मुखपृष्ठाविषयी




या अंकाचं सूत्र ‘खाद्यसंस्कृती आणि लिंगभाव’ असं आहे.
अंकातील विविध लेखांचा आशय लक्षात घेऊन मुखपृष्ठ तयार करणं हे एक कठीण काम होतं.
अंकातल्या विविध लेखांच्या आशयाला अनुरूप अशी व्यंगचित्रं शुभा खांडेकर यांनी काढली आहेत. त्यापैकी एका व्यंगचित्राचा उपयोग करून हे मुखपृष्ठ बनवले आहे.
आजकाल वेगवेगळ्या कारणांमुळे पुरूषांचा स्वयंपाकघरातला वावर वाढला असला तरी स्वयंपाक हा अजूनही बाईचीच जबाबदारी मानली जाते. जणूकाही स्वयंपाक करण्यासाठी गर्भाशय असणे गरजेचे असते ! ह्या साचेबंद विचाराला छेद देणारे अनेक लेख या अंकात आहेत.
म्हणून गर्भाशयालाच पोळपाटावर पोळी लाटणारे दोन हात शुभाने चित्रात जोडले आहेत आणि Extended roll of the womb (Role आणि Roll शब्दांवर कोटी साधत) समर्पक शीर्षक दिलं आहे. त्यातून अंकाचा आशय चांगल्या प्रकारे व्यक्त होतो आहे. फक्त मुखपृष्ठाच्या विशिष्ट आकाराच्या रचनेत हे चित्र बसवायचे असल्यामुळे आम्हाला त्यात अॅप्रनची भर घालावी लागली. पण म्हणून चित्राचा आशय फक्त शहरी आणि उच्चभ्रू स्त्रियांच्या बाबतीतच मर्यादित आहे - असं सूचित करण्याचा अजिबात हेतू नाही, हे नमूद करावंसं वाटतं!

मुखपृष्ठा विषयीच्या आपल्या प्रतिक्रिया समजून घेण्याची उत्सुकता आहेच. जरूर कॉमेंट्स लिहा.

ऋणनिर्देश

आमचे लेखक आणि वाचक यांच्या सूचना, त्यांचा सहभाग ‘पुन्हा स्त्री उवाच’ साठी मोलाचा आहे. सर्वांच्या साथीने तिसर्‍या अंकापर्यंतची वाटचाल केली आहे.
अंक तयार होण्याच्या प्रक्रियेतही सोनाली नवांगुळ, श्रीरंग भागवत, हर्षद जाधव अशा काही मित्रांनी आपआपल्या मित्रमैत्रिणींना अंकात लिहिण्यासाठी विनंती केली. शिवाय त्यांच्यासोबत पाठपुरावा करून त्यांचं साहित्यही उपलब्ध करून दिलं.
मुक्ता खरे ही आमची तरूण मैत्रीण पडद्याआडून अंकासाठी कष्ट घेत असते. या अंकाचं सूत्र तिने सुचवलं आहे. या अंकातल्या मुलाखती घेणं आणि इतर कामांचाही तिने भार उचलला आहे .
मौज प्रकाशनाने श्रीरंग भागवतांचा लेख पुन्हा प्रकाशित करायला परवानगी दिली आणि त्यासोबत लेखासाठी विनायक सुतार यांची रेखाटनं उपलब्ध करून दिली. विनायक सुतार यांनीही ही चित्रं घेण्यासाठी परवानगी दिली.
शुभा खांडेकरने मुखपृष्ठाव्यतिरिक्त अंकासाठी इतरही व्यंगचित्रं काढून दिली.

या सर्वांचे आभार मानणं हा एक सोपस्कार म्हणून पार पाडायचा नसला तरी या सर्व मित्रांच्या आणि आपल्या सर्वांच्या ऋणात रहाणं आम्हाला आवडेल. 

संपादकीय

“पुन्हा स्त्री उवाच” चा हा तिसरा अंक!

खरंतर 16 सप्टेंबरला हा अंक प्रकाशित करायचा असं आम्ही ठरवलं होतं. पण अनेक तांत्रिक अडचणी सोडवता सोडवता अंकाच्या प्रकाशनाला उशीर झाला आहे. सगळे अडथळे पार करून हा अंक वाचकांच्या समोर ठेवताना आम्हाला खूपच समाधान वाटतं आहे!

पहिल्या दोन अंकांच्या तुलनेत ताजा अंक काही बाबतीत वेगळा आहे. मार्चमध्ये प्रकाशित केलेल्या पहिल्या अंकात आम्ही सध्याच्या काळात स्त्रीयांसमोर असलेल्या वेगवेगळ्या आव्हानांचा वेध घेणारे ताज्या दमाच्या स्त्रीवादी लेखकांचे लेख प्रकाशित केले होते. दुसर्‍या अंकात देशविदेशातल्या घडामोडींविषयीचे स्त्रीवादी दृष्टिकोनातून विश्लेषण करणार्‍या लेखांसोबत ‘पर्यावरण आणि स्त्रीवाद’ ह्या विषयावरच्या काही लेखांचा समावेश केला होता. पण ह्या वेळी संपूर्ण अंक “खाद्यसंस्कृती आणि स्त्रीवाद” अशा एकाच सूत्रावर आधारलेला आहे.

महाराष्ट्रातली खाद्यसंस्कृती, जागतिक खाद्यसंस्कृती असे शब्दप्रयोग आपण अनेकदा ऐकतो . अनेक नियतकालिके वर्षातून एकदा तरी अन्नपदार्थांच्या सुंदर रंगीत छायाचित्रांनी नटलेले विशेषांक प्रकाशित करतात. त्याचसोबत अनेक लोक फूडब्लॉग्ज लिहतात किंवा यूट्यूब चॅनेल्स चालवतात – तरीही या सर्वांमधून खाद्यसंस्कृतीत असलेल्या लिंगभावा बद्दलचा विचार मात्र मांडला जाताना फारसा दिसत नाही! म्हणूनच स्त्रीवादी दृष्टिकोनातून खाद्यसंस्कृतीचा विचार मांडायची गरज आम्हाला वाटली. अंकाचे नियोजन करताना या विषयाचे अधिकाधिक पैलू आमच्यासमोर येत गेले आणि त्या दृष्टीने विविध बाजूंनी विषयाचा वेध घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.

अंकाची जुळवाजुळव सुरू केली तेव्हा आमच्या मनात संभ्रम होता की पूर्ण अंक तयार करण्याइतके ह्या एकाच संकल्पनेवर आधारलेले साहित्य मिळू शकेल का? पण जसजशी ही कल्पना वेगवेगळ्या लेखकांच्या समोर मांडायला सुरुवात केली तसतसा सगळ्यांकडून खूपच सकारात्मक प्रतिसाद येत गेला. काहीनी तर आपापल्या मित्रमैत्रिणींना देखील अंकात लिहायची विनंती केली. अंकातील सगळे लेखच नव्हे तर कविता आणि व्यंगचित्रे देखील याच संकल्पनेशी जोडलेले आहेत. शुभा खांडेकर यांनी अंकाच्या विषयाला अनुरूप नवीन व्यंगचित्र देखील काढली आणि काही पूर्वप्रकाशित व्यंगचित्रांचा उपयोग करण्याची देखील परवानगी दिली.

खाद्यसंस्कृतीमध्ये असलेल्या अनेक लिंगभावात्मक पूर्वग्रहांची(Gender Bias) एक झलक मोहसिना मुकादम यांच्या मुलाखतीतून वाचायला मिळेल. या भेदभावाची ऐतिहासिक कारणे समजून घेतानाच ही विषमता दूर करण्यासाठी कोणते उपाययोजना करायला हवी त्याचाही अंदाज येईल.

स्त्रीयांनी शेतीचा शोध लावलेला असला तरी अजूनही स्त्रीयांना 'शेतकरी' म्हणून दर्जा मिळत नाही. शेतकरी स्त्रीयांचे डावलले जाणारे हक्क आणि त्यांचा संघर्ष ह्याबद्दल आपल्याला सीमा कुलकर्णी यांच्या लेखातून माहिती मिळेल.

आदिवासी खाद्यसंस्कृतीवर नागरी जीवनाचा प्रभाव पडल्यामुळे स्त्रियांवर होणार्‍या परिणामा विषयी अनीता पगारे यांच्या लेखातून लक्षात येईल.श्रीरंग भागवत यांच्या ललित लेखात आफ्रिकन खाद्यसंस्कृती आणि आफ्रिकन स्त्रीजीवनाचे अनोखे दर्शन घडेल.

भारतीय संस्कृतीत स्त्रीला -अन्नपूर्णा - म्हटले जाते ; पण तरीही आपल्या देशातील ५० टक्क्यांहून अधिक महिला रक्तपांढरीने ग्रासलेल्या असतात. मुग्धा कर्णिक आणि नंदिनी आत्मसिद्ध यांच्या लेखातून भारतीय स्त्रीयांचा अन्नाबरोबर असलेल्या नातेसंबंधाचा उलगडा होईल.

पाककौशल्याचा उपयोग करून स्वत:च्या कुटुंबासाठी अर्थार्जन करणार्‍या गिरणगावातल्या महिलांची ओळख सुचित्रा सुर्वे आणि ऋतुजा सावंत यांच्या लेखातून होईल. संयोगीता ढमढेरेच्या लेखातून वैयक्तिक स्वयंपाकघराचा उंबरठा ओलांडून इंटरनेटच्या विश्वात स्वत:ची ओळख निर्माण करणार्‍या स्त्रियांचा प्रवास पाहता येईल.

अपंगत्वावर मात करून स्वयंपाकाचा आनंद मिळवण्याचे अनुजा संखे आणि सोनाली नवांगुळ यांचे अनुभव सर्वांनाच प्रेरणादायक ठरतील.

'रसोईतल्या सोयी' ह्या लेखात आर्किटेक्ट श्रीकांत चव्हाण यांनी स्वयंपाकघराच्या रचनेत होत गेलेल्या बदलांचा आढावा घेतलेला आहे.

प्रसारमाध्यमांतून अनेकदा स्त्रीच्या पारंपरिक भूमिकांचे गौरवीकरण केलेले असते. टिव्हीवरचे अनेक कार्यक्रम पाहताना किंवा खासकरून जाहिराती पहाताना ही त्रुटी नेहमीच जाणवते. पण दिग्दर्शक वरुण नार्वेकरने मात्र ह्या परंपरेला छेद देऊन खाद्यपदार्थांच्या जाहिरातींमधून समतेचा विचार मांडलेला दिसतो. म्हणून त्याची मुलाखत आम्ही समाविष्ट केलेली आहे.

स्वयंपाक करणे ही स्त्रीत्वाची ओळख बनू नये असे स्त्रीवाद मानतो. जगभरातल्या सगळ्याच समाजांमध्ये स्वयंपाकाची जबाबदारी स्त्रीयांवरच ढकललेली असली तरी अनेक स्त्रियांना ही सक्ती नकोशी वाटते. त्याचप्रमाणे पुरुषांनी घरात स्वयंपाकाचे काम करण्याला समाजाची मान्यता नसली तरीदेखील अनेक पुरूषांनाही पाककलेत रस असू शकतो - हे अंकातल्या अनेक लेखातून आणि मुलाखतींमधून दिसून येईल. स्वयंपाका विषयीच्या आवडीची आणि नावडीची कारणे व्यक्तीगणिक किती वेगवेगळी असतात - हे समजून घेताना आपल्या मनात नक्कीच स्वत:विषयी प्रश्न उभे राहतील.

सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि त्याचसोबत निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. तेव्हा एका बाजूला मजेदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असताना दुसरीकडे खाद्यसंस्कृतीच्या माध्यमातून वर्षानुवर्षे खेळल्या जाणार्‍या राजकारणाची सुद्धा आठवण ठेवूया! समाजातली विषमता नाहीशी करण्यासाठी समतेच्या दिशेने पावले टाकण्यासाठी ह्या अंकातला वैचारिक खुराक सर्वांना शक्ती देईल - अशी आम्हाला आशा वाटते.

 

“मेल्या पीठ नीट मळ घसरा देऊन”

मी वयाच्या सोळासतराव्या वर्षापर्यंत जुन्नर तालुक्यातल्या तेजेवाडी या अगदी छोट्या खेड्यात वाढलो. अजूनही तिथे एस.टी जात नाही. घरची शेती होती. पण त्यावर कुटुंबाचा गाडा चालवता येत नसे. त्यामुळे वडील मुंबईत नोकरी करीत आणि आई शेती सांभाळीत असे. कुटुंबात मुलगी नव्हती आणि आई शेतकरी. त्यामुळे असेल पण श्रमविभाजनाचे पारंपरिक संस्कार नव्हते. बायकांची अशी जी कामं असतात ती आम्ही करायला हवीत असं आईला वाटे. त्यामुळे विहिरीवरून पाणी शेंदून आणणं, जळणासाठी काट्या तोडणं, सारवणं, झाडून काढणं, कोंबड्या डालणं त्यांची खुराडी साफ करणं अशी सगळी कामं करावी लागत. आई आजारी असतांना स्वयंपाक करावा लागे. तेव्हा आई आम्हाला, “अरे मेल्या असं नाही अस्सं चांगलं घसरा देऊन मळ.” अशा प्रकारे शिकवी.


मग सतराअठराव्या वर्षी शिक्षणासाठी मुंबईत वडीलांसोबत रहायला आलो. सुरूवातीला खानावळीत जेवत असू.
तोवर समुद्रातले मासे खाल्ले नव्हते. ते इथे मालवणी खानावळीत खाऊन आवडायला लागले. पण खानावळीत रोज जेवणं परव़डणारं नव्हतं आणि ते बरंही वाटेना, म्हणून वडील आणि मी घरीच स्वयंपाक करायला लागलो. वडील थोडंफार शिकवीत (ते भरलेलं पापलेट फार छान करीत), अधून मधून रहायला येणारी आईही शिकवीत असे. पण तरीही चुकतमाकत करता करता अधिक शिकलो. वडील सोबत असल्याने श्रमाच्या वाटणीत कटकटीची कामं जसं की भाकरी करणं, भांडी घासणं, पसारा आवरणं हे मला करावं लागे.

लग्नानंतरही कामं करीत होतो. ओवी आणि क्षितिज या दोन्ही मुलांनाही या सगळ्या गोष्टींचे धडे दिले.

आता निवृत्तीनंतर आम्ही कामं वाटून घेऊन करतो (पूर्वीही करीत होतो, पण तेव्हा इतर व्यवधानांमुळे रोज जमेलच असं होत नसे). आता मी चहा करतो, शुभा नाश्ता करते. मी भाकरी किंवा पोळी करतो, शुभा भाजी, आमटी करते. भांडी घासायला बाई येते. पण त्या आमच्या बेगमताई सुट्टीवर असल्या तर भांडी घासतो कारण शुभाला गुडघ्याच्या त्रासामुळे फार उभं रहाता येत नाही. कपडे मशिनमध्ये धुणं, बाहेर काढून वाळत टाकणं ही कामं करतो. आणि हे सगळं रोज करतो.
असं असलं तरी स्वतःसाठी काय किंवा इतरांसाठी काय स्वयंपाक करणं, पसारा आवरणं हे मनापासून आवडत नाही. त्यात माझ्या दृष्टीने सर्जनशील असं काही नाही. अर्थात प्रत्येकाला असं वाटेल असं नाही. उदाहरणार्थ आमच्या दोन्ही मुलांना स्वयंपाक करायला आवडतो. क्षितिजला ते करणं सर्जनशील वाटतं. तसंच ताण कमी करण्यासाठी त्याला स्वैंपाक करायला आवडतो. तो लहानपणीही आवडीने नवे नवे प्रकार करीत असे. जसं की तो आठेक वर्षांचा असतांना पावाच्या चुऱ्यात उकडलेल्या बटाट्याचा कीस, पनीरचा कीस, मीठ, मीरपूड घालून त्याला वेगवेगळे आकार देऊन बाजूने तेल सोडून ते भाजून एक प्रकारचे पॅटीस करीत असे. एकदा त्याला द्राक्षाच्या पानातली कोलंबी करायची होती. तर द्राक्षाची पानं न मिळाल्याने त्याने विड्याची पानं वापरली. असं तो फार आवडीने करतो आणि आता तर एकटा रहात असल्याने त्याला जवळपास रोजच स्वयंपाक करावा लागतो. पण माझं तसं नाही. जात्याच मी फार अव्यवस्थित माणूस आहे. पण अशा अव्यवस्थेत राहता येत नाही. त्यामुळे काम करावं लागतं. त्यामुळे आवड म्हणून नाही तर गरज म्हणून शिकलो आणि गरज म्हणून करतो. सवयीने जमतं. सगळा स्वयंपाक येत नसला तरी पाककृती मिळाली किंवा कुणी सूचना दिल्या तर करू शकतो. शुभाला अपघात झाला होता तेव्हा दोन महिने मी घरातली सगळी कामं करून स्वयंपाक केला होता. पण अन्न बाहेरून आणलं तर मला अधिक आवडेल. कारण शुभाचा आणि माझा बराच वेळ त्यात जातो. पण आपल्याकडे अजून असं रोज बाहेरून अन्न आणणं आरोग्य दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या परवडणारं नाही. स्वच्छता, तेलाचा वापर या गोष्टींमुळे भीतीही वाटते.

