लॉकडाउन, जोक्स आणि बरंच काही


लॉक डाऊन सुरू होऊन आता जवळजवळ दोन महीने झाले. आता आपण सगळे ह्या ‘न्यू नॉर्मल’ सोबत अॅडजस्ट करायला लागलो आहोत. अर्थात त्यासाठी प्रत्येकाची आपापली वेगळी पद्धत असणार. मी अनेकदा इंस्टाग्रामवर मांजरीचे व्हिडीओ बघते, फिल्म्स बघते, थोडं फार वाचते, आणि भरपूर झोपा काढते. सध्या वातावरणच असं उदास झालंय की फार प्रॉडक्टीव असावंसं वाटतच नाहीये. त्यात मीडियाचं भयंकर म्युझिक सोबत बातम्या देऊन घाबरवणं, नेत्यांचं घाणेरडं राजकारण, रस्त्यावरून चालत निघालेली कष्टकरी माणसं - अशा गोष्टी पाहून अजूनच भयाण वाटतं! त्यामुळे कित्येक लोक बराचवेळ सोशल मिडियावर पडीक असतात. कधी जुनेपुराणे फोटो पोस्ट करणं, रेसिपीज् शेअर करणं, मीमस् बनवणं किंवा व्हॉटसॅपवर जोक्स फॉरवर्ड करणं असे उद्योग करून त्यातल्या त्यात सुख शोधत असतात. पण एकीकडे आपापलं वैयक्तिक आयुष्य सुखाचं करायचं प्रयत्न करत असताना त्याच कारणाने दुसऱ्याला त्रास होऊ नये अशी काळजी देखील घ्यायला पाहिजे. कारण आपल्याला सगळ्यांनाच अशा वेळी एकमेकांकडून सहानुभूती आणि सपोर्ट मिळण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने असा सपोर्ट सगळ्यांना मिळत नाहीये असं म्हणावं लागतंय! 
कारण लॉकडाउन मधल्या डिप्रेशन वर उपाय म्हणून सोशल मिडियावर बायकांना टार्गेट करणारे जोक्स आणि मीमस् बनवायची चढाओढ सुरू आहे. इंटरनेटवर चक्क ‘हसबंड वेलफेअर असोसिएशन’ अशी कम्युनिटी तयार झाली आहे. या आणि अशाच इतर ग्रुप्सच्या फेसबुक पेजवर ह्या अशा विनोदांचे भरभरून पीक निघत असते. बायकांच्या वागणुकीवर, अकलेवर, आवडीनिवडीवर विनोद करणे ही काही आजच नव्याने घडत असलेली घटना नाहीये. तरीही लॉकडाऊनमुळे बायकांचे शारीरिक-मानसिक कष्ट दुप्पट झालेले असताना आणि जगभरात कौटुंबिक हिंसाचार मोठ्या प्रमाणावर वाढलेला असतानाच बायकांना तुच्छ लेखणारे विनोद करणे मला जास्तच क्रूरपणाचं वाटतं! 
एका व्हिडिओमधे एक सरदारजी आनंदाने धमाल नाचत सुटलाय आणि त्याचं कारण लिहिलंय की त्याच्या बायकोला क्वारंटाईन केलंय. दुसऱ्या एका विनोदात नवरा म्हणतो ' माझी बायको सध्या मेकप करत नसल्यामुळे मला ती ओळखू येत नाहीये!’ आणखी एका विनोदात तर नवरा देवाकडे प्रार्थना करतोय की –‘देवा माझ्या बायकोला लवकर तुझ्याकडे बोलवून घे.’ लॉकडाउन मध्ये घरी ‘अडकलेल्या’ जोडप्यांच्या विषयीचे भरपूर विनोद दिसून येत आहेत. यात नेहमीप्रमाणे बायकोला कंटाळलेला बिचारा नवरा आणि त्याचा छळ करणारी बायको अशी जोडी हमखास दिसते आहे. गेले दोन महीने नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय बायका घरून आठतास ऑफिसचं काम करून शिवाय घरातली कामं करताहेत. नवऱ्यांना 'ब्रेक' मिळालाय, मुलांना सुट्ट्या आहेत - त्यामुळे त्यांची फर्माईश पुरी करायची कामंसुद्धा ह्या बायकाच करतायत. घरातल्या वृद्ध माणसांची जास्त काळजी घ्यावी लागते आहे. नोकरी न करणाऱ्या बायकांना नवरा, मुलं घरी नसताना जी काही थोडीफार प्रायव्हसी मिळायची ती पण हरवलेली आहे. भरीतभर घरात बसून चिडलेले नवरे त्यांना जास्त मारहाण करतायत. तरीसुद्धा विनोदांमध्ये मात्र नवराच बिचारा आणि बायको दुष्ट असते, याचं मला नवल वाटतं!
आणखी एक कार्टून तर फारच चीड आणणारं होतं – त्यात एक जाड्या बाईचं चित्र होतं आणि एक बारीक बाईचं चित्र होतं. जाड्या बाईच्या चित्राच्या वर लिहिलं होतं ' कामवाल्या बाया लॉक डाऊन नंतर अशा दिसायला लागतील ' आणि बारीक बाईच्या चित्राच्या वर लिहिलं होतं ' बायको लॉक डाऊन नंतर कधी नव्हे ती घरातली कामं केल्यामुळे अशी दिसायला लागेल' हे व्यंगचित्रं म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. घरेलू कामगार बायका जरी कामावर जाऊ शकत नसल्या तरी त्यामुळे त्यांना ‘आराम’ मिळतोय – हा फारच मोठा गैरसमज आहे. उलट त्यांची उपासमारच जास्त होत आहे. त्या ज्यांच्या घरी काम करत होत्या तिथे त्यांना थोडंतरी खायला मिळत असे. आता लहानसहान कामधंदा करणाऱ्या नवऱ्याची कमाई थांबलेली आहे, बाईला स्वत:लाही पगार नाही – अशा परिस्थिती मध्ये त्यांना चिडचिड करणाऱ्या नवऱ्याचा मारच जास्तवेळा खावा लागतोय. एकुणातच जगात बायकांचा शारीरिक आणि मानसिक त्रास वाढलेला आहे - नेमकं तेव्हाच बायकांना हिणवणाऱ्या ताज्या विनोदांचं भरभरून पीक आलं आहे.
विनोदांत थोडी अतिशयोक्ति असावी लागते असं म्हणतात, पण या विनोदांमध्ये वास्तवातल्या परिस्थितीला पूर्णच उलटं करून मांडलं आहे ! अशा तथाकथित विनोदांवर लोकांना हसायला येतं याचं वाईट वाटतं आणि ह्या जोक्सपेक्षा सुद्धा ते शेअर करणाऱ्या लोकांची स्पष्टीकरणं जास्त भयानक वाटतात. बरेच पुरुष म्हणतात - 'लॉकडाऊन मधे डिप्रेशन कमी करण्यासाठी थोडी गंमत केली तर काय बिघडलं?' पण ह्यांची गमतीची कल्पना नेमकी बायकांच्या कामाची  खिल्ली उडवण्या पुरतीच का आहे?
