळेचे शिक्षण नीट पूर्ण करता आले नाही. तिच्या इतर मैत्रिणी सारखे पुढे कॉलेज मध्ये जाऊन नोकरी मिळवता आली नाही.
आज मुंबईत राहत असताना आजूबाजूच्या बर्‍याच बायकांचे आयुष्य या पाण्याभोवती कसे जखडून गेले आहे ते अनुभवास येते. नोकरदार स्त्रियांना बाहेर पडताना पहाटेपासून पाण्याची तजवीज करून ठेवावी लागते. अगदी हातावर पोट असणाऱ्या बायका ज्या रोजंदारीवर बाहेर काम करायला जातात त्यांनाही पहाटेपासून थंडीत / पावसात उठून पाणी भरून ठेवावे लागते आणि मग कामावर जायचे. त्याचे खूप वाईट परिणाम त्यांच्या शरीरावर होतात. हा झाला शहरातला अनुभव. गावी राहणाऱ्या माझ्या नात्यातल्या बायका किंवा मैत्रिणी यांनादेखील सरपण आणणे, भाजी शेतात पिकवणे, चुलीसाठी सामान जमवणे, शेतीशी संबंधित इतर कामे करणे अशा जबाबदाऱ्या घ्याव्याच लागतात. त्यासोबत मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी असतेच! स्त्रियांची जास्त कामे निसर्गाशी संबंधित असल्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी आणि ह्रास यांचा सर्वात जास्त परिणाम स्त्रियांवर होत असतो. याकडे पर्यावरणवादी स्त्रीवादाने लक्ष वेधले आहे.
जर Ecofeminism ह्या शब्दाचा गूगलच्या मदतीने शोध घ्यायचा प्रयत्न केला तर खूप वेगवेगळे मुद्दे समोर येतात. काही व्याख्यांमध्ये महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या अनुषंगाने नफ्याच्या नावाखाली निसर्गाचा नाश करणार्‍या प्रक्रियांविषयी आहेत. निसर्गाशी महिलांचे जे नाते आहे – त्याबद्दल काही विवेचन दिसते तर काही व्याख्यातून केवळ शब्दबंबाळपणा दिसतो. सामान्यतः एकोणिसशे सत्तरच्या दशकात ‘पर्यावरणीय स्त्रीवाद’ ही संज्ञा प्रचलित झाली. एक फ्रेंच स्त्रीवादी विचारवंत Francois d Eaubonne यांनी सर्वप्रथम Ecofeminism हा शब्द वापरला. त्यांनी आपल्या लेखनातून स्त्रियांचे पर्यावरणाशी असलेले अतूट नाते व्यक्त केले आणि पाश्चात्य जगातील वर्चस्व प्रस्थापित करण्याची भूमिका स्त्रियांचे शोषण करण्याबरोबर पर्यावरणाचा ऱ्हासाला देखील कशाप्रकारे जबाबदार आहे याचे एकत्रित विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. खरंतर Simone de Beauvoir यांनीही 1952 च्या सुमारास अशी मांडणी केली होती की पितृसत्तेने स्त्रिया आणि निसर्ग दोन्हीचे शोषण केले आहे! युरोपात वाढत्या औद्योगिकरणाच्या अपरिहार्य परिणामातून निर्माण झालेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय स्त्रीवाद हा दृष्टिकोन उदयास आला. निसर्गातील प्राणी, जमीन, पाणी आणि वायू ह्या घटकांचे जसे शोषण केले जाते तसेच स्त्रीया, काळे लोक, मुले यांचेही वर्चस्ववादी गटांकडून शोषण केले जाते. म्हणून पर्यावरणीय समस्या ह्या एक प्रकारे स्त्रीयांच्याच समस्या आहेत, असे ईकोफेमिनीझम विचारधारा मानते.
