गावाच्या कारभारणींच्या ओळखीचा संघर्ष

गावकारभारात, निर्णयप्रक्रियेत स्त्रियांनी आपलं वेगळंपण सिद्ध केलं आहे. तरी अजूनही त्यांची ओळख महिला सरपंच अशीच करून दिली जाते. त्यांच्यापुढे असलेल्या राजकीय आणि सामाजिक आव्हानांची चिकित्सा!

73 व्या घटनादुरूस्तीमुळे महिला जाणीवपूर्वक राजकारणात येऊन आता साधारण 28 वर्ष होत आली. महिला सरपंच आणि सदस्यांची तिसरी-चौथी फळी आता कारभारात आहे. एवढा मोठा काळ लोटूनही तिच्याकडे केवळ सरपंच म्हणून पाहिलंच जात नाही. तिची ओळख महिला सरपंच अशीच करून दिली जाते. महिलाम्हणून येणाऱ्या सर्व सामाजिक आणि मानसिक आव्हानांना तिला तोंड द्यावं लागतं. महिला असल्यामुळे तिच्यासमोरची राजकीय आणि सामाजिक आव्हानं जरा जास्तच असतात. घटनादुरूस्तीच्या सुरुवातीच्या दशकात पंचायतराजमधील स्त्री लोकप्रतिनिधी कोणाच्या तरी सांगण्यावरूनच राजकारणात आली. तेव्हा त्या पतीच्या, कुटुंबातल्या किंवा गावातल्या प्रस्थापितांच्या रबरस्टँप ह्याच भूमिकेत होत्या. आजही काही ग्रामपंचायतींमध्ये हीच परिस्थिती आहे. पण अनेक ठिकाणी धडपडत, उठत, शिकत तिने आपलं अस्तित्व निर्माण केलंय आणि ते टिकवून ठेवलं आहे. तिच्यावर येणाऱ्या सर्व दबावांना ती ताकदीने सामोरी जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 टक्के महिला आरक्षणामुळे पुरूषी दबाव वाढला आहे. 33 टक्के आरक्षण असताना तुलनात्मकरित्या पुरूषी दबाव कमी होता. सुरूवातीच्या काळात आरक्षित जागा लढवण्याकरता महिला उमेदवार शोधाव्या लागायच्या. पण हळूहळू बचतगटांचं जाळं आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने महिला नेतृत्व विकसित होऊ लागलं. महिलांना प्रशिक्षण मिळू लागले. त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव होऊ लागली तशी गावकारभारात गती येऊ लागली. रबरस्टँपच्या भूमिकेतून ती बाहेर पडली. आपल्या सहीच्या अधिकाराला ती न्याय देऊ लागली. कोऱ्या चेकवर सही करायला विरोध करू लागली, कागदपत्र वाचून योग्य असतील तरच सही करू लागली. गावकारभारातल्या कामांचा क्रम महिला सरपंचांनी बदलला. महिलांना ज्या गोष्टींचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो, अशी कामं पटलावर अग्रक्रमानं येऊ लागली. आरोग्य, शिक्षण, पाणी, सुरक्षा, स्वच्छता, जुगाराचे अड्डे बंद करणे आणि दारूबंदी ही कामं तातडीने मार्गी लागू लागली. पुरूष सरपंचांचा ओढा असणारी बांधकामांची मलईदार कामं मागे पडली. कार्यक्षम स्त्री सरपंच असणाऱ्या गावात प्रत्येक कामाचं टेंडर निघतं. कामांचं प्राधान्य पाहून त्याप्रमाणे कामांवर निधी खर्च करण्यात येतो. याचा लेखाजोखा अगदी चोख असतो. ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसभेच्या मंजूरीशिवाय गावात कोणतचं काम होत नाही. टक्केवारीला इथं थारा नसतो. काही प्रस्थापितांकरता स्त्री सरपंचाच्या कामाची हीच पद्धत डोकेदुखी ठरते. मग सुरू होते दबावशाही आणि झुंडशाही. ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंचही या दबावगटात सहभागी असतात. सरपंचबाईंचं म्हणणं असतं, प्रत्यक्ष खर्च झालेल्या रकमेच्या बिलावरच सही करणार. तिला कोंडीत पकडायला खाऊबाज सदस्य खऱ्या कागदपत्रांवर, बिलांवर सह्याच करत नाहीत. प्रस्थापित आणि खाऊबाजांची मिलीभगत असते. मग हे लोक कामांकरता अडवणूक करायला सुरूवात करतात. आरोपांच्या फैरी सुरू होतात, बाई कागदावर सह्या करत नाहीत, बाई कामाचे पैसे खाते. बाई काही काम करत नाही.... गावात सरपंचबाईंच्या नावाने बदनामी सुरू होते. कोणत्याही स्त्रीला मुठीत ठेवण्याकरता चारित्र्य हा तर आपल्या समाजात एक हुकूमी एक्का आहे. याचाही वापर केला जातो. अविश्वास ठराव, सरकार दरबारी महिला सरपंचांच्या विरोधात सतत खोट्या तक्रारी केल्या जातात. महिला सरपंचांना सुनावणीसाठी तारखांच्या चक्रात अडकवून ठेवण्यात येतं. जेणेकरून सरपंचबाई गावात कमी राहील आणि प्रशासकीय कार्यालयात खेटे मारत राहील. पुण्यातील शेवाळवाडीत प्रस्थापितांचा पुरूषी अहंकार आणि महिलासरपंच यांच्यातला हा लढा गेली दोन वर्ष सुरूच आहे. येत्या ऑगस्टमध्ये इथल्या महिला सरपंचांची मुदत संपतेय.
आरक्षणामुळे सरपंचपदी महिला असते, पण उपसरपंचपद खुलं असतं. सर्वसाधारण किंवा खुली जागा पुरूषासाठीच आहे हे गृहितच धरलेलं आहे. बऱ्याचदा हा पुरूष उपसरपंच गावातला प्रस्थापित वा माजी सरपंचही असतो. त्याला नाईलाजास्तव उपसरपंचपदी बसावं लागतं. याला कारभार आपल्याच हातात हवा असतो. अगदी ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यावर बसण्याची खुर्ची यातही हे मानापान दिसून येतं. सरपंचपदी असणाऱ्या बाईंना काही कळतं नाहीअशाच पद्धतीने बोलणं सुरू असतं. महिला सरपंचांचं खच्चीकरण करणं सुरू असतं. उपसरपंच सरपंचबाईंना धाकातच ठेवू पाहतात. अमरावतीमधील असदपूरच्या सरपंचबाईंनी गावात आरोग्यकेंद्राकरता खटपट केली. निधी आला, ग्रामपंचायतीच्या समोरच बांधकामही सुरू झालंय. पण उपसरपंच या कामामध्ये काही ना काही कारणाने आडकाठी करत आहेत. तुम्हांला काही अधिकार नाही अशी भाषाही उपसंरपंचांकडून केली जाते. सरपंचबाईंना इतर महिला सदस्यांचा पाठिंबा असेल किंवा प्रशिक्षणातून तयार होऊन खमकी असेल; तर मग ग्रामसभा, विशेषसभा बोलावून ती या दबावातून मार्ग काढते. महिलासभेच्या ताकदीचा ती सकारात्मक वापर करते. सरपंचबाईंचं शिक्षण कमी असेल तर बाईंना सरकारी कार्यालयात जाऊन बोलता येईल का? योजना कळतील का? गावकारभाराचं काय? गावचा निधी वाया जाईल या मुद्द्यांवर गावात विरोधी मत तयार केलं जातं. महिला सरपंच उच्चशिक्षित असली तरीही या परिस्थितीत बदल नसतो. अगदी डॉक्टर असली तरी. मग मुद्दे येतात, बाई खूप शिकल्या आहेत, पण वर्षभर तरी टिकतील का? पुस्तकं वाचून ग्रामपंचायत चालवणं सोप्पं वाटतं यांना, आपल्या कामाकडे जाईल निघून गावाकडे काही बघणार नाही, अशी टीका करण्यात येते. पुरूष सरपंचांच्या शिक्षणाबाबत अशी चर्चा होताना दिसत नाही.
महिला सरपंच आरक्षण असलं की बऱ्याच ठिकाणी सरपंचपद वाटून घ्यायचा दबाव प्रस्थापित टाकतात. म्हणजे त्या आरक्षणात बसणाऱ्या जेवढ्या महिला सदस्या निवडून आलेल्या असतील, त्यांच्यात पाच वर्षांची मुदत वाटून घ्यायची. सर्व महिलांना समान संधी मिळाली पाहिजे असं गावातल्या पुढाऱ्यांकडून सांगितलं जातं. या प्रकाराला विरोध करणाऱ्या महिलेला अविश्वास ठराव किंवा कोणत्याही सबबीखाली राजीनामा द्यायला भाग पाडलं जातं. महिलांमध्येही फूट पाडून सरपंचपदाची लालूच दाखवतात. महिला सदस्यांच्या  कुटुंबीयांचाही दबाव येतो आणि महिला या प्रकाराला बळी पडतात.
पुरूषी मानसिकतेचा फटका महिला सरपंचांना कधी कधी ग्रामसचिवांकडूनही बसतो. ग्रामपंचायतीची कागदपत्र न दाखवणं, सरकारी अध्यादेशांची माहिती न देणं, सतत गैरहजर राहणं, कामात दिरंगाई करणं हे प्रकार केले जातात. ग्रामपंचायतीच्या इतर कर्मचाऱ्यांनाही काम न करण्याचं आयतंच प्रशिक्षण मिळतं. दोन-तीन गावांचं काम पाहायला एकच ग्रामसेवक असेल, तर तिथे ही समस्या आणखीनचं बिकट होते. ग्रामसेवक त्याच्या सोयीसाठी ग्रामपंचायतीची कागदपत्र, टपाल एकाच ठिकाणी ठेवतो. तिथूनच हुकूमत गाजवतो. गावातल्या प्रस्थापितांचीही काही घटनांमध्ये ग्रामसेवकांना फूस असल्याचं दिसून येतं. काही गावांमध्ये मात्र ग्रामसेवक महिला सरपंचांना प्रशासकीय काम समजवण्यात आणि आपलं कर्तव्य पार पाडताना चांगली मदतही करतात. ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये दारूच्या पार्ट्या चालतात. या पार्ट्यांना महिला सरपंचांनी चाप बसवला. त्यामुळे महिला सरपंचांना धमक्या देण्यापर्यंतची मजल गेली. सरपंचबायांनी कायद्याचा बडगा दाखवत हे प्रकार बंद केले. पूर्वी चावडी किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या आसपासही न फिरकणाऱ्या गावातील महिला, महिला सरपंच असल्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये येऊ लागल्या आहेत. ही एक मोठी जमेची बाजू आहे.
झेंडावंदन हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सरपंचपदी महिला असेल तर तिला झेंडावंदनाचा अधिकार नाकारला जायचा. माजी सरपंच, उपसरपंच किंवा पुढाऱ्याच्या हातून ग्रामपंचायतीत झेंडावंदन केलं जायचं. झेंडावंदनावरून गावात मानापनाची नाटकं रंगायची. गावाची प्रमुख म्हणून आपल्या या अधिकाराकरता सजग असणाऱ्या महिलांनी याकरता मोठा झगडा केला. सामाजिक संस्था आणि बचतगटांचंही त्यांना पाठबळ मिळालं. त्यामुळे शासनाला महिला सरपंचांच्या हस्तेच झेंडावंदन करायचं असा अध्यादेश काढावा लागला. महिला सरपंच ग्रामपंचायतीत झेंडावंदन करू लागल्या. मात्र काही ठिकाणी पुरूषी मानसिकतेचा पगडा महिलांच्या डोक्यावरूनही उतरत नाही. हे जोखड असणाऱ्या महिला सरपंच, गावातील वयस्कर पुरूष प्रस्थापिताला आपला झेंडावंदनाचा अधिकार देतात. अशाच एका सरपंचबाईंना मी म्हटलं, अहो ताई हा सरपंच पदाचा अधिकार आहे. तुम्हीच तो बजावला पाहिजे. तुम्ही उद्या सरपंचपदी नसाल तर तुम्हांला हा अधिकारही नसेल. त्यामुळे गावप्रमुख म्हणून तुमचा अधिकार, सन्मान बजावलाच पाहिजे. या बाईंचं उत्तर होतं, याच गावात माहेर आणि सासर आहे माझं. गावातले मोठे आहेत ते माझे. असं कसं मी त्यांच्यासमोर जाऊन झेंडा फडकवू? बरं नाही दिसत ते. दहावी झालेल्या या बाईंनी लग्नानंतर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर स्वतःचा डिटीपी आणि प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय सुरू केला.  
सरपंचपती हे स्वयंघोषित पद खूप ठिकाणी मिरवलं जातंय. एखाद्या गावात तुम्ही गेलात की सरपंचबाईंऐवजी त्यांचे पती येतात आणि बोलू लागतात, सरपंचमॅडमच सर्व काम पाहतात. मी कशातच नसतो. हे बघा हे काम झालंय, ते झालंय. सर्व त्यांनीच केलंय. मी कुठेच नसतो. तिचं काम तिच पाहते. मी कधी ऑफिसमध्ये पण जात नाही. तिच करते सर्व असा संवाद झाला की हमखास समजायचं, आपण सरपंचपती सोबत बोलतोय. एका गृहस्थांनी तर फोनवर स्वतःची ओळख करून देताना मला सांगितलं, नमस्कार, मी सरपंचपती xxxxxxx बोलतोय. अशा घरातील महिला सरपंचांना आमंत्रणपत्रिका, कागदपत्रं, बातमी किंवा बोलतानाही त्यांच्या नावापुढे पतीचं संपूर्ण नाव लिहिण्याचा दबाव असतो.  महिला सरपंच बाहेरच्या परिस्थितीला खूप हुशारिने हाताळू लागल्या आहेत. पण घरातल्या विषमतेला तोंड देणं अजून जड जातं. परभणीमध्ये हुंडाबळीच्या, अत्याचाराच्या केसेस सोडवणं, महिलांना शिवणकामाचं प्रशिक्षण देणाऱ्या एक बाई आरक्षणातून सरपंच म्हणून निवडून आल्या. त्यांचे पतीही सदस्य म्हणून निवडून आले. गावातील कार्यक्रमांचे फोटो, बातम्यांची कात्रण ह्या बाई मला दाखवत होत्या. सर्व फोटोंमध्ये बाई कुठेतरी कोपऱ्यात होत्या किंवा नव्हत्याही पण सरपंचपती मात्र प्रत्येक फोटोच्या मध्यभागी होते. बॅनर्सवर, वृत्तपत्रातल्या बातम्यांमध्ये त्यांचा सरपंचपती म्हणून उल्लेख होता. आपल्या बायकोच्या नावापुढे सौ लावून त्यांचं पूर्ण नाव लिहिण्याचा दबाव ते माझ्यावर टाकत होते. बायकोवर प्रचंड आगपाखड केली. मी त्याला जुमानलं नाहीच. त्या सरपंचबाईंशी या सगळ्याबद्दल बोलले.  त्या म्हणाल्या, नवरा त्याचं नाव मिरवून खूष होतोय, गावाची काम होतायत आणि काय हवं. पद पाच वर्ष आहे. संसार आयुष्यभर टिकवायचा आहे ना. त्यांचं म्हणण मला पटलंही पण अस्वस्थही झालं.
महिला लोकप्रतिनिधीला समाजकारण, राजकारण, अर्थकारण हे सर्व शिकून परिवारातला तोलही सांभाळावा लागतो. स्त्रियांना राजसत्तेत आरक्षण मिळालं. होतकरू स्त्रिया यशस्वीपणे कारभार करू लागल्यात. गावकारभारात, निर्णयप्रक्रियेत स्त्रियांनी आपलं वेगळंपण सिद्ध केलं. पण कितीही कायदे, आरक्षण आलं तरी जोपर्यंत पुरुषी अहंकार आपल्या समाजातून कायमचा जात नाही, तोपर्यंत महिलेला मोकळेपणाने काम करणं कठीण आहे. याच पुरूषी अहंकारापोटी सरपंच, पंचायतसभापती आणि जिप अध्यक्षा या पदाचा एक कार्यभार पूर्ण झाल्यावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या टर्ममध्ये ह्या महिला फार क्वचितच दिसतात. जेवढ्या वेगाने त्या राजकारणात येतात त्याच वेगाने त्या बाहेरही पडतात.

