“मला माहितीये” म्हणत - मी स्वतःला त्या तुडूंब भरलेल्या दरवाज्यातून धक्का देतच आत ढकललं.
“कुठे उतरायचंय हिला?” बायका मला न विचारता एकमेकींना विचारत होत्या.
“मला वसईला उतरायचंय” असं मी त्यांना सांगितल्यावर एक साधी अपेक्षा होती की, आता चर्चा थांबेल.
पण, माझी अपेक्षा सपशेल फोल ठरली.
“यांच्यासाठी अपंगांचा डब्बा असतो ना? मग तिथे का नाही गेली ही?”
“बघ ना. आधीच गर्दी त्यात आता ही.”
“आणि काय गं तू डायरेक्ट लेडीजमध्ये बरी शिरलीस? आम्ही चुकून आलो तुमच्या डब्ब्यात तर सगळे आम्हांला किती बडबडतात”
तेव्हा मी थोडी भिडस्त होते. पटकन तोडून टाकणं शक्य व्हायचं नाही. तरी चेहरा मात्र मी कोरा ठेवून होते.
मच्छीवाली मावशीने सडेतोड हल्ला चढवला, “ती बाई हाय, ते दिसतंय ना? न यो डब्बा तुमचा नाही सगळ्या बायकांचा हाय.” - त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणिव झाली की, मी आधी स्त्री आहे आणि मग अपंग आहे ...
बँकिंग क्षेत्रातला दीर्घ अनुभव असलेल्या अंजलीताईंनी मोकळेपणाने सांगितलं, “मी कॉलेजपासून तशी जवळच रहात होते. हातात क्रचेस घेऊन चालत कॉलेजला जायचे. मला असं चालत जाताना पाहणारे अनेक लोक असायचे पण, सोबत चालत येणारे अगदी मोजकेच. त्या वेळी वाटायचं - मी दिसायला छान आहे, हुशार आहे, स्वतंत्र आहे, शेअरिंग करायला कधीतरी मैत्रिणीही आहेत, गप्पा मारायला अगदी सिनेमाला जायलाही मित्र आहेत. पण, माझ्या हातात क्रचेस असल्यामुळे मी 'गर्लफ्रेंड' मात्र होऊ शकत नाही. हे मनातला न्यूनगंड वाढवणारं आणि फीलिंग असतं.” धडधाकट पुरुषाला तर अपंग बायको नकोच असते, पण अपंग पुरुषालाही सहसा अपंग बायको नको असते.
अगदी लहानसहान बाबींमध्येही अपंग स्त्रीचं बाईपण नाकारलं जातं. एकदा मी आणि लेखिका सोनाली नवांगूळ एका ऑनलाइन कार्यक्रमानंतरच्या चर्चेत रंगलो होतो. आम्हा दोघींचं अपंगत्व निराळं असल्याने अवेळी झालेल्या रक्तस्त्रावाबद्दल मला कसं कळतं आणि तिला कसं समजतं असा काहीसा विषय होता. यावरून आम्ही पोहोचलो ते चड्ड्या आणि ब्रा यांच्या वापरापर्यंत. त्यातले ब्रॅंड्स, सोयी-गैरसोयी अशी वळणं घेत आमचं बोलणं पोहोचलं लॉंजरी शॉपिंग पर्यंत.
मी म्हटलं, “असं फक्त लॉंजरीजसाठीचं शॉप असतं?” मला तर हे माहितीच नव्हतं. माझ्या अपंगत्वामुळे आलेली ही मर्यादा होती. पण, सोनालीताईचा किस्सा आणखीनच वेगळा आहे! तो अधिक बोलका, विचार करायला प्रवृत्त करणारा आहे.
![]() |
| सोनाली नवांगुळ |
एखाद्या व्यक्तीला अपंगत्व थोडंफार दुबळं करतं. अशात, त्यांच्या अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन त्यांचा शिक्षणाचा, संपत्तीचा, कुटुंबातल्या निर्णय प्रक्रियेतला हक्क आणि सहभाग डावलला जातो. शारीरिक दुर्बलतेमुळे घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणीही अपंग स्त्रीला लैंगिक त्रास सहन करावा लागतो. अपंगत्वामुळे आलेली असुरक्षिततेची भावना समाजात वावरताना अधिक ठळक होते. म्हणून अपंग स्त्रीच्या हक्कांबद्दल किमान बोललं तरी पाहिजेच. आता समाज माध्यमांतून व्यक्त होता येत असल्याने अपंगांच्या प्रश्नांना थोडातरी आवाज मिळायला लागला आहे. आपसूकच अपंग स्त्रीचे प्रश्नसुद्धा आपल्यासमोर या माध्यमातून येत राहतील. प्रत्येक माध्यमातून यावर चर्चा मात्र होत राहिलीच पाहिजे!