विविध देशांमधला सांस्कृतिक वारसा, राजकीय समस्या आणि आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने प्रत्येक देशातल्या स्त्री प्रश्नांचे स्वरूप देखील वेगवेगळे असते. जसे स्त्रीवादाचे निरनिराळे प्रवाह आहेत तसे पर्यावरणीय स्त्रीवादात देखील विविध मतप्रवाह आहेत. पण बहुसंख्य देशात औद्योगिकरणामुळे पर्यावरणाचे प्रश्नदेखील उभे ठाकलेले आहेत, लष्करावरील खर्च वाढत आहेत आणि गरीबश्रीमंतामधली विषमतेची दरी देखील वाढत आहे. जगभरात प्रत्येक वर्गात तळाशी असलेल्या स्त्रियांवर याचा विपरीत परिणाम होतो आहे. म्हणून संपूर्ण विकासप्रक्रियेच्या संदर्भात स्त्रीयांच्या प्रश्नांचा नव्याने विचार करण्याचे ‘दर्शन’ (vision) पर्यावरणीय स्त्रीवादाने मांडले. या विचारधारेवर वेगवेगळ्या स्वरूपाची टीकादेखील झाली. उदा. ही चळवळ म्हणजे पाश्चात्य गोर्‍या स्त्रीवादी लोकांची फॅशन आहे, ह्यातल्या कल्पना अव्यवहारी आहेत - असे म्हटले जात असे. मध्यंतरी काही काळ ही विचारधारा एकप्रकारे लुप्त झाल्यासारखे वाटत होते. पण जसजशा पर्यावरणवादी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या तेव्हापासून पुन्हा एकदा पर्यावरणीयस्त्रीवादाच्या संकल्पनेकडे पाहायची गरज वाटायला लागली आहे. 

जरी इकोफेमिनीझम हा शब्द पाश्चात्य स्त्रीवादी महिलांनी वापरात आणला असला तरी भारतातले चिपको आंदोलन, केनियामधली ग्रीन बेल्ट चळवळ, त्याच दशकातला पाश्चात्य देशातला अण्वस्त्रविरोधी चळवळीतला महिलांचा सहभाग या आणि अशाच प्रकारच्या विविध चळवळींनी एकत्रितपणे पर्यावरणीय स्त्रीवादाच्या तत्त्वज्ञानाला आकार दिलेला आहे. 
1984 साली बेंगलोर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या वेळी विविध देशातल्या महिला विकासाची रणनीती, धोरणे, सिद्धांत आणि संशोधनासह त्यांचे अनुभव सांगण्यासाठी एकत्र आल्या होत्या. त्यांनी जगातल्या आर्थिक आणि राजकीय संकटांच्या संदर्भात महिलांवर होणार्‍या विकासाच्या परिणामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि मूलभूत अस्तित्वाच्या गरजांना महत्व देईल अशा वैकल्पिक विकासनीतीचा विचार करण्याची गरज मांडली. यातूनच डेव्हलपमेंट ऑल्टरनेटिव्ह्ज विथ विमेन फॉर न्यू एरा (DAWN) ची स्थापना झाली. 1985 साली त्यांनी स्त्रीकेन्द्री विकासाची संकल्पना DAWN डॉक्युमेंट मधून जगासमोर मांडली. पर्यावरणीय स्त्रीवादाच्या संदर्भात हा सामूहिक पद्धतीने लिहिलेला मसुदा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. 
पर्यावरणीय स्त्रीवादाची तपशीलवार मांडणी आणि विकास करण्यामध्ये मारिया मिएस, देवकी जैन , बिना अग्रवाल, वंदना शिवा यासारख्या अनेक स्त्रीवादी विचारवंत स्त्रियांचा मोलाचा वाटा आहे. बिना अग्रवाल मँचेस्टर मधील ग्लोबल डेवलपमेंट इन्स्टिट्यूट येथे अर्थशास्त्र आणि पर्यावरण या विषयाच्या प्राध्यापक आहेत. त्यांच्या मते - पुरुष हे संस्कृतीच्या जवळ असतात तर स्त्रिया या निसर्गाच्या जवळ असतात. पितृसत्ताक व्यवस्थेने संस्कृतीला प्रकृती पेक्षा श्रेष्ठ मानल्यामुळे या व्यवस्थेत स्त्रियाही दुय्यम झाल्या आहेत. मारिया मिएस ह्या जर्मन स्त्रीवादी विचारवंत आहेत. त्यांनी वसाहतवादाच्या भिंगातून पर्यायी विकासनीतीचा आणि स्त्रियांच्या शोषणाचा विचार केला. त्यांनी भारतातदेखील अनेक संशोधन अभ्यास केले आणि स्त्रिया केवळ पितृसत्तेच्या मूक बळी नाहीत तर प्रतिकार करण्याचे अत्यंत सर्जनशील प्रकारही त्यांनी विकसित केले आहेत हे देखील दाखवून दिले. मरिया मिएस आणि वंदना शिवा या दोघींनी मिळून ECOFEMINISM हे पुस्तक लिहिले आहे. 1988 साली वंदना शिवा यांचे Staying Alive हे पुस्तक प्रकाशित झाले. आजची विकासाची संकल्पना पाश्चात्य पुरुषप्रधान आर्थिक दर्शनाशी एकवटलेली आहे आणि ती निसर्ग आणि स्त्रियांच्या शोषणावर आधारित आहे – असे मत या पुस्तकात त्यांनी मांडलेले आहे. 