साधना तिप्पनाकजे


अमेरिकेतली भारतीय स्त्रीवादी!

मला माझ्या भारतीय असण्याची लाज वाटत नाही आणि स्त्री असण्याची तर अजिबातच नाही.
अमेरिकेत सत्तावीस वर्षांपेक्षा अधिक काळ घालवल्यानंतर माझी स्वत:ची अशी सांस्कृतिक आणि लिंगभाव ओळख तयार झाली आहे.

स्त्री असणं म्हणजे नेमकं काय असतं? स्त्री कशी असावी हे नियम कोण ठरवतं ? तिचे विचार, भावना काय असाव्या? तिने काय केलं पाहिजे? माझ्या पूर्ण आयुष्यात मला हे प्रश्न कधी पडले नाहीत, तरीही हे प्रश्न हाच माझ्या स्त्रीवादाचा गाभा आहे.
अत्यंत पारंपारिक आणि पुराणमतवादी मराठी कुटुंबात जन्मल्यामुळे अगदी लहानपणापासून मुलीसाठी आखलेल्या अत्यंत बंदिस्त चाकोरीतच मला वावरावं लागत होतं. या अन्यायविरुद्ध सतत प्रश्न विचारत राहणं हा माझा स्थायीभाव झाला. समाज विशेषतः भारतीय समाज हा कसाही असला तरी समानता असलेला असू शकत नाही हा माझा समज पक्का झाला. मी जसजशी मोठी होत होते आणि पुढे १९९२ साली अमेरिकेत आल्यावर भारतीय समाजातला लिंगाधारित भेदभाव हा आणखी गडद जाणवत गेला.
१९९५ साली मी भारतात गेले असतान एका किशोरवयीन मुलीने मला विचारलं “अमेरिकेतलं तुला काय आवडतं? या प्रश्नाला ‘स्वातंत्र्य!’ हे तत्क्षणी माझं उत्तर होतं. हो, इथे मला समानतेसाठी माझं कुटुंब, सहकारी, समाज याच्याशी रोज झगडावं लागत नव्हतं. तरीही मी अमेरिकन समाजाचा भाग नाही ही भावना अनेक वर्ष मला छळत होती. मी या मातीतली नाही ही भावना मी स्त्री आहे यापेक्षाही भारतीय असल्याने जास्त आहे हे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना माझ्या लक्षात आलं. माझा वर्ण, माझे उच्चार, माझे कपडे, माझं असलेलं सर्व काही मला इतर लोकांहून भिन्न आहोत हे ठसवत असे. स्वत:ला इतरांपेक्षा वेगळ समजणारी माणसं साहजिकच आपल्यासारखी वैशिष्ट्य असलेल्याच माणसात राहून स्वत:ला आणखी कोशात बंद करून घेतात. परंतु मी या पठडीची शिकार झाले नाही कारण भारतीय समाजही मला स्वत:ला आपलासा वाटायचा नाही. वेगवेगळ्या पारंपरिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींबरोबर माझी खूप घट्ट मैत्री झाली. माझी एक कॉकेशियन (युरोपियन वंशाची अमेरिकन) मैत्रीण आहे आमची भौगोलिक, कौटुंबिक पार्श्वभूमी, आमच्या कामाचं स्वरूप भिन्न असूनही तिची आणि माझी घनिष्ट मैत्री झाली आणि ती कायम आहे. माझ्या मैत्रीत मी भारतीय असण्याचा काही प्रभाव पडत नाही. मी भारतीय असणं हा माझा एक भाग असला तरी आमच्या मैत्रीत अ-भारतीय मित्रांनी काही फरक करावा इतकं ते माझं वैशिष्ट्य ठरत नाही.
एक स्त्री म्हणून सगळीकडच्या बायकांबरोबर मी सहज जोडली जाते हे वैश्विक सत्य आहे. साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या माझ्या कॉकेशियन बॉसबरोबर गप्पा मारत असताना दोघींना सूर्यास्तानंतर अंधाऱ्या पार्किंग लॉटमध्ये जावं लागलं तर खूप अस्वस्थ वाटतं हा अनुभव दोघींसाठी सारखाच असतो. त्यावेळी आमचा वर्ण काय आहे याने काही फरक पडत नाही अंधाऱ्या पार्किंगमध्ये बाई एकटी असण्याचा अनुभव हा आम्हा दोघींना जोडणारा समान धागा आहे. मला खात्री आहे सगळीकडच्या बहुतांश स्त्रिया माझी ही भीती समजू शकतात. स्त्री म्हणून आपल्यात फरक करणाऱ्या वैशिष्ट्यांपेक्षा आपल्याला जोडणाऱ्या गोष्टी जास्त आहेत यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
अमेरिकेतल्या सध्याच्या राजकीय वातावरणात स्त्री म्हणून मला भीती वाटते आणि माझ्या वर्णामुळे ती आणखी वाढते. ट्रम्प प्रशासनाच्या प्रत्येक धोरण बदलामुळे स्त्रीवादी चळवळ किमान ५० वर्ष मागे ढकलली जात आहे. व्हिक्टोरिया वुडहॉल, ग्लोरिया स्टेनमॅन यांच्यासारख्या दिग्गज महिलांच्या परिश्रमातून उभी राहिलेली, अमेरिकेतली १५० वर्षांचा देदीप्यमान इतिहास असलेली स्त्रीवादी चळवळ या प्रशासनाचे सर्व हल्ले पचवेल असा मला दृढ विश्वास आहे.
अमेरिकेत राहाणारी भारतीय स्त्री म्हणून आलेल्या अनुभवाने माझे डोळेच उघडले. कौटुंबिक हिंसा करणाऱ्यांचे समुपदेशन करण्याच्या एक वर्षाच्या प्रकल्पावर समुपदेशक म्हणून काम करत असताना मला अनेक भारतीय पुरुषांबरोबर बोलण्याचा प्रसंग आला, माझ्या गोऱ्या अमेरिकन सहकाऱ्यांपेक्षा माझ्याशी त्यांचं वागणं वेगळं असायचं. माझ्या वर्गात ते मला आडवे प्रश्न विचारायचे, मी त्यांना प्रश्न विचारल्यावर माझा अपमान करायचे, माझ्याबद्दल असलेला त्यांचा दुस्वास त्यांच्या शरीरबोलीतून प्रतीत व्हायचा. मी भारतीय आणि स्त्री असणं या दोन कारणांमुळे ते माझ्याशी असं वागतात हे मला कळत होतं. मला आठवतंय एका पंजाबी पुरुषाने त्याच्या बायकोला मारल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली आणि त्याला पोलिसांनी अटक केली. माझ्या समुपदेशन वर्गात बसायला नाखूष असणं हे नेहमीचच होतं. पण भारतात स्त्रियांना पुरुषांच्या समान वागणूक मिळते या त्याच्या ठाम मताला मी आक्षेप घेतल्यावर तो आक्रमक झाला. त्याने माझ्याशी वाद घातला त्याच्या आई वडिलांच्या लग्नाच्यावेळीही (जे तेव्हा सत्तरीत होते) भारतात स्त्री-पुरुष असमानता नव्हती असं तो म्हणाला. अशा तऱ्हेने पूर्ण कचाट्यात सापडल्यावर मी त्याला विचारलं, स्त्री पुरुष समान आहेत अशा संस्कारात वाढूनही बायकोवर केलेल्या हिंसेचं तू कसं समर्थन करतोस? यावर त्याच्याकडे उत्तर नव्हतं त्यामुळे त्याला माझा आणखी राग आला. हा काही एकमेव अनुभव नव्हता. यावरून भारतीय संस्कृतीच स्त्रियांना कमी लेखते हे नाकारण्यासाठी भारतीय पुरुष कोणत्या थराला जाऊ शकतात एव्हढच या उदाहरणावरून कळतं. आजचा भारत कदाचित वेगळया मार्गावरून चालला असेल, पूर्वी नाकारलेल्या अनेक संधींचा आज स्त्रियांना लाभ मिळत आहे, तरीही स्त्रियांवर सातत्याने होणाऱ्या हिंसेचे भयंकर प्रसंग पाहिल्यावर आपल्याला प्रश्न पडतो, अजून किती पल्ला गाठायचा आहे?
अमेरिकेत सत्तावीस वर्षांपेक्षा अधिक काळ घालवल्यानंतर माझी स्वत:ची अशी सांस्कृतिक आणि लिंगभाव ओळख तयार झाली आहे. मला माझ्या भारतीय असण्याची लाज वाटत नाही आणि स्त्री असण्याची तर अजिबातच नाही. इतक्या वर्षात इथला भारतीय समाज हा सामाजिक न्यायाचं तत्व जपणारा आणि शांतताप्रिय समाज असून स्थिर आणि प्रगतीशील आहे हे सिद्ध करण्यात सफल झाला आहे. कदाचित ‘बे एरिया’त रहात असल्यामुळेही माझी अशी धारणा झाली असण्याची शक्यता आहे. पण हा अमेरिकेमधील फक्त एक भाग झाला. इथे युरोपियन अमेरिकन लोकांची संख्या एवढी नाही आणि भरपूर सांकृतिक वैविध्य आहे त्यातही बहुसंख्य भारतीय आहेत.
मी शिक्षणक्षेत्रात काम करते. एक भारतीय स्त्री म्हणून इथे मला जो भेदभाव अनुभवायला मिळतो,तो अप्रत्यक्ष असला तरी त्याचं लक्ष्य मीच असते! माझी एक माजी सहकारी ( माध्यमिक शाळेतली सह शिक्षिका) ६ वीतल्या विद्यार्थ्याच्या भारतीय पालकांबरोबर घमासान चर्चा केल्यानंतर मला . म्हणाली, “भारतीय पालकांशी बोलणं एव्हढ कठीण का असतं?’ आपण कुणाशी बोलतोय हे लक्षात आल्यावर वरमून म्हणाली ‘नाही म्हणजे आता जे पालक गेले त्यांच्याबद्दल बोलतेय.” मी तिला तिच्या सरळ सरळ वर्णद्वेषी शेऱ्याबद्दल काहीच बोलले नाही उलट तिला विचारलं तिला कधी कोणी चांगले भारतीय पालक भेटले आहेत का? तिने लगेच मी कशी इतर भारतीय पालकांहून वेगळी आहे हे सांगायला सुरुवात केली. या व्यक्तीचे भारतीयांबद्दल खूप पूर्वग्रह होते. ज्याचं माझ्या सुजाण पालकत्वाचं कौतुक करून ती समर्थन करू पाहत होती. दुर्दैवानं ती एकटीच अशी आहे असं नाही. वीस वर्षाहून अधिक वर्षं शिक्षणक्षेत्रात घालवल्यावर स्वत:च्या वर्णद्वेषी विचारांची कल्पना नसणारे अनेकजण मला भेटले. इथे बदल घडवायचा या उद्देशानेच मी शिक्षण हे माझं कार्यक्षेत्र निवडलं.
भारतीय पालक अमेरिकेत मुलांना कसे वाढवतात हे माझ्या अभारतीय सहकाऱ्यांसाठी मोठं कोडं असतं. कूपर्टीनो स्कूल या अत्यंत स्पर्धात्मक शाळेत मी गणित/ विज्ञान शिक्षिका म्हणून काम करते. आमच्या शाळेत बहुसंख्य मुलं भारतीय आहेत. भारतीय पालकांचं वर्तन मला माझ्या सहकारी शिक्षकांना सतत समजावून सांगावं लागतं. काही पालक मुलांना जरा जास्तच मोकळीक देतात. तर काही खूप कडक शिस्तीचे असतात, किंवा अनेक भारतीय आया जेवणाच्या सुट्टीत घरी केलेला डबा मुलांना का आणून देतात? माझ्या शाळेत मी एकच भारतीय शिक्षिका असल्याने मी भारतीय समाजाची तथाकथित तज्ञ झाली आहे!
पण मी कोणत्याही अंगाने भारतीय समाजाची तज्ञ नाही याची मला जाणीव आहे. भारतात लहानाची मोठी झाल्याचा अनुभव असल्याने त्याबाबतीत मात्र मी तज्ञ आहे. एक स्त्रीवादी स्त्री म्हणून भारतात राहणं एक आव्हान होतं. भारतीय समाजाचं पितृसत्ताक स्वरूप मला कधीच रुचलं नाही. अगदी आजही मी जेव्हा जेव्हा भारतात जाते, तेव्हा काही गोष्टी मला खूप खटकतात. नवीन पिढीची चळवळ समानतेच्या दिशेने आश्चर्यकारक वेगाने चालू आहे. मुलीच्या वागण्या बोलण्याबद्द्लचे जुने नियम गळून पडत असताना नवीन नियम तयार व्हायला पाहिजेत. या पोकळीतून स्त्री आणि पुरुष दोघेही स्वत:च वाट काढत आहेत. अर्थात हे फार मोजक्या लोकांचं वास्तव आहे. भारतात आजही अनेक स्त्रियांना त्यांचा आवाज मिळालेला नाही. एका बाजूला तरुण मुली आणि स्त्रिया आपले म्हणणे मांडत आहेत; त्याचवेळी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्याची हिंमत केली म्हणून मुलीवर बलात्कार झाल्याचं वाचण्यात येतं. स्त्रीवादी चळवळीच्या बाबतीत भारतात विरोधाभासी चित्र दिसतं, ते मला स्पष्ट कळत नाही.
माझ्या वीस वर्षाच्या भाच्याबरोबर बोलताना त्याच्या मित्राच्या वडिलांनी त्याच्या घनिष्ट मित्राच्या होणाऱ्या बायकोला लग्नानंतर नोकरी करण्यास कशी मनाई केली हे सहजच सांगितलं. हे ऐकून मला धक्का बसलेला पाहून तो म्हणाला, “... पण मावशी, ती मुलगी इतकी त्रासदायक आहे ना!” ती त्रासदायक आहे म्हणून तिच्या भावी सासरच्या लोकांनी तिच्यावर निर्बंध घालावेत याचं समर्थन होऊ शकत नाही! बळी पडलेल्यांनाच दोषी ठरवण्याचा प्रघात दोन्ही समाजात दिसतो. अगदी अमेरिकेतही स्त्रिया रोज नवीन अडथळे तोडत असल्या तरी.
पूर्वीच्या ओबामा प्रशासनाने स्त्रियांना प्रत्यक्ष लढाऊ लष्करात सामील करून घेतलं असलं तरी हिलरी क्लिंटन यांना राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अजुनही जिंकता आलेली नाही. “अमेरिका अजूनही महिला राष्ट्राध्यक्षासाठी तयार झालेली नाही” असं अगदी उदारमतवादी पंडितही कित्येकदा म्हणताना मी ऐकलं आहे. काय हे? महिला नेत्यासाठी देशाला ‘तयार’ व्हावं लागतं?
स्त्रियांचं समाजात विशिष्ट स्थान आहे हा समज आजही दृढ आहे, आणि तरुण पिढी आजही काही प्रमाणात अनिच्छेने का होईना या समजामध्ये अडकलेली आहे. जुने विचार ठाण मांडून बसले असताना नव्यासाठी अवकाश तयार होणार नाही. माझ्या दृष्टीकोनातून भारतात ज्या पद्धतीने स्त्रीवादी चळवळ जोमाने पुढे जात आहे त्याच्या मुळातच गडबड आहे. तर अमेरिकेत एक राजकीय पक्ष स्त्रीवादाची पद्धतशीर वाट लावत आहे. समाजमाध्यम आणि भारतीय लोकसंस्कृतीत स्त्रीवादी चळवळीबद्दलचा संभ्रम स्पष्ट जाणवतो. एक सोडून दुसरा निर्णय घेणे म्हणजे स्त्रीवाद नव्हे तर पटेल तो कोणताही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असणं म्हणजे स्त्रीवाद.
अमेरिकन असो वा भारतीय, माझी स्त्री म्हणून असलेली ओळख मला खूप प्रिय आणि मोलाची आहे. जर मला कोणत्याही स्त्रीला काही संदेश द्यायचाच असेल तर माझं एकच सांगणं असेल – ‘तू कोण आहेस, तू कशामुळे ‘तू’ आहेस? आणि तुझ्या अंतर्मनात काय प्रकाशमान आहे? ते ओळख! इतर कोणालाही तू कोण आणि काय आहेस हे ठरवण्याचा अधिकार देऊ नको!’


