मुक्ता मनोहर




गेल्या अनेक वर्षांपासून मुक्ता मनोहर पुण्यातल्या सफाई कामगारांच्या सोबत काम करीत आहेत. त्यांनी काम सुरू केल्यापासून आजपर्यंत ह्या कामातले मुद्दे कसे बदलत गेले, सफाई कामगारांच्या परिस्थित काय फरक पडला आणि विशेषत: महिला सफाई कामगारांचे काही निराळे प्रश्न असतात का – याविषयी त्यांची मुलाखत. ही मुलाखत पुन्हा स्त्रीउवाचअंकाच्या संपादन मंडळातील अंजली जोशी यांनी घेतली आहे.
सफाई कामगारांच्या बरोबर तुमचं काम कसं आणि कधी सुरू झालं?

मी सफाई कामगार युनियनची कार्यकर्ती 1993 मध्ये झाले पण त्याधीपासून मी ह्या प्रश्नांशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेली होते. 1975 साली जागतिक महिला वर्ष जाहीर झालं होतं त्यावेळेस मी अगदी तरुण होते आणि स्त्रीमुक्ती बद्दल खूप आकर्षण होतं. पण त्याच वेळी अशोकच्या संपर्कात आल्यामुळे कष्टकरी महिलांचं चळवळीमध्ये स्थान काय असाही चर्चेचा मुद्दा असायचा. विद्या बाळ यांनी स्त्री मासिकासाठी - सफाई कामगार महिलांच्या मुलाखती घे - असं सांगितलं तेव्हा मी ताराबाई सोनवणे या आमच्या जुन्या कार्यकर्त्या होत्या त्यांची मुलाखत घेतली होती. मी आधी महिला संघटनेचं काम करत असे. महिला संघटनेत कुटुंबातल्या समस्या सोडवणे वगैरे जास्त होत असे. तरी मला युनियनच्या डाव्या विचारसरणीचे आकर्षण होतं. मला आप्पासाहेब भोसले वगैरे त्यावेळच्या पुढार्‍यांनी सांगितलं की इथे महिला कामगार खूप आहेत म्हणून महिला कार्यकर्ती पाहिजे. कामगारांसोबत काम करायची ही संधी चालून आली आणि मोठ्या यंत्रणेमध्ये कामगारांची प्रतिनिधी म्हणून जाणं याचं मला खूप आकर्षण वाटलं. महिला संघटनेपेक्षा ट्रेड युनियन ही वेगळी संघटना होती.

महिला आणि पुरुष सफाई कामगारांच्या कामात काही फरक असतो का?

सगळीकडे पुरुषांचं आणि महिलांचं काम वेगळं मानलं जातं! पूर्वी सगळीकडे बायका वाकून कचरा काढण्याचं काम करायच्या आता उभा खराटा घेतात. तर पूर्वी त्या झाडून कचऱ्याचा एक ढीग करायच्या आणि मग तो ढीग भरण्याचं काम पुरुष करायचे. पूर्वी जोडीने काम करायची पद्धत मुंबईला होती. पुण्यामध्ये त्याला गाडा बिगारी म्हटला जाई. दोन किंवा तीन महिलांच्या मागे एक गाडा बिगारी असायचा.
या महिलांनी कचऱ्याचा ढीग केला की हा बिगारी तो ढीग उचलायचा. कदाचित त्यावेळी गाडी ढकलणे हे जड काम मानले जात असेल. पण आता हे फरक राहिले नाहीत. तरी आजही कचऱ्याच्या गाडीवर पण महिला कामगार नाहीत, स्मशानभूमीवर महिला कामगार नसतात. अजूनही बायका गटारात उतरायचं काम करत नाहीत. घाणकाम भत्ता मिळणार्‍याचा वारस नोकरीला लागला जातो. जेव्हा एखाद्या मुलीला नोकरी लावायचे असेल तर तिला काय काम द्यायचे असा प्रश्न पडतो. जर या सफाईच्या कामातला पुरुष वारला तर त्याला मुलगा नसेल तर बाईला झाडू खात्यात घेतलं जातं.

महिला आणि पुरुषांचे पगार वेगवेगळे असतात का?