या प्रश्नावर बरेच लोक नव्याने घरकाम करू लागलेल्या पुरुषांचे फोटो दाखवतात. पुरुषही घरकामात मदत करतात त्याचा पुरावा म्हणून हे फोटो कौतुकाने दाखवले जातात. मुळात स्वतःच्या घरात काम करण्याला ‘मदत’ का म्हणावं? आणि अशी 'मदत' करून हे पुरुष काय घरावर उपकार करतात का? अशा पुरुषांना मी - "कुकी मॅन" म्हणते. ‘बघाबघा मी बायकोला किती मदत करतोय’- असं म्हणत हे कुकीमॅन स्वतःवरच फुलं उधळून घेतात. प्रत्येक छोट्याशा कामासाठी त्यांना शाब्बासकीची कुकी हवी असते. वर्षानुवर्षे असंख्य बायका निमूटपणाने अशी अनेक कामं करत आहेत - आणि त्याबद्दल त्यांना पैसे तर नाहीच पण चार कौतुकाचे शब्दसुद्धा मिळालेले नाहीत. 
खरंतर लॉकडाऊनच्या निमित्ताने घरातल्या घरात सुद्धा किती काम करावं लागतं – ते अनेक पुरुषांना जवळून पाहायला मिळत आहे. किमान त्यामुळे तरी वर्षानुवर्ष रटाळ घरकाम करणाऱ्या बायांबद्दल त्यांना कृतज्ञता वाटायला पाहिजे. पण झालंय उलटंच! इतके वर्ष बायका घरात नुसत्या लोळत पडलेल्या असतात असं म्हणणारे पुरुष अजूनही दिवसभर घरकामाच्या चक्रात अडकलेल्या बायकोवरच विनोद करताहेत. जे पुरुष आवडीने किंवा कर्तव्य म्हणून घरकामात मदत करतायत त्यांनाही “बिचारे” ठरवलं जातंय किंवा तेही विनोदाचाच विषय ठरत आहेत.  एका जोक मध्ये एक बॉस म्हणतो ‘मी तुला फोन केला तेव्हा तुझी बायको म्हणाली तू भांडी घासतोयस. मग भांडी घासून झाल्यावर मला कॉलबॅक का नाही केलास?’ तर त्याला उत्तर मिळतं - ‘मी फोन केला होतं सर, पण तेव्हा मॅडम म्हणाल्या की तुम्ही पोळ्या करताय!’ पुरुषांनी घरकाम करणं हे अजूनही लोकांना “विनोदी” का वाटतं?
बायका कितीही शिकल्या, कितीही पैसे मिळवले आणि कितीही प्रेमात पडून लग्न केलं तरी घरकाम मात्र बायकांनीच करायचं असं त्यांच्या डोक्यात पक्कं ठरून गेलंय - घरकामाला पैशाच्या रूपात मोजता येत नाही म्हणून ते कमी प्रतीचं आणि हास्यास्पद ठरतं. पण पुरुष तर "महान" आहेत, ते घरासाठी पैसे कमावण्याचं काम करतात, त्यांनी जर बिनपैशाचं घरकाम केलं तर त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार! भारतातल्या बायका तर पुरुषांपेक्षा जवळजवळ सातपट जास्त घरकाम करतात अशी OECD (Organisation for Economic Co-operation and Development)ची माहिती आहे. पण त्याबद्दल कधी त्यांच्यासाठी कोणी थाळ्या वाजवून, मेणबत्त्या लावून कौतुक केलं का? उलट त्यांच्या कामाला कायम फालतू ठरवलं गेलं. एकीकडे बायकांना शिक्षण, नोकरी अशा हक्कापासून पासून वंचित ठेवायचं - त्यांच्यावर घरकाम लादायचं आणि दुसरीकडे त्याचसाठी त्यांच्यावर विनोद करायचे. हे कशामुळे शक्य होतं ? कारण पुरुषांच्या हातात भरपूर आर्थिक सत्ता आहे. त्यामुळे काय महत्त्वाचं आणि काय बिनमहत्त्वाचं ते ठरवायचा सांस्कृतिक अधिकार सुद्धा त्यांचाच ! विनोद करणारी व्यक्ति आणि जिच्यावर विनोद होतो अशी व्यक्ति ह्या दोन्हीमध्ये सामाजिक सत्तेचा फरक असतो. मस्करी करण्याची सत्ता पुरुषांकडे असते आणि बाईकडे नसते. म्हणून तर बहुतेक वेळा पुरुषच बायकांवर जोक करताना दिसतात.
विनोद करणारे जरी त्याकडे डिप्रेशन कमी करण्याचं साधन म्हणून बघत असले तरी अशा स्त्रिद्वेषी विनोदांचे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्याही मनावर खूप खोल परिणाम होतात. 'बाईने मुकाट्याने घर सांभाळायचं आणि पुरुषाने रुबाबात पैसे मिळवायचे' असले विचार अजुन पक्के होत जातात. बायकांनी अशा विनोदांना विरोध केला की बायकांना विनोदबुद्धी नाही- असं म्हणून आणखी काही विनोद केले जातात. पण बायकांनी पुरुषांच्या वागण्यातल्या विसंगतीवर विनोद केले तर ते मात्र पुरुषांना खिलाडूपणे ऐकून घेता येत नाहीत. एवढंच नाही तर विनोद करणाऱ्या बायकांच्या चारित्र्यावर, बुद्धीवर आणि integrity वर देखील अनेक पुरुष एकत्र येऊन टीकेची झोड उठवतात.
गेल्याच आठवड्यात सोशल मिडियावर काही मुलींनी मुलांवर टीका करणारे मीमस् बनवले होते. फेसबुकवर मराठी मिम् माँक्स नावाचं एक पेज आहे. तिथे विविध विषयांवर मीमस् बनवण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकदा खास मुलींसाठी घेतलेल्या ‘मिमर पोरी’ नावाच्या स्पर्धेत अनेक मुलींनी पुरुषप्रधानतेवर सणसणीत मीमस् बनवली. क्रिकेट, राजकारण,मासिक पाळी, सेक्स, व्हर्जिनिटी, ऑर्गझम, अशा अनेक पैलूंचा त्यात समाचार घेतला होता. खरं म्हणजे ह्या विनोदांवर हसून ते सोडून देणं सहज शक्य होतं - पण पुरुषांच्या इगोला बाऊ झाला! ह्या मुली स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी लैंगिकतेचा मसाला वापरतायत अशी टीका पुरुष करायला लागले. खासकरून चड्डी धुण्याविषयीचं एक मीम काही पुरुषांच्या अगदी जिव्हारी लागलं. त्याचा साधारण आशय असा होता की - ‘फेमिनिझम चा फ माहित नसलेला दादा जेव्हा त्यावर लेक्चर देऊ लागतो तेव्हा मी म्हणते - तू तुझ्या आई /बायकोकडून चड्ड्या धुवून घेणं बंद कर.’ 