कल्पना थत्ते


इंद्रधनुष्य

स्वत:चा निराळा लैंगिक कल असणाऱ्या मुलाचे अनुभव आणि निरीक्षणे


·         
माझं डोकं त्याच्या छातीवर होतं. तो म्हणाला, "काय झालं?"

मी म्हटलं, "काही नाही. तुझ्या हृदयाचे ठोके ऐकतोय."

तो म्हणाला, "आजची रात्र इथेच राहा ना."

मी म्हटलं, "नको. ऑफिस आहे उद्या."

तरंगतच घरी गेलो. काही दिवसांनी त्याला मेसेज केला, "आपण पुढे काय करायचं?"

तो म्हणाला, "काय करायचं म्हणजे? तुला काय साखरपुडा वगैरे करायचाय का?" आणि हसला.

पुन्हा एकदा माझ्या मनातली आशा मावळली.

मी त्यावेळी तेवीस वर्षांचा होतो आणि तो तेहत्तीसचा.

आता वयाची तिशी ओलांडल्यानंतर जेव्हा फेक अकाऊंटवरून मला वीस-एकवीस वर्षं वय असलेल्या मुलांच्या फ्रेंड रिक्वेस्ट्स येतात आणि मी मित्र असल्यासारखा त्यांच्याशी बोलू लागतो, तेव्हा हळूहळू ती खुलतात. आपल्या समस्या माझ्याकडे मांडू लागतात. मी त्यांना एवढा विश्वासार्ह वाटतो याचा आनंदही होतो. 
... 
स्त्री-पुरुषाचं नातं हे समाजमान्य असल्यामुळे ब्रेकअप नंतर अन्याय झालेल्या पक्षाला खांदा देण्यासाठी सारा समाज तयार असतो. समलैंगिकांच्या विश्वात मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे. एकतर पार्टनर मिळणं मुश्किल. त्यात एखाद्या नशीबवान मुलाला तो मिळालाच, तर त्या प्रियकराचे सगळे हुकूम प्रेमाखातर शिरसावंद्य मानले जातात. कारण तो निघून गेला की पुन्हा नवीन कुणी मिळेलच, मनासारखा मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे कधीकधी शारीरिक छळवणूक, कधी मानसिक त्रास, धमक्या वगैरे सहन करूनसुद्धा अशी मुलं नातं रेटत राहतात. ती जो छळ सहन करत असतात, ते पाहून वाईटही वाटतं.
मी कुठेही बाहेर जाणार असेन किंवा उशिरा येणार असेन, तेव्हा बाबा हजार प्रश्न विचारून भंडावून सोडतात. ते बऱ्याचदा इरिटेटिंग वाटत असलं तरी आत कुठेतरी माझा मेल इगो सुखावतो त्याने. दुसऱ्या कुणी माझ्यावर त्यांच्याइतकं प्रेमच करू नये, हा त्यांच्या इगोचा त्या काळजीतला अंडरकरंट मला स्पष्टपणे जाणवतो. पण तो हक्क अर्थातच माझ्या जन्मापासून त्यांना मिळत असला तरी सुरुवातीच्या विरोधानंतर मी आता तो त्यांना स्वतःहून देऊ केलाय. इतक्या वर्षांत आमच्या नातेसंबंधांचा पोत बदलत गेला असला, तरी वरवर कातळासारख्या वाटणाऱ्या या दोन पुरुषांच्या नात्याखालून एक निखळ प्रेमाची नदी आम्ही दोघांनीही संथपणे सतत वाहती ठेवली आहे.
थोड्याफार फरकाने सर्वच मुलांचे पालक आपल्या मुलांबद्दल असे पझेसिव्ह असतात. समलिंगी मुलांचं चुकतं ते इथे की त्यांना आपल्या पार्टनरवर शक्य तितक्या लवकर हक्क प्रस्थापित करायचा असतो. जो प्रस्थापित करायला आईवडिलांना इतक्या वर्षांचं प्रेमाचं सिंचन करावं लागतं, तो समलिंगी मुलांना एका सेक्स डेटमधल्या प्रणयाच्या धबधब्यात मिळवायचा असतो. तो मिळाला नाही की मग प्रेमाबद्दल मन शंका घेऊ लागतं. प्रेम उद्ध्वस्त करतं हे खरंच, पण ते रुजायला वेळ लागतो, वाट पाहावी लागते. मळलेल्या विवाहाच्या वाटेवरच विरोधाचे एवढे काटे पसरलेले असताना समलिंगी संबंधांमध्ये तर जास्तच... हे जेव्हा समलिंगी मुलांना कळेल, तो सुदिन!
... 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करायला मी माझ्या गे ग्रुपसोबत एका रेस्टॉरंटमध्ये जातो. तिथे एखाद्या सर्पोद्यानात काचेच्या पेटाऱ्यात साप ठेवले असावेत, त्याप्रमाणे वेगवेगळ्या मापांचे, आकारांचे पुरुष मॉडेल्स काचेआड उभे राहून आम्हांला इशारे करत असतात. आमचा गट चेकाळतो आणि आरोळी ठोकतो, "Kudos to our freedom..."
सर्वजण टेबलवर स्थानापन्न होतात. काही घोळक्यात, काही एकेकटेच. मी त्या सर्व स्वातंत्र्याची नशा चढलेल्या गर्दीपासून दूर एका टेबलवर जाऊन बसतो. पुरुषांच्या मांसाला चटावलेली एवढी गर्दी पाहून वेटर्स भराभर ऑर्डर्स घ्यायला येतात. कुणी एखादा हडकुळा पोरगा ऑर्डर करतो. कुणाला गुलाबी ओठांचा कुणी मदन हवा असतो. माझं लक्ष काचेपलीकडच्या एका धष्टपुष्ट सिक्स पॅक अॅब्स असणाऱ्या देखण्या पुरुषाकडे जातं. त्याचा अवाढव्य प्राईज टॅग पाहून वाॅलेटमध्ये कार्ड्स आहेत ना हे मी एकदा तपासून पाहतो. त्याच्याकडे बोट दाखवून मी वेटरला म्हणतो, "मला तो हवाय."
वेटर त्याचा देह माझ्या टेबलवर आणून ठेवतो. त्याच्या भरलेल्या देहाकडे पाहून माझी भूक आधीच चाळवलेली असते. वेळ न घालवता मी त्याच्या शर्टाची बटणं काढतो आणि त्याच्या मांसल छातीत काटा आणि सुरी खुपसून मांसाचा एक तुकडा कापतो. प्लेटमध्ये काढून घेतो आणि मिटक्या मारत खाऊ लागतो. त्याच्या छातीच्या हाडांचा पिंजरा बाजूला करत मी आणखी खोल जात पुन्हा काटा खुपसतो आणि तेवढ्यात रक्ताची एक चिळकांडी उडते. माझ्या भुकेखातर बलिदान दिलेल्या त्या देहाच्या आत हृदय अजून धडधडत असतं. मी काटा पुन्हा हातात घेतो आणि माझा गिल्ट दाबण्याचा प्रयत्न करत पुन्हा हृदयात खुपसतो. 'मला प्रेम हवंय, फक्त सेक्स नको' अशी आर्त किंकाळी ठोकत ते हृदय धडधडत माझ्या प्लेटमध्ये येऊन पडतं आणि चक्क रडू लागतं... आणि तेव्हाच शेजारी ठेवलेल्या फोनमधला अलार्म वाजून मी झोपेतून जागा होतो.
... 
स्त्रियांबद्दल स्ट्रेट पुरुषांना वाटणारं आकर्षण जितकं नैसर्गिक, तितकंच देखण्या पुरुषांचा घोळका पाहिल्यावर हे सगळे समलैंगिक असतील तर किती बरं होईल, असं समलैंगिक पुरुषांना वाटणंही नैसर्गिक. (माझी तर अशी विचित्र फँटसीच आहे की चर्चमधल्या फादरकडे असतं ना त्या 'होली वॉटर'मध्ये अशी काहीतरी जादुई शक्ती यावी की ते शिंपडलं की आपल्याला हवा असणारा पुरुष गे व्हावा आणि अर्थात त्यालाही आपण आवडावं... 'जादू तेरी नजर' नाटकातल्या त्या जादूच्या मुळीसारखं...) म्हणूनच मग अशा घोळक्यातल्या प्रत्येक नराचं लक्ष वेधून घ्यायचे गे पुरुषांचे प्रयत्न इतर दुनियेला कितीही वावगे वाटत असले, तरी त्यात चुकीचं काही नाही. पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या कळपातल्या मादीने नरांना किंवा नराने माद्यांना भुलवण्यासाठी केलेल्या विभ्रमांइतकीच ती भावना सुंदर आणि नैसर्गिक असते. चुकून त्यांच्यापैकी कुणाची नजर पडली की काळजाचा ठोका चुकून नजर दुसरीकडे वळत असली, तरी मनात मात्र पार्श्वसंगीतासारखं 'राजसा... जवळी जरा बसा' आपोआप सुरु झालेलं असतं.
स्ट्रेट पुरुषांच्या प्रेमात पडणं ही समस्त गे कम्युनिटीची सर्वांत मोठी समस्या आहे. विकतचं दुखणं म्हणा हवं तर. पण हा महाभयंकर रोग एकदाही जडला नाही असा समलिंगी पुरुष शोधून सापडणं कठीण. बरं, त्यातही तो 'स्ट्रेट' पुरुष समजूतदार असेल तर ठीक. नाहीतर त्याचं प्रेम तसंही नशिबात नसतंच, मैत्रीही तुटते, शिवाय त्याने आणखी चार जणांना त्याच्यावर एकतर्फी प्रेम करणार्‍या याच्याबद्दल सांगून त्याची बदनामीच करण्याच्या शक्यता अधिक. पण स्ट्रेट पुरुषांसाठी झुरून स्वतःच्या आधीच गुंतागुंतीच्या असणार्‍या आयुष्यातला झांगडगुत्ता वाढवणारे माझे मित्र पाहिले की मला वाईट वाटतं त्यांच्याबद्दल. 
... 
"माझ्यावर लहानपणी लैंगिक अत्याचार झाला आणि मी 'असा' 'झालो'," असं म्हणणारे समलैंगिक पुरुष समलैंगिकतेविषयीच्या गैरसमजांनाच खतपाणी घालत असतात. कुणावरही कधीही झालेला लैंगिक अत्याचार हा वाईटच, याविषयी दुमत नाही. पण त्यामुळे कुणाचाही विशिष्ट लैंगिक कल तयार होत नाही किंवा त्यात कोणत्याही प्रकारे बदलही होत नाही. लहानपणी झालेल्या लैंगिक अत्याचाराची परिणती भीती, कुतूहल अशा दबलेल्या भावनांमुळे वाट फुटेल तशी समलैंगिक आकर्षणात व्यक्त होत असेलही कदाचित, पण एखाद्या अशा घटनेमुळे किंवा अपघातात एका विशिष्ट वयात कधी समवयस्क मित्रासोबत घेतलेल्या 'तशा' अनुभवामुळे कुणीही समलैंगिक 'होत' नाही. त्यामुळे कधीतरी जेव्हा समलैंगिक पुरुषच एकमेकांना "तू या 'लाईनमध्ये' कसा आलास?" वगैरे प्रश्न विचारतात, तेव्हा फिस्सकन हसणं मला आवरता येत नाही. 'लाईन' म्हटलं की फिल्मलाईन वगैरे शब्दच पटकन डोक्यात येतात माझ्या. पुरुष आवडण्याच्या 'लाईनमध्ये' कुणी 'येत' नसतो. तो तिथे जन्मापासूनच असतो किंवा नसतो.
... 
मी कॉलेजमध्ये वगैरे असेन तेव्हा. मी आणि आई एकदा बस स्टॉपवर थांबलो होतो. तिथेच जवळ दोन मुलगे उभे होते. त्यांतील एकजण दुसऱ्याशी खूप लाडीकपणे बोलत होता. त्याच्या खांदयावर वगैरे हात टाकत होता. ते पाहून आई हसली आणि 'बायल्या' हा शब्द उच्चारला तिने. अर्थातच त्याला ऐकू येणार नाही अशा पद्धतीने. पण मला मात्र तो ऐकू आला आणि तेव्हाही तिडीकच गेली डोक्यात. पण तिला समजावण्याच्या वगैरे भानगडीत मी पडलो नाही. कारण तेव्हा मीच झुंजत होतो स्वतःशी. ते दोघे कसे का वागेनात, त्यामुळे तुम्हांला त्रास तर होत नाहीये ना, मग त्यांना 'बायल्या' वगैरे म्हणण्याचा हक्क तुम्हांला कुणी दिला? पण हे सगळं बोलायचं तेव्हा मनातच राहून गेलं.
... 
लहानपण आठवलं की अजून एक गोष्ट आठवते. माझ्यावर रागावताना माझ्या अत्यंत जवळची एक व्यक्ती मला 'हिजड्या' म्हणत असे. तेव्हा त्या शब्दाचा अर्थही माहित नव्हता, कळला तेव्हा राग आला होता. पण तो व्यक्त करायला ती व्यक्ती नव्हती या जगात. नंतर हळूहळू नवीन शब्द कळत गेले. 'गुड', 'मीठा' वगैरे. मित्रांनीच भेट म्हणून दिलेले. पण त्यावेळी मात्र मी हे सगळं सहन करणं सोडून दिलं होतं. आताही कुणी या शब्दांत काही बोलू लागलं की मग मीही माझा मूळचा शांत स्वभाव गुंडाळून ठेवतो. तुमच्या अध्यातमध्यात नसणाऱ्या आणि तुम्हांला कसलाही त्रास न देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ही असली शेलकी विशेषणं वापरून तिचा पाणउतारा करण्याचा हक्क नाहीच तुम्हांला. नाहीतर तुमची जागा दाखवायलाही आम्हांला वेळ नाही लागत.
... 
अलीकडे वर्तमानपत्रांत, इंटरनेटवर समलैंगिक संबंधांतून झालेल्या गुन्ह्यांच्या बातम्या वाचल्या. 'लैंगिक संबंध ठेवायला नकार दिला, म्हणून खून' अशा किंवा अशासारख्या मथळ्याच्या. पत्रकारितेतलं मला काही समजत नाही, पण एक विचार मनात चमकून गेला. स्त्रियांवर होणारे अत्याचार, बलात्कार, खून वगैरे बातम्या नव्या नाहीत आपल्याला. एकतर्फी प्रेमप्रकरणातून आजवर तरुण मुलींवर झालेले ऍसिड हल्ले, बलात्कार, खून यांची तर गणतीच नाही, तिथेही मुलीने मुलाचं प्रेम नाकारणं म्हणजे छुप्या पद्धतीने शरीरसंबंधांस नकार देणं, हाच अर्थ दडलेला नसतो का? लग्नापूर्वी शरीरसंबंध न ठेवता फक्त प्रेमाच्या भावनेतून मुलीला प्रपोज करणारीही मुलं आहेत, नकार मिळाल्यावर तो पचवणारीही आहेत. पण गुन्हे करणाऱ्यांची मानसिकता ही सत्ता गाजवण्याचीच असते. मग ते पुरुष आणि स्त्रीमधले संबंध असोत, दोन पुरुषांमधले संबंध असोत किंवा दोन स्त्रियांमधले. समलैंगिक संबंधांना जिथे अजूनही लग्नासारखी व्यवस्था मिळालेली नाही, तिथे लैंगिक सुख ओरबाडून घेणं, हाच गुन्हे करणाऱ्यांचा मुख्य हेतू असतो. पण तो गुन्हा नेमका कसा घडलाय, याची शहानिशा हे पत्रकार करतात का? अशा बातम्यांमधून समलैंगिक समाजाचं फक्त नकारात्मक चित्रच समाजासमोर उभं राहतं, त्याचं काय? म्हणजे इतर समाज करतो ते 'एकतर्फी प्रेम' आणि समलैंगिक करतात ती 'लैंगिक संबंधांची मागणी', हा दुटप्पीपणा का?
... 
माझ्यापुरता मी विचार करतो, तेव्हा आईबाबांशी मी नेहमी गुडीगुडी वागू शकत नाही, हे सत्य मी माझ्यापुरतं स्वीकारलं आहे. माणूस म्हणून ते चुकत असतील, तर ते केवळ आईवडील आहेत, म्हणून ते म्हणतील ते बरोबर, हा विचार मी कितीही प्रयत्न केला तरी नाही करू शकत. अर्थात प्रत्येक वेळी मतभेद मिटवण्याची गरज असते, असंही नाही. देवावर विश्वास असला, तरी पूजा, कर्मकांड या गोष्टींत रमणारा मी नाही. तरी आईने कधी हात जोड, पूजा कर म्हणून सांगितलं तर तेवढ्याने माझं काही नुकसान होत नसतं. तेव्हा तिला 'तुझी श्रद्धा आहे, तर तू कर' असं मी उर्मटपणे नाही सांगू शकत. कधीतरी प्रयत्नही केलाय, पण फरक पडत नाही, तेव्हा मी माझी ऊर्जा अशा ठिकाणी वाया घालवत नाही.
... 
बाबांचा विचार करताना मला अलीकडेच जाणवू लागलंय की त्यांच्यातला पुरुष आणि माझ्यातला पुरुष वेगळा आहे. स्ट्रेट पुरुषांचं पौरुष जाणून घ्यायचं ठरवलं की फार दूर जावं लागत नाही. बाबांबरोबर जगताना त्याचे दाखले पदोपदी नजरेस पडतात. आताशा मी ही दरी मिटवण्याचा प्रयत्न करणंही सोडून दिलंय. पुरुषसत्ताक कुटुंबव्यवस्थेचा एक घटक म्हणून वाढताना त्यांच्यावर झालेल्या संस्कारांत आणि माझ्या विचारसरणीत असलेली तफावत, त्यांचा कधीकधी डाचणारा हेकेखोरपणा, आईचा धाक घरात जास्त असला, तरी त्यातूनही जाणवणारा बाबांचा पुरुषी अहं, हे सगळं आहे तसं स्वीकारण्याचा प्रयत्न करतानाही प्रचंड दमछाक होते. तरीही त्यांच्या मनाचा थांग लागत नाही. गे पुरुष म्हणून ते मला अर्थातच शक्य तेवढं समजून घेण्याचा सुदैवाने प्रयत्न करत असतात, पण त्यांच्यातला स्ट्रेट पुरुष समजून घेण्याचे माझेच प्रयत्न कुठेतरी थिटे पडू लागतात कधीकधी.