नाही. बिगारी कामगार हा हुद्दा असतो आणि सगळ्यांचे पगार सारखेच असतात पण त्याच्याशी निगडीत जे बारकावे आहेत - ते जातीशी जोडलेले आहेत. सफाई म्हटलं की एक काम म्हणजे मानवी विष्ठा उचलण्याचं आणि त्याच्यात आपल्याकडे जातिभेदाच्या सीमा येतात. मानवी विष्ठा उचलणे, सार्वजनिक संडास साफ करणे हे सगळं काम मेहतर समाजामध्ये पारंपारिक आहे आणि ते खूपच अपमानकारक आहे. जर एखादी मेहतर बाई आली नाही तर झाडू मारणारी बाई काही संडास साफ करायला जाणार नाही! मग आपोआप त्याचा परिणाम असा होतो की मेहेतर बाई सुद्धा झाडू मारण्याचे काम करत नाही. या दोन्ही कामांमध्ये त्यातल्या त्यात कुठलं काम बर आहे, असं आपल्यासारख्या त्रयस्थ माणसाला विचारलं तर रस्ता झाडण्याचा काम बरं आहे - असं वाटू शकतं.
खरं म्हणजे दोन्ही कामं वाईटच आहेत! या सगळ्याला छेद देणाऱ्या पोलिसी हळूहळू पुढे आल्या. 2000 साली जेव्हा रत्नाकर गायकवाड आले तेव्हा - सगळ्यांचे हुद्दे बिगारी करावेत - असे ठरले. पण सर्वांना बिगारी कामगार म्हणणं जेवढं सोपं वाटतं तेवढं प्रत्यक्षात सोपं नाहीये. कारण त्याच्यावर या कामगारांचे भत्ते पण ठरतात. झाडूवाल्या बाईला झाडूचा भत्ता मिळतो, बिगारी जो असतो त्याला उचकटायला पळी लागते – त्याचा पळी भत्ता असतो. गणवेशही वेगळे असतात घाणकामाचा भत्ता हा एक भाग झाला पण त्याचे असे निरनिराळे पैलू असतात. ते मोडण्याची जी प्रक्रिया आहे ती यांत्रिकीकरणातूनच होऊ शकते. पण ते यांत्रिकीकरण कामगारांच्या जीवावर येतं, कारण त्यांच्या नोकऱ्या जातील अशी भीती असते असे ह्या विषयाला असे अनेक सामाजिक ऐतिहासिक पैलू आहे

महिला कामगारांना काम करताना कोणत्या अडचणी येतात?

काम करताना ज्या कोठ्यावर हजेरी देतात तिथे टॉयलेटची, पाण्याची सोय नसते. सार्वजनिक ठिकाणी काम करणार्‍या महिलेने टॉयलेटला कुठे जायचं? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग त्या कॉर्पोरेशनचे जे सार्वजनिक दवाखाने आहेत, त्यांचा उपयोग करतात. त्यांना राहायच्या ठिकाणापासून लांब कुठेतरी कामाला पाठवले जाते आणि दोनतीन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करायचं असतं. ही बाई काही वाहन वापरत नसते, मग तिने आपला झाडू काखोटीला मारून दूरवर चालत जायचं - असं चालत जाण्यातच तिचा कितीतरी वेळ जातो. कामावर जाता जाताच लोक थकून जातात आणि पुन्हा उभ्याने हे सगळं काम करायचं! पण या अशा सगळ्या गोष्टींकडे सहानुभूतीने बघण्याची नजर नसते. युनियनने आरडाओरडा केला की जाग येते. पण सफाईकाम कोण किती वेळ करू शकतो? याचे तास कसे मोजायचे? माणूस जर ड्रेनेज मधून घाण काढून वर आला तर त्याच्या अंगाला खूप घाण वास येतो. मुंबईच्या हायकोर्टाने महानगरपालिकेला एक आदेश दिला होता प्रत्येक ड्रेनेज कामगाराच्या मागे एक छोटा पाण्याचा बंब पाहिजे म्हणजे तो बाहेर आला ही त्याला हात धुता येतील. ते तर राहूनच द्या! पण तो त्याची ड्युटी करून आला की त्याने पिशवीत आणलेल्या स्वतःच्या टॉवेलने त्याला अंग पुसावे लागते. हे काम इतकं घाण आहे हे की आपल्याला तो वासदेखील सहन होत नाही. पण कामगारांना मात्र कामावर हात धुवायला पाणी मिळत नाही की साबण मिळत नाही! हे सगळं ‘कचराकोंडी’ फिल्ममध्ये सुद्धा पाहायला मिळेल.

अशा परिस्थितीत कामाचे तास कसे ठरवायचे? एकदा घाणीतून बाहेर आल्यावर पुन्हा घाणीतच कसे उतरणार? आम्ही युनियन मधून असा लढा दिला होता की तुम्ही सलग काम द्या म्हणजे आहे त्याच्या कितीतरी पटीने लोक येतिल. खरं म्हणजे कंत्राटी कामगार म्हणून लोक येतातच! पण हे घाणीचं काम, कंटाळवाणे काम हे एकप्रकारे माणसाच्या सन्मानाला कमी लेखणारे आहे - त्यामुळे हे काम लवकरात लवकर करून रिकामे व्हा आणि नंतर तुम्ही अमुक एखादी चांगली गोष्ट करा -अशी सवलत असली पाहिजे. किती किलो कचरा गोळा केला हा निकष योग्य नाही, एखादा छोटासा उंदीर मारून पडलेला असेल तरी सगळ्या परिसरात घाण वास सुटतो. या सगळ्याचा मानसिक परिणाम ह्या कामगारांवर होत असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे.


तुम्ही इतकी वर्ष महिला कामगारांकरता काम केलं आहे तर तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या जीवनमानात काय सुधारणा झाल्या?