वंदना शिवा एक महत्त्वाच्या पर्यावरणीय स्त्रीवादी विचारवंत आहेत . त्या नवदान्या संशोधन फाउंडेशनच्या संस्थापक संचालक आहेत. 1993 मध्ये त्यांना राईट टु लाइव्हहुड अवॉर्ड (पर्यायी नोबेल पुरस्कार) आणि २०१० चा सिडनी पीस पुरस्कार मिळाले आहेत. मे महिन्यात लिहीलेल्या एका लेखात वंदना शिवा म्हणतात की सध्या जगात तीन प्रकारच्या आपत्ती आलेल्या आहेत. एक तर आहे करोना व्हायरसची साथ, दुसरी भुकेची महामारी आणि तिसरे अब्जावधी लोकांचे रोजगार नष्ट होण्याचे अरिष्ट ! आजवर करोना व्हायरस मुळे लाखो माणसे बाधित झाली आहेत. रोज कित्येक मृत्यू होत आहेत. हा एक धोक्याचा इशारा समजून आपण पृथ्वी आणि मानवतेचे रक्षण करण्यासाठी लोकशाहीवर आधारित नवीन अर्थव्यवस्था तयार करायला पाहिजेत. संपूर्ण जगावर ओढवलेल्या ह्या नव्या संकटात कदाचित ‘पर्यावरणीय स्त्रीवाद’च सुटकेचा मार्ग दाखवू शकेल!

 डॉ सीमा घंगाळे
वंदना खरे

...नाहीतर अनेक ‘लॉकर रूम्स ’ तयार होतील!


कोरोनोत्तर काळात इंटरनेट वापरुन घरातून काम करणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक ऑनलाइन सेमिनार्स, वेबीनार्स, काही शाळाकॉलेजच्या अभ्यासाची लेक्चर्सदेखील ऑनलाइन सुरू असतात. या सगळ्यात अर्थातच पुरुषांसोबत स्त्रिया देखील सहभागी असतात. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पूर्वीपेक्षा जास्त महिलांना सायबर गुन्हेगारीचा सामना करावा लागतो आहे.  लॉकडाउनच्या काळात जशी कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाली आहे तशीच सोशल मीडियावर आणि इंटरनेटच्या अवकाशातल्या लैंगिक हिंसाचारात देखील वाढ झालेली आहे, असे UNWomen ला दिसून आले आहे. दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील काही शाळांमधल्या मुलांनी Instagram ग्रुपच्या माध्यमातून केलेल्या हिंसक लैंगिक कारवाया गाजत होत्या. दोनच दिवसांपूर्वी एका वेबिनार मध्ये स्त्रियांच्या हक्कांविषयी काम करणार्‍या एका कार्यकर्तीचे प्रेझेंटेशन सुरू असताना काही पुरुषांनी हिंसक लैंगिक भाषेत बोलून आणि लिंगाचे फोटो दाखवून वेबिनार मध्ये अडथळे आणायचा प्रयत्न केला. अशा वाढत्या ऑनलाइन हिंसाचारामागच्या मनोवृत्तीची दखल घेणारा आजचा लेख अनीता पगारे यांनी लिहिला आहे. (अनीता पगारे संगिनी महिला जागृती मंडळनाशिक ह्या सामाजिक संस्थेच्या संस्थापक असून अनेक वर्षांपासून स्त्रियांसोबत विविध मुद्द्यांवर काम करत आहेत. सध्या संगिनी तर्फे युवकांबरोबर जेंडर आणि हिंसाचार ह्या विषयावर काम सुरू आहे.) 