ह्या मिमवरून प्रचंड गदारोळ उडाला. या मीममध्ये आक्षेपार्ह भाषा नव्हती की उघडीवघडी चित्र नव्हती. पण यातलं वस्तुस्थितीचं प्रतिबिंब पाहूनच अनेक पुरुषांच्या असा वर्मी घाव बसला की काय सांगावं! मग ते लगेच ह्या मुलींना ट्रोल करायला लागले - “तुमचा स्त्रीवाद फक्त चड्ड्या धुण्यापूरताच मर्यादित आहे! , तुम्ही बायकांनी पुरुषांना चड्ड्या धुवायला का नाही शिकवलं?, इथल्या स्त्रीवादी बायका मूर्ख आहेत, त्यांना प्रश्नांची प्राथमिकता समजत नाही” अशा कॉमेंट्स करून त्यांनी ह्या मिमर मुलींना भरपूर मनस्ताप दिला.
यात ‘लिंगाधारित श्रमविभाजन’ हा मुख्य मुद्दा दुर्लिक्षतच राहिला. शिवाय नेहमीप्रमाणे मुलींच्या चारित्र्यावर, जातीवर, पुरुषांशी असलेल्या नातेसंबंधावर देखील पोस्टस् करण्यात आल्या. ही टीका मीमस् बनवणाऱ्या ठराविक मुलींच्या पुरतीच मर्यादित राहिली नाही, तर टीकेमध्ये ‘इथल्या स्त्रिया’ असे शब्द वारंवार येत राहिले. स्त्रीवादी चळवळीची आणि या मुलींच्या बाजूने उभं राहणाऱ्या स्त्रीवादी पुरुषांचीही खिल्ली उडवली गेली.
या घटनेतून माझ्या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या आहेत. एक म्हणजे पुरुषांनाही विनोदबुद्धी कमीच असते! दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषी असुरक्षितता! मीम बनवणं हे नव्याने आकार घेणारं आणि भरपूर पोटेन्शियल असलेलं एक अगदी नवं करीयर आहे. जगभरात कितीतरी माणसं मीमस् बनवून आपलं पोट भरतात. पण बायका हेही काम करायला लागतील अशी शंका येऊन ह्या पुरुषांना असुरक्षित वाटतंय. मला ह्याबद्दल नवल नाही वाटत. पण मला जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे ' बायकांना त्यांचेच प्रश्न समजावून सांगायला लागतात.' असा पुरुषांचा तोरा! बायकांना पुरुषांकडून काय त्रास होतात आणि त्यांनी आपल्या कुठल्या समस्येला कधी,किती महत्त्व द्यायचे हे पुरुष कसे काय ठरवू शकतात? हा तर सरळ सरळ स्त्रीवादी चळवळ हायजॅक करायचा प्रयत्न आहे. आपण बायकांच्या किती हक्कांवर पाय देऊन उभे आहोत हे पुरुषांच्या कधी लक्षात येणार? वर्षानुवर्षं पुरुषांनी विनोदाचं हत्यार वापरुन पितृसत्तेचा डोलारा टिकवून ठेवला होता. पण आता स्त्रियांनाही हे हत्यार वापरता यायला लागलं आहे आणि त्या पितृसत्ता उलथून टाकण्यासाठी हे हत्यार वापरायला कचरणार नाहीत!

मुक्ता खरे 
स्त्रीवादी रंगकर्मी आणि  फिल्ममेकर  


कुंदनिका कापडिया



ज्येष्ठ गुजराती साहित्यिक कुंदनिका कापडिया यांचे निधन होऊन आज पंधरा दिवस झाले. कुंदानिकाबेनने लिहिलेल्या – ‘सात पगला आकाशमा’ (‘सात पावले आकाशी’) या कादंबरीमुळे अनेक मराठी वाचकांना त्यांचे नाव परिचित होते. पण अनेकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या इतर पैलूंविषयी फारशी माहिती नाही. म्हणून गुजराती साहित्यविश्वाशी जोडलेल्या काही मित्रमैत्रिणींशी बोलून ह्या स्त्रीवादी लेखिकेचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न केला आहे!