आता ज्या नवीन मुली आहेत त्या शिकलेल्या आहेत आणि स्कूटर चालवतात. जास्त आत्मविश्वास आहे. आधीच्या काळात जेव्हा आप्पासाहेब होते तेव्हा झाडूवाल्या बायका तोंड झाकून घ्यायचा पण आता धीटपणा वाढला आहे. आता फक्त तरुण मुलीच नाही तर मोठ्या वयाच्या बायकासुद्धा पंजाबी ड्रेस घालतात. आता त्यांचं राहणीमान बघून एखादी बाई झाडू वाली आहे असं वाटणार पण नाही इतका बदल झालाय आणि तो स्वागतार्ह आहे.

आणखी काय सुधारणा व्हायला पाहिजे?

जिथून त्यांना हजेरी देऊन काम सुरू करायचं असतं त्या कोठ्या चांगल्या पाहिजेत. कामाचे तास सलग पाहिजे, जास्त माणसं कामावर घेतली पाहिजेत, कंत्राटीकरण बंद केलं पाहिजे आणि सुरक्षितता दिली पाहिजे. खूप लांबून पहाटे सहा वाजता कसे येणार? अनेक बायकांना खूप घाणेरडे अनुभव आलेले आहेत.
औंध मधील गोष्ट आहे - एक महिला कामासाठी बाहेर पडली आणि कामाच्या ठिकाणी गेली तर गाडीत बसलेला एक माणूस तिला म्हणाला, “अहो बाई इकडे या, मला हा पत्ता सांगा!” ती जवळ गेली तेव्हा तिला दिसलं की गाडीच्या आत मध्ये तो माणूस पूर्ण कपडे काढून बसलेला होता. तिला इतकी घाण वाटली की ती जोरात ओरडत पळत सुटली. शिवाय कामाच्या ठिकाणी कुत्रे पण असतात. महिलांना तर घरातल्या कामाचंही प्रेशर असतं. त्या इतक्या सकाळी डबा कसा आणणार? मग कित्येक वेळेला त्या बाहेर वडापाव खातात, त्यांच्या तब्येतीवर या सगळ्याचे वाईट परिणाम होतात. त्यांच्या कामाचे तास कमी व्हायला पाहिजेत. समजा सकाळी सहापासून काम केलं तर दहा वाजल्यानंतर त्यांना सोडून द्या ना! तसं न करता आठ आठ तास काम करावे लागते. पिढ्यानपिढ्या त्यांनी आहे तेवढ्या पगारात काम केलेले आहे त्यांची dignity वाढवली पाहिजे. त्यांच्या कुटुंबाला शिक्षणाची शाश्वती दिली पाहिजे.

‘वारसा’ असं जे म्हणतात त्याचे फायदे तोटे काय आहेत ?

हा खूप गुंतागुंतीचा मुद्दा आहे. वारसा हक्काचे तोटेसुद्धा असतात. कुटुंबात भांडणे लागतात, तीव्र वाद होतात. कधीकधी हे वाद अगदी जीवघेणे असतात. हे सगळं खूप कठीण आहे. एका वारसावर सगळं कुटुंब अवलंबून राहील, अशी परिस्थिती आता राहिली नाही. जर मुलगाच नसेल किंवा चार मुलं असतील तर वारस कोणाला करणार? सगळ्या मुली असतील तर कधीकधी जावयाला वारस करतात. वारसा हक्क हा एक प्रकारे संपत्ती सारखा झाला आहे. त्यातली भांडणे सोडवणे कठीण काम असते. जर एखाद्या मुलाला वारसाहक्काने नोकरी मिळणार असेल तर तो शिकत नाही असंही होतं. हे सगळं परिस्थितीतून आलेले आहे. काहीजण शिकतात सुद्धा! माझ्या मुलाला झाडू हातात धरायला लागू नये, असं म्हणणारे सुद्धा खूप आहेत. अगदी एमपीएससी, यूपीएससी परीक्षांना बसणारी मुलंसुद्धा आहेत. आमच्या युनियन मधल्या एका झाडूवालीचा मुलगा एमपीएससी झाला, त्याचा आम्ही सत्कार केला होता.

आता हे श्रमिक संघटनेचं जे काम आहे त्यात महिला आणि पुरुषांचा सहभाग वेगवेगळा असतो का?

महिलांचा सहभाग आहे आणि तो वाढलाही पाहिजे. यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. पूर्वी युनियनमध्ये पुरुषांचं वर्चस्व होतं, त्याचा बिमोड केला. पुरुषांचे वर्चस्व असू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले. पूर्वी कामगारांचे वारस म्हणून मुलगी किंवा सुनेलाही लावले जात असे, पण आता मुलग्यांना वारस म्हणून लावण्याचे प्रमाण जास्त आहे. पूर्वी झाडूवाल्या महिलांची संख्या लक्षणीय होती आणि युनियनच्या कामात त्यांचा सहभाग होता आणि आजही आहे. पण एकदा तो शोध घेऊन गेल्या काही वर्षात महिला कामगारांच्या संख्येत किती फरक पडलाय त्याची आकडेवारी काढायला पाहिजे.

महिला आणि पुरुषांच्या संघटन क्षमतेमध्ये काही फरक असतो का?