तुम्ही सर्वांनी दिल्लीची ती ‘बॉईज लॉकर्स रुमची’ घटना वाचली, ऐकली असेलच. दोन दिवसापर्यंत मला ती एकच घटना आहे असे वाटत होते. पण प्रत्यक्षात तीन वेगवेगळ्या घडलेल्या घटना एकत्र करुन सांगितल्या जात होत्या. मला असे कळले होते की, इन्स्टाग्राम वर दिल्लीतल्या एका शाळेतल्या मुलांनी आपल्याच वर्गातल्या काही मुलींचे नग्न फोटो शेअर केले आणि त्यांच्यावर आपण सामुहिक रेप कसा करु शकतो अशी चर्चा केली!  प्रत्यक्षात . दिल्ली पोलिसांनी एनडीटीव्ही ला दिलेल्या माहितीनुसार - घटना क्रमांक एक मध्ये दिल्लीतल्या वेगवेगळ्या शाळेतील मुलांचा इन्स्टाग्रामवर ‘बॉईज लोकर्स रुम नावाचा ग्रुप आहे जिथे त्यांनी त्यांच्या वर्गातल्या मुलींचे आक्षेपार्ह फोटो शेअर केले . त्यातल्या एका मुलाने त्याच्या वर्गातल्या एका मुलीला हे सर्व सांगितले, तीने तिच्या आईला सांगितले आणि तक्रार पोलिसात गेली. घटना क्रमांक दोन मध्ये एका मुलीने मुलाच्या नावाने  ‘स्नॅपचॅट’ मध्ये खाते उघडले आणि एका मुलाची मानसिकता समजावून घेण्यासाठी त्याच्या बरोबर सामुहिक बलात्कार ह्या विषयावर चर्चा केली आणि घटना क्रमांक तीनमध्ये , एका अल्पवयीन मुलीने एका अल्पवयीन मुलावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला (गुन्हा दाखल नाही बर का!) म्हणून त्या मुलाने ११ व्या मजल्यावरून खाली उडी मारुन आत्महत्या केली.  या घटनांचा काहीकाळ बराच बोलबाला झाला होता. 
 याविषयावर सध्याचा युवावर्ग काय विचार करतो आहे, ते  समजून घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या भागातल्या, वेगवेगळ्या परिस्थितीत राहणाऱ्या मुलामुलींशी बोललो. असे अनेक ग्रुप असतात हे प्रत्येकाला माहीत होते. अशा ग्रुप मध्ये अश्लील जोक्स शेअर केले जातात हे देखील त्यांनी मान्य केले पण दिल्लीच्या ह्या पोरांनी मात्र हद्द पार केली असे सर्वांचे मत होते. सर्वांनी ह्या घटनेचा निषेधच केला. तोपर्यंत ह्या चर्चेत मुलगी आहे हे त्यांना माहित नव्हते ! पण जेव्हा त्यांना हे कळाले तेव्हा मात्र त्यांची प्रतिक्रिया होती -  मुलांनी असे बोलले हे वाईटच पण मुलीही आता हाताबाहेर जायला लागल्या आहेत, मुलींचेही असे ग्रुप असतात?  मुलीही आता उनाडक्या करायला लागल्या आहेत ! हाच का तुमचा स्त्रीवाद ? - असे अगदी टिपिकल संस्कृती रक्षक जस बोलतात तशाच ह्या प्रतिक्रिया होत्या. मुलगा दारु प्यायला तर ते सोशल ड्रिंकिंग असते पण एक जरी मुलगी प्यायलेली दिसली किंवा दारुचे समर्थन करतांना दिसली किंवा तिला दारूची माहिती आहे असे दिसली की लगेच आपली संस्कृती, समाज रसातळाला जातो आहे असे गळा काढणारे असतात ना तसाच मला इथे ‘फील आला!