कुंदनिका कपाडिया यांचा जन्म 11 जानेवारी 1927 ला गुजरातमधील सुरेन्द्रनगर जिल्ह्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण गुजारतमध्येच झाले. त्यांनी 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता. नंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी. ए. ची पदवी घेतली. तेव्हापासून त्या सातत्याने लेखन करत होत्या. त्यांचे पहिले पुस्तक ‘प्रेमना आंसू’ १९५४ मध्ये प्रकाशित झाले. नंतरही त्यांचे ‘वधु ने वधु सुंदर’ (अतिशय सुंदर) , ‘कागळनी होडी’(कागदाची होडी), ‘जवा दईशुं तमने’ (तुला जाऊ देईन) हे आणखी तीन कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यांनी तीन इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद केले होते. त्यांनी ‘यात्रिक’ आणि ‘नवनीत’ ह्या मासिकांच्या संपादनाची जबाबदारी निभावली. शिवाय त्यांनी ‘परोढ़ थतां पहेलां’ (प्रभात होण्यापूर्वी); ‘अगनपिपासा’ आणि ‘सात पगलां आकाशमां’ ह्या तीन कादंबऱ्या लिहिल्या. आणि त्यांचे दोन लेखसंग्रह देखील प्रकाशित झालेले आहेत. कुंदानिका बेन ह्यांनी विविध प्रकारचे भरपूर लिखाण केलं असलं तरी ‘सात पगला आकाशमां’ ही त्यांची मुख्य ओळख बनली. 
ही कादंबरी अनेक कारणांसाठी खूपच गाजली. 1982 च्या जुलै महिन्यांपासून ही कादंबरी ‘जन्मभूमी’ नियतकालिकात दर आठवड्याला क्रमश: प्रकाशित होऊ लागली. त्या काळाच्या गुजराती समाजात ह्या लेखनाने खळबळ उडवून दिली होती. या कादंबरीत वेगवेगळ्या परिस्थिती मधील स्त्रियांच्या निरनिराळ्या कहाण्याची त्यात गुंफण आहे. आणि त्या सगळ्या कहाण्या सत्य घटनांवर आधारीत आहेत. त्यामुळे ही कादंबरी एक प्रकारे परिस्थितीचं डॉक्युमेंटेशन करणारी आहे असंही म्हणता येईल. पितृसत्ताक समाजात पुरुषांच्या वर्चस्वातून बाहेर पडण्याचा प्रयत्न ‘सात पगला आकाशमां’ची नायिका करते. जेव्हा ही कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा तिच्यावर भरपूर टिका झाली. स्त्रिया ही कादंबरी चोरून वाचत. त्यांना ही कादंबरी वाचू दिली जात नसे. ही कादंबरी घरं फोडणारी आहे, म्हणून अशा कादंबरीला घरात स्थान देता कामा नये - असं पुरुषांचं मत होतं. एक प्रकारे ही कादंबरी क्रांतिकारी, बंडखोर कादंबरी होती आणि तिने गुजराती स्त्रियांच्या मनात जाणीव जागृती करण्याचं महत्त्वाचं काम केलं.
१९८४ साली ही कादंबरी नवभारत साहित्य मंदिर तर्फे पुस्तक रूपात प्रकाशित झाली. जेव्हा ह्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तेव्हा सुरुवातीचा हा विरोध हळूहळू मावळला. नंतर अनेक पुरस्कारांनी ह्या कादंबरीचा गौरव होत राहिला. कादंबरीच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या. अनेक भाषांमधून ह्या कादंबरीचे अनुवाद झाले. त्यावर आधारित गुजराती आणि हिन्दी टीव्ही सिरियल देखील झाल्या. 
गुजराती कवयित्री राजुल भानुशाली यांना असं वाटतं की - इंग्रजी साहित्यात जे महत्त्व ‘डॉल्स हाऊस’चे आहे, तेच महत्त्व गुजराती साहित्यात ‘सात पगला आकाशमा’चे आहे. या कादंबरीला गुजरातच्या स्त्री-स्वातंत्र्याची जनक म्हणता येईल!
गुजराती लेखक आणि नाटककार राजू पटेल म्हणतात की ह्या कादंबरीने गुजराती समाजावर एक महत्त्वपूर्ण ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या मते ‘आई रिटायर होते’ ह्या प्रसिद्ध मराठी नाटकाची प्रेरणा ह्याच कादंबरीतील एका प्रकरणापासून घेतलेली आहे. 
 मृणालिनी देसाई यांनी ह्या कादंबरीचा मराठीत अनुवाद केलेला आहे. त्याचा काही भाग ‘स्त्रीउवाच’  वार्षिकात 1987 मध्ये प्रकाशित झाला होता, तेव्हा तो स्त्रीवादी वाचकांना आपलासा वाटला होता. ह्या कादंबरीत केवळ स्त्रियांवरच्या अन्यायाची चर्चा न करता एका सुंदर भविष्याची कल्पना देखील उलगडून दाखवली होती. 
बडोदा येथे ‘ओळख’ संस्थेद्वारे काम करणाऱ्या निमिषा देसाई म्हणतात – “माझ्यासाठी तर ही कादंबरी म्हणजे बायबलच आहे. त्यातला प्रत्येक शब्द पितृसत्तेला आव्हान देतो. त्यांची सगळी पात्रं बोल्ड, स्वाभिमानी आणि स्वतःचा वेगळा दृष्टीकोन असलेली आहेत. एक स्त्रीवादी कार्यकर्ता म्हणून काम करताना ह्या कादंबरी मधून मला सतत प्रेरणा मिळते. कम्युनिटी वर्क करताना ह्या कादंबरीची मला प्रचंड मदत झाली. आमच्या संस्थेतर्फे आम्ही अनेक कार्यकर्त्यांना हे पुस्तक भेट म्हणून दिलेले आहे.” 
निमिषा देसाई यांची कुंदनिकाबेन सोबत चांगली मैत्री होती. त्यांच्या आठवणी जागवताना त्या सांगत होत्या , “ कुंदनिकाबेन अत्यंत मोहक व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. त्या अतिशय प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांना छान, नीटनेटकं दिसायला खूप आवडायचं. छानशी साडी, त्यावर शोभेशी एखादी माळ अशीच त्यांची प्रतिमा माझ्या आठवणीत आहे. त्यांच्याशी गप्पा मारायला खूप मजा यायची!मी अनेकदा त्यांना नंदीग्राम मध्ये जाऊन भेटत असे. ”
नंदीग्राम हा कुंदनिकाबेन यांनी सुरू केलेला  आदिवासी आश्रम आहे. 1987 साली कुंदनिकाबेन आणि त्यांचे पती मकरंद दवे दोघेही मुंबई सोडून वलसाड जवळच्या एका खेड्यात स्थायिक झाले. एका उजाड माळरानावर त्यांनी आदिवासी विकास कामासाठी नंदीग्राम आश्रमाची स्थापना केली होती. आजही तिथे आदिवासीना आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीकोनातून शिक्षण आणि आरोग्य सुविधांविषयी काम केले जाते. शेवटपर्यन्त कुंदनिकाबेन नंदीग्राम मध्येच कार्यरत होत्या. 30 एप्रिल रोजी वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी तिथेच अखेरचा श्वास घेतला.  

वंदना खरे 












करोना निमित्तमात्र....

भूकंप, सुनामी, पूर , गॅसगळती अशा अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांनी माणसाला घराबाहेर काढलं होतं परंतु माणसांना घरात बंद करणारी ही एकमेव आपत्ती आहे. घर सर्वात सुरक्षित आहे असं म्हटलं जातंय! आजही जगभर घर हे निर्विवादपणे स्त्रियांचं बलस्थान आहे. कुटुंबातले सगळे सदस्य डोळ्यासमोर असावेत याबद्दल त्या आग्रही असतात. करोनामुळे मुलं आणि नवरा आठवड्याचे सात दिवस चोवीस तास, प्रदीर्घ काळ एकत्र असण्याची संधी प्रथमच अनेकींच्या आयुष्यात आली. पण त्याचे अनेक भले बुरे परिणाम पुन्हा महिलांनाच सोसावे लागत आहेत. प्रत्येक वर्गात या परिणामांचे नवनवीन आयाम समोर येत आहेत. 

कामाच्या रगाड्यात दिवसभरात रात्रीचं जेवण आणि झोप एव्हढयापुरती घरात एकत्र येणाऱ्या माणसांना पैसा आणि खाण्याची (आणि पिण्याचीही) विवंचना असताना सतत रिकामटेकडा सहवास लाभणं याचे महिलांवर काही फारसे सकारात्मक परिणाम झाले नाहीत. बाहेर कामाला जावं लागत नसेल तरीही महिलांना रोज दिवसभर पुरून उरेल एव्हढं काम घरात असतं. सर्वाना खायला करून घालण्याची जबाबदारी निभावताना या टंचाईच्या दिवसात त्यांचा कस लागला आहे . बहुसंख्य पुरुषांना घरातली कामं येत नाहीत आणि या कामांना बायकी म्हणून कमी लेखल्यामुळे घरात स्वत:ला त्या कामात गुंतवून ठेवता येत नाही. मुलं आणि पत्नीशी संवाद साधावा अशी मानसिकता समाजाने घडू दिलेली नाही - त्यातच अनिश्चितता, भय याचा राग पुरुषांनी नेहमीप्रमाणे हक्काच्या बायांवरच काढला आहे .

ज्या महिला तथाकथित सुरक्षित नात्यात पुरुषांबरोबर घरात आहेत ते पुरुष त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करोनाचा वापर करून घेत आहेत. या काळात भारतात घरगुती हिंसाचार आणि मुलांवरच्या अत्याचारांचं प्रमाण वाढत आहे अस हेल्पलाईन आणि समुपदेशन सेवांकडे आलेल्या वाढत्या तक्रारीवरून स्पष्ट झालं आहे. हा काळ संपल्यानंतर कौटुंबिक कलहांमुळे घटस्फोटाचं प्रमाण ३० टक्क्याने वाढेल असा तज्ञांचा अंदाज आहे. या काळात महिलांना तक्रारी करता याव्या यासाठी हेल्पलाईन, संकेत ठरवणे, फोन न करता मदत मिळवण्यासाठी अॅप हे सगळे उपाय तोकडे ठरत आहेत. कोरोना आणि महिलांवरील अत्याचार या विषयावर जगभरातील धक्कादायक आकडेवारी पुढे येत आहे. कोरोना प्रतिबंधाच्या कामात जखडलेल्या पोलिसांना या तक्रारींकडे लक्ष द्यायला आता तर अजिबात वेळ नाही आहे.

गावातून शहरात आलेल्या, निम्न मध्यमवर्गातल्या किंवा गरीब वस्तीत राहणाऱ्या स्त्रिया घरकामगार, भाजी/किराणा/ इस्त्री/ शिवणकाम/ पार्लर आदी छोटं दुकान चालवून घराला हातभार लावत होत्या, बचतगटातून छोटं मोठं कर्ज काढून मुलांची शिक्षणं, मोबाईल आदी गरजा पूर्ण करत होत्या. त्यात खंड पडला आहे. त्यांचे ग्राहक वस्तीतलेच असल्याने आता पुन्हा व्यवसाय सुरळीत होण्याची आशा उरली नाही. कर्जावरचं व्याज, सोनाराकडे गहाण ठेवलेले दागिने, हफ्त्याने केलेली खरेदी, सुट्टीचा पगार द्यायला मालकिणीनी दिलेला नकार यामुळे हवालदिल झाल्या आहेत. मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत जाणाऱ्या दुसऱ्या, तिसर्‍या घरबंदीत घर कसं चालवायचं हा प्रश्न त्यांना भेडसावतोय.

बाहेरचे लोक आपल्या गावात शिरू नयेत म्हणून पुरुष गस्त घालत आहेत. त्यात महिलांवर विशेषतः किशोरी आणि एकट्या महिलांवर लक्ष ठेवलं जात आहे. मुलींना, महिलांना बाहेर पडू दिले जात नाही. दाटीवाटीच्या वस्तीत महिलाकडे वाईट नजरेने बघणे, त्रास देणे, अश्लील शेरे मारणे त्याच्या नकळत त्यांचे फोटो, व्हिडियो काढणे, असे प्रकार सर्रास चालू आहेत. चोवीस तास घरात राहता येतील अशी ऐसपैस घरं शहरातून नाहीत, त्यामुळे मुलं वारंवार घराबाहेर जात होती. घरातली कामं, स्वयंपाक, वाळवणं आदी कामं करून मोठ्या माणसांची, पुरुषांची हरप्रकारे मर्जी राखण्याची कसरत करतानाच बाहेर पोलिसांच्या तावडीतून मुलांना सोडवून आणणं, मोठमोठ्या रांगेत उभं राहून बँकेत आलेली सरकारी मदत, राशन आणणं आदी कामं करत आहेत. ज्यांचे नवरे नाहीत , आजारी आहेत किंवा काम करू शकत नाही त्यांना घराबाहेर पडून अन्न – औषधाची सोय करण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

चौकोनी कुटुंब आणि पक्कं घर, नियमित उत्पन्न या सुरक्षित कवचात राहणाऱ्या मध्यम/ उच्च मध्यमवर्गीय स्त्रीलाही, कोरोना संसर्ग आणि घरबंदीमुळे वेगवेगळ्या बदल, परिणामांना सामोरं जावं लागत आहे. पूर्वी या महिलांना स्वयंपाक, वरकाम यासाठी मदतनीस आणि असल्याने नोकरदार आणि गृहिणींना टीव्हीवर मालिका पहाणे, भिशी पार्टी, योग, झुम्बा आदी छंद जोपासता येत होते. वेगवेगळ्या चवीच्या पदार्थांची हॉटेल्स, स्पा, पार्लर, पर्यायी उपचार पद्धतीतून स्वत:साठी वेळ काढत होत्या. करोनाने त्यांना ५० वर्ष मागे ढकललं आहे. घरकाम. स्वयंपाक, सुट्टीवर असलेली मुलं, वृद्धांची सुश्रुषा आणि घरातून कार्यालयीन काम अशी त्यांची कसरत चालू झाली आहे.

पण या आजाराची सर्वात जास्त झळ बसली आहे ती स्वत:चं रेशन किंवा आधार कार्डही नसलेल्या वर्गातील महिलांना. या असंघटीत, बेघर, एकट्या, भटक्या, रस्त्यावर राहणाऱ्या, वीटभट्टी, बांधकाम कामगार आदी स्थलांतरित श्रमिक, कचरा वेचणाऱ्या, सेक्स वर्कर, हिजडा, घरकामगार आदी महिलांच्या उत्पन्नाचं साधन आणि मार्ग बंद झाले आहेत. ज्यांना घरात बंद राहण्यासाठी घरंच नाहीत अशा महिलांसाठी शहरात काही आधारगृह ( शेल्टर ) आहेत, तिथे त्या रहात आहेत. तिथे आता इतकी गर्दी झाली आहे कि कोरोनाची लागण रोखण्यासाठी आवश्यक सहा फुटांचं शारीरिक अंतर राखणं अशक्य आहे. पैसा नाही, काम नाही, पेन्शन नाही – अशा परिस्थितीत घरबंदीचे हे दिवस ठिकठीकाणी मिळणाऱ्या शिजवलेल्या अन्नावर काढून काही महिला गुजराण करत असल्या तरी आत्ता किमान खर्चासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि त्या करत असलेलं काम पुन्हा कधी सुरु होईल त्याची शाश्वती नाही.


घरबंदी जाहीर झाल्यापासून वस्त्या, अनाथालय, बांधकाम मजूर , सेक्स वर्कर्स आणि तृतीयपंथी यांना मदत द्यावी यासाठी फोन आणि संदेशांचा पाऊस पडत होता. या गटांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या संस्थांनी त्यांच्याशी संबंधित लाभार्थींच्या नावांच्या याद्या तयार केल्या आहेत. मदतीचे काही हात पुढे येत आहेत, पण ते पुरे पडत नाही आहेत किंवा संचारबंदीमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचताही येत नाही आहे. काहीनी तात्पुरती मदत देऊ केली, पण अगोदर एकवीस दिवसांपुरती उत्साहाने केलेली मदत दीर्घकाळ चालू ठेवणं कठीण होत आहे. संस्था, गट यांच्याशी न जोडलेल्या महिलांची संख्या जास्त आहे. 
या काळात महिलांना लागणार पाळीचे पॅड, गर्भ निरोधक पोहोचवणं आवश्यक आहे त्याची गरज कुणी ओळखली नाही. गर्भवती महिलांचं आणि लहान मुलांचं पोषण यांचं संस्था आणि सरकार करत असेलेलं काम ठप्प झाल्याचे अनुभव अनेक वेबिनारमध्ये पुढे आले.

जशा अडचणीत असलेल्या महिला आहेत तशा सर्वांना सेवा पुरवणाऱ्या, भार वाहणाऱ्या अनेक महिला आहेत . आंगणवाडी सेविका, आशा, नर्स आदी आरोग्य आणि सरकारी कर्मचारी, सफाई कर्मचारी या आजही महिलाबहुल सेवा आहेत. अनेक व्यावसायिक , नोकरदार, पत्रकार, पोलीस आणि डॉक्टर या महिला स्वत:च्या घरी आणि बाहेर दोन्ही आघाड्या सांभाळत आहेत. लोकांना सेवा पुरवताना घरी लागण घेऊन जाऊ नये याची खबरदारी घ्यावी लागतेय. रुग्णालयाजवळ राहण्याची व्यवस्था करावी यासाठी मुंबईत नर्सेसना भांडावं लागलं. त्यानंतर आता तशी सोय करण्यात आली आहे. आपल्यामुळे घरी लागण होऊ नये या काळजीने अनेक महिला महिनोंमहिने घरी गेल्या नाहीत तर काही नाईलाजाने मुलांना बरोबर घेऊन अर्ध्या सुट्टीतून परत येऊन आपलं कर्तव्य बजावत आहेत. नोकरी जाण्याची किंवा आजाराची लागण होण्याची टांगती तलवार त्याच्या मानेवर आहे. सरकारी यंत्रणेत सर्वात तळाशी असलेल्या आणि लोकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येणाऱ्या ‘आशा’ आणि आंगणवाडी सेविकांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था आहे. कोरोना लागणीची शक्यता असलेल्या लोकाना शोधण्याचं आणि मुलांपर्यंत मध्यान्ह भोजन पोहोचवायचं काम या करत आहेत. त्यांना घरूनही विरोध होत आहे आणि त्या आपल्या दारात आल्याबद्दल नागरिकही राग राग करत आहेत. प्रतिबंधाच्या खबरदारीची पुरेशी साधनं उपलब्ध नसतानाही या महिला आपलं कर्तव्य निभावत आहेत. जगभरात महिला नेतृत्व असलेल्या जर्मनी, न्यूझीलंड, तैवान, डेन्मार्क, देशांनी कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि कार्यनिती याची वाहवा होत आहे हा केवळ योगायोग नाही.

यापूर्वी दुसऱ्या महायुद्धात पुरुष युद्धावर गेल्यावर महिलांनी उत्पादनात सहभाग घेऊन देश, अर्थव्यवस्थेला आपलं योगदान दिलं. आज या विषाणूने संपूर्ण विपरीत परिस्थिती निर्माण करून लोकांना घरात पाठवलं आहे. आता एकूणच रोजगाराच्या संधी कमी झाल्यावर सर्वात अगोदर महिलांनाच घरात बसावं लागेल. अकुशल, आर्थिक पाठबळ नसलेल्या परिस्थितीने बेजार स्त्रियांना कमी वेतनावर कामं करावी लागतील किंवा बरे पैसे मिळवण्यासाठी महिलांकडून अपेक्षित असलेल्या पुरातन व्यवसायाकडे वळावं लागेल. पूर्वीपासून या व्यवसायात असलेल्या महिलांची स्थिती आणखी बिकट होईल. भूक भागवायची की आजारापासून बचाव हे दोनच पर्याय असतील तर अगोदर तगून राहण्यालाच महत्व मिळेल.संपूर्ण कुटुंबाची आर्थिक घडी सांभाळत त्यांची शारीरिक , मानसिक स्वास्थ्य सांभाळण्याची महत्वाची जबाबदारी महिला निभावत आहेत त्याबरोबर गर्भनिरोधकाशिवाय लैंगिक संबंधांचा, नको असलेल्या गरोदरपणाचा धोका पत्करत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर पुरुष घरी परत आल्यावर वर्षभरात घरोघरी पाळणे हलले होते ते ‘बेबी बूम’ प्रसिद्ध आहे. आता ४५ ते ६० दिवसाच्या या घरबंदीत महिलांच्या विशेष गरजांकडे लक्ष न दिल्यामुळे ‘२०२१:बेबी बूम पार्ट टू’ येण्याची पूर्ण शक्यता दिसत आहे.