संदेश कुडतरकर



तिचा वेष, त्याचा वेष

कपडे हे स्त्री वा पुरुष असण्याचे चिन्ह वा प्रतीक म्हणून येतात. पॅण्ट्स आणि जीन्स वापरणाऱ्या स्त्रियांची संख्या इतकी झाली आहे की पूर्वी पुरूषांचे मानले गेलेले कपडे आता स्त्रियांच्या शरीराप्रमाणे वेगळ्या प्रकारे बेतले जातात. पण मेट्रोसेक्श्युअल पुरूषाने स्त्रियांचे म्हणावे असे कपडे क्वचित स्कार्फ आणि स्टोल वगळता आपलेसे केलेले नाहीत.



“त्या बिचाऱ्या दिपिकेला आपले कपडे कुलुपात ठेवावे लागत असतील नै? कधी रणवीर डल्ला मारेल काय सांगता येतंय काय?” रणवीर सिंगचे नवीन फोटो आले की व्हॉटसॅपवर किमान पंचवीसवेळातरी हा डबडा विनोद येतो. आपल्या मनाजोगी धडाडी न दाखवणाऱ्या पुरूषाला "बांगड्या भरा!" असा टोला मारणारे पैशाला पासरीभर असतात आणि त्यात काही चुकीचे आहे हे ही समजत नसते त्यांना. मुलीबायकांनी जीन्स घालणे यावर काही सांस्कृतिक गड्डे “जीन्स घातलेल्या मम्मीला पदर नसतो म्हणून मातृत्वाचा जिव्हाळा नसतो" वगैरे मंद टिप्पण्या करताना अजूनही दिसतात.एकूणात काय जगात प्रत्येकाने चौकटीत ठरवून दिल्याप्रमाणेच स्त्री वा पुरूष व्हायचे असते आणि त्या कप्प्यातच बसायचे असते असे स्थितीवादी समाजाचे पक्के ठरलेले असते.
कोणाला मुलगा म्हणायचं आणि कोणाला मुलगी हे आपल्याला कळायला लागलं तेव्हापासून माहिती आहे. नीट विचार केला तर लक्षात येईल की हि लिंगनिश्चिती केवळ राहणी, घातलेले कपडे यांच्यावरूनच आहे. मानवजातीच्या प्रवासात खूप पूर्वी कधीतरी लिंगनिश्चिती आणि कपडे यांचा संबंध जोडला गेला आणि मग तो नियमही झाला. त्यामुळे इथे कपडे हे चक्क स्त्री वा पुरुष असण्याचे चिन्ह वा प्रतीक म्हणून येतात.
हे कुठून सुरू होतं? जगातल्या बहुतेक सर्व संस्कृतींमध्ये मूल चालायला लागेतो, त्याच्या आठवणी सुरू होईतो बाळ मुलगी आहे की मुलगा हे स्पष्ट करणारे कपडे शक्यतो वापरले जात नाहीत. तान्ह्या बाळांना सारखीच झबली टोपडी घातली जातात. मग बाळ मुलगा असो वा मुलगी. तान्हे बाळ हे बाळ असते. स्त्री वा पुरूष असण्याआधी माणसाचे बाळ असते. मानवजन्म आधी मग लिंगभाव हे जगातल्या बहुतेक सगळ्या संस्कृतींना मान्य होते असे म्हणायला हरकत नाही.
आपल्याकडे झबल्याटोपड्याबरोबरच कुंच्या, वाळे, मनगट्या वगैरे बाळलेणी ही सर्वांना सारखीच घातली जातात. मूल चालूपळू लागले की मग मुलाचे वा मुलीचे कपडे दिले जातात. तिसरे वर्ष लागताना आपल्याकडे आत्याने भाचीला खण, बांगड्या घ्यायची पद्धत आहे. ही पद्धतही कदाचित तान्हेपणा संपला आणि नुसता मानवजन्म असण्याऐवजी त्याचे पुढचे कप्पे पडायला सुरू झाले हे सांगणारीच असावी. मग पुढे मुलीला गाठीची चोळी + बिनपदराची साडी, नंतर ती न्हातीधुती झाली की साडीला पदर हे सगळे टप्पे असत. मुलीला पदर आला हा वाक्प्रचार यातूनच आला. प्रबोधनकाळादरम्यान युरोपात मुलग्यांना झगा वा झबलेसदृश कपडेच घातले जात. पाचसहा वर्षाच्या आसपास ते कपडे जाऊन ब्रीचेस म्हणजे गुडघ्यापर्यंतच्या पॅन्टस घातल्या जात. अमीरउमरावांच्या घरांमध्ये मुलाला पहिल्या ब्रीचेस देण्याचा सोहळा केला जाई. त्याला ब्रीचिंग असे म्हणत.*
ब्रीचिंग होण्याआधी मुलग्यांचे कपडे
 ही झाली बरीच पुढची गोष्ट. कपड्यांच्या इतिहासाच्या मुळाशी गेले तर जगभरात मानवी संस्कृती सुरवातीची पावले टाकत होत्या तेव्हा वेशभूषेच्या उत्क्रांतीच्या त्या टप्प्यात कपड्यांमधून लिंगनिश्चिती हा उद्देश महत्वाचा नव्हता. प्राचीन ग्रीक काळात याची सुरूवात दिसते परंतू हे समाजाच्या काही घटकांपुरतेच अपेक्षित होते. रोमन कालखंडात कपड्यांचा व लिंगनिश्चितीचा परस्पर संबंध जास्त गडद झालेला दिसतो. रोमन वा ग्रीकांच्या आधी इजिप्त, बॅबिलोनियन, सुमेरियन वगैरे संस्कृती जिथे ग्रॅविटेशनल म्हणजे नेसायच्या कपड्यांवर भर असलेली वेशभूषा आहे तिथे कपड्यांचे लिंगाधारीत ध्रुवीकरण हे केवळ वरवरच्या सजावटीच्या गोष्टींपुरतेच मर्यादित होते. मात्र मूळ कपडे बरेचसे सारखेच आहेत.
आपल्याकडेही वैदीकपूर्व, वैदीक ते पार मौर्य कालखंडाच्या सुरूवातीपर्यंत हेच दिसते. मौर्यकाळात स्त्रिया व पुरूष दोघांच्याही कपड्यांमधे अंतरीय, उत्तरीय आणि शिरोभूषण (उष्णीष) आहे. स्त्रियांनी छाती झाकणे हे ही नव्हते. पुढे गुप्त काळात कपड्यांचा हेतू लिंगनिश्चितीकडे जास्त झुकल्याचे लक्षात येते. शिरोभूषणे पुरूषांपुरतीच उरणे, स्त्रियांनी चोळ्या वा कंचुकीने छाती झाकणे, स्त्रियांनी शिरोभूषणांऐवजी विविध केशरचना करून त्या सजवणे असे काही महत्वाचे लिंगाधारित फरक दिसतात. पुढे मुघलांच्या काळात आणि नंतर ब्रिटिश काळात बघितले तर पुरूषांचे कपडे मुघल आणि नंतर ब्रिटीश/ युरोपियन झाले आणि स्त्रियांच्या मूळ असलेल्या कपड्यांमधे मुघल आणि नंतर ब्रिटीश/ युरोपियन प्रभाव असलेले बदल झाले. फ्युजन व्हावे तसे. हे ही गमतीशीर आहे. त्यामुळे कपड्यांवरून माणूस वाचायचा तर पहिला मुद्दा लिंगनिश्चिती आणि मग सामाजिक दर्जा आणि इतर हेतू असे आपसूकच झाले.
यालाच समांतर कालखंडात मध्यपूर्व व युरोपियन संस्कृतींमधे मध्ययुगीन काळापासून पुढे कपड्यांमधे लिंगाधारीत फरक असणे आणि असे फरक अनिवार्य होत जाणे हे दिसते. भारतीय उपखंडात आणि पाश्चिमात्य जगातही पितृसत्ताक संस्कृती घट्ट होत जाणे, माणसाचे समाजातले स्थान व भूमिका हे त्याच्या स्त्री वा पुरूष असण्यावरून ठरणे हेही या काळात पक्के होत गेलेले दिसते.नागर संस्कृतीमधे स्त्रियांची भूमिका सांपत्तिक आणि सामाजिक स्थानानुसार वेगवेगळी पण घरकाम, मुले, घरगुती गोष्टी, शोभेची बाहुली, संपत्तीचे प्रदर्शन याच वर्तुळात फिरत राह्यली. अमीरउमरावांच्या घरातल्या शोभेच्या बाहुल्यांनी आपापल्या घराण्याच्या संपत्तीचे आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन करण्यासाठी ज्या ज्या वस्तू परिधान करणे अनिवार्य होत गेले त्या सगळ्या वस्तू घोळदार, परिधान करण्यात वेळखाऊ होत्या. ठराविक प्रकारे बसणे, उठणे, चालणे सोडल्यास बाकी काही हालचाली करणे त्यात निव्वळ अशक्य होते. प्रबोधनकाळापासून बघितल्यास भरभक्कम गाऊन्स, कॉर्सेटस, आतमधले पेटिकोटसचे थर या गोष्टींचा अधिकाधिक किचकट आणि जडपणाकडे होत गेलेला प्रवास याची साक्ष देईल.
रोमॅन्टिक कालखंडातील स्त्री वेश
स्त्रियांनी आपल्याला बंधनात टाकणार्‍या वेशभूषेत बदल करून पुरूषी किंवा सोपी वेशभूषा (जी पुरूषी दिसत असे अशी) करणे हे साधारण रोमॅन्टिक कालखंडात युरोपात घडायला सुरू झाले. १८४० च्या दशकाच्या अखेरीस अमेरिकेतील तेव्हाच्या स्त्रीवादी चळवळीतील एलिझाबेथ स्मिथ मिलर, सुझन बी अँथनी, एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन, मिसेस स्टोन आणि अमेलिया ब्लूमर एक वेगळ्या प्रकारचा वेष घालायला सुरूवात केली. हा वेष रोमॅन्टिक कालखंडातल्या स्त्रियांच्या कपड्यांपेक्षा सुटसुटीत होता. पाश्चिमात्य जगामधे अश्या आकृतीचे काही आधी स्त्रियांच्या वेशभूषेत आले नव्हते. ढगळी आणि पायाशी चुण्या असलेली तुम्मान आणि वरती गुडघ्यापर्यंत येणारा घोळदार गाऊन असे साधारण या वेषाचे स्वरूप होते.
ब्लूमर्स 

अमेलिया ब्लूमरने ती संपादन करत असलेल्या ‘द लिली’ या स्त्रियांच्या नियतकालिकामधे या वेषाबद्दल प्रशंसापूर्वक लिहिले. तेव्हापासून या वेषाला ब्लूमर कॉश्च्युम असे नाव मिळाले. चळवळीच्या बाहेर हा वेश फारसा प्रचलित झाला नाही. टिकेची झोडही अर्थातच बरीच उठली. चळवळीचे उद्दीष्ट झाकोळायला नको या कारणाने काही काळाने या सर्वांनीच इतर सर्व स्त्रियांप्रमाणेच वेश पत्करला. परंतू तुम्मानला पाश्चिमात्य वेशभूषेत ब्लूमर्स असे नाव मिळाले. कालांतराने या तुम्मानची उंची कमी होत ती अंतर्वस्त्रात जाऊन बसली. लहान मुलींच्या कापडी, फुग्याच्या चड्ड्यांना आता जगभरात ब्लूमर्स म्हटले जाते.  या नंतर पहिल्या महायुद्धाने बरेच काही बदल घडवले. 
सैन्यात भरती होणे पुरूषांना अनिवार्य ठरल्यामुळेअनेक कार्यालयांमधे स्त्रिया काम करू लागल्या. अर्थातच याचे प्रतिबिंब स्त्रियांच्या कपड्यांमधे पडले. स्त्रियांच्या कपड्यांच्या आकृतीमधे जास्त सरळ रेषांचा अंतर्भाव होऊ लागला. एस आकारातले एडवर्डियन कपडे कालबाह्य होत गेले. स्त्रियांसाठी कार्यलयीन काम करताना वापरण्यायोग्य कोट बनू लागले. हे अर्थातच पुरूषांच्या कोटापेक्षा वेगळे होते पण पुरूषांच्या कोटांमधले अनेक फिचर्स अस्तित्वात होते. पहिले महायुद्ध संपून सगळे स्थिर होईतो स्त्रियांच्या कपड्यांच्या बाह्याकृतीमधे सरळसोटपणा आला. अगदी लहान कापलेले केस आणि शरीराचे आकार सहजगत्या न दिसू देणारी बाह्याकृती याला बॉयिश लुक असे म्हणले जाई.
बॉयिश लुक