आई बहिणी वरुन सहजपणे शिव्या देणारी मुलंसुद्धा - मुलींची छेड काढू नये, मुलींना त्रास देऊ नये - असे म्हणतात तेव्हा त्यांना सांगायला हव की ‘बलात्कार हि घटना नसून ती एक मानसिकता आहे. काहीना दुर्बल मुलीपर्यंत पोहोचता येते आणि त्यांना तिच्यावर लैंगिक शोषण करण्याची संधी मिळते,तर अनेकांना ती संधी मिळत नाही. पण असे हजारो लोक आहेत जे सहजपणे उठता बसता स्त्रियांचा अपमान करतात, तिला वस्तू समजून बघतात, तिच्या निर्णयाचा आदर करीत नाहीत. आई बहिणीवरून शिव्या देणे, मुलींना वस्तू समजणे हा त्याच मानसिकतेचा भाग आहे. एकीकडे आम्ही स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या संस्कृतीत जन्मलो, आमच्या देशात स्त्रियांना देवी समजले जाते असे म्हणायचे पण आपल्या घरातल्या मुली किंवा स्त्रिया जरा बोलू लागल्या, आपल्या आवडीच्या मुला बरोबर फिरू लागल्या की यांच्या मनातला सनातनी पुरुष जागा होतो! यात काही विरोधाभास आहे हेच त्यांना कळत नाही. 
आता तरुण पिढीत मैत्रीत एक वेगळीच मोकळीक असलेली दिसते. मुली त्यांच्या बरोबरीने फिरतात, निर्णय घेतात हे आनंदाने बघणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. लैंगिकता ह्या विषयाची समज असलेल्या मुलांची, पुरुषांची संख्या वाढताना दिसते आहे हा एक सकारात्मक खूण आहे. आपल्या आवडीने प्रत्येक व्यक्तीला जगता येणे , त्यासाठी आपल्या आवडीच्या प्रमाणे निर्णय घेता येणे हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे हे आता मुलीही स्पष्ट पणे बोलतांना दिसताहेत आणि मुलही बोलतांना दिसताहेत हि फारच चांगली गोष्ट आहे. स्त्री वादी चळवळीने अनेक वर्ष केलेले प्रयत्न आता जगण्यात उतरतांना दिसत आहे. आम्ही ‘बॉईज लॉकर्स रुम यावर एक on line सत्र घेतलं  त्यात सर्वांची यावर सहमती झाली की, कुठल्याच व्यक्तीबद्दल तिच्या किंवा त्याच्या अपरोक्ष त्यांच्या ‘संमती शिवाय बोलल जाऊ नये. मग ते बोलण लैंगिकते बद्दल असो की इतर कुठल्याही विषयाबद्दल ! 

‘संमती शिवाय केलेलं कुठलही कृत्य हे ‘बलात्कारच आहे. संमतीचा अर्थ कळला की व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकाराचा आदर करायला शिकतो आणि हि ‘संमती घेण्याची सवय घरीदारी ती व्यक्ती अमलात आणायला शिकते. त्यासाठी लहानपणापासून प्रत्येक व्यक्तीला ‘संमती हि संकल्पना अनुभवायला येणे गरजेचे आहे. घरातले सगळे निर्णय एकच कोणीतरी ‘प्रमुख पदावरची व्यक्ती घेतांना लहान मुल बघतात.  ज्याच्याकडे नावाची,नात्याची, पैश्याची, शारीरिक ताकदीची, पदाची सत्ता आहे त्यानेच सर्व निर्णय घ्यायचे असतात, असंच ते शिकतात.आपण घरातल्या निर्णायात लहान मुलांना सहभागी करुन घेतले, त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांना विषय समजावला किंवा घाईत निर्णय घ्यावा लागला असेल तर त्या निर्णयाची माहिती दिली तर मुलही ‘संमतीची गरज, महत्व आणि त्याची प्रक्रिया शिकतील.