आपल्या समाजात आधीच असलेली गरीब श्रीमंत यातली दरी, स्त्री पुरुष विषमता , जाती धर्माची उतरंड कोरोनाने आणखी अधोरेखित केली आहे. या आजाराला आपल्या देशाने खास धार्मिक रंगही चढवला आहे त्यामुळे भेदभावाचा सामना करणाऱ्या अनेक कुटुंबाना गावाबाहेर वाळीत टाकण्यात आलं आहे त्या महिला आणि मुलांचं जगणं सर्व बाजूनी असुरक्षित झालं आहे. काश्मीरसारख्या प्रदेशात या काळातही दोन देशात एकमेकांवर हल्ले चालू आहेत तेव्हा जीवाच्या भीतीने नाईलाजाने घराबाहेर येण्याशिवाय तिथल्या महिला, मुलांपुढे दुसरा पर्याय नाही. मध्यंतरी दिल्लीत भूकंप आला, विशाखापट्टणमला गॅसगळती झाली तेव्हाही आजाराची लागण होण्याच्या भीतीपेक्षा जीव वाचवण्यासाठी लोकांना घराबाहेर यावं लागलं. याच काळात स्थलांतरित मजुरांची अवस्था आणि रेल्वेरुळावर, रस्त्यावर आलेलं मरण यातून आपलं अत्यंत क्रूर आणि नीच रूप समोर आलं आहे. वृद्ध, गरीब, आजारी आणि वंचित लोक जगभर करोनाला बळी पडत आहेत. जे बळी आहेत त्यांनाच दोषी ठरवलं जात आहे. त्या लोकांनीच जादा कष्ट सोसून डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सावरावी अशी अपेक्षा केली जात आहे. करोना हा आपला आरसा नाही भिंग झाला आहे. संकुचित दृष्टी, स्वार्थी राजकारण, संवेदनशील नेत्यांचा आणि कार्यनीतीचा अभाव यामुळे अन्याय, शोषण, भेदभाव, आणि हतबल गटातल्या लोकांवर वर्ण, वर्ग, वय, धर्म, लिंगाधारित हिंसा या काळात वाढताना दिसत आहे. वैयक्तिक, मानवनिर्मित, नैसर्गिक आपत्ती की आजाराची लागण होण्याचं भय आणि जगण्याची इच्छाशक्ती कोण कुणावर वरचढ ठरणार हे काळच ठरवेल. ऑगस्टपर्यंत तरी घरबंदीचं कवित्व सुरू राहील. त्यानंतर करोनासंसर्गाचा दुसरा टप्पा सहा महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबरमध्ये येणार आहे आणि कोरोनावरची लस शोधण्यासाठी १६ ते १८ महिन्यांची वाट पहावी लागणार आहे. तोवर या जगात जे स्वास्थ्य, मानवी मुल्यं आणि सकारात्मकता तगून राहील त्यात घराघरात आणि घराबाहेर खपणाऱ्या स्त्रियांचा निश्चितच मोलाचा वाटा असेल.













आपत्ती व्यवस्थापन आणि लिंगभावाधारित धोरण

covid19 विरुद्धच्या लढ्यामध्ये डॉक्टर्स, समाजकार्यकर्ते, नर्सेस, आया, सफाई कामगार, पोलीस आणि गृहिणी अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर महिला खूप मोठं योगदान देत असल्या तरी समाजातल्या विषमतेमुळे त्यांच्यावर ह्या आपत्तीचे विपरीत परिणाम जास्त प्रमाणात होत आहेत. हे  टाळण्यासाठी जगात यापूर्वी येऊन गेलेल्या विविध आपत्तींच्या वेळी केलेल्या उपाययोजनातून कोणते धडे शिकता येतील ?

आजवर जगात आलेल्या वेगवेगळ्या आपत्तींच्या परिणामा बद्दल झालेल्या संशोधनात असं निष्पन्न झालं आहे की आपत्तींमुळे समाजातल्या सगळ्या घटकांवर सारखाच परिणाम होत नाही. आपत्ती जरी स्त्रीपुरुष, गरीबश्रीमंत असा भेदभाव करीत नसली तरी समाज मात्र असे भेदभाव करतच असतो. समाजात आधीपासून अस्तित्त्वात असलेली विषमता आणि असुरक्षितता आपत्कालात जास्तच वाढते. त्यामुळे समाजातील वंचित गटांवर आपत्तींचा खूपच मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम होतो म्हणूनच कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये लिंगभावाच्या (gender) मुद्दयाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

उदाहरण द्यायचं झालं तर 2005 मधल्या हिंदमहासागरातील त्सुनामीचे घेता येईल. या त्सुनामीने  भारताच्या किनारपट्टीवरील २,००० किलोमीटरहून अधिक जमीन उद्ध्वस्त केली. त्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली आणि मालमत्तेचेही नुकसान झाले. तथापि, स्त्रिया आणि पुरुष यांच्यावर या आपत्तीचे वेगवेगळे परिणाम झाले. ऑक्सफॅमने केलेल्या अभ्यासानुसार आपत्तीग्रस्त लोकांपैकी जवळजवळ पंचाहत्तर टक्के महिला आणि मुले होती. याचे कारण महिला आणि मुलींवर घातलेल्या वेगवेगळ्या पितृसत्तात्मक निर्बंधांमुळे त्यांच्याकडे पोहण्यासारखे साधे जीवनरक्षक कौशल्यही नव्हते. त्यांनी घातलेल्या साडी आणि दुपट्ट्यासारख्या कपड्यांमुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा पडली, त्यांना झाडावर देखील चढता आले नाही आणि स्वत:चा जीव वाचवू शकल्या नाहीत. घराच्या चौकटी बाहेरचे जग माहीतच नसल्यामुळे अनेक जणीना कोणत्या दिशेने धावायला पाहिजे ही देखील समजले नाही आणि त्या त्सुनामीच्या दिशेने गेल्या म्हणून त्यांची सुटका होऊ शकली नाही.

वरील उदाहरण ही काही अपवादात्मक घटना नाही. 2015च्या नेपाळ भूकंपातदेखील मोठ्या प्रमाणावर स्त्रियाच मृत्यूमुखी पडल्या होत्या. बहुतांश संस्कृतींमध्ये महिला घराबाहेर जाऊन काम करत नाहीत, तशा नेपाळमध्येही पुरुष कामासाठी घराबाहेर असताना त्या घरातच होत्या. त्यामुळे भूकंपाच्या वेळी घरातच असलेल्या या महिलांचा मृत्यू झाला. आपत्तीच्या प्रसंगी फक्त दक्षिण आशियाई प्रदेशातच स्त्रियांवर जास्त विपरीत परिणाम होतो असे नाही. अगदी अमेरिकेसारख्या विकसित देशातही आपत्तीत महिलाच अधिक प्रमाणात बळी पडतात. कतरिना चक्रीवादळानंतर ऐंशी टक्के स्त्रियाच शहरात मागे राहिल्या होत्या. न्यूऑर्लीन्सच्या वादळग्रस्त शहराबाहेर जाण्यासाठी त्यांच्या हाताशी काहीच साधन नसल्यामुळे त्यांना तिथेच अडकून पडावे लागले. जात, वर्ग, वंश अशा भेदभाव निर्माण करणार्‍या सामाजिक व्यवस्थांमुळेही अनेकदा पीडितांपर्यन्त बचाव आणि पुनर्वसनाची मदत पोहोचू शकत नाही. हे टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक नियम आणि सांस्कृतिक रीतीरीवाजाची जाण असणे आवश्यक आहे.