शुभा कोकणातली आणि मी देशावरचा. त्यामुळे खाद्यसंस्कृती पूर्णपणे वेगळी. ओलं खोबरं आमच्या स्वयंपाकात अजिबात नसतं. पण तरी आमच्या घरात दोन्ही प्रकारचा स्वयंपाक होतो आणि दोघांनाही आवडतो. मला चपात्या येत असल्या तरी फार चांगल्या जमत नाहीत. त्यात मी आधी पीठ मळतो, मग गोळे करून घेतो. मग त्यात तेल, पीठ घालून ते भरून घेतो. सगळ्या चपात्या आधी लाटून घेतो, मग सगळ्या एकामागोमाग एक करीत भाजून घेतो. मध्यंतरी दोन पाहुणे आले तेव्हा या पद्धतीने केलेल्या चपात्या त्यांनी खाईपर्यंत कडक झाल्या. एकदा मी केलेल्या चपात्या डब्यात होत्या. विद्यापीठाच्या कँटीनमध्ये आमचा मित्र उदय रोटे आणि त्याची पत्नी ज्योती (जी माझी विद्यार्थिनीही आहे) जेवायला बसलो. मी केलेली चपाती ज्योतीला खाऊन बघायला सांगितल्यावर तिची प्रतिक्रिया अशी “तुम्ही ना पीठात पाणी कमी घालता त्यामुळे पोळी खुसखुशीत होत नाही. थोडं पाणी जास्त घालत जा.” (हे शुभाही सांगत असते). आमचे हे विद्यार्थीही स्वयंपाक करतात. शैलेश औटी तर उडदाच्या आमटीसारखे खास माझ्या माहेरचे पदार्थ करून डब्यात घालून आणून देतो दोघांनाही.

भाकरी करणं हाही एक संवेदनशील प्रकार आहे. पाणी कमी झालं तर ती चिरफाळते. जास्त झालं तर मोडते. तवा जास्त गरम होणं, कमी तापणं यावरही भाकरी चांगली होणं अवलंबून असते. बारीकसारीक तपशील ध्यानात ठेवावे लागतात. त्याचा कंटाळा येई. पण आता सवयीने माझी भाकर चांगली होते. माझे विद्यार्थी, आमचे येशू पाटील, नातवंडं खास माझ्या हातची भाकर खायला येतात. आमच्या ओवीलाही मी भाकरी करायला शिकवलंय. मध्यंतरी आमचा नातू सात्त्विक कुलकर्णी रहायला आला होता सुट्टीत. शुभाने दोन दिवस त्याला पुऱ्या, वडे, चपात्या खायला घातल्यावर त्याला म्हटलं, “गड्या आता भाकर खातोस काय माझ्या हातची?” तो हो म्हणाला. भाकरी केली आणि मी काम करीत बसलो. त्याला भाकरी इतकी आवडली की मोठ्ठी भाकरी खाऊन तो म्हणाला की अजून हवी. मग शुभाने भाकर केली. ती त्याने अर्धीही खाल्ली नाही. म्हणाला यापेक्षा आजोबाची भाकरी छान होती. जय हो!




हरिश्चंद्र थोरात
सुप्रसिद्ध समिक्षक आणि संपादक. 
मुंबई विद्यापीठात अनेक वर्षे मराठीचे अध्यापन केल्यावर निवृत्त झाले आहेत. विविध प्रकल्पांना मार्गदर्शन आणि लेखन तसेच संपादनाचे काम सातत्याने सुरू असते. 




अनामिका



राहते का उभी कुणाच्या मनात माझी प्रतिमा

शेतकरी म्हटल्यावर?

होतो का माझा विचार शेतमजूर म्हटल्यावर ?

मी ही राबते शेतावर खांद्याला खांदा लावून

पाठीला मुल बांधून

मी ही राबते मजूर म्हणून दुसर्याच्या जमिनीवर

पुरुषापेक्षा कमी मजुरी घेऊन

शेती, मजुरी ह्या सार्या कल्पना

माझ्या प्रतिमेतून उभ्या रहातच नाहीत कुणाच्या मनात

माझी प्रतिमा बसून राहिली आहे परंपरांमध्ये

मी स्वत:ला पाहते पोळीत आणि भाकरीत

आरशात पाहिल्यासारखी

माझी पृथ्वी तव्या एवढी

माझे कष्ट पृथ्वी एवढे !

डार्लिंग स्वयंपाकघर




मला स्वयंपाकघराविषयी इतकी ओढ वाटू शकेल ठाऊकच नव्हतं. कारणच नव्हतं काही. आयुष्याचं सर्वसामान्यपणे काही ठरतं, काही टप्पे असतात तसे ते माझे असायचे काही कारण नव्हतं. मी स्वत:विषयी फार गंभीरही नव्हते नि उदासीनही. तर तसं काहीच ठरलं नव्हतं की पुढं आपलं काय करायचंय, आपण काय करायचंय? होईल तसं होईल. म्हणजे जात होते दिवस. दु:खानं नव्हे नि आनंदानंही नव्हे, फक्त जात होते. 1990 ते 2000 हा काळ तो. त्यात रेडिओ, टीव्ही, सणवार, पाहुणे यांनी रूटिन किंचित बदलायचं. ते बरंच वाटायचं, पण ते नसताना सुद्धा काही फार डाचायचं नाही.
आई खूप साधा सात्त्विक स्वयंपाक करायची. चवदार असायचा तो. सणावारी नेमानं विशिष्ट रांधलं जायचं. ठरून गेल्या होत्या अनेक गोष्टी, उदा. नवरात्रात नऊ दिवस सवाष्ण-ब्राह्मण जेवायला यायचे. आणखीही कधीमधी असायचे. पक्ष पंधरवड्यात महाळ/महालयाचा खास स्वयंपाक. भोगी, ऋषीपंचमी, गौरीचा भाजी-भाकरी-खिचडीचा नैवेद्य. आई नोकरी सांभाळून नि माझ्यासारख्या अपंगत्वामुळे घरातच अडकलेल्या मुलीचा ताण सांभाळून हे सगळं कसं करायची कुणास ठाऊक. पण या सगळ्यांतून माझे दिवस बदलत राहायचे. घरातून क्वचितच बाहेर पडणार्‍याला माझ्यासारखीला दिवस वेगळेवेगळे वाटावेत याची सोय या खाण्यापिण्यातील बदलातून होत राहायची. शिवाय शनिवार/रविवारचं विशेष काहीतरी, एरवीही संध्याकाळी आई घरी परतली की भूक लागल्यावर चटपट होणारं काहीतरी. भडंग, लाह्या, शंकरपाळ्या नि किती काय काय. घरी मी एकटी असताना भुकेनं कासावीस होऊ नये याची किती तजवीज करून ठेवली जायची! हे बाबा, धाकटी बहीण, येणारेजाणारे असं सगळ्यांसाठीच असलं तरी मी चवीनं खाते, कौतुक करते मनापासून म्हणून मीच मध्यवर्ती असायचे या खाद्यजत्रेत. माझ्यात असणारे जगण्यातले सगळे रस, रंग नि चवी बरकरार राहिल्या त्याचं श्रेय या खाण्यापिण्याला, आईलाच! शिवाय आईच्या मैत्रिणी नि आमच्याच विस्तारित कुटुंबातली चार घरं, ज्यांच्यात काहीही, अगदी थालीपीठही नव्या भाजणीचं केलं की ते आठवणीनं मला यायचंच. एक मात्र आता वाटतं, मनाची अवस्था अन्नाच्या या चक्रामुळं कितीही संतुलित राहिली तरी आईचे जितके श्रम नि जितका आयुष्यातला वेळ यात गेला, तिला साधं शांत बसून राहाण्याची चैन कधी अनुभवताच आली नाही, आजही येत नाही.
हां, पण आमच्याच घरात माडीवर भाडेकरू म्हणून राहाणारा बंडूदादा खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर होता. त्याच्या फोडण्या जोरदार असायच्या. भाज्या सणकून परतायचा तो. गावच्या शाळेत तो शिपाई होता. पण जेव्हा जेव्हा शाळेत सामुदायिक जेवण असायचं, पावट्याच्या मौसमात डाळ-वांगंपावटे कार्यक्रम व्हायचा तेव्हा त्याच्यातल्या उत्साहाला जागा पुरायची नाही. शाळेत कुणाची फिस्ट असली की त्यालाच सांगायचे सगळे. भजी, वडे, जिलेबी, बुंदीचे लाडू सगळं जमायचं त्याला. मुळात आवडायचं त्याला. बटाट्याची, फ्लॉवरची भाजी करण्याची त्याची पद्धत वेगळीच चव द्यायची या भाज्यांना. आईच्या हातचं मला आवडायचंच, पण बंडूदादाचा स्वयंपाक म्हणजे ‘माहौल’ होता. सणसणीत, चमचमीत नि मेंदूच्या तारा झंकारणारा चरचरीत. सात्विकतेला त्यात तिळाएवढीही जागा नसायची. अध्येमध्ये हा बदल, त्या पेक्षा बंडूदादाचं उत्साहानं स्वयंपाकाच्या तयारीला लागणं मला आकर्षित करायचं. मी मन लावून त्याची तयारी बघायचे. तो जमिनीवर स्टोव्ह ठेवून हे सगळं करायचा, त्यामुळं मला दिसायचंही. घरात उंच कट्ट्यावर केलेला कोणताही पदार्थ मला दिसायचा नाही. त्यामुळं त्याच्या रंगात नि वाफेत झालेले बदल मला कळायचे नाहीत. आपण काहीही रांधताना ते दिसण्यानं स्वयंपाकाच्या दर्जात, आपल्या उत्साहात खूप फरक पडतो हे मात्र माझ्या लक्षात येत गेलं. ते लक्षात यामुळंही आलं की आईबाबा व बहीण शाळेत गेल्यावर मी घरीच असायचे. कारण शाळेत परीक्षेपुरतीच उपस्थिती असणार हे प्रयोगांती कळून आलं होतं. त्यावेळी सोप्याला लागून असणार्‍या पायर्‍या हाताच्या जोरानं उतरत उतरत मी खाली राहाणार्‍या नायकवडींच्या घरी जायचे. त्यांच्याकडे चूल होती. त्यावेळी गरम भाकरी किंवा भरपूर तेल लावलेल्या चपात्यांचा खमंग हवाहवासा गंध वेड लावायचा. अक्का म्हणायची, सोन्या, चहा टाकणारे, चहा-चपाती खाणार? मी नाही म्हणायचा प्रश्‍नच नसायचा इतका तो गंध टेम्पटिंग असायचा. शनिवारी घरचे सगळे लवकर शाळेत जायचे. ते गेले की मी लगेच अक्काकडे जायचे. त्यावेळी तिच्या स्वयंपाकाला नुकती सुरुवात झालेली असायची. लोखंटी अर्धखोलगट तव्यात बेफिकीरीनं परतलेल्या तिच्या भाज्यांना आधी वास घेऊन खावं व नंतर नीट मांड ठोकून रसनेत घोळवावं असंच व्हायचं. काहीच मसालेबिसाले न घालता जलद गतीनं केलेल्या त्या स्वयंपाकाची प्रत्येक पायरी माझ्या आठवणीत रूतून राहिली आहे. कारण ती दिसायची सुद्धा.
हे झालं खूप नंतरचं, पण त्या आधी हॉस्पिटलचा एपिसोड येतो. ते ठिकाण लक्षात राहिलंय माझ्या मूळ चवीत क्रांतिकारक बदल करण्याबाबतीत. पूर्वी गावी असताना म्हणजे अपघातपूर्वकाळात अंडं खाणं ‘सवालही पैदा नहीं होता!’ या कॅटेगरीत. हॉस्पिटलमध्ये ते औषधोपचाराचा भाग म्हणून कंपलसरी झालं. सुरुवातीला भरपूर रडारड करून झाली नि नंतर ते आवडीचं खाणं बनलं. गावात/घरात खायच्या सवयी नि पदार्थ आणि आता मुंबईच्या हाजीअलीसारख्या ठिकाणी असणार्‍या भारतातल्या महत्त्वाच्या हॉस्पिटलच्या स्वयंपाकघरातले पदार्थ यांत चवीचाच फरक नव्हता फक्त, खूपच वैविध्य होतं, जिन्नसांमध्ये नि पाककृतींमध्येही. आजही मला अनेक पदार्थ त्या चवीचे करावे वाटतात, पण उतरत नाहीत मेंदूतून थेट तसे. तिथं पहिल्यांदा सूप्स प्यायला शिकले, दोसे, विविध तर्‍हेची रायती, भाताचे विविध प्रकार, घट्ट अशी विशिष्ट चवीची चटकदार ‘दाल’, पकोडे नि त्याचं विशिष्ट डिप. कितीतरी असेही पदार्थ ज्यांची नावं लक्षात नाहीत, केवळ चवी जिभेवर येतात डोळे मिटल्यावर. ८९-९० या काळात जेमतेम नऊदहा वर्षांची असताना हॉस्पिटलमधलं एकटीचं राहाणं सुसह्य केलं ते तिथल्या फार छान माणसांनी व तिथल्या समृद्ध खाद्यजीवनाने. तरी जेव्हा खूपच घरवेडी व्हायचे तेव्हा आजीआजोबांच्याच जागी असणारे भिडे आजोबाआजी पळीवाढ्या मेतकूटतूपभात, ताकातली उकड अशा गोष्टी कडीच्या डब्यातून घेऊन नि ‘चांदोबा’चे अंक काखोटीला मारून येणं करायचे नि ओळखीच्या चवीचा अस्वस्थता कमी करणारा घास खाऊन मी शांतवायचे.
न कळत्या वयात घरून वर्षादीडवर्षासाठी थेट मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये नि तिथून परत घरी म्हणजे अशा खेडेगावात जिथं त्यावेळी एखाददुसराच लॅन्डलाईन फोन होता. तिथंवरचा हा सगळा काळ. बराच बदललेला. उपरा वाटवणारा. शरीराची स्थिती बदलून जाते तेव्हा आसपासचं सगळं ओळखीचं भूतकाळात जमा होतं. ओळखीचं वाटतंय, पण अनोळखीच उरतंय अशा भवतालात बदलली नव्हती ती घरच्या खाण्याची चव! हे आता विचार करताना कळतंय. त्यावेळी मी बसून इकडेतिकडे सरकायचे. चालताना वेगळ्या उंचीवरुन वेगळं दिसतं, आता बसत्या उंचीवरून त्याच अवकाशात नीट पाहू शकायचे. त्यामुळं मला जमिनीवरचा केर लगेच दिसायचा, पण मधल्या उंचीवरचे डबे, कपडे, स्वयंपाकाचा ओटा दिसायचा नाही. गंमत म्हणजे थेट त्या वरच्या छताच्या तुळ्या, पाटण्या, जळमटं, पाली नीट दिसू शकायच्या. बारकाव्यासकट. बदलेल्या स्थितीमुळं कधी विरक्त कधी आसक्त असा ऊनपावसाचा खेळ चालायचा. ते सगळं आज इतक्या लांब उभं राहिल्यावर दिसतं नि कळतं आहे.
खाण्यापिण्याचे लाड वगैरे करुन घेण्याच्या, अपघातपश्‍चात काळात मी साधी कोथिंबीर निवडण्याचेही कष्ट घेतले नव्हते. घरातलं ते शेंगदाण्यांचं कूट करण्याचं यंत्र मात्र मस्त होतं, त्याचं हँडल फिरवत कूट करायला मला फार आवडायचं, आणि हो, अध्ये मध्ये त्या पुरणयंत्राशी खटपट, पण फार खोलात नाही. जेव्हा एक पोर्टेबल गॅसची शेगडी ओट्यावर न ठेवता खाली बसून स्वयंपाक करू शकायला लावून घेतली गेली तेव्हा मात्र कधीतरी आमटी केलेली आठवतेय. पण कधीतरीच केलेली, फार आठवणी नाहीत.
2000 साली काहीतरी शोधायलाच पाहिजे म्हणून कोल्हापुरातील एका अपंग पुनर्वसनाशी संबंधित संस्थेत मी राहायला आले. त्यांच्या हॉस्टेलमध्ये राहायचं नि तिथून साताठ किलोमीटरवर असणार्‍या ऑफिसमध्ये काम करायचं असं ठरलं. ही संस्था कोल्हापुरात, हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड नावाची. बाकी तिथला पहिला दिवस नवं जग समजून घेण्यात, व्हीलचेअर आत्मसात करून तिच्यावरून वावरत काम करण्यात बर्‍यापैकी गेला, पण रात्री जेवायला नकोच वाटलं. घरची आठवण येत होती. सकाळी साडेसातला ब्रेकफास्टची बेल होते नि नऊ-सव्वा नऊला ऑफिसला नेण्यासाठी रिक्षा येते त्याआत डबा घेऊन तयार राहावं लागेल असं कळलं होतं. ब्रेकफास्ट काये असं विचारल्यावर कुणीतरी सांगितलं, पावभाजी. म्हटलं वॉव! गरमगरम मसालेदार वाफाळत्या भाजीसह पाव खायला मजा येईल. गेले तर होती पावाची भाजी. घरी पाव उरले, शिळे झाले तर ती केली जायची, कांद्यात खमंग परतलेली. अपेक्षाभंगाचं वाईट वाटलंच, पण गार, कोरडी, मोठे तुकडे झाल्यामुळे तिखटमीठ न लागलेली ती पावाची भाजी एक चमचा तोंडात घेतल्याक्षणी नको वाटली नि रडूच कोसळलं. घरचा गरम घास आठवला. क्षणात सगळ्याची किंमतच कळून गेली. असहाय्यता वाटली.
तिथलं स्वयंपाकघर त्यावेळी मोजक्या शारीरिकदृष्ट्या सुदृढ व्यक्ती नि काही अपंग व्यक्तींनी सांभाळलेलं. व्यक्ती म्हणजे स्त्रीच. काहीवेळेस स्टोअर किपर पुरुष असायचे, बाकी स्वयंपाकाच्या व्यवहारात स्त्रियांचीच गर्दी. कुणाला कुठलं काम यावरून तिथली सत्ता लक्षात यायची. दोन वेळची जेवणं नि ब्रेकफास्टसाठी लागणारे कांदे सतत कोण चिरतं, भाज्या कोण चिरतं, फोडण्या कोण घालतं, चपात्याभाकर्‍या कोण बडवत बसतं, वाढायला कुणाला मिळतं, त्यातही मांसाहारी जेवण असलं की कोण वाढतं नि कोण रांधतं, बाहेरची कँटिनसाठीची ऑर्डर आली की शेंगदाणा चटणी अथवा चकली, लाडू यासाठीची मूलभूत तयारी कोण करतं व शेवटचा हात कोण फिरवतं या सगळ्याचं निरीक्षण करून त्यातली गुपितं कळणं हा एकतर्‍हेनं ज्ञानमार्गाकडे वाटचाल करायला मदत करणारा प्रदेश होता. स्वयंपाकघरातला पॉवर गेम बर्‍याच कळा फिरवतो हे लक्षात येत गेलं तसतसे बरेच उलगडे होत गेले.
हॉस्टेलच्या स्वयंपाकघरातल्या प्रत्येक पदार्थाची चव गंडलेली नव्हती, काही पदार्थ फारच चवदार असायचे, उदाहरणार्थ कांदाभजी, फ्रुट कस्टर्ड, कुर्मा, पुलाव, इडली-सांबार वगैरे. पण तुम्ही कितव्या पंक्तीत कुणाबरोबर बसता यानं पडणारा फरक ओळखू यायचा. आपण हळूहळू विशेष होत गेलो की आपल्या टेबलवरच्या पंगतीबद्दल इतर टेबलं तसाच विचार करत असतील का जसा आपण अविशेष असताना करायचो असं वाटायचं. पण दिवसभराच्या अशक्य दमणुकीत मेंदूची आणखी दमण्याची तयारी नसायची. मेंदू तरतरीत असताना याकडे संबंधितांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न व्हायचा. तितकंच एक ते. तरीही विशिष्ट लांबलांब चिरलेल्या कांद्यात विशिष्ट वाटण घातलेल्या भाज्या कितीही बदलल्या तरी एकसारख्याच लागायच्या. त्यावेळी ऑफिसात संस्थेचे ट्रस्टी असणार्‍या पी.डी.देशपांडेंच्या घरचा त्यांच्यासाठीचा डबा नंतरच्या काळात माझ्यासाठी मरुद्यान झाला. रजनीताईंचं रांधणं थेट माझ्या आठवणीतल्या व सुखकर अन्नाशी नातं सांगणारं. परतलेली भेंडी, कुडकुडित कारलं, मेथीची परतलेली भाजी, मटारची उसळ नि सगळ्यात महत्त्वाचं मऊसूत पोळ्या. कस्सलं भारी वाटायचं. त्या चवीनी मला परत मऊकोमल करायला सुरुवात केली. अन्न आपल्या थेट आनंदाशी व मेंदूला रिलॅक्स करण्यासाठी कसा उपचार करते त्याची ही झलकच.
संस्थेतल्या अध्यायाचं उद्यापन करायची वेळ कदाचित मी वाचायला घेतला तेव्हा ठरून गेली असेल, पण आपण इथे जन्मभर नाही राहू शकणार हे कळलं होतं. म्हटलं ना मघाशी, स्वयंपाकघरातल्या पॉवर गेम बद्दल. तसे कितीकिती असतात. तर ते असो. मी स्वतंत्र व्हायचं ठरवलं. घर मांडायचं ठरवलं. त्यासाठी लहानमोठी विश्‍वासू मित्रमंडळी नि मुख्य म्हणजे घरचा पाठिंबा होता. घर लागलं कसं याचा तपशील फारफार आहे. तर थेट विषयाशी येते. माझ्यासारखी पॅराप्लेजिक असणारी मुलंमुली स्वत:च्या घरात राहाणारी आहेत, पण ती कुटुंबासह. एखादीच भावना विस्पुते सारखी संपूर्ण जबाबदारीनं घर सांभाळणारी. माझं मॉडेल निराळं असणार होतं. माझ्यासोबत आईबाबांनी राहावं हा आग्रह मी करणार नव्हते. मला, त्यांचं आयुष्य व जगण्याची रीत त्यांनी माझ्यासाठी बदलायला नकोच होती. त्यावेळी सोबत एक आजी आल्या. त्यांनाही गरज होती. त्या उत्तम स्वयंपाक करायच्या पण तेल नि पाणी यातला फरक त्यांना ध्यानात यायचा नाही. शिवाय तक्रारखोर. त्या मला किंवा माझ्यासारख्या त्यांच्या मते ‘गरजू’ अवलंबित्व असणार्‍याला स्वयंपाक करून देतात, सोबत राहातात याचा एक औदार्यभाव त्यांच्या चेहर्‍यावरून गळून फरशा घाण करायचा. खरं तर तो व्यवहारच होता, सोयीचा. पण माणसं दुसर्‍याच्या डोक्यावर उपकाराचं ओझं ठेवायची एक संधी सोडत नाहीत. विनाकारणच मला ती संधी त्यांना द्यायची नव्हती, तेव्हा त्या तिचं सोनं करण्याआधी मी त्याचं भंगार केलं. मैत्रिणीनं एक नवीन ताई पाठवल्या. त्यांची समजेची वाढ खुरटलेली. स्वयंपाकात अकुशलतेची परिसीमा. चपाती हातात धरली की पापडाचा फील यायचा. भाकरी म्हणजे भिजवून खाल्लेली रद्दी. भाज्या एकतर न शिजलेल्या किंवा करपलेल्या. भांडी स्वच्छ घासली तर पाप होईल म्हणून त्या त्यात शितं ठेवायच्या. साबण राहू द्यायच्या. या काळात मला कळलं की शोषण करण्याच्या स्टिरिओटाईप चालीला आपण बळी जायचं नाही. आपल्याला चार भिंतींच्या आत जे जे काम व्हायला हवं आहे ते करायलाच हवं - आणि मी माझे पहिले कांदेपोहे केले. आईची त्यावेळी नोकरी चालू होती. त्यामुळं मला शिकवायला ती येऊ शकत नव्हती. चव आठवत पदार्थ आकाराला आणणं हे त्यावेळी पहिल्यांदा केलं. नंतर कधीतरी पहिल्या इंडियन मास्टरशेफमध्ये मी ती परीक्षा पाहिली की पदार्थ खा नि त्यात काय काय असेल याचा अंदाज करा. मी स्पर्धा सुरू करण्याआधी जिंकायला सुरुवात केलेली होती.