नाही, महिला सुद्धा जिद्दीने काम करतात. आता आमच्या शोभाताई बनसोडे यांचं उदाहरण घेऊया. आम्ही काही दिवसांपूर्वी युनियन ची वार्षिक वर्गणी तीनशे रुपये केली त्यावेळी त्यांनी कामगारांना प्रत्यक्ष भेटून साडेचार हजार फॉर्म भरून आणले. हे मोठं जिकिरीचे काम होतं! म्हणजे कामगारांची हजेरी एका ठिकाणी असते, त्याचं काम दुसरीकडे असतं. एखादा माणूस नक्की कुठे आहे त्याला शोधून काढून, भेटून तो फॉर्म देऊन परत दुसर्‍यांदा जाऊन फॉर्म भरून आणणे हे कठीण काम असते. एकतर कामगारांना युनियन बद्दल फार जाणीव असते - असे नाही. कधीकधी फॉर्म दिल्यावर कामगार अपमान देखील करतात. ते म्हणतात कशाला आलात आमच्याकडे? काय करते युनियन ? कशाला आमचे एवढे पैसे घेतात - असं काहीही बोलू शकतात. खरंतर महिन्याला पंचवीस रुपये म्हणजे काही फार मोठी वर्गणी नाहीये. नव्या सरकारी धोरणामुळे कामगारांचे पाच ते आठ हजार नुकसान होणार आहे, त्यासाठी आम्ही हायकोर्टात केस टाकली आहे. हायकोर्टाच्या वकिलांची एकेका तारखेची फी केवढाली असते, एवढा खर्च युनियन कशी करणार? हे सगळं सामान्य सभासदाला समजावून सांगायचं काम या महिला देखील जिद्दीने करतात.

तुम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा आपल्याला काय करायचं हे मनात असेलच, ते पूर्ण झाल्यासारखं तुला वाटतं का? की अजून काही व्हायला पाहिजे?

मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा आप्पासाहेब भोसले होते. समाजवाद आणि लालबावटा यांच्या उतरणीचा कालखंड सुरू झाला होता. 93 ते 95 साली जागतिकीकरणाचे पडघम वाजायला लागले होते. सोव्हिएत युनियन संपलं होतं. त्याचे डायरेक्ट परिणाम कामगारांच्या विश्वासावर नाही झाले - आपल्याला लालबावटा न्याय देणार हा विश्वास काम होता! पण आता शहरे ज्या पद्धतीने वाढली आहेत त्यामुळे पूर्वीच्या पद्धतीने संप करणं शक्य होत नाही. आता युनियनचं गुडविल वाढल्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न टेबलावरच सुटू शकतात. रोजंदारीच्या मुद्द्यावर आम्ही कार्पोरेशनशी भांडलो. पण आता कंत्राटीकरणाचा लढा आहे, आता कंत्राटदारांना एकदा पैसे दिले की पालिका हात वर करते. महिला देखील कंत्राटी कामगार आहेत. कंत्राट संपल्यावर नवीन कंत्राट येईपर्यंत चार-चार महिने जातात आणि त्या तशाच काम करतात. पण जर त्या चार महिन्यात एखादी महिला गेली तर कंत्राटदार हात झटकतो. अशी केस झालेली आहे - एक कंत्राटी कामगार बाई एक्सीडेंटमध्ये वारली. जर ती कायम सेवक असती तर तिच्या वारसापासून तिच्या सर्व गोष्टींकडे पाहावं लागलं असतं, पण कंत्राटदाराला हे काहीच लागू नाही. खाजगीकरणामुळे कामातली सुरक्षितता देखील कमी झाली. समस्या काही संपत नाहीत. शिक्षणाचे प्रमाण फारसं वाढलं नाहीये. बेकारी आणि शिक्षण यांचं गुणोत्तर काय आहे? अनस्कील्ड कामाविषयी तुच्छता असते आणि ह्या लोकांना नावं ठेवली जातात, असं खूप वाईट चक्र सुरू असते. ही दुष्ट नीती जागतिकीकरणातून पुढे आली आहे. कष्टकऱ्यांच्या जीवावर काम चालते पण जबाबदारी मात्र घेतली जात नाही. हे सगळ्याच ठिकाणी सुरू आहे.

सध्या तुम्ही सफाई कामगारांचे कलापथक, नाटक, गाणी वगैरे उपक्रम सुरू केले आहेत त्याचा काय उपयोग होतो?

आमची युनियन फक्त कामाच्या मर्यादित असलेले प्रश्न सोडवणारी नाही तर युनियन जीवनाच्या सर्व अंगांना भिडेल असे काम करावे असा आमचा दृष्टिकोन आहे. त्याच विचाराने गो.पु.देशपांडे यांनी जोतिबा फुले यांच्यावर लिहिलेल्या 'सत्यशोधक' या नाटकाची निर्मिती केली होती. आमच्या संघटनेतल्या ममगारांच्या द्वारे पुण्यातल्या कचर्‍याच्या प्रश्नावर संशोधनात्मक प्रकल्प देखील आम्ही सुरू केला होता.