कुठल्या वयात मुलांना लैंगिकता शिक्षण द्याव हा कायमच वादाचा आणि काहीही निर्णय न निघता नुसत्या चर्चा करायचा विषय झाला आहे. माझ्या सारखे जे जे कोणी लैंगिकता या विषयावर काम करतात त्यांच्या मते कुठल्याही वयात हा विषय शिकवता येऊ शकतो. लैंगिकता शिक्षणात आपण स्वतःची लैंगिकता कशी समजावून घ्यावी, स्वतःच्या शरीरात होणारे बदल कसे समजावून घ्यावेत यावर चर्चा होते आणि ऐकणारी व्यक्ती स्वतःच्या भावनांबरोबरच दुसऱ्याच्या भावनांना किंमत देण्याची शक्यता वाढते. आम्ही ‘संगिनीच्या वतीने शाळेतील सातवी ते दहावीच्या विध्यार्थ्यांना विशेषतः मुलग्यांना ‘मासिक पाळी ह्या विषयावर गप्पा मारतो.  जेव्हा ह्या विषयावर सेशन घेणारी व्यक्ती मोकळेपणाने बोलते, तेव्हा मुलही मोकळेपणाने प्रश्न विचारतात. त्यांच्या मनातील चढ उत्तर, हालचाली आपल्याशी शेअर करतात. लहानपणी अनेकांना असे मोकळे वातावरण किंवा हि विषयाची सहजता अनुभवयाला मिळत नाही अशा युवाना त्यांच्या वयात, लग्न ठरताना किंवा लग्न झाल्यानंतर पालक होवू पाहणाऱ्या अशा कुठल्याही वयात हा विषय शिकवता येऊ शकतो किंवा त्यावर मोकळेपणाने चर्चा होवू शकते. अगदी आजी-आजोबाना हि हा विषय समजावून सांगायला हवा म्हणजे ते त्यांच्या नातवंडाना ‘तिथे हात लावू नका, ते घाण असतं, अव्वा, शेम शेम’ असं काही बोलणार नाहीत.  
लैंगिकते विषयी उत्सुकता असल्यामुळे घाबरत घाबरत भावना व्यक्त करणारे आणि आपल्या पदाचा/पैशाचा/ सत्तेचा/ ताकदीचा गैरफायदा घेत दुसऱ्या व्यक्तीवर जोर जबरदस्ती करुन स्वतःची इच्छा पूर्ण करणारे असे दोन प्रकारचे लोक सापडतात. पहिल्या प्रकारच्या व्यक्तींना समजावून घेऊन वेळीच माहितीची मदत मिळाली, समुपदेशन मिळाले तर त्यांच्या वागण्यात बदल होतो. दुसऱ्या प्रकारातले लोक हे बरोबर अडचणीत असलेल्या लोकांनाच त्रास देतात. कुठल्याही प्रकारचा लैंगिक छळ करणे, त्रास देणे हि मानसिकता आहे. दुसऱ्या प्रकारातले  लोक जेव्हा उपायांवर बोलतात तेव्हा मुलींनी अमुक कपडे घालू नये, तमूक वेळी बाहेर फिरू नये असे मुलींना किंवा महिलांनाच बंदिस्त करणारे उपाय सुचवतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्यांना ज्यांना लहानपणीच मोकळे वातावरण मिळाले आहे , जेव्हा गरज होती तेव्हा सर्व विषयांवर गप्पा मारायची संधी मिळाली आहे, योग्य पुस्तकं वाचायला मिळाली आहेत किंवा योग्य विचारांची, लिंग समानता मानणारी विचारधारा मिळाली आहे ती मुलंमुली म्हणतात की, नॉनव्हेज जोक्स शेअर करणे हे देखील चूक आहे.
 ‘बॉईज लॉकर रूम फक्त दिल्लीत आहे असे समजण्याचे काही कारण नाही, कदाचित ते आपल्या घरात असू शकेल. दिल्लीतले लक्षात आले, आपल्या घरातले लक्षात आले नाही एवढाच काय तो फरक. पण म्हणून दचकून जायचे काही कारण नाही. ज्यांच्या ज्यांच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी किंवा आयुष्यात कधीही ‘लैंगिकता ‘ याविषयावर बोलण्याची संधी येईल त्यांनी ती घेतली पाहिजे, त्यावर मोकळेपणाने बोलले पाहिजे . आपल्याला स्वतःला बोलता येत नसेल तर योग्य व्यक्तीची , योग्य माहितीच्या साधनांची मदत घेतली पाहिजे. रस्ता थोडा लांबचा आहे. पण त्यावरचा प्रवास तुम्ही आनंदाने करणार की वैतागून करणार यावर तुमच्या समाजात ‘बॉईज लॉकर्स रुम निर्माण होणार की नाही हे ठरेल. 

अनिता पगारे.