तर या बॅटलफिल्डवर येण्याची तयारी नीटच केलेली होती. २००७ ला मी शिवाजी पेठेतल्या तळमजल्यावर राहायला आले तेव्हाच घर जास्तीजास्त व्हीलचेअर फ्रेंडली करायचा प्रयत्न केला होता. म्हणजे लाईटची बटणं जमिनीपासून अडीच फुटांवर, टॉयलेट, बेसिन, कॉट, कामाचं टेबल यांचीही रचना व्हीलचेअरशी मैत्रीपूर्ण.
स्वयंपाकाचा ओटा व्हीलचेअरचं फूटरेस्ट आत जाईल असा म्हणजे ओट्यावर ठेवलेल्या गॅसशेगडीपाशी माझा वावर सहज होईल असा. सिंकमध्ये भांडी घासता येतील, पाणी सहज घेता येईल अशी रचना. कट्ट्याच्या बाजूला असणार्‍या भिंतभर रॅकमधून डबे सहज घेता येतील अशी सोय. कांदा हातात धरून तो चिरण्यापेक्षा तो स्थिर ठेवून त्यावर दाब देत तो चिरणं सोयीचं. त्यामुळं तो विचार करून सोय. एकूण मांडामांड नीट केली होती, पण ती वापरून पाहायचा मौका स्वत:ला नीट दिला नव्हता. त्यामुळं या नीट लागलेल्या नेपथ्यात मला आता अ‍ॅक्ट करायचा होता. कांदेपोहे ठरले. कढई ठेवली. बाजूला एका ताटात कांदा, मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे अशी तयारी ठेवली. कढईत तेल घातलं. तेल तापलं का बघायला हळू हळू करत बरीच मोहरी घातली. घाईच झाली होती मला. ती तडतडल्यावर कोण आनंद झाला. मग हिंग घातला. मग मिरच्या, शेंगदाणे, कांदा, मीठ, हळद.... पोहे बहुतेक जास्तच भिजले. लगदा झालेले. ते हाताने सुटे करत कसेबसे घातले. गडबडीनं कढईला हात लावला. मग तिथल्यातिथं नाचत चिमटा घेतला. तो कसा पकडावा याची व्हिज्युअल्स आठवत प्रयत्न केला तो बरा साधला नाही. शेवटी कापडानं कढई पक्की धरत पोहे परतले. त्यावर झाकण ठेवलं. भूक लागली, भूक लागली असा गोंधळ घालायचे तेव्हा आई म्हणायची, एकदोन सणसणीत वाफा येऊ देत, मग देते. तर आणल्या दोन सणसणीत वाफा नि घेतलं खायला. उदयकाका म्हणाले, मी खाल्लेल्या आजवरच्या पोह्यात हे सगळ्यांत चवदार पोहे. मी ते लगेच मान्य केलं. कौतुक स्वीकारण्यात कंजूशी केली नाही. पहिल्या प्रेमातली प्रियकराची पहिली आळवणी आठवावी तशी मी माझ्या कांद्यापोह्यांची कृती आठवून खुदखुदत राहिले स्वत:शी. आपण जग जिंकलंय असा फील होता. नंतर ती सगळी भांडी नीट एकत्र करून स्वत: सिंकमध्ये घासली तेव्हा तर कोण आनंद झाला. बारीक बारीक गोष्टीत आपलं दुमडून जाणं कोरलं जातं. ती कोर अशी भरली की स्वत:बद्दल बरं वाटतंय हे कळलं. मग उत्साहानं रोज काहीतरी करत राहायचे. पोळी, भाकरी वगळता बाकी गोष्टी जमत होत्या. मनातून कनविन्स असलं की काय वाट्टेल ते जमतं, काही अवघड उरत नाही हे कळलं. मनी संतोष जा ह ला!

तर दिवस जात होते. पदार्थ बिघडत, उलगडत होते. आत्मविश्‍वास टिकायला मदत होत होती. आत्मविश्‍वास टिकवणं जिकिरीची गोष्ट होती तेव्हा कारण माझं स्वत:चं एक्सप्रेशन मला सापडायचं होतं. त्याबाबतीतलं नैराश्य बुडवून टाकायला स्वयंपाकघराकडं वळणं ही सोपी व इंटरेस्टिंगही गोष्ट होती. पाणी प्यायचं तर, चहा करायचा तर, भांडी घासायची तर, स्वयंपाक करायचा तर आपण कुणावर अवलंबून नाही ही गोष्ट मला हलकी करत होती, स्फुरण चढवत होती. करण्यात सातत्य असल्यामुळं नेटकेपण वाढत होतं. वेळ पूर्वीपेक्षा कमी लागत होता. पण वरच्या दिशेची धाव दाखवणारा माझा नकाशा खीळ बसल्यासारखा कसातरी खाली यायचा अचानक. व्हायचं काय की कुणीही ओळखीपाळखीचे, नातेवाईक आले की माझ्या सहकारी स्त्रीकडे बघून म्हणायचे, “ही करते का तुझं सगळं?”, “बरंय, मन रमवायला करायचा एखादा जिन्नस. बाकी ‘ही’ करतच असेल!” - संस्थेतल्या सात वर्षाच्या काळात श्रेय हिरावलं जाण्याचं दु:ख ताजंच राहिलं होतं. त्यामुळं ज्याच्यात्याच्या कामाचं श्रेय पटकन देऊन टाकण्यात मला कसलीच अडचण नव्हती. पण जर सगळं नियोजन करून मी एखादी गोष्ट पूर्ण करत असेन तर मी ते नाकारत राहाण्यानं काय हशील? बरं, शारीरिकदृष्ट्या सुदृढ व्यक्तीनं दळणापासून, भाज्या चिरून देण्यापर्यंत नि केरफरशीपासून वॉशिंगमशीनमधले कपडे काढून दोर्‍यांवर वाळत टाकण्यापर्यंत घरातली वरची कामं करायला बाह्य मदत घेतलेली चालते, पचते तर मग माझ्यासारख्यांनी थोडीबहुत ती घेतली तर तिला प्रतिष्ठा का नसावी? एखाद्याला विशिष्ट चौकटीत बंदिस्त करायची ही इतकी हौस कशामुळे? मला स्वयंपाकघरात रूची आहे म्हणून ठीकाय, पण ती नसती तर मी बाह्य दुवे वापरून माझे प्रश्‍न सोडवलेच असते. प्रश्‍न सोडवण्याची हातोटी नि प्रश्‍नाच्या पात्रतेएवढाच राखलेला संयम ही लक्ष देण्याची गोष्ट आहे हे मला सगळ्यांच्याच वतीनं सांगावं लागणार आहे.
- म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो, ही म्हण मी चांगलीच जाणत होते. 