भारतात सध्या सुरू असलेल्या Covid-19 च्या संकटातही आपल्या समाजातील अशाच कुरूप वास्तवाचे दर्शन घडते आहे. सध्याच्या परिस्थितिमध्ये स्त्रियांवर होत असलेल्या विपरीत परिणामांकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेने (ILO) हल्लीच जाहीर केले आहे की या आपत्तीमुळे दीड अब्ज लोकांचा रोजगार जाऊ शकतो. त्यापैकी सर्वात जास्त लोक असंघटित क्षेत्रातले असणार आहेत.

भारतात, जवळपास 94% महिला असंघटीत क्षेत्रात कार्यरत आहेत. या महिला रोजंदारीवर काम करणार्‍या कंत्राटी कामगार असतात, किंवा भाजीपाला आणि फळांची विक्री करतात तशा त्या सफाई कामगार, घरकामगार आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये सुश्रुषा करणाऱ्या आयासारखी कामंही करतात. अशा प्रकारच्या रोजगारामध्ये उत्पन्नाची कोणतीही हमी नसते. असंघटीत क्षेत्रात सामाजिक सुरक्षा आणि कामगार संरक्षणाच्या नियमांचे अभावानेच पालन केले जाते. अनौपचारिक क्षेत्रात रोजगाराच्या हमीची काहीच तरतूद नसल्यामुळे सर्वप्रथम या महिला रोजगार गमावतील. विधवा, अविवाहित माता, घटस्फोटिता अशा एकल महिलांना लॉकडाऊन दरम्यान सर्वात जास्त त्रास होतो आहे. जात, वर्ग, वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याक दर्जा यामुळे येणार्‍या सामाजिक असुरक्षितते सोबतच आर्थिक असुरक्षिततेमुळे या संकटकाळात महिलांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचणार आहे. घरेलू कामगारांना देखील सध्या कामावर जाता येत नसल्यामुळे त्यांना पगार मिळण्याची शक्यता अगदीच कमी दिसते आहे.
भारतातील सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात देखील जी उतरंडीची रचना आहे आणि त्यात बहुसंख्य स्त्रिया तळातल्या स्तरावर आहेत. आपल्या देशातल्या नर्स आणि मिडवाईफ म्हणून काम करणाऱ्यामध्ये ८३% महिला आहेत. संसर्गजन्य आजारांच्या वेळी त्यांनाच पुढच्या फळीत राहून आजाराला सामोरे जावे लागते. भारतात खेडोपाडी काम करणार्‍या ‘आशा’ (सामाजिक आरोग्य कार्यकर्ते), आरोग्य सेविका आणि हॉस्पिटलमधल्या आया किंवा परिचारिकांनासुद्धा संरक्षक मास्क किंवा हातमोज्यांसारख्या आवश्यक गोष्टी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांची साथीला बळी पडायची शक्यतादेखील जास्त आहे. कोविडची आपत्ती येण्यापूर्वी कर्नाटकातील ‘आशा’कामगारांना १५ महिन्यांचा पगार मिळाला नव्हता. हक्काचा मोबदला मिळण्यासाठी त्यांना मोर्चा, निदर्शनांसारखे संघटित प्रयत्न करून राज्य सरकारकडे मागणी करावी लागली होती. महामारीसारख्या सध्याच्या परिस्थितीत तर मोठी आर्थिक कोंडी होऊन अनेक ठिकाणी अशी वेळ पुन्हा ओढवू शकते.
घरोघरी गृहीणींवर देखील कामाचा जास्त ताण येत आहे. त्यांच्या नेहमीच्या कामांसोबत घरातल्या आजारी माणसांची जास्त काळजी घेणे, दिवसभर घरात असलेल्या मुलांना गुंतवून ठेवणे, त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे आणि घरात असेल तेवढ्याच अन्नधान्यातून रुचकर पदार्थ बनवून घरात कोंडल्या गेलेल्या सर्वांची मर्जी राखणे – या सगळ्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. अनेक महिलांना हिंसक जोडीदारांच्या सोबत अडकून पडावे लागते आहे आणि त्यांच्या पर्यन्त मदत पोचवणे कठीण झाले आहे. जगात सगळीकडे घरगुती हिंसाचारात कित्येक पटीने वाढ झाली आहे असे उघडकीस आले आहे. मेक्सिकोत गेल्या तीन महिन्यात कौटुंबिक हिंसाचारामुळे 1000 महिलांचे खून झाले आहेत. भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगानेही देशातल्या देशातल्या वाढत्या कौटुंबिक हिंसेच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे. कार्यालयातले काम ऑनलाइन करावे लागत आहे आणि अनेक मुलींना ऑनलाइन शैक्षणिक वर्गात सहभागी व्हावे लागते आहे. त्यामुळे त्यांच्यावर सायबर हिंसा होण्याचे प्रमाण वाढले आहे.

गर्भवती महिलांना वैद्यकीय मदत मिळण्याच्या बाबतीत खूप गैरसोय होते आहे. सर्वसामान्य महिलांना सॅनिटरी नॅप्किनस् मिळणेही अवघड झाले आहे. विविध संस्था मदतीसाठी पुढे येत असल्या तरी त्या अपुऱ्या पडत आहेत. एकवेळ महिलांना काही प्रमाणात मदत मिळाली तरी ट्रान्सजेंडर व्यक्तींना मदत द्यायला अनेकजण नकार देत आहेत. सध्याची ही आपत्ती निरनिराळ्या लिंगभावाच्या व्यक्तींवर वेगवेगळे परिणाम करते आहे ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही. समाजातल्या विविध असुरक्षित गटांवर त्यामुळे कोणकोणते परिणाम होत आहेत त्यांची गंभीर चौकशी केली जायला हवी आणि त्यानुसार धोरणे आखली जायला पाहिजेत. तसेच ही धोरणे नुसती कागदावर न राहता त्यांची प्रत्यक्षात अंमलबाजवणी करायला पाहिजे. सार्वजनिक आरोग्याविषयीची ही सध्याची आपत्ती टळल्यानंतर मानवी हक्कांना महत्त्व देणारे आणि लिंगभाव समतेवर आधारित जग आपल्याला उभारायचे आहे.


लावण्या अरविंद

सध्या मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत सेंटर फोर डिझास्टर्स अॅन्ड डेव्हलपमेंट या विभागात सहायक प्राध्यापक आहेत.