यानंतर दोन महायुद्धांच्या मधल्या काळात जेण्डर या गोष्टीचा विचारच वेगळ्या प्रकारे सुरू झाला युरोपात आणि त्यातून १९३० च्या दशकात मार्लिन डिट्रीचने या अभिनेत्रीने ट्राऊझर्स आपल्याश्या केल्या. या गोष्टींना स्टायलिश आणि फॆशनेबल स्थान दिले. याची चर्चा अर्थातच झाली. टिकेची झोड उठलीच. दिपिका रणवीरपासून आपले कपडे लपवून ठेवत असेल अश्या प्रकारचे विनोद तिच्यावरही झाले. फॅशन आणि लिंगभाव या विषयातल्या चर्चा आणि अभ्यासाला तिने जन्म दिला. टिकेची झोड उठल्यामुळे लगेचच संपून गेलेल्या ब्लूमर ड्रेसप्रमाणे हा नवीन प्रवाह मात्र अल्पायुषी ठरला नाही. स्त्रियांनी वेगवेगळ्या प्रकारे पॆण्टस आपल्याश्या केल्या. मग ते लोण हळूहळू जगभर पसरले.
याला इतका काळ लोटलाय आणि पॅण्ट्स आणि जीन्स वापरणाऱ्या स्त्रियांची संख्या इतकी झाली आहे की पूर्वी पुरूषांचे मानले गेलेले कपडे आता स्त्रियांच्या शरीराप्रमाणे वेगळ्या प्रकारे बेतले जातात.
विमेन्स ट्राऊझर्स, विमेन्स शर्टस वगैरे. आता स्त्रियांनी पुरूषांचे कपडे घालायचे म्हणले तर एक्स्च्लुझिव असे फारसे उरलेले नाही. आता युनिसेक्स म्हणजे कुठलेही जेण्डर न दर्शवणारे कपडेही मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले आहेत. पण ते बहुतेक सगळे मुळातले पुरूषी या कप्प्यात असलेले कपडे आहेत. मेट्रोसेक्श्युअल पुरूषाने स्त्रियांचे म्हणावे असे कपडे क्वचित स्कार्फ आणि स्टोल वगळता आपलेसे केलेले नाहीत.
याच्यामागे लिंगाधारित प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांचा हातभार मोठा आहे. जगभराच्या पितृसत्ताक संस्कृतींमधे पुरूषाला एका उच्चासनावर ठेवून मुळातून खूप कमकुवत आणि अहंकारी बनवून ठेवले आहे. स्त्रियांचे कपडे वापरणे याचा अर्थ आपल्या पुरूषत्वात कमतरता असा घेतला जाईल, स्त्रियांच्यासारखे कमी समजले जाईल की काय ही सुप्त भिती नक्की आहे.
त्यामुळे रणवीर सिंग जेव्हा साडी, घागरा वगैरे कपडे घालून मिरवतो तेव्हा त्याच्या आत्मविश्वासाला आणि पुरूषी अहंकारावर मात करण्याला आपसूकच दाद दिली जाते.
हल्ली काही वर्षांपूर्वी बंगलोरला काही पुरुषांनी स्त्रीयांवर होणाऱ्या हिंसचाराच्या विरोधात निदर्शने करताना स्कर्ट घातले होते.परंतू स्त्रियांनी जश्या पॅण्ट्स आपल्याश्या केल्या तसे पुरूषांनी साड्या, स्कर्टस आपलेसे करणे घडेल याची शक्यता मात्र कमी दिसते. लिंगाधारित अहंकार वगैरे लोप पावेल असे धरले तरीही ही शक्यता कमी दिसते. हे विसरता येणार नाही की आजघडीला स्त्रियांचे कपडे म्हणून जे कपडे आहेत ते उदयाला आले तेव्हा समाजातले स्त्रियांचे स्थान, करायची कामे हे सगळे पक्के ठरलेले होते. माजघर ते शोभेची बाहुली हा परीघ होता. आणि त्यामुळे कपड्यांमधे वावरायची, बसाउठायची सोय, सुटसुटीतपणा कमी आणि नखरा जास्त हा प्रकार नक्कीच होता. आजच्या स्त्रियांच्या म्हणल्या गेलेल्या कपड्यांमधे या गोष्टी दिसतातच. त्यामुळे सोय, सुटसुटीतपणा या मुद्द्यावर पुरूषांनी हे कपडे आपलेसे करणे फारसे शक्य दिसत नाही.
पण इतका वेळ आपण स्त्री व पुरूष या दोनच जेण्डर्सविषयी बोललो. तृतीयपंथी, शरीर एका जेण्डरचे व मन दुसऱ्या जेण्डरचे, लिंगबदल केलेले, ठराविक जेण्डरच्या कप्प्यात स्वत:ला बसवू न इच्छिणारे वगैरे अनेक लोक जगात आहेत. ही सगळी वेगवेगळी जेण्डर्स मानली जाऊन त्या त्या जेण्डरप्रमाणे कपडे; असा बदल पुढच्या काळात दिसेल की सगळेच कप्पे बरखास्त होऊन कपड्यांमधे जेण्डरचा संदर्भच राहणार नाही या दिशेने कपड्यांची कहाणी पुढे जाईल हे सांगणे आत्ता तरी अशक्य आहे. परंतू सगळ्यांना मानवी समानतेवर वागवता येणे हे मात्र महत्वाचे आहे आणि कपडे व त्याला लागून येणारे लिंगाधारित पूर्वग्रह टाकून देणे हे त्यादिशेने पहिले पाऊल ठरेल.

नीरजा पटवर्धन



संपादकीय

आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

मागच्या वर्षी महिलादिनाच्या निमित्ताने ‘पुन्हास्त्रीउवाच’ ही मराठीतली पहिली स्त्रीवादी वेबसाइट प्रकाशित झाली. 1980 आणि 90 च्या दशकात हिरीरीने स्त्रीवादी विचार मांडणार्‍या ‘स्त्रीउवाच’ प्रकाशन गटातल्या ज्येष्ठ मैत्रिणींच्या कामाला अभिवादन करण्यासाठी एक छोटीशी वेबसाइट तयार करायच्या विचारातून मागच्या वर्षी काम सुरू केले होते. ‘स्त्रीउवाच’ वार्षिकाच्या संपादकांच्या दृश्य-श्राव्य मुलाखती आणि जुन्या अंकामधल्या काही लेखांचे डिजिटायझेशन करण्यासोबत सध्या स्त्रीवादी विचारांनी काम करणार्‍या व्यक्तींच्या कामाची ओळख करून देणे – अशी वेबसाईटची मूळ कल्पना होती. खरं म्हणजे काही वर्षांपासून महिलादिवसाचं जे बाजारीकरण होत चाललं आहे, त्या पार्श्वभूमीवर महिलादिना निमित्त वेबसाइटच्या उद्घाटन करणे ही एक जोखीमच होती. पण वर्षभरापूर्वी प्रकाशित झालेल्या वेबसाइटला मात्र अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. डिजिटल आणि छापील माध्यमांनी देखील विशेष दाखल घेतली आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या वाचकांपर्यंत पोचता आले. वाचकांनी सोशल मीडियावर आणि वैयक्तिक संपर्क साधून आपल्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोचवल्या आणि आमचा उत्साह वाढता ठेवला.

त्यामुळे “पुन्हास्त्रीउवाच”चा पसारा वर्षभरात वाढतच गेला. त्यानंतर आम्ही दर तीन महिन्यांनी वेबसाइटमध्ये भर घालत राहिलो. साधारणत: लिंगभाव आणि स्त्रीवाद यांच्या संबंधीच्या लेखनात स्त्रियांवरची हिंसा, लैंगिक अत्याचारा सारख्या घटना किंवा माध्यमातल्या नकारात्मक चित्रण  याविषयीचे लेखन असते. आम्हाला यापलीकडे जाऊन रोजच्या जगण्यातील लिंगाभावाबद्दलचे बारकावे मांडायचे असल्याने आम्ही पर्यावरण, खाद्यसंस्कृती आणि विनोद अशा वेगवेगळ्या विषयसूत्रांची जाणीवपूर्वक निवड केली. वर्षभरात शंभरपेक्षा जास्त लेखकांनी कविता, कथा आणि लेखांच्या रूपात अंकाच्या विषय आणि आशयात भर घातली. मुखपृष्ठावरची चित्रं, व्यंगचित्र आणि फोटोग्राफ्सच्या निमित्ताने अनेक कलाकार जोडले गेले. या सर्वांच्या विनामूल्य सहकार्यामुळे स्त्रीवादी दृष्टिकोनातून अनेक विषयांचा वेध घेता आला. मुख्यत: तुम्ही वाचकांनी वेळोवेळी अंकावर ज्या प्रतिक्रिया दिल्यात आणि आवडलेले साहित्य विविध माध्यमातून नवनवीन वाचकांच्या पर्यन्त पोचवले – त्यामुळे आमचा उत्साह टिकून राहिला. सुरुवातीला फक्त तिघींचे संपादन मंडळ होते त्यातही आता बरीच भर पडली आहे. आता विविध क्षेत्रातला अनुभव असलेले एकूण दहाजण संपादक मंडळात सहभागी झालेले आहेत.

नव्या संपादक मंडळाने ह्या वर्षपूर्ती विशेषांकासाठी ‘लिंगभाव आणि ओळख’(Gender & Identity) असे विषयसूत्र ठरवले. व्यक्तीच्या ओळखीचे जे विविध पैलू असतात त्यांचा लिंगभावाच्या भिंगातून शोध घेणारे लेख या अंकात वाचायला मिळतील. आपल्या व्यक्तित्त्वावर स्वत:च्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांच्या शिवाय ज्या अनेक सामाजिक घटकांचा प्रभाव पडतो त्यातून आपली ओळख घडत जाते. नाव, गाव, जात, धर्म, रंग, लैंगिकता, आर्थिक वर्ग, मूल्यव्यवस्था, भाषा, शिक्षण इ. अनेकविध परिस्थितीजन्य घटकांचाही त्यात मोठा भाग असतो. सध्या देशात धार्मिक आणि जातीय अस्मितांच्या राजकारणाला ऊत आलेला आहे. राष्ट्रवादाच्या कल्पनेचा बडिवार माजवून हिंसाचारला निमित्त पुरवले जाते आहे. बहुसंख्य प्रसारमाध्यमे प्रतिगामी विचारसरणीचे ढोल वाजवत आहेत. संविधानाने मांडलेल्या समतेच्या तत्त्वांमधली आणि सामाजिक न्यायाच्या अंमलबजावणी मधली दरी वाढत चाललेली आहे. त्यामुळे स्त्रियांच्या आणि वंचितांच्या हक्कांची गळचेपी होण्याचे प्रमाणदेखील वाढते आहे. या सर्वांचा परिणाम आपल्या व्यक्तित्त्वाच्या सगळ्याच घटकांवर होणे अपरिहार्य आहे. ह्या विविध घटकांची लिंगभावाच्या संदर्भात पडताळणी करताना समाजातला व्यवस्थात्मक हिंसाचार (structural violence ) अधोरेखित झाला आहे. या अंकात काही लेखकांनी स्वत:च्याच व्यक्तित्वाचा एखादा पैलू निवडून त्याचा लिंगभावाच्या संदर्भाने शोध घेतलेला आहे आणि काहीनी विशिष्ट सामाजिक ओळख असलेल्या समूहांविषयी लिहिले आहे. ह्या सगळ्या लेखांमुळे – ‘समाजात सगळ्यांनी एकमेकांशी समजुतीने वागले की विषमता शिल्लक राहणार नाही; कसल्याही चळवळी-आंदोलने करायची गरज पडणार नाही’ – अशी भाबडी समजूत थोडीतरी कमी व्हायला मदत होईल.
लैंगिक सेवा पुरवणार्‍या महिलांच्या हक्काविषयी मीना सेशू यांच्या मुलाखतीतून समजून घेता येईल. सगळ्याच जातीधर्माच्या महिलांकडे केवळ त्या त्या समाजाची इज्जत म्हणून पाहिल्यामुळे स्त्रियांवर किती मोठ्या प्रमाणात हिंसा केली जाते त्याचे भान मनीषा गुप्ते यांच्या मुलाखतीमधून येईल.
‘मी नवर्‍याला टाकलं’ असं स्पष्टपणे सांगणार्‍या एकल महिला संघटनेविषयी शिशिर सावंत यांचा लेखही असाच दृष्टीकोनात बदल घडवणारा आहे. गावचा कारभार करणार्‍या सरपंच महिलांना अजूनही किती पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो – त्याबद्दल साधना तिपन्नकजे यांनी लिहले आहे. नीरजा पटवर्धन यांनी ऐतिहासिक संदर्भ देऊन वेशभूषा ह्या महत्वाच्या पैलूविषयीचे विश्लेषण मांडले आहे. निमशहरी भागातील शिक्षकांच्या समताविषयक जाणिवांबद्दल अश्विनी बर्वे यांनी खुसखुशीत शैलीत निरीक्षण नोंदवले आहे. त्याचसोबत स्त्रीवादाला नाकारणार्‍या मतांतराची दखल घेणारा एक लेखसुद्धा आवर्जून समाविष्ट केला आहे.
स्वत:चे नाव हा कुठल्याही व्यक्तीच्या ओळखीतला महत्त्वाचा भाग असतो. आपले नाव कसे असावे यावर देखील पितृसत्तेचा किती प्रभाव असतो – याबद्दल ‘ नाव बदलण्याची गोष्ट’ या मुक्ता खरेच्या लेखातून लक्षात येईल. रवींद्र रु.प. आणि श्रीनिवास हेमाडे यांनी स्त्रीवादी चळवळीशी जोडलेले पुरुष या दृष्टिकोनातून स्वत:मध्ये घडवलेल्या बदलांविषयी लिहिले आहे. अंजली जोशी यांनी स्वत:च्या आयुष्यातल्या स्त्रीवादी मूल्यांविषयी सांगितले आहे. शुभांगी थोरात यांनी एक स्त्रीवादी व्यक्ती म्हणून पालकत्व निभावताना आलेले अनुभव मांडले आहेत.
‘इंद्रधनुष्य’मध्ये स्वत:ची वेगळी लैंगिक ओळख निवडणार्‍या तरुणाचे अनुभवकथन आहे तर ‘कॅलिडोस्कोप’ मध्ये स्त्रीवादी मूल्ये घेऊन जगणार्‍या पत्रकार तरुणीने स्वत:च्या आयुष्यातले अंतर्विरोध उलगडून पाहिले आहेत. अनुजा संखे हिने स्वानुभवाचा संदर्भ देत अंध मुलींच्या लैंगिकतेविषयी लिहिलेला लेख सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.
‘लिंगभाव आणि ओळख’ ह्या विषयाचे असे विविध पदर उलगडणारा हा अंक वाचकांच्या समोर ठेवताना ‘पुन्हास्त्रीउवाच’च्या विस्तारीत संपादक मंडळाला अतिशय आनंद होतो आहे. पण ह्या आनंदात सहभागी होण्यासाठी विद्या बाळ आणि मीना देवल ह्या दोन उत्साही ज्येष्ठ मैत्रिणी मात्र आपल्यात नाहीत – त्यांच्या विचारांच्या रूपाने त्या नेहमीच आपल्या सोबत राहतील.

त्या दोघींच्या स्मृतींना हा वर्षपूर्ती विशेषांक अंक समर्पित !

वंदना खरे 

तत्त्वज्ञानाच्या चष्म्यातून

'मी स्त्रीवादी आहे', हे मला माहित आहेच, पण इतरांना सांगताना ते लिखित रुपात कसे शब्दबद्ध करावे,हे बराच काळ सुचत नव्हते. वंदना खरेशी चर्चा करताना तिने काही प्रश्न सुचवले. उदाहरणार्थ "तुझी स्त्रीवादाशी ओळख कधी, कशी, कुठे झाली? आपण स्त्रीवादी आहोत हे तुला कसं जाणवलं? स्त्रीवादी बनण्याची तयारी म्हणून स्वतःमध्ये तुला जाणीवपूर्वक काही बदल करावे लागले का? इतर पुरुषांपेक्षा तू वेगळ्या जाणिवा असणारा आहेस, असे तुला का वाटले ? ते वेगळेपण कधी जाणवले ? वेगळे असल्याचे फायदे-तोटे कोणते झाले किंवा अजूनही होतात? उदाहरणार्थ पुरुषांच्या ग्रुपमध्ये असताना बायकांवरच्या पुरुषी विनोदाला हसला नाहीस तर ते पुरुष तुला काय म्हणतात? स्त्रीवादाच्या बाबतीत आपल्यात सुधारणेला वाव आहे, असं तुला वाटतं मनोमन का? पुढचा जन्म बाईचा मिळाला तर चालेल का?" तिच्या ह्या प्रश्नांनी मला माझ्या कथनाचा सूर सापडला... आता, मी काहीतरी सांगू शकेन, असे मला वाटते.
“मी स्त्रीवादी आहे " म्हणण्यात 'मी' हे सर्वनाम येणे भाषेच्या आणि कृतीच्या दृष्टीने अनिवार्य झाले. 'मी' हे प्रथम पुरुषी एकवचनी संबोधन व्यक्तीला अनिवार्यपणे आत्मनिवेदनाकडे घेवून जाते. 'मी' आला की आत्मश्लाघेचा दोष येतोच. तो स्वीकारला नाही तर निवेदन पुढे सरकत नाही. तो स्वीकारून माझा स्त्रीवाद उलगडतो. माझ्या निवेदनात मी कितपत यशस्वी होईन, हे मला माहित नाही.
कोणतीही विचारधारा केवळ सिद्धांकनाच्या पातळीवर न राहाता ती प्रत्यक्षात उतरणे, ही तिच्या सचोटीची अनिवार्य अट असते. "मी स्त्रीवादी" नामक कथनात जी कोणी कथनकार व्यक्ती असेल त्या व्यक्तीची स्त्रीवादी विचारसरणी, तिचे घडत गेलेले अनुषंगिक वर्तन आणि त्या वर्तनाचे समकालीन सातत्य ह्या तिन्हींनी मिळून त्या व्यक्तीच्या 'स्त्रीवादी जीवनाचा आकार' कसा घडत गेला, ह्याचा काहीएक आलेख मांडावा, असेही अपेक्षित आहे. त्यात 'भावी जीवनातील वर्तनही त्याच रीतीचे असेल' अशी एक आश्वासकताही गृहीत धरलेली असते.
मला आधी अनुभव येत गेले, अनुभवांचे मी निरीक्षण करत गेलो. ते भरड कच्चे-सच्चे आणि अनाम होते. त्यांना स्त्रीवाद असे नाव नव्हते, पण त्यांचे स्वरूप स्त्रीवादी होते (हे मला नंतरच समजले). हे अनुभव खासगी व सार्वजनिक असे दोन प्रकारचे होते. कुटुंब आणि व्यावसायिक जीवन हे त्याचे ढोबळ वर्गीकरण करता येते.
गेली तीस वर्षे मी संगमनेर या निमखेड्यात आणि निमशहरात राहातो आहे. येथील जनता खेडे आणि शहर ह्या दोन्ही जीवनशैलीत जगते आहे. कुटुंब या पातळीवर माझ्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांचे आयुष्य जवळून पाहिल्यानंतर, अनुभवल्यानंतर माझ्या स्त्रीवादाचा पाया रचला गेला. माझी आई, दोन बहिणी, दोन वहिन्या, माझी बायको आणि आमच्या दोन मुली ह्या माझ्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया. माझ्या जीवनात सर्वप्रथम आलेली पहिली स्त्री म्हणजे माझी आई. किंबहुना तिने मला 'जीवनात' आणले, मग ती माझ्या 'जीवनाचा हिस्सा' बनली. नंतरचा क्रम बहिणी, शाळासोबतिणी, वर्गमैत्रिणी (पण भगिनी नव्हे. कोणत्याही परस्त्रीला भगिनी म्हणणे हे स्त्रीवादी दृष्टीकोनातून चूक आहे, असे माझे मत आहे- हे शालेय जीवनातही होते आणि आजही आहे.)
कुटुंबाशिवाय बाहेरच्या 'दैनंदिन भूगोल' परिसरातील स्त्रियांविषयीही मला सहकार्य आणि समतावादी भावनेचे ममत्व आहे. त्या जसजशा ज्या क्रमाने माझ्या जीवनात आल्या तेव्हापासून मी त्यांच्याशी 'समतावाद' ह्या अर्थाने स्त्रीवादीच वागत आलो. 'समता' हे तत्त्व माझ्या 'वर्तनाच्या गुणसूत्रां' मध्येच अंतर्निहित असल्याने ते माझ्या वर्तनातच मुरलेले आहे. म्हणून वेगळे खास स्त्रीवादी वर्तन कसे करावे ? 'मी स्त्रीवादी' म्हणजे नेमके काय? हे वेगळं काय लिहावं अजूनही तसे फारसे उमजत नाही.
स्त्रीवादाची ओळख मला कशी झाली ? हा प्रश्न मला वेगळ्या रीतीने मांडावा लागेल. मी सोलापूरचा नागरिक आहे. त्यावेळी मी महाविद्यालयात असताना एका व्याख्यानमालेत विद्याताई बाळ यांचे व्याख्यान होते आणि विषय होता 'मंजुश्री सारडा खून खटला'. ते व्याख्यान ऐकत असताना मला विद्याताईंची ओळख पटली. तरीही साहित्याचा बऱ्यापैकी वाचक आणि तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मला त्याच्या व्याख्यानात स्त्रीवादापेक्षा मानवतावाद जास्त वाटत होता.
एमए नंतर मला १९८५ साली पुण्यातील गरवारे महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकी मिळाली. त्यावेळी नेहमी सिटी बसने येजा करीत होतो. तेव्हा बसचा कंडक्टर आणि एक प्रवासी यांच्यात कोणत्या तरी कारणाने जुंपली. त्यांनी एकमेकांना शिव्या द्यायला सुरुवात केली. पहिली गोष्ट तर बसमधील स्त्रीलोकांमधील बहुतेक स्त्रीप्रवासी कावऱ्याबावऱ्या झाल्या होत्या, लहान मुलामुलींना काहीतरी भांडणे चालली आहेत हे समजत होते, पण एक म्हातारी बाई निर्विकार चेहऱ्याने सगळ्यांकडे पाहात होती. पुरुषलोक भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. दुसरी गोष्ट सगळ्या शिव्या आईबहिण यांच्यावरून होत्या.. शिव्यांचे केंद्र केवळ आईबहिणच होत्या. शिव्यांच्या परिघात नातेविस्तार झालेला नव्हता. मावशी, आज्जी किंवा बापाकडून आत्या, काकी, तिकडची आजी इत्यादी स्त्रिया शिवीक्षेत्रात आल्या नव्हत्या - आजही विस्तारित नात्यावरून शिव्या नाहीतच. भांडण चालू असताना मी प्रथमच "शिव्या का दिल्या जातात? त्यात आईबहिणच का असतात? बापभाऊ का नसतात?" असा विचार करू लागलो.त्यामुळे कंडक्टर आणि प्रवाशाच्या भांडणातून मला नवीन ज्ञान काही मिळाले नाही. पण एक वेगळे भान आले. शिव्या मला नवीन नव्हत्या पण माझे शिवीचिंतन मलाच नवीन होते. सगळ्या स्त्रीकेंद्री शिव्यांनी माझ्या स्त्रीवादी जाणिवेचा पाया घातला, आणि हे स्त्रीवादाचे माझे पहिले भान होते, असे मी आता म्हणून शकतो. म्हणजे शिव्यांनी माझा स्त्रीवाद अभ्यास सुरु झाला.
अमूर्त शिवी चिंतन प्रत्यक्ष कागदावर उतरायला दहा वर्षे गेली. त्यातून माझ्या 'शिवीचे मानसशास्त्र' हा अतिशय कच्च्या स्वरूपातील लेख निर्माण झाला. 'अपशब्द संकल्पने विषयी काही तात्त्विक विचार' हा निबंध महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेत १९९५ साली वाचला. पण त्यावरील लेख प्रसिद्ध झाला तो १९९७ साली ('परामर्श' खंड १८, अंक ४, फेब्रुवारी १९९७). हा निबंध वाचून प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ डॉ अशोक केळकरांचे मला अतिशय उत्साहवर्धक पत्र आले. पण त्यांनी 'अपशब्द' शब्दाला हरकत घेऊन 'शिवी' हाच शब्द वापरण्यास सुचवले. मग माझ्याच महाविद्यालयात २००७ साली एका स्त्री प्रश्नांच्या परिषदेत मी 'शिवी : स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून' हा निबंध वाचला. आणि शिवी चिंतन बऱ्यापैकी पक्व होवून 'शिव्यांमधील पुरुषप्रधानता' ह्या लेखाच्या स्वरुपात ते चिंतन प्रकट झाले. ( 'पुरुष उवाच' - दिवाळी २००९)या शिवी चिंतनाने मला बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली.
शिवीला जोडून दारू येते. असाच रस्त्यावरून जाताना एकदा नवराबायको दारूने झिंगून एकमेकांना शिव्या देताना, झिंज्या ओढून मारामारी करताना पाहिलं. ते शिव्या देत होतेच, त्यात नाविन्य आढळले. मुख्यतः आईबहिण होतीच, पण बाप, सासूसासरा, मेव्हणा-मेव्हणी यांची भर पडून खुमासदार शिव्या बनवल्या जात होत्या. ती बाईसुध्दा नवऱ्यासारखी, पुरुषासारखी त्याच अवयवांवरून त्याच लैंगिक कृतीसूचक शिव्या देत होती. ते लैंगिक अथक व अदम्य संबंधाचे युद्ध चालू होते... ते करीत असलेल्या वर्णनावरून जणू प्रसंग उभा राहात होता. 'भाषा ही वस्तूस्थितीचे चित्र असते' हा तत्त्वज्ञानातील सिद्धांत तेथे सिद्ध होत होता. त्यांना आवरण्याच्या ऐवजी बघे ते एन्जॉय करत होते. मला चमत्कारिक वाटले. मला जाणवले- त्याक्षणाला ती बाई 'मानसिकदृष्ट्या स्त्री उरली नव्हती तर पुरुष झाली होती ! हे मानसिक कायांतर विलक्षण होते. माझ्या शिव्यांच्या लेखात हा मुद्दा मी नंतर समाविष्ट केला. पण दारूने हे घडल्याने दारू चिंतनाच्या केंद्रस्थानी आली आणि दारूचिंतन सुरु झाले. त्यातून "दारू म्हणजे काय रे भाऊ अर्थात मद्यपानाची आचार संहिता" हा एक प्रदीर्घ उपहास लेख मी लिहिला. तो २००५ साली 'परिवर्तनाचा वाटसरू' मध्ये प्रसिद्ध झाला.
पीएचडी करत असतानाच्या काळात २००५-०७ दरम्यान काहीतरी लिहिताना जेन्डरचे तत्त्वज्ञान म्हणजे काय ? असा प्रश्न पडला. त्यानंतर नोव्हेंबर २००७ ते ऑक्टोंबर २००९ दरम्यान ‘बायजा ’ मासिकातल्या लेखमालेत मी – ‘लैंगिक अल्पसंख्यांक आणि लिंगभाव’, ‘लिंगभावाच्या तत्त्वज्ञानाची गरज’ ह्या संकल्पना तात्त्विक दृष्टीकोनातून स्पष्ट केल्या.
या खेरीज ज्या ज्या विषयांचा त्रास मला झाला किंवा प्रश्न पडले ते सारे मी लिहिले. गितालीने काही विषय मला लिहायलाच लावले, त्यामुळेही काही नवीन विचार सुचले. संकल्पना स्पष्ट करणे हा हेतू होताच. संगमनेरला वरिष्ठ महाविद्यालयात 'भारतीय तत्त्वज्ञान' हा स्पेशल पेपर शिकवत असताना मला बरेच प्रश्न पडत गेले. पुरुष-प्रकृति, ब्रह्म-माया, चार्वाकांचा अर्थ-काम पुरुषार्थ ह्यात मला स्त्री-पुरुष नाते आणि त्यातील पुरुषी पक्षपात, शोषण, विषमता जाणवू लागली. त्या नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी सुरु केला. मला जे जाणवले ते नवीन आहे, ह्याची मला खात्री होती. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर 'महाराष्ट्र टाईम्स' चे संपादक होते. त्यांना मी 'चार्वाकांची स्त्री विषयक संकल्पना' असा लेख पाठवला. तो त्यांनी प्रसिद्ध केलाच पण पुढे त्यातूनच समग्र भारतीय दर्शन परंपरेतील 'स्त्री' विषयक मते मांडावीत असे वाटले. त्यावेळी म. टा चे 'मैत्रिण' हे सदर सुरु होते. या सदरात 'भारतीय तत्त्वज्ञानातील स्त्री दर्शन' ही लेखमाला १९९७ साली मी लिहिली. त्यानंतर अनेक दिवाळी अंकात अजूनही मी स्त्रीवादी अंगाने लिहीत आहे.
जसजसे मी स्त्रीवादी लेखन करत गेलो, वाचत गेलो तसतसा मी स्त्रीवादी बनलोच आणि 'पुरुषीसत्ताकवाद विरोधी' देखील बनत गेलो. स्त्रीपणा किंवा पुरुषीपणा हा लिंगाधारित आहेच, ह्यात शंका नाही. पण मला असे अनुभव येत गेले की पुरुषीपणा हा पुल्लिंगाच्या पलिकडे गेलेली वृत्ती बनली आहे. तिने अनेक स्त्रिया कह्यात घेतल्या आहेत किंवा त्या गेल्या आहेत. काही स्त्रियादेखील पुरुषी आहेत. भारतीय स्त्रियांमध्ये तर धर्मवर्णजात यांचाही अहंकार आढळतो मला! निवडणुकीतील उमेदवार स्त्रिया मतदारांना दारू, मटणाची लाच देणाऱ्याही आढळल्या. लाचखोर कर्मचारीही आढळल्या. नवरा वेश्याव्यवसायात काम करतो म्हणून त्याला पोरी पळवण्यात मदत करणाऱ्या, बलात्काराला मदत करणाऱ्या...तशा टीव्ही वाहिन्यांवरील विषप्रयोग करणाऱ्या, अनेक भानगडीत गुंतलेल्या ,चकचकीत काकू, मामी, सासवा सुना याही पुरुषीच आहेत, असे मला वाटते. या मुद्दया विषयी मला आणखी विस्ताराने लिहायचे आहे.
माझ्या मनात प्रश्न उपस्थित होतील तसे आणि संधी मिळेल तसे स्त्रीवादी लेखन मी केले. स्त्रीवादाची जाणीव मला असली तरी मी कुठल्याही चळवळीत कधीच सक्रीय नव्हतो. MAला असताना बहुधा विलास वाघ, वसुधा सरदार यांनी आंतरजातीय विवाह संघटना किंवा गट स्थापन केला होता. त्या गटाच्या काही बैठकांना उपस्थित राहिलो होतो. या गटाच्या चळवळीकडे 'जातीचे वाहन असणारी स्त्री ही प्रतिमा बदलण्याचा प्रयोग' म्हणून मी पाहात होतो. चळवळीत कार्यकर्ता होणे, मोर्चे-आंदोलने करणे म्हणजेच फक्त चळवळ करणे असे मी समजत नाही. विचार करणे, विचारांची निर्मिती करणे ही सुद्धा माझ्या मते कृतीच आहे. म्हणूनच मी 'स्त्रीवाद' आणि तिच्याशी जोडल्या गेलेल्या 'पुरुष', वर्ण, जात, धर्म, आश्रम, पुरुषार्थ, भाषा इत्यादी संकल्पना माझ्या मलाच स्पष्ट करत आलो आहे. स्त्रीवादात गुंतलेल्या संकल्पना स्वतः समजून घेणे आणि इतरांपर्यंत त्या संधी लाभेल तसे पोहोचवण्याचा प्रयत्न करणे, हे माझ्या 'व्यक्तिगत स्त्रीवादी चळवळी' चे स्वरूप ठरले.हाच माझा स्त्रीवाद आहे! आणि ह्या शोधप्रवासात मला आलेले स्त्रियांचे अनुभव, त्यांच्या जाणवलेल्या मर्यादा आणि त्यातून माझा घडत गेलेला व घडणारा स्त्रीवादापलिकडील मानवतावाद.. मला मांडायचा आहे. या सगळ्या प्रयत्नातून मला स्त्रीत्वाचा आणि पुरुषत्वाचा शोध कसा लागला आणि दोन्हीही कसे पक्षपाती ठरू शकतात, आणि त्यावर मी कोणता उपाय शोधला, ते मला सांगायचे आहे...त्यासाठी आणखी एक लेखमालाच लिहावी लागेल!