त्यामुळं मी माझ्यासारख्याला व्हीलचेअरवर बसूनही स्वयंपाकघर सांभाळता येऊ शकतं, उलट ते मला आवडतं, माझ्या मूळ कामाला अधिक एनर्जी देतं हे माझ्या कामाबाबतीत अविश्‍वास दाखवणार्‍यांना सांगत बसायचे. - मला ठाऊकाय, मी जे सांगायचे ते कुणालाच पटायचं नाही, उलट माझा ‘मी’ ड्राईव्ह फारच अ‍ॅक्टिव्ह असल्याचा उपहास त्यांच्या चेहर्‍यावर झळकायचा. मग मी दुपटीतिपटीनं कष्ट करायचे, दमून जायचे. मात्र एकवेळ अशी आली की मी हे थांबवलं. असं वाटलं, स्वयंपाकघरात खेळू शकणं हा आपला आनंद आहे. मला ‘अमुकही’ जमतं हे सिद्ध करण्याची आता जरूरच नाही. वर्षानुवर्षांच्या अपंगत्वाच्या बाबतीतल्या चाकोरीत मला दाबूनकोंबून बसावायचं ज्यांनी ठरवलं आहे ते माझ्याशी तस्संच वागणार. आपण मुकाबला केल्यामुळं भविष्यात धूसर असणारी संवादाची शक्यता आणखी अस्पष्ट होतेय. - एक धोरण म्हणून मला लोकांना हे सांगत राहावं लागणारच आहे की पायाभूत सुविधांचा नीट विचार केला तर माझ्यासारखी अजिबात उभं राहू न शकणारी, स्पायनल कॉर्ड इन्जुरी असणारी व्यक्ती क्षमतांचा पुरेपूर वापर करू शकते. माझ्यासारख्यांना कारण नसताना लाडावून घ्यायला आवडत नाही तसंच स्टिरिओटाईप्समध्ये बसवून माझ्या क्षमतांकडे मुद्दाम कानाडोळा केलेलाही चालत नाही. जर एकदा कळलंय की अपंग माणसांच्या क्षमता-अक्षमतांबद्दलचं सामाजिक स्ट्रक्चर, त्याचं पोजिशनिंग यावर पुन्हापुन्हा काम करत, सांगत राहावं लागणार आहे तर ‘किती वेळ पुन्हा तेच ते करायचं?’ असं म्हणत नैराश्याला आपल्या चवीत शिरकाव करू द्यायचा नाही. जे अविश्‍वास दाखवतात त्यांचीही एक गोष्ट आहे. शिळा भात चरचरीत फोडणी दिल्यावर जशी मजा आणतो तशी मजा आपण इथेही आणू शकतोच. प्रत्येकवेळी विषाला विषाचाच इलाज नसतोय चालत. - गोष्ट बदलायची तर हातात घ्यायला हवी प्रेमानं.
आता सुमारे दशकभर मंदा माझी सहकारी व सोबती म्हणून माझ्यासह व मी तिच्यासह राहते आहे. तिला हळूहळू हे घर इतकं आवडायला लागलं की आता ते माझ्याहून अधिक तिचं झालं आहे. आम्ही दोघी स्वयंपाकाच्या बाबतीत अतिशय उत्साही असल्यामुळं सारखं काहीतरी नवं करत असतो. तिची उंची माझ्या व्हीलचेअरवरच्या उंचीइतकीच आहे, पण हा शारीरिक अडचणीचा भाग तिला या घरात जाणवत नाही कारण व्हीलचेअरवरून सुलभपणे काम करता यावं ही केलेली रचना तिलाही फारच सोयीची ठरलेली आहे. गंमतजंमत करत मस्तमस्त पदार्थ करणं आम्हा दोघींनाही फार आवडतं. मजेत, आनंदात केलेले पदार्थ त्याच आनंदाचा संसर्ग सगळीकडे करतात हे कळत जातंच. “तुमच्या फोडणीनं माझ्या नाकातले केस जळाले सगळे!” असं म्हणत मंदा दुसर्‍या खोलीत पळत जाते तेव्हा मला कोण आनंद होतो. कडक फोडण्या देत नि मनस्वी ढेकर देत आमचं स्वयंपाकघर आनंदाची उडत्या चालीची गाणी गातं आहे.
या गाण्यात आपलीही धून विणणारे मित्रमैत्रिणी खूप आहेत. कधी गोव्याचा अनिल पाटील लोणी, खास निवडलेला तांदूळ घेऊन येतो नि म्हणतो, बसा जेवायला, गरम भाकरी करून घालतो. कधी भूषण कोरगावकर त्याच्या खास पद्धतीनी अंडाकरी करतो. त्याचं ते मसाले कुटत राहाणं, कसलाही दणदणाट न करता शांतप्रसन्नपणे स्वयंपाक करत राहाणं यानं आपण, आपलं जगणं फार भारीय असा फील येतो. रेणुका खोत ना ना तर्‍हेच्या करामती करत नि पदार्थांइतकीच चवदार कॉमेंट्री करत स्वयंपाक करते, प्रेमानं खाऊ घालते तेव्हा मौजेचा सिक्सर बसतो. सुनिता काकूच्या ‘काळ्या भाता’चा घमघमाट घरभर दरवळतो. अनिल सडोलीकर पटापट पातळसर खमंग ऑम्लेट्स खिलवत राहातात, भूक वाढत राहाते, पण अंडी कमी पडत नाहीत. एकूणात सगळ्या वयाच्या मित्रमैत्रिणींना हे स्वयंपाकघर व्हीलचेअरच्या मैत्रीसाठी बनवलेलं असलं तरी आपलं वाटतं, खास वाटतं. इतकं की पाच वर्षाची युतिकासारखी शेजारीण नि मैत्रीण म्हणते, सोनालीताई, आपण आधी कुळथाचं पिठलं करूया नि मग जेवून झालं की जायफळाची कॉफी करूया?




सोनाली नवांगुळ
लेखक, अनुवादक, संवादक. एकूण सहा पुस्तकं प्रकाशित.
दहा वर्षांहून अधिक काळ ‘स्पर्शज्ञान’सारख्या ब्रेल पाक्षिकाशी निगडित.
भरपूर फिरणं, जगभरातले सिनेमे बघणं, ‘चवी’नं खाणं, खाऊ घालणं याची आवड.
अपंग माणसांच्या प्रश्‍नांबद्दल चिकित्सक व सोडवणुकीबद्दल आग्रही. त्याविषयीच्या विविध पैलूंबद्दल लेखन, संवाद.

अन्न, स्त्रीवाद आणि मी

जगात दोन प्रकारची लोकं आहेत असं म्हणतात - एक जे खाण्यासाठी जगतात आणि दुसरे - जगण्यासाठी खातात.मी एक सामान्य भारतीय स्त्री आहे आणि तरीही, जरा चवीत बदल किंवा दुधात मिठाचा खडा म्हणूया - मी दुसर्या प्रकारात मोडते . जगण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट (read, necessary evil) इतकाच माझा आणि खाण्याचा संबंध. मी आता जे लिहिणार आहे ते केवळ कॅथार्सिस सारखं काहीतरी असणार आहे, पण हे कधीतरी करायला हवंच होतं तेंव्हा....


गोष्टीची सुरुवात करायची तर सुरुवातीपासूनच करायला हवी! त्यासाठी साधारण चार लाख वर्षं तरी मागे जायला हवं. अवघ्या चराचरात होमोनिड कुटुंबातील होमो इरेक्टस हा प्राणी कृत्रिमरित्या अग्नी निर्माण करायला आणि हाताळायला सगळ्यात आधी शिकला. ही मानववंशीय प्रजातींच्या बौद्धिक क्षमतेची पहिली ठिणगी. त्यातूनच मग अंधारलेल्या गुहे मध्ये हवं तेंव्हा हवा तेवढा प्रकाश आणि ऊब मिळवता येऊ लागली असेल. त्याने निबिड अरण्यात जगणं बरंच सुसह्य झालं असावं.
मुळात Hunter gatherer असलेल्या माणूस नावाच्या प्राण्याची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जेंव्हा निसर्गाशी दोन हात करण्यात आणि सतत च्या स्थलांतर करण्यात खूप शक्ती खर्ची पडू लागली तेंव्हा त्याच्या मादीने पिल्लं जगावी म्हणून गुहेत राहून शेतीचा प्रयोग करून बघितला. त्या प्रयोगाची फळं मिळायला लागल्यावर तो हळू हळू स्थिरावायला लागला. आणि इथेच स्त्रीच्या अधोगतीची बीजं –“संस्कृती” नावाच्या कसदार जमिनीत रुजली, वाढली, फोफावली. मूल हे स्त्री पुरुष संबंधांतून जन्माला येतं इतकं तोवर माणसाला कळायला लागलेलं होतं. पण स्त्रीला होणारं मूल नक्की कुठल्या पुरुषाचं आहे हे कळपात राहणार्‍या त्या बिचार्‍या प्राण्याला कळायला मार्ग नव्हता. (तेंव्हा DNA tests चा शोध अजून लागायचा होता अर्थातच.) त्यामुळे, कष्टाने मिळवलेली जमीन पुढच्या पिढीकडे सोपवायची तर समोरचं मूल आपलं आहे ह्याची खात्री तर असायला हवी नं ? मग आता हा पेच सोडवायचा कसा ? तर स्त्री इतर कुठल्याही पुरुषाशी संबंधच ठेऊ शकणार नाही अशी काहीतरी युक्ती करायला हवी होती. संबंधच काय तर इतर पुरुषांच्या संपर्कातही ती येऊ नये अशी चोख व्यवस्थाच करायला हवी होती.त्यासाठी एक फार धूर्त योजना आखण्यात आली, ती म्हणजे विवाह संस्था ! आणि अश्या तर्‍हेने अत्यंत स्वयंपूर्ण, सक्षम, स्वायत्त, स्वतंत्र आणि सबळ असलेली स्त्री ही अक्षरशः पुरुषाच्या दावणीला बांधण्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली . त्यातून मनुष्यबळ निर्मितीचा कारखानाच घरच्या घरी मिळाला वर जमिनीच्या वारसा हक्काचा प्रश्नही आपसूक मिटला. जश्या गोठ्यात गाई तशी घरात बाई !

आता ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सहज लक्षात येईल की अग्नी, शेती आणि विवाह ह्या तिन्हींच्या संयोगाने मानवाच्या मादीचं विश्व बदलून स्वयंपाकघर नावाच्या खोली पुरतं सीमित झालं आणि जीवंत राहण्यासाठीची मुलभूत गरज असलेला साधा अन्न नावाचा घटक पाककला नावाच्या अती क्लिष्ट आणि वेळखाऊ उपद्व्यापात अडकला . 


तेंव्हा अन्न आणि स्त्रीवाद हा अस्तित्वाच्या गाभ्याशी जाऊन भिडणारा विषय न होता तरच नवल .
अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा असल्या तरी आता ह्या तीनही गोष्टी अविश्वसनीय वाटाव्या इतक्या प्रमाणात बदलेल्या आहेत. आता त्या गरज ह्या संज्ञेला ओलांडून कधीच एका अत्यंत स्फोटक अश्या संस्कृती नावाच्या वेष्टनात गुंडाळल्या गेल्या आहेत .पुरुष धार्जिणी संस्कृती निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी कराव्या लागणार्या शोषणाची अत्यंत वस्तुनिष्ठ व्यवस्थाच निर्माण केली गेली. ती व्यवस्था एकाच वेळी अनेक पातळ्यांवर कार्यरत होती, अजूनही आहे . त्यामुळे अन्न आणि स्त्रीवाद हा विषय म्हणजे एक तीन पायाची शर्यत आहे . तो खरंच समजून घ्यायचा असेल तर स्त्री आणि अन्न ह्या दोन विषयांची जन्माची पडलेली गाठ सोडवून त्यांना तटस्थपणे वेगवेगळ करून बघता यायला हवं .
हा झाला larger point of view. Larger premise.

पूर्वीच म्हणल्या प्रमाणे मी जे लिहितेय ते माझ्यासाठी कॅथार्सिस सारखं काहीतरी आहे
But I also believe, the more personal you write , the more universal it becomes. And the first step you can take towards changing your story, is to tell your story.
So, अत्यंत खाजगी किंवा व्यक्ती, ह्या पातळीवर चिकित्सा करायला गेलो तर अन्न हा अतिशय over rated, time and energy consuming प्रकार वाटतो मला.त्यातही स्त्री असल्याने अन्न शिजवणे किंवा स्वयंपाक ह्या विषयाशी माझं कळत्या वयापासून love-hate relationship होतं असं आता मागे वळून बघताना मला जाणवतं.
I loved to hate food (&/or cooking) and Hated to have to love food (&/or cooking).
अगदी लहान असताना पासून मी घरातल्या स्त्रीयांना चुली जवळ तासंतास हाडाची काड करताना बघत होते आणि इतकं करून जे पानात वाढलं जायचं ते मोजून १०-१५ मिनिटात घरातली मुलंबाळ कर्ते पुरुष फस्त करून आपापल्या कामाला लागलेले असायचे आणि बायका पुन्हा अनेक तास उष्टी खरकटी भांडी स्वच्छ करण्यात घालवायच्या . त्यातून बाहेर पडत नाही तोच पुढ्या जेवणावळीच्या तयारीला बिचार्या लागलेल्या असायच्या.मोठं झाल्यावर आपल्यालाही हेच करायला लागणार आहे की काय ह्याचा धसका माझ्या बालमनाने घेतला होताच आणि ह्यातून काहीही झालं तरी आपण आपली सुटका करून घ्यायलाच हवी तरच काही खरं आहे; हे सतत स्वतःला बजावत राहिले.माझं स्वतःचं aptitude गृहकृत्यदक्ष सुगरण वगैरे स्त्री असण्याचं नव्हतं आणि घरातल्यानीही फार मला त्या साच्यात बसवायचा प्रयत्न केला नाही . त्यांनी एक दोनदा सांगून बघितलं असेल इतकंच पण फार काही मला कुणी “सासरी गेल्यावर आमचा उद्धार करशील” ह्या सबबीखाली जाच केला नाही. त्यात अभ्यासात बर्यापैकी प्रगती होती तेंव्हा त्यांनी मला माझ्यावर सोडून दिलं, त्यांच्या ह्या ऋणात मी आजन्म रहायला तयार आहे .

माझी आई उत्तम स्वयंपाक करायची पण त्याहून उत्तम जर काही तिने आमच्या भरणपोषणा साठी केलं असेल, तर तिने वाचन ह्या प्रकाराचे संस्कार आमच्यावर न बोलता, तिच्या वागण्यातून नकळत केले. आमच्या घरात पुस्तकांच्या चळती सतत लागलेल्या असायच्या . स्वयंपाक जेवणं आवरली की आई कायम हातात कुठलं न कुठलं पुस्तक घेऊन बसलेली असायची. तिला मी कधीही शेजारी पाजरी जाऊन कुणाशी उगाचच गप्पा मारत बसलेली बघितलं नाही. कधी कधी तर ती एखादं engaging पुस्तक वाचत असेल तर स्वयंपाक देखील झटकन आवरून जवळ जवळ पळत जाऊन पुस्तक घेऊन बसत असे.

मला हे एक तिचे खूप आवडे . तिच्या स्वयंपाकापेक्षा मला तिचं हे , स्वतःच्या वाचना साठी लागणारा वेळ आणि अवकाश संसाराच्या व्यापातून मिळवण्यासाठी धडपडणं, फार लोभस वाटत असे आणि आदर्शही. ती तिच्याच पुस्तकांच्या जगात इतकी रमलेली असे की आमच्यावर उगाचच बाकीच्यांच्या आया करतात तशी चौकीदारी किंवा आईगिरी तिने कधी केली नाही . ह्यावर अती दक्ष आया कदाचित भुवया उंचावतील पण त्यामुळेच खरंतर आमचे आम्ही निर्णय घ्यायला आणि त्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला शिकलो . याहून मोठं शिक्षणाचं प्रयोजन ते काय असेल??!!

आईचा स्वयंपाक minimalist म्हणता येईल ह्या categoryत मोडायचा. ती उगाचंच कधी स्वयंपाकघरात तासंतास घालवत बसत नसे. साधं सुटसुटीत पण व्यवस्थित पोट आणि मन भरेल असा स्वयंपाक ती करत असे आणि त्याचाही फार गवगवा करत नसे. स्वतःच्या पाक कौशल्याचा वापर तिने कधीही आम्हाला emotionally blackmail करायला अथवा स्वतःचा ego satisfy करायला केला नाही . हे फार महत्वाचं mental training मला घरबसल्या त्यामुळे मिळालं. अन्ना कडे बघण्याचा अलिप्त भाव त्यामुळेच आपोआप विकसित होत गेला. अन्न शिजवणे हा जगत राहण्यासाठीचा महत्वाचा भाग असला तरी तो आपल्या जगण्याचं प्रयोजन होऊ शकत नाही, होऊ नये, ह्याचं भान मला खूप लहानपणीच आलं होतं. त्यामुळे खाण्याच्या चवीपेक्षा त्याचं पोषण मूल्य तपासायला शिकले . जितका वेळ आणि शक्ती एखादी पाक कृती करायला लागते त्या प्रमाणात त्याचा उपयोग आपल्या शरीराला होतोय का ह्याचा ताळमेळ आपोआप मनात लागायला सुरु होत असे.

त्यातूनच नको त्या फापट पसार्यातून मोकळं होऊन शरीरास जे उपकारक ते स्वीकारणे आणि अपायकारक ते नाकारणे हे आपोआप घडायला सुरुवात झाली. मला कधीही कुठल्याही तळलेल्या किंवा चटपटीत किंवा गोड पदार्थांचं so called craving, instinctively सहसा होत नाही . त्यामुळे ठरवून diet (control) वगैरे प्रकार आजवर कधीही करायला लागले नाहीत. शरीरंच व्यवस्थित मार्गदर्शन करायला लागलं काय खायला हवं नको ते. शरीराचं ऐकलं तर मनाच्या स्वैर वागण्याला आपसूक चाप बसतो. आणि चवीचं म्हणाल तर ते बरंचसं mental construct आहे आणि त्यामुळेच फारच subjective आहे असंही मला हल्ली वाटायला लागलंय.