युनियन म्हणजे काही दुकानदारी नसते. युनियनला व्यापकपणे कामगारांचे प्रश्न समजले पाहिजेत. युनियन म्हणजे तळागाळातल्या माणसांची एक जातीधर्मविरहित संघटना आहे! कामगारांकडे बार्गेनिंग पॉवर शून्य असते त्या हक्कहीन कामगारांचा आवाज म्हणजे युनियन असतो. त्यांचा आवाज बुलंद ठेवणे, त्यांना हक्कांबद्दल जागरूक ठेवणे, सामाजिकतेचे भान देणे - यासाठी आम्ही हे असे उपक्रम राबवतो.

तुम्ही हे काम सुरू केलं तेव्हा – ‘तुम्ही पांढरपेशे लोक, तुम्हाला आमचे प्रश्न काय कळणार’ - असं ऐकावं लागलं का?

हो! अगदी सुरूवातीला अशा प्रतिक्रिया होत्या. पण सुरुवातीच्या काळात मला अप्पासाहेबांच्या कडून खूप शिकायला मिळालं. त्यांचा खंबीर पाठिंबा होता. ते जनरल सेक्रेटरी म्हणून खूप कृतीशील होते. काही कामगारांच्या तक्रारी असायच्या, काहींना वाटायचं की ही युनियनने नोकरीवर ठेवलेली बाई आहे. त्यांना वाटायचं आत्ताच्या आत्ता हिने हे काम करून द्यावं, त्यावरून कधीतरी कामगार कार्यकर्त्यांशी वाद सुद्धा झालेले आहेत. ‘या बाईला मराठी तरी बोलता येत असेल का?’ - अशा सुद्धा प्रतिक्रिया येत असत! कधी प्यायलेले कामगार असायचे, माझ्याकडे बघून युनियनला शिवीगाळ करायचे - हे सुद्धा मी अनुभवलं आहे. पण तेच कामगार नंतर पावती फाडायला यायचे आणि मेंबर व्हायचे. अनेक सांस्कृतिक गुंतागुंती असतात. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे, कार्यकर्तेपण तयार झाले आहे. आता माझ्याकडून दारोदार फिरणं होत नाही.

आता नवीन कार्यकर्ते आणि लीडर्स तयार होताना दिसतात का?

हो! किमान वॉर्ड ऑफिसच्या लेव्हलला तरी कार्यकर्त्यांचा चांगला संच आहे. मला रोज जायची गरज पडत नाही. ते छोटे छोटे प्रश्न सोडवू शकतात. आम्ही शिबिरे घेतो, त्यांचं बळ वाढवतो, ते अधिकाऱ्यांशी जाऊन बोलतात आम्ही इतर लोकांनाही जोडून घेतो. सध्या उदय भट अध्यक्ष आहे; युनियन च्या माध्यमातून काही वेगळं करावं अशी संधी त्यांच्यामुळे मला मिळते आहे. नाहीतर ‘गॅलेलियो’ सारखं नाटक करणं खूप मुश्कील आहे! हळूहळू कार्यकर्ते प्रश्न सोडवायला तयार झालेत. पुण्यामध्ये अठरा हजार कामगार कमी पडतात. कंत्राटी कामगारांना सुद्धा आम्ही सामावून घेत आहोत. कायम कामगारांना आम्ही सांगीतलेले आहे की आपण एकाच छताखाली काम करतो पण त्यांना कमी पगार आहे त्यांना संघटित करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि आम्ही खूप सदस्य केलेत. त्यांच्या कंत्राटात काय आहे, अटी पाळल्या आहेत का, फंड दिला आहे की नाही - हे बघणं असं खूप काम आहे. किमान वेतन मिळत नसेल तर भांडण करायला लागते. युनियनची दीडशे लोकांची कार्यकारणी असते. सचिव पदाधिकारी असे जवळजवळ 51 लोक आहेत. आमच्या शोभाताई उपाध्यक्ष आहेत. कार्यकर्त्यांना असं वाटतं त्याकडे तीस टक्के महिला कृतिशील असल्या पाहिजे आणि असा प्रयत्नही सुरू आहे. युनियनच्या कामात सगळ्यांचा गुणवत्तापूर्ण सहभाग हे सर्वांनाच आव्हान आहे. युनियनला जसा जात, वर्ग किंवा भाषेच्या भेदाचा रंग देता येत नाही - तसाच जेंडरचा ही रंग दिला जाऊ नये. पण तरीही महिलांसाठी निराळा विचार करायची गरज असते. विशाखा जजमेंट प्रमाणे काम करणारी आम्ही पहिलीच युनियन असू. कारण ते आल्याआल्या आम्ही कॉर्पोरेशन मधला एक प्रश्न हाती घेतला आणि सोडवला. तरी करण्यासारखं अजून खूप आहे, बायकांमध्ये जास्त काम करायला हवं आहे!

Thank You सोहैला!



मी एका कट्टर स्त्रीवादी आईची मुंबईत वाढलेली कट्टर स्त्रीवादी मुलगी आहे. त्यामुळे आयुष्यभर स्त्रीवादी असण्याचे भरपूर फायदे तसेच तोटे सुद्धा मी बघत आणि अनुभवत आले आहे. सुरुवातीची बरीच वर्षं नकळत आणि गेली दोन चार वर्षं मात्र समजून, जाणीवपूर्वक - मी स्त्रीवाद शिकण्याचा आणि अंगात भिनवून घ्यायचा सुद्धा प्रयत्न करते आहे. स्त्रीवादी पुस्तकं/कादंबर्‍या वाचणं, स्त्रीवादी संस्थांची फेसबुका पेजेस वाचत रहाणं, त्यांचे इव्हेंट्स आटेण्ड करणं, शिवाय रोजच्या आयुष्यात सहन कराव्या लागणार्‍या सेक्सिझमविषयी , स्त्रीवादी व्यक्तीच्या वाट्याला येणारा एकटेपणाबद्दल आणि पुरुष किती ओव्हर प्रिविलेज्ड आहेत हयाबद्दल माझ्या आईशी - वंदनाशी गरमागरम चर्चा झाडणं, सेक्सीस्ट मित्र-मैत्रिणींशी भांडणं करणं इत्यादी अनेक गोष्टी मी करत रहाते. ही एक भरपूर वैताग आणि कंफ्यूजनने भरलेली पण मजेदार अशी प्रोसेस असते. सिनेमांमध्ये, गाण्यांमध्ये, लोकांच्या साध्या साध्या वागण्या बोलण्यामध्ये सेक्सीझम दिसला लागला, की समजावं आपण बरोबर शिकतोय!

असाच अभ्यास करता करता मला थोडे दिवसांपूर्वी एक पुस्तक सापडलं. झालं असं की काही दिवसांपूर्वी “POINTOFVIEW” संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला गेले होते. त्या कार्यक्रमात सोहैला अब्दुल्लाली हिची मुलाखत होणार होती. शिवाय सोहैलाने तिथे तिच्या ताज्या पुस्तकातला काही भाग वाचून दाखवला. 

पुस्तकाचं नाव आहे - ‘What we talk about when we talk about RAPE.’ 










जगभरातल्या अनेक लोकांशी बोलून आणि मुख्य म्हणजे स्वत:चे अनुभव सांगत हे पुस्तक तयार झालेलं आहे. सोहैलाने तिच्या पुस्तकात ह्यातले इतके छोटे छोटे बारकावे स्पष्ट करून दाखवले आहेत की हे पुस्तक खरंच मुलांच्या अभ्यासक्रमात का नाही असं मला हे पुस्तक वाचताना राहून राहून वाटत राहिलं! माझ्या मते – ‘बलात्कार संस्कृती’ हा स्त्रीवादाच्या अभ्यासक्रमातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा धडा आहे. कारण बलात्कार हा फक्त गुन्हा नसून ती एक संस्कृती आहे. अगदी मुलग्यांना रडू न देणे इथपासून ते एखाद्या व्यक्तिबरोबर जबरदस्तीने संभोग करणे इथपर्यंत सगळ्याचा ह्या बलात्काराच्या संस्कृतीत समावेश होतो. म्हणून ह्या पुस्तकाची ओळख करून देणं आणि सोहैलाचं तोंड भरून कौतुक करणं हा ह्या लेखाचा उद्देश.

सोहैला ही एका उच्च मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबातली मुलगी. जवळपास सदतीस वर्षांपूर्वी, तिला बोस्टन युनिवर्सिटीत अॅडमिशन मिळाली होती आणि अमेरिकेतच स्थायिक होण्याची तिच्या कुटुंबाची जवळपास सगळी तयारी झाली होती. त्यावेळेस सोहैला साधारण सतरा वर्षांची होती. भारतातून अमेरिकेला निघण्यापूर्वी एका संध्याकाळी ती आपल्या एका मित्राबरोबर फिरायला गेली होती. तिथे चार हट्ट्याकट्ट्या पुरुषांनी या दोघांना घेरलं. चाकूचा धाक दाखवून ही माणसं दोघांना एका सुनसान टेकडीवर घेऊन गेली. त्यांना बेदम मारहाण केली आणि सोहैलावर बलात्कार केला. सोहैला आणि तिचा मित्र ह्या माणसांच्या हाता पाया पडले, ‘आम्ही कोणाला काही सांगणार नाही’ अशा वारंवार शपथा घेतल्या, तेव्हा कुठे कित्येक तासांनी त्यांनी दया येऊन ह्या दोघांना जिवंत सोडून दिलं.

पुस्तकाच्या पहिल्याच चॅप्टरचं नाव ‘who am I to talk?’ असं आहे. आपला अनुभव सांगितल्यावर सोहैला म्हणते की त्या बलात्कारानंतर जे घडलं, ते जास्त महत्त्वाचं आहे. तीन वर्षांनंतर अमेरिकेत सोहेलाला तिच्या पदवीपूर्व प्रबंधासाठी एक अनुदान मिळालं. विषय- भारतात होणारे बलात्कार. संशोधनासाठी ती पुन्हा भारतात आली, अनेक स्त्रीवादी बायकांना तसंच बलात्काराला बळी पडलेल्या बायकांना भेटली, ‘मानुषी’ नावाच्या महिलांसाठीच्या मासिकामध्ये स्वतःच्या बलात्काराच्या अनुभवाबद्दल स्वत:चे नाव न लपवता लेख लिहिला आणि प्रबंधही पूर्ण केला. पुढे कॉलेज संपल्यावर तिला केंब्रिजमधल्या रेप क्रयसिस सेंटरमध्ये नोकरी मिळाली. तिथे तिने बलात्काराला बळी पडलेल्या बायकांचं समुपदेशन केलं, निधी उभे केले, डॉक्टर/पोलिस/शिक्षकांना प्रशिक्षण दिलं आणि हे सगळं करता करताच स्वतः सुद्धा कित्येक महत्त्वाचे धडे शिकली. वेगवेगळ्या नोकर्‍यांमधून आणि नात्यांमधून जाताना ती पुन्हा पुन्हा लैंगिक हिंसेच्या मुद्द्याकडेच येत राहिली, जीव तोडून काम करत राहिली. त्यामागचं कारण तिला आलेला तो अनुभव नसून तिची ह्या विषयाबद्दलची आस्था हे होतं. एका भयानक अनुभवाशी सामना करायची ही किती धाडसी पद्धत आहे... तर ही आहे सोहैला.
तिच्या पुस्तकातले मला सगळ्यात जास्त आवडलेले आणि कळलेले मुद्दे मी इथे मांडणार आहे.

अब्दुलाली गाईडलाईन्स.

हा माझा ह्या पुस्तकातला सगळ्यात आवडता भाग आहे. ‘अब्दुलाली गाईडलाईन्स’ म्हणजे बलात्काराला बळी पडलेल्या बायकांशी कसं वागावं आणि कसं वागू नये जेणेकरून त्यांचा त्रास वाढणार नाही, हयाबद्दलच्या सोहैलाने दिलेल्या सूचना. 
उदा. तिचा अनुभव ऐकून भयचकित व्हा. पण एकदम चक्कर येऊन पडू नका. नाहीतर तिलाच तुम्हाला सावरावं लागेल. तिच्यावर विश्वास ठेवा. पण, ‘जर’ ‘तर’ हे शब्द मुळीच वापरू नका. फक्त तिच्यावर विश्वास ठेवा.तिला काय हवं हे विचारा. अंदाज बांधण्याची काही गरज नाही. तिला मदत घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. पण जबरदस्ती करू नका.
किती साध्या गोष्टी आहेत ह्या...! हे वाचताना माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे कुठलीही
तक्रार करायची असेल तर नुसतं ‘मला खूप त्रास होतोय’ एवढं म्हणणं पुरेसं नसतं. तर तो त्रास
सिद्ध करावा लागतो. नाही का? बलात्कार ही तर खूप लांबची गोष्ट राहिली पण साधं एखाद्या मैत्रिणीला जरी आपण सांगितलं की अमुक अमुक मुलाने माझा अपमान केला तरी ती ‘पण त्याच्या वागण्याचा अर्थ असा नसेल, तसा असेल’ असं एकदा तरी म्हणून बघते. एखाद्या पुरुषाला आपण आपल्या छातीकडे बघताना पाहिलं तरी आपण आपले कपडे सावरतो. का? ही वृत्ती कुठून जन्माला येते? आणि तिचा बलात्काराच्या ह्या संस्कृतिमध्ये किती मोठा वाटा आहे!
त्रास कमी करण्याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करणं असा होत नाही. ही साधी गोष्ट आपण शिकलो तर कित्येक बळींचे मानसिक कष्ट कमी होतील.

बलात्काराचे समर्थन

बलात्कार हा जरी इतर सर्व गुन्ह्यांसारखा असला की ज्यात बळी आणि गुन्हेगार असतात तरीसुद्धा तो असा एकमेव गुन्हा असावा जिथे बळीला दोष दिला जातो. सोहैलाने ह्या पुस्तकासाठी खूप लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात तिचे मित्रमैत्रिणी, डॉक्टर, वकील आणि बलात्काराला बळी पडलेल्या अनेक बायका अशा सगळ्यांचा समावेश आहे. एका माणसाला तिने विचारलं ‘तू बलात्कार करण्याची कल्पना करू शकतोस का?’ 
त्यावर तो म्हणाला - ‘नाही. मी खून करण्याची कल्पना करू शकतो, पण बलात्कार करण्याची कल्पना नाही करू शकत.’ सोहैलाने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आणि मी सुद्धा. खरंच, खुनाचं समर्थन करता येऊ शकतं. कोणाचा राग खूपच अनावर झाला तर खून केला जाऊ शकतो, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खून केला जाऊ शकतो, बलात्कार होण्यापासून थांबवण्यासाठी खून केला जाऊ शकतो. पण बलात्कार? एखाद्या व्यक्तीची मर्जी नसताना तिच्याबरोबर जबरदस्तीने संभोग करणे ह्याला काहीही समर्थन असू शकत नाही. ह्यावरून लक्षात येतं की बलात्कार हा किती वेगळ्या प्रकारचा गुन्हा आहे आणि त्याला किती वेगळ्या प्रकारच्या उपचारांची गरज असते. फक्त बलात्कार करणार्‍याला शिक्षा होणं पुरेसं नसतं तर बळीशी संवेदनशीलपणे वागणं, तिला शारीरिक, मानसिक मदत पुरवणं आणि मुख्य म्हणजे ह्यात तिची काहीही चूक नाही हे सांगणं ह्या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात. पण आपला समाज अजून ह्यापासून बराच लांब असावा. मदत तर सोडाच, पण पोलिस आणि डॉक्टरांचं वागणं हे सुद्धा पीडितेला शिक्षा दिल्यासारखंच असतं.

प्रतिबंधात्मक उपाय (Rape prevention)
हा भाग वाचायला मी खूप उत्सुक होते. बलात्कार प्रतिबंध म्हणजे सोहैलाला असं कोणतं जादूचं रहस्य सापडलंय जे अजून कोणालाच सापडलं नाहीये? कदाचित इतकी वर्षं बऱ्याच बलात्कारपीडितांशी बोलून तिने बलात्कार होऊ नये म्हणून अजून एखादी गाईडलाइन तयार केली असावी. खरच ही वापरल्यावर भारतात, जागात बलात्कार होणं बंद होईल? हे सगळं डोक्यात सुरू असताना मी हा चॅप्टर वाचायला घेतला आणि फुस्स! फक्त मनातला उपरोध बाहेर काढण्यासाठी लिहिलेला एक छोटासा चॅप्टर निघाला. आणि बलात्कार प्रतिबंध म्हणजे काय, तर घरात थांबा, अनोळखी माणसं टाळा, पण नको. बलात्कार घरात सुद्धा होऊ शकतो त्यामुळे घरात थांबू नका, कुटुंबातल्या माणसांना पण टाळा. फार मैत्रीपूर्ण वागणं टाळा नाहीतर तुमच्या बलात्काऱ्याला आमंत्रण दिल्यासारखं वाटू शकतं. पण फार मैत्रीपूर्ण नसणं सुद्धा टाळा नाहीतर तुमच्या बलात्काऱ्याला आव्हान दिल्यासारखं वाटू शकतं. पण हे सगळं जरी जरी टाळलं तरीसुद्धा तुमच्यावर बलात्कार होऊ शकतो. त्यामुळे शक्य झालं तर अस्तित्वात असणंच टाळा. म्हणजे प्रश्नच मिटला. खरंच, आपल्यावर बलात्कार होऊ द्यायचा नसेल तर ह्या वरच्या उपायांव्यतिरिक्त काहीच उपाय नाहीयेत. आणि कटू सत्य हेच आहे की आपल्यावर बलात्कार झाला किंवा व्हायला लागला तर प्रत्यक्षात आपण काहीही करू शकत नाही. अगदी आपण जिवंत सुटण्याचीसुद्धा काहीच शाश्वती नाही. 

पुस्तकाचा शेवट करताना सोहैला म्हणते, ‘I don’t care if I’m a mad dreamer but I think a world without rape is possible.’ ती म्हणते की तिचा अजूनही माणुसकीवर विश्वास आहे. आपल्याला ह्या समस्येवर अजून उपाय सापडलेला नसला (तो कधी सापडेल, काय असेल कुणास ठाऊक!) तरी आपण एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय तो सापडणारही नाहीये. तिच्या मते आपण माणसं एकत्र येऊन बलात्कारविरहित जग तयार करू शकतो. ह्या पुस्तकातल्या मला आवडलेल्या खूप सार्‍या मुद्द्यांपैकी हे झाले अगदी थोडे मुद्दे. पण एवढ्याने सुद्धा मला खाडकन डोळे उघडल्यासारखं वाटलं. ह्या पुस्तकामुळे बलात्कार आणि त्याच्या संस्कृतीबद्दलची माझी समजच बदलून गेली. एकीकडे ह्या समाजाबद्दलची आणि पुरुषांबद्दलची माझी भीती अजूनच वाढली असली तरीही दुसरीकडे आपल्यावर बलात्कार होण्यात आपली काही म्हणजे काहीही चूक नाही, ह्याची परत एकदा नव्याने जाणीव सुद्धा नक्कीच झालेली आहे. सोहेलाच्या पुस्तकातून मी कितीतरी शिकले आहे. उदाहरणार्थ आपल्यावर बलात्कार झाला म्हणून आयुष्य संपत नाही. किंवा, तीच आपली ओळख सुद्धा बनून राहण्याची गरज नाही. आपण आपल्याला हवं तसं यशस्वी आयुष्य घडवू शकतो. माझी खात्री आहे की सोहेलाचं पुस्तक मी जितक्या वेळा वाचेन तितक्या वेळा मला त्यात काहीतरी नवीन नवीन सापडत राहील. म्हणून पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतं – Thank You Sohaila! मला लेखक म्हणून आणि व्यक्ति म्हणून सुद्धा समृद्ध केल्याबद्दल. Thank you very very much!












मुक्ता खरे 

तरुण स्त्रीवादी रंगकर्मी आणि लेखिका. मराठी वृत्तपत्रातून लेख प्रकाशित झाले आहेत. अनेक लघुपटातून आणि योनीच्या मनीच्या गुजगोष्टी या नाटकात सहभाग.