श्रीनिवास हेमाडे

नजरीया


मी लग्न करून घरात आले आणि बरोबर एका महिन्याने मला पाळी आली. मी आईंना सांगितल्यावर मला त्यांनी – ‘त्याच खोलीत रहा’ - असं सांगितलं. मी जराशी गोंधळले पण, वाटलं की तेवढ्यापुरतंच असेल. पण थोड्या वेळाने बाथरूमला जायला म्हणून बाहेर आले तर त्या म्हणाल्या की, इथेतिथे हात न लावता बाथरूममध्ये जा. जर डोळस माणसाला समोर बघून चालताना अजिबातच इकडेतिकडे नजर वळवता कामा नये, असं सांगितलं तर जमेल का? नजरेच्या टप्प्यातल्या वस्तूंनाही नजरेचा स्पर्श होणारच ना? की तेही घाण आहे, अपवित्र आहे असं मानलं जाईल? मला आईंच्या सूचनांनी दडपण आलं... बाथरूमच्या समोरच्या पॅसेजमधला पिंप आणि सर्वच कामांसाठी वापरलं जाणारं त्यातलं पाणी माझ्या स्पर्शाने विटाळेल असं त्यांचं म्हणणं होतं. मी आतूनच बंडखोर! असं कोणी काही सांगायला लागलं की, आतून चीड दाटून यायची. काय आणि कसं सांगावं या लोकांना? मला दिसत नसल्याने फक्त त्यांना खूश ठेवण्यासाठी म्हणून सुद्धा कुठेही स्पर्श होऊ न देता वावरणं मला शक्य नाही हे जाणवलं. मी पुढे जात म्हटलं, “मला दिसत नाही, चुकून तरी माझा हात लागेलच इथेतिथे.” त्यांनी ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि पिंपाशी येऊन उभ्या राहिल्या. त्या दिवशी जेवण माझ्यासमोर लांबून सरकावलं गेलं, ते बेडरूमच्या दारात ठेवलं गेलं, माझं ताट मी बाहेरच्या बेसिनमध्ये धुतलं, पिण्याचं पाणीही बाटल्या भरून दारातच आणून ठेवल्या होत्या. या सर्व गोष्टींनी मनावर ओरखडे उमटत होते. त्या वेळी भरतने जवळ असावं हे प्रकर्षाने जाणवत होतं पण, तो ऑफिसात होता. संध्याकाळी तो घरी आला. मी त्याच्या कुशीत शिरायला अधिर झालेले पण, दारातच त्याला मला पाळी आल्याची बातमी दिली गेली. तो बेडरूममध्ये आला आणि मला गच्च जवळ घेतलं. मी रडत सुटले. या अशा वातावरणातून पार पाडायला जर भरत ताकदीने उभा नसता तर माझ्या संघर्षाला एकाकी रंग चढला असता. रात्री माझं ताट त्याने बेडरूम मध्ये आणलं. मागोमाग कुजबूज आली तरी स्वतःचं ताटही तो आतच घेऊन आला. त्याचा बिछाना बाहेर घातल्याचं त्याला सांगितलं तेव्हा ठामपणे – ‘मी आत अनुजाजवळ झोपणार’ - हे खणखणीत आवाजात सांगितलं आणि तसंच केलं. ही बाब माझ्यासाठी जशी खूप मोठी, महत्त्वाची होती तशीच ती त्याच्यासाठीही खूप महत्त्वाची होती. काल आलेल्या पोरीपायी त्याला थेट आईवडिलांच्या विरुद्ध उभं रहावं लागलं होतं. पुढे हळूहळू याचा त्रास आम्हा दोघांनाही झाला, तो आजही वेगळ्या पद्धतीने होतोच. पण तो सोबत आहे!
माझ्यासोबत भरत नसता तर मी ह्या नियमांनी स्वत:ला बांधून घेतले असते का? खरं सांगायचं तर अजिबात नाही. पाळीच्या बाबतीत एवढी स्पष्ट आणि ठाम भूमिका मनात निर्माण झाल्याचं कारण माझी शाळा. वयाच्या नकळत्या टप्प्यापासून आम्ही निवासी शाळेत वाढलो. दुखलंखुपलं, छोटी आजारपणं, रोजच्या सवयी सारं शाळेने शिकवलं. मुलगी म्हणून आयुष्यातला सर्वात मोठा बदल म्हणजे पाळी येणं. हा बदल मी आणि माझ्या अनेक मैत्रिणींनी शाळेतच पाहिलाय. आम्हा मुलींचं वय वर्गाच्या मानाने बहुतेक एखाद दुसरं वर्ष जास्त असायचं. म्हणजे १० वर्षांचं मूल जे पाचवीत असणं प्रमाण मानलं जायचं तिथे आमच्या विशेष शाळांमध्ये पाचवीतल्या मुली १२-१३ वर्षांच्या म्हणजेच पाळी येऊ शकते अशा वयाच्या असायच्या. अशा टीनएजच्या उंबऱ्यावर असलेल्या सर्वच मुलींना शाळेतून लैंगिकता शिक्षण दिलं जायचं. शरिरात होणारे बदल, पाळी कशी येते, त्या वेळी आपल्याला कोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात, या दिवसात कशी काळजी घ्यावी आणि स्वच्छता कशी राखावी हे समजावलं जायचं. या पाळीबद्दल माहिती देण्यासाठी जी मंडळी यायची त्यात एक ताई आणि एक दादा असायचे. तेव्हा ‘अय्या, हे दादा का बोलताहेत मुलींच्या विषयी!’ असा प्रश्न मनात यायचा आणि आम्ही सर्व एकत्र आलो की, त्याबद्दल बोलायचोसुद्धा! पण ही मंडळी आम्हांला फक्त पाळीसंदर्भात माहिती देऊन थांबत नसत तर पाळी येणं ही एक नैसर्गिक घटना आहे, याचा देवाशी किंवा पवित्र-अपवित्र या मान्यतांशी काहीही संबंध नाही असं ठासून सांगत. पाळीत आपण देवाला नमस्कार करू शकतो. देव सगळीकडे आहे. त्याला पाळीबद्दल घाण वाटत नाही उलट त्याला मुलींची खूप काळजी वाटते वगैरे आम्हांला समजेल असं ते काहीबाही सांगत. त्यावेळी अर्थ फारसा कळायचा नाही पण, शब्द मनात कोरले गेले! तेव्हापासूनच मला पटायला लागलं की, पाळी येणं हे वाईट नाही. पण, हे चांगलं आहे असं वाटायला लागलं ते आमच्यासाठी घेतल्या गेलेल्या आणखी एका वर्कशॉपमुळे!
तेव्हा मी आठवीत असेन. पाळी येणं थोडंफार कॉमन झालेलं... तरी त्याबद्दल माहिती देणाऱ्या ताई दरवर्षी यायच्या आणि आम्हा सर्वांना तिथे जावं लागे. वाटायचं - आता येतेय ना पाळी, मग का नेहमीच तेच ते ऐकायचं? एकदा त्या ताईने तेव्हा आम्हांला स्त्री आणि पुरूषाच्या जननेंद्रियांचे लाकडी मॉडेल दाखवले. आम्ही आधी उगाच कचरत होतो. पण, हळूहळू ते कमी होत गेलं आणि आम्ही शांतपणे ते मॉडेल्स हाताळले. योनी म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा तिथे ऐकलं. ताईने घरी गेल्यावर आपला अवयव नीट पहा असं सांगितलं, तेव्हा शाळेतून आलेल्या शिक्षिकेने असलं काही मुलींना सांगू नका असं निक्षून सांगितलं. पण ताईंनी मात्र त्यांना थांबवलं. त्यांनी पुढे सांगितलं की, जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा त्यांना बाळ होतं. ते एकत्र कसं येतात आणि बाळ कसं होतं हेही त्यांनी जुजबी पद्दधतीने सांगितलं पण, त्यापुढचं वाक्य माझ्या आयुष्याला वेगळा विचार देऊन गेलं. त्या म्हणाल्या होत्या की, बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हा स्त्रीची पाळी बंद होते. याच पाळीच्या रक्ताची मऊ गादी असते आपल्या गर्भाशयात ज्यावर बाळ झोपलेलं असतं. पाळीच्या रक्तातला काही भाग घेऊन बाळ वाढतं, मोठं होतं म्हणून या दिवसात पाळी येत नाही. आपली पाळी ही बाळ तयार करणारी अगदी शक्तीशाली गोष्ट आहे. मग, ज्या पाळीमुळे आख्खा एक माणूस तयार होत असेल तर ती घाण, असेल का? यावर आम्ही मुली खणखणित आवाजात म्हणालो, “नाही...” पण मनातला विचार पक्का करण्याचं काम या सततच्या माहितीने झालं.
मी तेव्हापासून हे सारं घरी गेल्यावर माझ्या मम्मीला आणि माझ्या दोन खास मैत्रिणी होत्या त्यांना सांगत असे. त्या दोघी डोळस असूनही त्यांना माझ्यासारखी अजिबात माहिती कशी नाही? असा प्रश्न मला पडायचा. त्या म्हणायच्या की, घरात कोणी याबद्दल काही बोलतच नाहीत. त्यातल्या एका मैत्रिणीला तर पाच बहिणी होत्या, तरी अज्ञान होतं - अर्थात संवादाची कमतरता होती. याच मैत्रिणी लहानपणी मला सोबत खेळायला घेत नसायच्या आणि मोठ्या झाल्यावर माझ्याशी लैंगिकतेबद्दल बोलण्यासाठी माझी शुक्रवारी वाट बघत असायच्या. आमची वेळही मजेदार. शनिवारी आणि रविवारी सकाळी सातला आम्ही तिघी गच्चीवर भेटायचो आणि खूप गप्पा मारायचो. मी त्यांना रटरटाई माहिती द्यायचे तर त्या मला कोणता मुलगा किती हॅंडसम दिसतो, कोणाची हेअर स्टाइल एकदम भारी आहे - हे सर्व जनरल नॉलेज पुरवायच्या. शाळेत जाताना येताना मुद्दाम मुलांशी ओळख काढण्याचे नुस्खेही मला सांगायच्या. पण मला हे ऐकून एन्जॉय करण्यापलिकडे काहीच करता येणं शक्यच नव्हतं. मी एका कोंदणात होते. घरी मम्मीपप्पांच्या नजरेत आणि शाळेच्या भिंतीत.
शाळेत असताना आवर्जून पाळी ही कशी अत्यंत नैसर्गिक, वैज्ञानिक घटना आहे - हे समजावलं जायचं. पण याच शाळेत जेव्हा नागपंचमीची पूजा, गोकुळाष्टमीचा उत्सव किंवा होळीला वंदन करायचं असलं की, ‘पाळी आलेय का गं कोणाला?’ - असं हॉलमध्ये विचारून त्यांना खाली न येण्याची सक्त ताकिद दिली जायची. ही विसंगती तेव्हा समजतच नव्हतीच. पण, मनात विचार यायचा की देवीलाही तर पाळी येत असेल मग तिच्या पूजेत पाळी आलेल्या मुलीला का परवानगी नाही? 
आमच्या शाळेतला एक प्रसंग खूप बोलका आहे. मी तेव्हा आठवीत होते. सातवीच्या मुलींनी वर्गाला विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षिकेला जाऊन प्रश्न विचारला, “कॉन्डम म्हणजे काय?” तर शिक्षिकेने त्या मुलींची मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली. जर त्यांना नीट सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? आज मला त्या शिक्षिकेची कीव येते. टिव्हीवरच्या जाहिरातीत, रेडियोवरही कित्येकदा हा शब्द कानावरून जात असतो पण, तो उच्चारायचा मात्र नाही! का? कारण ते घाण आहे! - हे त्या मुलींच्या मनात बसलं. या कोषातून बाहेर पडून मोकळेपणे पाळी, शारीरिक संबंध, सेक्समधून मिळणारं प्लेजर, याबद्दल सहज बोलणं कधीतरी जमेल का? जमेलही कदाचित. पण हा प्रसंग मनात येईल तेव्हा मन बिचकेल. वयात येताना आवश्यक असलेल्या सुयोग्य कम्युनिकेशनच्या अभावामुळे अनेक समस्या निर्माण होतात. हेच निकष लावून आपण अंध मुलांचाही विचार केला पाहिजे. खरं म्हणजे नुकत्याच वयात येणाऱ्या मुलामुलींना लैंगिक कुतूहल वाटणं स्वाभाविक समजलं पाहिजे. तसं या वयात दोन मुली किंवा दोन मुलं एकमेकांच्या जवळ येणं स्वाभाविक आहे. पण आज जरी समलैंगिकतेला कायद्याचं स्वरूप प्राप्त झालं असलं तरी हे सामान्य लोकांच्या पचनी पडत नाही. शाळेत आम्ही लहान असताना किंवा आमच्या बॅचनंतरही कितीतरी असे प्रकार पुढे आले. पण अशा मुलींशी कधीच कोणी प्रेमाने बोलले नाही. त्यांना इतर मुलींपासून वेगळं ठेवायचे. ती मुलगी स्वतःहून ‘चूक’ कबूल करेपर्यंत तिला एकांतवास भोगावा लागे. हे अंध मुलांच्या शाळेतही घडतं. आजकालची मुलं मात्र किमान मोकळेपणाने शंका तरी विचारतात! माझे कितीतरी मित्र-मैत्रिणी असे आहेत ज्यांनी माझ्याशी सेक्स, पाळी, प्रेग्नन्सी, डिलेव्हरी याबाबत चर्चा केली आहे.
मुलगी म्हटलं की, सुरक्षितपणाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळणाऱ्यावर येतेच. तशी शाळेवरही ती होतीच. वयात येणाऱ्या अपंग मुलींच्या गटावर लक्ष देणं सोपं नाहीच आहे. शाळेतून मुलींना एकट्याने बाहेर जायला बंदी होती आणि ती आवश्यकही होती. आमच्या राहण्यावर, कपडे घालण्यावरही शाळेतून बंधनं होती. जिन्स घालायची बंदी होती. पण त्यामुळे असं होत होतं की, मुलींना आपलं घर किंवा शाळेतच अडकून रहावं लागत असे. त्यामुळे इतरांमध्ये मिसळणं, आत्मविश्वासाने वावरणं जमायला खूप वेळ जायचा. मुलांशी मैत्री नसल्याने सुरुवातीला त्यांच्याशी बोलायला खूप दडपण यायचं आणि मग जर कोणी एखादा गोड बोललं की, या मुली त्याच्या बोलण्यात वाहवतही जायच्या. थोड्याफार प्रमाणात आजही असंच होतं. खरंतर, यात दोष कोणाचाच नाही. पण या सर्वाचा मुलींच्या व्यक्तीमत्त्वावर दूरगामी परिणाम होतोच. घरापासून दूर राहणाऱ्या मुलींना कॉलेजमध्ये गेल्यावर अचानकच मोकळं आभाळ दिसतं. त्यात भरारी मारणं सुरुवातीला जड जातं पण, एकदा उडता येऊ लागलं की, कुठे कसं वावरावं हे मात्र संवादातून पटवून देणारं, समजावणारं कोणीही नसतं. अशात, जो मुलगा तारुण्यसुलभ भावनेतून बोलतो त्या मुलाशी या मुली चटकन् भावनिक दृष्टीने जोडल्या जातात. यातला मुलगा विचारी असेल तर ठिक; जर नसेल तर मुलींचा उपभोग घेऊन, त्यांना फसवून, त्यांच्या भावनांचा वापर करून सोडून देतात. शाळेतून लैंगिकतेबद्दल माहिती मिळते, आपली शारीरिक काळजी कशी घ्यावी याबद्दलही सांगितलं जातं. पण भावनिक बाबतीत स्वत:ची काळजी कशी घ्यावी, दुसऱ्याला कसं ओळखावं याबाबत स्वतःहून मुलींशी कोणीच आपलेपणाने संवाद साधत नाही. जगात वावरण्याचाही फारसा अनुभव नसतो. मग एकाने सोडून दिलेल्या मुलीला दुसरा मुलगा आधार देऊ पाहतो. ती त्यात मानसिक आधार शोधत असते पण, त्याच्या उद्देशाबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह असतं. यामुळे काही मुली एकाकडून दुसऱ्याकडे फक्त लैंगिकभूक भागवण्याचं साधन म्हणूनच जात राहतात. माझ्या अशा कितीतरी मैत्रिणी आहेत ज्यांना पार्टनर होते पण, लग्नाची वेळ येताच त्यांनी डोळस मुलींशी लग्न केली. अशा संबंधातून सावरण्यासाठी, गर्भधारणेसारख्या अडचणी सोडवण्यासाठी ती एकटीच उरते. चांगली धडधाकट मुलगी असली तरी तिचं लग्न होणं कठिण होतं अशावेळी - मग दृष्टीहीन मुलीचं काय होणार ? 
अनेक दृष्टिहीन मुलींना तर त्यांच्या घरातलीच माणसं लैंगिक त्रास देतात. माझ्या शाळेतली एक अत्यंत सुखवस्तू घरातली मुलगी. वर्गात अभ्यासात आणि गाण्यातही हुषार होती. माझ्यापेक्षा किमान ४-५ वर्षं तरी सीनिअर. ती पास आऊट होऊन गेली. मग मीही कॉलेज वगैरेत गुंतले. पण, तोपर्यंत आमच्यातला संपर्क तुटला होता. अचानक भेट झाली आणि कळलं की ती पुढे शिकलीच नाही. शाळा जेमतेम पूर्ण झाली. तिला कारण विचारलं तर एकदम रडत सुटली आणि म्हणाली, “आईवडिल बाहेर जाऊ देत नाही. वडलांची भिती वाटते, राग येतो, चीड येते.” तिला शांत करून विचारलं तर कळलं की, रोज रात्री तिचा बाप तिच्यावर बलात्कार करत होता. आम्ही एकदोघी मैत्रिणींनी तिला घराबाहेर निघायला मदत केली होती. पण, तिच्यावर दबाव टाकून पुन्हा स्वतःच्या आईनेच तिला घरी परत बोलावलं. तिने दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला तरी तिची विटंबना अजूनही चालूच आहे. आणि माहिती असूनही संपर्कच नसल्याने आपण काहीच करू शकत नाही, ही शोकांतिका! 
तशी मला आठवते ती छोटी. एका वर्गाने माझ्यापेक्षा मागे. दर शुक्रवारी आई घ्यायला यायची. तिच्याच घरी बहिणीचं कुटूंब येऊन राहिलेलं. ती आली की, रात्री तिचा भाओजी तिच्यावर आई आणि बहिणीदेखत बळजबरी करायचा. बहिणीला वाटायचं तेवढाच आपल्याला आराम आणि आईला तो धमकी देत असे – ‘बोललीस तर पोरीला सोडून देईन. नाही तरी या आंधळीचं काय करणार?’ मनावर असलेल्या प्रचंड दडपणाने तिला टिबीने ग्रासलं पण, माझ्यासमोर तिने त्या गोळ्या कित्येकदा बेसिनमध्ये चुरून वाहवल्यात. तेव्हा मला तरी किती अक्कल असणार? पण एका प्रकारे तिने केलेली ही आत्महत्याच ना? आज हे लिहितानाही मनात राग भरून राहिलाय.
माझ्यासारख्या सुशिक्षित आणि स्वावलंबी मुलींना नोकरीसाठी घराबाहेर पडणं देखील सोपं नाही. रस्त्यावर, ट्रेनमध्ये आम्हाला लैंगिक त्रास द्यायला टपलेल्या पुरुषांपासून सतत सावध राहावं लागतं. एक मैत्रिण थोडा उशिराचा कार्यक्रम अटेंड करून घरी येत होती. पश्चिम रेल्वेच्या अपंगांसाठीच्या डब्ब्यात ती बसली होती. डब्ब्यात ती एकटीच असावी. एक स्टेशन गेलं असेलनसेल; एक माणूस आला आणि त्याने तिच्या गालावर पप्पी घेतली आणि ट्रेन थांबताच उतरून पळून गेला. तिने आवाज करायला हवा होता ना? पण होतं कोण तिचं ऐकायला? कुणी म्हणेल रात्रीच्या वेळी प्रवास करू नये. मग तिला सोशल लाइफ कसं मिळणार? आणखी एकीची गोष्ट अशी की एकदा गर्दी कमी असताना एक माणूस हळूहळू सिटवरून सरकत तिच्या जवळ आला. बेंचवरून हात पुढे सरकवत तिला स्पर्श केला. ती लांब झाली. पुन्हा तेच झालं म्हटल्यावर तिने त्याचा हात धरला आणि मुरगळला. नखं रुतवली आणि म्हणाली की, जर पुन्हा असं काही केलंस तर मी तुला फाडून खाईन. ती म्हणाली, ‘ही एवढी हिंमत दाखवताना मात्र ताई मी खूप घाबरले होते गं!’
पण हे असे प्रसंग रोजच घडतात. रोड क्रॉस करताना गाड्यांचा आडोसा मिळाला की, कोणी छातीला हात लावू पाहतं, कोणी कोपराने ढोसू पाहतं. कोण काय करेल, हे सांगणं कठिण! पण यावर तोडगा काय? 
खरं तर अंधत्व आणि लैंगिकता याबाबत काम करणाऱ्या संस्थांची खूप गरज आहे. आजकाल अंधांसाठी काम करणाऱ्या संस्था अनेक आहेत पण त्या शिक्षण, रोजगार एवढ्या पुरत्याच मर्यादित आहेत. पण शिक्षणाबरोबर लैंगिक शिक्षण, लैंगिक समस्या आणि त्यासंदर्भातला मुक्तसंवाद यावर काम करायची आवश्यकता कोणालाही जाणवत नाही. लैंगिक समस्यांवर बोलता येईल असा एखादा तज्ञ तरी या संस्थांमधून असावाच असं मला मनापासून वाटतं! 

अनुजा संखे 

स्त्रीवाद नाकारताना

जेव्हा कोणीही व्यक्ती – ‘मी फेमिनिस्ट नाही!’ असं ठणकावून सांगते ; तेव्हा त्यांना असं का सांगावंसं वाटतं  हे समजून घेणं स्वत:ला स्त्रीवादी मानणाऱ्या सर्वांसाठी आवश्यक आहे.


स्त्रीयांचे हक्क, स्त्रीपुरुष समता किंवा स्त्रीयांवर होणारे अत्याचार असे काही विषय चर्चेत आले की काही लोक हिरीरीने स्त्रियांची बाजू मांडतात, जितके लोक आपण ‘स्त्रीवादी’ असल्याचं आवर्जून सांगतात त्यापेक्षा कितीतरी मोठ्या संख्येने – ‘आपण स्त्रीवादी नसल्याचे’ सांगणारेही लोक असतात. काही लोक स्वत:ला ‘स्त्रीवादी’ म्हणवणारांची टर उडवतात, किंवा आता खरंतर पुरुषांनाच संरक्षणाची गरज आहे – असंही म्हणतात. यात बरेचदा पुरुषांची संख्या जास्त प्रमाणात असते. पुरुषांनी ‘स्त्रीवादी’ असण्याची अपेक्षा बहुतेक वेळा केलीही जात नाही. 
पण सगळ्या स्त्रिया मात्र जन्मत:च ‘स्त्रीवादी’ असतात – अशी बऱ्याच जणांची समजूत असते. त्यामुळेच की काय स्त्रियांनाच - ‘मी स्त्रीवादी नाही’- असं सांगायची गरज पडत असावी! अनेक सेलिब्रिटीज्, यशस्वी महिला, कधीकधी सामाजिक कार्यकर्ते आणि काहीवेळा तर पूर्वी स्वत:ला स्त्रीवादी म्हणवणाऱ्या व्यक्तीदेखील पुढे येऊन आपण स्त्रीवादी नाही – असं सांगतात. काहीजणी स्त्रीवादी चळवळीमुळे स्त्रीयांना मिळालेल्या शिक्षण, नोकरी, सोयीस्कर कपडे वापरणे अशा सुविधांचा पुरेपूर फायदा घेत जगत असतात आणि तरीसुद्धा – आपण स्त्रीवादी नसल्याचा दावा करतात. काहींनी स्त्रीवादाची अनेक तत्त्व अंगीकरलेली असतात तरीदेखील त्यांना “स्त्रीवादी” हे लेबल नको असते. असे स्त्रीवादाला नाकारणाऱ्या व्यक्तींचे अनेक प्रकार पाहायला मिळतात.

स्त्रीवादाचे अनेक प्रकार आहेत आणि सर्व स्त्रिया एकजिनसी नाहीत असं स्त्रीवाद मानतो. तसाच हा स्त्रीवाद नाकारणारा गटही एकजिनसी नाही. त्यांचेही वेगवेगळे प्रकार दिसतात. जेव्हा कोणीही व्यक्ती – ‘मी फेमिनिस्ट नाही!’ असं ठणकावून सांगते; तेव्हा त्यांना असं का सांगावंसं वाटतं आणि त्यांचं म्हणणं काय आहे, हे समजून घेणं स्वत:ला स्त्रीवादी मानणाऱ्या आणि आग्रहाने सांगणाऱ्या सर्वांसाठी आवश्यक आहे.

यापैकी सर्वात पहिला वर्ग आहे उघड उघड स्त्रीवादाचा द्वेष करणारा आणि स्त्री-पुरुष असमान आहेत असंच मानणारा आणि पितृसत्तेची मूल्य दिमाखाने मिरवणारा आहे. या व्यवस्थेचे फायदे असलेला पुरुष पितृसत्तेची याची भलामण करणार यात आश्चर्य नाही! पण देव, धर्म यांच्या नावाखाली रूढ झालेल्या व्यवस्थेत काही स्त्रियादेखील म्हणतात – हो, मी लग्नानंतर माझ्या नवऱ्याचं नाव लावते, मुलं जन्माला घालते, घर सांभाळते, नोकरी करत नाही, पैसे कमावत नाही. मी धर्माने मला नेमून दिलेलं काम करते मी अजिबात स्त्रीवादी नाही आहे. असं म्हणणाऱ्या महिलांना बहुधा हिंसाचार आणि विषमतेचे फारसे चटके बसलेले नसतात.

दुसरा वर्ग आहे – ‘हे वाद वगैरे आपल्याला काही माहित नाही’ असं म्हणणारा. कोणत्याही ठराविक चौकटीत बसणं त्यांना आवडत नाही. ‘मी एक व्यक्ती आहे आणि मी या सगळ्या वादांच्या पलीकडे आहे. माझ्या क्षमता, माझी ताकद यांचा - मी स्त्री आहे याच्याशी काही संबध नाही. स्त्री आणि पुरुष यांच्याबद्दल विचार करण्यापेक्षा अनेक महत्वाची कामं आहेत आमच्या आयुष्यात!’ असं त्यांना वाटतं. अशा व्यक्तिवादी लोकांना सतत स्वत:ला समूहाशी जोडून घेणं किंवा आपली प्रगती अथवा अधोगती यामागे स्त्री असण्याचा संबंध आहे हे पटत नाही. तर काही सेलिब्रिटी म्हणतात – ‘मी एक स्वतंत्र आणि खंबीर महिला आहे पण मी स्त्रीवादी नाही. जन्माने मी स्त्री आहे म्हणून मी स्त्रीवादी असलंच पाहिजे असं काही आहे का?’ काही दिवसांपूर्वी करीना कपूर ने असेच विधान केले होते. मराठी साहित्यात  स्त्रीयांच्या बाजूने प्रश्न मांडणार्‍या मेघना पेठे, विजया राजाध्यक्ष, अनुराधा पाटील, अरुणा ढेरे अशा अनेक लेखिका आवर्जून आपण ‘स्त्रीवादी’ नसल्याचे सांगतात. 
तिसरा वर्ग आहे ज्यांना वाटतं की - कोणे एकेकाळी स्त्री-पुरुष विषमता होती; पण आता कुठे तशी परिस्थिती आहे? मुली शिकत आहेत, सर्व क्षेत्रात अग्रभागी आहेत. आता काय स्त्रीवादाची गरज आहे? स्त्रीयांना झुकतं माप देणं थांबवलं पाहिजे. स्त्रीवादाचं उद्दिष्ट सफल झालं असून आता समानता आलेली असताना पुन्हा स्त्रियाच बळी आहेत अशी ओरड करणं थांबवलं पाहिजे. महिलांनी ठरवलं तर त्या सक्षम होऊ शकतात. आता स्त्रीपुरुषात भेदभाव केलाच जात नाही. पुरुषानाही आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. फक्त स्त्रीयांना समान वेतन नाही अशी ओरड चुकीची आहे. स्त्रीया स्वत:च अशी काम निवडतात त्यामुळे त्यांना पुरुषांपेक्षा कमी वेतन मिळतं! स्त्रीया किंवा पुरुष कोणालाही विशेष स्थान दिले जाऊ नये- असं त्यांचं म्हणणं असतं. काही जण म्हणतात, आता आपण लिंगभाव निरपेक्ष झालं पाहिजे. फक्त स्त्रीपुरुषांतच नव्हे तर सर्वलिंगभाव समानता झाली पाहिजे.

त्या पलीकडे जाऊन काहीजण म्हणतात मी समानतावादी आहे, मानवतावादी आहे म्हणून मी स्त्रीवादी नाही. सगळ्यांनी एकमेकांशी समजूतदारपणे वागलं की आपोआप समता येईल – अशी अनेकांची कल्पना असते. काहीजण म्हणतात लग्न, घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार या कायद्यामध्ये महिलांना धार्जिण्या तरतुदी केल्याने पुरुषांवरच अन्याय होतो आहे. कायद्यांच्या या तरतुदीचा महिला गैरवापर करत आहेत. त्यामुळे संसार उध्वस्त होत आहेत. अशा अनेक कारणांनी स्त्रीवाद या संकल्पनेला आणि स्त्रीवादी असण्याला विरोध होत आलेला आहे.

वर सांगितलेली बहुतांश कारणं काही महिलांनी २०१४ साली सोशल मीडियावर सुरू केलेल्या “विमेन अगेन्स्ट फेमिनिझम” ( स्त्री वादाविरुद्ध महिला) ह्या चळवळीतून पुढे आलेली आहेत. ही चळवळ सुरू करणाऱ्या व्यक्तीने ‘ट्रोलिंग’च्या भीतीमुळे स्वत:चं नाव जाहीर होऊ दिलं नव्हतं. पण या चळवळीत भाग घेणाऱ्या महिला टंब्लर, ट्विटर, फेसबुक अशा माध्यमावर हातातल्या पोस्टरवर आपल्याला स्त्रीवादाची का गरज नाही त्याची कारणं लिहिलेला स्वत:चा फोटो पोस्ट करत  होत्या. ही मोहीम म्हणजे एकप्रकारे - हु नीड्स फेमिनिझम - या अभियानाला दिलेलं उत्तर होतं. 
आपण आपल्यातले फरकच अधोरेखित करत राहिलो तर आपल्यात काय साम्य आहे हे कसं कळणार? आपल्याला एकमेकांपासून लांब नाहीतर एका मध्यावर येण्याची गरज आहे तरच आपण समानता स्थापन करू शकू. त्यासाठी स्त्रीवाद या शब्दापासून फारकत घेतली पाहिजे. कारण स्त्रीवाद हा फक्त स्त्री पुरुष एवढ्याबद्दल बोलतो. अनेक लैंगिक ओळखी असलेल्या समाजात आपल्याला जास्तीत जास्त समावेशक झालं पाहिजे. फक्त स्त्री पुरुषच नाही त्तर इतर लिंगओळखीना सामावून घेता आलं पाहिजे. प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या त्यांच्या लिंगाशिवायही अनेक ओळखी असतात. आपल्याला समानता हवी असेल तर आपल्याला फक्त स्त्रिया नाहीतर सर्वांच्या झगड्याबद्दल बोललं पाहिजे आणि सर्वाना सोबत केली पाहिजे. सर्व लिंगभाव समानता झाली पाहिजे. पुरुषांमुळे समस्या निर्माण झाल्या असतील तर समस्यांच्या उत्तर शोधण्यासाठी त्यांना बरोबर घेणं आवश्यक आहे.

काहीजणी स्त्रीवादी चळवळीच्या विरुद्ध आहेत कारण या स्त्रीवादी चळवळीने स्वीकाराच्या नावाखाली आपली खरी ओळख हरवली आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळे स्त्रीवाद हा आता बिनकामाची, नम्र, प्रभावहीन चळवळ होऊन राहिली आहे ती ‘जैसे थे’ वृत्तीला प्रश्न विचारात नाही म्हणून जेसा क्रिस्पीन यांनी अन्यायाची संपूर्ण व्यवस्था उलथून टाकणारा क्रांतिकारी जाहीरनामाच लिहिला आहे. 
ती म्हणते - 

“गेल्या काही वर्षात स्त्रीवाद इतका बोथट झाला आहे कि त्याने आपली ओळख हरवली आहे. त्यामुळे स्वत:ला स्त्रीवादी म्हणवून घेण्यात काही अर्थ नाही. स्त्रीवाद सार्वत्रिक करण्याच्या नादात ते निष्प्रभ ठरला आहे. सर्व समाजाला बदलणं, रम्यतेला आव्हान देणं आणि जगण्याचे नवीन मार्ग शोधणं हे स्त्रीवादाकडून अपेक्षित होतं आज त्याला नगण्य स्वरूप प्राप्त झालं आहे. मी स्त्रीवादी आहे असं सांगितल्यावर जर मी एक निरुपद्रवी आणि निर्बल आहे हेच प्रतीत होत असेल तर स्त्रीवादाच हे लेबल मला नाकारावं लागेल!”

स्त्रीवादाच्या विरोधातील विचारांचे संकलन संयोगीता ढमढेरे यांनी केले आहे.