म्हणजे प्रत्येकाला आपल्याच आईच्या हातच्या आमटी किंवा वरणाची चव लक्षात असते, आवडते. मला माझ्या हातच्या आमटीची चव अजीबातच आवडत नाही पण माझ्या मुलांना मात्र ती फार आवडते. तर त्यात त्या आमटी पेक्षा ती मी केलेली असते हे त्यांना माहीत असेल तर त्यांच्या दृष्टीकोनात फरक पडतो. आमटी अतिशय सामान्य असते पण ती आपल्या आईने आपल्यासाठी केलीये ह्यात कदाचित मुलांचाही ego satisfy होत असेल. कुणीतरी आपल्यासाठी सगळी कामं बाजूला ठेऊन केवळ आपल्याला आवडते म्हणून एखादा पदार्थ करून आपल्याला वाढत असेल, किंवा तेच तिचं काम असेल, तर ह्यापेक्षा जास्ती validation काय असू शकेल ?!

पण मला आई म्हणून अजिबातच माझ्या हातच्या कुठल्याही पदार्थांचा कौतुक वाटत नाही. मी एक average स्वयंपाक करणारी average बाई आहे. त्यात आई झाल्याने फार काही फरक पडलेला आहे असं मला वाटत नाही. एकदा वीणा वर्ल्ड ह्या पर्यटन व्यवसायात अग्रगण्य असलेल्या कंपनीच्या सी.ई. ओ. वीणा पाटील ह्यांची मुलाखत मी बघत होते . तेंव्हा त्यांनाही इतर व्यावसायीक यश मिळवलेल्या कर्तबगार स्त्रीयांना विचारतात तसेच घरा-दारा-मुलां संबधीचे सुमार प्रश्न त्या मुलाखतकारानेही विचारले असता, त्यांनी अजिबात कुठलाही अपराध भाव चेहेर्यावर अथवा आवाजात न येऊ देता दिलेलं उत्तर माझ्यासाठी मनोहर सूर्योदय बघितल्याचा आनंद देऊन गेलं. त्या म्हणाल्या होत्या, “मला जर कुणी विचारलं की तुमचा आवडता पदार्थ कोणता, तर माझं प्रामाणिक उत्तर असतं , असा कुठलाही पदार्थ, ज्यासाठी मला स्वतःला स्वयंपाक घरात जाऊन फार वेळ घालवावा लागणार नाही, मला आवडतो.”

घराबरोबरच इतर अनेक व्यवधानं समर्थपणे सांभाळणार्या कर्तबगार मल्टी टास्किंग मास्टर्स असलेल्या अनेक मैत्रिणी मला लाभलेल्या आहेत . त्यातल्याच एकीने एकदा एक मजेशीर किस्सा सांगितला होता . ती म्हणाली, “नवीन लग्न होऊन मी जेंव्हा ह्या घरात आले तेंव्हा माझ्या सासर्यांनी मला सांगितलं होतं, तुला जर आयुष्यात खरंच सुखी व्हायचं असेल तर कुणाच्याही हातच्या कुठल्याही पदार्थाची चव आवडून घ्यायची सवय लाऊन घे, आणि त्यात उगाचंच कुठलाही अहंभाव किंवा न्यूनगंड मनात येऊ देऊ नकोस.”

माझ्यासाठी ही दोन्ही उदाहरणं माझ्या narrative शी अगदी चपखल मेळ खाणारी आणि म्हणून अत्यंत तार्किक वाटली मला आणि मी ती पडत्या फळाची आज्ञा समजून शिरसावंद्य मानली . कसोशीने पाळली आणि खरंच सुखी झाले .

आमच्या घरी स्वयंपाक करणार्या मावशी अतिशय उत्तम स्वयंपाक करतात. माझ्यापेक्षा नक्कीच जास्त सरस करतात हे मी नम्रपणे मान्य करून माझं स्वयंपाकघर निर्धास्त मनाने त्यांच्या स्वाधीन करून टाकलेलं आहे .जबाबदार्यांच delegation किंवा वेळखाऊ आणि repetitive processes चं outsourcing हे global economies मध्ये organisation building चे key factors समजल्या जातात. घर ही एक संस्था म्हणलं तर ती चालवण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार असू शकतात. माझ्या आईकडे वेगळा उपाय होता, सासूबाईं कडे वेगळा आणि माझा वेगळा. सगळेच प्रकार एकाच वेळी तितकेच प्रभावी असूच शकतात . प्रत्येकीचं नियोजन कौशल्यंच असतं ते.

कुणी स्टार प्लेयर्स असतात कुणी टीम प्लेयर्स असतात. मी टीम प्लेयर आहे. मला एकटीच्या खांद्यावर विजय ओढून आणावा असं कधीही वाटत नाही तशी महत्वाकांक्षा नाही आणि इच्छा तर मुळीच नाही. I enjoy being part of a winning team , without having to keep performing all the time.

खांदे पालट होत राहिली तर कुणावरच अतिरिक्त ताण येत नाही आणि प्रत्येकाच्याच क्षमता अधून मधून घासून पुसून लख्खं होत राहतात . “मी घरी नसले तर माझ्या घराचं पानही हलत नाही” किंवा “आमच्या ह्यांना साधा चहा देखील करायला येत नाही”, “किंवा आमच्या घरी सगळ्यांना माझ्याच हातच्या गरम गरम पोळ्या/भाकरी लागतात” इत्यादी इत्यादी, असल्या dysfunctionality ला कौतुकांच्या वेष्टणात गुंडाळून स्वतःचं आणि इतरांचही जगणं दुर्धर करून टाकणार्या toxic feminity च्या जाळ्यात मी कधीच स्वतःला किंवा माझ्या घराला अडकू दिलेलं नाहीये. ह्याचा मला माफक अभिमान आहे. मी असली नसली तरी माझं घर व्यवस्थित सुरू राहावं ह्याची तजवीज मी केलेली आहे. मी स्वयंपाक घरात दिवस दिवस गेले नाही तरी सगळ्याचं सगळं व्यवस्थित होतंय की नाही ह्याकडे माझं माझ्या कामाच्या टेबलावरून लक्ष असतं. आणि तितकं पुरेसं असतं. स्वयंपाकघर हेच एकमेव आणि इतकंच जगण्याचं, कर्तव्यपूर्तीचं आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचं मर्यादित क्षेत्र असलेल्या स्त्रियांच्या अनेक पिढ्यांचे “संस्कार” अगदी आजच्या पिढीपर्यंत लीलया पोहोचलेले आहेत. हे बघून गंमत वाटते.

अभिनयाच्या क्षेत्रात प्रथितयश असलेल्या एका तरुण दांपत्याची मुलाखत सोशल मीडिया फीड स्क्रोल करत असताना चुकून बघण्यात आली, तेंव्हाच्या ३० सेकंदात , मुलाखत घेणाऱ्या मुलीने नेहमीप्रमाणेच दोघांमधल्या तिच्यावर नेम धरून हमखास वर्मी बसणारा आणि प्रेक्षकांना खुश करणारा, ठेवणीतला प्रश्न भात्यातून काढला, “ तुम्ही दोघंही सतत इतके बिझी असता, तेंव्हा घरासाठी , एकमेकांसाठी वेळ कसा काढता आणि तो कसा घालवता?” त्यावर क्षणाचाही विलंब न लावता ती म्हणाली, “आम्हाला फार वेळ एकत्र मिळत नाही पण जेव्हा जेव्हा तो मिळतो तेंव्हा तेंव्हा आम्ही एकत्र जेवतो, त्यातही ह्याला गरम गरम पोळ्या करून वाढण्यात मला सगळ्यात जास्त आनंद मिळतो.” असं ती सांगत असताना, तो दोन्ही गालात गुलाबजाम असल्यासारखा गोड ब्लश करत होता, पुढे ती म्हणाली, “मला आठवतं माझी आई आम्हाला असं लहानपणी मस्त गरम पोळ्या वाढायची ते खाताना कोण सुख वाटायचं, तेच ह्यालाही मिळावं असं मला वाटतं आणि मलाही असं वाढायला आवडतं ” इतका सगळा प्रेमळ गोड गुलाबी संवाद ऐकून मला अर्धा क्षण कौतुक वाटलं खरं त्या आदर्श दांपत्याचं, पण तितकंच. त्यानंतर मात्र त्या गोडव्याने पोटात ढवळायला लागलं. ३० सेकंदाच्या वर काही मी ती मुलाखत पचवू शकले नाही आणि पुढे स्क्रोल करता करता विचार करू लागले , मिळत असेल कुणाला त्यात आनंद तर मिळो बापडा. आपल्या आईचं काय जातंय?

पण मला, प्रामाणिकपणे सांगायचं तर, कधीही पोळ्या लाटत बसण्यात किंवा त्या गरम गरम नवर्याला किंवा कुणालाही , अगदी स्वत:च्या मुलांनाही, वाढण्यात आनंद वगैरे अनुभवलाय असा एकही क्षण आठवत नाही. आमच्या घरात ज्याला गरम पोळ्या/ भाकरी खाण्याचा आनंद मिळवायचा असेल त्याने मावशी असतात त्या वेळेत जेवायला बसावे इतकाच नियम आहे . तोही कुणी पाळत नाही . प्रत्येक जण आपापल्या वेळेत आपापल्या सोईने लागेल तसं जेवण गरम करून वाढून घेतात . अगदी माझा १० वर्षाचा मुलगाही !

मला आठवतं नवीन लग्न होऊन जेंव्हा मी सासरी आले तेंव्हा हळदीचा रंग उतरल्यावर कुणीतरी मला विचारलं होतं, तुझी स्पेशालिटी डिश काय आहे , तीच आज सगळ्यांसाठी कर बघू . ते ऐकल्यावर खरंतर पोटात आधी गोळाच आला होता. सुचेचना उत्तर. कधी विचारच नव्हता केला ह्याबद्दल, कृती तर फार दूर. आपली तर कुठली स्पेशालिटीच नाहीये . तेंव्हा नवरा मदतीला धाऊन आला आणि दोघांनी मिळून कढी खिचडी का काय ती केली होती. सगळ्यांनी अर्थातच कौतुक करून वेळ साजरी केली पण i was so unimpressed with my culinary efforts. नवरा अतिशय समंजस मिळालाय हे एका अर्थी खरोखरीच ‘वर’दान म्हणायला हवं.

“पुरुषाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो”, ह्यासारखं sexist आणि crude वाक्य नाहीये जगात. माझ्या आयुष्यात महत्वाच्या असलेल्या एकाही पुरुषाला मी कधीही, काहीही खाऊ पिऊ घालून आपलंसं करायचा प्रयत्न तर सोडा तसा विचारही कधी केलेला नाहीये. आणि मुळात अश्या, हृदयाचा मार्ग पोटातून वगैरे जाणार्या पुरुषांबद्दल किंवा त्यांच्या हृदयाबद्दल मला कधीही यत्किंचीतही आकर्षण वाटलेलं नाहीये, त्यामुळे त्यांना आपलंसं करण्याचा प्रश्नच नव्हता उलट असे जे काही तुरळक पुरुष वाटेत आले त्यांना kindly excuse me म्हणून मी तिथून सहज सटकलेय.
एखाद वर्ष एकमेकांना ओळखल्यावर जेव्हा नवर्याने propose केले तेंव्हा मी त्याला पहिला प्रश्न विचारला होता, “ तुला तुझ्या आई किंवा वहिनी सारखी कुणी मुलगी हवी आहे का??” त्यावर क्षणाचाही विलंब न लावता त्याने शांतपणे उत्तर दिलं होतं, “नाही. मला आई आणि वहिनी already आहेत , मला तू हवी आहेस , life partner म्हणून हवी आहेस. तुझी तयारी असेल तर लग्न करुया .” मी अर्थातच ते उत्तर ऐकून मगच तयार झाले.
त्यानंतर च्या एका भेटीत त्याने विचारले होते, “तू non veg खात नाहीस , पण तू non veg बनवू शकते का ?” त्यावर मी म्हणाले होते , “नाही. मला येत नाही.”
त्यावर त्याने विचारले , “माझी आईही खात नाही, ती शिवतही नाही , पण शिजवते. तसं तुला करायला जमेल का?"
मला आठवतं त्यावर मी तितक्याच शांतपणे उत्तर दिल होतं , “प्रयत्न केला तर कदाचित जमेलही मला, पण मला तो प्रयत्न करायला आवडेल असं वाटत नाही , एक तर ते माझ्या तत्वात बसत नाही आणि मी तुझी आई नाहीये.” त्यावर त्याने मला हसून long drive वर नेलं आणि त्याच्या आवडत्या एका restaurant मध्ये dinner date ला घेऊन गेला जिथे आम्ही architecture ह्या आमच्या अत्यंत आवडत्या विषयावर पोट भर चर्चा करून दिवस सत्कारणी लावला.
लग्ना आधी जेंव्हा सासरी भेटायला गेले होते तेंव्हा माझ्या नणंदेने मला विचारलं होतं, “स्वयंपाक येतो का ?” तेंव्हा मी “फार नाही, फक्त कामा पुरता, उपाशी रहायला लागणार नाही कधी इतकाच येतो.“ असं प्रामाणिक उत्तर दिलं होतं. त्यावर तिने पुन्हा विचारलं,
“पण आमच्या सचिन ला तर वेगवेगळ्या डिशेस खायला खूप आवडतात, मग कसं करणार तू ??” त्यावर मी पुन्हा तितक्याच शांतपणे म्हणाले होते “ ज्याला खायला आवडतं त्याने बनवायलाही शिकावं, मी मदत नक्की करीन, पण तेवढ्यासाठी मला स्वयंपाकात फार वेळ घालवायला नाही आवडणार"

तेंव्हा कदाचित कुणाला माझी उत्तरं आगाऊपणाची वाटली असतील पण माझ्यासाठी ती सगळीच उत्तरं खरी आणि महत्वाची होती, अजूनही आहेत. मला माझं स्त्रीत्व स्वयंपाकघराशी बांधून घ्यायचं नव्हतं अगदी प्रेमाखातर देखील नाही. ही clarity मला लहानपणापासूनच होती त्यामुळे ती उत्तरंही तितकीच स्वच्छ होती. केवळ पाककला कौशल्या च्या कसोटी वर जर कुणी माझ्या स्त्रीत्वाची पारख करणार असेल तर त्यांनी मला खुशाल शून्य देऊन टाकावा . आयुष्यभर तो क्रूस खांद्यावर घेऊन चालत बसण्यापेक्षा मला खांदे झटकून त्या ओझ्यातून मोकळं होणं जास्त परवडणारं, आवडणारं होतं. 
त्यामुळेच जेंव्हा आमच्या नवीन घरातलं स्वयंपाकघर आम्ही design करत होतो तेंव्हा अत्यंत साधं logical brief आम्ही स्वतःला दिलेलं होतं. आपल्या घरातलं स्वयंपाकघर democratic असावं , open असावं . तिथे कुणीही कधीही काहीही येऊन शिजवावं. स्वतः खावं इतरांना खाऊ घालावं. स्वयंपाकघर हे भूक लागणार्या प्रत्येकासाठी, भूक शमवण्यासाठी लागणारं साहित्य असलेलं ठिकाण आहे. ते प्रत्येकाने मुक्तहस्ते वापरावं इतर कुणावरही स्वतःच्या भुकेचं, चवीचं ओझं न टाकता, मग ती आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आई असो, बायको असो, गर्ल फ्रेंड असो, आजी असो किंवा कुणीही .
बहुसंख्य स्त्रियांची, त्यातही भारतीय स्त्रियांची, उमेदीची खूप वर्षं,कर्तृत्व,उर्मी, क्षमता, स्वयंपाक घर नावाच्या पोकळीत अक्षरशः शोषल्या जातात हे आपण सारेच जाणतो, ते मान्य करू न करू हा भाग वेगळा. त्यातल्या सगळ्याच स्त्रीयांना काही स्वयंपाकाची आवड असू शकत नाही, किंबहुना असत नाही किंवा त्या नैसर्गिकरीत्या स्वयंपाकासाठी designed असतात असंही नाही. स्वयंपाक ही काही gendered skill नाहीये, आणि असं असेल तर food industry चा विचार करता, तिथे सगळ्याच महत्वाच्या ठिकाणी पुरूषच दिसतात, हे कसे? 5 star हॉटेल्स चे शेफ्स असो किंवा लग्नात लागणारे जेवण बनवणारे आचारी /महाराज असो, किंवा सरकारी गेस्ट हाऊस मध्ये काम करणारे खानसामे असो, किंवा अगदी पाणीपुरी/ पावभाजी ची गाडी चालवणारे असो, सगळेच पुरुषच दिसतात. हे कसे ?
व्यवसाय म्हणून स्वयंपाक करणे किंवा एखाद दिवशी हौसेने एखादा पदार्थ करून बघणे आणि रोज तासंतास ओट्या समोर उभं राहून तेच thankless काम वर्षानुवर्ष , आयुष्यभर करत राहणं ह्यात perception चा खूप फरक आहे. करणार्यांच्या आणि ती सेवा विनासायास उपभोगणार्यांच्या देखील. म्हणूनच ज्या स्त्रिया ह्या एकरेषीय, एकसुरी gender roles, ना आव्हान देतात, त्यातून मार्ग काढतात, त्या जाळ्यातून मुक्त होण्याच्या शक्यता धुंडाळतात, त्यांचं स्त्रीत्व यत्किंचीतही दुय्यम दर्जाचं ठरतं असं मला अजिबातच वाटत नाही. उलट त्याच जगण्याच्या पद्धतींच्या नव्या शक्यता, विचारांच्या नव्या दिशा दाखवू शकतात .

बोलता बोलता मी असं एकदा म्हणाले असता माझा एक अत्यंत जिवलग फेमिनीस्ट मित्र म्हणाला होता, “ न जाणो असे किती आईनस्टाईन, शेक्सपीअर, कोलंबस आपण हरवून बसलोय.... स्वयंपाकघरात, आणि त्याहून मोठं दु:खं हे आहे की आपल्याला ते कधीच कळणारही नाही. त्यांची इतकी महत्वाची आयुष्यं केवळ तांदळातले खडे वेचण्यात निघून गेली असतील.” त्याचं ते वाक्य मनात घर करून राहिलंय ते कायमचं.
आईनस्टाईनच्या (त्याच्याच इतक्या कर्तबगार) बायकोवर ची documentary एकदा youtube वर बघण्यात आली. मलीव्हा मरीच तिचं नाव. अर्थात आपल्यापैकी बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी हे नाव ऐकलं असेल. ज्यांना अधिक जाणून घेण्यात रस असेल त्यांनी जरून गूगल करून बघावं म्हणजे मी काय म्हणतेय त्याचं गांभीर्य कदाचित थोड्या प्रमाणात पोहोचेल.
सिमोन दि ब्वाव्हा तिच्या सेकंड सेक्स ह्या पुस्तकांत ह्या प्रक्रियेचा व्यवस्थितच धांडोळा घेते. ती म्हणते, एकूणच आपल्या समाजात पुरुषाच्या कर्तृत्वाला नको तितके वलय प्राप्त झालेले आहे. स्त्री तीन चार तास खपून जगातला सर्वोत्तम केक जरी बनवत असेल तरी तो १०-१५ मिनिटात संपून जातो आणि त्याची इतिहासात कुठेही नोंद ठेवली जात नाही .
केवळ चूल आणि मूल ह्या टोकांवर झुलणारा स्त्रीत्वाचा डोलारा उतरवून फक्त व्यक्ती म्हणून स्त्री कडे बघता आलं तर अन्न ह्या एका छोट्याश्या गोष्टी साठी किती मोठी किंमत ती व्यक्ती मोजतेय ह्याचा अंदाज जरी आला तरी आपल्या अपेक्षा आटोक्यात ठेवता येतील. “तुला स्वयंपाक येतो का?” असा वर वर साधा वाटणारा प्रश्न एखाद्या तरुण मुलीला विचारण्या आधी आपण तो किती loaded आहे ह्याचा क्षणभर थांबून विचार करू शकलो त्या ऐवजी, तिला तिच्या कुठल्या क्षमता विकसित कराव्याश्या वाटतात ह्यावर चर्चा करू शकलो तरी ह्या लेखन प्रपंचाचं प्रयोजन कारणी लागलं असं म्हणायला हरकत नाही. नाही ??!!




शीतल पाटील 
लेखिका गेली १७ वर्ष बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक प्रख्यात राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केल्या नंतर तिने मंथन डिझाईन स्टुडीओ ह्या नावाने कोल्हापूर येथे स्वतः ची प्रक्टिस स्थापित केली . शिक्षण क्षेत्रात रस असल्याने ती वेगवेगळ्या आर्किटेक्चर कॉलेजेस मध्ये विजिटिंग लेक्चरर म्हणूनही कार्यरत आहे . एकीकडे व्यवसाय नावारूपास आणताना एकत्र कुटुंबात राहून दोन मुलांची आई असण्याची तिहेरी कसरत करत झालेल्या तिच्या प्रवासातून आलेल्या अनुभवांचा उपयोग विध्यार्थ्यांना आणि व्यवसायात नव्याने उतरू बघणार्या मुलांना विशेषतः मुलींना व्हावा ह्यासाठी ती सतत प्रयत्नशील असते .

‘स’ स्वयंपाकाचा



मला स्वयंपाक करण्याची ‘आवड’ अशी कधी नव्हतीच! पण स्वयंपाक येत होता लहानपणापासून. आमचं कुटुंब मोठं होतं आणि आईला खूप काम पडत असे. मी भावंडात मोठी मुलगी असल्याने साताठ वर्षांची असल्यापासून मला आईच्या हाताखाली स्वयंपाकघरात पुष्कळ काम करावं लागलेलं आहे. पण मी त्यातले बारकावे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. मी फक्त आईला मदत करायची म्हणून काम करत असे! याउलट माझ्या दोन लहान बहिणींना मात्र स्वयंपाकाची खूप आवड होती. त्यांनी आईकडून खूप बारकावे शिकून घेतलेले आहेत. अगदी लहान असल्यापासून त्या लोणची घालणं, दिवाळीचा फराळ बनवणं - अशी कामं आवडीने करायच्या. मी फक्त वरकाम करून त्यांना सगळी तयारी करून देत असे. माझे वडीलसुद्धा आईला घरकामात खूप मदत करायचे. भाजी स्वच्छ करून, चिरून देण्याचं काम वडील करायचे पण भाजी आई बनवायची. मला पोळ्या करायला वडिलांनीच शिकवलं. वडिलांचं बघून माझे भाऊसुद्धा घरकाम करायला लागले असावेत. अजूनही आमच्याकडे आम्ही बहिणींनी स्वयंपाक केला तरी नंतरची आवराआवरी किंवा भांडी घासण्यासारखी कामं आमचे भाऊ करतात. आमच्याकडे तेव्हा पाण्याचा प्रॉब्लेम असायचा, त्यामुळे भाऊ सगळे कपडे घेऊन नदीवर जायचे आणि घरातल्या सर्वांचेच कपडे धुवून आणायचे. आमच्या घरात आम्हा बहिणींना कधीही भावांचे कपडे धुवायची वेळ आली नाही. पाणी भरण्याचं कामसुद्धा तेच करायचे. त्यात कामाची फार जाणीवपूर्वक विभागणी होती असं मला वाटत नाही – पण एकप्रकारचा सहजपणा होता. आम्हा मुलांना स्वयंपाक आलाच पाहिजे – असा काही दबाव नव्हता. पण आईला मदत करता करता आपोआप माहिती होत गेली होती.
पण मी जेव्हा नोकरीच्या निमित्ताने परगावी घर घेऊन एकटी राहायला लागले – तेव्हा मला वाटायला लागलं की आता मी माझ्या पसंतीचे पदार्थ बनवून खाऊ शकते. जेव्हा मी एकटीचा स्वयंपाक करायची तेव्हा स्वत:च्या आवडीचे पदार्थ करायला लागले. मला पुरीभाजी खूपच आवडते. मग मी आठवड्यातून दोनतीनदा तेच बनवायला लागले. मला वरणभात किंवा आलूपराठे सुद्धा आवडतात – तर तेही मी आवडीने करायला लागले. ती इतरांनाही खूप आवडते. आपण जे खाऊ ते स्वादिष्ट असलं पाहिजे, असं मला नेहमीच वाटत आलं आहे. त्यामुळे मी जे काही पदार्थ बनवते, ते स्वादिष्ट असतील याच्याकडे मी लक्ष देत असे आणि अजूनही देते. मी अनेक वर्ष छत्तीसगढमध्ये रायपूरला ‘रूपांतर’ नावाच्या संस्थेत काम करत होते. मी सामाजिक क्षेत्रात काम करत असे, त्यामुळे घरात भरपूर लोकांचं येणंजाणं सुरू असायचं. माझे सहकारी सगळे तिथलेच मूलनिवासी होते. तिथे बायकांनी स्वयंपाक करायचा आणि पुरुषांनी बघत बसायचं असं काही नव्हतं. सगळेजण समोर येईल ते काम करायचे. सगळ्यांनी मिळून स्वयंपाक करण्याची एक वेगळी गम्मत होती.
मला असं वाटतं; मी काहीही स्वयंपाकाचं काम करत असेन तर आसपासच्या लोकांनी नुसतं बसून राहू नये – त्यांनीही मदत करायला पाहिजे. खास करून पुरुष मंडळींना हे उमजत नाही. माझी अशा वेळी चिडचिड होते आणि मग पदार्थाची चव बिघडते. तसंच आपल्या मेहनतीची दाखल घेतली गेली तर करणाराला काम केल्याचं समाधान वाटतं. आमच्याकडे येणारे सगळे लोक ते आवर्जून करतात. आपला स्वयंपाक हा असा इतरांच्यावर सुद्धा अवलंबून असतो.

जरी स्वयंपाक करण्याची मुळात आवड नसली तरी मी स्वत:च्या पद्धतीने करता करता शिकत गेले आणि अजूनही सवडीने काही ना काही शिकत रहाते.
वयाची पन्नाशी उलटल्यावर मी लोणची घालायला शिकले. रवी नेहमी लोणचं विकत आणायचा, पण मला ते आवडत नसे. त्यात कितपत स्वच्छता असेल, प्रीजरव्हेटीव्ह असतील असं वाटायचं. म्हणून आम्ही दोघं मिरच्या, लिंबू, कैरी अशी लोणची आवर्जून शिकलो. मी जेव्हा रवीच्या सोबत मुंबईला राहायला आले, तेव्हा आमच्याकडे स्वयंपाकाला बाई होती पण मला जरा तिचं काम आवडत नसे. कारण मला फार मसालेदार पदार्थ नाही आवडत आणि ती तेलही खूप वापरत असे. म्हणून मग भाजी तरी आपणच करायला पाहिजे वाटत असे. फोडणीचं वरण करायची माझी एक विशिष्ट पद्धत आहे. ती बर्‍याचजणांना आवडते. असेच वेगवेगळे पदार्थ करता करता माझ्या हातची एक विशिष्ट चव विकसित होत गेली. माझ्या मुलाला शाळेचा डबा देताना तर मी अनेक प्रयोग करून पाहिले. त्याचा डबा त्याच्या मित्रांनाही खूप आवडत असे. कधीकधी तर मित्रच डबा संपवून टाकायचे आणि तो उपाशीच राहायचा. म्हणून मी त्याला दोन डबे द्यायला लागले. एक त्याच्यासाठी आणि एक मित्रांसाठी! ही पद्धत अगदी कॉलेजमध्येही सुरू राहिली.

माझ्या मित्रमैत्रिणींनाही माझ्या हातचे काही पदार्थ खूपच आवडतात. कधीकधी ते अगदी फर्माईश करून खायला येतात. जसजसा खाणार्‍या मंडळींच्याकडून फीडबॅक मिळत गेला – तसतसा माझा इंटरेस्ट आणखी वाढायला लागला. नवीन प्रयोग करून पहावेसे वाटायला लागले. हळूहळू माझ्या स्वयंपाकाची खासियत लोक मला सांगायला लागले. हा लेख लिहिण्यासाठी आम्ही दोघं आणि आमचा मुलगा एकत्र बसून माझ्या स्वयंपाकाबद्दल काय लिहावं असा विचार करत होतो – तेव्हा नवर्‍याने आणि मुलाने माझ्या स्वयंपाकाची काही वैशिष्ट्यं माझ्या नजरेस आणून दिली! गम्मत म्हणजे ही सगळी वैशिष्ट्य ‘स’ अक्षराशी जोडलेली आहेत. म्हणजे माझ्या स्वयंपाकात -"स" फार महत्त्वाचा आहे.

साधेपणा – घरात ज्या वस्तु नेहमी असतात त्यातूनच करायचं, एखादा पदार्थ बनवायचा म्हणून मुद्दाम क्रीम आणा, खास वस्तू आणा - वगैरे मी करत नाही. त्यामुळे माझा स्वयंपाक तसा स्वस्त असतो.

सहजता – मला खूप सगळ्या प्रक्रिया करून बनवायला आवडत नाही. मिक्सर मधून काढा, ओव्हन मध्ये घाला, मग एक तास थांबा - असं लांबलचक काही नको वाटतं. फार वेळ रेंगाळत बसायला आवडत नाही – पटापट काम झालं पाहिजे.

सुंदरता – पदार्थ बघूनच तो खावासा वाटला पाहिजे! मला कलरफुल जेवण चांगलं वाटतं. मला कोशिंबीर करायची असेल तरी त्यातल्या रंगांच्याकडे मी लक्षं देते. जर कोशिंबीरीत बीट घातलं तर संपूर्ण पदार्थ लाल रंगाचा होऊन जातो – त्यातल्या वेगवेगळ्या घटकांचे रंग झाकले जातात. म्हणून मी नेहमी बीटाची कोशिंबीर वेगळी बनवते आणि इतर सगळ्या वस्तूंचे रंग एकमेकाला खुलवतील अशा प्रकारे आणखी एक कोशिंबीर करते.

स्वास्थ्य – माझे पदार्थ अगदी शंभर टक्के आरोग्यपूर्ण असतीलच असं नाही. पण मी शक्य तितकं पोषणमूल्य वाढेल असा प्रयत्न करते. म्हणजे शक्य तिथे मोडाच्या कडधान्याचा जास्ती उपयोग करते, कमीत कमी तेलात स्वाद राखून जेवण बनवते.

स्वाद – स्वयंपाकात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वाद. पदार्थ नुसता छान दिसून उपयोग नाही पण पदार्थ खारट किंवा तिखट झाला असेल तर मजा नाही. तिखटमिठाचं, मसाल्याचं योग्य प्रमाण पाहिजे.




भारती दिवाण 
 मुळात मध्यप्रदेशातिल असून गेल्या तीस वर्षांपासून मुंबईत स्थायिक आहे. अनेक वर्षांपासून महिला आणि मुलांसोबत विविध सामाजिक प्रश्नांवर स्त्रीवादी विचारांनी काम करीत आहे.   


चव स्वावलंबी स्वयंपाकाची

खरंच, स्वावलंबनात जो आनंद असतो त्याला इतर कशाचीही तोड नाही. नोकरी करून, घर सांभाळताना जेव्हा स्वयंपाकघर आपल्या हातात येतं तेव्हा त्या घराबद्दल आपुलकी, जवळीक, प्रेम आणि जबाबदारीची भावना निर्माण होते हे मी अनुभवलंय. मी जर घरी वेळेत गेले नाही तर आम्ही खाणार कायअशी प्रेमळ काळजी असो, दमून आलेल्या पार्टनरला गरम कॉफी करून देण्याची गोड हुरहूर असो, बायकोने बिनधास्त बाहेर जावं - मी बनवेन ना माझ्यापुरतं - असा विश्वास व्यक्त करून तिला अधिक रिलॅक्स करणं असो. खूप छोटे छोटे पण तरीही आनंद, आत्मविश्वास, प्रेम आणि स्वातंत्र्याची चव असलेले हे क्षण स्वयंपाकघरच सहज मिळवून देत असतं.


तू चहा कसा गाळतेस?” आनंदने फोनवर हॅलो, म्हणण्याच्या आधी हा प्रश्न विचारला. मी त्याला म्हटलं चिमट्याने पातेलं पकडते मग, कपावर ठेवलेल्या गाळणीच्या वरच्या भागावर आपल्या बाजूने अंगठा तर समोरच्या बाजूने पहिलं आणि मधलं बोट येईल अशा पद्धतीने हात ठेवते. मग, पातेलं नेमकं कपावर येतंय का? हे पहिल्या बोटाने हळूच स्पर्श करून पाहते आणि मग, ते तिरकं करून कपात चहा ओतत जाते. कधी कधी चटकेही लागतात पण, आता सरावाने चटक्यांचं प्रमाण खूप कमी झालंय. पण, तू का विचारतोएस?” “मी शिकतोय ना चहा करायला म्हणून. बनवता आला पण, ओतता मात्र आला नाही. असं एखादं भांडं असतं का जे वापरून आपण चहा व्यवस्थित सर्व करू शकतो?”  मीही हसत हसत म्हटलं, हो असतं आणि त्याला वगराळं म्हणतात. लांब दांडा असतो त्याला एका बाजूला छोटासा कप असतो. त्यात चहा भरून तो कपात ओतून घेऊ शकतोस. त्याला एकदम कससंच झालं. नको वाटलं चहात दुसरं भांडं बुडवणं. पण, त्याच्या चौकशीने मात्र मला गंमत वाटली. स्वयंपाक घराशी माझा संबंध कसा आला? कसं जेवण बनवायला मी शिकले आणि त्यात प्रयोग करणं कधी सुरू झालं हे या वगराळ्याने आठवलं.
नवीन लग्न झालं तेव्हा मला नोकरी नव्हती. घरात दिवसभर बसून भरतची वाट पहायची एवढंच काम असायचं. सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आणि झाडू मारणं, लादी पुसणं, कपडे धुणं ही कामं मी करायचे. खरं तर, अशा कोणत्याच कामाची मला सवय नव्हती. शाळेच्या वसतीगृहात असताना हे सारं करावं लागायचं पण, स्वतःपुरतंच. पहिल्यांदाच चार माणसांची जबाबदारी आणि तीही अशी की, ज्यात सहजासहजी एक्स्क्यूज नसणारी अंगावर पडली होती. मी सुरुवातीला खूप आनंदाने आणि आपलेपणाने सर्व करायचे. पण, स्वयंपाक घरात जायला मात्र मला मज्जाव होता. हे बंधन हळूहळू माझ्या लक्षात येत गेलं. आईंना तिन्ही मुलगेच, त्यातही दोघं दृष्टीहीन. म्हणजे दृष्टीहीन मुलगी स्वयंपाक घरात व्यवस्थित वावरू शकते हे त्यांना पटवून देणं अशक्य होतं. मी किचनकडे जाताना दिसले की, त्या लगबगीने उठून येत आणि मला काय हवंय ते विचारत. मी पाणी म्हटलं की, त्या स्वतः ग्लास अगदी हातात आणून देत. सुरुवातीला यातही मला खूप आनंद वाटायचा. पण मग, हळूहळू लक्षात आलं की, मी स्वयंपाक घरात जाणं आईंना आवडत नाहीये. याचं कारण काय असावं यावर मी विचार करू लागले. त्यांनीही सारखं मी स्वयंपाक घरात जाऊन पाणी घेण्याचा प्रयत्न करते हे पाहून त्यावर तोडगा म्हणून पाण्याची बाटली भरून ठेवायला सुरुवात केली. मी स्पष्टपणे त्यांना काही बोलू शकत नव्हते पण, मनाला या सर्व गोष्टी टोचत होत्या. सारखं माझं घर आठवायचं. जिथे फ्रिज उगाचंच उघडून पप्पांनी खायला काय आणलंय हे मी दिवसातून १२ वेळा तपासायचे. गरम झालं की, फ्रिजची हवा खायला स्वयंपाक घरात जायचे कारण, एसी लावायचा कंटाळा यायचा. भरतकडे सतत भुणभुण करत होतेच. पण, आईंना समजावूनही काही फरक पडत नव्हता.
दरम्यान नोकरी लागली, बाळ झालं पण स्वयंपाकघर काही वावरण्यासाठी खुलं झालं नाही. एकदा सुट्टीच्या दिवशी भरतने मला पोहे करायला सांगितलं. आईला तू किचनमध्ये थांबू नकोस असंही त्याने सांगितलं. पण, त्या आल्याच. मी ओट्यावर हाताने पाहू लागले तर, मला शोधू देण्याआधीच त्यांनी लायटर उचलून माझ्या हातात दिला. मी गॅसच्या बर्नरला हात लावून लायटर तिथे टेकवला खरा! पण, हात भितीने थरथरू लागला. आई हसल्या आणि दाब की गं बटान असं म्हणाल्या. मी आतून रागाने पेटले. अपमान वगैरे काहीतरी डोक्याने घेतलं. तरीही हिंमतीने तिथेच उभी राहिले. बटन घाबरत घाबरत दाबलं आणि गॅस पेटवला. मला वाटलं होतं तेल गरम होण्याचा आवाज येईल पण, थेट तेलात कांदा टोमॅटो शिजतानाचा चर्चर् असा आवाज आला आणि मी आईंना विचारलं की, काय झालं हा असा आवाज? “आगं तुला जमनार न्हाई म्हून मीच कांदा टमाटर आदी घातलंयअसं म्हटल्यावर मी फणकाऱ्याने म्हटलं की, मग आई तुम्हीच करा मी बाबूकडे थांबते. तो दिवस आयुष्यातला निर्णायक दिवस ठरला. आम्ही वेगळा संसार मांडायचा हे पक्कं केलं यामागचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे हरवलेला विश्वास.
आत्मविश्वास हा एकच प्रकार आहे ज्याच्या बळावर कोणतीही व्यक्ती मग ती अपंग असो वा नसो, ठाम असते, आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून असते, आपल्या पायावर उभी असते. मी तो हरवताना पाहू शकत नव्हते. बरं असंही नव्हतं की, मी त्यापूर्वी कधीच स्वयंपाकघर हाताळलं नव्हतं. मध्यंतरी, गावाला काहीतरी इमर्जन्सी आल्याने आईपप्पांना जावं लागलं होतं. तेव्हा मी नोकरी करत नव्हते. सकाळी लवकर उठून मी भरतला चपाती भाजीचा डब्बाही १०-१२ दिवस दिला होता. 

असं असूनही आईंनी त्या परत आल्यावर माझा किचनमधला वावर पूर्ण बंद केला. तो इतका की, लायटर धरून बर्नरपर्यंत जायलाही घाबरत होते. खरंच, माझ्या आत्मविश्वासाचा बळी मला द्यायचा नाही अशा शब्दात भरतला ठणकावलं आणि जिद्द नसेल तर आपण काहीच नसतो हे स्वानुभवातून समजलेल्या भरतनेही मला ठामपणे पाठिंबा दिला. आम्ही पुढच्या सहा महिन्यातच वेगळं घर घेतलं आणि लग्नानंतर तब्बल दोन वर्षांनी खऱ्या अर्थाने संसार सुरू केला. मी पुन्हा चहा करायला शिकले अगदी नव्याने. भाताला नेमकं किती पाणी घालायचं, किती वेळ त्याला शिजू द्यायचं, कोणत्या प्रकारचं भांडं वापरलं तर तो खाली न लागता व्यवस्थित शिजतो आणि किती वेळाने गॅस बंद करायचा हे मी दोन तीनदा भात करपल्यावर शिकले. भरतने आणि ओजसनेही कच्चंपक्कं अन्न खाल्लंय. माझ्या हातचं खाताना कधीही त्यातली कमतरता उपहासाने त्याने सांगितली नाही. हळूहळू मी अधिक अचूक बनत गेले.
पण, एक प्रसंग सांगते जो आजही अंगावर काटा आणतो. मैत्रीण घरी आली होती म्हणून मी चिकन आणलं होतं. गॅसवर कूकर ठेवला होता कारण, तेव्हा किती वेळ पातेलं गॅसवर ठेवल्याने चिकन शिजतं हे माहीत नव्हतं आणि एका मैत्रिणीने कूकरची मंद आचेवर ठेवून एक शिट्टी घेतली की बास! असं सांगितलं होतं. मी कूकरमध्ये बरच तेल घातलं आणि तेलाचा आवाज येतो का हे कान देऊन ऐकू लागले. वाट पाहिली पण, आवाज काही येईना. म्हणून स्लो होता तो एकदम फास्ट केला गॅस. तर, भक्कन्  आवाज झाला आणि कूकरमधून आगीच्या ज्वाळा बाहेर आल्या. मी भरतला ओरडून समोरच्यांना बोलवायला सांगितलं. त्याला काय झालंय हे कळेच ना. सांगितलंय तेवढं कर लवकर असं किंचाळत मी आधी गॅस बंद केला, मग, खाली वाकून सिलेंडर बंद केला. मग, आठवलं, की, जळत्या कूकरच्या शेजारीच ओट्यावर तेलाचा पाच किलोचा डब्बा आहे, तो उचलून खाली आपटला आणि कूकर थरथरत्या हाताने बेसिनमध्ये नेला. त्यावर पाणी ओतलं तर आणि भडका झाला पण, दुसर्याच क्षणी आग मंदावली. मी पाय लटपटत असतानाही पाणी घालतच राहिले. आग शांत झाली. मग समोरचे आले आणि त्यांनी कूकर काळा कुट्ट पडल्याचं सांगितलं. काय झालं ते मात्र त्यांनी विचारलं नाही आणि मी सांगितलं नाही.
जेव्हा स्वतंत्र रहायला लागलो तेव्हा सकाळच्या डब्ब्यासाठी आम्ही स्वयंपाकीणबाई ठेवल्या. संध्याकाळचं मात्र मीच करायचे. पण, काम करताना सहज व्हावं म्हणून किचनमधलं सारं सामान आम्ही जागा ठरवून ठेवलं. आजही त्या जागा आम्ही बदलत नाही. आई आणि मम्मी दोघी अधूनमधून घरी येतात. त्या स्वच्छतेसाठी नकळत बऱ्याच वस्तूंच्या जागा बदलतात. पण, त्या गेल्या की, आम्ही दोघंही आधी जर कोणतं काम करत असू तर ते म्हणजे वस्तू जागच्या जागी ठेवण्याचं. यातून मी मिळवलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर ती म्हणजे आईंचा माझ्यावरचा ठाम विश्वास. आता त्या आल्या की, चिकन बनवण्याचं काम हमखास माझ्याकडे असतं. फ्राय चिकन तर त्यांनी स्वतःहून बनवणं माझ्यावर सोडून दिलं. कारण मी बनवलेलं त्यांना खूप आवडतं म्हणून. आणि मीही त्या आल्या की, त्यांचं खाणंपिणं आणि औषधगोळ्यांवर लक्ष ठेवून असते. आमचं वेगळं राहणं का आवश्यक होतं हे आम्हा दोघांना समर्थपणे घर सांभाळताना पाहून त्यांनीही समजून घेऊन स्वीकारलंय यातच आम्ही समाधानी आहोत.

स्वयंपाक करणारा भरत
मला वाटतं तेव्हा मला सहावा महिना चालू होता. आणि काही कारणांमुळे आईपप्पा बाहेर गेले होते. मीही तेव्हा बोईसरला माहेरी होते. भरतकडे कोणीच नाही म्हणून मी बदलापूरला जायचं ठरवलं आणि येत असल्याचं अचानकच कळवलं. आई त्याच्यापुरतं जेवण बनवून गेल्या होत्या आणि ते त्याने संपवलंही होतं. मी दोन जीवांची. फक्त भूकच लागायची तेव्हा. उलट्यांनी हैराण होत घरी पोहोचले. पोटात भुकेचा आगडोंब. स्वतः उभं राहून बनवणं तर अशक्य होतं. मग, मी भरतला गॅसकडे उभं केलं. त्याला सांगितलं तसंतसं त्याने केलं आणि मस्त चहा माझ्या पुढ्यात आला. त्याला इतका आनंद झाला होता की, मला सांगता येणं शक्य नाही. सारखं खरंच चांगला झालाय चहा? विचारून मला नक्को करून टाकलं होतं त्याने. मग, अशीच एकदा गर्भारपणामुळे बिकट झालेल्या अवस्थेत भरतने मॅगी बनवून दिली होती आणि सोबत अननसाचा रस.. त्यावेळी एवढं चविष्ट जेवण मिळणं हे माझ्यासाठी स्वर्गसुख होतं. पण, कठीण प्रसंगात जो नवरा स्वयांपकघर सांभाळू शकतो त्याची साथ खूप अमूल्य ठरते.
स्वतःच्या घरात येऊन चार दिवस झाले होते. दोन दिवस घरात काम करण्यात गेले पण, तिसऱ्या दिवसापासून आम्ही त्याला पाळणाघरात सोडून ऑफिसात हजर झालो होतो. पहिल्याच दिवशी ओजसला आम्ही जवळजवळ दहा तासांसाठी अनोळखी स्त्रीच्या ताब्यात ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशीही तेच. पण, रात्री ओजस तापला. दहा महिन्याचं माझं बाळ तापाने फणफणलं होतं. डोळेही उघडेना. आजाराची काहीच कल्पना नव्हती. शेजारच्यांना विचारलं आणि त्याला दवाखान्यात नेऊन आणलं. शेजारच्यांनाच सांगून त्याला औषधं वगैरे दिली आणि झोपवण्यासाठी मांडीवर घेऊन बसले. बराच वेळ झाला, ग्लानीत असलेलं बाळ झोपलं असेल असं वाटून त्याला गादीवर ठेवण्यासाठी उचललं तर ते किंचाळून रडायला लागलं. पुन्हा त्याला शांत करत झोपवायला अर्धा तास आणि झोपवता झोपवता एक तास गेला. नऊ वाजेपासून मांडीवर एकाच पोजिशनमध्ये बसलेली मी साडेबारापर्यंत तशीच बसले होते. साडेअकराच्या सुमारास भरत उठला आणि म्हणाला, अनुजा, खिचडी कशी करायची ते मला इथून सांग मी तसंतसं करतो. मी घाबरले. 
तेल गरम होण्याचा अनुभव माझ्या गाठीशी होता पण, भरतच्या बाबतीत असं काही झालं तर? मी विचार करू लागले. पटकन् सुचलं की, सारं साहित्य एकत्र करून जर कुकर लावला तर! मी भरतला सांगितलं, आधी तांदूळ धुवून घे. त्यात दोन-तीन पळ्या तेल घाल. मग, जिरं, हळद, मिठ आणि मसाला घाल. चमच्याने नीट ढवळून घे आणि झाकण लावून कुकर गॅसवर ठेव. त्याने तसं केलं. खिचडी तयार झाली. आम्ही त्या रात्री दीड वाजता जेवलोय. 

नवीन घर, नवा संसार. आजूबाजूच्यांशी ओळख होती पण, इतकं स्वातंत्र्य घेऊन त्यांना आपलं अवलंबित्व ठळक करून दाखवण्याची आवश्यकता नव्हती. कसं का असेना आमचं स्वावलंबी असणंच इतरांना अधिक मोकळं, अधिक उत्सुक करतं. त्यांना एखादं अंध कुटुंब कसं सारं आपलं आपण करू शकतं? अशी जिज्ञासा असते आणि त्यातूनच ओळखी होतात. अशा ओळखी अत्यंत गरजेलाच उपयोगात आणाव्यात. बाकी वेळा जमतील तशा पार पाडता येतात. स्वयंपाकघरातले हे दोनचार अनुभव भरतलाही विश्वास देऊन गेलेत. आजही कधी गंमत म्हणून भरत स्वयंपाकघरात शिरतो. मी काही बनवत असताना हाताशी असलेल्या डब्ब्यातलं काही संपलं की, त्या डब्ब्यात नेमकी वस्तू काढून देणं हे भरतचं काम आहे कारण, भरलेलं सामान कोणतं कुठे असतं हे त्यालाच माहिती असतं. मी ते लावत नसल्याने माझा त्या साहित्याशी स्वयंपाक करण्याइतकाच संबंध येतो. मला कंटाळा आला किंवा खूप थकल्यासारखं वाटत असलं की, तो प्रेमाने खिचडी बनवतो. सरावाने तो आणखी पर्फेक्ट झालाय.
पदार्थ बनवताना त्याचा गंध आणि स्पर्श तितकाच महत्त्वाचा असतो जितका महत्त्वाचा त्या पदार्थाला आलेला रंग असतो. पण, या दोन महत्त्वाच्या अंगांकडे बहुधा डोळस व्यक्तींचं दुर्लक्ष होताना मी तरी पाहिलंय. पण, याच दोन गोष्टी आपल्यासाठी पाककलेतलं आपलं कौशल्य अधोरेखित करतात. रिनाताई सांगत होती. आईवडिलांनी प्रयत्नपूर्वक घडवलेला स्वतंत्रबाणा जपणारी रिनाताई बॅंकेतली नोकरी करून पाककलेचा आपला छंदही जोपासते. कटलेट, बटाटेवडे, सॅंडविचेस, ओली भेळ, चिकन लॉलिपॉप, चिकन, अंडा बिर्यानी, सुका चिकन, झिंगा बिर्यानी, वेज पुलाव, आलूपालक, मटरपनीर, दालखिचडी, पापड, निरनिराळ्या प्रकारची भजी, वडे, ऑमलेट तळणं, शेंगदाणे अगदी दुकानातल्या प्रकारे ओवनमध्ये भाजणं, अनेक प्रकारच्या चटण्या. हे सारे पदार्थ रिनाताई अगदी एकट्याने बनवते. गरम मसाला असो किंवा उन्हाळ्यात मिरच्या वगैरे विकत घेऊन दळून करण्याचा गोडा मसाला असो, ती महिन्याला थोडा थोडा घरच्या फूड प्रोसेसरवरच वाटते. हे ऐकून तर मीच अजून धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. एवढी आवड! “कशी जोपासलीस गं?” तर मोकळं हसून म्हणाली की, मला स्वयंपाक यावा ही माझ्या आईबाबांची इच्छा होती. पुढे जाऊन कधी गरज पडली तर खाण्यासाठी आपल्या मुलीला कोणा दुसऱ्यावर अवलंबून राहवं लागता कामा नये असं त्यांना वाटत होतं. आई नेहमी स्वयंपाक घरातली छोटीमोठी कामं करवून घेत असे. बाबाही काही टिप्स द्यायचे. हळूहळू, सोलणं, चिरण्यावर हात बसला आणि आईने गॅसची कामंही दिली. तशी ओळख होतीच गॅसची. शाळेत होणाऱ्या पाकशास्त्राच्या वर्गात आम्ही स्वयंपाक शिकत असतो पण, प्रत्येकीला ती आवड जोपासण्याची संधी मात्र मिळत नाही.
पहिला पदार्थ काय बनवला होतास?’ असं विचारल्यावर एक किस्सा रिनाताईने सांगितला. शाळेच्या वसतीगृहात असताना एकदा रात्री साडेनऊच्या दरम्यान खूप भूक लागली होती. करायचं काय? आम्ही तिघीचौघी पाकशास्त्राच्या वर्गात गेलो आणि सर्व डबे धुंडाळले. त्यात पोहे, हळद, मिठ, लाल तिखट, साखर, असे जिन्नस सापडले. थोडा विचार केला आणि मी मसाला घालून पोहे बनवण्याचा निर्णय घेतला. बाकी सारी कृती योग्यच होती. फक्त मिर्च्यांऐवजी लाल तिखट होतं एवढंच! पण, पोह्यांना चव आली होती. पोट आणि मन तृप्त करणारी चव. तेव्हाच मनाने घेतलं की, या विषयात रस घेऊन पाककला आत्मसाद करायचीच.
तिने तसं केलंही. बहिणी, मैत्रिणींच्या मदतीने अनेक पुस्तकं तिने वाचली. ती ध्वनिमुद्रित पुस्तकं, इन्टरनेट ब्रावजिंग करून अधिक माहिती मिळवू लागली. आईबाबांसोबत राहणारी रिनाताई त्यांच्या वयाचा आणि आपल्या आरोग्याचा विचार सतत मनात ठेवूनच पदार्थ बनवते. पदार्थ कसा केला की, अधिक पौष्टिक होईल यावर तिचं बारीक लक्ष असतं. तिच्याशी बोलताना सहज म्हटलं की, अगं रिनाताई, सारं जमतं पण, मासे तळताना ते उलटता येत नाहीत म्हणून कामवालीची मदत घ्यावी लागते. तर, दृष्टीहीन व्यक्ती स्वयंपाक करताना वापरू शकेल अशा उपकरणांची, भांड्यांची मला भरपूर माहिती मिळाली. एकतर, असा चमचा जो पापड तळण्याच्या चिमट्याप्रमाणे असतो. दोन्ही बाजूंना त्याचा रुंद भाग असतो. समजा, तव्यावर मच्छीचा तुकडा टाकलाय आणि मला उलटायचा आहे तर, मी या चमच्याच्या एका बाजूवर तो हलकेच उचलून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने तो नीट धरायचा. म्हणजे तो इथेतिथे सरकून पडणार नाही आणि व्यवस्थितपणे उलटताही येतो. मग, लांब दांडी आणि चोच असलेल्या भांड्याबद्दल म्हणाली की, अशा भांड्यात चहा बनवला की, वगराळं घेण्याची गरज पडत नाही. हे दांड्यांवाली भांडी जरा काही दिवसांनी सैल पडतात. अशावेळी स्क्रूड्रायव्हरचा सेट जवळ असावा म्हमजे दुरुस्ती आपली आपणच करू शकतो. नसेलच तर म्हणे, मी तर मसाल्याच्या छोट्या चमच्यानेही स्क्रू टाइट केलेत. हे बारीकसारीक ज्ञान पण केल्याशिवाय, अनुभवाशिवाय येत नाही. नाही का? मुंबईला आल्यावर माझ्यासोबत स्वयंपाक अधिक सोपा करणाऱ्या अशा भांड्यांच्या खरेदीला यायचं रिनाताईने कबूल केलंय. खरंतर, आम्हा दृष्टीहीन मुलींसाठी तिने पाककलेचे वर्ग सुरू करावेत असं मला आणि तिलाही वाटतंय. पाहू कधी याला मूर्त स्वरूप येतंय ते!
चपाती रोजचा आणि तरीही अत्यंत महत्त्वाचा पदार्थ. डब्ब्याला चपाती लागतेच ना! मला संतोषीताई आठवते. तीही माझ्यासारखी संपूर्णतः दृष्टीहीन. स्वेच्छेने गृहिणीपद आणि स्वीकारलेली, निरनिराळे पदार्थ बनवणारीच नव्हे तर आग्रहाने खायला घालणारी. आग्रह एवढा की, कधीकधी शेजारीच असलेल्या सासरी जाणं टाळावं लागतं. कॉलेजपासून संतोषी साहू आणि किरण भापकर या जोडप्याबद्दल खूपच आकर्षण होतं. हे दृष्टीहीन जोडपं कसं सारं मॅनेज करत असेल? हेच कुतूहल अधिक असायचं. पहिल्यांदा रहायला गेले तेव्हा चिकन आणि भात खाल्लेला अजूनही आठवतंय. तेव्हा एकदा गेलो होतो, त्यावर त्यांना दोन मुलं झाली, आमचं लग्न झालं आणि आमचा मुलगा तीन वर्षांचा झाला तेव्हा कितीतरी वर्षांनी पुन्हा किरणदादाकडे जायचा योग आला. रात्री उशिरा पोहोचलो त्यामुळे जेवून गेलो होतो. रात्री बऱ्याच गप्पा मारल्या आणि बोलता बोलता कधी झोपलो तेच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी चपाती भाजण्याच्या खमंग वासाने जाग आली. मी आळोखेपिळोखे देत स्वयंपाकघराशी गेले तर, संतोषीताई चपात्या करत होती. थेट आत जाऊन डब्ब्यात हात घातला. अगदी गोल, नरम आणि लुसलुशीत चपाती! मनापासून वाटलं, घरी स्वयंपाकाला येणाऱ्या आंटीला नेऊन दाखवावी आणि म्हणावं जा तिच्याकडून जरा शिकून घ्या म्हणून. मी चहासोबत आवडीने ती गरम चपाती लगेच गट्टम केली.
मला आठवते मीराताई. पतीच्या अकाली निधनानंतर ९ वर्षांची मुलगी आणि ३ वर्षांच्या मुलाचा समर्थपणे सांभाळ करणारी. त्यांच्या शाळेसाठी लवकर उठून, आधी नाष्ता आणि मग स्वतःसोबत तिघांचा चपाती भाजीचा डबा तयार करणारी. पौष्टिक खाण्याची सवय असावी म्हणून हटकून रात्री मोठी गोल ज्वारीची भाकरी थापणारी. बॅंकेतली नोकरी सांभाळून कधी, इडली तर कधी सॅंडविच करून मुलांना खूष ठेवायला धडपडणारी.  
मी निःशब्द होते. शब्दच काही ठिकाणी आपल्याला थांबवतात असं वाटतं.
स्वयंपाकघर म्हणजे स्त्री - हे समीकरण हल्ली बदलतंय असं म्हणण्यापेक्षा ते हल्ली नीट स्वीकारलं गेलंय असं म्हणणं अधिक समर्पक ठरेल. टीव्हीवर तर पुरूष शेफ दिसतातच पण, रस घेऊन स्वयंपाक करणारी मुलंही बरीच आहेत. तसेच खंडू भंडारे हा माझा मित्र. कॉलेज जीवनात जिथे सर्वसामान्य मुलं मौज, मजा, मस्ती आणि आपला अभ्यास अशा जगात वावरत असतात तेव्हा खंडू मुंबईत शिक्षणासाठी राहता यावं म्हणून जीवाचं रान करत होता. मुंबईत राहण्याच्या धडपडीत त्याचं शिक्षणच पणाला लागत होतं हे दुर्दैव. वसतीगृहातल्या अटी पूर्ण करता येत नसल्याने कधी मित्रांकडे तर कधी वसतीगृहात दोनचार रात्री काढाव्या लागत होत्या. शिक्षण चालू असल्याने पैसा हातात नव्हताच. एका ठिकाणी सोय नसल्याने खाण्याचे वांदे असायचे. अशावेळी मित्रांनी आधार दिला आणि मदतही केली. त्यांच्यासोबत राहून ट्रेनमध्ये वस्तू विकून मिळवलेला पैसा आणि त्यातून मिळालेलं अन्न याबद्दल तो आजही भरभरून बोलतो. नोकरी लागली आणि एका मित्रासोबत शेअरिंग रूम घेऊन तो वेगळा राहू लागला. मित्र म्हणजे रॉबिनसन डिसुजा, तोही शंभर टक्के अंध. दोघांनी रूम घेतला, गॅस घेतला आणि रॉबिनदादाने खंडूला स्वयंपाक शिकवायला सुरुवात केली. अक्षरशः पद्धतशीर ट्रेनिंगच दिलं म्हणा ना!. गॅस कसा पेटवावा, सुरी कशी धरावी, कांदा, बटाटा, टोमॅटो चिरण्यातला फरक फोडणी देताना होणारे आवाज, सुटणारे वास, शिजल्यानंतरचा पदार्थाचा स्पर्श, गंध आवाज आणि चव. त्याला जेवढं म्हणून येत होतं समजत होतं त्याने तेवढं सगळं खंडूला शिकवलं. खंडू चपाती सोडून सगळा स्वयंपाक बनवू शकतोच तर रॉबिनदादा म्हणतो बिर्यानी त्याची स्पेशल डिश आहे. मला आमंत्रणपेक्षा मीच येईन तेव्हा - बिर्यानी दे हं बनवून असं कबूल करून घेतलंय रॉबिनदादाकडून. दोघेही आपल्या संसारात रमलेत. कधी बायकोला जमलं नाहीच तर तिला संपूर्ण साग्रसंगीत जेवण वाढता येण्याइतके दोघेही या पदार्थांमध्ये तरबेज आहेत. तसं ते करतातही. खूप संघर्षानंतर मिळालेलं हे स्थैर्य त्यांना अधिक उत्तेजन देतं आणि मग हौस म्हणून हे दोघं स्वयंपाकघराचा कधीकधी ताबा घेतात.
आपल्या जगण्याची ऊर्जा म्हणजे अन्न. समाजात सर्वसामान्यांप्रमाणेच वावरता यावं म्हणून, जगता यावं म्हणून आम्ही दृष्टीहीन माणसं रोज असामान्य संघर्ष करत असतो. पाऊल पुढे टाकताना खरंच शाश्वती नसते की, ते योग्य जागी पडेल की, निसरड्या केळ्याच्या सालावर पडेल / कुत्र्यावर पडेल / मधेच पार्क केलेल्या बाइकला जाऊन आपटेल की, पार्क केलेल्या कारचा उघडा आरसा हाताला दोन दिवस दुखेलशी जखम देऊन जाईल. इतक्या अनिश्चिततेमध्ये वावरताना, आपली नोकरी, आपलं घर आणि आपलं कुटुंब सांभाळताना कधी जबाबदारी म्हणून तर कधी रिलॅक्स होण्यासाठी दृष्टीहीन लोक स्वयंपाक घरात पाऊल ठेवतात.
आता तुम्ही कामवाली का ठेवत नाही? किंवा बाहेरून का मागवत नाही असे प्रश्न कोणाच्या मनात येऊ नयेत असं वाटतं.कारण, रोज बाहेरचं खाणं परवडत नाहीच शिवाय तब्बेतीच्या दृष्टीनेही ते मारक ठरत. आणि कामवाली प्रत्येकाला परवडते असंही नाही. त्याहीपेक्षा जर कच्चंपक्कं कसंही का असेना, आपल्याला बनवता येत असेल आणि इतर कुटुंबिय गोड मानून घेत असतील तर आपणच का बनवू नये! असा आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला बाणेदार प्रश्न माझे मित्र-मैत्रिणी हमखास विचारतात. आजकाल स्मार्ट युग आहे. मॉड्युलर किचन ही संकल्पना खूपच लोकप्रिय झाली आहे. अनेक घरांतून ओवन, इन्डक्शन, चपाती बनवण्याचं मशिन अशी स्मार्ट इलेक्ट्रिक साधनं सर्रास वापरली जातात. मी वर उल्लेख केलेल्या माझ्या निवडक मित्र-मैत्रिणींपैकी काही जण अगदी सहज वापर करतात या सर्व वस्तूंचा. 
बिट्टू जयस्वाल 

तरीही मुद्दाम नाव घ्यावं तर मी घेईन बिट्टूकुमार जैसवाल या माझ्या संपूर्णतः दृष्टीहीन असलेल्या मित्राचं. एका सॉफ्टवेअर डेवलपिंग कंपनीमध्ये बिट्टू काम करतो. स्मार्ट जमान्याच्या सर्व प्रकारचे अपडेट हा ठेवतो आणि आम्हा मित्र-मैत्रिणींसोबत सतत शेअर करत राहतो. मायक्रोवेव कसा वापरायचा याबाबतही त्याने सविस्तर माहिती आम्हाला वेळोवेळी दिली. तो स्वतः कोणत्या मोडवर, किती हिट ठेवली की, कोणता पदार्थ छान होतो हे सांगतो. समजावून सांगताना बटन कोणत्या बाजूला आहे, त्याचा आकार कसा आहे, ते किती वेळा दाबलं की, योग्य प्रमाण ठरेल हे सांगतो. शिवाय, प्रत्येक वेळी त्याचा स्वतःचा अनुभवही असतोच. कुकिंग मोड म्हणजे मायक्रोवेव मोड. त्यात त्याने आजवर ढोकळा, सँडविच, कॉफी असे पदार्थ केले आहेत. आज ऑम्लेटवर प्रयोग होणार आहे आणि लवकरच त्याची रेसीपी, टाइम आणि हिटचे डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचतील. इतरवेळी त्याचं पाणी गरम करणं, शेंगदाणे भाजणं, एकाच वेळी अनेक पापड भाजणं हे चालूच असतं. अशा सततच्या शेअरिंग प्रेरित होऊन माझे आणखी मित्र-मैत्रिणी ओवन घेण्याच्या विचारात आहेत, त्यांपैकीच मीही.
खरंच, स्वावलंबनात जो आनंद असतो त्याला इतर कशाचीही तोड नाही. नोकरी करून, घर सांभाळताना जेव्हा स्वयंपाकघर आपल्या हातात येतं तेव्हा त्या घराबद्दल आपुलकी, जवळीक, प्रेम आणि जबाबदारीची भावना निर्माण होते हे मी अनुभवलंय. मी जर घरी वेळेत गेले नाही तर आम्ही खाणार काय? अशी प्रेमळ काळजी असो, दमून आलेल्या पार्टनरला गरम कॉफी करून देण्याची गोड हुरहूर असो, बायकोने बिनधास्त बाहेर जावं - मी बनवेन ना माझ्यापुरतं - असा विश्वास व्यक्त करून तिला अधिक रिलॅक्स करणं असो. खूप छोटे छोटे पण तरीही आनंद, आत्मविश्वास, प्रेम आणि स्वातंत्र्याची चव असलेले हे क्षण स्वयंपाकघरच सहज मिळवून देत असतं. नाही का?
                                                                           


अनुजा संखे
मुंबई विद्यापीठातून मास कम्युनिकेशन आणि जर्नलिजमचे पदव्युत्तर शिक्षण. बँकेत नोकरी करत असताना लिखाणाची आवड जोपासते. सोशल मीडियावर सातत्याने लिहिते. सह्याद्री वाहिनीच्या हिरकणी पुरस्काराने आणि सावली फाउंडेशन च्या नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित.